Friday, November 3, 2017

अनुभवातून शिका

     पुढच्याला ढेच,मागचा शहाणा, या म्हणीनुसार माणसाने अनुभवातून बोध घ्यायला हवा. अनुभव हा माणसाला धडा शिकवतो. हा अनुभव मग आपल्याला आला असेल अथवा दुसर्‍याला! त्यातून बोध घेऊन आपली वाटचाल चालू ठेवली पाहिजे. दुसरा खड्ड्यात पडला म्हणून आपणही पडायला जाऊ नये. काही माणसं फार धुर्त असतात. एकाद्या गोष्टीत स्वत: नुकसानीत गेले, असतील पण त्यातून दुसर्‍याला चांगले सांगणार नाहीत. उलट त्याला त्यात फार फायदा आहे,असे सांगून तुम्हाला खड्ड्यात घालायला मोकळे असतात. त्यामुळे दुसर्‍याचे ऐकत असताना आपण सावध असले पाहिजे. अंधळेपणाने अनुकरण करणे धोक्याचे असते.

     माणूस अनुभवाने शहाणा होतो, असे म्हटले जाते,मात्र पहिल्यांदा अनुभव तरी घेतलाच पाहिजे. सगळ्या कामात धोके असतात. यश मिळवयाचे तर काट्याकुट्यातून चालावे लागणारच आहे. यश काही सहजासहजी मिळत नाही. यशासाठी तपश्‍चर्या करावी लागते. मेहनत,जिद्द,चिकाटी असल्याशिवाय आपण त्याच्या पासंगालाही जाऊ शकणार नाही.त्यामुळे कुठलेही काम करताना धाडसही असायला हवे. दुसर्‍याला एकाद्या गोष्टीत नुकसान आले,म्हणून त्या वाटेला जायचे नाही. असे म्हणून चालणार नाही. तो तोट्यात का गेला, त्याचे नुकसान का झाले? का तो परीक्षेत नापास झाला? याचा सांगोपांग विचार केला पाहिजे. यालाच अनुभवातून शिका, असे म्हटले जाते. कदाचित तो चुकला असेल, पण तुम्ही आत्मविश्‍वासाने त्यात पडला तर तुम्ही  पुढे जाऊ शकता.त्यामुळे आपण कुठलेही पाऊल उचलताना कान,नाक आणि डोळे उघडे ठेवूनच मार्गक्रमण केले पाहिजे.
     वास्तविक आपल्याला पदोपदी अनुभव येत असतात. काही क्लेश देणारे असतात. काही संताप आणणारे असतात. मात्र आपण यातून शांतपणे पुढे सरकत असताना आपला निवडलेला मार्ग सोडता कामा नये. अनुभव येत राहतील. वाईट अनुभव आला म्हणून खचून जायचं नसतं आणि चांगला अनुभव आला म्हणून फार आनंदूनही  जायचं नसतं. आजच्या तंत्रज्ञान युगात मरणाची स्पर्धा आहे. चांगल्या वाईटाचे अनुभव पदोपदी येत राहतात.त्यामुळे आपला समतोल वावर असला पाहिजे.
     चुकांमुळे बराच फायदा होत असतो.चुकल्याशिवाय काय चुकलं आहे, हे समजणार नाही. माणूस आहे,म्हटल्यावर चुका या होणारच.हे ग्रहीत धरले तरी वारंवार होणार्‍या चुका मात्र तुम्ही त्यातून काहीच शिकला नाही, हेच सांगते. एखाद्या व्यक्तीने मला पहिल्यांदा फसवले असेल, तर त्याला तेव्हा लाज वाटायला हवी. पण त्याच व्यक्तीने मला दुसर्‍यांदा फसवले,तर मात्र मला त्यावेळी लाज वाटायला हवी. लाज यासाठी की, एकदा फसवणूक झाली तरी मी त्यापासून काहीच धडा घेतला नाही आणि पुन्हा फसवलो गेलो. या गोष्टी टाळायच्या तर त्रयस्थ होऊन वाटचाल करता आली पाहिजे. भावनिक होऊन स्वत:चे नुकसान करून घेता कामा नये.
     एक क्षुल्लक चूकदेखील खूप मोठ्या सुधारणेचे कारण होऊ शकते, याचेही भान असायला हवे. आपल्या अनुभवाचा लाभ घेणार्‍या माणसाला चतुर म्हणतात. यशस्वी व्यक्ती मात्र दुसर्‍याच्या अनुभवाचा फायदा करून घेत असतात. असं म्हटलं जातं की, अनुभव घेण्यासाठी आपल्याला अनेक पटीने अधिक किंमत चुकवावी लागते,परंतु, त्यापासून आपल्याला मिळणारी शिकवण दुसर्‍या कशापासूनही मिळू शकत नाही.
     अनुभव म्हणजे तरी काय? तुम्हाला जे हवे असते, त्याच्याऐवजी तुम्हाला दुसरेच काही मिळाले तर त्याला अनुभव म्हणतात. तुम्हाला दुसर्‍या व्यक्तीचा अनुभव कळला असेल तर तुमच्यासाठी तोदेखील एक अनुभव आहे. असं म्हटलं जातं की, दुसर्‍याच्या अनुभवातून शिका आणि शक्य होईल तितका त्याच्यापासून लाभ मिळवा. अशा प्रकारे वागत गेलात तर तुम्हाला लोक बुद्धिमानांच्या रांगेत नेऊन उभा करतात. एक लक्षात ठेवा, ओव्या लहान असतात,पण त्यांची रचना करण्यासाठी खूप मोठा अनुभव लागत असतो.

