Monday, November 18, 2013

लेख नट्यांचं वाढतं वय आणि त्यांच्या लग्नाची चर्चा



     नुकतीच एक बातमी आली होती की, आपल्या राणी मुखर्जीचा  तिचा विवाहीत दोस्त आदित्य चोप्राबरोबर साखरपुडा झाला आहे आणि ते लवकरच लग्न करणार आहेत. अर्थात तथ्य किती आहे, हे अद्याप बाहेर आले नाही, पण त्यामुळे आपल्या बॉलीवूड नट्यांच्या लग्नाबाबतच्या चर्चेला पुन्हा एकदा रंग भरला आहे. तुलसी विवाह संपन्न झाल्याने सगळीकडे लग्नाचे बार उडत असताना आता या बॉलीवूडमधल्या सिंगल सुंदर्‍यांच्या लग्नाच्या चर्चेचीही त्यात भर पडली आहे. राणी मुखर्जी आता 36 वर्षांची झाली आहे. कित्येक वर्षांपासून तिचे  यशराज बॅनरचा सर्वेसर्वा आदित्य चोप्राशी प्रेमसंबंध सुरू आहेत. 1997 मध्ये राजा की आयेगी बारात या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये एंट्री केलेल्या राणीला मध्यंतरीच्या काळात बॉलीवूडची सम्राज्ञी म्हणूनही संबोधले जात होते. ब्लॅक, हम तुम, बंटी और बबली सारखे हिट चित्रपट दिलेल्या राणीचे  अलिकडच्या चार-पाच वर्षात फारच कमी चित्रपट आले आनि जे आले ते साफ कोसळले. मात्र तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या प्रेमसंबंधाची आणि लग्नाचीच चर्चा अधिक ऐकायला मिळाली. मध्यंतरी दोघांनी गुपचुप लग्नही केल्याच्या वावड्या उठल्या होत्या, परंतु त्यावेळी राणीने त्याचे खंडन केले होते. काही महिन्यापूर्वी शत्रुघ्न सिन्हाने म्हणे एका कार्यक्रमात राणी मुखर्जी असा उल्लेख न करता तिचा राणी चोप्रा असा उल्लेख केला होता. काहीही असले तरी हे दोघेही अद्याप मिडियासमोर एकत्र न आल्याने तिच्या विवाहाबाबत तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता मात्र लागून राहिली आहे.
      37 वर्षाची विश्‍व सुंदरी सुष्मिता सेन अजूनही अविवाहित आहे. ब्युटी वुथ ब्रेन असे संबोधल्या जाणार्‍या सुश्मिता सेनच्या सौंदर्यात अजूनही फारसा फरक पडलेला नाही. चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी चाहत्यांमध्ये  तिच्याविषयी अजूनही आकर्षण कायम आहे.  आपल्या फिल्मी कारकीर्दीला दस्तक चित्रपटाद्वारे सुरुवात केलेल्या सुश्मिताने सिर्फ तुम, बीवी नं 1, आँखे सारखे चांगले चित्रपट दिले.दिग्दर्शक विक्रम भट्ट,अभिनेता रणदीप हुड्डा नंतर त्चे नाव पकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वासिम अक्रमशी तिचे नाव जोडले गेले, पण सुश्मिताने या सगळ्या बाष्कळ गप्पा असल्याचे म्हटले. लग्नाशिवाय दत्तक घेतलेल्या दोन मुलांच्या संगोपनात सध्या ती गुंतली आहे. तिने एके ठिकाणी म्हटलंय की, माझा लग्न संस्थेवर विश्‍वास आहे.मला उशिर लागत असला तरी मी लवकरच या बंधनात अडकणार आहे.
      सुश्मिताबरोबरच तब्बूदेखील अद्याप अविवाहित आहे. माचिस, विरासत, हु तू तू, अस्तित्व, चांदणी बार, मकबूल, चिनी कम आणि मीरा नायरचा द नेमसेकसारख्या चित्रपटांमध्ये काम एक परिपक्व विचाराची आणि दमदार अभिनेत्री म्हणून नाव कमावलेल्या तब्बू आपली चित्रपट कारकीर्द देव आनंद यांच्या हम नौजवान या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून सुरू केली होती. गेल्या वर्षीच्या ऑस्कर विजेत्या लाईफ ऑफ पाइ या चित्रपटातही ती होती. हैद्राबादच्या या सुंदर ललनेचे वय 41 आहे. मात्र तिच्याकडे पाहिल्यावर तसे वाटत नाही. आजदेखील तरुणीसारखीच दिसते. कधी निर्माता साजिद नाडियादवाला तर कधी तेलगु सुपरस्टार नागार्जूनसोबत तिचे अफेयर असल्याचे बोलले जात होते. पण ती अजूनही सिंगल आहे.
      जवळपास नऊ वर्षे जॉन अब्राहमसोबत सिरियस रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या बिपाशा बसूचे  आता त्याच्याशी ब्रेक अप झाले आहे. बारा वर्षांपूर्वी अजनबीद्वारा फिल्म इंडस्ट्रीत आलेल्या बिपाशाच्या खात्यावर जिस्म,राज,धूम 2, ओमकारा, नो एंट्री, अपहरणसारखे अनेक हिट चित्रपट आहेत. 34 वर्षाची ही बंगाली कन्या जॉनच्या अगोदर डिनो मोरियोसोबतही काही वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. मात्र आजही ती सिंगल आहे. सध्या तिचे नाव हरमन बावेजाशी घेतले जात आहे. पण तिला विचारल्यावर ती म्हणते, हरमन फक्त माझा दोस्त आहे.
      33 वर्षाच्या नेहा धुपियाला देखील लग्नची प्रतीक्षा आहे. 12 वर्षांपासून  फॅशन आणि चित्रपटांमध्ये सक्रिय राहिलेल्या नेहाला वैयक्तिक आयुष्यात मात्र अपयशच मिळाले आहे. त्यामुळे रिलेशन निर्माण करण्याच्याबाबतीत ती सावध आहे. योग्य असा जोडीदार मिळाला की, आपण विवाह बंधनात अडकू, असं ती ठामपणे सांगते. नेहाबरोबरच इंडियन क्रिकेट लीगच्या निमिताने पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलेली प्रिती झिंटादेखील अजून अविवाहित आहे. बर्‍याच कालावधीनंतर अलिकडचेच तिचा एक सिनेमा आला पण चालला नाही. नेस वाडियासोबतचे अनेक वर्षांपासूनचे रिलेशनशिप तुटल्यानंतर सध्या तरी तिचे नाव कुणाशी जोडले गेलेले नाही. 1998 मध्ये दिल से चित्रपटाद्वारा बॉलीवूडमध्ये पर्दापण केलेल्या प्रितीच्या नावावर अनेक हिट चित्रपट आहेत.सोल्जर, क्या कहना, सलाम नमस्ते, वीर झारा आदी चित्रपटांचा त्यात समावेश आहे.35 वर्षाच्या डिम्पलगर्ललामात्र लग्नाची फारशी घाई नाहीए. हजरजबाबी आणि बिझनेसचे पक्के सेन्स  असलेल्या प्रितीने  सध्या चित्रपट आणि बिझनेसवर  आपले लक्ष केंद्रीत केले आहे.

