९/ ११ च्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण होत असतानाच त्याच्या बरोबर दोन दिवसांत तालिबानने अफगाणिस्तानातील काबूलमधल्या अमेरिका दूतावास आणि नाटो मुख्यालयाला निशाणा साधून आपला नापाक इरादा स्पष्ट केला आहे. न्यूयॉर्कच्या वर्ल्ड सेंटरवर ११ सप्टेंबर २००१ रोजी विमानांद्वारा केलेल्या हल्ल्यात दोन हजार ९८३ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर 'अलकायदा' आणि 'तालिबान'ला संपवण्याच्या इराद्याने अमेरिकेने अफगानिस्तानवर हल्ला केला होता.अद्याप ही मोहीम संपलेली नाही. नाटो सैन्याच्या सहाय्याने तिथे चाललेल्या कारवाईलाही आता दहा वर्ष पूर्ण होत आहेत. अमेरिकेने तिथल्या हजारो तालिबान्यांना मारल्याचा दावा केला असला तरी तेथील सध्याची परिस्थिती पाहता त्यामध्ये तिळमात्र फरक पडला नसल्याचे स्पष्ट होत आहे. ड्रोन हल्ल्यात हजारो तालिबानी अतिरेकी मारले गेले आहेत, हे वास्तव असले आणि काही महिन्यांपूर्वी 'अलकायदा'चा म्होरक्या ओसामा बिन लादेन यालाही अमेरिका सैन्याने एबटाबाद ( पाकिस्तान) मध्ये यमसदनी पाठवले असले तरी अफगाणिस्तान आणि पाक -अफगाण सीमा भाग आजही जगातला सर्वात धोकादायक क्षेत्र म्हणून ओळखला जातो आहे, हेही नाकारून चालत नाही. अलकायदासह अन्य काही दहशतवादी संघटनांनी अमेरिकेवर पून्हा तशाचप्रकारे हल्ला करण्याची धमकी दिली आहे. या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने ९/११ च्या दशपूर्तीनिमित्ताने ग्राऊंड झिरोवर आयोजित केलेल्या विशेष समारंभासाठी जागोजागी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. परंतु, हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या तालिबान्यांशी लढणार्या आपल्याच सैनिकांच्या सुरक्षततेसाठी मात्र अमेरिकेला काही करता आलेले नाही. ऑगस्टमध्ये तालिबान्यांनी अमेरिकेचे एक हेलिकॉप्टर पाडले होते. यात तीस अमेरिकी सैन्य मारले गेले. अमेरिका दूतावास आणि सैनिकांना यापूर्वीही अनेकदा तालिबान आणि अलकायदाने आपले लक्ष्य केले आहे. अमेरिकेला अफगाणिस्तानातून माघारी परतायचे आहे. तशी अमेरिकेने घोषणाही केली आहे. १०१४ पर्यंत आपण अफगाणिस्तानातून बाहेर पडू, असे सांगतानाच त्यांनी काहीशी मवाळ भूमिका स्वीकारत तालिबान्यांशी विचारविनियम करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण कट्ट्ररवादी तालिबान वेळोवेळी अशाप्रकारचे हल्ले करून आपल्याला अमेरिकेशी कोणत्याही प्रकारची बोलणी करायची नाही, असाच संदेश देत आहे. कारण त्यांचे अमेरिकेशी निर्णायक युद्ध सुरूच आहे, असे म्हटले जाते. काबूलमध्ये सहा ठिकाणी झालेले हल्ले अमेरिका आणि नाटो सैनिकांसाठी मोठे आव्हान देणारे आहे. त्यामुळे त्यांची लवकर सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत, अशीच एकूण परिस्थिती सांगते. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी नाटो सैन्याला अफगाणिस्तानात हमखास यश मिळेल, असा अलिकडेच दावा केला आहे. परंतु, तिथली एकूण परिस्थिती वेगळेच काही सांगत आहे. .. - मच्छिंद्र ऐनापुरे, जत surajya.solapur
No comments:
Post a Comment