Tuesday, June 5, 2012

स्प्राइट प्या आणि त्यासोबत प्लॅस्टिकसुद्धा खा!

जत (ता. जत जि. सांगली) येथील एका विक्रेत्याकडे स्प्राइटच्या बाटलीत प्लॅस्टिक दिसून येत आहे.
          सांगणार्‍यांनी कितीही चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला तरी आपण त्याचं ऐकत नाही. एका कानाने ऐकतो आणि दुसर्‍या कानांनी सोडून देतो. आकर्षक बाटल्यांमधील कार्बनयुक्त शीतपेये पिऊ नका, असं सांगूनसुद्धा आपण काही त्यांचं ऐकत नाही आणि आपण विकतचा आजार घेऊन आपलं आर्थिक नुकसानही करून घेतो. पण ह्या कंपन्या निव्वळ कार्बनयुक्त पाणी प्यायला देतील तर खरे! आता ते यात गुटख्याच्या पुड्या, प्लॅस्टीकचे तुकडे आणखी काहीबाही खायला बाटलीत घालून देतात. वर थंडगार प्या आणि वर स्नॅकला असले काही तरी खा, असेच काही तरी शीतपेय कंपन्या सांगत असतात का कोण जाणे. विशेष म्हणजे या कंपन्यांना कसलीच लाजअब्रू नसते. त्यांनी खालच्या डीलर, विक्रेते मंडळींना सांगून टाकलेलं असतं. आमची शीतपेये बिनधास्त खपवा. आम्ही मोठमोठे वकील ठेवले आहेत. काही काळजी करू नका. बिनधास्त विका. त्यांनी पढवलेली भाषाच ही मंडळी वापरत असतात. त्यांना समाजाचं काही देणं-घेणं नसतं. त्यामुळे असे शीतपेय बाटल्यांमध्ये काही सापडू शकतं. आपण मात्र त्याकडे कानाडोळा करून बिनधास्त थंडगार पेये घशात घालत असतो.  वास्तविक ही थंडपेये तात्पुरते मनाला समाधान देत असतात. मिळते, शिवाय  नकळतपणे शरीरावर त्यांचा प्रतिकूल परिणामही करत असतात. जगभरातील संशोधकांनी यावर संशोधन केलेले आपण वृत्तपत्रांमध्ये आलेले वाचत असतो.  अलिकडेच  शीतपेयांच्या अतिसेवनामुळे आजारी पडणार्‍या लहान मुलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे यात समोर आल्याचंही वाचलं आहे. त्यामुळे जर कोणी सातत्याने कार्बनयुक्त शीतपेयांचे सेवन करत असेल तर त्याला वेळीच रोखायला हवं की नाही. पण आपण तसल्या भानगडीत न पडता, उलट त्याकडे दुर्लक्ष करून आपण तहान त्याच्यानेच भागवत असतो.      अलिकडेच वाचलेली आणखी एक बातमीत फेसाळणारी कार्बनयुक्त कोलासारखी शीतपेये आरोग्यास हानीकारक आहेत असा दावा पाँडिचेरी विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी केला आहे. दिल्लीस्थित विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने केलेल्या चाचणीमध्ये लोकप्रिय कोला कंपन्यांच्या शीतपेयांमध्ये जास्त प्रमाणात हानीकारक घटक आढळून आले आहेत. या घटकांमुळे मनुष्याच्या शरीरावर एखाद्या स्लो पॉयझनसारखा परिणाम होतो असे स्पष्ट झाले आहे. या शीतपेयांचा सर्वाधिक धोका बालकांना होत असून जगभरातील प्रदीर्घ संशोधनानंतर कृत्रिम स्वाद, रसायने, रंग असणार्‍या पेयांपासून लहान मुलांना दूर ठेवावे असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. संशोधनानुसार या पेयांच्या वारंवार सेवनाने मुलांची एकाग्रता कमी होते, शिवाय शरीरावरदेखील दुष्परिणाम होतो.

ही शीतपेये प्यायल्याने आपण विकतचे आजारांना निमंत्रण देत असतोच. पण ती बनवताना आणि बाटल्यांमध्ये भरताना किती निष्काळजीपणा केला जातो, हेही आपण पाहिले आहे. गुटख्या पुड्या, शेवाळ, प्लॅस्टिकचे तुकडे, काड्यापेटीतील जळक्या काड्या, विड्या असं काहीबाही बाटलीत आढळून येतं, तशा बातम्याही आपण वाचत असतो. आता परवा काही मित्र-मित्र स्प्राईट पित होते, त्यांनी विक्रेत्याकडून बाटल्या मागवल्या. तर त्यात त्यांनी चुरगाळलेला प्लॅस्टिक तुकडा सापडला. म्हणजे ' स्प्राइट प्या आणि वर प्लॅस्टिकही खा' म्हणजे अन्न खायची गरजच नाही. आहे की नाही गंमत! तरीही आम्हाला त्याच्याशी काही देणे-घेणे नाही. होतं असं कधी कधी, असं म्हणून पुढं जातो. ही आपली मनोवृत्ती कधी संपणार?

बालकथा '... आणि भीती पळाली!'

