Tuesday, August 14, 2018

सरकारी नोकरी,टेन्शन आणि बरंच काही!


     एक शिक्षक माझ्याजवळ त्याच्या शाळेतल्या शिक्षिकेविषयी तक्रार करत होता. जिल्ह्याच्या ठिकाणाहून जवळ असलेल्या एका शाळेतून रँडम राऊंडमध्ये शिक्षिकेची बदली शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या एका दुष्काळी तालुक्यातल्या काहीशा आडमार्गी असलेल्या एका गावातल्या ठिकाणी झाली होती. महिला शिक्षिकेची गैरसोय झालेली. तिची मोठी अडचण झालेली. पण सरकारी नोकरी म्हटली की, ऊन-सावलीचा खेळ हा खेळावाच लागणार. आले देवाजीच्या मना,तिथे कुणाचे काही चालेना, अशी गत कधी कधी सरकारी कर्मचार्‍यांची होते. पण सरकारी नोकरीपेक्षा बेटर अशी नोकरी कुठलीच नाही. शिवाय शेवटी पेन्शन मिळते, उर्वरित आयुष्य फारशा त्रासाशिवाय जाते. त्यामुळे आजही नोकरी भरती सरकार करत नसले तरी या नोकरीची आस लावून बसलेल्यांची संख्या मोठी आहे. इतकेच नव्हे तर सरकारी नोकरीत लवकर संधी लाभावी म्हणून जो तो समाज आता आरक्षणाची मागणी करू लागला आहे. म्हणजे गेल्या दहा वर्षात राज्यात भरतीची प्रक्रिया राबवली गेली नसली तरी अजूनही लोक त्यावरच अडून बसले आहेत. का तर सरकारी नोकरीत कसलीही चिंता न करता काम करता येते.
सांगायचा मुद्दा असा की, सरकारी नोकरी ही सुखासुखीची असते, अशी मानसिकता असते.इथे त्या शाळेत हजर झालेली महिला शिक्षक अडचणीत आहे,म्हटल्यावर तिथल्या शिक्षकांनी त्या शिक्षिकेला काही दिवस सवलत द्यायला सुरुवात केली. घडी बसेपर्यंत चालेल थोडे दिवस, असा काहीसा शिक्षकांनी विचार केला होता. त्यामुळे आठवड्यातून तीन-तीन दिवस शाळेला न येण्याची संधी मिळू लागली. शिवाय लांबून येतेय म्हणून सकाळी तास-दीड तास लेट, आणि संध्याकाळी आणि लवकर सोडणे आले. पण झाले असे की, संबंधित महिला शिक्षक अधिकच फायदा घेऊ लागली. काही तरी निमित्त सांगून शाळेला दांडी,पण परत आल्यावर मागच्या सह्या मारणे, असा हा प्रकार सुरू होता. त्यामुळे हळूहळू संबंधित शाळेतले शिक्षक तिच्या या वागण्याला वैतागले.

