Tuesday, September 27, 2011

बालकथा भाऊबीजेची ओवाळणी

         गोष्ट खूप जुनी आहे. एका गावात रामधन नावाचा एक मोठा जमिनदार होता. त्याला चार मुलगे आणि एक मुलगी होती. यथावकाश मुलांचे विवाह झाले. जीवन काय असते, याची पक्की जाणीव रामधनला होती. त्यामुळे जसजशी मुलांची लग्ने होत गेली तसतशी त्यांची त्यांना वेगळी चूल मांडून दिली.शिवाय त्यांच्या हिश्श्यातील जमीनही देऊन टाकली. परंतु, त्यांना आपल्यापासून दूर केले नाही. आता मुले आपापल्या संसारात रमून गेली.  सगळ्यांसाठी आंगण एकच होते. अंगणात मुलांची  नातवंडं  प्रेमाने, जिव्हाळ्याने एकत्र खेळताना पाहून रामधनचं मन भरून यायचं. समाधान पावायचा.
       अलिकडे रामधनला एक गोष्ट फार सतावत होती. ती होती, एक जमीनीचा तुकडा. त्याने त्याची काळजी हिरावून घेतली होती. हा तुकडा सगळ्यांना वाटून राहिलेला होता. त्याची वाटणी करता येण्याजोगी नव्हती. त्याची वाटणी करून काही उपयोग होणारही नव्हता. पण इकडे चारही मुलांची नजर त्या छोट्याशा तुकड्यावर होती. प्रत्येकजण त्याच्यावर आपला हक्क सांगत होता.
       रामधनला याचीच काळजी वाटत होती की, हा तुकडाच घराची शांती हिरावून घेईल की काय? जमिनीचा हा तुकडा द्यायचा तर कुणाला, हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर होता. या काळजीने त्याची प्रकृती बिघडत चालली. इकडे भावाभावांमध्ये या जमिनीवरून कुरबूर सुरू झाली होती. रामधनच्या घरावर ज्यांची ज्यांची वाईट नजर होती, त्यांनी त्यांनी  भावाभावांना स्वतंत्रपणे  गाठून भडकावत आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करू लागली. त्यामुळे त्यांच्यात वितुष्ट  रुंदावत चालले.
      दिवाळीचा भाऊबीजेचा दिवस होता. चारही भावांची लाडकी , एकुलती एक धाकटी बहीण माधुरी ओवाळणीसाठी पतीसमवेत गावाकडे आली   होती.  पण वडिलांची खालावत चाललेली तब्येत पाहून ती काळजीत पडली. तिने आपल्या भावांमध्ये झालेला बदलही पाहिला. यावेळी तिला माहेरी आल्यावर पहिल्यासारखी मायेची , प्रेमाची अनुभूती आली नाही. आपल्या पतीशी तिने चर्चा केली. तिला चार दिवस माहेरी सोडून तो माघारी परतला.
     संध्याकाळी माधुरीने सर्व भावांना अंगणात बोलावून घेतले. वडिलांसमक्ष तिने जमिनीच्या तुकड्याचा विषय काढला. पण, त्यावर कुणीच काही बोलले नाही.  उलट विषयाला बगल देत तिला ओवाळणी कुठली द्यायची, हाच प्रश्न ते वारंवार विचारू  लागले.
माधुरी म्हणाली, " आज मी तुमच्याकडून माझ्या आवडीची भेटवस्तू तुमच्याकडून घेणार आहे. "
" बोल तुला कुठली वस्तू हवी आहे? आमच्या लाडक्या बहिणीला मागेल ती वस्तू देऊ." सर्वच भाऊ एकदम म्हणाले.
     माधुरीने तसे त्यांच्याकडून वचन घेतले.  माधुरी म्हणाली, " आपल्या गावात शाळा नाही. " थोरला भाऊ म्हणाला, " यात काय नवीव? आम्हाला तर माहितच आहे. मग पुढं...?"
    माधुरी म्हणाली, " बाबांजवळ जो जमिनीचा तुकडा आहे, तो तुमची इच्छा असल्यास शाळेसाठी पंचायतीला देऊन टाकू."
    माधुरीची ही गोष्ट ऐकून सगळेच भाऊ एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. माधुरी पुढे म्हणाली, " या शाळेत आपली मुले शिकतील. पुढं शिकून नोकरी  मिळवतील. याचा आपणा सर्वांनाच लाभ होईल."
    इतक्याच धाकटा भाऊ म्हणाला, " माझी काही हरकत नाही." मग सगळ्यांनीच होकारार्थी कौल देऊन टाकला. रामधनला तर अगदी गहिवरून आले. ज्या जमिनीच्या तुकड्यापायी  तो  सुख-चैन हिरावून बसला होता. त्या तुकड्याचा एका झटक्यात निकाल लागला. मनावरची चिंता एखाद्या पाखरासारखी भुर्रकन उडून गेली. रामधन म्हणाला,: पोरी, तू खूप हुशार निघालीस. माझी सारी काळजी एका झटक्यात मिटवलीस."
   दुसर्‍याच दिवशी सरपंच आणि अन्य पंचांना बोलावून घेऊन जमिनीचा तुकडा शाळेच्या नावाव्रर करून देण्यात आला. आता सगळे भाऊ गुण्यागोविंदाने राहू लागली.
   एका वर्षाने गावात शाळा सुरू झाली. शाळेला माधुरीचे नाव देण्यात आले. सुरुवातीला पाचवीपर्यंत वर्ग सुरू केले. आता उच्च माध्यमिक शाळाही सुरू आहे. आजूबाजूच्या गावातील मुलेही   इथे शिकतात. माधुरीने आपल्या भावाभावांमधल्या भांडणाचे मूळ उखडून टाकतानाच  एक चांगले, विधायक काम केले. आपल्याही आयुष्यात अशी संकटे येत असतात. पण आपण पैसा, जमीन्-जुमला यापेक्षा आपल्या माणसांना जवळ करायला हवे. होय ना ?   
                                                                                       - मच्छिंद्र ऐनापुरे, जत

No comments:

Post a Comment