Sunday, January 22, 2012

सकारात्मक विचारांचा संकल्प!

     १९५२ मध्ये एडमंड हिलरीने जगातल्या सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर चढण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश मिळाले नाही. काही आठवड्यांनंतर त्याला इंग्लंडमधील एका कार्यक्रमात बोलायला लावले. हिलरी मंचावर आला आणि माऊंट एव्हरेस्टच्या चित्रांकडे पाहत मूठ आवळत म्हणाला,‘माऊंट एव्हरेस्ट, तू मला पहिल्या वेळेस हरवले आहेस, पण पुढच्या खेपेला मी तुला हरवून टाकीन. कारण तू आणखी उंच वाढू शकत नाहीस. मी मात्र प्रगती करू शकतो.’
एका वर्षाने म्हणजे २९ मे रोजी एडमंड हिलेरी माऊंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारा पहिला मानव ठरला. त्यावेळी हिलरी म्हणाला होता, माणसाला पर्वतावर नव्हे तर स्वत:वर विजय मिळवावा लागतो. ‘दी सिक्रेट’ची लेखिका रॉन्डा बर्न आपल्या जीवनाविषयी सांगते,‘‘मी पूर्णपणे निराश झाले होते. शारीरिक, भावनात्मक आणि आर्थिकदृष्ट्या पुरती खचून गेले होते. त्यातच अचानक माझे वडील गेले. आता मला माझ्या आईचीही चिंता सतावू लागली. चारी बाजूंनी जसा दु:खाचा डोंगर कोसळला. मी रात्रंदिवस रडत होते... रडत होते आणि फक्त रडत होते, पण अचानक माझ्या मनात आशेचा एक तरंग उमटला. आता मी चांगल्या गोष्टींना माझ्या जीवनाकडे खेचू लागले. चांगल्या गोष्टींची आशा करताच मी प्रसन्नता महसूस करू लागले. चमत्कार होऊ लागला. मी शारीरिक, मानसिकदृष्ट्या अत्यंत समाधानी राहू लागले. श्रीमंत होऊ लागले आणि प्रसिद्धीचे वलयही विस्तारू लागले. हीच ‘दी सिक्रेट’ची सुरुवात होती माझ्यासाठी! मी एक बेस्ट सेलर पुस्तकाची लेखिका बनले होते. कारण मला खात्री होती की, असे होणार!
     नव्या वर्षात आपण सगळ्यांनी मिळून संकल्प करूया की, नेहमी आशेचा पदर धरून चालू. मग पुढ्यात कितीही संकटे येऊ दे. निराश व्हायचं नाही. दु:खी व्हायचं नाही. आपण आशावादी राहिलं की, नशीबसुद्धा आपल्या मागे मागे चालून येईल. ‘युनिवर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलियामधील (यूएस) मानसशास्त्राचे प्रोफेसर बार्बरा फ्रेड्रिक्सन यांनी आपल्या ताज्या संशोधन म्हटले आहे की, सकारात्मक भावनेमुळे मोठमोठ्या संकटांवर मात करण्यासाठी ऊर्जा मिळते, उत्तम क्षमता प्राप्त होते, इतकेच नव्हे तर त्यामुळे एकाग्रता आणि शिकण्याच्या ऊर्मीत वाढ होते. फ्रेड्रिक्सन म्हणतात, ‘गेल्या काही वर्षांपासून आम्ही पॉझिटिव्ह गोष्टी,विचार आणि प्रसन्नतेच्या संबंधातली काही रंजक तथ्ये अभ्यासली आहेत. सकारात्मक विचाराने जीवनात महत्त्वपूर्ण यशात्मक बदल घडवता येतात याचा शोध लागला आहे.’
     रॉन्डा बर्न म्हणतात,‘‘तुम्ही या ब्रह्मांडातले सर्वात शक्तिशाली चुंबक आहात. जसा विचार कराल तसेच घडेल. चांगल्याची आशा करा... चांगल्या गोष्टीची खात्री बाळगा... सगळे काही चांगलेच होईल. तुम्ही आशावादी राहिलात आणि एखाद्या पॉझिटिव्ह गोष्टी व विचारांवर फोकस करीत राहिलात, तर त्याक्षणी तुम्ही ब्रह्मांडातल्या सकारात्मक वस्तूंना आपल्याकडे खेचत असता.’’
‘‘आशावादी माणसे आजारी पडल्यावरही रूटिन जीवनाशी जोडलेली असतात. आपल्याला कुठला तरी आजार आहे आणि त्याचाच रात्रंदिवस विचार करता आहात, तुमच्या भेटीला येणार्‍या लोकांशी याच विषयांवर बोलता आहात तर मग खात्रीने समजा की, तुम्ही या आजाराच्या अधिक कोषिका निर्माण करता आहात. दिवसभर स्वत:ला शंभरदा म्हणा, मी सुखी आहे, मी समाधानी आहे, फिट आहे, मला मस्त वाटते आहे. असे म्हणून स्वत:ला ऊर्जा द्या आणि सामान्य जीवनाशी एकरूप व्हा.’’ रॉन्ड बर्न
     जो नेहमी आशेवर जगतो. आशेचा पिच्छा सोडत नाही. त्यांनाच जीवनाची साथ मिळत राहते. आशावादी माणसे अगदी पर्वतसुद्धा हलवून सोडतात असे म्हटले जाते. सकारात्मक चिंतन आणि शास्त्रज्ञांच्या नव्य संशोधनाने आशेवर जगणार्‍यांच्या जीवनात आनंदाचे क्षण येत राहतात हे सिद्ध केले आहे. त्यामुळे माणसाने काहीही होवो, आपला सकारात्मक विचार दृष्टीकोन सोडायचा नाही. त्यामुळे आपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या ऊर्जा सतत निर्माण होत असतात. चांगल्या आणि वाईट, सुखी आणि दु:खी, सकारात्मक आणि नकारात्मक, सुगंधी आणि दुर्गंधी, योग्य आणि अयोग्य, पण त्यातून आपण कुठल्या आकर्षित करायच्या ते आपल्याच हातात आहे. यात महत्त्वाचे भूमिका बजावते ते आपले मन. मनच सर्वांचा कर्ताकरविता आहे. मन दिसत नाही, पण त्याला अखिल ब्रह्मांडाची जाणीव आहे. ते क्षणार्धात करोडों मैलाचा पल्ला पार करू शकते. मनाद्वारे आपण शरीरावर नियंत्रण, सभोवतालच्या परिस्थितीवर नियंत्रण आणू शकतो. बघा, मन प्रसन्न असेल तर आजूबाजूचा परिसर... सजीव, निर्जीव सर्व गोष्टी प्रसन्न वाटू लागतात.
- मच्छिंद्र ऐनापुरे           saamana.utsav  22/1/2012