     मुख्याध्यापकांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण पालथ्या घड्यावर पाणी! शेवटी त्यांना कडक धोरण अवलंबवावे लागले. याचा परिणाम असा झाला की, सवलत देणारा मुख्याध्यापक अगोदर चांगला होता, आता तो वाईट झाला. सवलत दिली की, चांगला म्हणायचे आणि सवलत नाही दिली की वाईट, असला कुठला न्याय? शिक्षक सवाल करत होता. नोकरी करताना कुणी कुणावर मेहरबानी करत नाही. मला यायला गाडी नाही, गाडी उशीराने आली. सकाळी उठायला जमलं नाही. शनिवारी सकाळी यायचं कधी आणि जायचं कधी? फार वेळ होतो, ही कारणं आहेत का? आपल्या मुलांची काळजी करत असताना आपल्या वर्गातल्या मुलांची फिकीर करायची नाही का? आपली ज्यांच्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे, त्यांचा काहीच विचार करायचा नाही का? आपल्या मुलांची काळजी घ्यायला सरकार पगार देते का?, असा त्या शिक्षकाचा प्रश्‍न होता. शिक्षकांच्या संघटनांचे पदाधिकारीदेखील सांभाळून घ्या, असा धमकीवजा संदेश देतात,तेव्हा शाळा चालवणार्‍या मुख्याध्यापकांनी काय करायचं, असा सवाल उपस्थित होतो.
     एकिकडे कर्तव्य आणि दुसरीकडे माणुसकी या कात्रीत सापडलेल्या मुख्याध्यापकाने प्रशासनाचे ऐकायचे की आणखी कुणाचे? या शिक्षकाला एका संघटनेचा पदाधिकारी म्हणाला म्हणे, तुझं काय जाणार आहे? असं काय मुलं शिकून दिवे लावणार आहेत? शिक्षक आपलेच बांधव आहेत, त्यांना सवलत मिळाली म्हणून काय बिघडणार आहे? जर अशी शिक्षकांचीच मानसिकता असेल तर उद्याची पिढी घडणार कशी? प्राथमिक शिक्षक आणि शिक्षण यांच्याविषयी समाजात जी ओरड सुरू आहे, जी प्रतिमा निर्माण झाली आहे,त्याला शिक्षकच जबाबदार आहे. कर्तव्याकडे दुर्लक्ष करणार्‍याला समाज कधीही क्षमा करू शकत नाही. आधीच शिक्षकांना अशैक्षणिक कामांचे ओझे आहे. अलिकडच्या काही वर्षात शिक्षकांची भरती केली नसल्याने रिक्त जागांचा कोटा वाढत चालला आहे.साहजिकच एकेका शिक्षकाकडे दोन-दोन वर्ग आहेत. अशा परिस्थितीतून प्राथमिक शिक्षणाची वाटचाल सुरू असताना नेमका दोष कोणाला द्यायचा.
     पूर्वी सरकारी अधिकारी असो अथवा कर्मचारी बदली झालेल्या गावी राहायला जायचे. आज दळणवळणाची साधने उपलब्ध झाली असल्याने सरकारीबाबू नोकरीच्या गावात राहायला तयार नाहीत. त्यामुळे कधी-मधी सरकारी नोकरदारांना नोकरीच्या गावी राहण्याची सक्ती करण्याची मागणी होते. पण पळवाटा पुष्कळ असल्याने मार्ग निघत जातात. अशा सगळ्या परिस्थितीत त्या शिक्षकाला काय समजून सांगायचे, असा प्रश्‍न माझ्या मनात निर्माण झाला. मी त्याला एवढंच म्हणालो, सरकारी नोकरीही सुखासुखीची नसते, हे कुणाला समजून सांगायचं? तू मात्र  टेन्शन घेऊ नको. तू गेल्यावर तुझ्या लेकरांकडे कोण बघणार? 

वडिलांचं स्वप्न आणि एक संधी


     आदिल पाचवीत होता,त्यावेळेला त्याच्या बाबा- रईसने त्याला पहिल्यांदा फुटबॉल आणून दिला. आदिलला फुटबॉल खेळण्यात आनंद वाटू लागला. हळूहळू स्टेट टीमच्या कोचने आदिलला स्पोर्टस अकादमीमध्ये समावेश करून घेतला. आदिलची प्रॅक्टीस चुकू नये,याची रईस खास करून काळजी घ्यायचा. आदिलला तयारी करायला जवळपास पाच वर्षे लागली. पण त्याचा कधी टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. कमकुवत खेळाडू म्हणून त्याची सदानकदा राखीव खेळाडूंमध्येच समावेश व्हायचा. दरवेळेला रईस त्याला विचारायचा,पण आदिल काहीच बोलायचा नाही. पण रईसला समजायचं. मुलाचे मनोबल वाढवण्यासाठी तो नेहमी समजावण्याच्या सुरात म्हणायचा, मला खात्री आहे की,एक दिवस तू असा खेळ खेळशील की, संपूर्ण स्टेडियम फॅन होऊन जाईल.

