Saturday, February 3, 2018

(बालकथा) दवाने भरलेला तलाव


     होळी काही दिवसांवर येऊन ठेपली होती. तेनालीराम काही दिवसांच्या सुट्टीवर गेला होता. ही संधी साधून दरबारी मंडळींनी राजा कृष्णदेवरायला विनंती केली,"महाराज, या खेपेला होळीचे औचित्य साधून मूर्ख संमेलन घेण्यात यावे. राज्यातल्या सर्वात मोठ्या मूर्खाला 'मूर्खराज' ची उपाधी देऊन गौरव करण्यात यावा."
राजाने त्यांची गोष्ट मान्य केली. मंत्र्याला राजा  म्हणाला ,"जा आणि सर्वात मोठ्या मूर्खाचा शोध घ्या." मंत्री महामूर्खाच्या शोधाला  निघाला. तो मूर्खासारख्या वागणाऱ्या माणसांची नावे रजिस्टरमध्ये नोंद करायचा. शिवाय त्यांना मूर्ख संमेलनाला  येण्याचे आमंत्रण द्यायचा.
एक दिवस रानातून जात असताना मंत्र्याला एक म्हातारा माणूस भेटला .पानांवर पडलेले दव तो आपल्या ओंजळीत घेऊन तलावात टाकत होता.मंत्र्याने विचारल्यावर तो म्हणाला,"दवांनी तलाव भरणार आहे आणि हे पाणी पिकासाठी सिंचणार आहे."
"सापडला,राज्यातला सर्वात महामूर्ख सापडला." मंत्र्याने विचार केला.म्हातारयाने आपले नाव सांगितले,बाळू. मंत्र्याने लगेच त्याचे नाव मूर्खांच्या यादीत सगळ्यात वरती टिपून घेतले. मंत्री जाताना त्याला म्हणाला,"बाळू,मूर्ख संमेलनाला नक्की यायचं बरं का!"
ठरलेल्या दिवशी मूर्ख संमेलनाला सुरुवात झाली.राजा,दरबारी सर्व आले,पण ज्या माणसाला महामूर्खचा किताब द्यायचा होता,तो मात्र कुठे दिसत नव्हता. राजा कृष्णदेवराय मंत्रीजींना म्हणाले,"कुठे गेला तो महामूर्ख?त्याला लवकर शोधून आणा."
मंत्री काळजीत पडला. कुठून शोधून आणू त्याला? त्यांनी त्याचे फक्त नावच लिहून घेतले होते. कुठे राहतो,काय करतो, काहीच पत्ता नव्हता. तेवढ्यात तो म्हातारा तिकडे लांब दृष्टीस पडला. मंत्र्याचा आनंद गगनात मावेना. त्याने लगेच महाराजांना कळवले. म्हणाला,"महाराज, हाच तो महामूर्ख!"
म्हातारा हसून म्हणाला,"महाराज, मंत्रीजीच माझ्यापेक्षा मोठे मूर्ख आहेत.महामूर्ख हा किताब त्यांनाच मिळायला हवा.त्यांनी माझे नाव मूर्खांच्या यादीत सर्वात वरती लिहिले,पण माझा ठावठिकाणा काही विचारलाच नाही.जर मी आलो नसतो,तर त्यांनी मला कुठे शोधलं असतं?"
असे म्हणत त्या म्हातारयाने आपल्या चेहऱ्यावरचा मुखवटा उतरवला.समोर तेणालीरामला पाहून राजाच्या चेहऱ्यावर हसू फुटले. मंत्र्याची अवस्था मोठी पाहण्यासारखी झाली होती.

(बालकथा) देव कुठे आहे?