Friday, January 20, 2012

शिक्षा पद्धती बदलायला हवी

      मुलं खोडकर असतात. खोड्या करतात. त्याचा त्रास मोठ्यांना होतो. खोड्यांमुळे शेजार्‍यांची भांडणे येतात. शाळेत शिक्षकांना ती त्रासदायक ठरतात. ही मुलं सांगून, समजावून  ऐकत नाहीत.त्यामुळे घरीदारी, शाळेत अशा मुलांना शिक्षा केली जाते. अपमान केला जातो.  काही पालक आणि शिक्षक तर अत्यंत कठोर शिक्षा करत असतात.  मुलाला मानसिक त्रास होईल अशी अपमानमानास्पद  वागणूक देत असतात. अर्थात पाल्य आणि विद्यार्थ्याला चुकीचे गांभीर्य समजावे आणि  पुन्हा भविष्यात तशी चूक करू नये, या आपलेसेपणाने ही पावले उचलली जातात. पण जरा जाणिवपूर्वक पाहिल्यास असे लक्षात येईल की  अशा प्रकारच्या शिक्षेने अथवा  अपमानजनक वागणूकीमुळे मुलांचे वर्तन सुधारण्यास फारशी मदत होत नाही.  कारण या शिक्षा मुलांच्या मनावर एवढा गंभीर परिणाम करतात की, ते त्याच्याव्यतिरिक्त इतर कशाचा विचारही करू शकत नाहीत. मुलांची मानसिकता आता बदलत चालली आहे. सुखाधीन वातावरणामुळे अशा कठोर शिक्षेची, बोलण्याची त्यांना सवय नसते. वारंवारच्या अशाप्रकारच्या वागणुकीमुळे त्यांच्यात एकप्रकारची असुरक्षित भावना निर्माण होत जाते.
      शिवाय शिक्षेमुळे मुलांमध्ये राग, चिडचिडेपणा, दु:ख, भीती आणि न्यूनगंडाची भावना निर्माण होतात. अशा परिस्थितीत तो आपल्या झालेल्या चुकीबद्दल विचार करू शकत नाही. त्याचं मन अनेक भावनांनी भरून गेलेलं असतं. इतरांसमक्ष झालेली मारहाण किंवा अपमानास्पद वागणूक त्याला सहन होत नाही. जेव्हा पालक किंवा शिक्षक  इतरांसमोर मुलाला मारतात अथवा काही वाईट्-साईट बोल  बोलतात तेव्हा त्या मुलाची अवस्था मोठी विचित्र होते. त्याच्या मनाला मोठ्या वेदना होत असतात.  त्यानंतरही  तो नेहमी त्या अपमानाबद्दलच विचार करत असतो. काही वात्रट मुले त्याची खोड काढतात. शिक्षेचा व वागणुकीचा विषय काढून त्याची छेड काढतात. त्यामुळे त्याला आणखीनच शरमिंदा झाल्यासारखे होते. अशा परिस्थितीत तो मुलांना टाळण्याचा प्रयत्न करीत असतो, मात्र मुले चिडवायला 'बरा बकरा ' मिळाला म्हणून त्याच्या पाठी हात धुवून लागतात.
      आपल्या आईवडिलांनी इतरांसमोर अशी वागणूक का दिली, असा त्याच्यापुढे प्रश्न पडतो.  अशा प्रकारच्या मानसिकतेमुळे मग त्यास मोठ्याने दिलेल्या शिक्षेबद्दलही फारसे काही वाटत नाही. पुढे तर  त्यांच्यातील संवादही कमी होतात. त्यामुळे दोन गोष्टी होण्याची शक्यता असते. पहिली म्हणजे तो मुलगा तुमचा बदला घेण्याचा विचार करतो, तर दुसरा पर्याय म्हणे त्याचा मोठ्यांवर असणारा विश्वास पूर्णपणे नाहीसा होतो. मात्र आई- वडील त्याच्या या परिस्थितीला तो स्वतः   जबाबदार असल्याचे मानतात.  मुलांना अशा प्रकारची शिक्षा करण्यामागे शिक्षक, त्यांचे वर्तन सुधारण्याचा हा एकमेव मार्ग असल्याचे कारण देतात. पण ते हे विसरतात की, या सर्वांमध्ये मुलांना ज्ञानार्जन करण्याचा त्यांचा मुख्य हेतूच मागे राहतो. मुलाच्या खोडकरपणच्या उत्पत्तीमागील कारणे शोधण्याची गरज असते. त्याचा शोध घेऊन त्याच्याशी समुपदेशक या नात्याने वागल्यास त्याच्या वागणुकीत बदल करण्यास मदत होते. अन्यथा मुले शिक्षक- पलकांपासून लांब लांब जात राहतात.  तसेच विद्यार्थी नंतर त्या शिक्षकाच्या विषयाचाही तिटकारा करू लागतात. अनेकदा पालक तक्रार करतात की, त्यांची मुले ठरावीक विषयाचे शिक्षक कडक असल्यामुळे त्यांच्या विषयाचे तास बुडवण्याचा प्रयत्न करत असतात. त्या विषयात इंटरेस्ट दाखवत नाहीत. शिक्षकांनी आपल्या कडक शिस्तीच्या पडद्याआड कनवाळू पालकाची भूमिकाही ठेवायला हवी.
       शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांना शिस्त लागावी म्हणून प्रयत्न करण्यात चुकीचे काहीच नाही. मुलांना शिक्षा जरूर करावी  मात्र, त्यासाठी मुलांना अपमानास्पद वाटेल अशी नसावी. शिक्षा करताना त्याच्या अभ्यास, कृतीकार्य, शारीरिक - मानसिक पातळीचा विचार केला जावा.  चूकीबद्दल मुलांना अपमानास्पद वाटणारी शिक्षा करणे चुकीचेच आहे. त्यामुळे ते   आणखी बंडखोर होण्याची  शक्यता अधिक असते. त्यामुळे परिस्थिती बदलण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी मुलांच्या मानसिकतेचा विचार करून उपाय शोधावा.  आता मारण्याची शिक्षा करण्याचा किंवा अपमानास्पद वागणूक देण्याचा काळ राहिलेला नाही. सध्याची सामाजिक, आर्थिक स्थिती बदलली आहे, तशी मुलांची मानसिकताही बदलली आहे. मुले जशी शारीरिक कमकुवत बनत चालली आहेत, तशी त्यांची मानसिक कमकुवताही वाढत चालली आहे. मुलांची सहनशीलता कमी होत चालली आहे. अपमान सहन न झाल्यास मुले आत्महत्येला कवटाळतात.  ती वाढवण्याच्यादृष्टीकोनातून पालकांनी प्रयत्न करायला हवे. मुले मनाने खंबीर बनविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. शिक्षक- पालकांनी मुलांना  सुधारण्याचा  50 वर्षापूर्वीच्या जुन्या पद्धतीचा अवलंब आता टाळायला हवा. त्यासाठी नव्या पर्यायाचा शोध आणि अवलंब आवश्यक बनला आहे. शेवटी शिक्षक- पालकांनाच या गोष्टी कराव्या लागणार आहेत.