चिकू-मिकू बेटा, चला मी आज तुम्हाला उडायला शिकवते. तुम्ही दोघे मोठे झालात, आता तुम्हाला उडायला यायला हवं."  मिनू चिमणीने आपल्या बाळांना आवाज दिला.
"मोठे! आणि आम्ही!"  एकदम दोघेही ओरडले.
" हो... हो.. आता तुम्ही मोठे झालात. चला उडण्याचा प्रयत्न करा. आता तुमचे पंख उडण्याइतके मोठे आणि सक्षम झाले आहेत."
" पण मम्मी, काल तर तू म्हणालीस की आम्ही दोघे अजून  लहान आहोत म्हणून..."
" हो मी म्हणाले होते, पण माझ्या लबाड आणि आळशी पिल्यांनो! तुम्ही घरट्याबाहेर जाऊ का विचारत होतात. तेव्हा म्हणाले, उडायला आल्याबिगर बाहेर जाणार कसे?" उडायला शिकायचं म्हणजे भारी कष्टाचं काम आहे, असं त्यांना वाटत होतं.  दोघेही बहाणा करताहेत, हे मिनूनं ताडलं होतं.
"बरं चला, काही बहाणा सांगायचा नाही मला. मी जशी उडते, तसे पाहून उडायला शिकायचे. "
चिकू म्हणाला," मम्मी, आम्ही दाणे कसे टिपायचे शिकलो आहोत ना, मग तसेच शिकू. त्यात काय अवघड आहे."
"हो मम्मी, चिकू म्हणतोय ते खरंय." मिकू चिकूच्या स्वरात स्वर मिसळत म्हणाला.
"खायला काही शिकवावं लागत नाही. जन्मताच  काय आणि कसं खायचं आपोआप सगळे शिकतात. उडायला मात्र शिकावं लागतं."
"आमची स्वीट स्वीट मम्मी, आज नाही उद्यापासून....  उद्या  शिकव ना उडायला!" दोघंही मिनूच्या गळ्याभोवती जाऊन झुलू लागले. शेवटी मम्मीने हार पत्करली.
" ठीक आहे, पण उद्या नक्की!"
" हो, नक्की!" दोघांनी विश्वास दिला.
दुसर्‍यादिवशी मिनूने पुन्हा उडण्यासाठी त्यांना उठवलं, पण पुन्हा दोघांनी बहाणा केला.अशा प्रकारे दिवस जात राहिले.पण ते काही  उडायला शिकले नाहीत.
एक दिवस चिकू आणि मिकू घरट्यात दोघेच होते. मम्मी खाऊ आणायला बाहेर गेली होती. दोघांना एकटे पाहून दबा धरून बसलेला साप त्यांच्या दिशेने हळूहळू सरकत होता. दोघांनीही सापाला पाहिले. दोघे घाबरून गट्ट झाले. त्यांना मम्मीने सांगितलं होतं, साप आपला शत्रू आहे. संधी मिळताच आपली लहाने बाळे आणि अंडी गिळंकृत करतो. चिकू म्हणाला," मिकू, आता हा साप आपल्याला खाणार. आपण काय करायचं रे?"
" चिकू, ही विचार करत बसण्याची वेळ नव्हे. चल उड..." मिकूने चिकूचा हात पकडला आणि दोघांनीही घरट्याबाहेर उडी घेतली. दोघे उडण्याचा प्रयत्न करू लागले. पण उडायला शिकले नसल्याने दोघेही धप्पकन खाली पडले. जोराचा मार बसल्याने त्यांचे डोळे बंद झालेले...!
डोळे उघडले तेव्हा, ते दोघे एका घराच्या अंगणात होते. भलं हो त्या माणसांचे! ज्यांनी त्यांना पाहिलं नि  सुरक्षित ठिकाणी ठेवलं. त्यांनी दवा-पाणीही केलं. दोघे घाबरल्याने थरथर कापत होते. चिकू तर रडायलाच लागला. रडत रडत म्हणाला," मिकू, आपण मम्मीचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. आता आपण जिवंत राहणार नाही. सापापासून तर बचावलो, पण इथे एखादे मांजर आपल्याला गट्टम करून  टाकील."
"चिकू, तू म्हणतोयसं ते खरंय. आपल्याला आपला आळस नडला. मम्मीचं ऐकलं नाही, म्हणून ही शिक्षा मिळाली. पण रडू नकोस. आपन काही तरी करू..."
दोघांचं बोलणं सुरू होतं, तेवढ्यात एका लहान बाळाच्या हसण्या-खिदळण्याचा आवाज कानावर आला. दोघांनीही त्या दिशेने पाहिलं, तर तिथे एक लहान मूल आईचा हात धरून हळूहळू चालायला शिकत होतं.
ते दृश्य पाहून चिकू आणि मिकूची भीती कुठल्या कुठे पळून गेली. त्यांनी फक्त एकमेकांकडे पाहिलं. डोळ्यांनी खाणाखुणा केल्या आणि मग दोघांनीही मोठ्या धैर्याने हवेत झेप घेतली, मम्मीकडे जाण्यासाठी! कारण तिच्याकडून उडण्याचे उत्तम उत्तम धडे घ्यायचे होते.                                               