     दुर्दैवाने एक दिवस घरी परतत असताना रईसचा एका अपघातात मृत्यू झाला. कोचने आदिलला एका आठवड्याची सुट्टी दिली. पण आदिल दुसर्‍याच दिवशी स्टेडिअमवर पोहचला. त्या दिवशी दुसर्‍या स्टेटच्या टीमसोबत मैत्रीपूर्ण लढत होती. आदिलचा संघ पराभवाच्या छायेत होता. आदिलने कोचला त्याला खेळवण्याची विनंती केली. कोचला माहित होतं की, त्याच्या संघाचा पराभव होणार आहे. दुसरी टीम दोन गोलने पुढे होती. का कुणास ठाऊक,पण कोचने आदिलला खेळण्यासाठी मैदानात पाठवले. सर्वच खेळाडू आदिलला पाहून चकित झाले,कारण दोन दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. आणि आता तो खेळण्यासाठी मैदानात होता. पाहता पाहता सामन्याचे चित्र पालटले. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे आदिलला मैदानात कुणीच अडवू शकत नव्हते. थोड्याच वेळात टाईम ऑफ झाला आणि आदिलच्या संघाने 3-2 ने विजय मिळवला. संपूर्ण स्टेडिअममध्ये जल्लोष सुरू झाला. टाळ्यांचा कडकडाट होऊ लागला. आदिलला सर्वांनी आपल्या खांद्यावर घेतले.
तात्पर्य: अंगात वेड भरलं असेल,तर तुम्हाला यशापासून कुणीच रोखू शकत नाही.

Monday, August 13, 2018

(बालकथा) जांभळं खा


      तामिळनाडूतल्या एका छोट्याशा गावात एक मुलगी राहत होती. तिचे नाव अव्वैयार. ती लहान असतानाच तिच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला होता. तिला गावातल्याच एका कुटुंबाने दत्तक घेतले होते.
अव्वैयार अगदी लहानपणापासूनच गणेशाची भक्त होती. ती गणेशाच्या पुजेत इतकी दंग होऊन जायची की, तिला आजूबाजूच्या परिसराचा विसर पडायचा. ती कुशाग्र बुद्धीची होती. ज्यावेळी ती वयात आली,त्यावेळेला तिचे वडील तिच्यासाठी वर शोधू लागले. अव्वैयारने लग्न करण्याला नकार दिला. म्हणाली, “ मी कवयित्री बनणार आहे. आणि रंजल्या-गांजल्या लोकांची सेवा करणार आहे. ”
वडील समजावण्याच्या सुरात म्हणाले, “  हे बघ मुली, सर्वच मुलींना एक ना एक दिवस नवर्‍याच्या घरी नांदायला जावे लागते. आणि यासाठी तुलाही आता लग्न करावं लागेल. ”