     फार फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. पश्चिम बंगालमधल्या मागास भागात एक ऋषी राहत होते. ते मोठे धार्मिक होते. त्यांच्याकडे अनेक शिष्य शिक्षण घेत होते.
ते रोज आश्रमाबाहेर एका झाडाखाली बसून आपल्या शिष्यांना उपदेश करत.त्यांचा एक शिष्य मदन त्यांना नेहमी एक प्रश्न विचारायचा,"गुरुजी, देव कुठे आहे?" आणि ऋषी नेहमीचेच उत्तर द्यायचे," तू तुझ्या आजूबाजूला पहा. तू पाहिलं नाहीस का?"
पण मदनला काही कळायचं नाही.
शेवटी एक दिवस मदन म्हणाला,"गुरुजी, आपण  मला नेहमी सांगता की, देवाला तूझ्या आजूबाजूला पाहा.पण मी सगळीकडे पाहत आलो आहे,परंतु आजपर्यंत मला कुठेच देव पाहू शकलो नाही."
ऋषी हसले आणि म्हणाले,"मदन,देव सर्वत्र आहे. तो प्रत्येक वस्तूत, प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. तो तुझ्यात आहे,माझ्यात आहे. तो प्रत्येक प्राण्यात आहे,फुलातदेखील आहे. फक्त तू लक्षपूर्वक पहा,तुला तो नक्की दिसेल."
ऋषींचे बोलणे ऐकून त्याला आश्चर्य वाटले,पण त्याने आजूबाजूला लक्षपूर्वक पाहण्याचा निश्चय केला.
त्या दिवशी संध्याकाळी मदन घरी निघाला होता. वाटेत तो ऋषींच्या बोलण्यावर  विचार करत होता.
देव माझ्यात आहे,त्यांच्यात आहे. सगळीकडे आहे. हे कसे शक्य आहे?
अचानक त्याच्या मागे कसला तरी गोंधळ ऐकू आला. तो घाबरला. त्याने मागे वळून पाहिले तर त्याला एक पिसाळलेला हत्ती त्याच्या दिशेने धावत येत होता. त्याने मदनला पाहिले आणि त्याच्यावर हल्ला करण्यासाठी पुढे येऊ लागला.
माहूत ओरडत होता,"बाजूला हो,हत्ती पिसाळलेला आहे.बाजूला हो."
देव सगळीकडे आहे.म्हणजे तो हत्तीमध्येही आहे. देव माझ्यातही आहे म्हटल्यावर तो मला दुखापत कसा करेल.त्यामुळे हत्ती मला जखमी करणार नाही." असा विचार करून तो तसाच वाटेत उभा राहिला.
काही क्षणात हत्ती त्याच्याजवळ पोहचला. त्याने मदनला उचलून हवेत भिरकावून दिले. सुदैवाने मदन लाकडाच्या भुशाच्या ढिगाऱ्यावर जाऊन पडला.त्याला थोडेसेच खरचटले.
हत्तीने त्याच्यावर हल्ला का चढवला. त्याला काहीच कळेना. तो मोठ्या गोंधळात पडला.
दुसऱ्यादिवशी सकाळी रोजच्या प्रमाणे मदन ऋषींना भेटायला गेला. त्याने कालचा घडलेला सारा प्रसंग त्यांना सांगितला.पुढे म्हणाला,"गुरुजी, आपण तर मला सांगितले होते की, देव सर्व वस्तूंमध्ये आहे.तो हत्तीमध्येही आहे तर त्याने माझ्यावर हल्ला का चढवला ?"
ऋषी हसले आणि म्हणाले," देव हत्तीमध्ये आहे, हा तुझा विचार योग्य आहे. पण तू विसरलास की, त्या माहुतामध्येही देव आहे आणि तो तुला वाटेतून बाजूला व्हायला सांगत होता."
ते पुढे म्हणाले," तो तुला ओरडून सांगत होता,हत्ती पिसाळलेला आहे. मग तू त्याचे का ऐकले नाहीस?"
मदनला पुढे काय बोलावे कळेना. शेवटी त्याने यातून बोध घेतला. त्याला समजून चुकले की, देव सर्वत्र आहे आणि सर्व काही त्याच्या मर्जीनूसार होते. हत्ती त्याच्यावर हल्ला करू इच्छित होता आणि त्याने तो केला. माहूत त्याला मदत करू इच्छित होता. त्यामुळे त्याने आपल्याला सावध केले. तरीही आपण वाटेत उभे राहिलो. माहुताचे त्याने ऐकले नाही आणि तो जखमी झाला.
त्याला आता समजून चुकले की, कोणतेही काम  विचारपूर्वक करायला हवे