Monday, June 4, 2012

रहस्यकथा रहस्यमय संदेश

       बर्नर आणि हॅमर दोघे मित्र होते. दोघंही छोटी-मोठी कामं करायची, पण संधी मिळेल तेव्हा हेरगिरीत आपला हात आजमवायची. एकदा दोघांना एका पार्टीला जाण्याची संधी मिळाली. तिथे शहरातील मोठमोठी असामी उपस्थित होती. बर्नर आणि हॅमर सावध पण बारीक नजरेने सारा परिसर न्याहळत होते. अशाच ठिकाणी गुन्हे घडतात किंवा गुन्ह्याच्या योजना आखल्या जातात, अशी त्यांची धारणा होती.
     एक व्यक्ती काळा गॉगल लावून एका कोपर्‍यात बसली होती. हॅमर म्हणाला," मित्रा, मला तर एक अट्टल गुन्हेगार वाटतो. नाही तर रात्रीच्यावेळी कोण काळा गॉगल घालून बसला असता."
     सर्वजण खाण्यात मग्न होते. परंतु, बर्नर आणि हॅमरच्या नजरा मात्र त्या काळ्या गॉगलवाल्यावर खिळल्या होत्या, जो एका कोपर्‍यात खुर्चीवर गपचीप बसला होता. तेवढ्यात बर्नर हॅमरच्या कानाला लागून फुसफुसला," हॅमर, बुफेकडे बघ. तिथे काही तरी गडबड चाललीय."
     "काय गडबड चाललीय?" हॅमरने विचारलं आणि तिथे त्याला काही तरी विचित्र दिसलं.त्यानं पाहिलं की एक महिला आपल्या प्लेटमध्ये काही पदार्थ वाढून घेत होती. तेवढ्यात तिच्याजवळ एक इसम गेला आणि  महिलेच्या हातात एक कागद टेकवला. कागद वाचताच ती महिला रडू लागली आणि प्लेट टेबलवर आदळून वेगाने बाहेर निघून गेली.
     ज्या इसमानं कागद दिला होता, तो म्हणाला, " इवा, अगं, ऐक तरी जरा."
     पण ती महिला वेगाने तिथून बाहेर पडली. मग दोन शब्द ऐकायला आले- इवा आणि विलियम. दोघेही पती-पत्नी होते.विलियम इवाच्या मागे-मागे धावला, पण तेवढ्यात ट्रे घेऊन येणार्‍या वेटरला धडकला. ट्रे खाली पडला आणि धक्का लागून  विलियमसुद्धा बाजूला पडला.
     हॅमर म्हणाला," चल लवकर बाहेर, इवा कुठे जाते पाहू."
     बर्नरने चौकीदारला विचारले," एक महिला रडत बाहेर आली होती, ती कुठे गेली?"
     चौकीदारनं सांगितलं," हो हो, ती मिसेस इवा विलियम होती. ती बाहेर येऊन रस्त्यावर उभी राहिली होती. तेवढ्यात एक कार तिच्याजवळ येऊन थांबली. इवा कारमध्ये बसलेल्या माणसाशी काही तरी बोलली आनि कारमध्ये बसून निघून गेली."
     " नक्कीच त्या कागदावर काही तरी रहस्यमय संदेश लिहिला असला पाहिजे, जो विलियमने तिच्या हातात टेकवला होता." असे म्हणत हॅमर रस्ता लक्षपूर्वक न्याहळू लागला. तेवढ्यात त्याला एका बाजूला कागदाचा एक तुकडा पडलेला दिसला. त्याने वाकून तो कागद उचलला. त्यावर के-७० लिहिले होते.
     बर्नर म्हणाला," अरे, हा तर कुठल्या तरी प्लॅट किंवा बंगल्याचा नंबर वाटतो. नक्कीच इवा तिकडे गेली असावी."
     ज्या बंगल्यात पार्टी चालली होती, त्याचा नंबर के-३० होता. बर्नर म्हणाला," के-७० नंबरचा बंगला फार लांब नसणार आहे. इवा तिथेच गेली असावी. चल, तिथे शोध घेऊ."
   तिथे गेल्यावर दोघांचाही मोठा भ्रमनिराश झाला. के-७० ची इमारत म्हणजे एक जुना वाडा होता. बंद दरवाज्याच्या बाहेर एक चौकीदार उभा होता. त्याला विचारल्यावर कळलं की हा वाडा बर्‍याच वर्षांपासून बंदावस्थेत आहे. हॅमरने विचारले," इथे एखादी महिला आली होती का?"
     चौकीदार म्हणाला," नाही, इथे तर कुणीच आले नाही." हॅमर बर्नरला म्हणाला," आपल्या वाड्याच्या पाठीमागे जाऊन बघायला हवं. कदचित तिकडून एखादा मार्ग असेल." यानंतर दोघांनीही गपचीप वाडा फिरून पाहिला. वाड्याच्या सगळ्या बाजूला अंधार होता. वाड्यात प्रकाश कुठेच दिसत नव्हता. वाड्याच्या मागच्या बाजूला एक दरवाजा होता, पण तो बंदावस्थेत होता.
     आता दोघेही वैतागून गेले. बर्नर म्हणाला," कदाचित के-७० नंबर दुसर्‍या एखाद्या इमारतीचा असावा किंवा मग एखादा गुप्त संदेश. आपल्याला माघारी परतायला हवं आणि काय भानगड आहे, ते विलियमकडूनच काढून घ्यावं."
     दोघे परतले, तेव्हा पार्टी संपली होती. विचारल्यावर कळलं की मि. विलियम त्याची पत्नी अचानक निघून गेल्याने अपसेट झाला होता. तोही मग तिच्या शोधासाठी निघून गेलाय.
     हॅमर म्हणाला," आपणच विलियमला इवाच्या हातावर कागद ठेवताना पाहिलं आहे. नक्कीच विलियमला या रहस्याबाबत ठाऊक असलं पाहिजे. आपल्याला लगेच त्याला भेटायला हवं." बर्नर म्हणाला,'' पहिल्यांदा आपल्याला पोलीस इन्स्पेक्टरला जाऊन सगळं सांगायला हवं."
     दुसर्‍यादिवशी सकाळी दोघे मित्र पोलिस ठाण्यात इन्स्पेक्टर थॉम्पसन यांना भेटायला पोहोचले. थॉम्पसनची भेट झाल्यावर बर्नरने त्याला रात्रीची ती सर्व हकिकात ऐकवली.