हसत जगा

                    करिअर
*पहिला डासः मी शिकून मोठा डॉक्टर होणार आहे.
दुसरा डॉक्टरः मी इंजिनिअर होणार.
एवढ्यात लक्ष्मण मास्किटो क्वायल लावतो.
पहिला डासः चल पळ, नाही तर आपलं करिअर बर्बाद होईल.
                   मिठाई
*मालक ( नोकर रामाला) : रामा, ही मिठाई कुठे तरी लपवून ठेव. मुलांना दिसली नाही पाहिजे.
काही वेळाने मालक रामाला बोलावतो आणि विचारतो: अरे, ती मिठाई कुठे ठेवलीस सांग बरं....
रामा (पोटावरून हात फिरवत): मालक, ह्या पोटात !
* सोन्या: मन्या, 'इकडे ये' ला इंग्रजीत काय म्हणतात रे?
मन्या: कम हियर.
सोन्या: बरं मग 'तिकडे जा' ला काय म्हणतात?
मन्या: अगदी सोप्पं आहे. पहिला तू तिकडे जा आणि मग म्हणायचं... कम हियर.
                 ड्रायव्हर
* बसमध्ये जाम गर्दी असते. उभे राहायलासुद्धा  जागा नसते. तरीही कंडक्टर  एका व्यक्तिला   चालकाच्या बाजूने जबरदस्तीने बसमध्ये चढवत असतो.  जवळच उभारलेल्या रोहितला आश्चर्य वाटते. तो कंडक्टरला म्हणतो: अहो काका, बसमध्ये तर अजिबात जागा नाही आणि तुम्ही त्याला जबरदस्तीने बसमध्ये का चढवता आहात?
कंडक्टरः अरे बाबा, हा काही प्रवाशी नाही. हा ड्रायव्हर आहे. ढोसायला निघालाय....