जे काही होते...

     डॉ. मार्क नावाचे एक कॅन्सर तज्ज्ञ होते. एकदा ते दुसर्‍या शहरात होणार्‍या महत्त्वाच्या कॉन्फ्रेंसमध्ये भाग घेण्यासाठी निघाले होते.या कॉन्फ्रेंसमध्ये त्यांना मेडिकल रिसर्चवर महत्त्वाचे काम केल्याबद्दल अ‍ॅवार्ड दिले जाणार होते. ते फारच खूश होते कारण त्यांनी रिसर्चवर फारच मेहनत घेतली होती.
     ते विमानात बसले, काही वेळाने विमान कसल्याशा  तांत्रिक कारणामुळे दुसर्‍या एका विमानतळावर उतरवण्यात आले.मार्कला वाटलं आता आपण कॉन्फ्रेंसमध्ये भाग घेऊ शकणार नाही. ते लगेच विमानतळावरच्या रिसेप्शनवर पोहचले आणि दुसर्‍या फ्लाइटची वेळ विचारली. तिथे त्यांना कळले की, पुढची फ्लाइट दहा तासांनी आहे.
 
   रिसेप्शनवर डॉ. मार्क यांना सांगण्यात आले की, फ्लाइटची वाट पाहात बसण्यापेक्षा कारने त्या शहरात जा. चार तासांत पोहचाल. दुसरा कुठला पर्याय नसल्याने त्यांनी कार भाड्याने घेतली  आणि त्या शहराच्या दिशेने निघाले.
     काही अंतर गेल्यावर मोठे वादळ आले.त्यांना पुढचे काहीच दिसत नव्हते. या सगळ्या गोंधळात त्यांचा मार्ग चुकला. त्यांना ज्या वळणावर वळायचे होते, ते मागे गेले. ते भरकटले. खूप वेळ गाडी चालवल्याने ते पुरते थकले होते. ते घराचा शोध घेऊ लागले. त्यांना आराम करण्याची गरज होती. भूकही लागली होती.
     काही वेळाने त्यांना एक घर दिसले. त्यांनी दरवाजा ठोठावला. एका सुंदर मुलीने दरवाजा उघडला. डॉ. मार्क यांनी त्यांना सगळा प्रकार सांगितला आणि फोनसाठी विनंती केली.त्या मुलीने आपल्याकडे फोन नसल्याचे सांगितले. ती म्हणाली, जोपर्यंत मोसम ठीक होत नाही,तोपर्यंत तुम्ही थांबू शकता.
     घरात आल्यावर मुलीने त्यांना गरम गरम चहा दिला.यानंतर तिने मार्कला प्रार्थना सभेत सामिल होण्याची विनंती केली. मार्क म्हणाले,माझा मेहनतीवर विश्‍वास आहे, तुम्ही प्रार्थनेला जा. डॉ. मार्क तिच्या प्रार्थनेचे निरीक्षण करत राहिले. तिच्याशेजारी एक लहान मुलगादेखील बसला होता.ती उशिरापर्यंत प्रार्थना करत होती, त्यामुळे त्यांना वाटले की, तिला कशाची तरी मदतीची आवश्यकता आहे. तिची प्रार्थना झाल्यावर तिला विचारायचे त्यांनी ठरवले.
     डॉ. मार्कनी तिला विचारलं, तू परमेश्‍वराकडे काय मागितलंस? शिवाय त्यांनी त्या मुलाविषयीही विचारलं. मुलीने हसत त्यांच्या प्रश्‍नांना उत्तरं दिली. ती म्हणाली, तिच्या मुलाला कॅन्सर आहे. आणि तो  फक्त मार्क नावाचे डॉक्टरच बरे करू शकतात. पण माझ्याकडे पैसे नसल्यामुळे उपचार करू शकत नाही.
     ती मुलगी पुढे म्हणाली, परमेश्‍वर एक दिवस नक्की माझी प्रार्थना ऐकेल आणि काही ना काही मार्ग काढेल.हे ऐकून डॉ. मार्कच्या डोळ्यांत अश्रू आले.ते शांत झाले. त्यांनी मनातल्या मनात म्हटले, परमेश्‍वर महान आहे आणि अगोदर घडलेली घटना ते आठवू लागले.
तात्पर्य: जे काही होते, त्यामागे काही ना काही कारण असते.



Thursday, November 2, 2017

हसत जगावे


वॉट्स अ‍प
एकदा शिक्षकांनी बंड्याला विचारले, जर 1947 ला वॉट्स अ‍ॅप होता,तर काय झाले असते?
बंड्या लगेच म्हणाला, बरं झालं त्यावेळेला वॉट्स अ‍ॅप नव्हता, नाही तर स्वातंत्र्य लध्यात कोणीच उतरलं नसतं. ॠगळेच घरात बसूनच मेसेज करत राहिले असते, इस मेसेज को इतना फैलाओ, अंग्रेज खुद ही भारत छोडकर भाग जाए।

मेडल
बंड्या गुंड्याच्या घरी आला होता. तिथे त्याला टीव्हीच्या शोकेसवर दोन मेडल दिसले. यावर तो गुंड्याला म्हणाला, अरे, हे मेडल तुला कशासाठी मिळाला?
गुंड्या: दोन्ही मेडल गाण्यासाठी मिळाले.
बंड्या: पण,एक मेडल लहान आणि एक मोठा का?
गुंड्या: लहान मेडल गाणे गाण्यासाठी आणि मोठा मेडल गाणे बंद करण्यासाठी!

