Friday, December 16, 2022

चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा

आत्तापर्यंत असे अनेक सामाजिक, भावनिक आणि सत्य मांडणारे चित्रपट  बनले आहेत, जे थेट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतात. खूप वर्षांपूर्वी आलेला मदर इंडिया, मध्यंतरी आलेला अमिताभ बच्चनचा बागवान', अमोल पालेकरचा 'खट्टा मीठा' आदी चित्रपटांतून नात्यांमधील प्रेम, कटुता आणि स्वार्थीपणा दाखवण्यात आला होता.  असे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अमिताभ बच्चन यांचा डबल रोल असलेला 'सूर्यवंशी' चित्रपट कितीदा जरी पाहिला तरी कंटाळा येत नाही.  बाप आणि मुलगा यांच्यातील नाते संबंधावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट कितीदा तरी पाहिलेले प्रेक्षक आहेत. त्यामुळेच चित्रपटसृष्टीच्या 100 वर्षांच्या इतिहासात असे अनेक सामाजिक चित्रपट बनले आहेत जे संस्मरणीय या श्रेणीत येतात. आजही असे अनेक चित्रपट बनवले जात आहेत जे नातेसंबंध, कुटुंब आणि मैत्रीवर केंद्रित आहेत. सामाजिक चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, असे अनेक चित्रपट आपल्याला आयुष्य कशा पद्धतीने जगायचं हे शिकवतात. असे अनेक चित्रपट आहेत जे जीवनात हार मानलेल्या किंवा पूर्णपणे निराश झालेल्या लोकांना प्रेरणा देतात. सामाजिक, शैक्षणिक चित्रपट अशा लोकांना योग्य मार्ग दाखवतात. उदाहरणार्थ, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सलाम वेंकी' चित्रपटाची कथा इच्छामरणावर केंद्रित आहे, ज्यामध्ये एक मरणासन्न व्यक्ती मरत असतानाही त्याच्या शरीराचे अवयव दान करू इच्छिते. इतरांचे भले व्हावे या उद्देशाने, जे त्याच्यामुळे जिवंत राहतील त्यांना त्याने दान केलेल्या अवयवांच्या मदतीने चांगले जीवन जगता येईल. 

'सलाम वेंकी' चित्रपटाचा मुख्य उद्देश हा आहे की आयुष्य लांब असून चालत नाही तर ते मोठे असावे. आयुष्यात काहितरी भव्यदिव्य केलं पाहिजे. लोकांच्या उपयोगी पडेल असं आयुष्य हवं.  प्रत्येकजण स्वतःसाठी जगतो.  पण जे फक्त इतरांसाठी जगतात ते खरोखरच अधिक निस्वार्थी जीवन जगतात. 'सलाम वेंकी' ची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. त्याचप्रमाणे सूरज बडजात्या यांचा ‘ऊंचाई' हा चित्रपट चार मित्रांची कथा सांगतो, जे आपल्या म्हातारपणात आपल्या मृत मित्राची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी एव्हरेस्टवर चढण्याचा निर्णय घेतात. मनात इच्छा, ध्यास, उत्साह असेल तर म्हातारपणातही काही फरक पडत नाही, हे ‘ऊंचाई" या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अमिताभ बच्चन अभिनीत 'गुड बाय' या चित्रपटात अंत्यसंस्कार आणि अंत्यसंस्काराच्या नावाखाली होणारा भ्रष्टाचार, ढोंग आणि अंधश्रद्धा विनोदी आणि भावपूर्ण पद्धतीने मांडण्यात आली आहे. सामाजिक संबंध आणि सामाजिक समस्यांचे चित्रण करणारे अनेक आगामी चित्रपट आहेत, जसे की सलमान खानचा चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'! या चित्रपटाचे  पूर्वीचे शीर्षक होते, 'कभी ईद कभी दिवाळी'. याची कथा हिंदू-मुस्लिम प्रेम संबंध दर्शवते. 

21व्या शतकात जिथे आज हिंदू-मुस्लिम लढताना दिसत आहेत, तिथे सलमान खानच्या या चित्रपटात जातिभेद पुसून प्रेमाचे चित्रण दाखवण्यात आले आहे. अक्षय कुमारचा चित्रपट 'ओएमजी' जो 'ओह माय गॉड'चा दुसरा भाग आहे. भारतीय शिक्षणाचे ढासळणारे प्रश्न या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत.  याआधी 'ओ माय गॉड'मध्ये धर्माच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या ढोंगीपणाचे आणि अंधश्रद्धेचे चित्रण केले होते. अक्षय कुमारच्या दुसर्‍या चित्रपट 'सेल्फी'ची कथा देखील श्रीमंत आणि गरीब, अभिनेता आणि चाहते यांच्यातील मैत्रीची कथा आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीची जोडी दाखवली आहे. झोया अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटाची कथा मुलींच्या स्वातंत्र्यावर आणि त्यांच्या हक्कांसाठीच्या लढ्यावर केंद्रित आहे. ज्यामध्ये आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ या तीन मुली रस्त्याने प्रवाला जाण्याचा प्लॅन करतात पण मुली असल्यामुळं कोणत्या समस्या आणि अडथळे येतात आणि त्यांना कसे तोंड द्यावे लागते, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment