Sunday, August 12, 2012

साठ वर्षात आम्ही काय कमावलं, काय गमावलं

      मध्यरात्री बाराचे ठोके पडले आणि १५ ऑगस्ट १९४७ च्या दिवसाची सुरुवात झाली.  भारताचे पारतंत्र्य संपले. भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवण्यात आला. त्याच्या जागी भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला. वर्षानुवर्षांच्या गुलामगिरीच्या शृंखला गळून पडल्या. आपण एका नव्या स्वतंत्र भारतात पाऊल ठेवले. पण स्वातंत्र्यप्रातीचा हा उत्कट आनंद निर्भळ मात्र नव्हता. देशाची फाळणी आणि त्या वेळी उफाळलेला भयानक हिंसाचार यामुळे एक प्रकारची उदासी पसरली होती. पण तरीही आम्हाला आशा आणि महत्त्वाकांक्षा होती, ती म्हणजे आमचे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक भविष्य स्वतः घडविण्याची. लोकशाही राज्यात ते शक्य वाटत होते. आता आपण याच महत्त्वाकांक्षेसोबत पन्नास साठ  वर्षाचा एक टप्पा पार केला आहे. आज आपण जी प्रगती साधली आहे, त्याची बिजे त्या दशकात रोवली गेली होती. हे लक्षात घ्यायला हवे. या कालावधीत आपल्याला बरेच क्लेशदायक, दु:खदायक घटनांना सामोरे जावे लागले. त्याचबरोबर  काही आनंददायी, यशदायी घटनाही वाट्याला आल्या. याचा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने संक्षिप्त लेखाजोखा...
१९४७ ते १९६० 
भारताचे संविधान तयार करण्याचे काम संविधान समितीने १९४७ साली सुरू केले. या समितीत डॉ. राजेंद्रप्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी यांसारखे ज्येष्ठ राष्ट्रीय नेते तर  डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बॅ. जयकर यांच्यासारखे प्रख्यात कायदेपंडित; तसेच सरोजिनी नायडू, हंसाबेन मेहता यांसारख्या कर्तबगार महिलाही होत्या. संविधान समितीने तयार केलेले संविधान २६ जानेवारी, १९५० रोजी अमलात आले. आणि अशा प्रकारे आपला भारत देश प्रजासत्ताक बनला.  ब्रिटिश साम्राज्यवादाविरुध्द लढताना स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता व लोकशाही या मूल्यांवरील निष्ठा भारतीयांनी उराशी बाळगल्या होत्या. या मूल्यांच्या पायावरच आपल्या संविधानाची उभारणी झाली. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती बनण्याचा मान डॉ. राजेंद्र प्रसाद यांना मिळाला. क्रीडा क्षेत्रात आपले वर्चस्व स्थापित करण्यासाठी १९५१ मध्ये दिल्लीत पहिल्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धा भरविण्यात आल्या. १९५० मध्ये योजना आयोग आणि निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. १९५१ मध्ये पाणी आडविण्यावर भर देणारी आणि सिंचनाला प्राधान्य देणारी पहिली पंचवार्षिक योजना राबवण्याला सुरुवात झाली. याच वर्षी पहिल्यांदा सार्वजनिक निवड्णुका घेण्यात आल्या. भारताला टेक्नॉलॉजी क्षेत्रात पुढे आणण्याच्या उद्देशाने पश्चिम बंगालमधील खडगपूर येथे पहिली इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्था स्थापन करण्यात आली. १९५५ मध्ये भाखरा धरणाच्या कामाला प्रारंभ झाला. ५० च्या दशकात हिंदू विवाह अधिनियम लागू  करण्यात आला. यावरून बराच गदारोळ झाला.
१९६० ते १९७०
या दशकात देशाला अनेक जबरदस्त धक्के मिळाले. भारताचे पहिल्यांदा चीनशी १९६२ मध्ये तर १९६५ मध्ये पाकिस्तानशी युद्ध झाले. पंडित नेहरू ( १९६४) आणि लालबहाद्दूर शास्त्री (१९६६)  या दोन महान नेत्यांना आपल्याला गमवावे लागले. तरीही 'भारत निर्माण' साठी मैलाचा दगड ठरावेत, असे प्रयत्न याच दशकात झाले. १९६३ मध्ये डॉ. नॉर्मन बॉरलॉग  यांनी गव्हाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी नव्या हायब्रीड जातीचे वाण उपयोगात आणले. याचबरोबर डॉ. एस. एम. स्वामीनाथन यांनी खताच्या वापरास प्रोत्साहन दिले. या दोघांच्या प्रयत्नाने आणि सिंचन व्यवस्थेमुळे हरित क्रांतिला चालना मिळाली. याच दशकात मन्सूर अली खाँ पतौडी यांनी भारतीय क्रिकेट संघाची धुरा सांभाळली. (१९६२) व संघात जिंकण्याची मानसिकता विकसित केली. 'आन' चित्रपटाद्वारा हिंदी सिनेमा रंगीत झाला. आणि 'संगम' 'जंगली' पर्यंत तो ईस्टमन कलर बनला. रिटा फारिया ही १९६५ मध्ये मिस वर्ल्डचा किताब पटकवणारी पहिली भारतीय महिला ठरली. याच दरम्यान पश्चिम बंगालमधून नक्षलवाद्यांच्या आंदोलनाला ( १९६७) सुरुवात झाली. १९६९ मध्ये भारत सरकारने १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.
१९७० ते १९८०
     सत्तरच्या दशकाची सुरुवातीलाच भारताने बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानला १९७५ च्या युद्धात पराभूत केले. सिमला करार (१९७२), पोखरण अणू परीक्षण (१९७४), भारताच्या पहिल्या आर्यभट्ट सॅटेलाइट उपग्रहाचे प्रक्षेपण अशा महत्त्वपूर्ण घटना घडल्या. पण १९७५ मध्ये आणीबाणी लादली गेली.   
१९८० ते १९९०
     ऐंशीचे दशक आशियाई खेळ ( १९८२) आणि क्रिकेट विश्वकप (१९८३) यासाठी विशेषत्वाने संस्मरणात राहिले. त्याचबरोबर इंदिरा गांधी यांची हत्या, रंगीत दूरदर्शनवर मालिकांचा प्रारंभ आणि राजीव गांधी यांची पंतप्रधानपदी निवड आदी उल्लेखनीय घटना म्हणाव्या लागतील. राकेश शर्माच्या रुपाने पहिल्यांदा एक भारतीय अवकाशात पोहोचला. कॉम्प्युटरसुद्धा कार्यालयांमध्ये दिसू लागले.
१९९० ते २०००
या दशकाची सुरुवात मंडल आयोग व आयोध्या आंदोलनाच्या हिंसेने आणि राजीव गांधी यांच्या हत्येने ( १९९१)  झाली. या दशकात केबल टीव्ही, आर्थिक सुधारणा कार्यक्रम आणि सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण अशा काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. सॅटेलाइट टेलिव्हिजनचा नवा जमाना सुरू झाला. सुष्मिता सेन मिस युनिवर्स तर ऐश्वर्या रॉय मिस वर्ल्ड बनली. याच दरम्यान पोखरणमध्ये पुन्हा एकदा अणूस्फोट (१९९८) घडवून आणला गेला. आणि १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानला कारगील युद्धात धूळ चारली.  
२००० ते आतापर्यंत
     २००० ची सुरुवात प्रियांका चोप्रा मिस वर्ल्ड, लारा दत्ता मिस युनिवर्स, दीया मिर्झा मिस एशिया पॅसेफिक आणि आदीती गोवारीकर मिसेज वर्ल्ड या ग्लॅमर जगतातल्या सौंदर्यवती ललना ठरल्या. पण भारतीय संसदेवरील हल्ला (२००१), गुजरात दंगल (२००२), सुनामी(२००४), मुंबई हल्ला ( २००८) सारख्या काळ्याकुट्ट घटना घडल्या. हे दशक रक्तरंजित दशक म्हणून ओळखले जाईल. मात्र याच दशकात भारताने आयटीसह अन्य क्षेत्रात पुर्‍या विश्वभरात आपला दबदबा निर्मान केला. २०१० मध्ये भारताने कॉमनवेल्थ स्पर्धेचे नेटके संयोजन केले. अभिनव बिंद्राने देशासाठी पहिले वैयक्तिक गटात बिजिंगच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले. आणि २०११ मध्ये भारताने पुन्हा एकदा क्रिकेट विश्व कपवर आपले नाव कोरले.
     एकूण काय तर या साडेसहा दशकांच्या स्वतंत्र भारताच्या या वाटचालीत आम्हाला बर्‍याच जखमांनी घायाळ केले असले तरी आम्ही बरेच काही मिळवलेही आहे. उतुंग भरारी घेतली आहे.

हॉकीविषयी बोलायची सोयच राहिली नाही

     लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाकडून मोठी अपेक्षा होती. ऑलिम्पिकपूर्वी घेतलेली मेहनत पाहता किमान कास्य पदकाची कमाई करेल, अशी आशा वाटत होती. पण ही आशा तर पार धुळीला मिळालीच, परंतु ऑलिम्पिकमध्ये सर्व लढती गमावून आणखी एक नामुष्की ओढवून घेतली. या लाजिरवाण्या पराभवामुळे लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकीची अक्षरशः लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या मानहानीकारक पराभवामुळे हॉकीवर बोलायचे काय, असाच प्रश्न सार्‍यांना पडला आहे.
     ऑलिम्पिकमध्ये एके काळी हॉकीचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या भारतीय हॉकी संघाची तिकडे लंडन ऑलिम्पिकमध्ये सर्वच लढतीत धुळधाण झाली असताना इकडे क्रीडा मंत्रालयाने हॉकी हा राष्ट्रीय खेळ नाही, असे सांगून या खेळाची पुरती वासलात लावली आहे. हॉकी संघाने, व्यवस्थापकीय यंत्रणने आणि राजकारण्यांनी या खेळाची अगोदरच वाट लावण्याची व्यवस्था केल्यानंतर आता क्रीडा मंत्रालयाने त्यावर शिक्कामोर्तब करून सार्‍यांची बोलतीच बंद करून टाकली आहे. या खेळावर आणि या अनुषंगाने येणार्‍या सगळ्या बाबींवरच कुणाची बोलायची इच्छा राहिलेली नाही. अनेकांनी यावर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे. त्यामुळे इतकी मोठी नामुष्की हॉकी खेळावर ओढवले जावी, ही हॉकीच्यादृष्टीने मोठी दुर्दैवी बाब म्हटली पाहिजे.
     भारतीय हॉकीला गेल्या तीन- चार  दशकापासून जी उतरती कळा लागली आहे, ती कमी व्हायलाच तयार नाही. हॉकीने गेल्या ३२ वर्षात ऑलिम्पिकमध्ये कसलेही यश मिळवलेले नाही. या संघाने १९८० मध्ये मॉस्को ऑलिम्पिकमध्ये शेवटचे सुवर्णपदक जिंकले होते. बिजिंग ऑलिम्पिकमध्ये तर संघाने पात्रताच गमावली होती. त्यामुळे या खेपेला संघाने काही कमाल करून दाखवली नाही तर हा खेळ लोकप्रियतेच्या दृष्टीने आणखी खाली घसरेल आणि खेळाडूंचा आहे तो ओढाही अटेल, अशी भीती व्यक्त केली जात होती. आणि झाले तसेच. वास्तविक प्रशिक्षक मायकेल नॉब्ज यांनीही एक चांगला संघ घेऊन आपण ऑलिम्पिकला चाललो आहोत, असे प्रारंभी म्हटले होते. त्यांनी सरदारासिंहची तर मोठी तारिफ करत त्याची गणना जगातल्या सर्वोत्कृष्ट दोन्-तीन खेळाडूंमध्ये केली होती. नॉब्ज यांच्या मेहनती व खर्चाच्या उधळणीमुळे हॉकी संघ पदकाची कमाई करेल, अशी स्वप्ने भारतीयांनी पाहिली होती. मात्र ज्या भारताने आठ वेळा ऑलिम्पिकचे सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केलेला होता, त्याच देशातील हॉकीपटूंना लंडन ऑलिम्पिकमध्ये एक विजयही मिळवता आला नाही, यापेक्षा आणखी ते दुर्दैव कोणते? विशेष म्हणजे ऑलिम्पिकमध्ये एकही लढत न जिंकता रिकाम्या हाताने मायदेशी परतण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ आहे. या आधी १९९६ च्या अंटलांटा ऑलिम्पिकमध्ये भारताला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
     ज्या खेळाने भारताला सुवर्णकाळ दिला त्या खेळाची अशी वाताहत होणे, हे भारताच्यादृष्टीने योग्य नाही. भारताच्या प्रतिष्ठेला तो धक्का आहे. खेळाला जिवंत ठेवण्यासाठी भारताने परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे. या खेळाची दुर्दशा राजकारण्यांमुळे आणि त्यांनी अवलंबलेल्या नीतीमुळे झाली आहे. त्याचबरोबर हॉकीविषयी संकुचित विचार, प्रसारमाध्यमांमध्ये क्रिकेटला मिळणारे अवाजवी महत्त्व यामुळेही हॉकी रसातळाला जात आहे. मधल्या काळात केपीएस गील यांची हकालपट्टी, त्यांच्या जागी असलम शेर खान यांची नियुक्ती किंवा सुरेश कलमाडी यांची इंडियन हॉकी फेडरेशनवर कब्जा करण्याची केलेली राजकीय खेळी आणि त्यातल्या अपयशामुळे समांतर 'हॉकी इंडिया' ची केलेली निर्मिती असा हा घोळ, जोळ  हॉकीला मागे खेचतच राहिला. या सगळ्याचाच परिणाम आपल्यासमोर दिसत आहे.
     शालेय स्तरावरून तर आधीच हॉकी हद्दपार झाला आहे. या स्तरावर आवडच राहिली नसल्याने पुढे त्याचा निभाव कसा लागणार? मोठमोठी माणसे, नेते, चित्रपट कलाकार क्रिकेटच्या बाजूने मैदानात उतरल्यावर गरिबांच्या या खेळाकडे लक्ष कोण देईल? सचिन तेंडुलकरचा खेळ वादातीत आहे. मात्र एखाद्या श्रीमंताच्या तालावर पैशासाठी खेळ करणार्‍या खेळाडूंना भारतरत्नसारखा महनीय किताब द्यायचा कसा, हा मोठा प्रश्न आहे. पूर्वी लोक कोंबड्याच्या झुंजी लावून गंमत पाहात. प्रिमियर लिग हा त्याचाच एक नवा अवतार आहे. कोंबड्याच्या भूमिका पार पाडणार्‍यांना हा पुरस्कार देऊन पुरस्काराचेच अवमूल्यन नाही का? पण तरीही भारतरत्नसाठी सचिनचा आग्रह कायम आहे. का तर तो श्रीमंतांचा खेळ आहे. हॉकी गरींबांचा खेळ. मेजर ध्यानचंद या खेळाशी संबंधित, पण त्यांची दखल कोण घेणार? आता तर देशाला ऑलिम्पिकमध्ये आठ सुवर्ण व एक विश्वविजेतेपद मिळवून देणारा हॉकीच काय पण इतर कोणत्याही खेळास राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळालेला नाही. असेही खुद्द क्रीडा मंत्रालयानेच  सांगून टाकल्याने हॉकीची उरलीसुरली प्रतिष्ठाही धुळीला मिळाली आहे.    'राष्ट्रीय' म्हणवल्या जाणार्‍या गोष्टींना हा दर्जा प्राप्त कसा झाला असा प्रश्न लखनऊच्या 10 वर्षांच्या ऐश्वर्या पराशरने माहितीच्या अधिकाराखाली केंद्र सरकारला विचारला होता. सगळीकडूनच हॉकीची अशी अवहेलना होत असताना हॉकी संघानेही  पराभवाची नामुष्की पदरी पाडून घेऊन त्यात आणखी भरच घातली आहे. त्यामुळे हॉकीचा भरवसा आता सगळ्यांनी दैवावर सोडला आहे. कुणालाच हॉकीविषयी बोलायची इच्छा राहिलेली नाही.  मग हॉकीला चांगले दिवस येणारच नाहीत काय? इतिहासाची पुनर्रावृत्ती होते म्हणतात. हॉकीच्या गतवैभवाची पुर्नरावृत्ती  होणार नाही?     

