कुटुंब, समाज आणि देशाप्रती एक विचित्र प्रकारची उदासीनता आजच्या तरुणांमध्ये दिसू लागली आहे. त्यांना पाहून कधी कधी वाटतं की आपला काळ योग्य होता. कमी संसाधने असली तरी काय झालं, आमच्यामध्ये जीवन जगण्याची एक अप्रतिम कला होती. संयुक्त कुटुंबाचं स्वतःचं सुख होतं. प्रत्येकजण एकमेकांच्या डोळ्यांसमोर होते, तरीही आनंदात होते. खेळायला मोकळे मैदान होते, तिथे मित्र जमायचे. सण- उत्सवात अप्रतिम उत्साह होता. एकत्र राहात असल्याने एकमेकांना चांगलं समजलं-परखलं जायचं. एखादी अडचण आली की आम्ही सगळे मिळून त्यावर उपाय शोधायचो. अडचणींवर मात करायचो. गोपनीयता म्हणजे काय हे आम्हाला माहीत नव्हते. मात्र, तरीही त्याची वेगळ्या प्रकारे काळजी घेणारेही होते. जे काही आहे त्यात आनंदी राहा एवढंच माहीत होतं.
आता तसे काही दिसत नाही. काळानुसार सर्व काही बदलले आहे. आजच्या पालकांनी लहानपणापासूनच मुलांना स्वतंत्र खोल्या देण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून त्यांची गोपनीयता राखली जाईल आणि त्यांच्या अभ्यासात कोणत्याही प्रकारे व्यत्यय येऊ नये. पाहुणे आल्यानंतरही तो आपली खोली सोडणार नाहीत, याची विशेष काळजी घेतली जाते. या व्यवस्थेत वाढलेली मुले जेव्हा तरुणांच्या श्रेणीत येतात, तेव्हा ते पूर्णपणे एकांतप्रिय होतात. मग एखादी नोकरी लागते, त्यासाठी कधी बाहेर जावं लागतं आणि त्याच शहरात एखादं ऑफिस असेल तर तो दिवस-रात्र ऑफिस ड्युटीमध्ये झुलत राहतो. कुटुंबात काय चालले आहे, आई-वडिलांना काय अडचण आहे, याची त्यांना पर्वा नसते, कारण कौटुंबिक चर्चेत त्याला कधीच सामावून घेतलं जात नाही.
खरं तर ज्या काळात चारी दिशांना सामोरे जाण्याची वेळ येते, त्याच काळात आपली तरुणाई पूर्णपणे आत्मकेंद्रित झाली आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आजची तरुणाई पैसे कमवण्याच्या शर्यतीत अशाप्रकारे गुंतली आहे की त्यांना वेगळं काही करायला वेळच मिळत नाही. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ते त्यांच्याच विश्वात व्यस्त असतात. या गजबजाटात सगळं मागे पडल्यासारखं वाटतं - नाती, मित्र, सगळं जुनं झालं. अशी नीरस जीवनशैली काही लोक फार काळ सहन करू शकत नाहीत. परिणामी ते तणाव, नैराश्यासारख्या आजारांना बळी पडतात.
मात्र, थोडं जवळून पाहिलं तर त्यात आजच्या तरुणांचा कमी आणि त्यांच्या पालकांचा दोष जास्त दिसून येतो. ते आपल्याच मुलांना स्वतःपासून दूर नेणारे शिक्षण देत आहेत. लहानपणापासून त्यांनी मुलांना अभ्यासाशिवाय काहीही शिकवले नाही. ते स्वतः मुलांसमोर मर-मर काम करत राहतात आणि आपल्या मुलांना पुस्तकांतून डोकं वर काढू देत नाही. मुलांच्या परीक्षेच्या निकालापासून ते नोकरीतील भरघोस पगारापर्यंत त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
अशा स्थितीत परदेशातील बड्या कंपनीत करोडोंचे पॅकेज सापडले तर मग काय सोन्याहून पिवळे! अशा वेळेला शेजाऱ्या-पाजारयांमध्ये बातमी पसरवताना खूप आनंद होतो. मी अनेक पालकांना ओळखतो जे परदेशात राहणाऱ्या आपल्या मुला-मुलींबद्दल अभिमानाने बोलतात. असे दिसते की त्याने जग जिंकले आणि त्याचे जीवन यशस्वी झाले. त्याने आधी सर्व स्वप्ने पाहिली आणि नंतर मुलाला दाखवली. आणि जेव्हा मुलं ती स्वप्नं जगू लागली तेव्हा पालकांच्या लक्षात आलं की आपण चूक केली आहे. आपले मूल त्याच्यापासून दूर गेले आहे,असे त्याला वाटले. एक प्रचलित म्हण आहे - '‘अब पछताय होत क्या जब चिड़िया चुग गयी खेत।’
सामाजिक प्रशिक्षण ही अशी गोष्ट आहे की, मुलाच्या जन्मानंतर आपण त्यांना ज्या प्रकारचे वातावरण देतो, त्यांच्या मनात जे विचार भरवतो, त्यातून त्यांची मानसिकता तयार होते. त्यातून त्यांच्या विचारांची आणि आकलनाची दिशा ठरते. म्हणूनच आता गरज आहे की आपण आपल्या मुलांना अशा शिक्षणाकडे नेणे गरजेचे आहे, जेणेकरून ते पूर्ण नागरिक बनतील. त्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देऊ नका, तर त्यांना सामाजिकतेचा धडाही शिकवा.
त्यांना ज्ञानी बनवा तसेच त्यांना शिक्षित करा. स्वावलंबी बनवा, घरातील कामे शिकवा, स्वयंपाकघरातील वस्तू ओळखायला शिकवा, तसेच दया, सहानुभूती, सद्भावना, कृतज्ञता इत्यादी मानवी मूल्यांचे महत्त्व सांगा. त्यांना जीवनात लागू करण्याचे फायदे समजावून सांगा. सामाजिक संवाद आणि एकमेकांची काळजी घेतल्याने आयुष्य किती सुंदर बनते ते देखील त्यांना सांगा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याशी चर्चा करा. त्यांना घरच्या समस्यांची जाणीव करून द्या. उपाय शोधण्यासाठी त्यांची मदत घ्या. देशाच्या समस्यांबाबतही त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने आपली तरुणाई सक्षम आणि संवेदनशील होईल. जीवनातील सर्व आव्हानांना ते हसत-हसत तोंड देतील.अशी तरुणाई कुटुंब, समाज आणि देश या सर्वांना उपयुक्त ठरेल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment