Friday, February 15, 2013

शिक्षणाचा दर्जा उंचाविण्याच्या दृष्टीनेदेखील निधीचे वाटप

     जागतिकीकरणासोबतच शिक्षण क्षेत्राचा मोठय़ा प्रमाणावर प्रसार झाला आहे. विद्यापीठ व शालेय स्तरावर शिक्षणाचा व्यापदेखील मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. शिक्षणातूनच समाजाचा खरा विकास होतो. त्यामुळे अर्थसंकल्पातून शिक्षणाचा व्यापक प्रसार होईल व उच्चशिक्षणाची दारे सगळ्यांसाठी खुली होतील याकरिता विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. आर्थिक तरतूद, शिष्यवृत्ती यांच्या माध्यमातून शैक्षणिक समानतेचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. अशा प्रकारचा अर्थसंकल्प असायला हवा. आजच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी उच्च शिक्षण हे अत्यावश्यक झाले आहे. आजचे विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. त्यामुळे शासनाने उच्च शिक्षणाच्या विकासासाठी जास्तीतजास्त लक्ष द्यायला हवे. अर्थसंकल्पात उच्चशिक्षणातील अभ्यासक्रमांसाठी जास्तीतजास्त निधी उपलब्ध करून द्यावा. हा निधी एकप्रकारची गुंतवणूकच आहे असे समजावे. त्याचप्रमाणे शैक्षणिक पातळीवर शिक्षणाचा दर्जा उंचाविण्याच्या दृष्टीनेदेखील निधीचे वाटप व्हायला हवे.
      विद्यार्थ्यांना संशोधनाकडे जास्तीतजास्त प्रमाणात आकर्षित करण्यासाठी सरकारने फेलोशीप सुरू करायला हव्या. त्याचप्रमाणे संशोधन करणार्‍या संस्थांना आर्थिक अनुदानदेखील द्यायला हवे. आज कुठल्याही शाखेतील उच्च शिक्षणाचे शुल्क हे फार वाढले आहे. त्यामुळे शैक्षणिक शुल्काची रक्कम ही आयकरापासून मुक्त असावी. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनादेखील थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळेल. मागासलेल्या प्रदेशातील विद्यार्थ्यांना जास्तीतजास्त शैक्षणिक सोयी व सवलतीदेखील देण्याची आवश्यकता आहे.
     शिक्षणक्षेत्रात खासगीकरणाला अधिक वाव देण्यात आला आहे. मात्र त्यांमध्ये दर्जेचा अभाव आहे.  आपला दर्जा टिकवून ठेवण्यासाठी व नवनवीन सकारात्मक बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी भांडवलाची गरज असते. जर अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राला 'इन्फ्रास्ट्रक्चर'चा दर्जा दिला तर ते शिक्षण संस्थांच्या फायद्याचे राहील. यामुळे भांडवल उभे करण्यासाठी निरनिराळे पर्याय उपलब्ध होतील. याशिवाय शासनाने शिक्षण क्षेत्रात 'एफडीआय' बाबत गंभीरतेने विचार करायला हवा. यामुळे आपल्या इकडच्या संस्थादेखील विदेशातील विद्यापीठांना निश्‍चितपणे टक्कर देऊ शकतील. शिवाय या क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी पायाभूत सुविधा वाढवण्याची गरज असून त्यासाठी केंद्राने शिक्षणासाठी सध्याच्या पेक्षा अधिक तरतूद करण्याची गरज आहे. विशेषत: संशोधन विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाची भरती होणे अतिशय आवश्यक झाले आहे.                              

