Wednesday, June 6, 2018

(बालकथा) ससा पुन्हा हरला

     दिनू कासव त्याच्या काही कामासाठी घराबाहेर पडला. तेवढ्यात गल्लीतल्या दुसर्या बाजूने सोनू ससा त्याच्यासमोर आला. त्याने विचारले, “भावा कासवा, तुझ्या या संथ चालीने निघालास कुठे?”
कासव मोठ्या विश्वासाने पण शांतपणे म्हणाले,”मी माझ्या सावकाश, पण निश्चित चालीने त्या डोंगरावर चाललो आहे. का तुला काही प्रोब्लेम आहे का...?”

ससा म्हणाला,“मीदेखील तिकडेच चाललो आहे,पण बघच! मी तुझ्या खूप आधी जाऊन पोहचेन. हो,पण तिथे तुझी वाट पाहीन हं.”
कासव म्हणाले, “तू तुझी जुनी गोष्ट विसरलास वाटतं...?”
ससा म्हणाला,“ मधे वाटेतच झोपण्याची चूक पुन्हा करणार नाही.”
कासव म्हणाले,“ठीक आहे, मला जाऊ दे.”
सोनू ससा नेहमीप्रमाणे टुणटुण उड्या मारत निघाला. तिकडे कासव आपल्या संथ गतीने चालत राहिले.
या वेळेला सशाने कोणतीच चूक केली नाही. तो वेगाने उड्या मारत निघाला आणि डोंगरावर जाऊन पोहचला.
काही वेळाने कासवदेखील आले. त्याला पाहून ससा टाळ्या वाजवू लागला. ससा म्हणाला,“बघ, मी तुझ्यापेक्षा अगोदर आलो की नाही. मी जिंकलो. आता सांग, तुला घरी कधी परतायचंय?”
कासव म्हणाले,“ मी संध्याकाळी बरोबर चार वाजता निघेन.”
ठीक आहे, मीसुद्धा त्याचवेळेला निघेन. तू बघच! त्यावेळेलादेखील मीच तुझ्या अगोदर घरी पोहचेन आणि दुसर्यांदासुद्धा मीच जिंकेन.” ससा म्हणाला.
कासव म्हणाले,“ मी बघतोय,तुझा अहंकार अजून गेलेला नाही. बघ! तो पुन्हा गळून पडेल.”
ससा म्हणाला,“असं आता कधीच घडणार नाही.”
कासव उत्तर देऊ शकले नाही. तो आपले काम करीत राहिला.
संध्याकाळी चार वाजता कासव डोंगरावरून माघारी परतू लागले. ससा पटकन त्याच्याजवळ आला आणि म्हणाला,“बघ! आता पुन्हा मीच जिंकतो की नाही ते!”
कासव काही बोलले नाही. ते गपचीप आपल्या घराच्या दिशेने निघाले. थोड्या वेळातच ससा कासवाच्या घराजवळ जाऊन पोहचला. काही वेळ गेल्यानंतर कासवदेखील तिथे आले. त्याला पाहून कासव हसू लागले. तो म्हणाला,“ बघ! मीच जिंकलो की नाही!”
आता बोलायची पाळी कासवाची होती. ते म्हणाले,“जरा विचार आणि सांग. खरे कोण जिंकले ते! खरे तर तू पुन्हा हरला आहेस.”
सशाला समजेना.त्याने विचारले,“ कसे काय?”
कासवाने विचारले,“तुझ्या या वेगाचा तुला काय फायदा झाला?”
ससा म्हणाला,“ तिथे डोंगरावर तुझ्याअगोदर पोहचलो आणि इथे तुझ्या आधी आलो आहे. मग यापेक्षा आणखी वेगळी गोष्ट काय असणार आहे?”
कासवाने विचारले,“ याशिवाय तू काही केलंच नाहीस! काही म्हणजे काहीच नाही. मी बघ, मी सावकाश गेलो, पण माझी पाहिजे ती कामे केली. तू विनाकारण गेलास, विनाकारण आलास. तुझ्या वेगाचा काहीच उपयोग झाला नाही. तुला या वेगाने काहीच हाती लागले नाही. तू रिकाम्या हाताने परतलास.मला बघ! मी मला घरी लागणारे साहित्य सोबत आणले आहे. आता तरी मानतोस की नाही, तू हरला आहेस ते!”
सशाची बोलतीच बंद झाली. त्याने शरमेने आपली मान खाली घातली.तो म्हणाला,“ भावा कासवा,तू म्हणतोयस ते बरोबर आहे. काम आणि त्याचा परिणाम आवश्यक आहे. मी धावलो. पण मी झिरोवर आऊट झालो. तू सावकाश गेलास,पण धावा बनवूनच आलास. तुझं बरोबर आहे, मीच हरलो.”

(बालकथा) हा घ्या नजराणा

     विजयनगरमध्ये शेजारील देशाचा एक दूत राजाला भेटायला आला. येताना त्याने राजा कृष्णदेवरायसाठी खूप असा नजराणा आणला.
दूताचा स्वागत-सत्कार झाला. त्याला त्याच्या योग्यतेनुसार राहण्या-खाण्याची सारी व्यवस्था केली गेली. तिसर्यादिवशी तो जायला निघाला. राजा कृष्णदेवरायने शेजारच्या राजासाठी किंमती नजराणा दिला. राजा दूताला म्हणाला,“ आम्ही तुलाही काही देऊ इच्छितो. सोनं,चांदी, रत्नं, काय हवं ते माग.”
दूत म्हणाला,“महाराज, मला काही देऊ इच्छित असाल तर दुसरं काही तरी द्या.”

राजाने विचारल्यावर तो म्हणाला,“ महाराज, मला असा नजराणा द्या, जो माझ्या सुख-दु:खात आयुष्यभर माझ्यासोबत राहील. त्याला माझ्याकडून कोणीही हिरावून घेणार नाही.”
हे ऐकून राजा बुचकाळ्यात पडला. त्याने दरबार्यांकडे पाहिले. सगळ्यांच्या चेहर्यावर चिंता दिसत होती. असा कोणता नजराणा असेल, याचा सगळेच विचार करत होते. कोणी काहीच बोलत नव्हते. असा नजराणा कुणाच्या लक्षातच येत नव्हता.
राजाने तेनालीरामला विचारले,“तू आणू शकतोस का असा नजराणा?”
नक्की महाराज! दुपारी हे ज्यावेळेला प्रस्थान करतील, तेव्हा तो नजराणा त्यांच्यासोबतच असेल.”
ठरल्यावेळी दूत जायला तयार झाला. सगळ्या भेटवस्तू त्याच्या रथात ठेवण्यात आल्या.राजा कृष्णदेवराय दूताला निरोप देऊ लागला, तेव्हा दूत म्हणाला, “ महाराज, मला तो नजराणा तर मिळालाच नाही, जो मला दिला जाणार होता.”
राजा कृष्णदेवरायने तेनालीरामकडे पाहिले आणि म्हणाला,“ तो नजराणा आणला नाहीस का तू?”
तेनालीराम हसून म्हणाला,“ महाराज, तो नजराणा तर त्यांच्यासोबतच आहे. ते त्याला पाहू शकत नाहीत इतकेच! त्यांना म्हणावं, त्यांनी मागे वळून पाहावं.”
दूताने मागे वळून पाहिले, पण त्याला काही दिसले नाही.म्हणाला,“ कुठे आहे, मला तर दिसत नाही?”
तेनालीराम म्हणाला, “जरा लक्षपूर्वक पहा, तुमच्या मागेच आहे. तुमची सावली. तुमच्या सुख-दु:खात ती तुमच्यासोबतच राहणार आहे. हिला तुमच्याकडून कुणीही हिरावून घेणार नाही.”
हे ऐकताच राजा कृष्णदेवरायला पटकन हसू फुटलं. दूतदेखील अगदी मनापासून हसला आणि म्हणाला,“ महाराज, मी तेनालीरामची खूप प्रशंसा ऐकली होती. आज त्याचा प्रत्यय आला.” 