अव्वैयारचे वडील तिच्या लग्नाच्या तयारीला लागले. इकडे अव्वैयार श्री गणेशाच्या मूर्तीपुढे हात जोडून उभी राहिली. म्हणाली, “  देवा परमेश्‍वरा, माझे बाबा माझी गोष्ट ऐकत नाहीत.तेव्हा तूच काही तरी चमत्कार कर. ”
तेवढ्यात तिने म्हटल्यासारखेच झाले. एक चमत्कार घडला. अव्वैयारचे बघता बघता एका वृद्ध महिलेमध्ये रुपांतर झाले. आता ती वृद्ध आणि कुरूप दिसू लागली. चेहर्‍यावरच्या सुरकुत्या स्पष्ट दिसत होत्या. तिच्या हातात एक काठी आली होती. अव्वैयारचे रूप पाहून तिच्या आई-वडिलांना मोठा धक्काच बसला. अव्वैयार जाऊ लागली, तेव्हा तिचे आई-वडील आणि गाववाले तिला सोडायला गावाच्या वेशीपर्यंत आले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते.
वृद्ध अव्वैयार एका दूरच्या प्रवासाला निघाली. वाटेने जाताना ती सर्वांशीच गोड बोलायची. त्यांच्यावर कविता रचायची. कविता ऐकल्यावर त्यांचे दैन्य दूर व्हायचे. तिची प्रसिद्धी दूर दूरपर्यंत पोहचली. राजा-महाराजा तिला बोलावून आदर-सत्कार करू लागले. भेटवस्तू द्यायचे. त्या भेटवस्तू अव्वैयार गरिबांमध्ये वाटून टाकायची.
एके दिवशी ती एका गावात पोहचली. ती भूक आणि तहानेने व्याकूळ झाली होती. ती चिलंबी नावाच्या एका नृत्यांगनाच्या घराच्या अंगणातल्या कट्ट्यावर बसली. चिलंबी बाहेर आल्यावर तिला वृद्ध महिला दिसली. ती म्हणाली, “  आजी,मी चिलंबी. मला वाटतं,तुम्ही सकाळपासून काही खाल्लं-पिलं नाही. घरात फक्त बाजरीची भाकरी आणि थोडे दही आहे. तुम्हाला हवी तर देऊ का? ”
अव्वैयार म्हणाली, “  तू खूप सरळ स्वभावाची आहेस. तू जे काही देशील,ते आनंदाने खाईन. ”
चिलंबी धावतच आत गेली.ताटात भाकरी आणि दही घेऊन आली. अव्वैयारने ते आनंदाने खाल्ले. मग ती गाऊ लागली. तल्लीन होऊन ऐकणार्‍या चिलंबीचे डोळे मिटलेले होते. गाणे संपल्यावर तिने डोळे उघडले. पाहते तर काय! तिचे रुपच पालटून गेले होते. तिला सुखद धक्काच बसला. तिच्या अंगावरच्या फाटलेल्या साडीच्या जागी चमचमणारी रेशमी साडी होती.तिच्या गळ्यात सोन्याच्या आभूषणांची गर्दी होती. घरंदाज बाईसारखी ती दिसत होती.चिलंबीचा आपल्या डोळ्यांवर विश्‍वासच बसेना. टपकणार्‍या अश्रूसह ती अव्वैयारच्या पायाशी पडली. अव्वैयारने तिला मायेने कुरवाळले. आणि पुढे निघून गेली.