     वय  वाढत चालले असले तरी या अभिनेत्रींना त्याची पर्वा नाही. त्यांची चिंता मात्र त्यांच्या चाहत्यांना लागली आहे. चित्रपट इंडस्ट्रीला लागली आहे. नट्यांच्या लग्नाच्या चर्चेचा  विषय केवळ आजचा नाही. त्यांची वयं वाढत चालली की, त्यांच्या लग्नाच्या चर्चेला उधाण येते. सध्याही तसेच वातावरण आहे. नुकतेच मल्लिका शेरावतने एम टीव्हीच्या बॅचलरेट इंडिया या स्वयंवरावर आधारित असलेल्या कार्यक्रमाद्वारा 29 पुरुषांमधून विजय सिंह याला आपला जोडीदार म्हणून निवडला आहे. या घडामोडी घडत असतानाच मल्लिकाचे बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वीच विवाह झाला होता आणि पहिल्या नवर्‍यापासून तिला एक मुलगाही आहे, ही बातमी थडकली. पण काही का असेना तिने दुसरा जोडीदार निवडला आहे, त्याच्याशी तिचा किती दिवस संसार चालतो, ते आपल्याला पाहायला मिळलेच.


लेख डॉक्टरांची जीवघेणी लिखणावळ



     डॉक्टरांच्या गिचमिड, घसरड्या आणि घाणेरड्या अक्षरांमुळे दरवर्षी सात हजार लोकांना आपला जीव गमवावा लागतो, यावर आपला विश्‍वास बसेल का? नाही ना? पण ही वस्तुस्थिती आहे. एका सरकारी रिपोर्टनुसार डॉक्टरांच्या अशा घसरड्या, न वाचता येणार्‍या हस्ताक्षरांमुळे दरवर्षी जवळपास सात हजार रुग्णांना आपले प्राण गमवावे  लागतात. इतकी या डॉक्टर मंडळींची लिखणावळ खराब आहे. त्यांच्या या लिखणावळीमुळे लोकांचा जीव जात असेल तर त्यांच्यात आणि जल्लाद यांच्यात काय फरक आहे, असे समजायचे? आपल्या घरातली किंवा खिशातली डॉक्टरांची औषधांची चिठ्ठी  काढून पहा.  तुमच्याही लक्षात ही गोष्ट येईल. शेवटी ही माणसं अशी का करतात बरं?
      अशाच हस्ताक्षरात त्यांनी डॉक्टरकीच्या डिग्रीची परीक्षा दिली असती तर ही मंडळी पास झाली असती का? आणि अशी दुकाने थाटल्यासारखी दवाखाने उघडली असती किंवा सरकारी रुग्णालयात नोकरीला लागली असती का? डॉक्टर झाल्यावरच  त्यांचे हस्ताक्षर का बिघडते? याचा सरळ अर्थ निघतो. तो म्हणजे ते केवळ पैसे कमवायला बसले आहेत. रुग्णांना झिडकारल्यासारखे करत ही माणसे औषधाची चिठ्ठी लिहितात. रुग्ण सेवा हीच ईश्‍वर सेवा, हे वचन ही मंडळी विसरूनच जातात. कित्येक डॉक्टर तर फक्त पहिले अक्षर तेवढे स्पष्ट लिहितात. बाकी पुढे नुसती आढवी रेघ असते. कित्येकांना त्यांनी काय लिहिलं आहे, असं विचारलं तर सांगून टाकतात, मेडिकलमध्ये जा, तो वाचून गोळ्या-औषध दे ईल. म्हणजे त्यांना पुन्हा विचारायला गेले तर त्यांचे त्यांना लिहिलेले वाचता येत नाही, अशी ही तर्‍हा. मग मेडिकल दुकानदाराला तर काय कप्पाळ कळणार त्याचे हस्ताक्षर! तो पहिल्या अक्षरावरून अंदाजित गोळ्या लिहून देतो. मग होतात चुका. चुकीचा डोस दिला गेल्याने रुग्णाच्या जीवावर बेततं.
      जग जिंकायला निघालेल्या सिंकदरचे अक्षर फारच वाईट होते. तो स्वारीवर असल्यावर आपल्या बायकोला पत्रं लिहायचा. बिचारी ती पत्रं वाचूच   शकत नव्हती. तो स्वारीवरून परत आल्यावर तिने ती सगळी पत्रं त्याच्यापुढे टाकली आणि म्हणाली, यात काय लिहिलात मला वाचून दाखवा. तो म्हणाला, ही पत्रं  लिहून मला खूप दिवस झाले. आता ही पत्रं मी आता कशी वाचू शकतो? पुढे इतिहासात  सिंकदर महान (?) ठरला. मग त्याच्या समर्थकांनी एक सिद्धांत मांडला, महान लोकांची अक्षरे खराबच असतात. आता या महानतेच्या पलिकडे आपली ही डॉक्टर मंडळी गेली आहेत. कारण यांची हस्ताक्षरे नुसते खराबच नाहीत तर जीवघेणीही आहेत.
      डॉक्टरांचा दवाखान्याचा उंबरा उलांडायचा म्हणजे खिशात भरपूर पैसे असायला हवा. त्यांच्या अशा हस्ताक्षरांचा विचार केला आणि एखाद्याचे ऑपरेशन झाले तर मग त्याने पिशवी भरूनच पैसे न्यायला हवेत. एक तर डॉक्टर वेळेत सापडत नाहीत किंवा जाग्यावर नसतात म्हणून अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यात डॉक्टर लोक जाणूनबोझुन रुग्णांना मारत असतील, हा प्रकार  मोठा चिंताजनक म्हटला पाहिजे. आपल्या मेडिकल कायद्यात अशी काही तरतुद नाही की, त्यांनी स्वच्छ अक्षरात औषधांची चिठ्ठी लिहून द्यावी. मात्र सरकारने किंवा सामाजिक संस्थांकडून याची दखल घेतली जायला हवी. चुकीच्या डोसने जीव गमावणार्‍यांची ही आकडेवारी मोठी चिंताजनक आहेच, पण त्यातही अशा चुकीच्या औषधांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होणार्‍यांची संख्याही कमी असणार नाही. त्यामुळे  याची वेळीच दखल घेतली गेली पाहिजे. डॉक्टरांनी रुग्ण सेवा ही ईश्‍वर सेवा म्हणून काम करायला हवे. औषधांची चिठ्ठी लिहून देताना औषधांची नवे व डोसेचे प्रमाण स्वच्छ अक्षरात लिहून द्यायला हवे.  त्यांचे खराब अक्षर हे त्यांच्या असंवेदनशीलता आणि  असामाजिकतेच लक्षण मानले पाहिजे. सुंदर  हस्ताक्षर हाच खरा दागिना आहे, असा एक सुविचार प्रसिद्ध आहे.  सुंदर अक्षरात त्याचे व्यक्तिमत्त्व डोकावते, म्हणतात. तर मग डॉक्टरांच्या या औषधांच्या चिठ्ठ्यांवर लिहिलेली अक्षरे त्यांच्या कोणत्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक म्हणायचे, याचा विचार केला गेला पाहिजे.  आता कॉम्प्युटरचे युग  आहे, त्याचा लाभ उठवत डॉक्टरांनी औषधांच्या चिठ्ठ्या कॉम्प्युटर प्रिंट द्याव्यात, त्यामुळे असे धोके राहणार नाही. शिवाय त्यांचा  लिहिण्याच्या कंटाळ्यापासून बचावही होईल.