Tuesday, June 5, 2018

हजरजबाबी बिरबल


     बिरबलाचे नाव घेतले की आपल्या नजरेसमोर प्रचंड विश्वासाने सुहास्याने आपल्या काळजाचा ठाव घेणारी व्यक्ती समोर येते.चतुर,हजरजबाबीपणा त्याच्यात ठासून भरलेला आहे. त्याचा वाक्चातुर्यपणात आपण कधीच पराभव पाहिला नाही. त्यामुळे आपल्यापुढे ही व्यक्ती एक आदर्श म्हणून येते. अकबरसोबत येणारे त्याचे नाव एक प्रकारे अख्ख्यायिका बनली आहे. त्याच्या नावावर कोणताही विनोद, चातुर्यकथा आणि हजरजबाबीपणा यांची उदाहरणे खपवली जात आहेत.पण या व्यक्तीची व्यक्तिगत माहिती मात्र फारच थोड्या प्रमाणात आपणाला ठाऊक आहे. फक्त त्याच्या कथा मात्र पुष्कळ ऐकल्या आहेत. वास्तविक बीरबल हे जे नाव त्याला पडले आहे,ते त्याचे खरे नाव नाही.त्याला मिळालेली पदवी आहे.
birabal's mahal.phattepur sikri
     बीरबलचं खरं नाव महेशदास असं सांगितलं जातं. त्याचा जन्म त्रिविक्रमपूर ( सध्याचे तिकवापूर) येथे इ.. 1528 मध्ये झाला. तो जन्माने ब्राम्हण भट होता.त्याच्या वडीलांचे नाव गंगादास तर आईचे नाव अनभादेवी होते. महेशदासचे आजोबा रुपधर. ते संस्कृत पंडित होते. पत्रपुंज येथे ते राहत असत. मोहनदास त्याच्या आई-वडिलांचे तिसरे अपत्य.तो लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. घरातला कर्ता माणूस गेल्याने त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती खालावली होती. त्यामुळे महेशदासचे शिक्षण आजोबांकडे झाले. अवघ्या पाच वर्षांचा असताना त्याच्या शालेय शिक्षणाला सुरुवात झाली. अल्पावधीत त्याने संस्कृत,हिंदी आणि तत्कालीन राजभाषा पार्शियन या भाषा त्याने आत्मसात करून घेतल्या. काव्य आणि संगीत याचेही धडे त्याला मिळाले.या त्याच्या आवडत्या कला होत्या. तो स्वतःच गाणी रचायचा आणि चाली लावायचा.याच्या जोडीला असलेल्या अंगभूत हजरजबाबीपणाआणि चातुर्यपणा या कला प्रसिद्ध झाल्या. किंबहुना या उपजत गुणांमुळे तो इतिहासात अमर पावला.
     त्या  काळातले राजेमहाराजे कलेचे भोक्ते होते. आदर करणारे होते.कवी,लेखक,संगीतकार,चित्रकार,शिल्पकार असे कलाकार आपल्या पदरी ठेवीत आणि त्यांच्याकडून रसग्रहण आणि करमणूक  करून घेत. जयपूरचा राजा भगवानदासपर्यंत  महेशदासची कीर्ती पोहचली. त्याने मानाने महेशदासला बोलावून घेतले. त्याच्या दरबारात तो स्वतः रचलेली काव्ये गाऊन दाखवत असे. तोब्रम्हकवीया नावाने काव्यरचना करत असे.
     यानंतर रेवा संस्थान चा राजा राममचंद्र याच्या पदरीही काही काळ राहिला. येथेही तो आपल्या प्रतिभेमुळे चांगलाच नावारूपाला आला. पुढे त्याची कीर्ती पाहून अकबर बादशाहने त्याला पाचारण केले.इथे मिळालेल्या संधीचे सोने करीत त्याला अकबरचा विश्वास संपादन केला. पुढे तो अकबर बादशहाच्या इतिहास प्रसिद्ध नवरत्नांपैकी एक नवरत्न म्हणून प्रसिद्ध पावला.
     अकबर दरबारात त्याचे ब्रम्हकवीचे बीरबल असे नामकरण झाले. त्याला दोन कारणे आहेत.बिरबलाने आपण फक्त कवी आणि संगीतकार नाही तर युद्धकलेतही निपुण असल्याचे दाखवून दिले होते. पंजाब येथील सुलतान येथील मोहीम त्याने फत्ते करून दाखवली होती. त्यामु़ळे अकबरने त्याला इ.. 1574 ‘ध्ये खूष होऊनवीरवरही पदवी बहाल केली. पुढे याचा अपभ्रंश होऊन बीरबल झाला.
बीरबल अकबराच्या दरबारात सुमारे 30 वर्षे राहिला.हा त्याचा सुवर्णकाळ म्हटला तरी चालेल. .. 1556 च्या सुमारास त्याचा अकबराच्या दरबारात प्रवेश झाला असल्याचे इतिहासकार सांगतात. अगदी सुरुवातीलाच त्याला दोन हजारी मनसबदार करण्यात आले. यावरूनच त्याची नेमणूक खास असल्याचे सिद्ध होते. नवरत्नांपैकी एक अबूल फजल याची नेमणूक फक्त 20 चा मनसबदार म्हणून करण्यात आली होती. पुढे वाढत जाऊन शेवटी 5 हजार झाली होती. बिरबलची बुद्धिमत्ता, चातुर्य आणि विनोदी स्वभाव यामुळे तो अल्पावधीतच दरबारात उच्चपदाला पोहचला. सम्राट अकबराचा तो अत्यंत आवडता आणि विश्वासू मंत्री होता. नंतर तो सहकारी आणि अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार त्याच्यावर अनेक दंतकथा आणि आख्यायिका नंतरच्या काळात रचल्या गेल्या. खरे तर त्याच्या सत्यांशाच्या शोधात कुणी न पडलेलेच बरे! कारण त्याच्या कथांमधून चातुर्य, विनोदाचा मनसोक्त आस्वाद घ्यावा. कथा वाचनाचा आनंद घ्यावा.
     काव्यलेखन,हजरजबाबीपणा, चतुरपणा हे गुण आपल्याला माहित आहे.पण तो तलवारबाजीतही निष्णात होता, हे फारच कमी लोकांना माहीत आहे.  अमीराला आवश्यक असणारे उमदे व्यक्तिमत्त्व,बुद्धिमत्ता यांच्या जोडीला युद्ध-कौशल्य आणि शौर्य या महत्त्वाच्या गोष्टी त्याच्या अंगी होत्या. मनकवडेपणा हा दुर्मिळ गुणदेखील त्याच्यात होता. त्यामुळे अकबर बादशहाच्या मनात कोणत्यावेळी काय असेल, हे तो बरोबर ताडत असे आणि त्यानुसार वागत असे. खासगी वैयक्तिक सल्लागार म्हणूनही त्याच्याकडे बादशहा पाहात असे. अकबर बादशहाची जाती-धर्माबाबतची उदारता हीदेखील बिरबलामुळेच त्याच्यात आली होती.
     इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की, मुलतान आणि गुजरात या दोन्ही ठिकाणच्या मोहिमेवर अकबर बादशहाने आपल्यासोबत बिरबलाला नेले होते.आपली तलवार बिरबल सफाईदारपणे चालवू शकतो,याची ओळख बादशाहाला झाली. त्यामुळे नंतरच्या बंगाल, बिहार आणि ओरिसाच्या मोहिमांवरदेखील बिरबल बादशहासोबत होता.
     अर्थात बिरबलाचा बादशहा अकबरावरचा प्रभाव दरबारातल्या अन्य मुसलमान अमीरांना खुपत होता. त्यात झैनखान हा आघाडीवर होता. दरबारात संधी मिळेल तेव्हा त्याच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न दरबारी मंडळींकडून होत होता. पण यात त्यांना यश मिळत नव्हते. पण शेवटी याच लोकांनी बिरबल मोहिमेवर असताना दगाबाजी करून मारले. अर्थात यावेळी तो शौर्याने लढला,पण शेवटी 16 फेब्रुवारी 1583 रोजी त्याला वीरमरण आले.

डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला पैलवान:कविता देवी


     कविता देवीने डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये पहिल्यांदा सहभाग घेतला. तोही प्रोफेशनल पेहराव न करता सलवार कमीज या आपल्या पारंपारिक पेहरावाततिचा हाच पेहराव भारतीयांना फार भावला. ती सोशल मिडियामध्ये चांगलीच चर्चेत आली.आज ती एक प्रोफेशनल डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये भाग घेतेय. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिला महिला वर्ल्ड चॅम्पियन बनायचं आहे. त्या दिशेने तिची पावले पडत आहेत. मात्र इथंपर्यंतचा तिचा प्रवास संघर्षाचा आणि प्रेरणादायी आहे. एका छोट्याशा अशा  गावातून ती आली आहे,जिथल्या लोकांना मुलींच्या शिक्षणाविषयी फारशी आस्था नाही. मुली शिकल्या की, बिघडतील, अशा समजुतीच्या गावातून फक्त घरच्या लोकांची साथ मिळाल्याने तिने मोठी भरारी घेतली.

     हरियाणातल्या जींद जिल्ह्यातील माल्वी हे छोटेसे तिचे गाव. मुलीने फक्त चूल आणि मूल सांभाळावे, अशा विचाराच्या गावात मुलींना फक्त पत्र लिहिता-वाचता आले पाहिजे, एवढेच शिक्षण दिले जात होते. गावातल्या शाळेत मुलींची संख्या मुलांपेक्षा फारच तोकडी होती. अशा परिस्थितीत तिच्या घरच्याने तिला प्रोत्साहन दिले. तिचा संदीप नावाचा भाऊ तिच्या पाठीशी अगदी श्रीकृष्णासारखा उभा राहिला. 10 वी उत्तीर्ण झाल्यावर तिच्या बहुतांश मैत्रिणींनी शाळा सोडली. पण तिने गावातल्या शाळेत 12 वीपर्यंतचे शिक्षण घेतले. मग बी..! या दरम्यान तिला वेटलिफ्टिंगमध्ये रुची वाटू लागली. वडील आणि भावाला तिच्या खेळण्याने काही अडचण नव्हती.पण गाववाल्यांना हे मान्य नव्हते.तिच्यामुळे गावातील मुली बिघडतील, असे त्यांना वाटत होते. तिला खेळापासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारे आटापिटा चालवला. तिच्या वडिलांवर सतत दबाव टाकला जात होता. तिचे लग्न करून द्यावे,यासाठीही गाव हट्ट करून बसले होते. परंतु, तिच्या वडिलांनी त्याकडे कानाडोळा केला.
     तिच्या घरच्यांनी तिला वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण देण्याचा निश्चय केला. तिने प्रोफेशनल खेळाडू बनावे, असे त्यांचे मत पडले. 2002 मध्ये कविताचे फरिदाबाद येथील अॅकेडमीत ट्रेनिंग सुरू झाले. नंतर पुढच्या ट्रेनिंगसाठी लखनौला गेली. तिने आपल्या खेळ करिअरची सुरुवात पावरलिफ्टिंगने केली. मोठी मेहनत आणि शिस्तबद्ध जीवनशैली याचा परिणाम समोर होता. 2007 मध्ये ती नॅशनल चॅम्पियन बनली. 2016 मध्ये तिला साऊथ एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल मिळाले. खेळाच्या कोट्यातून तिला सीमा सुरक्ष दलात कॉन्स्टेबलची नोकरी मिळाली. पुढे बढतीतून ती सब इंस्पेक्टर बनली. खेळामुळे तिला नेहमी बाहेर जावे लागायचे. त्यामुळे तिला नोकरीवर जाणं कठीण होऊन बसलं.  शेवटी 2010 मध्ये तिने नोकरीला रामराम ठोकला.
     त्या दिवसांमध्ये पूर्ण देशभर दिलीपसिंह राणा ऊर्फ द ग्रेट खली डब्ल्यूडब्लूईमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनल्याने त्याची खूपच चर्चा होती.कविता त्याचे शो टीव्हीवर पाहायची. डब्ल्यूडब्ल्यूईविषयीचे आकर्षण वाढत होते. तो खेळ आवडू लागल्याने ती द ग्रेट खलीची फॅन बनली. तिलाही डब्ल्यूडब्ल्यूई खेळ खुणावू लागला. तिने खलीशी संपर्क साधला आणि त्याच्या अॅकेडमीत ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली. तिथे तिला काही विदेशी ट्रेनरच्या देखरेखीखाली शिकायची संधी मिळाली. ॅकेडमीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये तिची कामगिरी शानदार राहिली. तिने डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिला लोकांनी मुर्खात काढलं. पण तिच्या घरच्यांनी मात्र तिच्या या योग्य निर्णयाला साथ दिली.
     कविता डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला पैलवान आहे.अलिकडेच डब्ल्यूडब्ल्यूईच्यावतीने फक्त महिला पैलवानांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कविता ज्यावेळेला पहिल्यांदा न्यूझिलंडच्या महिला पैलवानाविरोधात मैदानात उतरली,त्यावेळेला सगळे तिला पाहातच राहिले. कारण ते तिला पूर्णपणे भारतीय पोशाखात म्हणजे सलवार कमीजमध्ये  पाहात होते. वास्तविक, डब्ल्यूडब्ल्यूईचे सामने त्याच्या बोल्ड पश्चिमी पेहराव्यामुळे लोकप्रिय आहेत. पण कविताने या पश्चिमी पेहराव्याऐवजी आपला देशी पारंपारिक पेहराव करण्याचा निर्णय घेतला. या रोमांचित करणार्या सामन्यात तिने मोठ्या शानदार ढंगात तिच्या प्रतिस्पर्धीवर मात केली. अर्थात तिला थोडक्यात पराभव स्वीकारावा लागला असला तरी तिने भारतीयांची मने जिंकली होती. सगळीकडे तिच्या पेहराव्याचीच चर्चा होऊ लागली. या खेळाला लोक शो-मॅनशिप म्हणतात. या खेळाच्या तंत्रज्ञानाचे बारकावे तिला माहीत आहेत. ती बाकी रेसलरप्रमाणे ग्लॅमरस नाही.पण सलवार-कमीज ही एक आपली स्टाइल आहे. यात लाजण्यासारखे काय आहे, असा सवाल कविता करते. उलट यामुळे मी फारच आनंदी आहे. कविताचे पुढचे ध्येय डब्ल्यूडब्ल्यूई महिला वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचे आहे. सध्या ती यासाठी मोठी मेहनत घेत आहे.
     कविताने व्हॉलिबॉल खेळाडू गौरव तोमरशी विवाह केला आहे. आता तिला पाच वर्षांचा मुलगा आहे. पण लग्नानंतरदेखील तिच्या दिनचर्येत काडीमात्र फरक पडलेला नाही. ती आजदेखील भल्या पहाटे उठते. धावते. व्यायाम करते आणि कित्येक तास सराव करते. लग्नानंतर तिच्या पतीने तिला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. तिचे म्हणणे असे की, प्रत्येक मुलीला तिच्या लग्नानंतरदेखील आपले करिअर करायला आणि बढतीतून पुढे जायला स्वातंत्र्य असायला हवे.