Thursday, January 19, 2012

हसत जगावे

*शेखर चित्रपट पाहायला थिएटरजवळ आला होता. एका भिकार्‍याने त्याचे पाय धरले व विनवणी स्वरात म्हणाला," साहेब, मला ३० रुपये द्या. तुमचे फार उपकार होतील, त्यामुळे मला माझ्या बायका-पोरांना भेटता येईल. त्यांची नी माझी ताटातूट झाली आहे.देव त्मचं भलं करील."
 शेखरला भिकार्‍याची दया आली. त्याने पटकन खिशात हात घातला आणि १०-१० च्या तीन नोट्या काढून त्याच्या हातात देत म्हणाला," या तीस रुपयात तू तुझ्या घरच्या लोकांना कसा भेटणार बरं?"
पैसे मिळाल्यावर भिकारी म्हणाला," ते 'बॉडीगार्ड' पाहायला गेलेत. आता मीही तिकिट काढून आत जाईन. तिथे गेल्यावर त्यांची भेट होईल..."    

उत्साही रहा, निवृत्ती टाळा

     उत्साही माणूस कुठल्याही गोष्टीचा कंटाळा करत नाही. तो सतत कामात असतो. त्यामुळे अशी माणसे कधीही निवृत्त होत नाहीत. सरकारी नोकर किंवा खासगी कंपन्यातले कामगार ठरलेल्या निवृत्तीच्या वयात रिटायर्ड होऊन घरात बसतात. पण ज्याच्यात उत्साह कायम असतो, त्याला  कोणीही निवृत्त करू शकत नाही. फक्त पैसे कमावण्यासाठी ऑफिसमध्ये नोकरी करणारे लोक रिटायर होत असतात. पण ज्यांच्याकडे अनेक उत्साहवर्धक कामे असतात, असे लोक कधीही निवृत्त होत नाहीत. कोणत्याही संस्था वयाच्या कारणामुळे कोणाला निवृत्त करत नसतात. तर तुम्ही आयुष्याच्या सायंकाळी आपल्या इच्छेप्रमाणे जीवन जगावे, आवडीचा छंद जोपासत जगावे हा त्यामागील सेवानिवृत्तीचा हेतू असतो. परंतु,  जर एखाद्याकडे एकही छंदच नसेल, तर त्यामघ्ये त्या संस्था काहीही करू शकत नाहीत. माणसाने कोणत्याना कोणत्या छंदात अडकलेले असावे. सुंदर जीवनात शिकण्यासारखे प्रचंड आहे, आयुष्याच्या शेवटपर्यंत शिकत राहिले पाहिजे. सतत शिकण्याची धडपड करणारा उत्साही असतो, तो कधीच निवृत्त होत नाही.