Saturday, October 12, 2013

बालकथा कष्टाचे मोल



      गोष्ट फार जुनी आहे. अमृतपूर  नावाच्या छोट्याशा गावात गोरखनाथ नावाचा एक शेतकरी राहात होता. त्याला केदार नावा मुलगा होता.  त्याच्याकडे एक अवगुण होता, तो म्हणजे वायफट पैसे खर्च करण्याचा. त्याच्या हातात लक्ष्मी ठरतच नव्हती. वडिलांकडून पैसे मागून घ्यायचा आणि उधळायचा. साहजिकच वडिलांना त्याच्या खर्चिकपणाची मोठी चिंता वाटत होती. हा असाच पैसे उधळत राहिला तर याला पैशाची किंमत कळणार नाही   आणि हा  भविष्यात दरिद्री बनून जाईल.
      एक दिवस गोरखनाहाने आपल्या मुलाला जवळ बोलावलं आणि समजावलं, “बाबा रे, मी एका गरीब घरात जन्माला आलो. माझे बाबा शेळ्या चारवत. दूध, बकर्‍यांची विक्री यातून चार पैसे मिळत. त्यात कशी-बशी घराची गुजराण होई. मला फार शाळा शिकता आली नाही. मी वडिलांना कामात मदत करू लागलो. वडिलांनी मग अधिक शेळ्या घेतल्या. थोडा फार पैसा येऊ लागला. ते पैसे खर्च न करता साठवून ठेवू लागलो. वडिलांच्या मृत्यूनंतर मी त्या पैशांतून थोडी जमीन घेतली. त्यात भाजीपाला पिकवून विकू लागलो. पैसे वाचवून पुढे त्यातून एक छोट्ंस घर खरेदी केलं. मी तुझ्यासारखे पैसे उधळत राहिलो असतो तर आज मी गरीबच राहिलो असतो.”
      केदारवर  याचा काडीमात्र परिणाम झाला नाही. तो पैसे उधळतच राहिला. एकदा गोरखनाथ विचार करीत बसला असताना त्याच्या मित्रानं-मंजूनाथनं कारण  विचारलं.  गोरखनाथने कारण सांगितलं.मंजूनाथने एक योजना सांगितली. ती गाेरखनाथला विलक्षण  आवडली. त्याने एक दिवस केदारला बोलावून सांगितले, “ मी बाजारला भाजीपाला विकायला जातो आहे. आता रोज मी भाजीपाला विकून आलो की, तुला दहा रुपये देत जाईन. त्यातले पाच रुपये तू खर्च करायचे  आणि पाच रुपये आपल्या शेतातल्या झाडीतल्या  विहिरीत फेकून द्यायचे. ”
      केदारला तेवढेच पाहिजे होते. रोज दोन रुपयाच्या जागी पाच रुपये मिळणार असतील तर कोणाला नको आहे? तो वडील सांगतील तसेच करू लागला. एक दिवस ठरल्यानुसार गोरखनाथने आजारी पडल्याचा बहाणा केला. केदारला जवळ बोलावून म्हणाला, “ बाबा रे, माझ्या अंगात ताप भरला आहे. अशक्तपणाही  आला आहे. उद्यापासून काही दिवस तुलाच बाजारला जावं लागेल. शेताचीही काम करावी लागतील. नाही तर मग  मी तुला पैसे कोठून आणून  देणार? ”
      दुसर्‍या दिवशी केदार शेतावर गेला.  भाजी तोडली. त्याच्या पेंड्या बांधल्या. हे करताना त्याला खूप कष्ट पडले.  भाज्याचे गाठोडे  बांधून बाजारात गेला.   संध्याकाळी घरी आला तो फार थकून. एवढे करूनही तो फक्त दहा रुपयेच कमवू शकला होता. त्याने अगोदरच पाच रुपये खर्च केले होते. उरलेले पाच रुपये विहिरीत टाकायला गेला. चालता चालता विचार करू लागला, एवढे कष्ट करून मिळवलेले पैसे विहिरीत कसे टाकायचे? तरीही मन मारून त्याने पाच रुपये विहिरीत टाकले.
      पुढच्या दिवशीही असेच घडले. पण विहिरीत पैसे फेकायला त्याचे मन तयार होईना. बराच वेळ विचार करत उभा राहिला आणि शेवटी मनाचा हिय्या करून पाच रुपये विहिरीत फेकून माघारी परतला. तिसर्‍या दिवशी मात्र त्याचे धाडस झाले नाही. विहिरीत पैसे न फेकताच तो माघारी फिरला. वडिलांना म्हणाला, “ बाबा, एवढे मोठे कष्ट उपसून पैसे कमावयचे आणि ते विहिरीत फेकायचे? जर हेच पैसे साठवले तर भविष्यात आपल्या कामाला येतील. ”
      गोरखनाथ म्हणाला, “केदारबाळा, मी रोज तुला दहा रुपये देत होतो, त्यावेळेला तू असा  का विचार केला नाहीस? ”
      “  बाबा, माझी चूक झाली. त्यावेळेला मला कष्टाचे मोल माहित नव्हते. पण आता समजून चुकलो आहे. यापुढे असा प्रकार होणार नाही. ”
      गोरखनाथ हसला. म्हणाला, “बाळ  जा, ती विहीर कोरडी आहे. तिला पायर्‍याही आहेत. त्यात फेकलेले पैसे काढून घेऊन ये. आता तुला पैशाचे मोल कळले ना, हेच मला हवे होते. ”  केदार आनंदला. तो धावतच विहिरीकडे गेला. विहिरीत उतरल्यावर पैशांचा ढीग पाहून चकीत झाला. ते सगळे पैसे गोळा करून घरी परतू लागला. वाटेत विचार करू लागला, आपण उगाचच पैसे खर्च करत होतोे. ते पैसे साठवले असते, तर सायकल घेण्याइतपत पैसे जमले असते. अजूनदेखील वेळ गेली नाही. हे पैसे आणि आणखी थोडे पैसे जमवून उपयोगाच्या काही गोष्टी करता येतील. ही  योजना त्याने आपल्या बाबांना सांगितली. गोरखनाथने त्याला गळ्याशी धरलं आणि म्हणाला, “ आता तुला पैशाची किंमत कळाली, माझ्या मनावरचं फार मोठं ओझं कमी झालं. मी निर्धास्त झालो. मुलं शहाणी  झाली की, मोठ्यांची काही काम उरत नाहीत. आता मी तीर्थयात्रा करून येतो. तू तुझा व्यवसाय सांभाळ. ”
      खरोखरच केदारने   व्यवसाय चांगला सांभाळला,  वाढविला आणि फुलविला. गोरखनाथ कृतकृत्य झाला.
kilbil.prahaar 2013
kilbil.mahasatta 2017