... आणि मोहीम फत्ते झाली


     माझे नाव रितु कारीधाल.उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये मी लहानाची मोठी झाले.मला लहानपणापासूनच चंद्र-तार्यांविषयी कुतूहल होते. शालेय दिवसांत रात्री घराच्या छतावर जाऊन कित्येक तास तार्यांचे निरीक्षण करीत असे. खूप सारे प्रश्न डोक्यात उठायचे. घरच्यांकडून याची उत्तरे मिळायची नाहीत,मग पुस्तकांमध्ये त्यांचा शोध घ्यायची. पण लवकरच एक गोष्ट कळली की, चंद्र,तारे या रहस्यमय जगाची माहिती जाणून घ्यायची असेल तर यासाठी अंतराळ विज्ञानाचा अभ्यास करावा लागेल.

     बाबा सुरक्षा सेवेत होते. चार भाऊ-बहीण असलेल्या आमच्या कुटुंबात मुलींच्या शिक्षणासाठी पूर्ण मोकळीक होती. आमच्या मध्यमवर्गीय कुटुंबात वायफट खर्चाला थारा नव्हता. आम्ही दोघे भाऊ आणि दोघी बहीणी होतो. आम्हाला नावाजलेल्या शाळेत घातलं होतं,पण ट्युशन किंवा कोचिंगची सुविधा कधी मिळाली नाही. शाळेनंतर आम्ही घरीच स्वत: अभ्यास केला. मी दहावी पास झाल्यावर अंतराळ विज्ञान शिकायचं ठरवून टाकलं होतं. बारावीत चांगले गुण मिळवण्यासाठी रात्रीचा दिवस केला. आईने आम्हा दोघी बहिणींवर घरकामासाठी कधी जबरदस्ती केली नाही. त्यांचे एकच स्वप्न होते की, त्यांनी शिकून-सवरून स्वत:च्या पायावर उभे राहावे. आई दिवसभर घरकामात व्यस्त असायची. मी रात्री उशीरापर्यंत अभ्यास करायची,तोपर्यंत तीही जागी राहायची. ती स्वत: थकली असली तरीदेखील आम्हाला घरातले कुठले काम सांगायची नाही.
     चंद्र-तार्यांविषयी माझ्यामध्ये इतकी उत्कटता निर्माण झाली की, मी विज्ञानावरील लेखन वाचण्याचा सपाटाच लावला.  सायन्सशी संबंधीत बातम्या मी अगदी मनापासून आणि बारकाईने वाचत असे. वर्तमानपत्रातील कात्रणे सांभाळून ठेवू लागली. नंतर कॉलेजमध्ये शिक्षकांशी त्याबाबत चर्चा करायची. पदवीबरोबरच गेट परीक्षेची तयारी करू लागले. गेट उत्तीर्ण झाल्यावर इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स येथून एयरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्सची डिग्री मिळवली. यानंतर इस्त्रोकडून बोलावणे आले. ही 1977 ची गोष्ट आहे. इस्त्रोमध्ये काम करण्याची संधी मिळणे म्हणजे फार मोठी गोष्ट होती. माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. ध्येयाच्या दिशेने माझे पहिले पाऊल पडत होते. मला इस्त्रोच्या बेंगळुरू सेंटरमध्ये प्रशिक्षण घ्यावं लागणार होतं. लखनौपासून जवळपास दोन हजार किलोमीटरचा प्रवास होता. मी दोन दिवसाच्या प्रवासानंतर बेंगळुरूला पोहचले. आईला काळजी वाटत होती, मुलगी इतक्या दूर एकटी कशी राहील,पण तरीही मनावर दगड ठेवून आईने मला अगदी आनंदाने जायला परवानगी दिली.
     इस्त्रोमध्ये आल्यावर खरोखरच तार्यांच्या दुनियेत आल्यासारखे वाटले. खरे तर त्या दिवसांमध्ये फारच कमी महिला शास्त्रज्ञ होत्या. मला काही महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळाली. मंगळयानची जबाबदारी अचानक मिळाली. नुकताच आमचा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट पूर्ण झाला होता आणि मला सांगण्यात आले की, तुला मंगळयानावर काम करावं लागणार आहे. तो क्षण खरंच रोमांचित होता. फक्त अठरा महिन्यात प्रोजेक्ट पूर्ण करायचा होता. अमेरिका,रशिया,जपान आणि चीन या सर्व प्रगत देशांनी प्रयत्न केला होता. यातल्या कुठल्याही देशाची मोहीम पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाली नव्हती. इस्त्रोला पहिल्या टप्प्यातच यश मिळवायचं होतं. हे एक मोठं आव्हान होतं.
जबाबदारी मिळताच मी माझ्या टीमसोबत मंगळ मोहीम पूर्ण करण्याच्या कामाला लागले. सुरुवातीचे दहा महिने फारच व्यस्त गेले.      सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रयोगशाळेतच व्यस्त राहायची. संध्याकाळी घरी आल्यावर मुलांचे जेवण, त्यांचा अभ्यास वगैरे तपासल्यानंतर पुन्हा रात्री बारा वाजता ऑफिसात जायची. पहाटे चार वाजेपर्यंत टीमसोबत काम करून घरी परतायची. सकाळची सर्व कामे उरकून मुलांना शाळेत पाठवल्यावर पुन्हा ऑफिसात जायची. मोहिमेदरम्यान प्रत्येक क्षण आमच्यासाठी लाखमोलाचा होता. आम्हाला बारीक-सारीक गोष्टींवर काम करावं लागायचं. या मोहिमेशी शेकडो शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर जोडले गेले होते. आम्हाला रात्रीचा दिवस करून मोहीम पूर्ण करायची होती.
     कित्येकदा मुले तक्रार करायची. तू उशीरा का येतेस? तू रविवार असूनही ऑफिसात का जातेस? मुलांना समजून सांगणं, कठीण होतं. पण माझ्या पतीने मला पूर्ण साथ दिली. त्यावेळेला माझी मुलगी पाच वर्षांची होती आणि मुलगा दहा वर्षांचा होता. त्यांना माझी उणीव जाणवायची, माझ्या पतीने ही बाजू सांभाळून घेतली.
     दहा महिन्यात मोहीम प्रक्रियेतून महत्त्वाचे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले. शेवटी तो ऐतिहासिक क्षण जवळ आला, त्याची सर्वांनाच अनावर प्रतीक्षा होती. 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळ मोहीम यशस्वी झाली. ही जगातली पहिली मोहीम होती, जी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाली होती. आमच्या सर्वांच्या नजरा कॉम्प्युटरवर खिळल्या होत्या. सर्व काही नियोजनानुसार व्यवस्थित चालले होते. आमच्या सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. आणि मोहीम यशस्वी झाल्याचे संकेत मिळताच, आम्ही अत्यानंदाने जल्लोष केला. ही जगातील सर्वात स्वस्त मंगळ मोहीम ठरली. विशेष म्हणजे या मोहिमेत माझ्यासोबत आणखी काही महिला शास्त्रज्ञांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. यानंतर लोक मला रॉकेट वुमेन म्हणून ओळखू लागले. 2007 मध्ये युवा शास्त्रज्ञ अॅवार्ड देऊन माझा गौरव केला गेला. सध्या मी चंद्रयान-2 या मोहिमेवर काम करीत आहेत. याच वर्षी तो लॉन्च केला जाणार आहे.

Sunday, June 3, 2018

(बालकथा) सूर्यप्रकाश


     एकदा तेनालीराम दरबारात बसला होता. कुठल्या तरी महत्त्वाच्या विषयावर चर्चा चालली होती. इतक्यात अचानक तेनालीरामला डुलकी लागली. त्याला पाहून दरबारातले सगळेच हसू लागले. मंत्री म्हणाले,"महाराज, तेनालीराम आता म्हातारा झाला आहे. आता याला सुट्टी द्यायला हवी."

