Tuesday, September 20, 2011

बालकथा

बालकथा                                                      न्यायी राजा
राजा चंद्रसेन मोठा शूर, दानी आणि न्यायी होता.  अनोख्या न्यायाबद्दल त्याची ख्याती होती. चंद्रसेन राजाच्या राज्यात दुर्गापूर नावाचे एक गाव होते. तेथील प्रजा सर्वार्थाने सुखी होती. पण काही दिवसांपासून गावची झोप उडाली होती. गावात चोर्‍या हो ऊ लागल्या होत्या. गावात कोणी अनोळखी मुक्कामी राहिल्यास तर हमखास चोरी होत असे. त्यामुळे वाटसरू अथवा अनोळखी माणसाला गावात मुक्कामाला राहू दिले जात नसे.
एकदा एक ब्राम्हण कुठे तरी निघाला होता. प्रवासात अंधार पडल्याने त्याने दुर्गापूर गावात मुक्कम करण्याचे ठरविले. मात्र त्यास कोणी राहण्यास जागा दिली नाही. शेवटी खूप विनंती-विनवणी केल्यावर एका विणकर्‍याने त्याला राहण्यास परवानगी दिली. मात्र विणकर्‍याने बजावून सांगितले, कोणी परका गावात आला की हमखास चोरी होते. त्यामुळे सकाळी जाताना सर्व चिजा दाखवून पुढच्या वाटेला निघावं , हे चांगल.
ब्राम्हणाने अट कबूल केली. दोघेही अंथरुणावर पहुडले. विणकरास लागलीच झोप लागली परंतु, ब्राम्हण जागाच होता. नवी जागा, चोरीची भीती यामुळे त्याला झोप येत नव्हती.पहाटे पहाटेच्यावेळी डोळे जड हो ऊ लागले होते, तेवढ्यात घरात कोपर्‍यात कोणीतरी अंधारात चाचपडत असल्याचे त्याला दिसले. ब्राम्हण खडबडून जागा झाला. त्याने अंधारातच त्याठिकाणी झडप घातली. त्याच्या हाताला एक चोर लागला. चोर दरडावत म्हणाला, स्वतः ची पर्वा असेल तर मुकाट्याने मला सोड. तुला ठाऊक नाही, मी इथला पाहरेकरी आहे.
ब्राम्हणाने त्याच्या धमकीला भीक घातली नाही. उलट ब्राम्हण म्हणाला, ' तुला सोडलो तर सकाळी मलाच चोर समजलं जाईल'  दोघात झटापट झाली. ब्राम्हणाने  जखडून ठेवल्याने पाहरेकर्‍याने नवीन्च युक्ती काढली आणि ब्राम्हणाचा हात धरून जोरजोरात ओरडू लागला, चोर, चोर... धावा.. धावा
विणकर्‍यास आजूबाजूचे लोक धावले. पाहतात तर पाहरेकरी आणि ब्राम्हण. पाहरेकर्‍याने ब्राम्हणाचे हात धरलेले. लोकांनी पाहरेकर्‍याची बाजू घेतली. शेवटी न्याय राजाच्या दरबारात गेला. ब्राम्हणाने सारी हकिकत कथन केली. त्याच्या चेहर्‍यावरील विश्वास पाहून राजाने ब्राम्हण चोर नसल्याचे ताडले. तो निर्दोष आहे. परंतु, निर्दोष असल्याचा पुरावा दरबारास हवा होता. राजाने त्यांना तीन दिवसानंतर पुन्हा दरबारात येण्यास सांगितले.
तिसर्‍या दिवशी दोघेही दरबारात आले. तेव्हा राजाने दोघांनाही हुकूम सोडला. इथून एका मैलावर एक नदी आहे. त्याच्या काठावर कापडात एक मृतदेह गुंडाळून ठेवला आहे. तो तुम्ही दोघांनी अलगद दरबारात आणा. आल्यावर तुमचा फैसला सुनावला जाईल. सेवक आणि ब्राम्हण दोघेही निघाले. नदीच्या काठावर खरोखरच कापडात गुंडाळलेला मृतदेह होता. दोघांनी तो अलगद उचलला. परताना सेवक खुशीत होता.  तो म्हणाला,पंडीत महाशय, आता कसं वाटतंय. गेल्यावर चापकाचे फटके बसतील तेव्हा कळेल, माझ्याशी पंगा घेतोस काय?
बिचारा ब्राम्हण निराश झाला होता. तो एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, माझ्यासारख्या निर्दोषाला हकनाक गोवलंस. राजाची शिक्षा मी सहन करीन. पण वरचा देव तुला कदापि माफ करणार नाही. अशा भल्या-बुर्‍या गोष्टी ऐकत्-ऐकवत दोघे दरबारात पोहचले. त्यांनी मृतदेह खाली ठेवला. राजाने त्यावरील कापड हटवण्यास सांगितले. कापड हटवले गेले आणि काय आश्चर्य! मृतदेहाऐवजी एक जिवंत व्यक्ती उठून उभी राहिली.
वास्तविक राजाच्या सूचनेनुसार गुप्तहेर कापडात पहुडला होता. त्याने वाटेतला दोघांमधला संवाद राजापुढे कथन केला. ते ऐकून राजाने पाहरेकरी सेवकास शंभर फटक्याची तसेच तडिपारची शिक्षा सुनावली. ब्राम्हणाला काही धन देऊन राजाने त्याची सन्मानाने पाठवणी केली. यानंतर मात्र कधी दुर्गापूर गावात चोरी झाली नाही. .- मच्छिंद्र ऐनापुरे, जत  gavakari.sap.11

No comments:

Post a Comment