बालकथा अंधश्रद्धाळू आकाश




       संध्याकाळी बाबा ऑफिसमधून घरी आल्या आल्या आकाशानं विचारलं, “बाबा, माझा पेन आणलात?”
 “हो, आणलाय,” असे म्हणत त्यांनी आपल्या बॅगेतून एक पेन काढला आणि आकाशच्या हातात टेकवला.
 पेन पाहताच आकाशचा चेहरा उतरला.तो म्हणाला, “ हे काय हो बाबा, मी तुम्हाला निळ्या रंगाचा पेन आणायला सांगितला होता, तुम्ही हिरव्या रंगाचा आणलात. निळा रंग यश देतो, माहित नाही का तुम्हाला? ”
 “हे  कुणी सांगितलं तुला? ” बाबांनी चकित हो ऊन विचारलं.
 “नितीन म्हणाला असं!”आकाश म्हणाला.
 “कोण नितीन? ”बाबा
 “माझ्या वर्गात आहे तो! ”आकाश
 “असं काही नसतं! परीक्षेची तयारी कर. ” बाबा म्हणाले.
 “नाही बाबा, हिरव्या रंगाच्या पेनने परीक्षा दिली तर चांगले मार्क पडत नाहीत. ”आकाश म्हणाला.
 “आकाश, या सगळ्या फालतू गोष्टी आहेत. हिरव्या-निळ्या रंगानं काही घडत नसतं. तू परीक्षेची चांगली तयारी केली असशील तर चांगले मार्क मिळतीलच. ” बाबांनी समजावलं.
 पण आकाश ऐकायला तयार नव्हताच. तो बाबांकडे निळ्या रंगासाठी हट्ट धरून बसला. तेव्हा बाबा म्हणाले, “आता सगळी दुकानं बंद झाली असतील.आता कोठून निळ्या रंगाचा पेन आणणार? ”
 पेन शोधता शोधता  बरीच रात्र झाली. शेवटी एकदाचा निळ्या रंगाचा पेन मिळाला. अजून त्याला परीक्षेची तयारी करायची होती. पण त्याला झोप येऊ लागली. त्यामुळे त्याने आईला पहाटे पाच वाजता उठवायला सांगून झोपी गेला.
 पहाटे आईने त्याला उठवले. तो बेडवरून खाली उतरत होता, तोच आईला शिंक आली. तो पुन्हा बेडवर जाऊन पडला.
 आईने तो परत फिरून झोपल्याचे पाहून त्याला उठायला सांगून ती आपल्या कामाला निघून गेली. बाबांना तर त्याचा रागच आला. ते आकाशला म्हणाले, “आकाश, काल तू निळ्या पेनच्या भानगडीत अभ्यास केला नाहीस. आता उठतोस की नाही? साडेसहापर्यंतच तुला वेळ आहे. ”
 तेव्हा आकाश म्हणाला, “बाबा, नितीनने सांगितलंय की, कुठलंही काम सुरू करण्यापूर्वी कुणी शिंकलं तर लगेच कामाला सुरूवात करायची नाही. ”
 बाबा म्हणाले, “अरे व्वा! आमचा आकाश तर चक्क अंधश्रद्धाळू बनला आहे. पण याच्याने तुझं नुकसानच होणार आहे. ” तरीही आकाश टाळत राहिला. दहा मिनिटांनंतरच तो अंथरुणातून उठला.
 परीक्षेच्या तयारीसाठी त्याच्याकडे फक्त साडेसहापर्यंतच वेळ होता.सातला तर त्याची स्कूलबस यायची. काल रात्री निळ्या पेनच्या शोधात आणि आज सकाळी शिंकेच्या भानगडीत  त्याची परीक्षेची तयारी काही म्हणावी अशी झाली नाही. त्यामुळे त्याला शालेला जाण्यासाठी तयार व्हायलाही वेळ झाला. बाबा आणि आकाश रस्त्यावर येताच त्यांना एक मांजर आडवं गेलं. आकाशने बाबांना थांबवले. एक मोटरसायकल पुढे गेल्यावर मग तो निघाला. स्कूलबस कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर येऊन थांबायची. पण तिथे गाडी होती ना मुलं! म्हणजे स्कूलबस निघून गेली होती. आकाशला शाळेत पोहचणं आवश्यक होतं, कारण आज परीक्षा होती.
 एक रिक्षा आली. बाबांनी त्याला हाक दिली. दोघेही रिक्षात बसायला पुढे निघाले, तोच आकाश जागच्या जागी थांबला. बाबांनी विचारल्यावर आकाश म्हणाला, “बाबा, गाडीचा नंबर 1301 आहे. तेरा हा अंक अशुभ असतो. या रिक्षाने गेलो तर परीक्षा चांगली जाणार नाही. आपण दुसर्‍या रिक्षाने जाऊ.”
 आकाशची गोष्ट ऐकून बाबांना भलताच राग आला. ते म्हणाले, “तुझे डोके-बिके फिरलेय का काय? कुठल्या अंधश्रद्धेच्या बाता मारतोयस तू? या घडीला तुला शाळेत पोहचणं, महत्त्वाचं आहे. चल, रिक्षात बस बघू.आधीच उशीर झाला आहे. ”
 पण आकाश आपल्या गोष्टीवर अडून राहिला. रिक्षावाल्याला दुसरे भाडे मिळाले. तो निघून गेला. बर्‍याच उशीराने एक रिक्षा आली.
 दोघे शाळेत पोहचले. परीक्षा सुरू होऊन अर्धा तास झाला होता. आकाश वर्गात गेला. त्याचे बाबा घरी आले. दुसरा शनिवार असल्याने ऑफिसला सुट्टी होती.
 दुपारी आकाश शाळेतून घरी आला. त्याचा चेहरा उतरलेला होता. आई-बाबांनी त्याला विचारल्यावर त्याने पेपर खूपच कठीण गेल्याचे सांगितले. तेव्हा बाबा म्हणाले, “बघितलसं,अंधश्रद्धेच्या आहारी गेलं की काय होतं ते! मी तुला अगोदरच सांगितलं होतं, असल्या गोष्टीवर विश्‍वास ठेवू नकोस म्हणून! ”
 बहुतेक ही गोष्ट आकाशच्या लक्षात आली असावी.त्याने हो म्हणत मान हलवली होती.तेवढ्यात आई म्हणाली,असू दे, आता हात-पाय धुवून घे. काही तरी खा. आणि पुढच्या पेपरच्या तयारीला लाग. ”
 आईची गोष्ट ऐकून आकाश हात-पाय धुवायला उठणार तोच, बाबांना शिंक आली. बाबा म्हणाले, “आकाश, मला शिंक आली. आता तू दहा मिनिटे असाच बसणार का? हात-पाय धुवायला जाणार नाहीस काय?”
 “नाही बाबा, आता या भानगडीत पडणार नाही. मला सगळं काही समजून चुकलं आहे. या सगळ्या गोष्टी बेकार आहेत. ” असे म्हणून आकाश हात-पाय धुवायला बाथरुममध्ये गेला.

  