Saturday, February 9, 2013

बुद्धिमान मंत्री

     फार फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. जयंतनगर नावाच्या राज्याचा एक राजा होता. त्याला एक दिवस देश पाहण्याची लहर आली. त्याने देश भ्रंमतीची योजना आखली. आणि तो देशाटनाला निघाला. काही दिवसांत सारा देश फिरून झाला. परत आल्यावर त्याच्या पायाचं काहीतरी दुखणं सुरू झालं, आणि बळावलं. त्याने आपल्या मंत्र्यांपुढे ते कथन केलं. रस्त्यात भले मोठे दगड, खड्डे होते. त्यामुळे प्रवासात त्याला भयंकर त्रास झाला. यासाठी काही तरी करायला हवं, असंदेखील राजाने मंत्र्यांना सुचवलं.
     बराच वेळ विचार केल्यावर त्याला यावर एक उपाय सापडला. त्याने तत्काळ आपल्या मंत्र्यांना आणि सनिकांना आदेश दिला, ‘ताबडतोब देशातले सगळे रस्ते कातडय़ांनी झाकून घ्या’. राजाचा हा आदेश ऐकून सारे जण चपापले. सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले. पण एकाचीदेखील तोंडातून ब्र काढण्याची िहमत झाली नाही. या कामासाठी मुबलक पैशांची गरज होतीच, शिवाय इतक्या सगळ्या रस्त्यांसाठी कातडे कुठून आणायचे? एवढं करूनदेखील रस्त्यांना त्याचा त्याचा किती उपयोग होणार, हे कोण सांगणार? त्यामुळे एकूणच या योजनेचा देशातील रस्त्यांसाठी किती फायदा होईल, याची सा-यांना चिंता वाटत होती. मात्र आता राजाचा आदेश म्हटल्यावर अंमलात तर आणावाच लागणार! इतकी मोठी अडचण असतानादेखील कोणाचं उलटून बोलण्याचं धारिष्टय़ झालं नाही. सगळे जण मुकाटय़ाने आपापल्या घरी गेले. मात्र सगळ्यांच्या डोक्यात एकच प्रश्न होता, राज्याची सगळी तिजोरी या कामी ओतली तर अन्य विकासकामांचं काय होणार?
     दुस-या दिवशी पुन्हा दरबार भरला. राजाने हुकूम सोडला, ‘रस्ते करण्यासाठी कारागिरांना बोलावण्यात यावं’. सगळ्यांची खात्री झाली की, आता योजनेच्या अंमलबजावणीशिवाय पर्याय नाही. राज्याच्या दरबारात एक वृद्ध मंत्री होता, त्याने अनेकदा आपल्या अनमोल सल्ल्याने राज्यावर ओढवलेली अनेक संकटे सोडवली होती. अनेक समस्यांचं निराकरण केलं होतं. शेवटी त्याने बोलण्याचा निश्चय केला. तो आसनावरून उठून राजाजवळ गेला, ‘महाराज, क्षमा असावी, पण मी तुम्ही आखलेल्या योजनेवर काही सांगू इच्छितो’. वृद्ध मंत्र्याचं बोलणं ऐकून राजा काहीसा चकीत झाला. त्याला सल्ला ऐकून घ्यायची सवय नव्हती. कारण तेवढं धाडस आजपर्यंत कोणी केलं नव्हतं. पहिल्यांदा तर राजाला मंत्र्याचा थोडा रागच आला. परंतु, मंत्र्याने आपल्या बुद्धिचातुर्याने राज्याला अनेकदा संकटसमयी मदत केली होती. त्यामुळे त्याचा आदर करत राजा म्हणाला,‘बोला, महाशय, काय बोलायचं आहे ते निर्धास्तपणे बोला’
     मंत्री म्हणाला, ‘महाराज, आपण सगळे रस्ते कातडय़ांनी आच्छादून घेतले तर सरकारी तिजोरी झटक्यात रिकामी होईल’. पुढे मंत्री म्हणाला, ‘आपल्याला रस्ते कातडय़ांनी आच्छादायचे असतील तर आपला शाही खजिना मोकळा होईल. आपल्याला पैशाचा अपव्यय करायचा नसेल तर मी एक उपाय सुचवू शकेन’
     काय? राजानं विचारलं.
     मंत्री म्हणाला, ‘आपण कातडय़ांनी देशातले संपूर्ण रस्ते झाकण्यापेक्षा एका कातडय़ाच्या उपयोगाने चपला शिवून आपल्या पायांना झाकता येईल आणि पायांना संरक्षण देता येईल. यामुळे आपल्या पायांना इजा तर होणार नाहीच शिवाय आपला शाही खजिनादेखील रीता होणार नाही. हा उपाय राजाला बेहद्द आवडला. मग त्याने स्वत:साठी कातडय़ापासून एक चप्पल जोड बनवून घेतला. राज्याचा पैसा तर वाचलाच पण महत्त्वाचं म्हणजे लोकांना पायांच्या संरक्षणासाठी चपला नावाची एक नवी वस्तूदेखील मिळाली.
prahaar,mumbai

Sunday, February 3, 2013

लोकशाहीचा चौथा स्तंभ संशयाच्या भोवर्‍यात...!