     इन्स्पेक्टर म्हणाला," याचा अर्थ, विलियमला ठाऊक आहे की त्याची पत्नी कुठे गेली ती! " आता ज्याची चर्चा चालली होती, तोच विलियम तिथे आला. तो थॉम्पसनला म्हणाला," इन्स्पेक्टर, माझी पत्नी रात्रीपासून बेपत्ता आहे."
     थॉम्पसन त्याच्यावर डोळे रोखत म्हणाला,  ''मि. विलियम, मला सगळा प्रकार माहित आहे. फक्त एवढं सांग की या के-७० चा अर्थ काय?"
     " के-७०!" विलियम आश्चर्यने म्हणाला.
     "हो, ही संख्या त्या कागदावर लिहिली होती, जो तुम्ही तुमच्या पत्नीच्या हातात दिला होता. तो कागद   आमच्याजवळ आहे." असे म्हणत हॅमरने तो कागद काढून दाखवला.
     कागद पाहताच विलियमचा चेहरा पार उतरला. पण तो पुढे म्हणाला," होय, हा कागद मीच इवाच्या हातात थांबवला होता. पण या कागदाचा तिच्या बेपत्ता होण्याशी काही संबंध नाही."
     "असं का? मग या के-७० चा मतलब काय?" इन्स्पेक्टरने विचारलं.
     " हा माझा आणि इवाचा आपसातला मामला आहे. मी आता यासंबंधी काहीही सांगू शकत नाही. पण इतका नक्की विश्वास देतो की, जेव्हा आम्ही दोघे समोरासमोर येऊ, तेव्हा सगळा प्रकार सांगू टाकू."
     काही क्षण खोलीत शांतता पसरली. मग विलियम सावकाश बाहेर निघून गेला. तिथून तो म्हणाला," म्हणजे तुम्ही मला माझ्या पत्नीला शोधण्यात मदत करणार नाही तर...! मला वाटत, इवा गैरसमजाच्या चक्रव्यूहात सापडली असावी. अरे देवा! आता तिला कुठे शोधू मी!"
     विलियम गेल्यावर थॉम्पसन म्हणाला," या रहस्याची चावी विलियमच्या हातात असताना आम्हाला मात्र तो सांगायला तयार नाही."   
     बर्नर आणि हॅमर विलिअयमच्या घरावर नजर ठेवून होते. त्याचदिवशी संध्याकाळी विलियम एका अनोळखी इसमासोबत बाहेर आला. त्यावेली बर्नर आणि हॅमर यांनी आपला वेष बदलला होता.
     दोघे विलियम आणि अनोळखी यांच्या आजू-बाजूने चालू लागले. हॅमरने विलियम अनोळखी माणसाशी बोलत असताना ऐकलं," माफी? कसली माफी? ...त्याचा इथे काय संबंध! जाऊ दे मीच जाऊन भेटतो...  अरे देवा! माझा तर जीवच चालला होता..." 
     ते समुद्र किनारी पोहचले. तिथे उंचावर एक कॉटेज होते. विलियम अनोळखी इसमासोबत त्या कॉटेजमध्ये घुसला.
     हॅमर बर्नरला म्हणाला," पटकन थॉम्पसनला फोन लावून इथे बोलावून घे." लगेचच थॉम्पसन सिपायांसह तिथे पोहचला.
     त्याने कॉटेजचा दरवाजा ठोठावला. दरवाजा स्वतः विलियमने उघडला. आश्चर्याने म्हणाला," अरे, तुम्हीसुद्धा आलात. बरं झालं. आता सगळं तुम्हाला सांगतो." मग समोर बसलेल्या महिलेकडे बोट करून म्हणाला," मीट माय वाइफ, इवा."
     " म्हणजे तुम्हाला ठाऊक होतं की तुमची पत्नी इथे आहे ते?" थॉम्पसन रागाने म्हणाला.
     " मी तुम्हाला सगळा प्रकार सांगते. कृपया असे रागावू नका." इवा म्हणाली.
     " हे के-७० चे प्रकरण काय आहे?" बर्नरने विचारले.
     विलियम म्हणाला," इन्स्पेक्टर, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की हा आम्हा दोघांचा आपसातला मामला आहे, जो मी हिच्यासमोर सांगणार होतो."
     " हो तर मग सांग." इन्स्पेक्टर म्हणाला.
     "अलिकडे काही दिवसांपासून इवाचे वजन खूप वाढले होते. यामुळे तिचे गुडघे दुखत होते. डॉक्टरांनी तिला औषधाबरोबरच वजनसुद्धा  कमी करण्याचा सल्ला दिला होता." त्या दिवशी पार्टीत पाहिलं की, इवाने आपल्या प्लेटमध्ये खूप से चमचमीत पदार्थ वाढून घेतले होते. मला ते योग्य वाटलं नाही. पण सगळ्यांच्या समोर कसे सांगणार? तेव्हा मी एका कागदावर के-७० लिहून तिच्या हातावर टेकवलं. याचा अर्थ असा होता की, तुझे वजन ७० किलो आहे, त्याकडे लक्ष दे."
     आता इवा पुढे म्हणाली," खरे तर यांच्या सततच्या  टोचून बोलण्याने मला भयंकर राग आला. मी रडतच बाहेर निघून गेले. तेवढ्यात मला माझ्या मैत्रिणीने तिच्यासोबत नेले. विलियम सगळीकडे माझी चौकशी करत राहिले. आज मी मैत्रिणीच्या नोकराकरवी निरोप पाठवला होता की त्यांनी येऊन माझी माफी मागावी, तरच मी त्यांच्यासोबत परत जाईन. यांनी येऊन माझी माफी मागितली आणि आता आमचे भांडण संपले." म्हनून इवा हसू लागली.
     हॅमर आणि बर्नर तिथून परत निघताना बोलत होते," यार, ही आपण कसली हेरगिरी केली."
     "पण काहीही म्हण, के-७० चा कागद तर आपणच शोधला होता." बर्नर म्हणाला.
     "हो, हे तर आहेच." यावर हॅमर म्हणाला. मग दोघेही खूश झाले. 
                                                                                            मूळ लेखक- जुलियस चॅम्बर्स  .. .          …                                                                                        भाषांतर- मच्छिंद्र ऐनापुरे  