Saturday, August 4, 2012

प्रा. अशोक सेन यांच्या सन्मानाने भारतीय विज्ञानाला उत्तेजन

   
      भारतीय थियरिटिकल फिजिसिस्ट प्रा. अशोक सेन यांचा भौतिकशास्त्र क्षेत्रातल्या जगातील सर्वात मोठ्या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले, ही गोष्ट भारतीय विज्ञानासाठी एक सुवर्ण क्षण म्हटला पाहिजे.या पारितोषिकामुळे केवळ आपल्या देशाचाच गौरव वाढला आहे, असे नव्हे तर भारतीय संशोधकांमध्ये उत्तेजन मिळण्यासही मदत होणार आहे. आतापर्यंत भारतीय शास्त्रज्ञांनी विविध क्षेत्रात भरीव अशी कामगिरी केली आहे, मात्र या  कामगिरीची आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच उपेक्षा केली गेली आहे. काही अपवाद सोडले तर त्यांच्याबाबतीत दुराग्रही व्यवहार करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात ज्यावेळेला 'गॉड पार्टिकल' किंवा 'हिग्स बोसोन' कणाच्या शोधाची घोषणा झाली, त्यावेळेला पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी मोठी हाकाटी मारत  ब्रिटिश फिजिस्ट पीटर हिग्स यांना नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात यावे, अशी मागणी केली होती. पण कोणीही भारतीय भौतिकशास्त्रज्ञ  प्रा. सत्येंद्रनाथ बोस यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. वास्तविकया नोबेल पुरस्काराचे हकदार प्रा. बोसच आहेत. त्यांच्या मूलभूत कार्यामुळे  तर 'गॉड पार्टिकल'च्या शोधाचा मार्ग सापडला होता. या मूळ ब्रम्हांडीय कणाच्या नावाचा एक हिस्सा 'बोसोन' हा प्रा. बोस यांच्या नावाशी जोडला गेलेला आहे. दुर्दैवाने प्रा. बोस आपल्या जीवनकाळात नोबेलपासून वंचित राहिले आणि आम्हीसुद्धा त्यांचा योग्य तो आदर- सन्मान करू शकलो नाही. अशा वातावरणात प्रा. अशोक सेन यांना मिळालेला आंतरराष्ट्रीय सन्मान विशेष महत्त्वाचा आहे. उशिराने का होईना पण जग  विज्ञान क्षेत्रात लपलेल्या भारतीय प्रतिभेला ओळखू लागले आहे, असेच म्हणायला हवे.
     प्रा. सेन अलाहाबादच्या हरीश्चंद्र संशोधन संस्थेशी संबंधित असलेले सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आहेत. ते बर्‍याच वर्षांपासून मूलभूत भौतिक क्षेत्रावर महत्त्वपूर्ण असे काम करीत आहेत. त्यांना  युरी मिलनर फंडामेंटल फिजिक्स पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार त्यांना स्ट्रिंग थियरीवर त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन देण्यात आला आहे. त्यांना पुरस्काराच्या रुपाने ३० लाख डॉलर म्हणजे १६. ७ कोटी रुपये मिळाले आहेत. ही रक्कम नोबेल पुरस्काराच्या रकमेपेक्षाही जवळ्जवळ तिप्पट आहे. प्रा. सेन यांच्याशिवाय जगातल्या आठ आणखी शास्त्रज्ञांनाही हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार रशियन अब्जोपती युरी मिलनर याने सुरू केला आहे. याने फेसबूक आणि ग्रुपनसारख्या इंटरनेटवर आधारलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून अब्जावधी डॉलर कमावले आहेत. मिलनरने आपली फिजिक्सची पीएचडी अर्ध्यावरच सोडून हा व्यवसाय सुरू केला होता. यावेळेला पुरस्कारांसाठीच्या निवडी त्याने स्वतःच केल्या आहेत. पण पुढील वर्षांपासून आताचे पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ पुरस्कारांच्या निवडी करणार आहेत. 
     फंडामेंटल फिजिक्स अथवा मूलभूत भौतिक खूपच गुढ आणि किचकट असे विज्ञान आहे. पण या गुढ विज्ञानाचा अभ्यास केल्याशिवाय निसर्गातले मूलभूत नियम समझून घेता येत नाहीत. प्रा. सेन ज्या स्ट्रिंग थियरीवर काम करत आहेततो एक जटील गणितीय सिद्धांत आहे. याद्वारे गुरुत्वाकर्षणसारख्या ब्रम्हांडातल्या बलीय रहस्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न चालला आहे. प्रा. सेन यांचे हे कार्य काही लोकांना क्रांतिकारी वाटतात, तर काही लोकांनी त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. मूलभूत भौतिकशास्त्रातील संशोधकांच्या कामगिरीला मान्यता आणि सन्मान मिळावा, हे मिलनरचे ध्येय आहे.  या पुरस्कारांमुळे फंडामेंटल फिजिक्सच्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या आणि भविष्यात या क्षेत्रात योगदान देऊ इच्छिणार्‍या शास्त्रज्ञांना उत्तेजन मिळण्यास मदत होईल, अशीही त्याला आशा आहे.  
     ५६ वर्षीय प्रा. सेन यांनी विदेशातल्या नावाजलेल्या संस्थांमध्ये अध्ययन केल्यानंतर अनेक आकर्षक प्रलोभनांना लाथाडून भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. त्यांचा ऍकॅडमिक रेकॉर्ड खूपच शानदार आहे. त्यांनी कोलकात्याच्या प्रेसिडेंसी कॉलेजमध्ये अध्ययन केल्यानंतर कानपूर येथील आय आय टीमधून मास्टर्सची डिग्री घेतली होती. यानंतर त्यांनी अमेरिकेतल्या स्टोनीब्रूकस्थित स्टेट युनिवर्सिटी ऑफ न्यूयॉर्कमध्ये शिक्षण सुरू ठेवले. पुन्हा ते पोस्ट डॉक्टरेटसाठी फर्मिलॅब आणि स्टेनफर्डला गेले. भारतात आल्यानंतर त्यांनी मुंबईतल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल संशोधन संस्थेत कामाला सुरुवात केली. पुन्हा ते अलाहाबादला गेले. आणि तेव्हापासून ते हरिश्चंद्र संशोधन संस्थेत कार्यरत आहेत. प्रा. सेन यांना कित्येक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २००१ मध्ये त्यांना पद्मश्रीने गौरवण्यात आले होते. तर १९९४ मध्ये त्यांना एस. एस, भटनागर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. १९९८ मध्ये ते रॉयल सोसायटी ऑफ लंडनच्या फेलोशिपसाठी निवडले गेले होते.
      १९९५ मध्ये मायदेशी परत आले होते, तेव्हा त्यांना इथे थोडा अलिप्तपणा जाणवत होता. पण आता तशी परिस्थिती राहिली नसल्याचे ते आपल्या मुलाखतीत सांगतात. इंटरनेटवर सगळी माहिती उपलब्ध असते. संशोधकांचा गट आणि आमच्या संस्थेतील सहकारी यांचा आता एक उत्तम समन्वय आहे. सैद्धांतिक भौतिकशास्त्राला निधी लागत नाही. त्यामुळे त्यांना पैशाची कधी गरज भासली नाही. शिवाय भारतातील संशोधनाबाबत ते मोठे आशावादी आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानाकडे मुलांना आकर्षित करण्यासाठी अनेक विज्ञान संस्था उभारण्याची गरज आहे, असेही ते म्हणतात.
     अत्यंत विनम्र आणि मृदुभाषी असलेले प्रा. सेन यांनी अद्याप आपल्याला मिळालेल्या पारितोषिकाच्या रकमेचे काय करायचे ते ठरवले नाही. त्यांनी आणखी एक कबुली दिली आहे ती म्हणजे या पुरस्काराने माझ्या संशोधनाला मान्यता मिळाली आहे, असे मी मानत नाही. असे असले तरी आपल्याला याचा आनंद झाला. तरुणांनी मूलभूत विज्ञानात रस घ्यावा यासाठी उत्तेजन मिळण्यास हा पुरस्कार महत्त्वाचा वाटतो. पण त्यांनी हेही सांगून टाकलं की युवकांनी केवळ पारितोषिकाच्या ग्लॅमरकडे पाहून विज्ञानाचा स्वीकार करू नये. विज्ञानातून ज्ञानार्जन किती होतं, हे पाहायला हवं.    
  