     जत तालुका वृत्तपत्र विक्रेता एजंटाचा मेळावा इथल्या साईमंगल कार्यालयात पार पडला. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष, राज्य सहकारी बँकेचे माजी संचालक आणि जत तालुक्याचे धडाडीचे, अभ्यासू नेते विलासराव जगताप यांनी आजच्या वृत्तपत्रांच्या धोरणांवर परखड मत व्यक्त केले. श्री. जगताप परखड विचार मांडताना कुणाची मुलाहिजा बाळगत नाहीत. सत्य ते बोलणार मग त्याच्याने कुणाची मने दुखावली तरी त्यांना त्याची फिकिर नसते. परखड बोलणे हा त्यांचा स्वभाव आहे. आणि त्याच स्वभावानुसार आणि आपल्या अभ्यासाच्या तराजूत तोलून त्यांनी आजच्या वृत्तपत्रांच्या धोरणांवर आपली मते व्यक्त केली. अर्थात ती पटणारी आहेत. कारण आजची वृत्तपत्रीय पत्रकारिता ही निव्वळ जाहिरातीवर चालली आहे. पेड न्यूज हा प्रकार वृत्तपत्र पत्रकारितेला लागलेली कीड आहे आणि ती अगदी लोकल वृत्तपत्रांमध्येदेखील शिरली आहे. नि:पक्ष, निर्भय आणि अर्थकारणविरहित पत्रकारिता आज राहिली नाही, ही वस्तूस्थिती आहे. आज जाहिरातींवर वृत्तपत्रे कोणाला मोठे करायचे आणि कुणाला जमीनदोस्त करायचे याचे गणित मांडले जाते.
     श्री. जगताप यांनी म्हटल्याप्रमाणे जो शुभेच्छांच्या जाहिरातीने वृत्तपत्रांची पाने भरवतो, त्याला मोठा पुढारी बनवून टाकले जाते. त्यामुळे आजकाल गल्लीतला कोणही लुंग्यासुंग्या उठतो आणि डिजिटल फलक आणि जाहीरातीच्या जीवावर पुढारी होऊन बसतो. आजकाल पुढारी होणं फार सोप्पं झालं असल्याचं दिसतं, या श्री. जगतापच्या यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. राजकारणी लोकांच्या कामाचं मोजमाप करण्याचं गणित बदललं आहे. गावात चार डिजिटल बोर्ड लावले आणि वृत्तपत्रांना पानभर जाहिराती दिल्या की, तो पुढारी, युवा, उभरता नेता बनून जातो.
     आज जी काही वृत्तपत्रे आहेत ती मोठ्या उद्योगपतींची, व्यापार्‍यांची आहेत. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांपेक्षा त्यांना आवश्यक असणार्‍या शेअर मार्केट यासारख्या बातम्यांना प्राधान्य दिले जाते. बड्या लोकांची वृत्तपत्रे ही त्यांच्या लाभासाठी अधिक वापरली जातात. शासनावर दबाव टाकून त्यांच्यासारखे कायदे करून घेण्यासाठी या माध्यमाचा वापर करून घेतला जातो, या समाजाच्या म्हणण्यात तथ्य नाही म्हणण्याचे धाडस कोणी करणार नाही. वास्तविक दृकश्राव्य माध्यम येण्यापूर्वी प्रिंट मिडियालाच देशाचा चौथा स्तंभ म्हटले जायचे. हा स्तंभ सरकार, त्यांच्या नीतीमत्तेवर अंकुश ठेवण्याचे काम करीत असे. तळागाळातल्या लोकांचे प्रश्न मांडत असे आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी सरकारला भाग पाडत असे. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. लोकशाहीतले सगळेच स्तंभ त्यांच्याकडे साशंकतेने पाहावे, अशा पद्धतीने वागत आहेत. जनतेचा कोणावरही आज विश्वास राहिलेला नाही. लोकशाहीला भक्कम करणारे हेच स्तंभ असे विश्वास गमावल्यासारखे वागत असतील तर, तिथे लोकशाही अस्तित्वात आहे का, असा प्रश्न उपस्तित होतो.