बालकथा बकरी मिळाली परत



      ताश्कंद नगरीत मीर जाफर नावाचा एक फिरस्ता व्यापारी राहत होता.  दिवसभर उंटासारखा राबायचा. तरी त्याची बरकत काही होत नव्हती.  उलट व्यापारात घाटाच व्हायचा. शेवटी त्याने व्यापार टाकला. आता तो मस्त खाई-पिई आणि कुठे तरी बाहेर जाऊन चकाट्या पिटत राही. बिच्चारी त्याची बायको चार घरची धुणी-भांडी करी आणि घरगाडा  कसा तरी टिच्चून टिच्चून चालवी.
      एक दिवस मीर जाफर एक मरतुकडी बकरी अगदी स्वस्तात घेऊन घरी आला. मीर जाफर तर दिवसभर घराबाहेरच असे. त्यामुळे बकरीचे सगळे काही जमिराला करावे लागे. बकरी  दिवसभर ओरडून दंगा घालायची. खुशाल चारा खायची आणि घरभर घाण करायची. बकरीची उसाभर करून करून जमिरा  पार मेटाकुटीला आली.
      एक दिवस मीर जाफर घरी आल्यावर जमिरा डोळ्यांत पाणी आणून म्हणाली, “ ही बकरी काय माझा जीव घ्यायला आणला आहात? आत्ताच्या आत्ता तिला विकून या नाही तर मला माहेरी सोडून या. इथे आपल्यालाच खायचे वांदे असताना हिला काय घालू, माझी वाळलेली हाडं?”
      “जमिरा, तू अजिबात काळजी करू नकोस. आत्ताच्या आत्ता हिचा बंदोबस्त करतो.”  मीर जाफर तिचे सांत्वन करीत म्हणाला.
      त्या दिवशी मीर जाफरचं मन फार उदास होतं. काय करावं त्याला सुचत नव्हतं. त्याला तिच्या अम्मीची याद आली. तो अम्मीची कबर असलेल्या कब्रस्तानात गेला. तिथं भरपूर गवत उगवलं होतं. गवत हिरवंगार, कोवळं लुसलुशीत होतं.
      मीर जाफर काही वेळ कबरीजवळ बसला. चोहोबाजूची हिरवळ पाहून त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. त्याच्या बकरीसाठी याच्यापेक्षा  चांगलं ठिकाण आणखी  कुठे असणार?    तो उठला आणि तडक कब्रस्तानच्या रखवालदाराकडे गेला. म्हणाला, “  मी तर आता फार थककून गेलोय. मला काही मूल-बाळ नाही. तेव्हा मी मेल्यावर माझं दफन तूच करायचंस. तुला ही बकरी आत्ताच देऊन टाकतो.”
      हैदरनं अगदी आनंदानं बकरीचा स्वीकार केला.
      दोन महिन्यांनी मीर जाफर पुन्हा अम्मीच्या कबरीकडे गेला. काही वेळ बसला.
 जाताना सहज त्याची नजर तिथे चरणार्‍या बकरीवर पडली. पहिल्यांदा तर तो ओळखूच शकला नाही. ती त्याचीच बकरी होती. हिरवंगार गवत खाऊन अगदी धष्टपुष्ट झाली होती.
      “इतकी वजनदार बकरी दान करायची म्हणजे खुळ्याचा बाजारच की!”  तो स्वत: शीच विचार करू लागला. विचार करता करता त्याने पक्का निश्‍चय केला. काय वाट्टेल ते झाले तरी बकरी सोडायची नाही. तो तडक रखवालदाराच्या घराकडे गेला. त्याचा दरवाजा खटकावला. दरवाजा  उघडताच म्हणाला, “ हैदर, चल आटप लवकर. मी शहर सोडून चाललोय. तूदेखील माझ्यासोबत निघायला तयार हो.”
      “कुठे जायला  तयार होऊ म्हणतोस?” हैदरने  हैराण होऊन विचारले.
      “कुठं काय, विचारतोयस. अरे, तू मला वचन दिलयसं , माझ्या मृत्यूनंतर माझा दफनविधी तू करणार म्हणून!  म्हणून तर तुला मी बकरी दिली. आता मी जिथं कुठं राहीन, तिथं तुला यावं लागेल. माझा दफन विधी करायला तू हवास ना!”
      ऐकून हैदर चक्रावलाच! तो जाम भडकला. “ तुला जिथं कुठं जाऊन मरायचं आहे, तिथं जाऊन मर जा. आणि ही तुझी मनहूस बकरीदेखील सोबत घेऊन जा. दोघे जाऊन नदीत जीव द्या नाही तर आणखी काय करायचं ते करा. वेडपट कुठला!”  असे म्हणतच हैदरने पटकन दरवाजा लावून घेतला.


     मीर जाफर बकरी घेऊन अगदी आनंदाने घरी आला. आता तो आपल्या हुशारीवर   स्वत: ची पाठ थोपटून घेत होता.  