saamana 8/8/2012                      

Friday, August 3, 2012

बालकथा सोन्याची तलवार

     एक वृद्ध महिला आपल्या विधवा सुनेसह मदतीसाठी दरबारात पोहचली. तिने बिरबलला विनंती केली," माझा मुलगा वीस वर्षे शाही सेनेत नोकरीला होता. युद्धात त्याला वीरमरण आले. त्याच्या मृत्यूनंतर आम्ही निराश्रीत झालो आहोत. आम्हाला काही मदत मिळाली तर बरे होईल."
     "आई, तुम्ही निश्चिंत रहा," असा धीर देत बिरबल पुढे म्हणाला," शहंनशहा फार द्याळू आहेत. ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. फक्त मी सांगतो तसे करा आणि उद्या सकाळी दरबारात वेळेवर या."
     दुसर्‍यादिवशी सकाळी वृद्ध महिला दरबारात पोहचली. तिने बादशहापुढे आपले गार्‍हाणे मांडले आणि आपल्या मुलाची तलवार बादशहाला दाखवत म्हणाली," आलमपनाह, याच तलवारीने माझ्या मुलाने आपल्यासाठी अनेक लढाया लढल्या आहेत. त्याने युद्धात कधीच पाथ दाखवली नाही. हुजूर, या तलवारीला आपल्या शस्त्रागारात स्थान द्यावे, एवढी विनंती आहे." 
     "द्या पाहू इकडे, ती तलवार!" बादशहा अकबर म्हणाला. महिलेने ती तलवार बादशहाकडे सोपवली. बादशहाने तलवार न्याहळली आणि विचार करू लागला,' ही गंजलेली तलवार माझ्या काय कामाची?' बादशहा  तलवार सैनिकाकडे सोपवत म्हणाला,"   ही तलवार त्यांना परत करा आणि सोबत सोन्याच्या पाच मोहराही द्या."
     बादशहाचे बोलणे ऐकून बिरबलला धक्काच बसला.  'फक्त पाच मोहरा!आश्चर्याने त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले. मग तो बादशहाला म्हणाला," आलमपनाह, मी ही तलवार पाहू शकतो का?"  बिरबलाने ती तलवार हातात घेऊन खालवर करून न्याहळली. आणि पुन्हा ती तलवार सैनिकाकडे सोपवून काही एक न बोलता निमूटपणे उभा राहिला.
     बिरबल गप्प राहिलेला पाहून बादशहाने त्याला विचारले," बिरबल, तू असा गप्प का, तुला काही सांगायचं नाही का?"
     बिरबल लगेच म्हणाला," काही नाही आलमपनाह! पण मला ही तलवार सोन्याची होईल, असं खात्रीने वाटलं होतं."
     "सोन्याची!" अकबर चकीत हो ऊन म्हणाला.
     " हो, जहांपनाह." बिरबल ठामपणे म्हणाला.
     " तुला काय म्हणायचं ते स्पश्ट सांग, ही तलवार सोन्याची कशी होईल?"
      बिरबल म्हणाला," जहांपनाह, एक छोटासा परिस नावाचा दगड लोखंडाचंही सोनंकरतो. मी मात्र या विवंचनेत आहे, ही लोखंडी तलवार आपल्या पवित्र हातात आल्यावरसुद्धा साधारणच कशी राहिली?"
     बादशहा बिरबरलला काय म्हणायचे आहे, ते समजला. त्याने लगेच वृद्ध महिलेला त्या तलवारीच्या वजनाइतके सोने देण्याची आज्ञा केली. दोन्ही गरीब महिला अकबर आणि बिरबलला दुवा देत तेथून बाहेर पडल्या.                   