हे ऐकून राजा कृष्णदेवराय  खरोखरच गंभीर झाला.दुसऱ्या दिवशी राजा म्हणाला,"खूप दिवसांपासून  माझ्या मनात एक सवाल घोळतोय. मला जाणून घ्यायचे आहे की, या जगात सर्वात प्रकाशमान वस्तू कोणती आहे? जर तुम्ही मला समर्पक उत्तर दिलात तर तेनालीरामला उद्यापासून नक्कीच सुट्टी दिली जाईल." यावर दरबारी लोकांमध्ये उत्तर देण्यासाठी खरोखर चढाओढ लागली.
मंत्री म्हणाले,"महाराज,जगात चांदीपेक्षा अधिक प्रकाशमान वस्तू दुसरी कोणतीही  नाही." पुरोहितांनी दूध सर्वात प्रकाशमान असल्याचे सांगितले. कुणी जाई तर कुणी जुई फुलं प्रकाशमान असल्याचं सांगितलं. पण राजा कृष्णदेवरायचं काही समाधान झालं नाही. त्याने तेनालीरामला विचारलं तेव्हा तो म्हणाला,"महाराज,याचे उत्तर मी उद्या देईन."
दुसऱ्या दिवशी तेनालीरामने चांदीचे दागिने, थोडे दूध आणि काही जाई,जुईची फुलं मागवली. नंतर एका मोठ्या खोलीत फरशीवर त्याने त्या वस्तू मांडून  ठेवल्या. खोलीची सर्व दारे-खिडक्या बंद करायला सांगितल्या. त्यांचे पडदे लावण्यात आले. मग बाहेर येऊन तेनालीराम म्हणाला,"महाराज, आता यांना सांगा की,त्यांनी आत जाऊन आपापल्या प्रकाशमान वस्तू घेऊन याव्यात."
मंत्री,पुरोहित आणि काही सभासद आत गेले. पण त्यांना आत गेल्यावर काहीच दिसेना. त्यातल्या कुणाचा  तरी पाय दुधाच्या भांड्यावर पडला. दूध सारे फरशीवर सांडले. कुणाचा पाय चांदीच्या दागिन्यांवर पडला तर, तर कुणाचा पाय फुलांवर! ती सारी चिरडून गेली. त्यांना काय करावे कळेना. सगळे गोंधळून गेले. ते एकमेकांना दोष द्यायला लागले. तेवढ्यात तेनालीरामने खोलीची वरची खिडकी उघडायला सांगितली. खिडकी उघडताच खोलीत एकदम प्रकाश पडला. आणि प्रत्येक वस्तू स्पष्ट दिसू लागली.
आता तेनालीराम म्हणाला,"महाराज,माझे उत्तर आता तुम्हाला कळले असेल. जगात सर्वात प्रकाशमान वस्तू ना दूध आहे ना चांदी. आणि ही जाई-जुईची फ़ुलंदेखील प्रकाशमान नाहीत. असे असते तर अंधारात या वस्तू दिसल्या असत्या ना! जगात सर्वात प्रकाशमान वस्तू कोणती असेल तर ती आहे सूर्याचा प्रकाश! यामुळे ही खोलीच नाही तर संपूर्ण पृथ्वी प्रकाशमान होते."
हे ऐकताच राजा कृष्णदेवरायने आनंदाने तेनालीरामला मिठी मारली. तो दरबारी मंडळींना म्हणाला," आता तुम्हाला समजले असेल की आम्हाला तेनालीराम का प्रिय आहे तो!"

आठवीच्या पाठ्यपुस्तकाच्या निमित्ताने...


     राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्यावतीने राज्यातल्या पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम तयार करण्याचे काम केले जाते. यांच्यावतीने जी पाठ्यपुस्तके तयार केली जातात,त्या पाठ्यपुस्तकात आपल्या पाठाला संधी मिळावी,अशी प्रत्येक लेखकाची एक सुप्त इच्छा असते. तशी माझीही होती. गेली पंधरा-वीस वर्षे विविध विषयांवर मी लेखन करीत आहे. बालकथा, कथा यांचेही लेखन सुरूच आहे. महाराष्ट्रातल्या आघाडीच्या दैनिकांबरोबरच स्थानिक वृत्तपत्रे, मार्मिक, केसरी-छावा, मुलांचे मासिक आदी ठिकाणी माझे लेखन प्रसिद्ध होत असतानाच अचानक मला एप्रिल महिन्यात पाठ्यपुस्तक मंडळातून फोन आला. तुमच्या किशोर मे 2017 मधील अंकातील धाडसी कॅप्टन: राधिका मेनन यांच्यावरील शौर्यकथेची निवड नव्याने निर्मिल्या जाणार्या आठवी इयत्तेच्या बालभारती-मराठी पुस्तकासाठी निवड करण्यात आली आहे.