Tuesday, January 17, 2012

भेकडपणाची लक्षणे

      विरोध करण्याचा सरळधोबट मार्ग लोकांनी सोडून दिला आहे की काय अशी शंका आता यायला लागली आहे. भारतीय लोकशाहीत सत्ताधार्‍याला जितके महत्त्वाचे स्थान आहे, तितकेच किंबहुना त्याहून अधिक  महत्त्व विरोधकालाही आहे. लोकशाहीत   विरोध करण्याचा,  दर्शविण्याचा सनदशीर मार्गही सांगण्यात आला आहे. आजपर्यंत त्याचाच अवलंब केला जात होता. त्याच्याने प्रश्नही सुटत होते. महात्मा गांधींनी तर आयुष्यभर अशाच मार्गाचा अवलंब केला,  पण अलिकडे असे काय घडले आहे की लोकांनी हा सनदशीर मार्ग सोडून आक्रमक, आक्रस्ताळी आणि लोकशाहीला काळिमा फासणार्‍या मार्गांचा अवलंब सुरू केला आहे.  विरोध दर्शविण्यासठी  थप्पड मारण्याचा, चप्पल फेकण्याचा आणि शाई फेकण्याचा अवलंब केला जात आहे. योगगुरू रामदेवबाबा यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार नुकताच घडला. याचा अर्थ  राजकारणातली सहनशीलता संपत चालली आहे की काय, असे वाटावे असे हे प्रकार चिंताजनक आहेत.
     वास्तविक विचारांची मतभिन्नता ही आपल्या भारतीय लोकशाहीची खासियत आहे. मतभिन्नता ही सजगतेची लक्षणे आहेत. पण ती व्यक्त करण्याच्या पद्धती बदलल्या , या अशाप्रकारच्या घटना मात्र निश्चितच लोकशाहीच्यादृष्टीने घातक आहेत, असे खेदाने म्हणावे लागेल. यापूर्वीही अशाप्रकारच्या अभद्र घटना  प्रशांत भूषण, कपिल सिब्बल, शरद पवार  यांच्याबाबतीतही घडल्या आहेत. ( अशा घटना केवळ आपल्याच देशात घडताहेत, अशातला भाग नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षालाही चपलेचा प्रसाद खावा लागला आहे.) यात आणखी मोठे दुर्दैव असे की,  या घटनांकडे राजकीय लोकांनी गांभिर्याने न पाहता त्याला राजकीय रंग देण्याचाच अधिक प्रयत्न चालवला आहे.  या आधी घडलेल्या घटनांनासुद्धा राजकीय रंग देण्याचाच प्रयत्न केला गेला. आता योगगुरू रामदेवबाबा यांच्यावरील शाई शिडकाव्याचा घटनेबाबतीतही  असाच प्रकार घड्त आहे. काँगेसच्या महासचिवांनी या शाई फेकण्याच्या घटनेमागे भाजप-संघाचा हात असल्याचे म्हट्ले आहे.  तर जनता पक्षाचे अध्यक्ष सुब्रह्ण्यम यांनी हा भारत मातेचा अपमान असल्याचे सांगून कहरच केला. रामदेवबाबांच्या अंगावर शाई फेकल्याचा  राग धरून बाबा समर्थकांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या यांच्या पोस्टरवर शाई फेकून आपला संताप व्यक्त केला. हे कृत्यही  काँग्रेसने भाजप आणि संघाच्या माथी फोडले.  