बदाम
गीता: रोज रोज बदाम खाल्ल्याने काय होईल?
नीता: आणखी काय होईल? बदाम संपतील.

चायनीज
एक वेडा: तू अमेरिकन आहेस ना?
चिनी: नाही हो, मी चायनीज आहे.
वेडा: नाही,तू अमेरिकनच आहेस.
चिनी: (वैतागाने) हो हो, मी अमेरिकनच आहे.
वेडा: अरे व्वा! पण दिसतो पक्का चायनीज!

री-सायकलिंग
शिक्षक: अंत्या, सांग बरं री-सायकलिंग कशाला म्हणतात?
अंत्या:सायकल चालवल्याने पाय दुखले, म्हणून बाइक घेतली. बाइक चालवल्याने पाठदुखी वाढली. मग फोर व्हीलर घेतली.पण फोर व्हीलर चालवल्याने पोट सुटले. मग जीमला जावं लागलं. जीमला गेल्यावर मग काय! पुन्हा परत सायकल मिळाली. यालाच म्हणतात री-सायकलिंग!

एकच ध्यास,गावाचा विकास

     नुकत्याच राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यंदा प्रथमच सरपंच हा थेट लोकांमधून निवडून आला आहे.त्यामुळे ही निवडणूक तशी ऐतिहासिक ठरली आहे. आता अजून महिनाभर जुनेच कारभारी ग्रामपंचायतीवर राहणार आहेत.त्यामुळे नव्यांना काही काळ कामकाज पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र या कालावधी सरपंच आणि सदस्यांनी ग्रामविकासाबाबत प्रशिक्षण वगैरे घेऊन ग्रामपंचायत चालवण्यासाठी सक्षम व्हायला हवे. शासनाने आणि विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्षांनी त्यांना प्रशिक्षण द्यायसाठी पुढाकार घ्यायला हवा. बहुतांश ठिकाणी सरपंच मंडळी कारभार कसा चालवायचा याचा अनुभव नसलेली निवडून आली आहेत. विविध संवर्ग आणि पन्नास टक्के महिला आरक्षण यामुळे चारचौघात वावरायचा अनुभव नसलेली मंडळीही ग्रामपंचायतीवर निवडून आली आहे. कित्येकांनी आरक्षणामुळे आपल्याला संधी मिळाली नाही म्हणून आपली पत्नी, आई,बहीण किंवा भावासह अन्य नातेवाईकांना निवडणुकीत उतरवले होते. त्यामुळे या नव्या कारभार्‍यांचा कारभार साहजिकच जुनी मंडळीच पाहणार हे उघड आहे. मात्र असे न होता त्यांनी आपल्याच लोकांना प्रशिक्षित करून त्यांचे निर्णय त्यांनाच घ्यायला उद्युक्त केले तर चांगलाच फायदा होईल. नाही तर पहिल्यासारखे गटा-तटाचे राजकारण करत बसले तर गावचा विकास तिथेच राहणार आहे. हार-जीत, पक्षीय राजकारण,गट-तट विसरून फक्त गावाचा विकास त्यांनी आपल्या डोळ्यांसमोर ठेवला पाहिजे.

