Friday, December 31, 2021

हिंदी सिनेमाला भारी पडत आहे दक्षिणचा चित्रपट उद्योग


दक्षिणचे चित्रपट आणि त्यातील कलाकार यांची लोकप्रियता काही आजची नाही.  सुपरस्टार प्रभासने बाहुबली आणि बाहुबली 2 सह हिंदी चित्रपट प्रेक्षकांमध्ये आधीच स्वत: साठी एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.  त्याचा 'साहो' हा चित्रपटही प्रेक्षकांना खूप आवडला होता.  प्रभासने हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून ‘साहो’मधून पदार्पण केले आहे. याशिवाय आणखीही काही दक्षिणचे कलाकार बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत.  2022 या नव्या वर्षा मध्ये असे अनेक चित्रपट येत आहेत जे एकतर साऊथचे रिमेक आहेत किंवा ज्यामध्ये साऊथचे कलाकार त्यांच्या करिअरला सुरुवात करत आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीत टॅलेंटची तशी काही कमतरता नाही.  पण मेंढरपणामुळे चित्रपट निर्माते आणि अभिनेते-अभिनेत्री मेहनत करणे टाळतात.  त्यामुळेच ते जुन्या पुरण्या कथांच्या आधारे करोडोंचे चित्रपट बनवतात.  चांगल्या आशयाच्या कमतरतेमुळे हिंदी प्रेक्षक केवळ ओटीटीकडेच ओढले गेले नाहीत तर दक्षिणेकडील चित्रपटांकडेही खूप आकर्षित झाले आहेत. साहजिकच अनेक प्रेक्षक साऊथचे डब केलेले चित्रपटही आनंदाने पाहतात.  याचे जिवंत उदाहरण म्हणजे साऊथचा अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिकाचा हिंदी डब केलेला 'पुष्पा' या चित्रपटाने अवघ्या 11 दिवसांत 40 कोटींचा व्यवसाय केला.  यानंतर दाक्षिणात्य अभिनेता धनुषचा 'अतरंगी रे' हा चित्रपट प्रदर्शित झाला.  हा चित्रपटही प्रेक्षकांना खूप आवडला होता.  अक्षय कुमारऐवजी 'अतरंगी रे'मध्ये सारा अली खान आणि धनुषचे काम लोकांना अधिक भावले. दाक्षिणात्य कलाकारांच्या कामात एवढी ताकद असते, की हिंदीचा प्रेक्षक त्यांना लगेच  डोक्यावर घेऊन नाचतात.

कमल हसनचा 'एक दुजे के लिए' आणि 'सागर', अरविंद स्वामीचा 'बॉम्बे', ' रोजा', यशचा 'केजीएफ', प्रभासचा बाहुबली,राजनिकांतचे 'अंधा कानून','गैर कानुनी' श्रीदेवी आणि जयाप्रदा यांचे असंख्य हिंदी चित्रपट, चिरंजीवी, व्यंकटेश चे काही चित्रपट आणि आता धनुषच्या 'रांझना' नंतर आता 'अतरंगी रे' या चित्रपटाने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या हृदयावर अमिट छाप सोडली आहे. यांनतर आता पुन्हा एकदा हिंदी चित्रपटसृष्टीकडे दक्षिणेचे कलाकार आकर्षित होत आहेत.

2022 मध्ये दक्षिण कलाकारांचे अनेक चित्रपट येत आहेत.  'मुंबईकर' या चित्रपटात तमिळ' तेलगू आणि मल्याळमचा सुपरस्टार' लेखक' गीतकार  असा बहुआयामी विजय सेतुपती एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत.  करण जोहरच्या 'लिगर'मध्ये, दक्षिण अभिनेता विजय देवरा कोंडा, ज्याने  बॉक्स ऑफिसवर आपला पहिला चित्रपट अर्जुन रेड्डीसह यशस्वी केला होता, याच चित्रपटाचा रिमेक म्हणजे  शाहिद कपूरचा कबीर सिंग. हाच विजय देवरकोडा अनन्या पांडेसोबत 'लिगर' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज होईल.

अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा'ची नायिका रश्मिका मदन हिनेही हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे रश्मिका सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' आणि अमिताभ बच्चनसोबत 'गुड बाय' या चित्रपटात काम करताना दिसणार आहे.  साऊथचा दिग्दर्शक राजा मौली 'आर आर आर' (RRR) हा चित्रपट घेऊन येत आहे.  या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट देखील आहे.  त्याचबरोबर रामचरण आणि ज्युनियर एनटीआर देखील हिंदी चित्रपटात पदार्पण करणार आहेत.  हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदी भाषेत बनवला जात आहे.

2018 मध्ये रिलीज झालेल्या केजीएफ (KGF) चित्रपटाच्या प्रचंड लोकप्रियतेनंतर 'केजीएफ'(KGF)-2 देखील  2022 मध्ये रिलीज होणार आहे.  यशसोबत या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय दत्तही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  दिग्दर्शक मणिरत्नम यांचा 'पोनीन सेल्वन' हा चित्रपट ऐतिहासिक कादंबरीवर आधारित आहे.  यामध्ये अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेता करथीदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. एकूणच काय तर हिंदी चित्रपटसृष्टीसमोर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी  एक आव्हान बनली आहे.


No comments:

Post a Comment