(बालकथा) राक्षसाचे पुण्यकर्म


     दुष्काम निधीला शोधत शोधत दंडकारण्यात पोहचला. एका राक्षसाने त्याला कैद केले. तो भीतीने थरथर कापू लागला.
राक्षस त्याला धीर देत ,समजावत आपली कहानी सांगू लागला."मी कित्येक वर्षांपासून माणूस आणि इतर  जीवजंतू यांना खावून पोट भरत आहे. अत्यंत निकृष्ट असं जीवन जगतो आहे. एक दिवस एक ऋषी मला भेटले.मी त्यांना माझी व्यथा सांगितली व त्यांना मी सविनय विनंती केली की,मला या राक्षस जन्मापासून मुक्ती द्या आणि मला मनुष्य जीवन प्रदान करा.ऋषींनी माझी विनंती मान्य केली आणि आश्वासन दिले की, मी जर पुण्यकाम केले तर ही गोष्ट शक्य आहे. मला माणूस बनायचं आहे."
आपली कहानी सांगितल्यावर राक्षस पुन्हा दुष्कामला म्हणाला,"तुला पाहिल्यावर मला वाटतं आहे की, पुण्यकर्म करण्याची वेळ आली आहे.माझी शक्ती अमोघ आहे.सांग,तुला काय हवंय."
दुष्कामला वाटलं की, आता त्याला नक्की निधी भेटेल.त्याने राक्षसाकडून निधी कुठे आहे , हे जाणून घेण्याची इच्छा प्रकट केली.
"खरं सांग, निधीशी तुझा काय संबंध आहे? जर तू खोटे बोललास तर मला दिसणारी निधी तुला अजिबात दिसणार नाही.भेट तर लांबच राहिली."राक्षस म्हणाला.
दुष्काम म्हणाला,"निधी मला प्राप्त झाली तर मी संपत्ती संपन्न होऊन जाईन.त्या धनसंपत्तीतून शक्तीशाली मल्लयोद्धांना पोसेन.जो कोणी मला विरोध करील, माझी गोष्ट कुणी ऐकणार नाही,त्यांना बदडायला सांगेन. त्यांची त्यांना औकात दाखवेन.ज्या विशालाक्षीवर मी प्रेम करतो,तिच्याशी विवाह करेन."
"एवढ्याशा गोष्टीसाठी धनसंपत्ती कशाला हवी? मल्लयोद्धे कशाला हवेत? ज्या विशालाक्षीशी तू प्रेम करतोस,तिला मी गोड बोलून समजावून सांगेन आणि तुझ्याशी लग्न करायला  तिला तयार करीन." राक्षस म्हणाला.
"परंतु,विशालाक्षी अशा माणसाशी विवाह करायला तयार होणार नाही,ज्याचा आगोदरच विवाह झाला आहे.ती माझी दुसरी पत्नी व्हायला कदापि तयार होणार नाही." दुष्काम म्हणाला.
त्याच्या या उत्तराने राक्षस आश्चर्य व्यक्त करत म्हणाला,"तुझ्या पहिल्या पत्नीचं काय झालं?आता ती कुठे आहे?"
राक्षसाच्या या प्रश्नावर दुष्काम चपापला. तो गोंधळून म्हणाला," ग्रामदेवीच्या यात्रेत तिचा मी बळी दिला आहे.एका मांत्रिकाने सांगितले होते की, असे केल्याने तुझ्या घरावर धनसंपत्तीचा वर्षाव होईल. पण धनाचा वर्षाव काही झाला नाही.ही गोष्ट शिपायांना कळल्यावर ते माझ्या मागे लागले.त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठीदेखील मला धन हवे आहे. विशालाक्षीला मिळवण्यासाठीसुद्धा धन हवे आहे.त्यामुळे मला निधी हवी आहे."
"माणसाला पुनर्जन्म देण्याची शक्ती माझ्यात आहे.तुझ्या पत्नीला मी पुनर्जन्म देईन. तुझ्या सगळ्या समस्या दूर होतील.चालेल ना?" राक्षस म्हणाला.
" माझी पत्नी जिवंत झाली तर मग मी विशालाक्षीशी विवाह कसा करू शकेन?" दुष्काम म्हणाला.
"अरे दुष्टा,तू माणूस नाहीस.माझ्यासारख्या राक्षसापेक्षाही भयंकर आहेस. पापी आणि नीच आहेस. तुला चांगला माणूस बनवण्याचा मी खूप प्रयत्न केला,पण तू मोठा नालायक माणूस निघालास. चांगल्या माणसाला मदत केल्याने पुण्यकर्म होऊ शकते. आज मी पुण्यकाम करू शकत नाही, हे आता स्पष्ट झालं आहे. आता मला पुण्यकर्म करण्यासाठी आणखी एका दिवसाची वाट पाहावी लागणार आहे. आज तुला खाऊन माझी भूक मिटवणार आहे." असे म्हणून राक्षसाने त्याला आपल्या तोंडात टाकले.
दुसऱ्याच क्षणी तिथे ऋषी प्रकट झाले आणि म्हणाले,"दुष्कामसारख्या नीच माणसाला खाऊन तू पुण्यकाम केलं आहेस.अशा प्रकारे अजाणतेपणी तू अनेक पुण्यकर्म केलं आहेस.पण आज तू जे केलंस, ते सर्वात मोठे पुण्यकर्म आहे. आता तुझी राक्षस जन्मापासून मुक्तता झाली आहे.लवकरच तू मानव जन्म घेशील. तथास्तू...!" असे म्हणून ऋषी अदृश्य झाले.