Sunday, June 3, 2012

नानाविध फंड्याने चित्रपट निर्माते मालामाल

    पहिल्यासारखी सिनेनिर्मात्यांना चित्रपट चालला न चालला याची आता चिंता राहिली नाही. कार्ण आता चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच त्यांचा खिसा गरम हो ऊ लागला आहे. चित्रपट प्रमोटचे नानाविध फंडे, टीव्ही प्रदर्शनाचे हक्क अशा अनेक कारणांमुळे निर्मात्यांचे हात तुपात आहेत. काळ बदलला, ट्रेंड बदलला तसे निर्मात्यांचे दिवसही पालटले.
   या वर्षी प्रारंभीच करण जौहरच्या हृतिक रोशन स्टारर 'अग्निपथ' चित्रपटाचे सॅटेलाइट राइट्स ४१ कोटी रुपयांना झी नेटवर्कला विकले गेले. जवळपास ६० कोटीचे बझेट असलेल्या  या चित्रपटाने टीव्ही हक्कातून प्रदर्शनापूर्वीच एक तृतीयांश रक्कम मिळवले. थिएटरच्या इन्कमची तर बातच सोडा! म्हणजे 'आम के आम गुठलियों के भी दाम' म्हणतात ना, तसा काहीसा हा प्रकार झाला म्हणायचा. आता एखाद्या बड्या निर्मात्याचे चित्रपट प्रदर्शनापूर्वीच पैसे वसूल होण्याचा प्रकार सामान्य झाला आहे. कॉर्पोरेट कंपन्या सगळ्या कसोट्या पडताळून, एखाद्या प्रोजेक्टमध्ये दम असेल तर त्यावर खिसा मोकळा करायला मागे-पुढे पाहात नाहीत, हेच यातून स्पष्ट होते. २००७ मध्ये दिवाळीच्या दरम्यान आलेला शाहरुखचा 'ओम शांती ओम' याचेच उदाहरण घ्या. ३५ कोटीत बनलेला हा चित्रपट शाहरुख खान आणि फरहा खान यांनी इरोसला ७० कोटीला विकला. म्हणजे चित्रपट पडद्यावर येण्याअगोदरच त्यांनी शंभर टक्के नफा कमावला होता.
    गेल्यावर्षी १ जुलै रोजी 'बुढ्ढा होगा तेरा बाप' हा अमिताभचा सिनेमा रिलीज होणार होता. त्याचदिवशी युवावर्गात लोकप्रियता मिळवलेल्या इमरान खानचा 'दिल्ली बैले' झळकणार होता. तेव्हा पत्रकारांनी अमिताभला विचारलं होतं की या चित्रपटाच्या मुकाबल्यात तुमच्या चित्रपटाचा कसा टिकाव लागणार? यावर अमिताभने उत्तर दिले होते, 'या चित्रपटासाठी केवळ साडेदहा कोटी रुपये खर्च आला आहे. त्याचा टीव्हीवर दाखवण्याचा हक्क आम्ही अगोदरच साडे तेरा कोटीला विकला आहे. आता आम्ही नफ्यातच आहोत. थिएटरमधून मिळणारा पैसा म्हणजे बोनस असणार आहे.' आहे की नाही कमाल!
   म्हणजे आता पहिला जमाना कधीचा लोटला आहे. पूर्वी निर्मात्याला घातलेला पैसा काढण्यासाठी मोठी धडपड करावी लागे. पैसे जमवण्यासाठी त्याला अनेकांचे उबंरठे झिझवावे लागत. तो डिस्टीब्यूटर्सकडून ऍडवान्स पैसे घ्यायचा. सिनेमा बनविण्यासाठी बाजारातून अधिक व्याजाने पैसे उभे करायचा. चित्रपट पूर्ण करून रिलीज करेपर्यंत त्याला जमीन्-अस्मान एक करावे लागे. यात अनेकांचे दिवाळे निघाल्याच्या कहाण्या आपण ऐकल्या आहेत. अनेकांना घरदार विकावं लागलं आहे. काहींनी मृत्यूलाही कवटाळले आहे. आज मात्र अशी परिस्थिती राहिलेली नाही. दमदार प्रोजेक्ट असेल तर मागेल ती किंमत मिळून जाते. सध्या  चमक -धमक नसलेले चित्रपट भाराभर येत आहेत. पण ती एका झटक्यात विकली जात आहेत आणि हिटही होत आहेत. कॉर्पोरेट कंपन्या त्यातल्या एखाद्या गोष्टीला फ्लॅश करून वेगळ्या अंदाजात चित्रपट प्रेक्षकांसमोर आणतात. त्यामूळे प्रेक्षक त्याच्यामागे धावल्याशिवाय राहत नाहीत. चित्रपट प्रमोट करण्याचे नानाविध फंडे वापरले जात आहेत. कधी चित्रपटाचे नायक्-नायक टीव्हीच्या रिऍलिटी शोमध्ये तर कधी मालिकांमध्ये घुसतात. गाण्याच्या सीडी फुकट वाटतात. त्यामुळे आपोआपच   चित्रपटाची प्रसिद्धी होते.
    २०११ मध्ये अगदी साधारण चांगले मिळकत मिळवून गेले. शाहरुखच्या 'रा-वन'चेच उदाहरण घ्या. म्यूझिक राइट्स, मोबाइलवर वाजणारी कॉलर ट्यून, रिंग टोन, डिझिटल फॉर्मेट, कंज्युमर प्रोडक्ट, थिएटरचे हक्क, व्हिडिओ गेम अशा अनेक माध्यमातून या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच बरीच कमाई केली.
    पैसे कमविण्याचे आणखी एक साधन म्हणजे चित्रपटाचे संगीत. सुभाष घई यांच्या 'युवराज' चित्रपटाच्या म्युझिकने राइट्समधून इतकं भरभरून दिलं की चित्रपटाच्या प्रदर्शनातून निव्वळ बोनसच हाती लागला. गेल्या महिन्यात आलेल्या 'जन्नत-२' च्याबाबतीथी हेच घडले. खरे तर काही फिल्मकार असे आहेत की त्यांच्या स्क्रिप्ट्मध्ये दम नसला तरी ते म्युझिकवर अधिक भर देतात. श्राव्य संगीतासाठी मेहनत घेतात. म्हणून म्युझिक कंपन्या त्यांच्या पुढे-मागे घुटमळत असतात. लवकरच प्रदर्शित होणार्‍या 'गँग्स अँड वासेपूर' किंवा 'शंघाई' सारख्या     चित्रपटांनी आताच मोठी कमाई म्युझिक राइट्समधून केली आहे. चित्रपटात आयटम नंबर टाकले आणि कथेपेक्षा आयटम नंबरची अधिक पब्लिसिती केली की यश पदरात पडलेच म्हणून समजा. असे अनेक फंडे वापरून चित्रपट प्रेक्षकांच्या माथी मारल्यावर कुठला निर्माता कंगाल होऊन रस्त्यावर येणार आहे?