     आज वृत्तपत्रांमध्ये स्पर्धा वाढली आहे. लहान, स्थानिक वृत्तपत्रे  अर्थिकसह अनेक कारणांनी डबघाईला आली आहेत. त्यांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी जाहिरातीवर जोर देणे भाग आहे, मात्र त्यांनी आपल्या लोकशाहीची बूज राखण्याचाही प्रयत्न करायला हवा. चांगल्याला चांगले म्हणण्याची व त्यांना प्रसिद्धी देण्याची आवश्यकता आहे. आजकाल जो जाहिराती अधिक देतो, त्याच्या बातम्यांना अधिक प्राधान्य असते. काही माणसे पैशांच्या जीवावर सामाजसेवेचा तोंडावळा जाहिरातीच्या माध्यमातून दाखवत दुसर्‍या बाजूने काळेधंदे करत असतो. आजच्या वृत्तपत्रांमध्ये त्याच्याकडच्या जाहिरातीच्या सोर्समुळे त्याच्या विरोधात लिहिण्याची धमक राहिलेली नाही. संबंधित वृत्तपत्राच्या स्थानिक प्रतिनिधीमध्ये ती धमक असली तरी वृत्तपत्रामध्ये ती असेलच असे नाही. त्यामुळे समाजसेवेच्या बुरख्याआड आज अनेक लोक काळे, लुबाडणुकीचे धंदे करत आहेत. त्यांना आवर घालण्याचे दिवस संपले आहेत.
पेड न्यूजचा प्रकार सध्या गाजत आहे. केंद्र सरकार त्याबद्दल फारच गंभीर आहे. त्यामुळे वृत्त्पत्रांना आवर घालायला काही कायदे येण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ती येतीलही, पण त्यामुळे वृत्तपत्रांनी लगेच गळा काढण्याची आवश्यकता नाही. त्यांनी पहिल्यांदा  स्वतःला बदलले पाहिजे. स्पर्धा वाढल्याने वृत्तपत्रे आता कुठल्याही थराला जात आहेत. त्यांनी समाजजागृतीचे, उपेक्षित घटकांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे आहेत. वृत्तपत्रांचा जाहिराती हा आत्मा असला तरी त्यांनी आपली धोरणे बदलू नयेत. नाही तर आजच्या जगात फक्त पैसे वाल्यांचे राज्य आहे, आणि मग त्यावरच शिक्कामोर्तब हो ऊन जाईल. गोरगरिबांना वाली कोणी राहणारच नाही. देशातला भ्रष्टाचार, लुबाडणूक-फसवणूक थांबणार नाहीत. काही वृत्तपत्रांनी अंगापेक्षा आपला पसारा मोठा केला आहे, आता त्यांना तो आवरणे कठीण झाले आहे. त्याचा भार स्थानिक प्रतिनिधी, पत्रकारांवर टाकला जात आहे. त्याला जाहिरातीच्या ओझ्याखाली असे दाबले जात आहे की, त्यामुळे त्याला चार ओळीची बातमी लिहावी, असे वाटण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. त्याला पुरेसे मानधन मिळत नाही. त्यामुळे त्याचे जीवनमान सुधारले नाही. कौटुंबिक स्वास्थ्य नाही. केवळ फुकाचा मोठेपणा मिरवण्यात काहीच हशील नाही. जाहिरात देणार्‍या कसल्याही माणसापुढे त्याला नमते घ्यावे आणि व्हावे लागते.
     एकिकडे छोटी वृत्तपत्रे मृत्यूपंथाला लागले आहेत. तर मोठ्या उद्योगधंदेवाल्यांची वृत्तपत्रे आपली नवी आवृत्ती घेऊन लोकल पातळीवर येऊ लागली आहेत. असे विरोधाभासाचे चित्र सध्या दिसत आहे. समाजसेवा, लोकशाहीच्या संरक्षणासाठीचे प्रयत्न यापेक्षा नफा हे सूत्र वृत्तपत्रे अवलंबत आहेत. लोकशाहीच्या चौथ्या स्थंभाने व्यावसायिक जरूर असावे, पण दुर्बलांवर होणार्‍या अन्याय, अत्याचाराबाबत तडजोड केली जाऊ नये.   