... मग आपला राष्ट्रीय खेळ कोणता?


     हॉकी या खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा दिला नसल्याची माहिती खुद्द क्रीडा मंत्रालयाने दिल्याने सर्वसामान्यांची, शिक्षकांची आणि क्रीडाप्रेमींची मोठी गोची झाली आहे. महितीच्या अधिकारांतर्गत मागवण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना क्रीडा मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या भारताच्या सरकारी वेबसाईटवर 'राष्ट्रीय खेळ' या मथळ्याखाली हॉकीच्या भारतीय कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. भारताच्या राष्ट्रीय प्रतिकांमध्ये खेळ गटात हॉकीला स्थान देऊन त्याविषयीची माहिती प्रसृत केली जाते. अगदी शाळांमध्येसुद्धा हीच माहिती विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवली जाते. त्यामुळे विद्यार्थी आपल्या पुढील आयुष्यात याच माहितीच्या आधारे आपले ज्ञान पाजळत असतो. हॉकीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा दिला गेला नसेल तर त्याची माहिती शासकीय पातळीवरून सर्वसामान्य, शाळांना पोहचवली पाहिजे. केवळ आकरा वर्षाच्या एका मुलीला हा प्रश्न पडल्याने तिने उत्सुकतेपोटी ही माहिती क्रीडा मंत्रालयाकडे मागितली आणि हा खुलासा मिळाला. आम्ही मात्र हॉकीला राष्ट्रीय खेळाचे महत्त्व देऊन त्याच्या अधःपतनाच्या नावाने शिमगा मारत बसलो आहोत. देशाला ऑलिम्पिकमध्ये आठ सुवर्ण व एक विश्वविजेतेपद मिळवून देणारा हॉकीच काय पण इतर कोणत्याही खेळास राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळालेला नाही. असेही खुद्द क्रीडा मंत्रालयानेच  माहिती दिली आहे.  'राष्ट्रीय' म्हणवल्या जाणार्‍या गोष्टींना हा दर्जा प्राप्त कसा झाला असा प्रश्न लखनऊच्या 10 वर्षांच्या ऐश्वर्या पराशरला पडला. तिने माहितीच्या अधिकारांतर्गत पंतप्रधान कार्यालयातून राष्ट्रगीत, खेळ, पशू, पक्षी, फूल प्रतीकांच्या घोषणेची आदेशाची प्रत मिळवण्याची मागणी केली. क्रीडा मंत्रालयाचे अवर सचिव शिवप्रतापसिंह तोमर यांनी ऐश्वर्याला पाठवलेल्या उत्तरात कोणत्याही खेळास राष्ट्रीय खेळाचा दर्जा दिलेला नसल्याची माहिती दिली. या माहितीने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च पुरस्कारासाठी जी स्पर्धा लागली आहे, त्यात हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या नावाची चर्चाही आघाडीवर आहे. क्रीडा मंत्रालयाच्या या माहितीने हे नाव आपोआप मागे पडणार आहे. केंद्रीय मंत्रालयाने एकदा भारतीची राष्ट्रीय प्रतिके जाहीर करावी, जेणेकरून तमाम भारतीयांना त्याची माहिती होईल. शाळांमध्येसुद्धा चुकीचे काही शिकवले जाणार नाही.   

Wednesday, August 1, 2012

राखी बांधायला बहीणी आणायच्या कोठून?