     सत्तेच्या विकेंद्रीकरणात गावाला अधिक महत्त्व आले आहे. गावाच्या विकासाला थेट निधी 14 व्या वित्त आयोगाच्यामाध्यमातून उपलब्ध होत असल्याने बाकीचे राजकारण सोडून सत्ताधार्‍यांनी गावाचा विकासात्मक कायापालट कसा होईल, हे पाहिले पाहिजे. निधी गेल्यावर्षीपासून मोठ्या प्रमाणात येत आहे,त्याचा सुयोग्य वापर व्हायला हवा. सर्वांना घेऊन कारभार केल्यास नक्कीच गावाचा विकास होणार आहे. आपल्या खरी गरज आहे,ती रोजगाराची! गावातल्या लोकांना गावातच रोजगार मिळायला हवा. गावातली शेती उन्नतीकडे सरकली पाहिजे तरच गाव समृद्ध होणार आहे. कुठे निधी कमी पडत असेल तर गाव उठावातून कामे करायला हवीत. राळेगणसिद्धी, हिरवेबाजार,पाटोदा,निवळसारख्या गावांचा कारभार तिथल्या लोकांच्या हातात आहे. ग्रामसभांना महत्त्व आहे.लोकांना त्यात मोठ्या संख्येने सहभाग करून घेऊन गावाला काय हवे, काय नको याचा ऊहापोह करत त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. गावात अवैध धंदे, दारू विक्रीला थारा देता कामा नये. व्यसनी लोकांमुळे फंदफितुरी होऊन गावाच्या विकास कामात आडकाठी घालण्याचा धोका आहे. गावातले व्यसन कमी करण्यासाठी विशेषत: महिलांनी पुढाकार घ्यायला हवा.
     यापूर्वी गावाला निधी तटपुंजा मिळत होता. घरपट्टी,पाणीपट्टीही गोळा होत नव्हती, असा अनुभव आहे. त्यामुळे गावासाठी राबणारे शिपाईसारखे कर्मचारी पगाराअभावी दुर्लक्षित राहत होते. गावाला निधी आला आहे, मात्र लोकांनी गावाचा कर भरून ग्रामपंचायत आणखी सक्षम करायला हवी. आपले सरकार सारख्या योजनांमुळे लोकांना  शेती, शिक्षण अथवा विविध योजनांकामी विविध प्रकारचे दाखले हवे असतात. यासाठी त्यांना तालुक्याच्या गावाला जावे लागते. यासाठी वेळ आणि पैसा वाया जातो. आता हे दाखले गावातच मिळण्याची सोय झाली आहे. इंटरनेट अथवा नव्या तंत्रज्ञानाचा वापर गावात करत राहिल्यास शेतीचे नवे तंत्रज्ञान, माहिती उपलब्ध होणार आहेच शिवाय गावातल्या काहीजणांना गावातच रोजगार उपलब्ध होणार आहे. समूहशेती,बचत गट यातून छोटे छोटे उद्योग,शेतीप्रक्रिया उद्योग साकारता येणार आहेत. गाव एकदिलाने काम करत राहिल्यास काय अशक्य नाही? म्हटलेच आहे, गाव करेल तिथे रावाचे काय? त्यामुळे गावाच्या विकासाला चांगली संधी आली आहे. त्याचे सोने करून घ्यायला हवे.
     गावात विकास कामे करायला अनेक खूप कामे आहेत. शिक्षण, आरोग्य, रस्ते,पाणीपुरवठा (ओढे,नद्या,पाण्याचे स्त्रोत इत्यादी सुव्यवस्थितपणा), बांधकाम,विविध दुरुस्ती, समाजविकास, वृक्षारोपण, गावातील सण,उत्सव आदी गोष्टींवर काम व्हायला हवे. विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जागरुकता महत्त्वाची आहे. उत्तम लोकशाहीसाठी निवडणुका संपल्या की विरोधासाठी विरोध न करता गाव माझा मी गावाचा या न्यायाने वर्तन आणि काम अपेक्षित आहे. सध्या सरपंचांची भूमिका फार महत्त्वाची आहे. विकास कामे तर होतीलच पण गावाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी आणखी काय काय करायला हवे, याचा सतत ध्यास त्याने घ्यायला हवा.स्वच्छ गाव, सुंदर गावसारख्या कल्पना सत्यात यायला हव्यात. पंचक्रोशीतील सरपंच आणि सदस्यांनी यासाठी महाराष्ट्रातील आदर्शगावांना भेटी द्यायला हव्यात. त्यातून आपल्याला काय हवे, हे समजून येईल. एकच ध्यास,गावाचा विकास,हेच सरपंच आणि सदस्यांच्या तनामनात रुजायला हवे.

भारतीय खेळण्यांची संस्कृती लयाला

     आपल्या लहानपणी आपण कोणकोणत्या खेळण्यांशी खेळलो, हे आठवत असेल तुम्हाला.फुगे,कुडमूड, लाकडी, प्लॅस्टिकची खेळणी, बासरी,पिपाणी अशा किती तरी वस्तूंशी आपण खेळलो आहे.पण आता ही खेळणी हद्दपार झाली आहेत.ती जागा आता मोबाईल,व्हिडिओ आणि आभासी गेम्सनी घेतली आहे. कागदी नाव,विमान करून, त्याचबरोबर मातीची खेळणी बनवून खेळण्याचे दिवस संपले आहेत. ही खेळणी शाळेत कधीतरी शिक्षक कार्यानुभवच्या तासाला शिकवतात. बाकी त्यांच्याशी खेळण्याचा मुलांचा संबंधच येत नाही.
     घरोघरी पूर्वी लहान बाळासाठी लाकडी घोडा असायचा. त्यावर बसवून बाळाला झोके दिले जायचे. त्यावेळेला बाळ फार छान हसायचे. लकडी की काठी,काठी पे घोडा हे गाणेदेखील ऐकले असेल.पण आज यातले काहीच राहिले नाही. तंत्रज्ञानातील प्रगती आणि त्याच्या आहारी गेलेल्या माणसांना नव्या जमान्यातल्या खेळण्यांनी आकर्षित करून टाकले. अर्थात ही खेळणी तर कोणती? स्मार्टफोन आणि व्हिडिओ गेम. यांमध्ये आभासी गेम्सचा भरणा अधिक आहे.जे प्रत्यक्षात करता येत नाही,खेळता येत नाही,ते यावर आपली बोटे नाचवून बिनधास्त खेळता येते. मात्र ही खेळणी मुलांचा विकास करत नाहीत तर विनाश करत आहेत. मुले तणावग्रस्त होऊ लागली असून त्यांच्यात या गेम्समुळे चीडचीडपणा वाढला आहे. ब्लू व्हेल सारख्या जीवघेण्या आभासी खेळाने तर बालपणच गिळून टाकले आहे.

