हॉकीचा बादशहा : मेजर ध्यानचंद
ऐक्य समूह
Sunday, August 29, 2010 AT 02:16 AM (IST)
Tags: news
हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. आज (रविवार) मेजर ध्यानचंद यांची 105 वी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख...
मेजर ध्यानचंद हॉकीच्या मैदानात उतरत तेव्हा मैदानात असं काही मायावी इंद्रजाल विणत की त्यात विरोधी टीम अलगद फसायची. अर्थात विरोधी संघाचा पराभव केवळ सामान्य नसायचा तर तो ऐतिहासिक ठरायचा. आपल्या कसोटी क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर 10 गड्यांनी अथवा एका डावाने पराभव.
आपल्या देशाला हॉकीमध्ये तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक मेजर ध्यानचंद यांनी मिळवून दिले. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद शहरात झाला. प्रारंभीचे शिक्षण घेतल्यानंतर ते वयाच्या 16 व्या वर्षीच भारतीय सैन्य दलात दाखल झाले. सेवेत असतानाच त्यांनी भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ आणला. त्यांच्या जादुई खेळामुळे त्यांना हॉकीचे जादुगार म्हटले जाते.
एकदा ते इंग्रजांच्या दोन हॉकी संघांमध्ये सामना पाहत होते. त्यातला एक संघ खूपच वाईटरित्या हरणार अशी चिन्हे दिसत होती. तेव्हा ध्यानचंद आपल्या वडिलांना म्हणाले, "जर मी या संघात असतो तर सामन्याला कलाटणी दिली असती.' वडिलांनी त्यांना गप्प बसून सामना पाहण्यास सुनावले; परंतु दुसऱ्या संघाचा होत चाललेला पराभव त्यांना अस्वस्थ करत होता.
ते वडिलांजवळ मैदानात जाण्याचा हट्ट वारंवार धरत होते. इतक्यात त्यांच्या शेजारी बसलेला इंग्रज दरडावत म्हणाला, "हा काही शेंबड्या पोरांचा खेळ नाही. निमूट बस.' पण ध्यानचंद यांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आपली जिद्द कायम ठेवली. शेवटी त्या इंग्रजाने 14 वर्षांच्या ध्यानचंदला मोठ्यांच्या सामन्यात खेळायला पाठवले. मग काय, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात. तसंच घडले. ध्यानचंदने चार गोल करुन सामन्याचा नूरच पालटवला आणि या खेळापासूनच सुरू झाला ध्यानचंदच्या हॉकी खेळाचा अद्वितीय प्रवास...
ध्यानसिंह ते ध्यानचंद हा प्रवासही मोठा रंजक आहे. गोष्ट अशी की, भारतीय सैन्यात शिपाई असल्याने दिवसभराच्या भागदौडीत दिवसा हॉकीचा सराव करायला वेळ मिळत नव्हता. त्यामुळे रात्रीच्यावेळी सगळे झोपी गेल्यावर ध्यानचंद चंद्राच्या शीतल प्रकाशात हॉकीचा सराव करायचे. त्यामुळेच त्यांच्या कोचने त्यांना चंद्राची उपाधी दिली. "हा मुलगा हॉकी विश्वातला चंद्र बनेल', असे गौरवोद्गारही काढले आणि घडलेही तंतोतंत तसेच! ध्यानचंद यांच्या खेळाचा दिवाना "हुकुमशहांचा हुकुमशहा' ऍडॉल्फ हिटलरसुध्दा होता. ध्यानचंद यांच्या खेळामुळे प्रभावित होऊन त्याने ध्यानचंदना जर्मन सैन्यात फिल्ड मार्शल बनवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. ऑलिम्पिकमध्ये त्याकाळी भारताकडून केलेल्या 28 गोलपैकी 11 गोल एकट्या ध्यानचंद यांनी केले. ऑलिम्पिक आणि क्वालिफाईंग सामन्यांमध्ये 101 गोल करण्याचा तसेच अन्य आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 300 गोल करण्याचा विक्रमही त्यांच्याच खात्यावर आहे.
ऑलिम्पिकमध्ये तीनदा सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारतीय संघाचे ते अविभाज्य घटक होते. ऍमस्टरडॅम (1928), लॉस एंजेल्स (1932) ऑलिम्पिक-मध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या भारतीय संघाचे सदस्य राहिलेल्या ध्यानचंद यांनी बर्लिन (1936) ऑलिम्पिकमध्ये भारताला आपल्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.
निवृत्ती स्वीकारण्यापूर्वी त्यांनी ईस्ट आफ्रिकेविरुध्दच्या 22 सामन्यांमध्ये 61 गोल केले होते. न्यूझीलंड दौऱ्यात खेळल्या गेलेल्या 21 सामन्यांमध्ये भारतीय संघाने केलेल्या 192 गोलपैकी 100 हून अधिक गोल एकट्या ध्यानचंद यांच्या स्टिकने केले होते, शिवाय 21 पैकी 18 सामने जिंकले होते.
1936 सालच्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भारताने जर्मनीला जबरदस्त धक्का देत त्यांचा 8-1 असा पराभव केला होता. त्यातील 6 गोल एकट्या ध्यानचंद यांनी मारले होते. 1932 मधल्या सिंगल वर्ल्ड टूर दरम्यान त्यांनी 132 गोल केले होते. एखादा खेळाडू त्याच्या अख्ख्या कारकिर्दीत इतके गोल मारू शकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.
ध्यानचंद यांच्या हॉकी स्टिकला "जादुची काठी' म्हटले जायचे. कारणही तसेच होते. चेंडू त्यांच्या स्टिकपासून लांब जायचाच नाही. हॉलंड व जपानमध्ये त्यांची ही जादुची काठी तोडून त्याची विविध प्रकारे तपासणी केली होती. कारकिर्दीत एक हजारांपेक्षा अधिक गोल ठोकणाऱ्या ध्यानचंद यांचा पुतळा व्हिएन्ना येथे उभारला गेला आहे. त्यांच्या दोन्ही हातात चार हॉकी स्टिक्स आहेत. हा पुतळा त्यांच्या जादुई खेळाविषयी बरेच काही सांगून जातो.
भारत सरकारने 1956 मध्ये त्यांना "पद्मभूषण' किताबाने सन्मानित केले. शिवाय त्यांच्या नावाने नवी दिल्लीत स्टेडियम उभारण्यात आले आहे. भारतीय टपाल सेवेने त्यांचे चित्र असलेले टपाल तिकीट जारी केले. त्यांचा जन्मदिवस "राष्ट्रीय क्रीडा दिवस' म्हणून साजरा केला जातो.
- मच्छिंद्र ऐनापुरे, जत, जि. सांगली.
No comments:
Post a Comment