(बालकथा) संकटाचे कारण सायकल


      आनंदवनात एक अस्वल होते. नाव होते मिकू. काही दिवसांवर  त्याच्या मुलाचा-सोनूचा वाढदिवस होता.वाढदिवसाला तो सोणूला काही खास भेटवस्तू देणार होता.
त्याने ठरवले, जवळच्या शहरात जाऊन खास भेटवस्तू आणायची. रात्रीच्यावेळी तो शहरात गेला आणि एका घरासमोर ठेवलेली सायकल उचलून घेऊन आला.
वाटेत त्याने सायकल न्याहळी,म्हणाला,"अरे व्वा! काय मस्त सायकल आहे. सोनू अगदी खूश होऊन जाईल." मिकू अगदी आनंदात सायकल घेऊन वनात आला.
वाढदिवसाला सायकल पाहून सोनू जाम खूष झाला. तो दिवसभर सायकल चालवायचा आणि दुसऱ्या प्राण्यांना  चिढवायचा. जंगलातल्या कोणत्याही प्राण्याने यापूर्वी कधी सायकल पाहिली नव्हती.
एके दिवशी हत्तीकाका मिकूला म्हणाला,"मिकू, ही सायकल माणसांची आहे.तुला याच्यामुळे तुला जखम वगैरे होईल किंवा एकाद्या संकटात सापडशील."
"काका,मला सायकल छानपैकी चालवायला येते. मी कधी पडणार नाही आणि कुठल्या संकटातही सापडणार नाही."मिकू म्हणाला.
मिकूने चांगल्या प्रकारे सायकल शिकून घेतली होती. यासाठी त्याने खूप सराव केला होता. तो सोनूला मागे बसवायचा आणि जंगलातून फेरफटका मारायचा.डबलसीट सायकल चालवण्यातही तो मोठा पारंगत झाला होता.
एके दिवशी जंगलात शिकारी घुसले.त्यांची दृष्टी मिकूवर पडली.
"अरे,तो बघ. सायकल चालवणारा अस्वल!"एक शिकारी म्हणाला.
"सर्कससाठी हा चांगला उपयोगाला येईल.चला, त्याला पकडून  घेऊन जाऊ. सर्कसवाल्याला विकून आपल्याला बक्कळ पैसे मिळतील." दुसरा शिकारी म्हणाला.
शिकाऱ्यांनी मिकू आणि सोनू दोघांनाही पकडले.त्यांच्यासोबत शहरात घेऊन गेले.
आता मिकूला हत्तीकाकाची आठवण झाली.त्याला स्वतःची आणि सोनूची सुटका करून घ्यायची होती. पण हतबल होता. सुटका करून घ्यायला कुठे काही पर्यायच दिसत नव्हता.
मिकू आणि सोनू दुसऱ्यादिवशी सर्कसमध्ये होते.त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले होते. तेवढ्यात तिथे सर्कशीचा मालक आणि त्याचा लहानगा मुलगा आले. सोनूला पाहून म्हणाला,"किती गोंडस पिल्लू आहे.पण बाबा, आपल्याला त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेता येते का?"
मालक विचारात पडले. त्यांना आपल्या मुलाच्या भावना कळल्या. त्यांनी त्याला आणि त्याच्या वडिलांना मुक्त करण्याचा आदेश दिला. आता मिकूला मोठा पश्चाताप होऊ लागला.तो विचार करत होता,'माणसाच्या मुलाने आपली सुटका केली आणि त्याने माणसाच्याच कुणा एका मुलाची सायकल चोरून आणली होती.'
जंगलात आल्यावर त्याच रात्री त्याने ती सायकल शहरात नेली आणि ज्या घरापुढून उचलली होती,त्या घरापुढे नेऊन ठेवली. आणि आनंदात माघारी परतला.