बालकथा शिवण यंत्राचा अविष्कार



      एक मुलगा होता. ताे एका पायाने अपंग होता. पण  आईचा लाडका होता. सात वर्षाचा  हा मुलगा  एक दिवस आईला म्हणाला, “ आई, आपल्या शेजारची दोन मुलं आज शाळेला गेली. मला कधी शाळेत  पाठवणार? ”
 आई म्हणाली, “ बेटा, शाळा फार दूर आहे. तुला चालवणार नाही. आणखी थोडा मोठा झालास की, तुला पाठविन हो.”
 तो म्हणाला, “ नाही आई, मी आताच जाणार! मी पायाने लंगडा असलो तरी काय झालं? मी जाऊ शकतो. ”
      आई त्याला किती तरी वेळ समजावत राहिली, पण त्याने आपला हट्ट सोडला  नाही. कुठलाही वाईट हट्ट दु:ख देतो, तर  चांगला हट्ट  सुख! आपल्या मुलाचा हट्ट  चांगल्यासाठी, भल्यासाठी आहे. शिवाय आपला मुलगा अपंग आहे. त्याला कष्टाची कामे जमणार नाहीत. शिकला-सवरला  तर कसली तरी बैठी नोकरी मिळून जाईल. त्याचे आयुष्य सुखी झाले म्हणजे झाले, याचा विचार करून तिने त्याला शाळेला जायला परवानगी दिली. त्याला  घेऊन शाळेत गेली आणि नाव दाखल केले.
      शाळेतील त्याचे वर्गमित्र  त्याला लंगड्या लंगड्या म्हणून चिडवत. पण तो त्यांना काहीदेखील  म्हणत नसे. त्यांच्या बोलण्याचे वाईट वाटून घेत नसे. सुरुवातीला त्याच्या वर्गातली मुलं फळ्यावर, भिंतीवर लंगड्या मुलाचे चित्र काढायचे, तर कधी त्याला पाहून लंगड्त चालायची. पण तो या सगळ्या गोष्टी हसून टाळत असे. एक दिवस तर मुलांनी तो बसताना त्याची खुर्ची मागे खेचली आणि तो खाली पडला. त्यालाप्रचंड  वेदना झाल्या. जखमदेखील  झाली. परंतु, तरीही त्याने खोड काढणार्‍या मुलांची नावे शिक्षकांना सांगितली नाहीत. सगळीच मुले अचंबीत  झाली. शेवटी त्यांना उपरती आली.  त्याला चिडवणारे, त्रास देणारे सगळे  त्याचे मित्र बनले. आपल्या सहनशिलतेच्या आणि लाघवी बोलण्याच्या जोरावर त्याने सगळ्यांची मने जिंकली.
      एक दिवस तो घरात बसून अभ्यास करीत होता. बाजूलाच बसून आई कपडे शिवत होती. त्याने आईला विचारलं,“ तू शिंप्याचं काम  करते आहेस का? ”
      आई म्हणाली, “ नाही रे बाबा, तुझा फाटलेला  शर्ट शिवते आहे. ”
 त्यानं विचारलं,“ मग शिंप्याकडे टाकायचं नाही का? तो चांगल्या प्रकारे शिवून दिला असता. ”
 “बाळा, शिंप्याला पैसे द्यावे लागतील. तेवढे पैसे आपल्याकडे  नाहीत. ” आई म्हणाली.
      ही गोष्ट त्याच्या मनाला फार लागली. आई किती कष्ट उपसते. तरीही पुरेसे  पैसे नाहीत. त्याने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला. कामाच्या शोधात घराबाहेर पडला. कामाचा शोध घेत घेत तो एका कारखान्यात पोहचला. तिथल्या मालकाला अगदी विनम्रपूर्वक म्हणाला, “ साहेब, मी पायाने अपंग आहे. पण मला कोणतेही काम द्या, ते मी मन लावून करेन. काम आवडले तर कामावर ठेवा अन्यथा नका ठेवू. ”
      त्याच्या विनम्र बोलण्याने मालक प्रभावित झाला. त्याला कामावर ठेवून घेतले. कष्ट, एकाग्रता आणि जिद्दीच्या जोरावर त्याने मालकाचा विश्‍वास संपादन केला. त्याला आता स्थायीस्वरुपाची नोकरी मिळाली.
 काही वर्षे लोटली. त्याचे मन कामात रमले. कामात साधी चूकसुद्धा  होऊ नये, याची तो खबरदारी घेत असे. एक दिवस मालक -कारखानदार कोणाशी तरी बोलत होता, “ हाताने जितके काम होते, त्याच्या दहापट काम यंत्राद्वारा करता येते. एक शिंपी दिवसभरात एखादेच  कापड शिवू शकतो, मात्र  एक शिवण यंत्र दिवसभरात दहा कपडे शिवू शकते. ”
      त्या अपंग युवकाला त्याची आई आठवली की, जी अजूनही आपल्या वृद्धापकाळात दुसर्‍यांची कपडे शिवते  आणि     आपले पोट भरते. त्या काळात  अद्याप शिवण यंत्राचा शोध लागलेला नव्हता. शिंपी लोक हातानेच कपडे शिवत.
 तो युवक आपल्या मालकाला विनम्रपणे म्हणाला, “ आपली आज्ञा असेल तर मी शिवणयंत्र बनवण्याचा प्रयत्न करू का? ” मालकाने एकवार त्याच्याकडे पाहिले आणि म्हटले, “ असे शिवणयंत्र बनवले जाऊ शकते, याची तुला खात्री आहे का? ”
 “हो, मला खात्री आहे, मला माझ्या मेहनतीवर आणि निष्ठेवर विश्‍वास आहे. ” युवक दृढतेने म्हणाला.
      मालकाने परवानगी तर दिलीच, पण  शिवाय त्याच्या मदतीला लोक आणि आर्थिक सहकार्यही दिले. त्याने काही चित्रे बनवली, ज्याच्या आधाराने  धातूचे सुटे भाग बनवण्यात आले. यंत्राचा त्याने साचा बनवला. त्याद्वारे काम चालले होते. शेवटी त्याच्या दिवस-रात्रीच्या कष्टाला, जिद्दीला यश आले आणि शिवणयंत्राचा अविष्कार झाला. त्यावर कपडे शिवले जाऊ शकत होते.
      लोकांपर्यंत शोधाची बातमी पसरली. शिंप्यांनाही कळले, पण त्यांचा या यंत्रावर  विश्‍वास बसला नाही. यंत्रावर कपडे कसे शिवले जाऊ शकतात? असा त्यांचा सवाल होता. परंतु, हळूहळू लोक ते यंत्र पाहायला येऊ लागले. त्यांचा विश्‍वास बसू लागला. शिंपी मोठ्या खुबीने आणि तितक्याच संयमाने कपडे शिवतात, पण यंत्रानेही हुबेहुब तशीच शिलाई केली जाऊ शकते आणि अल्पावधीत होऊ शकते, याची खात्रीदेखील  त्यांना पटली.


 1840 मधली ही घटना आहे. आपल्या जिद्द, एकाग्रता आणि मेहनतीच्या जोरावर शिवणयंत्राचा अविष्कार करणार्‍या अपंग अमेरिकन युवकाचे नाव आहे, इलियस होव. त्याच्यामुळेच शिवण कलेत मोठी क्रांति झाली.