Friday, February 1, 2013

बिनीची पार्टी

     बिनी मुंगी तोंडात पेढयाचा तुकडा धरून सावकाश येत होती. वाटेत तिला किटी माशी भेटली. पेढा पाहून किटीच्या तोंडाला पाणी सुटलं. ती बिनीजवळ जात म्हणाली, ‘ए बिनी, पेढा घेऊन कुठे चाललीस गं?’ बिनी पेढा तोंडातून काढून बाजूला ठेवत म्हणाली, ‘किटी, आज रात्री माझ्या घरी नव्या वर्षाच्या स्वागताची पार्टी आहे. त्याची मी तयारी करतेय. तूही ये, पार्टी करायला’.
     किटी दीर्घ उसासा घेत म्हणाली, ‘ मी आले असते गं, पण काय करू! माझ्या सोन्याला काय झालंय कोण जाणे! कालपासून तो तापानं फणफणलाय. मला त्याला दाखवायला डॉक्टरांकडे न्यायचं आहे. पण तुझा पेढा मात्र दिसायला फार छान आहे. त्यामुळे ..
     बिनीला किटीचा आशाळभूत चेहरा पाहून दया आली. ती लगेच म्हणाली,‘तसं काही नाही, किटी. तू आतादेखील पेढा खाऊ शकतेस.पेढय़ाचा एक तुकडा तोंडात धरून किटी माशी उडाली.
     बिनी उरलेला पेढा तोंडात धरून निघाली तोच टिलू फूलपाखरू उडत उडत तिच्यासमोर दत्त म्हणून हजर झालं. पेढा पाहताच टिलू मोठय़ाने म्हणाल, ‘बिनी, पेढा मला फार आवडतो. मला थोडा दे ना!
     बिनी काही बोलू शकली नाही. टिलू फुलपाखरू पेढय़ाचा तुकडा तोंडात टाकत म्हणालं, ‘पण पेढा घेऊन चाललीस कुठं?’बिनी काहीशा हिरमुसल्या आवाजात म्हणाली, ‘टिलू, आज रात्री मी माझ्या घरी पार्टी ठेवली आहे. त्यासाठीच घेऊन चालले आहे.टिलू काही बोलला नाही. तो गपगुमानं उडून गेला. बिनी आपल्या घरी पोहोचली. पण तिथे मुंग्यांची काही बाळं खेळत होती. तिला पाहताच सगळे तिच्याकडे धावले. दीदी, काहीतरी खायला दे ना, खूप भूक लागलीय.
     बिनीने विचार केला, एवढय़ाशा पेढय़ात पार्टी ती काय करणार? तिने उरलेला पेढा मुलांमध्ये वाटून टाकला. ते खाऊन-पिऊन आनंदाने निघून गेले.बिनी घरात आली. तिने अगोदरच रंगीबेरंगी कागदांनी, मेणबत्त्यांनी घर छानसे सजवले होते. ती खिडकीपाशी जाऊन बसली. हळूहळू तिची दोस्त मंडळी येऊ लागली. पण त्यांना खायला द्यायला तिच्याकडे काहीच नव्हते. बरोबर बारा वाजता हॅपी न्यू इअरची धून वाजू लागली, तसा सगळ्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली. सगळे नाचू लागले. तेवढय़ात दारावर टकटक झाली. दारात किटी माशी उभी होती. तिच्या हातात भला मोठा केक होता. तिच्यापाठोपाठ टिलू चॉकलेटचा डबा घेऊन हजर होते.
     माशी म्हणाली, ‘आम्ही तुझी पार्टी टाय टाय फिस्स करू देणार नव्हतो. तू आमची सगळ्यांत बेस्ट फ्रेंड आहेस. कधी कुठल्याही वस्तूला नाही म्हणत नाहीस’.टिलू हसायला लागला, बिनी, तुला काय वाटलं, आम्ही तुझ्या मित्रांना काही न खाऊ घालता असंच जाऊ देऊयानंतर मग सगळ्या मित्रांनी खूप दंगा-मस्ती केली. केक कापला आणि केक, चॉकलेट्सवर सगळ्यांनी यथेच्छ ताव मारला आणि एकमेकांना न्यू इअरच्या शुभेच्छा देत आपापल्या घरी निघून गेले
 दैनिक प्रहार, छोट्टम-मोठ्ठम (१/२/२०१३)