     पूर्वी देशी खेळण्यांचा बाजार अगदी समृद्ध होता. गावातल्या बाजारात किंवा यात्रा-जत्रांमध्ये अशा खेळण्यांचा बाजार फुललेला असायचा. मुलांना खेळणी पाहिल्यावर काय घेऊ न काय नाही, असे होऊन जायचे. मुलं हट्ट करायची.पालक त्यांच्या हट्टापुढे हार पत्करून त्यांना खेळणी घेऊन द्यायची. आता गावोगावचा बाजार बदलला आहे. यात्रांचेही रूप पालटले आहे. अगोदर फुगे,बासरी,पिपाणी, शिटी विकायला लोक गावात यायचे. केसावर फुगे, अशा आरोळ्या ऐकायला आल्या की चिमुरडी पोरं गोळा केलेले केस घेऊन धावत जायचे. आता फुगे आहेत,पण ते खेळायला नाही तर, सजवायच्या कामी येत आहेत. आता लाकडी खेळणी पाहायला तर मिळतच नाहीत,पण प्लॅस्टिकची गाडी,बाहुली वगैरे खेळणीदेखील कमी झाली आहेत. आता रिमोट चालणारी गाडी,हेलिकॉप्टर,विमान अशी खेळणी पाहायला मिळत आहेत. ही सगळी खेळणी चिनी बनावटीची आहेत. विकत घेतल्यावर काही तासातच त्यांचा खेळ खल्लास! अशा खेळण्यातून मुलांची हौसही भागत नाही.त्यामुळे पालकही अशी खेळणी घेऊन द्यायला मागे-पुढे करतात.परंतु, या खेळण्यांचे आकर्षणही फार कमी झाले आहे.कारण आजकाल शेतकरी,हमाल,मजूर यांच्या हातातही स्मार्टफोन आला आहे. त्यात गेम्स असतात, हे आता सर्वश्रुत झाले आहे. त्यामुळे दोन-तीन वर्षाची मुलेदेखील स्मार्टफोन सहज हाताळण्याबरोबरच गेम खेळताना दिसत आहेत. बापालाही फार हौस आणि मौज असते. आपला चिमरुडा मोबाईलवर गेम खेळतोय,याचं अप्रूप तो सगळ्या गावाला दाखवत सुटतो.
     पूर्वी आपल्या देशात खेळणीची समृद्ध परंपरा होती. संस्कृती होती. यामुळे गावातल्या सुतार,कुंभार, लोहार यांसारख्या कष्ट करणार्‍या समाजाला रोजगार उपलब्ध होत होता. सिंधू संस्कृतीकालीन भाजलेल्या मातीच्या खेळण्यांमध्ये जनावरांच्या आकृत्या, घराघरात वापरात येणारी मातीची भांडी उत्खननात आढळून आली आहेत. ऋग्वेदात बाहुल्यांचा उल्लेख आहे.पाटणा मथुरा, कौशांबी आणि राजघाट येथील खोदकामात मौर्य आणि गुप्तकालीन मातीची खेळणी आढळून आली आहेत. अशी खेळणी आपल्या देशातल्या काही संग्रहालयांमध्ये पाहायला मिळतात. शुंग काळातील साच्यातील खेळणी सापडली आहेत. साच्यातली मेंढी,मगर खूप सुंदर आहेत. एकूण काय तर मुलांची खेळणी बैलगाडीसह जनावरांच्या आकृत्या मुलांना निसर्ग आणि त्यांच्या मातीशी जोडली जात होती. टेराकोटाची खेळणी सिंधू घाटी संस्कृतीची देण आहे.
आपल्या पारंपारिक खेळण्यांमध्ये मातीची खेळणी कुंभार, लाकडाची खेळणी सुतार आणि लोखंडी खेळणी लोहार बनवू द्यायचा. काष्ठकलेत कधीकाळी वाराणसी आणि आयोध्या आघाडीवर होते. तर राजस्थानच्या कठपुतळ्यांना पर्यायच नव्हता.धातूची खेळणी बनवण्यात बस्तर पुढे होता. जुन्या कपड्यांपासून खेळणी बनवण्यात हिमाचल प्रदेश आणि पंजाब यांचा हात कुणी धरत नव्हता. केरळमध्ये लाकडाच्या नृत्य करणार्‍या बाहुल्या, आंध्रप्रदेशात नवविवाहित जोडप्यांच्या मूर्ती तर बंगालमध्ये देवा-देवता लाकडांपासून बनवल्या जात होत्या. जपानमध्ये आपल्या आरोग्याला धोकादायक ठरू शकणार्‍या प्लॅस्टिकऐवजी कागदी खेळणी बनवली जात होती.ओरोगामी कला प्रसिद्ध आहे. म्हणजे आपल्याला ठिकठिकाणच्या कला,त्यांची विशेषता तिथली खेळणी पाहिल्यावर समजत होती. मुलेदेखील खेळण्यांच्याबाबतीत सृजनात्मक होती. खेळणी पाहून तशी बनवण्याचा त्यांचा प्रयत्न असे.त्यामुळे प्रांताप्रांतातली खेळणी संपूर्ण हिंदूस्थानभर झाली.
     असा खेळण्यांचा समृद्ध वारसा काही देशांनी जपला आहे.त्यांना आपल्या संग्रहालयांमध्ये स्थान दिले आहे. ही कला टिकून राहावी,यासाठी तिथे खास प्रयत्न केले जात आहेत. पर्यटकांना अशा खेळण्यांचे आकर्षण वाटावे,यासाठी खास योजना अंमलात आणल्या जात आहेत.फिलिपिन्सची राजधानी मनिलामधील एका संग्रहालयात तब्बल सात हजार प्रकारची खेळणी पाहायला मिळतात.दिल्लीतदेखील एक संग्रहालय आहे, ज्यात अनेक देशांची खेळणी पाहता येतील. भूतानच्या एका संग्रहालयातसुद्धा खेळण्यांनी स्थान मिळवले आहे.
     देश-विदेशातल्या सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरांना जोडणार्‍या देशी खेळण्यांचा मुलांच्या मानसिक आणि सामाजिक विकास करण्यामध्ये अदभूत योगदान राहिले आहे. पण आज आपण ही समृद्ध परंपरा लयाला नेत आहोत. त्याऐवजी आपण ब्लू व्हेलसारख्या जीवघेण्या खेळांच्या हातात मुलांचे बालपण सोपवत आहोत.त्यांची संवेदना आणि समज आपण अमानवीय बनवत आहोत. यामुळे आपण स्थानिक कुटीर उद्योग उदवस्त करून अशा खेळाला-खेळण्यांना चालनाच देत आहोत. या कुसंस्कृतीमध्ये आपल्या मुलांचे काय हित असणार आहे? अशा खेळांमुळे आतापासूनच मुले ताणतणाव,चीडचीडसारख्या आजारांना सामोरे जात आहेत. मग मुलांचे भविष्य काय असणार आहे?