बालकथा टिंकीचा करिश्मा



      नंदनवनात परतल्यावर टिंकी  बरेच दिवस आपल्या आईच्या हातच्या स्वादिष्ट भोजनावर ताव मारत राहिली. मग  एक दिवस ती तिच्या मैत्रिणीला-किटी खारूला भेटायला बाहेर पडली. जाताना तिनं पाहिलं की, बंटी माकड कल्लू कावळ्याशी भांडत होता. फिस्सकन अंगावर जात होता आणि   तावदारू न म्हणत होता, “ तुझं  गबाळ उचलं आणि दुसर्‍या झाडावर जाऊन राहा. इथे माझ्याबरोबर नको. तुला कसं राहावं, याची अजिबात  अक्कल नाही.कुठलेही, कसले घाण मांसाचे तुकडे आणतोस, आणि  कुठेही, कसेही टाकतोस.त्याच्याने  परिसरात किती दुर्गंधी पसरली आहे. अरे, तुझ्यामुळे  आम्हाला  नाकपुड्या धरून वावरावं लागतं.छे... छे! तू इथे एक क्षणभरही थांबायचं नाहीस.चालता हो इथून! ”
      त्यावर कल्लू कावळा ठामपणे म्हणाला, “ आम्ही आमच्या  वाडवडिलांपासून इथे राहतो आहोत. इथून  अजिबात जाणार नाही.ङ्घ  बंटीचे पित्त खवळले.  त्याने त्याच तिरीमिरीत  कल्लूच्या कानशिल्यात लगावली. तसा कल्लू तडमडत खाली पडला. त्यांचे भांडण पाहून इटुकली टिंकी  पटकन तिथे पोहचली. आणि म्हणाली,            “ नमस्कार बंटीकाका! कसे आहात? ”
      बंटी आवाज ऐकून  मागे वळला. पाहतो तर  टिंकी मुंगी  पुढचे दोन्ही हात जोडून उभी.  तिला पाहताच त्याचा राग कुठल्या कुठे पळाला. टिंकी होतीच तशी! सार्‍या  नंदनवनची  तिच्यावर मर्जी होती. तिला लहानपणापासून एक सवय होती, कुणी कितीही रागावलं तरी रागाला यायचं  नाही. आणि राग अनावर झाला तरच ती थेट तेथून उठायची आणि दुसरीकडे कुठे तरी जायची.  पाणीबिणी प्यायची.   थोडावेळ  पुस्तक  वाचत बसायची.
 राग शांत  झाला की, मग ती माघारी परतायची. पुन्हा  पहिल्यासारखी हसत खिदळत  गप्पांमध्ये रमून जायची. तिच्या अशा या वागण्यामुळे जे आपल्या क्रोधाने दुसर्‍या पशु-पक्ष्यांना  त्रास द्यायचे, त्यांना आपण केलेल्या कृत्याचा पश्‍चाताप व्हायचा.
       टिंकीला पाहून कल्लूनेदेखील नमस्कार केला.ती बंटीला म्हणाली, “ काका, भांडणतंट्याने कुणाचे प्रश्‍न सुटले आहेत का? आणि कल्लू कावळ्याकडून काही चूक झालीच असेल तर तुम्ही त्याला अगदी शांतपणानेसुद्धा सांगू शकता.  मी मनोमन किती अभिमान बाळगला होता, आपल्या नंदनवनचा  आणि  इथल्या रहिवाशांचा! आपल्या नंदनवनात शहरातल्या माणसांसारखं कुणी भांडणतंटा करत नाही. अगदी प्रेमानं, गुण्यागोविंदयानं राहतात. आपले जंगल स्वच्छ आणि सुंदर ठेवतात, पण इथे तर  शहराची हवा लागली असल्याचं दिसतं.”