Thursday, February 1, 2018

मुलांना बचतीची सवय लावा


      आजच्या महागाईच्या जमान्यात बचतीला पर्याय नाही. पैसा वाचवण्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे फंडे असतात. आयुष्यात आलेल्या अडचणींमधून आपल्याला बचतीचं महत्त्व कळलेलं असतं. पण, बचतीची ही सवय मुलांनाही लावता येईल का, याचा विचार करायाला हवा आहे. ही सवय त्याच्या भावी आयुष्यासाठी महत्त्वाची आहे. अलिकडे  आई-बाबा दोघेही कमावते असल्याची अनेक उदाहरणे आहेत,त्यामुळे आजच्या मुलांना भरपूर पॉकेटमनी मिळतो. हा सगळा पॉकेटमनी उधळण्यापेक्षा मुलांना त्यातल्या थोड्या पैशांची बचत करण्याची सवय लावा. त्यांना याचा फायदा भविष्यात होईल. असे काही सोपे उपाय आहेत ज्यामुळे मुलांना बचतीची सवय लागू शकेल.

पिगी बँक भेट द्या : आजच्या जमान्यात पिगी बँक हा प्रकार तसा जुना झालाय. पण, मुलांना बचतीची सवय लागावी यासाठी एखादी पिगी बँक भेट द्या. या बचतीतून त्यांना हवी ती वस्तू कशी घेता येईल आणि यातून कसा आनंद मिळेल, हे समजावून सांगा. सुरुवातीला तुम्हीच बचतीचे पैसे द्या. बचतीची गोडी लागली की मुलं स्वत:च पॉकेटमनी वाचवतील.
 तुमचा आदर्श ठेवा : मुलं कायम आपल्या आई-वडिलांचा आदर्श ठेवतात. त्यामुळे तुमच्या कृतीतून त्यांना बचतीचे धडे द्या. तुम्हीही बचत करताय हे त्यांना दिसू द्या. आपली बचत कधी आणि कुठे वापरायची याची माहितीही देत राहा.
गोष्टी सांगा : मुलांना गोष्टी खूप आवडतात. त्यामुळे त्यांना बचतीचे धडे देणार्‍या गोष्टी सांगा. पंचतंत्र किंवा इतर बोधकथांमधून मुलांना बचतीचे महत्त्व कळू शकेल.
बचत खातं उघडा : कळत्या वयातल्या मुलांचं बचत खातं उघडता येईल. खातं उघडल्यावर मुलांना बँकेत घेऊन जा. त्यांनाच पैसे भरायला सांगा. पासबुक, चेकबुक याची माहती द्या. मुलांना हे फारच आवडेल. त्यांना बँकेच्या कामकाजाचीही माहिती होईल.
मुलांचं कौतुक करा : केलेल्या बचतीबद्दल मुलांचं कौतुक करा. त्यांना छानशी भेटही देता येईल. यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळेल. बचतीची रक्कम महत्त्वाची नाही तर मुलांना बचतीची सवय लागणं जास्त महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा.