बिहारमधील जमीन संघर्षाचा इतिहास

     बिहारमधला १९७० ते २००१ पर्यंतचा काळ हा जमिनीशी संबंधीत असलेला सशस्त्र जातीय संघर्षाचा, हत्याकांडांचा आणि नरसंहाराचा काळ म्हणून ओळखला जातो. मध्य बिहारमधल्या भोजपूर, रोहतास, सासाराम, गया, जहानाबाद, पाटणा, नवादासह अनेक जिल्ह्यांमध्ये जमीनदार आणि नक्षली गटांमध्ये सशस्त्र लढाई चालत असे. यातून अनेक जातीय गटांची निर्मिती झाली. माओवाद्यांचे काही गट तर  आपापल्या क्षेत्रात प्रभाव ठेवून रक्तपात करत राहिले. याशिवाय रणवीर सेना, लोरिक सेना, पीपुल्स वारग्रुप, भाकप्-माले आदी संघटना हल्ला- प्रतिहल्ला करत राहिल्या. भूमिहिन मजूरांचे समर्थक आणि जमीनदार समर्थक गटांमधला हा रक्तरंजित लढा थांबण्याचे नाव घेत नव्हता. माणुसकीला काळीमा फासणार्‍या या  नरसंहाराचे राजकारणही केले जाऊ लागले.
     इथल्या इतिहासावर दृष्टीक्षेप टाकल्यावर आपल्या लक्षात येईल की १९७६ पासून २००१ पर्यंत जवळपास ९० हत्याकांड आणि नरसंहार झाले, यात हजारो माणसे मारली गेली. या मालिकेतले पहिले हत्याकांड १९७६ मध्ये भोजपूर जिल्ह्यातल्या अकोदीमध्ये घडले. यात उच्च जातीच्या जमीनदारांनी अनुसुचित जातीच्या तीन मजुरांची हत्या केली होती. १९७७ मध्ये पाटणा जिल्ह्यातल्या बेलची गावातही असाच नरसंहार घडवून आणला होता. यात १४ शेतमजुरांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. १९८० च्या दशकात वेगवेगळ्या लोकांच्या नेतृत्वाखाली लोरिक सेना आणि सुवर्ण जातींच्या ब्रम्हर्षी सेनेकडून शेतमजूर आणि दलित व मागास जातीच्या लोकांचा नरसंहार केला गेला. १९९६, १९९७ आणि १९९८ दरम्यान तर नरसंहाराच्या सर्वात अधिक घटना घडल्या. १९९६ मध्ये भोजपूर आणि औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या ११  नरसंहारांमध्ये एकूण ७६ लोकांचा बळी गेला. १० जुलै १९९६ रोजी बथानी टोला येथे २२ दलित आणि मुस्लीम शेतमजुर ठार झाले. या नरसंहारानंतरच रणवीर सेना आणि बरमेसर मुखिया सगळ्यांचा समोर आला. इथेच घडलेल्या १९९७ मधल्या नरसंहारात एकून १३० लोकांचा जीव गेला. १ डिसेंबर १९९७ रोजी घडलेल्या लक्ष्मणपूर बाडा नरसंहारामुळे तर संपूर्ण देशात खळबळ उडाली. यात ५८ दलितांना मारण्यात आले होते. संपूर्ण देशभरातच नव्हे तर सार्‍या जगात  बिहारमधली जाती-व्यवस्था प्रकर्षाने आणि तिथला  संघर्ष चव्हाट्यावर आला. बाडामध्ये नक्षली गटाने उच्च जातीच्या ३७ लोकांची हत्या केली होती. त्याचा बदला म्हणून हा नरसंहार घडवला गेला होता. १९९९ ला जहानाबाद जिल्ह्याच्या सेनारी गावात माओवादी गटाने सुवर्ण जातीच्या ३५ लोकांचे सामुहिक हत्याकांड घडवून आणले  होते. याच वर्षात शंकरबीघामध्ये २३ दलित शेत मजुरांना सुवर्ण जमीनदारांच्या सशस्त्र गटाने यमसदनी पाठविले होते. २००० सालात औरंगाबाद जिल्ह्यातल्या मियांपूर गावात मागास आणि दलित जातीच्या ३५ लोकांची हत्या करण्यात आली होती.
     भोजपूर जिल्ह्यातल्या संदेश विभागातील खोपिरा पंचायतीचा माजी प्रमुख ब्रम्हेश्वर सिंह उर्फ बरमेसर मुखिया यांनी बेलोर विभागाचा तत्कालिन प्रमुख शिवनारायण चौधरी यांच्या रणवीर किसान संघर्ष समितीचे नेतृत्व स्वीकारले. चौधरी यांच्या नेतृत्वाखालील समिती भोजपूर जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये शेतकर्‍यांवर सीपीआय( माले) ने लादलेले आर्थिक प्रतिबंध हटवण्याच्या निर्णया विरोधात नाकाम राहिली होती.  ब्रम्हेश्वर सिंह यांनी पुढे १९९४ मध्ये स्वतंत्र रणवीर सेनेची स्थापना केली. जमीनदार शेतकर्‍यांची खासगी सेना म्हटली जात असलेल्या या संघटनेच्या उभारणीला   कॉंगेसचे नेते जनार्दन राय, एकवारीचे भोलासिंह, तीर्थकौलचे प्रोफेसर  देवेंद्र सिंह, भटोलीचे युगेश्वरसिंह, बेलोरचे वकील चौधरी, धनछुहाचे काँगेसचे नेते डॉ. कमलकांत शर्मा आणि खंडोलचे प्रमुख अवधेश कुमार सिंह आदींनी हातभार लावला होता.  रणवीर सेनेची खुनसी गाठ नेहमी नक्षलवाद्यांशी पडत असे. लक्ष्मणपूर आणि बथानी टोला नरसंहारानंतर त्याला अटक करून तुरुंगात टाकण्यात आले होते. राज्य सरकारने ऑगस्ट १९९५ मध्ये रणवीर सेनेवर बंदी घातली. बरमेसर मुखिया २७७ लोकांच्या हत्येप्रकरणी २२ वेगवेगळ्या गुन्हेगारी प्रकरणात ( नरसंहार) आरोपी होता. यातल्या १६ प्रकरणांमध्ये पुराव्याअभावी त्याची सुटका झाली होती. उर्वरित सहा प्रकरणी ते जामिन्यावर सुटले होते. मुखियाला २९ ऑगस्ट २००२ रोजी पाटणा येथे अटक केली होती. मुखिया नऊ वर्षे तुरुंगातच होता. तुरुंगातून सुटून आल्यावर त्याने ५ मे २०१२ ला शेतकर्‍यांच्या हिताची लढाई लढण्यासाठी अखिल भारतीय राष्ट्रवादी किसान संघटनेची स्थापना केली.  अगोदर त्याने शेतकर्‍यांवर होत असलेल्या अत्याचारांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रणवीर सेनेची  स्थापना केली होती. या संघटनेला राज्य सरकारने जहालवादी संघटना घोषित करून त्यावर बंदी आणली होती.  
      तुरुंगातून सुटून आल्यावर  बरमेसर मुखिया शेतकरी संघटनेला अखिल भारतीय स्वरूप देण्याच्या खटपटीला लागला होता. हेच त्याच्या हत्येमागील  कारण असले पाहिजे, असे म्हटले जात आहे. किंवा कदाचित त्याला शेतकर्‍यांची संघटना व राजकिय महत्त्वाकांक्षा भोगावी लागली असावी. या त्याच्या हत्येची केंद्रीय तपास यंत्रणेकडून तपास करण्याची मागणी  माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी  केली आहे. त्यामुळे या हत्येला राजकीय रंग चढत जाणार आहे. 
     बिहारमध्ये जमीनदार शेतकरी आणि भूमीहीन मजुरांदरम्यानच्या सशस्त्र लढयाला तशी  दीर्घ परंपरा  आहे. रणवीर सेना आणि माओवादी संघटनांशिवाय अनेक जातीय गट काही दशकांपासून नरसंहार करत आले आहेत, पण बिहारमध्ये सत्तेवर आलेल्या कुठल्याही सरकारने यावर तोडगा काढून समाधान शोधण्याची तसदी,  इच्छाशक्ती दाखवली नाही.  वास्तविक हा सगळा संघर्ष जमिनीवरचा अधिकार, आपापसातील वर्चस्व आणि शेतकर्‍यांच्या हिताच्या रक्षणातून चालत  आहे. वेळोवेळी त्याला जातीय स्वरुपही आले आहे. पण  दुर्दैवाची व गंभीर बाब अशी की, सरकार आणि प्रशासन या  संघर्षाच्या  आणि समस्येच्या मुळापर्यंत जाऊन शोध घेण्याचा व सर्वसंमत समाधान शोध घेण्याचा   ठोस  पावले उचलू शकले नाही. देशातील दुसर्‍या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या या राज्यातल्या  राजकिय पक्षांनीही   त्याच्या सोल्युशनबाबत प्रबळ इच्छाशक्ती दाखवली  नाही. म्हणायला काही आयोग , काही समित्या नेमल्या गेल्या. पण वास्तव मुद्द्यांकडे लक्ष देण्याचा व समाधान शोधण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल झालीच नाही. यातली     सगळ्यात क्लेषदायक गोष्ट कोणती असेल तर  ती म्हणजे बिहारमध्ये  जमिनीसंबंधित दृष्टीकोनातून सरकारे चालवली जात नाहीत. शिवाय त्यांच्याकडून यासंबंधीच्या मूलभूत समाधानाची आशाही कधी दृष्टीक्षेपात आली नाही. आजच्या घडीलाही शेतकरी- मजूर यांच्यातला संघर्ष उफाळून येत असेल तर आपल्या देशाचे यापेक्षा आणखी दुर्दैव ते कोणते? अशा विचित्र परिस्थितीत  या समस्यांची सोडवणूक करण्यासाठीच्या  ठोस उपायांची अपेक्षा आपण कशी काय करू शकतो ?   dainik saamana 5/6/2012