Wednesday, November 1, 2017

सकाळी उठल्यावर काय खाता?

     अलिकडे आरोग्याबाबत काळजी घेतली जाऊ लागली आहे.कारण आरोग्याचे महत्त्व त्यांना पटलेले आहे. अगदी लहान वयातच विविध आजार होऊ लागल्याने फार लवकर लोक याबाबत जागृत झाले आहेत.चाळीस वय झाल्यानंतर हळूहळू एक-एक आजार गाठू लागल्याने माणसे घाबरून गेली आहेत. आपले शरीर तंदुरुस्त राहावे,यासाठी व्यायाम,योग असे प्रकार होऊ लागले आहेत. तरुण-तरुणी सिक्स पॅकच्या प्रेमात पडून डायट करू लागले आहेत.मात्र तरीही खाण्या-पिण्याबाबत अजूनही मोठ्या संख्येने लोक सतर्क असल्याचे दिसून येत  नाही. उपाशी राहिले म्हणजे झाले वजन कमी, असे होत नाही. याबाबत आपल्या शरीराची व्यवस्था कशी आहे, आपल्या शरीराला कशाकशाची आवश्यकता आहे, आपल्या अन्नात कोणकोणते घटक असायला हवेत, सकाळी उठल्यावर पहिल्यांदा काय घ्यायला हवं, अशाच बर्‍याच गोष्टी आहेत,त्या अगदी बारीकपणे समजून घ्यायला हव्यात. यासाठी आपल्याच शरीराचा आपणच अभ्यास करायला हवा आहे,मात्र या स्पर्धेच्या युगात आपल्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळ नाही. आजारी पडायचे नसेल,तर याबाबत काळजी घ्यायलाच हवी.


रिकाम्यापोटी मोसमी फळ खा
सकाळी अंथरुणातून उठल्यावर आपल्या दिवसाची सुरुवात होते. या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने होते. पण रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेणे आपल्या शरीराला अपायकारक आहे, हे कितीजणांना माहित आहे. रिकाम्यापोटी चहा घेतल्याने पोटात हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडची निर्मिती होते. त्याम्उले अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. यामुळे आतड्यातील लाईनिंगची चीज होऊ शकते.  काहीजण शरीराला आरोग्यवर्धक आहे,म्हणून ग्रीन टी किंवा ग्रीन कॉफी घेतली जाते.यात असलेल्या पॉलीफेनॉल्स फॅट मेटाबॉलिज्म वाढवतात. ग्रीन टी किंवा कॉफी रिकाम्यापोटी पिल्याने अ‍ॅसिडीटी होऊ शकते. मात्र दीर्घकाळ आरोग्य चांगले राहावे,यासाठी काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवेच.
काही तज्ज्ञ सांगतात की, सकाळी उठल्यावर चहा पिण्यापेक्षा एकादे कोणतेही मोसमी फळ खाल्यास शरीराला चांगले असते. फळांमुळे मेटाबॉलिज्म सुधारते. ज्यावेळेला तुम्ही रिकाम्या पोटी फळ खाता, त्यावेळेला पचनक्रिया फळांमध्ये असलेल्या साखरेचा सहजपणे स्वीकार करते. फळांमध्ये असलेल्या फायबर,न्यूट्रिेंटससारखे व्हिटॅमिन सी आणि एंटीऑक्सिडेंटस शरीरात होणार्‍या इंफ्लेमेशनला कमी करतात. फायबरयुक्त फळ डायजेस्टिव ट्रॅकने जुन्या टाकाऊ पदार्थांना बाहेर काढण्यास मदत करते. पण आणखी एक लक्षात घ्या की, सकाळी रिकाम्यापोटी एकादे फळ खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने खर्‍या अर्थाने नाश्ता करायला हरकत नाही.

भिजवलेले बदाम खा
दिवसाची सुरुवात बदामने केल्यास तर फारच चांगले. संशोधनानुसार कोरडे बदाम खाण्याऐवजी रात्री भिजत घातलेले बदाम सकाळी रिकाम्यापोटी खाल्ल्याने त्याचा आरोग्याला चांगला लाभ होतो. भिजवलेले बदाम सहज पचतात.मुलांना किंवा घरातल्या वडील धारी मंडळींना पाण्यात भिजू घातलेले बदाम सकाळी रिकाम्या पोटी खायला दिल्याने चावायला आणि पचायला सोपे जाते.सालीसकट बदामाचे सेवन करायला हवे. बदाममध्ये एंटीऑक्सिडेंटस, मिनरल्स,व्हिटॅमिन्स आणि ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड  मोठ्या प्रमाणात असते. सकाळी सर्वात अगोदर बदाम खाल्ल्याने बुद्धीला तेज येते,कारण यात दोन प्रमुख ब्रेन न्यूट्रिेंटस रिबोफ्लोविन आणि एल-कॅरनिटाइन असतात, जे मेंदूची क्रियाशिलता वाढवतात.