यानंतर अव्वैयार कोरैक्कालला पोहचली. आतापर्यंत तिची कीर्ती  देशोदेशी पोहचली होती. खूप लांबून लोक तिच्या दर्शनाला येत. अव्वैयार त्यांना सुंदर सुंदर कविता ऐकवायची. कविता ऐकून त्यांचे दु:ख,पिडा दूर व्हायच्या. एके दिवशी एक वृद्ध व्यक्ती तिच्याकडे आली आणि म्हणाली, “  माझा मुलगा शहरातून इकडे यायला तयार नाही. आमची विचारपूस करत नाही. अलवान, मोठा श्रीमंत झाला आहे. त्याच्या डो़क्यात पैशांशिवाय काही येतच नाही. ”
काही तरी विचार करून ती तिथून निघाली. दुसर्‍यादिवशी शहरातल्या  अलमानच्या घरी पोहचली. अलमानने तिची कीर्ती ऐकली होती. तो हात जोडून म्हणाला, “  या, आपण तर फार मोठ्या महान कवयित्री आहात. आपले स्वागत आहे. सांगा, आपली काय सेवा करू.तुम्हाला काय उपहार देऊ? ”
अव्वैयार मोठ्या विनम्रपणे म्हणाली, “  तुम्ही जे काही द्याल,त्याचा प्रेमाने स्वीकार करीन. ”
अलवानला अशी अपेक्षा नव्हती. त्याला वाटत होतं,की,अव्वैयार स्वत: या वस्तू घ्यायला नकार देईल. तिचे बोलणे ऐकून तो मधाळ आवाजात म्हणाला, “  बरोबर... बरोबर... तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मी तुम्हाला उपहार देईन. पण तुम्ही काही साध्यासुध्या कवयित्री नाही आहात. त्यामुळे भेटवस्तूदेखील खासच असली पाहिजे. तुम्हाला एक हत्ती उपहार स्वरुपात देईन म्हणतो. चालेल का तुम्हाला? ”
“  आवश्य! ” अव्वैयार म्हणाली.
“ ठीक आहे, तर मग उद्या या आणि तुमची उपहार घेऊन जा. ” आलवान म्हणाला.
दुसर्‍यादिवशी अव्वैयार पुन्हा आलवानच्या घरी गेली. आलवानला ती येईल, अशी अपेक्षा नव्हती. तरीही अव्वैयारला पाहून तो आनंद झाल्याचा आव आणत म्हणाला, “  बरं झालं,तुम्ही आलात. मी आपलाच विचार करत होतो. हत्तीचा सांभाळ करणं तुमच्यासारख्या वृद्ध महिलेला शक्य नाही. त्यामुळे घोडा भेट देणं उचित ठरेल. तुम्ही उद्या या. ”
आता अव्वैयारचा पारा वर चढला. म्हणाली, “  तू फक्त कंजूषच नाहीस तर महामूर्खदेखील आहेस.तू लोकांना त्रास देऊन संपत्ती गोळा केली आहेस. याचे तुला लवकरच शिक्षा मिळेल. ” असे म्हणून अव्वैयार रागाने झपझप पावले टाकत निघून गेली.
आलमानला आपण जिंकल्याचा फार मोठा आनंद झाला. तेवढ्यात त्याच्या पोटात जोर जोरात दुखू लागले. एकदम त्याला अव्वैयारचे बोल आठवले.तो लागलीच धावतच तिला शोधायला घराबाहेर पडला. लवकरच त्याला रस्त्यातल्या गर्दीत अव्वैयार दिसली. त्याने तिच्याजवळ जाऊन तिचे पाय धरले आणि काकुळतीला येऊन म्हणाला, “  अम्मा,मला क्षमा कर. आता मी कुणालाही त्रास देणार नाही. ”
त्याची अवस्था पाहून अव्वैयारला दया आली. तिने हळूच आलवानच्या पोटाला स्पर्श केला. त्याचे दुखणे गायब झाले. आलवान नम्र  स्वरात हात जोडून म्हणाला, “  अम्मा, आतापर्यंत मी ज्या ज्या लोकांना त्रास दिला आहे, त्या त्या सर्व लोकांची सेवा करीन म्हणतो. त्यासाठी मला आशीर्वाद द्या. ”