Saturday, June 2, 2012

माझी चित्रकारी

१९९५-९६ दरम्यान नोकरीच्या प्रारंभीच्या काळात सवड असल्याने चित्रे काढण्याचा छंद जोपासला. अलिकडच्या काळात सवड मिळत नसल्याने आणि आता या कॉम्प्युटरच्या युगात त्याला फारच वेळ द्यावा लागत असल्याने चित्रे काढण्याचा छंद मागेच राहिला. सध्या सवयसुद्धा कमी झाली आहे. कामावर फळ्यांवरचे लेखन सोडले तर चित्रकारी आता पार थांबली आहे. मुलांनी जुनी फाईल काढून ती ब्लॉगवर टाकण्याचा हट्ट धरल्याने ही चित्रे इथे टाकली आहेत. 'मैंने प्यार किया' चित्रपटातील भाग्यश्री पटवर्धन, सलमान, लक्ष्मीकांत बेर्डे, अनिल कपूर, आदींची चित्रे इथे टाकली आहेत. मला कलाकारांची चित्रे काढायला फार आवडायची. मी छत्रपती शाहू महाराज आश्रमशाळेत असताना शाहू महाराजांचे चित्र काढून शाळेला भेट दिले होते. तेही चित्र इथे टाकले आहे.





Friday, June 1, 2012

हम न भुलेंगे तुम्हें...