रक्ताची गरज भागवणारी 'खून' संस्था


     रक्तदान हेच जीवनदान' हे वाक्य आपण अनेकदा वाचलंय. पण गैरसमजांमुळे आपण रक्तदान करायला धजावत नाही. आजवरच्या आयुष्यात आपण कितीदा रक्तदान केलंय, हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर नकारात्मकच असेल. भारत हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला जगातला दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. पण देशभरात तीन दशलक्ष रक्ताच्या बाटल्यांची कमतरता असल्याची आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेने जारी केली होती. भारतीयांच्या दृष्टीने ही लाजीरवाणी बाब म्हणता येईल. भारतात दर वर्षी १२ दशलक्ष रक्ताच्या बाटल्यांची गरज असते. ही गरजही आपण पूर्ण करू शकत नाही. रक्तदानाबाबतच्या उदासीनतेची अनेक कारणं आहेत. जागरूकतेचा अभाव, गैरसमज, चुकीची माहिती, सुविधांची वानवा अशी काही कारणं यामागे आहेत. आता ही परिस्थिती बदलता येईल का? रक्तदान करण्याची इच्छा असणार्‍या अनेकांना याची नेमकी प्रक्रिया माहित नसते. अशा लोकांना मार्गदर्शन करता येईल का? बंगळूरूची 'खून' ही संस्था हे कार्य करतेय. चेतन एम. या १६ वर्षाच्या तरुणाने ही संस्था स्थापन केलीये. 

     रुग्णालयं, ब्लड बँक यांसारखे रक्त मिळण्याचे सगळे मार्ग बंद झाले की 'खून' मदतीला धावून येते. थोडं रक्त दिलं तरी अशक्तपणा येत नाही. मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना रक्ताच्या कमतरतेमुळे अनेकांचे मृत्यू होतात, ही बाब चेतनला पटत नव्हती. रक्ताची कमतरता दूर करण्याच्या ध्येयाने त्याला पछाडलं. यातूनच 'खून'ची स्थापना झाली. 'मानवी शरीरात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेलं रक्त न मिळाल्याने कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये', हेच या संस्थेचं घोषवाक्य आहे. 
     रक्तदान करण्याची इच्छा असलेल्यांनी 'खून'कडे नावनोंदणी करायची. रक्ताची गरज भासली की त्यांना संपर्क केला जातो. रक्तदान केलं जातं. रुग्णाच्या रक्तगटाचं रक्त मिळविण्यासाठी काही हजार रुपये मोजावे लागतात, ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न 'खून' ही संस्था करतेय. देशातली ५0 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या तरुण आहे. यापैकी एक ते दोन टक्के लोकांनी रक्तदान केलं तरी ही कमतरता दूर होईल. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी खूनकडे नोंदणी करावी, यासाठी आम्ही प्रयत्न करतो, असं चेतन सांगतो. खूनची टीम विविध कॉलेजांना भेटी देते. 'खून'चं कार्यक्षेत्र वाढविण्यासाठी चेतन झटतोय. चेतनकडून स्फूर्ती घेऊन रक्तदानाच्या मोहिमेची सुरुवात झाली तर हे खूनचं मोठं यश असेल.


थुंकणार्‍याला आवर कोण घालणार?


     स्थळ: मार्केट यार्डसमोर,वेळ सकाळी 10.10
एसटी स्टँड आणि मार्केट यार्ड दरम्यान विजापूर रस्त्यावर ट्रॉफिक जाम झालेले. वाहने उभारलेली. एक तरुण गाडीची काच खाली करून रस्त्यावरच थुंकतो. शेजारील दुचाकीवाला त्यास म्हणतो, दिसता सुशिक्षित मात्र, कुठे थुंकावे हे कळत नाही का? निर्विकार चेहर्याने थुंकणारा सॉरी म्हणतो. गाडीची काच वर घेतो, जसे काही घडलेच नाही.
प्रसंग दुसरा