     माणूस अश्मयुगाअगोदरपासूनच स्वतः च्या हिताचा विचार करत आला आहे. स्वतः च्या रक्षणासाठी समुहाचा आश्रय त्याने घेतला. स्वतः भोवती एका नात्याची गुंफण केली. यातून भावनिक, मानसिक समाधान मिळवू लागला. ही नाती पुढे विस्तारत गेली. भाऊ, बहीण, पत्नी असा त्याचा वाढविस्तार होत होत चुलत, मावस, सावत्र, दूरचा, जवळचा अशी नाती चिकटत गेली. माणसाने स्वतःच्या सुखसोयीसाठी जशी धडपड चालवली तशी नात्याचीवीण घट्ट करण्यासाठीही त्याची धडपड वाढत गेली. माणूस फिरस्ता बनला. जाईल, तिथे नाती जोडू लागला. माणसे मिळवू लागला. भावनिक, मानसिक गुंतवण करीत राहिला. आज माणूस सातासमुद्र पार  करून आता परग्रहावर विसावायला निघाला आहे. पण हे करीत असताना नवनवीन नाती जोडत राहिला आहे.
     माणूस प्रगती करत राहिला, स्वतःच्या सुखासाठी, नात्याखातर  चंद्र- तारे तोडण्याची भाषा करू लागला.   त्यासाठी जीवही द्यायला तयार झाला. निसर्गाच्या सानिध्यात राहत माणसाने आपल्या मन, मेंदू आणि मनगटाच्या जोरावर वेगवेगळ्या क्षेत्रांत शेकडो क्रांत्या घडवल्या. पण त्याने आपल्या दैनंदिन जीवनात, सांस्कृतिक जीवनात आणि भावविश्‍वात घडवलेली सर्वश्रेष्ठ क्रांती म्हणजे ही नात्यांची क्रांती  होय. पण आता तो स्त्री भ्रूणहत्येसारखे पाप करून या नात्यालाच संपवायला निघाला आहे, हे मोठे दुर्दैवी होय. या वेडपटापायी तो  आजपर्यंत मिळवलेले सारे गमावू लागला आहे. स्वतः च्या पायावर धोंडा मारून घेऊ लागला आहे. त्याला आई हवी आहे, बायको हवी आहे, बहीण हवी आहे, पण तरीही स्त्री भ्रूणहत्या करून या नात्याच्या मूळावरच घाव घालायला लागला आहे. त्याला ही नाती हवी असतील तर पृथ्वीतलावर स्त्री जगली पाहिजे, याची जाणीवच नाही, असे कसे म्हणता येईल?   खरे तर नाती ही माणसाची सुंदर अशी निर्मिती आहे. माणूसपणाची ही खूण. पण तिलाच तो तडा देऊ लागला आहे. ही माणसाच्या अधः पतनाची सुरुवात म्हणायची का?  
      माणूस समूहजीवनात नाती घेऊन जगत आला आहे.  रक्ताची नाती, मैत्रीची नाती त्यानं जन्मास घातली. त्यावर आपल्या भावविश्‍वातला उजेड टाकण्यासाठी सणावाराचा सारिपाट मांडला. नात्याची विण घट्ट  होण्यासाठी  अनेक सण-उत्सव त्यानं सुरू केले. आज भावा-बहिणीच्या नात्याला राखीच्या धाग्यात गुंफणारा  रक्षाबंधन त्यापैकीच एक सण. या बंधनात  सणाच्या पलीकडचीही एक निराळी दृष्टी आहे. त्यामुळेच  स्त्री श्रेष्ठ की पुरुष, अशा मोजपट्टी घेऊन याकडे  पाहिले जाऊ  नये. कोण सबळ, कोण दुर्बल असे चष्मे घालूनही पाहू नये. माणसं, मनं, नाती जोडण्याचं एक साधन म्हणून त्याकडं पाहायला हवं. रक्षाबंधन हा बहीण-भावाचे नाते सुदृढ करणारा सण आहे. त्यांच्यातील अतूट प्रेम व्यक्त करणारा सण आहे. इतके अतूट, की बहीण-भाऊ परस्परांना आयुष्यही द्यायला तयार होतात. "राखी सजू दे सजू दे, बहीण माझी जगू दे' असा जागर करतात. असं हे मोठं भावविश्व आहे.
     नात्याचं भावविश्व मोठं असलं तरी त्यात स्वार्थसुद्धा खचाखच भरला आहे. वंशाच्या दिव्याचा हव्यास ठेऊन गर्भजल चिकित्सा करत गर्भाशयातच मुली मारण्याचा निर्दयी, अमानवी उद्योगही सुरू आहे. पैसा-अडका, घरदार, सुखवाद्च्या पाठीमागे लागताना मूल्यांची पायमल्ली केली, विज्ञानाचा गैरवापर केला, पण यात स्त्रीला कमी लेखण्यात आले. तिला दुय्यमत्व दिले. त्यामुळे मानवी विकासातल्या एका चाकावर घाला घातला जाऊ लागला. या मागे कित्येक कारणे असले तरी पुरुषप्रधान संस्कृतीला धक्का देण्यात स्त्रीला शक्य झाले नाही. त्यामुळे पुरुष सांगतो तसे किंवा समाज भीती बाळगून स्त्री वागत आली. पण यात मानवाचेच नुकसान आहे, याचा विचार केला नाही. स्त्री नष्ट झाली तर सगळी नाती नष्ट होणार आहेत. भावा-बहीणीचं नातं राहणार नाही. पती-पत्नीचं नातं राहणार नाही. आईची ममता कळणार नाही. कुठलीच नाती राहणार नाहीत. आणि नाती नसतील तर माणूस थोडाच राहणार आहे?
     पैशाच्या मोहापायी  मूल्यहीन झालेले व्यवसाय आणि मुलीविषयी तयार झालेली दुराव्याची, दुय्यमत्वाची भावना, रक्षाबंधनाला बहीण आणायची कोठून असा मोठा गहन प्रश्न वेडावून टाकतो.  पृथ्वीच्या पाठीवरून मुलगीच नाहीशी झाली की नव्या जगाचा पाळणाच हलणं बंद होईल. जग थांबेल. हा अराजकतेचा धोका टाळायला हवा. स्त्री भ्रूण हत्या रोखायला हवी.  मुलीच्या आयुष्यावर पसरणारा मृत्यूचा काळोख संपवण्यासाठी अशा सणावारालाही निर्धार करायला हवा. राखी हवी असेल तर ती बांधणारी बहीण नको का जीवंत राहायलाआपल्याला आई, बहीण, मावशी, मैत्रीण, पत्नी अशी सारी रूपं हवी आहेत. नव्हे ती  जगरहाटीची गरज आहे. कुठलीही नाती एकतर्फी जपली जात नाहीत, तर त्यासाठी नाण्याच्या दोन्ही बाजू खणखणीत असायला हव्यात. पण एक बाजू पुसणार असू तर नाणे कसे चालणार? त्यामुळे दोन्ही बाजू सक्षम असायला हव्यात.
     जग म्हणजे केवळ दगड-धोंडा, प्राणी- वनस्पती किंवा खाऱ्या पाण्याचे समुद्र नव्हे. या साऱ्यांना माणसाचा स्पर्श होतो किंवा या साऱ्यांच्या सावलीत  मानवी जीवन बहरते, फुलते, तेव्हा जग ही कल्पना सुंदर नि आशयपूर्ण वाटते. मात्र तिला सुरुंग लावण्याचा प्रयत्न म्हणजे भ्रूणहत्या. अशा हत्येखोरांना समाजानं मान्यता देऊ नये. मुलगी जन्माला घालणं ही जगातील सुंदर गोष्ट असते. मुलगी एकाच वेळी व्यक्तीही असते आणि नव्या जगाची, नाना नात्यांची निर्मितीही. निर्मितीलाच जर खलास केलं, तर जगाच्या झोळीत काय हो उरेल? राखी बांधून घेणाऱ्या सर्व मनगटांनी आणि बांधणाऱ्या सर्व मनांनी याचा विचारही करायला हवा. सणाचा अर्थ काय? सांस्कृतिक जीवन समृद्ध बनवणं, नाती गच्च करणं, मनाचं आवरण त्यावर टाकणं, मनाचा पिसारा घेऊन त्यांना स्पर्श करत राहणं होय. तर मग ही नाती, ही सांस्कृतिक समृद्धी टिकवायची असेल तर स्त्री भ्रूण्हत्येच्या पापापासून दूर राहायला हवं.
punya_nagari, ( sangli/ kolhapur) 2/8/2012