पुढे तो त्याच्या आईची, लोकांची सेवा करण्यात दंग झाला.
असेच दिवस चालले होते. अव्वैयारच्या कविता,गाणी रचायची, म्हणायची. त्या कविता,ती गाणी  जो कोणी ऐके,त्याचे सर्व दु:ख दूर होई.
एके दिवशी सकाळी सकाळी अव्वैयार जांभळाच्या एका झाडाखाली बसली होती. मनातल्या मनात एक कविता जन्माला येत होती. अचानक तिला झाडावर हसण्या-खिदळण्याचा आवाज ऐकू आला. तिने चमकून वर पाहिले. झाडावर एक छोटासा खेळकर मुलगा बसला होता. तो हसून म्हणाला, “  आजी, जांभळं खाशील का? ”
अव्वैयार हसून म्हणाली, “  हो,बाळा. ”
मुलाने विचारले, “  थंड का गरम? कसली हवीत तुला जांभळं? ”
“  मला ना, थंड जांभळं हवीत. ” अव्वैयार म्हणाली.
मुलाने जोर जोराने झाडाच्या फांद्या हलवल्या. पटापट जांभळं खाली पडली. त्यांना माती लागली. अव्वैयार ती जांभळं तोंडाने फुंकून फुंकून खाऊ लागली.
खेळकर मुलगा खळखळून हसत म्हणाला, “  काय आजी! जांभळं इतकी गरम आहेत का, की तुला फुंकून फुंकून थंड करून खावी लागत आहेत. ”
अव्वैयार विचारात पडली.तेवढ्यात मुलगा म्हणाला, “  मला ओळखत नाहीस का आजी? मी शिवचा मुलगा मुरुगन (कार्तिकेय). मला कविता ऐकवणार नाहीस का? ”
अवैयार तल्लीन होऊन गाऊ लागली. तिच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू ओघळू लागले. कविता संपली, पण मुरुगन कुणास ठाऊक कुठे गायब झाला होता.
पुढे पुढे अव्वैयारचे वय वाढत गेलं. तिला वाटलं, आता आपला शेवट जवळ आला आहे. एक दिवस तिनं ऐकलं की, काही शिवभक्त शिवलोकच्या कैलास पर्वताच्या दिशेने निघाले आहेत. तिलासुद्धा त्यांच्यासोबत जायचं होतं. पण रोजच्या पूजापाठची वेळ झाली होती. त्यामुळे ती गणेशमूर्तीजवळ बसली आणि भरभर पूजापाठ करू लागली.
तितक्यात आवाज आला, “  नाही अव्वैयार, अजिबात घाई करू नकोस.नेहमीसरखं मन लावून पूजापाठ कर. ”
अव्वैयारने हात जोडले आणि म्हणाली, “  क्षमा असावी प्रभू. पण मलाही भक्तांसोबत शिवलोक जायचं होतं. त्यामुळे... ”
“  काही काळजी करू नकोस, अव्वैयार. शांतपणे पूजा कर.ङ्घ  पुन्हा तोच आवाज आला.
अव्वैयार सर्व काही विसरून गणेशाची पूजा करू लागली. तिला वेळेचे काही भानच राहिलं नाही. पूजा संपल्यावर तिनं पाहिलं, तिच्यासमोर साक्षात गणेश उभा होता. त्याने अव्वैयारच्या हाताला धरून तिला सोबत घेतलं आणि कैलास पर्वताच्या दिशेनं निघाला.
भक्तांच्या मांदियाळीपूर्वी ती शिवलोक पोहचली.