     पण प्रश्न इथे असा नाही की, रामदेवबाबावर शाई फेकणारा भाजपा-संघाचा कार्यकर्ता होता की काँग्रेसचा पक्षाचा! शिवाय  असे पाऊल उचलण्यामागे कार्यकर्त्याचा उद्देश कोणता होता, हाही प्रश्न इथे महत्त्वाचा नाही.  मात्र लोकशाहीला  काळिमा फासणार्‍या, जगातल्या बलाढ्य लोकशाहीला बदनाम करणार्‍या  अशा घटना का वाढत आहेत, हा मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. देशात निवडणुका पूर्वीही होत होत्या, आणि आताही होत आहेत.  आरोप-प्रत्यारोप पूर्वीही  होत होते आणि आजही होत आहेत.  आजच्यासारखे निवडणुका जिंकण्यासाठी सगळे हातखंडे आगोदरसुद्धा वापरले जात होते. पण लोकप्रतिनिधीला, समाजसुधारकाला  चप्पल फेकून किंवा थप्पड मारण्याचा, शाई फेकण्याचा प्रसंग कधी पाहायला आणि  ऐकायला मिळाला नाही. मग आता असे का घडत आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. माणसं विरोध करण्यासाठी असला घृणास्पद प्रकार का अंगिकारत आहेत. या गोष्टीचा शोध घेतला जायला हवा.  
     मुद्दा दहशतवादाचा असो अथवा भ्रष्टाचाराचा, आपले खासदार - मंत्री किंवा पक्षाचे पदाधिकारी असल्या काही अर्वाच्च शब्दांचा वापर करताना दिसतात की सभ्य समाज त्याला अजिबात स्थान नाही.  ज्या लोकांवर देश चालविण्याची जबाबदारी आहे, तीच मंडळी संसदेत जो हंगामा घालतात. एकमेकांना अर्वाच्च शिवीगाळ करतात, एकमेकांचे थोपाड फोडतात, धमकी देतात. जर ही मंडळी अशाप्रकारे वागत असतील तर आपली लोकशाही कशी बळकट  होणार, असा प्रश्न आहे. अशा प्रकारच्या घटना समाजात पून्हा घडू नयेत म्हणून समाजातल्या सगळ्याच घटकाने प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. केवळ दर पाच वर्षांनी निवड्णुका घेण्याने भारतीय लोकशाही  जगातील सर्वात मजबूत लोकशाही कशी बरं निर्माण होईल?   लोकशाही तंत्राशी खेळणार्‍यांचा  लोकप्रियता मिळवण्याचा स्वस्तातला मकसद असू शकतो. मात्र आपल्याला ज्याप्रकारे  सांगण्या- बोलण्याचा हक्क आहे, स्वातंत्र्य आहे, त्याप्रकारे        दुसर्‍याचेही  ऐकून घेण्याची उदारता  दाखवली गेली पाहिजे.  थोर तत्त्वज्ञ वाल्टेयर म्हणतो, कदाचित मी आपल्या विचारांशी सहमत होऊ शकत नाही, पण तरीही विचार प्रकट करण्याच्या आपल्या स्वातंत्र्याचे, अधिकाराचे रक्षण करीन. आपण मात्र विचार व्यक्त करणार्‍यावर हात चालवायला लागलो आहोत. ही कुठली लक्षणे म्हणायची? आपली लोकशाही मजबूत होईल, यासाठी झटणार्‍यांची आवश्यकता आहे. दुसर्‍याला थप्पड मारणे, त्याच्यावर चप्पल फेकणे किंवा शाई फेकणे या गोष्टींचे कदापि समर्थन कदापि समर्थन केले जाऊ शकत नाही. आणि करताही  कामा नये, अशी कृत्ये करणार्‍याची लक्षणे भेकडपणाची  म्हणायला हवीत. अशावेळेला आपण संयम बाळगून कायद्याला आपले काम करण्याची मुभा दिली गेली पाहिजे.