बालकथा सोनं नाही नि चांदीही नाही

     एका गावात भोलाराम नावाचा एक शेतकरी राहत होता. नावाप्रमाणेच स्वभावानेही तो भोळाभाबडा होता. त्याच्याजवळ थोडीशी जमीन होती. त्यात जे काही पिकायचं, ते त्याला पुरेसं ठरायचं. गावालगतच जंगल होतं. पीक भरास आलं की माकडं पिकात घुसायची. धुडगूस घालायची.  खाऊन फस्त करायची.
     माकडं जितकं खायची, त्याहून अधिक नाश करायची. शेतकरी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नानाविध उपाय करायचे. पिकं वाचवायला बघायची. भोलाराम मात्र सगळ्यांपेक्षा वेगळा होता. तो विचार करायचा, माकडांनाही पोटं असतं. आपल्याकडे जमीन्-जुमला आहे, म्हणून आपण काम करतो. बिचार्‍या माकडांकडे काय आहेतो माकडांना कधी हुसकावून लावत नसे.
     एकदा पीक भराला आले होते. त्याच्या रखवलीसाठीच तो एका झाडाखाली बसला होता. बसल्या बसल्या त्याला झोप येऊ लागली. शेवटी तो तिथेच लवंडला. तेवढ्यात माकडांनी पिकावर धाड घातली. सगळ्या शेताची नासधूस केली. माकडांनी भोलारामला झाडाखाली झोपलेलं पाहिलं, तसे सगळे त्याच्याभोवती गोळा झाले. त्यातला एकजण म्हणाला," अरे, बिचारा मेला वाटतं." दुसरा म्हणाला," अरे हो रे, चला याला नदीत सोडून येऊ. नाही तर हा मृतदेह सडून जाईल."
     सगळ्या माकडांचे या गोष्टीवर एकमत झाले. ते त्याला उचलू लागले., तेवढ्यात एक आवाज आला," नको, त्याला पाण्यात सोडू नका. बिचारा भला माणूस होता. याने आपल्याला कधीच त्रास दिला नाही की कधी शेतात येण्यापासून मज्जाव केला नाही. याने आपल्यासाठी कधी जाळेसुद्धा लावले नाही. याला सोन्याच्या गुहेत नेऊन ठेवू." हा आवाज माकडांच्या सरदाराचा होता.
     भोलाराम माकडांचे बोलणे ऐकून खूश झाला. तो डोळे बंद करून तसाच पडून राहिला. माकडांनी त्याला उचलले नी सोन्याच्या गुहेत घेऊन गेले. तिथे गेल्यावर माकडांनी योग्य जागा शोधून त्याची साफसफाई केली आणि तिथे भोलारामला झोपवले. त्याला नमस्कार करून माकडे निघून गेली.
     सगळे गेल्यावर भोलाराम उठला. धोतरात जेवढे सोने मावेल, तेवढे घेऊन तो घरी आला. आता तो गावातला सर्वात श्रीमंत माणूस बनला. त्याच्या शेजारी एक व्यापारी राहत होता. तो फार दुष्ट होता. त्याने भोलारामला विश्वासात घेऊन श्रीमंतीचे रहस्य जाणून घेतले. भोलारामने खरे काय ते सगळे सांगून टाकले.
     आता तो माकडांची वाटपाहू लागला. आणि एक दिवस माकडांची झुंद त्याच्या पिकावर चालून आली. व्यापारी झाडाखाली मेल्याचे सोंग घेऊन पडला. माकडे त्याच्याजवळ आली. त्यांना तो मेला असल्याचे वाटले. त्यातला एकजण म्हणाला," बरं झालं, हा दुष्ट मेला तो! चला, याला जंगलात फेकून येऊ." ते त्याला उचलून जंगलात घेऊन जाऊ लागले. इतक्यात तिथे त्यांचा सरदार आला. तो म्हणाला," याने आपल्याला खूप त्रास दिला आहे. याला सोन्याच्या गुहेत घेऊन जायला नको. त्यापेक्षा चांदीच्या गुहेत फेकून या."
     व्यापारी सोन्याच्या गुहेचे स्वप्न पाहात होता. चांदीचा विषय निघाल्यावर तो विचार करू लागला,' कुठे सोने आणि कुठे चांदी! आपल्याला चांदी घेऊन करायचे काय?' तो पटकन उठला आणि म्हणाला," मलासुद्धा सोन्याच्या गुहेत घेऊन चला." मेलेल्या माणसाला हलता - बोलताना पाहून माकडे घाबरली. आणि त्यांनी त्याला तिथेच टाकून धूम ठोकली. बिचार्‍याला सोन्याच्या मोहापायी चांदीवरही पाणी सोडावं लागलं.