Thursday, January 24, 2013

बालकथा : जमीनदाराची शिकवण

     लखनपूर गावात विष्णूकांत नावाचा सोन्या-चांदीचा एक प्रसिद्ध व्यापारी राहात होता. त्याला मदनलाल नावाचा एक मुलगा होता. त्याला आपल्या वडिलोपार्जित व्यापारात रस नव्हता. एक दिवस अकस्मात व्यापाराचा मृत्यू झाला. त्यामुळे धंद्याची सगळी जबाबदारी मदनलालवर येऊन पडली. पण त्याने त्यात लक्ष न घालता सगळा कारभार नोकरांच्या भरवशावर सोडून दिला.
     एक दिवस त्यांच्या व्यापारातला  सल्लागार त्याला म्हणाला,"मालक, मी ऐकलंय की, आपल्या दुकानासमोरच एक व्यापारी दुसरं सोन्या-चांदीच्या व्यापाराचं दुकान थाटतो आहे. आपल्याला काही तरी करायला हवं." 
     मदनलाल बेफिकीरपणे म्हणाला," तू इतकी का काळजी करतोयस. आपयाकडे कुशल कारागीर आहेत. आपल्या व्यापारात कसलादेखील परिणाम होणार नाही."
     काही दिवसांतच समोर भव्य असे सोन्या-चांदीचे दुकान सुरू झाले. थोड्या दिवसांतच त्याने लोकांचा विश्वास संपादन केला. व्यापारात जम बसवला.साहजिकच मदनलालची मिळकत कमी हो ऊ लागली. पुढे पुढे तर त्याला आपल्या नोकर, कारागिरांनादेखील पगार द्यायला अडचण येऊ लागली. काही कारागीर सोडून गेले तर काहींना मदनलालने काढून टाकले. व्यापार पूर्ण बसला. एक दिवस वैफल्यग्रस्तावस्थेत त्याने घर सोडले.
     असाच भटकत असताना प्रचंड थकव्यामुळे तो एका झाडाखाली विसावला. चेहर्‍यावर त्याच्या प्रचंड ताण आणि थकवा होता.  तिकडून आपल्या माणसांसोबत जाणार्‍या एका जमीनदारने त्याला पाहिले. तो आजारी असल्याचे वाटल्याने त्याने मदनलालला आपल्यासोबत घेतले. जमीनदारने त्याला बरेच काही विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो काही एक बोलला नाही. कदाचित, जमीनदारला त्याची दया आली असावी. त्याने त्याची आपल्या अतितीगृहात राहण्याची व्यवस्था केली.
     त्याच रात्री दरोडेखोरांनी जमीनदाराच्या घरावर हल्ला चढवला. जमीनदारदेखील आपल्या माणसांना घेऊन  शस्त्रांसह त्यांना सामोरे गेला. प्रचंड धुमश्चक्री झाली. मजबूत प्रतिकार पाहून दरोडेखोर मागे हटले आणि पळून गेले. जमीनदारला स्वतः आपल्या माणसांसोबत दरोडेखोरांशी दोन हात करताना पाहून मदनलाल चकीत झाला. तो त्याच्याजवळ जात म्हणाला," भाऊ, आपल्याकडे एवढे नोकरचाकर असताना आपण स्वतःचा जीव धोक्यात घालून दरोडेखोरांशी लढणे योग्य नव्हते. हे काम तुमचे नाही, नोकरांचे आहे."
     ऐकून जमीनदार हसला आणि म्हणाला,'' कुठलेही काम सगळ्यांनी मिळून केले तरच  ते यशस्वी होते.  आणि तसे आपण वागलेच पाहिजे.   त्यातून जो फायदा होईल, त्यातला काही वाटा त्यांनाही द्यावा. जमीनदार आणि व्यापार्‍यांनी तर ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवली पाहिजे."
     जमीनदारचे बोलणे ऐकून मदनलालचे डोळे उघडले.त्याने आपली सगळी कहानी जमीनदारला सांगितली. जमीनदारने त्याला गळाभेट देत विश्वास दिला. आणि काही माणसे आणि काही पैसा देऊन मदनलालची त्याच्या गावी रवानगी केली. मदनलालने आपल्या व्यापाराला नव्याने सुरुवात केली. आणि अल्पावधीतच त्याने आपल्या वडिलांसमान कीर्ती मिळवली.

