Tuesday, September 20, 2011

दोन उदास चेहरे

दोन उदास चेहरे
प्रेमासारख्या प्रकरणांच्या आठवणींचा दरवाजा  सगळ्या शक्यतांचे द्वार बंद झाल्यावर आपोआप खुलतात.एका वयाच्या पावसाबरोबरच जुन्या प्रियेसीला याद करण्याचा मौसम सुरू व्हायला लागतो. मी खिडकीजवळ बसलो आहे. आणि बाहेर पाण्याबरोबरच आठवणींचा पाऊस कोसळू लागलाय. मन असं काही चिंब भिजून जातंय की, त्याचा कुणालाही पत्ता लागणं शक्य  नाही. पण आता कुणी टपकलंच तर मात्र लपवणं कठीण होऊन जाईल.सालं भयंकर आहे सारं.
ही पावसाळी हवा मोठी चुगलखोर आहे. नाही तर कोण कमबख्त बेइमान म्हणून घ्यायला तयार होईल. च्या आयला ! का बरं ऊना-तान्हात किंवा थंड मोसमात प्रियेसीची आठवण येत नाही. उन्हाळ्यात एक ठिक आहे. पण थंडीच्या दिवसात तिला यायला काय हरकत आहे? एकदा आठवणीचं प्रतिक म्हणून तिनं दिलेल्या स्वेटरमध्ये राहण्याचा जरूर प्रयत्न केला होता. त्याला अगदी जीवापाड आणि सगळ्याच्या नजरा चुकवून जपून ठेवला होता. पण कळलं की,  स्वेटरबरोबरच आठवणीसुद्धा टाइट झाल्या होत्या. दम घुटमळायला लागला तसा त्यातून पटकन बाहेर आलो. मग सारी थंडी वैधानिक स्वेटरमध्ये घालवली.
वास्तविक उन्हाळ्याचे दिवस या कामाला अगदी उचित आहेत. एक तर दिवसभर काही करावसं वाटतं नाही.का कशात जीव गमत नाही.मोकळ्या वेळात उदास होऊन पंख्याखाली बसावं आणि मस्तपैकी तिच्या आठवणीत गुंगून जावं. पण 'ही' आपली सारखी इकडे-तिकडे करीत असते, पंख्यासारखी! अंगात खाज-खुजली शिरल्यासारखी सारखी वळवळ सुरू असते.  त्यात हा निर्लज्ज घाम नीट कुठला विचार
करायला सवड देतोय?. सारा वेळ अस्वस्थतेचा बँड्बाजा वाजवत घालवावा लागतो.मग कप्पाळ, तिची आठवण येणार?
आयला पण ही पावसाळी उदासी मोठी गोड असते. जणू काय हवेत आंब्याचा दरवळ घुसळला आहे. सवयीचे आठवणखोर पावसाळी मोसमात खिडकीजवळ उदास बसण्यापूर्वी हातात भलं-मोठं पुस्तक घेऊन बसतात. आता या मोठ्या पुस्तकाचं काम त्यांना चांगलं ठाऊक असतं. कारण त्याचा उपयोग वाचण्यासाठी कमी तर तोंड लपवण्यासाठी अधिक होतो. जाडजूड पुस्तकाची किमयाच तशी मोठी असते. हातात मोठं पुस्तक असलं की, कोणी त्याच्याशी फारसं बोलत नाही. अगदी धर्मपत्नीसुद्धा.  त्याला प्रोफेसरासारखं पुस्तकाला कवटाळून रस्त्यानं जाताना  कुणी रस्ता आडवण्याची गुस्ताखी करत नाही. वाटतं पुस्तक नाही, रॉकेट लांचर आहे.
हाँ, तर... मी पाऊस सुरू झाला की हातात जाडजूड पुस्तकं घेतो.क्लासिक उदासीनं खिडकीच्या कडेला जाऊन बसतो. आता पुढंच काम 'मनीषे'ला करायचं होतं. आता दोघांच्या तारा जुळणार होत्या. वायद्यानुसार पावसाचा मोसम आणि  खिडकीकडेला उदास बसलेला मी तिच्या आठवणीत दंग असू शकतो.    ठिक या टायमाला आकाशात एक एक्स्ट्रा ढग येतो. आंगण नेहमीपेक्षा जास्तच चिंब भिजलंय. याचा अर्थ कनेक्टिविटी बरोबर आहे. आता फालतू हलणं-डुलणं, चकरा-बिकरा मारणं एकदम बंद. नाही तर रसभंग झालाच म्हणून समजा. पावसात असेच आठवणीचे सिग्नल असतात.... अचानक  जरा अँटेना हलला.
'ओ... काय करताय तुम्ही?'
इकडं कानात शब्दं घुसली तशी  आकाशात वीज कड!डली.
'पुस्तक वाचतोय... दिसत नाही काय?' का कुणासठाऊक बायका धर्मपत्नी झाल्यावर हवालदार कशा होतात?
' पुस्तक! ... हातात तर गीता आहे.'
' होय!... मग ?'
'तुम्ही ती उलटी धरलात.'
'अं...माहिताय. मी आता सरळ करणारच होतो, तेवढ्यात वीज कडाडली.'
'खोटं... खरं- खरं सांगा. त्या सटवीची आठवण काढत बसला होतात की नाही?'
'नाही... तसं नव्हे, कुठल्या सटवीची..?'
'तुमच्या हातात गीता आहे. शपथ खावा की, खरं खरं सांगेन , खोटं सांगणार नाही.'
'यात शपथ घ्यायची काय गरज.... तुझं तर ना....'
' खरंच म्हणताय तुम्ही, रंगेहात पकडल्यावर शपथेची काय जरुरत.'
'आता असल्या पावसाच्या दिवसात कुठली आठवण आली म्हणजे काय गुन्हा केलाय म्हणायचं का ?'
' गुन्हा नाही ?  खा गीतेची शपथ.'
'नाही.... गीतेची शपथ.'
 'तर ठिक आहे, थोडं व्हा बाजूला. मलासुद्धा कुणाची तरी आठवण येतेय. माझं आंगणसुद्धा भिजतं आहे. काही काळ मीसुद्धा उदास....'
आंगण भिजत होतं. खिडकी तशीच उघडी होती. आत दोघे उदास बसले होते. पण आता माझी उदासी तितकीशी क्लासिक नव्हती.
                                                                                                           .- मच्छिंद्र ऐनापुरे,

No comments:

Post a Comment