      टिंकीचे बोलणे ऐकून कल्लू कावळ्याला तर रडूच कोसळलं. तो रडतच म्हणाला, “ टिंकी, भांडण  मी उकरून काढलं नाही. या टिंकीमामानं काढलं. आणि मी काही जाणूनबुझून दुर्गंधी पसरवत नाही. अनावधानानं घडतं, यापुढे  काळजी घेईन, पण हे झाड सोडून जाणार नाही.  इथल्या खुपशा स्मृति  हृदयात जपल्या आहेत. हे झाड मला फार आवडतं.”
      कल्लू  कावळ्याच्या डोळ्यांमध्ये पाणी पाहून बंटी माकड काहीसा नरमला.  म्हणाला, “ अरे कल्लू, मी तर तुला हेच सांगत होतो,  आपल्या सगळ्यांनाच नंदनवन स्वच्छ आणि सुंदर ठेवायला हवं ना!   आपण जर असाच कचरा कुठेही टाकत राहिलो तर  नंदनवन किती कुरूप-विद्रुप  दिसेल. दुर्गंधीमुळे साथीचे आजार  पसरतील. काय टिंकी! मी म्हणतोय ते बरोबर ना? तू तर शहरात शिकून मोठी मॅडम होऊन आली आहेस. आता तुलाच आम्हा आडाण्यांना जगण्याची रीतभात शिकवावी लागेल. ”
      बंटीचे बोलणे ऐकून टिंकी हसत म्हणाली, “  नक्कीच काका! मी सगळ्यांना  मोठ्या आनंदान आणि  मोफत शिकवीन. आणि जे शिकतील-सवरतील, त्यांना माझ्या टीममध्ये सामिल करून घेईन. आणि  वनातल्या सर्व सानथोर  पशू-पक्ष्यांना शिकवून शिक्षित करीन. त्यांना चांगल्या ज्ञानाच्या गोष्टी सांगेन.कॉम्प्युटरदेखील शिकवीन. शेवटी आमचं  नंदनवन तरी का मागे असावं?  कॉम्प्युटरच्या माध्यमातून सगळी कामं  एका चुटकीसरशी  करता येतात. ”
      टिंकीचे बोलणे  बंटी आणि कल्लू कान देऊन ऐकू लागले. तिची तळमळ ऐकून ते   चकीत झाले. या दरम्यान बरेच पशू-पक्षी तिथे गोळा झाले होते. सगळेच  टिंकीचे बोलणे अगदी लक्षपूर्वक  ऐकत होते. कल्लू म्हणाला, “ टिंकी, तू तर खरंच, किती शहाणी झाली आहेस. शहरातला मधाळ गोडवा आणि  सुविचारांचा आमरस तू  ग्रहण केला आहेस.”
      यावर टिंकी पटकन म्हणाली, “ का नाही ग्रहण करणार! गोडवा ग्रहण करणं हे तर आमच्या  रक्तात आणि स्वभावातच  आहे. माणसांच्या स्वयंपाकघरात घुसतो, पण  आम्ही चटणी-मिठाला हात लावत नाही.   फक्त साखर-गुळावरच आमची नजर असते. म्हणजे, आम्हाला समाजात तिखट-मिठाचा फवारा  मारायचा नाही तर  गोडव्याचा शिडकावा करायचा  आहे.  हा गोडवा मला आपल्या नंदनवनातल्या  कानाकोपर्‍यात शिडकावयाचा  आहे. आणि या गोडव्याची कीर्ती फक्त शहरभर नव्हे तर  सार्‍या विश्‍वात पसरावयाचा आहे. ”
       तिचे हे गाेड  बोलणे नंदनवनचा राजा  सिंहराजदेखील ऐकत होता. तो टिंकीच्या ज्ञानाने ओतप्रोत भरलेल्या गोड  गोष्टीने भारावून गेला. त्याला टिंकीचा भारी अभिमान वाटला. त्याने तिला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले.
      आणि काय आश्‍चर्य!  काही दिवसांतच टिंकीसोबत शिक्षित पशू-पक्ष्यांची एक फळी  सार्‍या नंदनवनला शिक्षित करायला पुढे सरसावली.