मायावतींची आदळाआपट

   उत्तर प्रदेशात  विधानसभा निवडणुकीची हवा गरम झाली आहे.   मात्र त्याहीपेक्षा अधिक निवडणूक आयोगाने मायावती व त्यांच्या पक्षाचा हत्ती यांच्या जागोजागच्या पुतळ्यांना निवडणूक काळापर्यंत झाकण्याचे  आदेश दिल्यानेच वातावरण तापले आहे.  मायावतींनी हा आदेश दलितविरोधी असल्याचे सांगून आदळाआपट सुरू केली आहे. त्यांनी या सार्‍या वादाला जातीयतेचा रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आयोगाचा पुतळे झाकण्याचा प्रकार फार योग्य आहे, असे नाही.  पुतळे झाकण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च येणार आहे. मात्र प्रश्न खर्चाचाही नाही. प्रश्न आहे अशाप्रकारे पुतळे झाकल्याने मतदान प्रभावित होणार कशावरून याचा? निवडणूक आयोग नावाची एक व्यवस्था निवडणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी असते, पण त्यांच्या अधिकारात अतिरेक असता कामा नये.  आयोगाचा निर्णय आक्रस्ताळेपणाचा आहे, असे ग्रहीत धरले तरी मायावतींनी तरी त्यावर प्रतिक्रिया संयमित द्यायला हवी होती. पण नाही. त्यांनी तर त्याहून जास्त आक्रस्ताळतेपणा दाखवला. आयोगाचा निर्णय काँग्रेसच्या दबावाखाली घेण्यात आला, हा त्यांचा आरोप समजता येऊ शकतो. तो मान्य करायलाही जागा आहे.  पण त्यासाठी थेट तो निर्णय दलितविरोधी म्हणणे मात्र खूपच झाले. या निर्णयाला जातीयतेचे लेबल लावणे गैर आहे. निवडणूक आयोग घटनात्मक संस्था आहे. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रचलेल्या राज्यघटनेने त्याला हा दर्जा दिला आहे. अशा संस्थेवर हीन आरोप करणे त्या राज्यघटनेचाही अपमान आहे. एवढय़ावरच मायावती थांबल्या नाहीत. त्यांना तर हत्तीचे पुतळे झाकणे म्हणजे भारतीय संस्कृतीचा अपमान वाटला, तर त्यांच्या कार्यकर्त्यांना तो भगवान गणेशाचा अवमान वाटला. हत्ती भारतीय संस्कृतीचे, हिंदू संस्कृतीचे प्रतीक आहे, ही नवी माहिती यानिमित्ताने मतदारांना मिळाली. अशी हास्यास्पद विधाने व आरोप करून मायावती काय मिळवतील, कोण जाणे?                  .