Sunday, August 12, 2018

(बालकथा) फुलांची मुलं


     इकेता जपानच्या पर्वत घाटीत राहत होता. त्याला फुलं फार आवडायची. त्याने आपल्या बागेत फुलांची हरतर्‍हेची रोपं लावली होती. त्यातल्या त्यात गुलबकावलीची रोपं अधिक होती. गुलबकावलीची फुलं उमलायची तेव्हा त्याची बाग रंगीबेरंगी फुलांनी फुलून जायची. सुगंधाने बाग दरवळायची.

     एकदा वसंत ऋतुत फुलं उमलण्याअगोदरच इकेता आजारी पडला.त्याला फार वाईट वाटलं की, आता आपल्याला फुलांची देखभाल करता येणार नाही. एके दिवशी आजारी इकेता खिडकीतून बागेतल्या फुलांकडे पाहात होता.तेवढ्यात त्यानं पाहिलं की, खुपशी छोटी छोटी मुलं गुलबकावलीच्या फुलांवर नाच-गाणं करत आहेत. मुलांचा खेळ आणि त्यांचे नृत्य पाहण्यात रममाण झाला. त्यांचा खेळ पाहून त्याला फार आनंद झाला.
     त्याने आवाज देऊन मुलांना आत बोलावलं. सगळी मुलं त्याच्याजवळ आली. ती म्हणाली, “ आम्ही फुलांची मुलं आहोत.तू आजारपणामुळं दु:खी-कष्टी झाला आहेस. तुझे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठीच इथं आलो आहोत.” इकेताने फुलांच्या मुलांना म्हटले, “ तुमचा नाच मला फार आवडला. मला खरंच खेद आहे,मी माझ्या लाडक्या फुलांची काळजी घेऊ शकत नाही. आता यापुढेही पुन्हा त्यांची काळजी घेईन, असे वाटत नाही. माझी तब्येत आणखीच खालावत चालली आहे. ”
     मुले त्याचे बोलणे ऐकून फक्त हसली. ते इकेताला म्हणाले, “ चला, गुडबाय. आता आम्ही उद्याला येऊ. ” आणि बाहेर जाऊन ती गायब झाली.
     दुसर्‍यादिवशी खिडकीकडे डोळे लावून इकेता मुलांच्या येण्याची वाट पाहू लागला. एवढ्यात त्याने पाहिले की, सूर्याच्या किरणांसारखी मुलं फुलांवर नाचत होती. काही वेळ फुलांवर हुंदडल्यावर सगळी मुलं एकत्र खिडकीजवळ जमली.
मुलांनी विचारलं, “ आता कशी आहे तब्येत? कालच्यापेक्षा बरी आहे ना? ”
     इकेताने अशीच होकारार्थी मान हलवली. तेवढ्यात एक मुलगा हवेत उडाला. हवेत तरंगत तो इकेताच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. त्याच्या हातात एक पान होते, त्यावर दवाचे काही थेंब चमकत होते. तो इकेताला म्हणाला, “ मी तुमच्यासाठी फुलांचे दव आणले आहेत. हे पिऊन घे. तुला बरं वाटेल. ”
     मुलाचे मन राखण्यासाठी म्हणून त्याने ते थेंब पिऊन टाकले. सगळे टाळ्या वाजवून म्हणू लागले, “ आता तुम्ही लवकर बरे होणार? ”
इकेताला त्यांच्या या बोलण्यावर विश्‍वास बसला नाही. पण काही वेळातच त्याला बरे वाटू लागले. एका आठवड्यात तो खडखडीत बरा झाला. आता तो पुन्हा आपल्या लाडक्या फुलांची काळजी घेऊ लागला. पण फुलांची मुलं पुन्हा कधी दृष्टीस पडली नाहीत. काळ पुढं चालला. इकेता म्हातारा झाला. त्याने खाट धरली.
     फुलांची मुलं पुन्हा एकदा त्याचे मनोरंजन करायला अवतरली. ते त्याच्या खाटेभोवती फेर धरून नाचू लागली. इकेताने त्यांना दवाचे थेंब आणायला सांगितले. मुलांनी समजावलं, “ या खेपेला आम्ही तुम्हाला सोबत घेऊन जाणार आहोत. आता तुम्ही वृद्ध झाला आहात. तिथे तुम्ही आमच्यासोबत राहायचे,खेळायचे. तुम्हाला कुठलाच त्रास होणार नाही. ”
     वृद्ध इकेताला त्यांच्या बोलण्याचा अर्थ उमजला नाही. काही वेळात त्याचा मृत्यू झाला. फुलांच्या मुलांनी येऊन त्याचा आत्मा ढगांमध्ये नेला. तिथे त्यांनी त्याला खूप आनंदात ठेवले. त्याची काळजी घेत. त्याला एकटे-दुकटे कधी सोडून जात नसत.मुले विसरली नव्हती की, ज्यावेळेला ते फुलं होऊन इकेताच्या बागेत उमलली होती, त्यावेळेला त्याने त्यांची खूप काळजी घेतली होती.

यांचा आदर्श कसा घ्यायचा ?