     आपल्या लिखाणाची निवड झाली आहे, हे कळल्यावर इतका आनंद झाला की, पुढे फोनवर माझ्याशी बोलणार्या मॅडम काय बोलताहेत,हे काही काळ कळायचे बंदच झाले! हा आनंद वेगळाच असतो. आपली एक इच्छा पूर्ण झाली,याचा एक आनंद मोठाच असतो. जंगल एक्सप्रेस आणि हसत जगावे ही दोन पुस्तके प्रसिद्ध झाल्यावर आणखी पुस्तके प्रसिद्ध करण्यावर मी आवर घातला. कारण नियमितपणे ब्लॉगलेखन सुरूच आहे. त्यामाध्यमातून आपण वाचकांसमोर जात आहोत. मग कशाला पुस्तकांच्या मागे लागायचं. आणि पुस्तके प्रसिद्ध करण्यापूर्वीची जी प्रक्रिया फारच कंटाळवाणी आहे. ज्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत,त्यांना याची चांगलीच कल्पना आहे. काही काही लेखकांची पुस्तके दहा-दहा वर्षांनी प्रसिद्ध झाल्याचा अनुभव ऐकल्यावर त्याकडे तसे दुर्लक्ष केले. अर्थात बाळंतबाईचे बाळंतपण कसं असतं, तसंच काहीसं लेखकाच्या पुस्तक निर्मितीचं आहे. त्यामुळे शेवटी पुस्तक निर्मितीला जे मोल आहे, ते मी नाकारत नाही.
सन 2011 पासून मी ब्लॉगलेखन करीत आहे. 2014-15 ही वर्षे सोडली तर ब्लॉगवर लेखन चालूच ठेवले आहे. आज या ब्लॉगवर 1200 च्यावर लेख,कथा,कविता वगैरे उपलब्ध आहेत. काही कथांचे अनुवादही केले आहेत. त्यांनाही वेळोवेळी प्रसिद्धी मिळाली आहे. लोकसत्तासाठी शेतशिवार पुरवणीला काही काळ लेखन केले.या लेखांचादेखील यात अंतर्भाव आहे. पण नेहमीचे लेखन करत असताना काही तरी हटके लिहिण्याचा विचार करत होतो. माझ्या मुलाची- अनिकेतची दहावी झाल्यानंतर त्याला पुढे कुठे पाठवायचे,याचा विचार चालू झाला, तेव्हा मी इंटरनेट व पुस्तके यांमध्ये वेगवेगळ्या कोर्सचा शोध घेऊ लागलो. यातून काही गोष्टी पुढे आल्या. एक म्हणजे- मुलांना ज्या विषयांत आवड आहे,ज्याकडे कल आहे, तिकडे त्याला पाठवा. पण त्यातून त्याला आपल्यापासून लांब राहणे जमते का? त्याला कोणत्या गोष्टीत इंटरेस्ट आहे. या गोष्टी जाणून घेताना काही अशा लोकांच्या कथा वाचायला मिळाल्या, ज्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून अक्षरश: आपल्या आयुष्याचे सोने केले. आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळाल्याने मंडळी कामाचा आनंद तर उपभोगलाच पण त्याचबरोबर प्रचंड पैसाही कमवला.
      दुसरं म्हणजे काही वर्षे आपल्याला न आवडणार्या क्षेत्रात काम करून काहींनी त्या क्षेत्राला रामराम ठोकला आणि आपल्या आवडीच्या क्षेत्राचा स्वीकार केला. काहींना आपल्याला कशात इंटरेस्ट आहे हे कळायला काही महत्त्वाची वर्षे गेली.पण ज्यावेळेला कळले,तेव्हा मात्र त्यांनी आश्चर्यकारक प्रगती केली. काहींना समाजसेवा करण्यात रस होता. काहींनी स्वत:च्या कल्पनेतून छोट्या छोट्या नित्योपयोगी वस्तू बनवल्या.त्यातून ते पुढे आले. काहींना खेळात रस होता,मात्र घरातल्यांचा त्याला विरोध होता.मग घरच्यांना लपून छपून खेळाचा सराव केला. मोठ्या टुर्नामेंटमध्ये त्यांची निवड झाल्याचे घरच्यांना कळल्यावरच आपला मुलगा काय करतोय,याची त्यांना कल्पना आली. शेवटी घरच्यांना त्याचा स्वीकार करणे भाग पडले. काहींनी पर्यावरणासाठी स्वत:ला वाहून घेतलेले. यासाठी किती तरी किलोमीटर अंतर चालत जाऊन त्यांनी झाडांना पाणी घातले. जंगले वाचवण्यासाठी काहींनी लाकूडतस्करांशी दोन हात केले. अशा लोकांची अनेक संस्थांनी दखल तर घेतलीच पण शासनानेही त्यांची दखल घेऊन त्यांचा यथोचित गौरव केला,त्यांना प्रोत्साहन दिले. जगायला पैसा हा लागतोच,पण मन शांत असायला हवे असेल तर समाजसेवासुद्धा घडायला हवी. काहींनी धाडसी पावले उचलून जीवनात यश मिळवले. मग मला वाटले, शेवटी सतत प्रयत्न होत असतील आणि आवडीच्या क्षेत्राचा शोध चालला असेल तर त्याला यश हे नक्कीच मिळतं. मग अशा लोकांवरच का लिहू नये, असे वाटू लागले. बर्याच लोकांविषयी मराठीत माहिती उपलब्ध नाही. मग म्हटलं, हे काम आपण करावं. मग तिथून त्याच्या कामाला लागलो. आजवर पन्नास-साठ अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उठवणार्या लोकांविषयी लिहिले आहे. इथून पुढेही लिहित राहणार आहे. नेहमीपेक्षा एक वेगळी वाट चोखाळल्यामुळे मला मराठी आठवीच्या पुस्तकात स्थान मिळाले, हे इथे मी आवर्जून उल्लेख करत आहे. वाचन आणि लेखन कायम ठेवले. त्यात सातत्य ठेवले.त्याचा लाभ मला झाला. अजून खूप लिहायचे आहे,विविध विषय हाताळायचे आहेत.पण काही घाई नाही. हळूहळू त्या इच्छाही पूर्ण होतील, असा मला विश्वास आहे.