     स्थळ: संभाजी चौक दुपारी 1
दुचाकीवर चौकात तिघे जण तरुण. तोंडात मावा भरलेला. रहदारीच्या चौकात तिघांच्याही पिचकार्या. ते पाहून एक ज्येष्ठ व्यक्ती बोलती झाली,ए पोरांनो, असे रस्त्यावर थुंकता का? त्यावर उत्तर होते, एवढेच वाईट वाटतेय तर शर्ट काढ आणि पुसून घे. अक्कल शिकवू नको.
तिसरा प्रसंग
     स्थळ: एसटी बसथानक दुपारी 3
तंबाखू मळतच चालक एसटी बसमध्ये बसतो. थोडे अंतर गेल्यावर केबिनमध्ये पायापाशीच थुंकतो. ठराविक वेळेनंतर पुन्हा तेच. न राहून गाडीत का थुंकता? असे विचारल्यावर, मग कुठं थुंकायचं, असे उत्तर.
    शहर असो अथवा गाव असे अनेक ठिकाणी थुंकणारे दिसतात.मात्र, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याने जंतुसंसर्ग आणि रोगराई पसरते,याचे भान त्यांना नसते. अशा पोरांवर संस्कारच झालेले नाहीत, अशी बेपर्वाई,मग्रूर तरुण काय देशाचं भलं करणार, असा प्रश्न पडतो. तोंडात मावा नाही तर गुटखा कोंबून जागोजागी थुंकत जाणे, हेच त्यांचे काम. हीच त्यांची देशसेवा. यांना अक्कल शिकवायला जाणेही अवघड. कसाही पाणौतारा करायला तयार. कुचकामी कायदा आणि अंमलबजावणीच्या नावाने शंख, यातूनच थुंकणार्यांचे फावते. कायदे केले असले तरी त्याची अंमलबजावणी करणारेच मावा,गुटखा खाऊन रस्ता खराब करीत असतात. त्यांनाच कोण सांगणार, असा प्रश्. थुंकणार्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाईची तरतूद आहे,मात्र त्यांच्यावर लक्ष ठेवून पकडणार कसे, हाही प्रश्न आहे.
     थुंकणार्यांवर अद्याप कुठेच आणि कुणी कारवाई केलेली नाही. ग्रामपंचायत,पालिका, शाळा-कॉलेज, सार्वजनिक सिनेमा थिएटर,नाट्यगृह, बसस्थानक अशा किती तरी ठिकाणी बिनधास्त थुंकण्याचा कार्यक्रम होत असतो. आणखी एक म्हणजे परिसर स्वच्छ असेल तर थुंकणाराही विचार करील. त्यामुळे स्वच्छता ही सामुहिक जबाबदारी आहे. याचे भान प्रत्येकाने बाळगणे गरजेचे आहे. स्वयंशिस्तीचा अभाव आणि बेपर्वाई यांना आळा घालण्यासाठी कायदा करून भागणार नाही,तर सामाजिक जागृती आणि दबाव गट निर्माण होण्याची गरज आहे, अन्यथा सामाजिक स्वास्थ्यापुढे जटील प्रश्न भविष्यात निर्माण होईल,हे नक्की.
     सार्वजनिक अस्वच्छतेमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याचा परिणाम म्हणजे क्षयरोग,न्यूमोनिया,स्वाईन फ्लू, श्वसनाचे आजार, कर्करोग,पुनरुत्पादन क्षमता कमी होणे,असे आजार जडतात.शिवाय  सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते, ते वेगळेच! ॠार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे,थुंकणे,तंबाखूजन्य उत्पादनांचे उत्पादन,जाहिरात, साठवण, पुरवठा,विक्री करण्यास बंदी आहे.परंतु,याची अंमलबजावणीच होत नाही.
     सरकारी आकड्यानुसार भारतात दरवर्षी क्षयरोगाच्या 19 लाख नवीन केसेस नोंदवल्या जातात. जगात भारतामध्ये क्षयरोगाचे रुग्ण सर्वात जास्त आढळतात.या सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्या मंडळींवर नैतिक दबावगट निर्माण व्हायला हवे आहे. त्याचबरोबरच कडक कायदा करण्याची गरज आहे. शिवाय कायद्याची किंवा कारवाईची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक भान आणि स्वयंशिस्त महत्त्वाची आहे, यांच्यामुळे रस्त्यावर थुंकणार्याला आळा बसण्यास मदत होणार आहे.