दालचिनी खा
दालचिनीमध्ये एंटीऑक्सिडेंट भरपूर असते. याला वंडर स्पाइसदेखील म्हणतात.दालचिनी पावडर कोमट पाण्यात मिसळून पिल्याने ब्लड शुगर लेवल नियंत्रित राहते. हृदयरोगाचा धोका कमी होतो आणि फ्री रॅडिकल्सने शरीराचे होणारे नुकसान कमी होते.दालचिनीचा एक तुकडा पाण्यात रात्रभर भिजू घालून ठेवा. हेच पाणी सकाळी रिकाम्यापोटी प्या. यात असलेल्या एंटीऑक्सिडेंट्स शरीरातील झीज भरून काढण्यास मदत करते.

लिंबू-पाणी प्या
एका ग्लासात कोमट पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस पिळून ते रिकाम्या पोटी प्या. इम्युनिटी बूस्ट होईल. युरिनरी ट्रॅकद्वारा टाकाऊ पदार्थ सहज बाहेर निघून जातात. लिंबूमध्ये असलेला व्हिटॅमिन सी इम्युनिटी दुरुस्त करतो. फ्री रॅडिकल्सने त्वचेच्या होणार्‍या नुकसानीशी लढण्यास मदत होते. गरम पाणी डायजेस्टिव सिस्टिम दुरुस्त करून पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.तुम्हाला वाटल्यास यात मध घालू शकता. यामुळे लिव्हरची स्वच्छता होते.
अमर उजाला या दैनिकात न्यूट्रिशनिस्ट डॉ. अंशुल जयभरत यांची मुलाखत वाचली होती. त्या म्हणतात, दिवसाची सुरुवात कधीही रिकाम्यापोटी चहा किंवा कॉफी पिऊन करू नका. एक कोणतेही मोसमी फळ खा. पपई, सफरचंद, केळी, चिकूसारखी फळे खा. या सगळ्या फळांमुळे पोट साफ होते. सिट्रस फळ जसे संत्रे खा. टलबू-पाणी प्या. आपले आरोग्य लक्षात ठेवून फळांची निवड करा. चहा-कॉफीच्या सेवनाने अ‍ॅसिडीटीचा त्रास होतो. रात्रीचे जेवण केल्यानंतर तुम्ही सकाळी सात- आठ तासांच्या फास्टिंगमध्ये राहता. अशा वेळी रिकाम्यापोटी कोणतेही काम करू नये. यामुळे ब्लड शुगर लो होणार नाही. शरीर चार्ज राहील.  

भाजपला एकतरफी वाटणारी निवडणूक झाली अवघड

  (हिमाचल प्रदेश: विधानसभा निवडणूक)
       पहाडी इलाका असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये  विधानसभा निवडणुकीचा चांगलाच रंग चढला आहे. सत्तेचे दोन प्रबळ दावेदार असलेले काँग्रेस आणि भाजप यांनी कंबर कसली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी जोरदारपणे झाडल्या जाऊ लागल्या आहेत.इथली जनता सातत्याने आलटून-पालटून सत्ता आणत असल्याचा पूर्वानुभव पाहता इथे भाजपाला संधी मिळण्याची अधिकाधिक संधी आहे, असे म्हटले जात आहे. मात्र अलिकडच्या काही दिवसांत भाजपविरोधातल्या घडामोडी आणि काँग्रेसने घेतलेली आघाडी पाहता ही निवडणूकला वाटते तितकी सोपी राहिलेली नाही. भाजपला फारच कष्ट घ्यावे लागणार आहेत, असेच सध्या तरी दिसत आहे.