कष्टाचं मोल

     गोष्ट फार जुनी आहे. अमृतपूर नावाच्या छोटयाशा गावात गोरखनाथ नावाचा एक शेतकरी राहात होता. त्याला केदार नावाचा मुलगा होता. त्याच्यात एक अवगुण होता. तो नेहमी वायफळ पैसे खर्च करायचा. त्याच्या हातात पैसे राहतच नसत. वडिलांकडून पैसे मागून उधळण्यातच त्याचा दिवस जात असे. साहजिकच, वडिलांना त्याच्या खर्चिकपणाची मोठी चिंता वाटत होती. हा असाच पैसे उधळत राहिला तर याला पैशाची किंमत कळणार नाही आणि हा भविष्यात दरिद्री बनून जाईल, असा ते मनोमन विचार करत असत.
     एक दिवस गोरखनाथानं आपल्या मुलाला जवळ बोलावलं आणि समजावलं, ‘‘बाबा रे, मी एका गरीब घरात जन्माला आलो. माझे बाबा शेळ्या चरवत. दूध, बक-यांची विक्री यातून चार पैसे मिळवत. त्यात कशी-बशी घराची गुजराण होई. मला फार शाळा शिकता आली नाही. मी वडिलांना कामात मदत करू लागलो. वडिलांनी मग अधिक शेळ्या घेतल्या. थोडा फार पैसा येऊ लागला. ते पैसे खर्च न करता साठवून ठेवू लागलो.
     वडिलांच्या मृत्यूनंतर मी त्या पैशांतून थोडी जमीन घेतली. त्यात भाजीपाला पिकवून विकू लागलो. पैसे वाचवून पुढे त्यातून एक छोटंस घर खरेदी केलं. मी तुझ्यासारखे पैसे उधळत राहिलो असतो तर आज मी गरीबच राहिलो असतो. मला असं वाटतं, पैसे उधळण्याबाबतीत तू थोडातरी विचार करावास.’’केदारवर याचा काडीमात्र परिणाम झाला नाही. तो पैसे उधळत राहिला. एकदा गोरखनाथ विचार करीत बसला असताना त्याच्या मित्रानं, मंजूनाथनं त्याला कारण विचारलं.
     गोरखनाथने कारण सांगितलं. मंजूनाथने एक योजना सांगितली. ती गोरखनाथला विलक्षण आवडली. त्याने एक दिवस केदारला बोलावून सांगितलं, ‘‘मी बाजारात भाजीपाला विकायला जातो आहे. आता रोज मी भाजीपाला विकून आलो की, तुला दहा रुपये देत जाईन. त्यातले पाच रुपये तू खर्च करायचे आणि पाच रुपये आपल्या शेतातल्या झाडीतल्या विहिरीत फेकून द्यायचे.’’
केदारला तेवढेच पाहिजे होते.
     रोज दोन रुपयाच्या जागी पाच रुपये मिळणार असतील तर कोणाला नको आहे? तो वडील सांगतील तसंच करू लागला. एक दिवस ठरल्यानुसार, गोरखनाथने आजारी पडल्याचा बहाणा केला. केदारला जवळ बोलावून म्हणाला, ‘‘बाबा रे, माझ्या अंगात ताप भरला आहे. अशक्तपणाही आला आहे. उद्यापासून काही दिवस तुलाच बाजारात जावं लागेल. शेतातलीही कामं करावी लागतील. नाही तर, मग मी तुला पैसे कोठून आणून देणार?’’
     दुस-या दिवशी केदार शेतावर गेला. भाजी तोडली. त्याच्या पेंडया बांधल्या. हे करताना त्याला खूप कष्ट पडले. तो भाज्यांचे गाठोडे बांधून बाजारात गेला. संध्याकाळी तो फार थकून घरी आला. एवढं करूनही त्याने फक्त दहा रुपयेच कमावले होते. बाजारातून त्याने अगोदरच पाच रुपये खर्च केले होते. उरलेले पाच रुपये विहिरीत टाकायला गेला. चालता चालता विचार करू लागला, एवढे कष्ट करून मिळवलेले पैसे विहिरीत कसे टाकायचे? तरीही मन मारून त्यानं पाच रुपये विहिरीत टाकले.
     पुढच्या दिवशीही असंच घडलं. पण विहिरीत पैसे फेकायला त्याचं मन तयार होईना. तो बराच वेळ विचार करत उभा राहिला. आणि शेवटी मनाची तयारी करून पाच रुपये विहिरीत फेकून माघारी परतला. तिस-या दिवशी मात्र विहिरीत पैसे फेकण्याचं त्याचं धाडस झालं नाही. विहिरीत पैसे न फेकताच तो माघारी फिरला. वडिलांना म्हणाला, ‘‘बाबा, एवढे मोठे कष्ट उपसून पैसे कमवायचे आणि ते विहिरीत फेकायचे? जर हेच पैसे साठवले तर भविष्यात आपल्या कामाला येतील.’’
गोरखनाथ म्हणाला, ‘‘केदार बाळा, मी रोज तुला दहा रुपये देत होतो, त्यावेळेला तू असा का विचार केला नाहीस?’’
     ‘‘बाबा, माझी चूक झाली. त्यावेळेला मला कष्टाचं मोल माहीत नव्हतं. पण आता मी ते समजून चुकलो आहे. यापुढे माझ्याकडून असा प्रकार होणार नाही.’’ गोरखनाथ हसला. म्हणाला, ‘‘बाळ जा, ती विहीर कोरडी आहे. त्यात फेकलेले पैसे काढून घेऊन ये. आता तुला पैशाचं मोल कळलं ना, हेच मला हवं होतं.’’ केदारला आनंद झाला. तो धावतच विहिरीकडे गेला. विहिरीत उतरल्यावर पैशांचा ढिग पाहून चकीत झाला. ते सगळे पैसे गोळा करून घरी परतू लागला.
     वाटेत विचार करू लागला, आपण उगाचच पैसे खर्च करत होतो. ते पैसे साठवले असते, तर सायकल घेण्याइतपत पैसे जमले असते. अजूनदेखील वेळ गेली नाही. हे पैसे आणि आणखी थोडे पैसे जमवून उपयोगाच्या काही गोष्टी करता येतील. ही योजना त्याने आपल्या बाबांना सांगितली. गोरखनाथने त्याला गळ्याशी धरलं आणि म्हणाला, ‘‘आता तुला पैशाची किंमत कळली, माझ्या मनावरचं फार मोठं ओझं कमी झालं. मी निर्धास्त झालो. आता मी तीर्थयात्रा करून येतो. तू तुझा व्यवसाय सांभाळ.’’खरोखरच केदारने व्यवसाय चांगला सांभाळला, वाढविला आणि फुलविला. त्याची भरभराट पाहून गोरखनाथ कृतकृत्य झाला.

