Tuesday, September 20, 2011

बालकथा जंगली पोपट

      एक शिकारी होता. त्याचं नाव गबरू. एक दिवस तो शिकारीला बाहेर पडला. सकाळची संध्याकाळ झाली, पण त्याला शिकार काही मिळाली नाही. शेवटी माघारी परतताना वाटेत त्याला एक मोठे घनदाट जांभळाचे झाड दिसले. त्यावर बरेच पक्षी बसले होते. गबरुने आपले जाळे फेकले. काही पक्षी उडाले, पण काही जाळ्यात फसले. त्यात एक सुंदर पोपटसुद्धा होता. तो घाबरला होता.
     पोपट गबरुला म्हणाला," मी तर इवला इवला पक्षी. मला मरू नको. मला सोडून दे. माझीसुद्धा छोटी-छोटी बाळं आहेत. माझी वाट पाहत असतील."  गबरु पोपटाची आर्जव ऐकली . पहिल्यांदाच एखाद्या शिकारवर त्याला दया आली. त्याने विचार केला, ' याला विकून टाकू. त्यामुळे त्याचा जीव  वाचेल आणि मला दामसुद्धा मिळेल.'
     असा विचार करून शिकार्‍याने पोपटाला बाजारात नेले. सुंदर पोपटाला एका शेठने विकत घेतले. त्याच्यासाठी एक पिंजरा आणवून दुकानाबाहेर दरवाज्याला लटकावले. शेठ त्याला संध्याकाळी घरी नेत असे आणि दुसर्‍यादिवशी दुकानात आणत असे. काही दिवसांनी त्याला पोपटाचा कंटाळा आला.  एक दिवस शेठ पिंजरा सोबत घेऊन भाजीमंडईत गेला. तिथे पोपटाची दृष्टी मिरच्यांच्या ढिगार्‍यावर गेली. पोपट ओरडला, " मिरची..मिरची."
     भाजी विक्रेत्याला पोपटाचे बोल आवडले. त्याने पोपटाला विकत घेण्याचा  निश्चय केला. भाजीवाल्याने वीस टक्याला पोपट विकत घेतला. त्याने पिंजर्‍यासह पोपटाला घरी आणले. त्याच्या घरात त्याची बायको आणि मुलगा असे दोघेच होते. मुलाचे नाव बिरजू होते.
एक दिवस नगरचा राजा नगरीत भ्रमण करत होता. काही दिवसांनी शेजारच्या राजाशी युद्ध होणार होते. शत्रू राजाने युद्ध पुकारले होते. राजाच्या स्वागताला प्रजा रस्त्यावर उभी होती. बिरजूसुद्धा आपल्या पोपटासह आपल्या दारात उभा होता. राजा जवळ येताच पोपट म्हणाला, '' राजाचा विजय असो. राजाचा विजय असो."
पोपटाची गोड शुभवाणी ऐकून राजा आश्चर्यात पडला. पोपट राजाच्या हातात आल्यावर म्हणू लागला, '' माझा मालक राजा आहे. माझा मालक राजा आहे."
     राजाने बिरजूला पुष्कळसे धन दिले आणि पोपटाला आपल्यासोबत नेले.  राजा पोपटाला आपल्यासोबतच ठेवत असे. पण काही दिवसांनी पोपटाला राजमहालाचा कंटाळा आला. त्याला आपल्या मुला-बाळांची आठवण येऊ लागली. तो उदास राहू लागला. राजाने त्याला कारण विचारले. पोपटाने आपली सगळी हकिकत राजाला सांगितली.
दुसर्‍यादिवशी राजा पोपटाला घेऊन राजमहालाच्या गच्चीवर आला. पोपटाला आकाशात सोडून दिले. पोपट उडत उडत म्हणाला, '' राजाचा आभारी राजाचा आभारी."  पोपट जंगलात आपल्या मुला-बाळात जाऊन पोहचला.  
                                                                                                                           _       मच्छिंद्र. ऐनापुरे,         gavakari ag.11           

No comments:

Post a Comment