     हिमाचल प्रदेशातील नागरिक सातत्याने सत्तारुढ गटाविरोधात आपला कौल देत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे.केंद्रात कोणाचीही सत्ता असली तरी इथे परिवर्तन अटळ असते. गेल्या तीन दशकापासून परिवर्तन घडत आले असून 1985 पासून आलटून-पालटून भाजप-काँग्रेस सत्तेवर आली आहे. त्यामुळे सध्या सत्तेवर असलेल्या काँग्रेसला ही निवडणूक मोठे आव्हान ठरली आहे. 9 नोव्हेंबरला याचा फैसला होणार आहे. मागच्या निवडणुकीचा अंदाज लक्षात घेता वातावरण भाजपच्या बाजूने वाटत आहे. शिवाय काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावर पुरते पानिपत झाले आहे. फक्त थोडा जवळ असलेला पंजाब येथेच तेवढी काँग्रेसची सत्ता आहे.गेल्या तीन वर्षात एक एक करत काँग्रेस आपला जनाधार गमावत आली आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून म्हणजे जीएसटी लागू झाल्यापासून इथले वातावरण मान्सूनप्रमाणेच फिरायला लागले आहे. जनाधार वाचण्यासाठी काँग्रेस प्रयत्नांची पराकाष्ठा करत असून त्यांनी नोटाबंदीमुळे झालेले नुकसान आणि जीएसटीचा व्यापारीआणि उद्योजकांना बसलेला फटका याचा कुशलतेने वापर करून घेण्यास सुरुवात केली आहे.नोटाबंदीचे श्राद्ध घालायसाठी काँग्रेस तयार झाली आहे. तरीही वीरभद्रसिंह सरकारचे कमकुवत प्रदर्शन आणि वरिष्ठ नेत्यांमधील वादविवाद पाहता हा पक्ष भाजपला कितपत घेरेल, याबाबत शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.
     भाजपने मुख्यमंत्री म्हणून वरिष्ठ नेते प्रेमकुमार धुमल यांना पुढे केले आहे. तर काँगेस सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वीरभद्रसिंह यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा खटला चालू आहे.दोन्ही पक्षातील काही बंडखोर उमेदवारदेखील निवडणूक मैदानात उतरले आहेत.68 सदस्य संख्या असलेल्या या विधानसभा निवडणुकीत सुमारे डझनभरपेक्षा अधिक ठिकाणच्या निवडणुकांवर त्यांच्यामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे.उत्तर प्रदेश निवडणुकीत वापरलेली रणनीती आखत भाजपने चार विद्यमान आमदारांचे तिकिट कापले आहे. 21 नव्या लोकांना संधी दिली आहे. त्यातच त्यांनी काही काँग्रेसच्या नेत्यांना आपल्यात सामावून घेतले आहे.यात सगळ्यात मोठे नाव आहे,ते माजी माहिती व प्रसारणमंत्री सुखराम शर्मा यांचा मुलगा अनिल शर्मा यांचे! अनिल शर्मादेखील हिमाचल सरकारमध्ये ग्रामीण विकास मंत्री होते.  माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील विरोधी नेता शांता कुमार यांना विधानसभा क्षेत्र हमीरपूरऐवजी सुजानपूर देऊन पक्षापेक्षा कोणी मोठा नाही, हेही भाजपने दाखवून दिले आहे. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही,त्यांना निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी देऊन त्यांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आली आहे.
     दुसरीकडे कॉम्ग्रेसने घराणेशाहीचे राजकारण करताना काही वरिष्ठ नेत्यांच्या नातेवाईकांवर विश्‍वास टाकला आहे. केवळ वीरभद्रसिंह यांना नेता म्हणून  घोषित केले नाही तर राज्य युवा काँग्रेसचे अध्यक्ष व वीरभद्रसिंह यांचे चिरंजीव यांना सिमला (ग्रामीण) येथून उमेदवारीही दिली आहे. अशाच प्रकारे आरोग्यमंत्री कौलसिंह यांची कन्या चंपा ठाकूर, विधानसभा अध्यक्ष बी.बी. बुटेल यांचे चिरंजीव आशिष बुटेल यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. या घराणेशाहीद्वारा काँग्रेसने तिथे आपल्या पक्षाला एकजुट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आणि राज्य काँग्रेस अध्यक्ष सुखविंदरसिंह हे संधी मिळेल तेव्हा एकमेकांवर तोंडसुख घेत असतात, त्यांच्यातले मतभेद जाहीर असले तरी या निवडणुकीच्यानिमित्ताने त्यांनाही एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.निवडणुका तर आता जाहीर झाल्या असल्या तरी याची तयारी दोन्ही पक्षांकडून गेल्या वर्षभरापासून चाचली होती. मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांनी तर गेल्या दोन वर्षांपासून राज्यभर दौरे करत विविध कार्यक्रम घेत वातावरण निवडणूकमय करण्याचा प्रयत्न चालू ठेवला होता. कुठे कामांचे भूमिपूजन,कुठे विकास योजनांचे उदघाटन, कुठे शाळा- कॉलेजच्या घोषणा असा सपाटा त्यांनी सुरूच ठेवला होता.मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी निर्णयही घेतले आहेत. उदाहरणच द्यायचे झालेव तर शिक्षित बेरोजगार युवकांना भत्ता, बेकायदेशीर आणि अतिक्रमण नियमित करणे आदीचे देता येईल. खरे तर यासाठी जबाबदार भाजपच आहे.कारण मतदारांना आपल्याकडे खेचताना अशा प्रकारची मागणी त्यांनी उचलून धरली होती. मुख्यमंत्र्यांनीही निवडणुकीच्या दवाबाखाली या मागण्या तात्काळ मान्य केल्या. 

   केंद्रातल्या भाजप सरकारनेदेखील गेल्या वर्षभरात राज्यासाठी काही नव्या योजनांच्या घोषणा केल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंडी, सिमला आणि बिलासपूर याठिकाणी सभा घेतल्या आहेत.वीरभद्रसिंह आणि त्यांच्या नातेवाईकांकडून केला गेलेला कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा आणि बिघडलेला कायदा व सुव्यवस्था त्याचबरोबर बेकायदेशीर आर्थिक गुंतवणूक असे मुद्दे आपल्या प्रचारात प्रामुख्याने घेतले आहेत. दूरसंचार घोटाळ्यातील आरोपी सुखराम शर्मा यांच्या चिरंजिवांना पक्षात सामिल करून भाजप भ्रष्टाचार प्रकरणात आपली नैतिकता गमावून बसली आहे.निवडणूक प्रचार टिपेला पोहचला आहे. दोन्ही पक्षांकडून राष्ट्रीय नेते प्रदेशात सभा घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेवटच्या आठवड्यात प्रभावशाली निवडणूक प्रचार काट्याच्या लढतींवर परिणाम करू शकतात, असे मानले जाते. त्यानुसारच निवडणूक  निकालाचे चित्र असणार आहे.