Monday, January 21, 2013

सोन्याचा शर्ट, सोन्याचा बूट आणि....

     आपल्या महाराष्ट्रातल्या पिंपरी-चिंचवडमधील दत्ता फुगे नावाच्या इसमाने सव्वा कोटी रुपयांचा साडेतीन किलो वजनांचा सोन्याचा शर्ट बनवून घेतला असल्याची बातमी अलिकडेच झळकली होती. सोन्याविषयीचे त्याचे प्रेम आपल्याला आश्चर्यात टाकत असले तरी हे काही एकमेव उदाहरण नाही. सोन्याविषयीचे माणसाचे प्रेम आजकालचे नाही, ते प्राचीन काळापासून चालत आलेले  आहे. विशेष म्हणजे हे वेड आणखी वाढतच चालले आहे. धर्मापासून ते विज्ञानापर्यंत सोन्याची महिमा गायिली जात आहे. हेही कमी की काय म्हणून फायनान्सियल ऍडवायझरदेखील सोन्यातील गुंतवणुकीला सर्वोत्तम गुंतवणूक असल्याचा सल्ला दिल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या रुपाने सोन्याचा भाव वाढतोच आहे आणि त्याचे महत्त्व अधोरेखित होतेच आहे. आजच्या बेभवरशाच्या आर्थिक व्यवहारात बँका, पतपेढ्या आदी संस्थांपेक्षा सोन्यातील गुंतणुकीलाच खात्रीशीर आणि योग्य असल्याचं स्वीकारलं जात आहे. फक्त दत्ता फुगेसारखी माणसे काहीसा अतिरेक करताना दिसतात.
     सोन्याचे महत्त्व आणि त्याचा उपयोग आपल्याला माहितच आहे. चकाकी असलेला आणि सहज आकार देण्याजोगा मऊ धातू असल्याने सोन्याचा दागिन्यांमध्ये वापर होतो. त्याच्यापासून सुंदर सुंदर दागिने बनवता येतात. जुन्या काली सोन्याची नाणी प्रचारात होती. तशी ती आजही आहेत, मात्र आता ती देव्हार्‍यात पुजन्यासाठी अथवा गुंतवणुकीसाठी वापरली जातात. वैद्यकशास्त्रातही त्याचा उपयोग औषधी धातू म्हणून केला जातो. कशिदाकाम, वर्करुपाने मिठाईत वापर होतो. अन्य विविध उद्योग-व्यवसायांमध्येदेखील सोन्याचा उपयोग केला जातो. पण वेळोवेळी काही लोकांना सोन्याची सणक अशी काही येते की, मग असं काही घडतं. काही तरी असामान्य वस्तूच्या निर्मितीत त्याचा वापर करण्याची लहर येते आणि मग  चकीत व्हायला होतं. प्राचीन काळात राजे-रजवाड्यांना आपल्या श्रीमम्तीचे प्रदर्शन करण्याची मोठी हौस आणि खुमखुमी होती. ते रोजच्या वापराच्या वस्तूदेखील सोन्याच्या बनवायचे आणि त्याचा रोजच्या व्यवहारात वापर करायचे. सोन्याच्या सिंहासनावर बसणे, सोन्याच्या ताटात भोजन करणे, सोन्याचा मुकुट परिधाण करणे किंवा आपल्या महाल्याच्या खिडक्यांमध्ये सोन्याचा उपयोग करणे आदी गोष्टी राजे-रजवाड्यांच्या काळात सामान्य होत्या. इजिप्तसारख्या देशांमध्ये महालसुद्धा सोन्यापासून बनविण्याचा प्रघात होता. आयुष्यभर सोन्याच्या वैभवात लोळणार्‍या राजांवर त्याच्या मृत्यूपश्चातदेखील अंत्यसंस्कार करताना सोन्याचा वापर केला जाई.
     काही शासनकर्ते सोन्यावर अधिक संशोधन व्हावे  व त्याचबरोबर नव-नवे प्रयोग करण्यासाथी म्हनून शास्त्रज्ञ आणि कलाकारांची नियुक्ती आपल्या दरबारात करत असत.या पिवळ्या रंगाच्या धातूत आढळणार्‍या प्रत्येक नव्या गुणाविषयी नव्या उपयोगाविषयीच्या दाव्यांप्रति शासनकर्त्यांना मोठी उत्सुकता असे. काही राजे तर आपल्याच कल्पनांचा खेळ मांडून सोन्यापासून हे बनव... ते बनव... असा आदेश आपल्या दरबारी असलेल्या कलाकारांना-संशोधकांना आदेश देत असत. आणि मग यंत्रणा कामाला लागायची. त्यातून 'घडलं-बिघडलं' व्हायचं. पण राजापुढं बोलायची  कुणाची बिशाद असायची.
     राजे-रजवाडे यांचा काळ सरला म्हणून सोन्यापासूनची सर्जनशीलता संपली, असे नाही. त्यावरचे प्रयोग आणि नवे-नवे उपयोग पुढेही होतच राहिले. आधुनिक काळातदेखील काही श्रीमंतांनी ही हौस जोपासली. भागवली. इतकंच नव्हे तर काहींनी या  बाबतीत राजे-रजवाडे यांनासुद्धा मागे टाकले. सोन्याच्या महालाचाच विचार केला तर आपल्या लक्षात ये ईल की, सध्याच्या युगातदेखील पॉपकिंग मायकल जॅक्सनसारखी सेलिब्रिटिज सोन्याच्या अवाढव्य सदनिकेत लोळत होती आणि आजही आहेत. काहींना तर नजराणा म्हणून त्यांच्या आप्तनातेवाईक, मित्र-मंडळींकडून दिला जातो.
     अलिकडेच एका डिझायनरने लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये २४ कॅरट सोन्यापासून बनवलेल्या बुटांचे प्रदर्शन भरवले होते.अर्थात सोन्याचा बूट घालून हिंडण्याची कुणाची हिंमत नसली तरी बनविणार्‍याने बनवून आणि पाहणार्‍यांनी पाहून आपली हौस भागवून घेतली. एका मोठ्या हॉटेलने २००५ मध्ये आपल्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाच्यानिमित्ताने एक खास 'स्वीट डिश' सादर केली होती. त्याचं नाव होतं 'गोल्डन ऑप्युलेंस संडे' जगभरातून मागवलेल्या किंमती भांड्यांमधून भोजन 'सर्व' करण्यात आले होते.  त्यात सोन्याची कँडी आणि  १८ कॅरट सोन्याचा चमचादेखील होता. त्याची किंमत होती, एक हजार डॉलर. हाँगकाँग म्हटलं की, पर्यटकांसाठी मोठी पर्वणीच. तिथे कित्येक आकर्षणं आहेत. पण हँग फंग गोल्ड टेक्नॉलॉजीच्या शोरुममध्ये मात्र एक खास असं आकर्षण आहे. ते आहे, २४ कॅरट सोन्यानं बनवलेलं टोयलेट. इतकेच नव्हे तर टोयलेटमधील फरशा, भिंती, सिंक आणि टाईल्सपर्यंत सगळ्या वस्तू सोन्याच्या आहेत.
     हे सगळं जाणून घेतल्यावर  आपल्यापुढे प्रश्न पडतो तो असा कीशेवटी लोकांमध्ये एवढी सोन्याविषयी आसक्ती का? अशा विक्षिप्त वस्तू बनवून घेण्यात काय हशील आहे? याचा थोडा फार विचार केल्यावर माणसाला आपल्या श्रीमंतीचा बाजार मांडण्याची, त्याचे प्रदर्शन करण्याची मोठी हौस असते, हे प्रामुख्याने लक्षात येते. काही कलाकार, तंत्रज्ञ यांनाही कदाचित  मोठं आव्हानात्मक  काही करावंविशेष म्हणजे धातूंचा राजा असलेल्या सोन्यापासून काही तरी करून दाखवावं, असं वाटणं साहजिक आहे. सामान्य वस्तूदेखील सोन्याच्या बनवल्या की, त्या वस्तू विशिष्ट हो ऊन जातात आणि याच विशिष्टतेच्या अट्टाहासापायी काही सर्जनशील मंडळी सोन्याच्या दिशेने खेचली जातात.