     गुलाब जितका मनोहारी गंध विखरतो, तितकाच तो त्याच्या अंगभरच्या काट्यांनी घायाळ करतो. सज्जाद हुसेन यांचा स्वभावसुद्दा काहीसा असाच होता. गान्याची चाल जितकी गोड, तितकीच त्यांची जीभ कडवट. त्यांच्या हट्टी स्वभावामुळे हा वटवृक्ष बोन्सॉय बनून राहिला. अहंकार आणि घमेंद यामुळे हा प्रतिभावंत कलाकार हळूहळू प्रवाहातून बाहेर पडला. शिवाय लहरी आणि संशयी अशीही त्याम्ची प्रतिमा झाली. 'ये हवा ये रात ये चांदनी...' या गाण्यात तलतने जी काही कमाल दाखवली, त्याच्या मागे सज्जाद यांची कडी मेहनत आहे. या गाण्यामुळे तलत रोमांटिक गाणीसुद्धा लिलया गाऊ शकतो, ही नवी ओळख स्रोत्यांना  झाली. सतरा टेक घेतल्यावर सज्जाद यांनी काळजाचा ठाव घेणार्‍या बंदिशीला हिरवा कंदिल दाखवला. त्यांना परफेक्शनबाबतीत कणभरसुद्धा हयगय चालत नव्हती. सज्जाद यांच्या गाण्यांची संख्या कमी असली तरी त्यांचे प्रत्येक गीत पानांवरल्या दवांप्रमाणम चमकत राहतं.
     सीतामऊ ( मध्यप्रदेश) मध्ये १५ जून १९१७ रोजी एका शिंप्याच्या कुटुंबात जन्मलेल्या सज्जाद यांनी आपल्या वडिलांकडून सितार वादनाचे धडे घेतले. नम्तर वीणा, वॉयोलिन, सरोद, बासरी, पियानोसारखी वाद्ये वाजवायले शिकले. मेडोलिन वादनात त्यांनी हातखंडा मिळवला. १९३७ मध्ये मुंबईला आल्यावर अल्ला बक्श यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम पत्करले. के. एल. सैगल यांच्या 'दुख के दिन अब बितत ना हो...' ( देवदास) या गाण्यावर भलतेच प्रभावित झाले होते. नूरजहांचे पती शौकत हुसेन यांच्या 'दोस्त' (१९४४) चित्रपटाने त्यांच्या स्वतंत्र कारकिर्दीला सुरूवात झाली. 'बदनाम मुहबत कौन करें...' मध्ये  नूरजहांने 'बदनाम' शब्दावर असा काही हळूवार, मासूम जोर दिला होता की, या गाण्याने जणु काही श्रोत्यांच्या काळजावर सुरी चालवली. मात्र 'दोस्त' च्या संगीताच्या यशाचे श्रेय शौकथुसेन यांनी सज्जाद यांना नूरजहां यांना दिले. 'दोस्त'ची गाणी नूरजहांमुळे गाजली. इथे संगीतकार कुणीही असला तरी फरक पडला नसता, अशी मुक्ताफळे उधळली. यावर सज्जाद चांगलेच उखडले. दोघे 'दोस्त' बनण्याअगोदर दुश्मन बनले.सज्जाद यांनी त्यानंतर नूरजहांकडून गाणी गाऊन न घेण्याची शपथ घेतली. नूरजहां यांनी या वादावर पडदा टाकण्यासाठी स्वतः जाऊन सज्जाद यांची माफी मागितली. परंतु, सज्जाद यांच्यावर काडीचाही परिणाम झाला नाही. त्यांनी 'जुगनू'चा करार मोडला तर 'जीनत'ची ऑफर धुडकावून लावली.
     तिकडे 'ये हवा ये रात्...' च्या चालीचा मदनमोहन यांच्यावर चांगलाच प्रभाव पडला होता. त्यांनी संगदिल' नंतर पाच वर्षांनी या धूनचा 'तुझे क्या सुनाऊं ऐ दिलरुबा...' ( आखरी दाव) साठी वापर केला. तेव्हा सज्जाद यांनी खूप वाईट प्रतिक्रिया दिली होती. 'आजकाल लोक आमच्या सावलीचीसुद्धा नक्कल करतात,' असं त्यांचं वक्तव्य होतं. विशेष म्हणजे या चालीचा मोह संगीतकार रवी यांनासुद्धा आवरला नव्हता. त्यांनी 'जरा सुन हसीना ऐ नाजनी...'( कौन अपना कौन पराया) साठी आजमावली होती.
     सज्जाद यांच्या संगीतात एक प्रकारचा गोडवा होता. निवडक गाणी असूनही त्यांनी उच्च कोटीची संगीतनिर्मिती केली. 'ये कैसी अजब दास्तां हो गई है...' ( रुस्तम सोहराब/ सुरैय्या) ची दिलखेचक धून असो अथवा 'धरती से दूर गोरे बादलों के पार...'( संगदिल/ गीता-आशा) ची मेलोडियन तर्ज! सज्जाद यांची प्रत्येक बंदिश लाजवाब होती. 'दिल में समा गए सनम...' ( सम्गदिल्/लता-तलत) , 'क्या रात सुहानी हैं...(अलिफ लैला/रफी-लता), 'मेरी नजर में तू रहें...(१८५७/सुरेंद्र-सुरैय्या) आणि 'ये चार दिन बहार के...'(रुखसाना/आशा-किशोर) सारखी डुएट गाणी सज्जाद यांच्या खात्यावर जमा आहेत. लता मंगेशकर यांनी सुद्धा सज्जाद यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली अनेक अनमोल गानी गायिली आहेत. 'वो तो चले गये ऐ दिल...' (संगदिल), 'आज मेरे नशीब ने ( हलचल) , ऐ दिलरुबा( रुस्तुम सोहराब), भूल जाए ऐ दिल...( खेल) आणि तुम्हें दिल दिया ये क्या किया...(सैंया) ही लता-सज्जाद जोडीची गोड गाणी आहेत.
     रागीट आणि फटकळ स्वभाव असला तरी सज्जाद यांची गणना अनेक संगीतकारांनी प्रतिभावंतांमध्येच केली आहे. अनिल विश्वास  तर त्यांना एकमेव  अलौकिक संगीतकार मानायचे. दुसर्‍या संगीतकारांनी सज्जाद यांच्या चालींची नक्कल केली पण स्वतः सज्जाद यांनी मात्र कुणाची धून किंवा सैली चोरली नाही. एकदा एका निर्मात्याने कुठल्या तरी एका इंग्रजी चालीची ऑफर दिली होती, पण त्यांनी त्या निर्मात्याला बाहेरचा रस्ता दाखवला. चिडचिड्या स्वभावामुळे त्यांनी अनेकांची नाराजी ओढवून घेतली. गायक त्यांच्याशी बिचकून वागू लागले तर गीतकारांनी त्यांच्याशी संबंधच तोडले.
     परंपरागत हिंदुस्थानी संगीताचे पुजारी असलेल्या सज्जाद यांनी कधी कुणाची खुशामत केली नाही की कुणाची ढवळाढवळ सहन केली नाही. आणि कुणाचा सल्ला मानला नाही. ते नेहमी आपल्या मर्जीनुसारच वागले. याचा परिणाम त्यांना भोगावा लागला. अनेक चित्रपट त्यांच्या हातून निसटले. पण त्याची त्यांना पर्वा नव्हती. त्यांच्या संगीताची चर्चा कमी तर त्यांच्या विक्षिप्त वागण्याची चर्चा अधिक होत राहिली. ओ.पी. नय्यर त्यांचे एकमेव मित्र. लता मंगेशकर हेसुद्धा त्यांची शेवटपर्यंत विचारपूस करत.  २१ सप्टेंबर १९९५ रोजी या प्रतिभावंत संगीतकाराने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या चाहत्यांच्या ओठी  'रुस्तम सोहराब' मधील ही कव्वाली आजही रेंगाळत असेल,' हम न भुलेंगे तुम्हें...'!