     आपल्या लोकप्रियतेचा आणि राजकीय व्यक्ती असण्याचा गैरफायदा अनेकजण घेत असतात. कायद्याचे उल्लंघन हा तर त्यांच्या डाव्या हातचा मळ असतो. ज्यांच्या जीवावर त्यांचे कार्यकर्ते जगतात.ती मंडळी ओळखीचा गैरलाभ घेऊन सर्रास वाहतुकीचे नियम मोडतात.पोलिसांनी गाडी अडवली की,चालक आपल्या ओळखीच्या राजकारण्यांना फोन लावतात. आणि दंड न भरता गाडी सोडवून घेतात. कार्यकर्ते जिथे कायद्याचे उल्लंघन करतात,तिथे त्यांचे नेते काय करत असतील? तेही आपल्या राजकीय असण्याचा गैरफायदा घेत असतील तर आजच्या तरुणांनी आदर्श कुणाचा घ्यायचा? आजची पिढी बिघडत चालली आहे,याला कोण जबाबदार आहे? आजच्या सेलिब्रिटींच्या वागण्यामुळे आजची पिढीदेखील तशाच प्रकारे वागताना दिसत आहे. 

     परवा एक यादी प्रसिद्ध झाली आहे,यात मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दंड न भरणार्‍यांच्या  मनसे प्रमुख राज ठाकरे, युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे, महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, अभिनेता सलमान खान यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे आहेत. नो एन्ट्रीमध्ये वाहन नेणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे, सिग्नल तोडणे अशा गुन्ह्यांसाठी राज्यभरात दंड आकारला जातो. मुंबईत हा दंड ट्रॅफिक पोलीस वसूल करत नाहीतर तर नियम मोडणार्‍यांना वाहतूक विभागाकडून ई चलान पाठवण्यात येते. त्या ई चलाननुसार जो दंड असेल तर तो वाहन मालकांना भरावा लागतो. मात्र मुंबईतल्या अनेक दिग्गजांनी दंड भरलेला नाही अशी बातमी समोर आली आहे. जर ही मोठी लोकं किंवा सत्तेत असलेली माणसे कायदा पाळत नसतील तर सर्वसामान्य लोकांकडून तशी का अपेक्षा करायची? आत्तापर्यंत अशा लोकांकडून एकूण 119 कोटींचा दंड वसूल होणे बाकी आहे. हा दंड न भरणार्‍यांची एक यादीच तयार करण्यात आली आहे. या यादीत राज ठाकरे, आदित्य ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता सलमान खान, भाजपाचे नेते राम कदम यांची नावे आहेत. अभिनेता अर्जुन कपूरने ई चलान द्वारे पाठवण्यात आलेला दंड भरला आहे.  ई चलान भरण्यासाठी सक्ती नसल्याने लोक दंड भरत नाहीत असे वाहतूक विभागाने म्हटल्याचेही वाचण्यात आले आहे.
     दंड न भरलेल्या यादीत विनोदवीर कपिल शर्मा, महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर, राम कदम, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, अभिनेता सलमान खान आदींची नावे आहेत. ज्या कारने नियमभंग केला त्या कारचा क्रमांक एम. एच. 02 बी. वाय. 2727 असा असून ती कार सलमानचा भाऊ अरबाझ खान याच्या अरबाझ खान प्रॉडक्शन प्रा. लि. कंपनीच्या मालकीची आहे अशीही माहिती समोर आली आहे.
     युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या एम. एच. 02 सीबी 1234 या वाहनाने नियम मोडले आहेत. डिसेंबर 2016 ते मे 2018 या कालावधीत या कारने सहावेळा नियमभंग केला आहे. आपल्या देशात मूल्यांची जोपासना व त्यांचा अंगीकार कराणारा दुर्लक्षित आहेत,तर कायदा पायाखाली चिरडणारे,मूल्यांची कसलीच चाड नसलेली मंडळी हिरो म्हणून मिरवत आहेत. खरे आदर्श हिरो विजणवासात गेले आहेत. ही बाब आपल्या देशासाठी मोठी चिंताजनक असून देशाची वाटचाल अधोगतीकडे चालली आहे.

Saturday, August 11, 2018

सुविचार संग्रह (भाग 4)


1)   टीका करणे, निंदानालस्ती करणे, तक्रार करणे कोणत्याही मूर्ख माणसाला सहज जमते आणि मूर्ख तेच करतात.-बेंजामिन फ्रँकलिन
2)   तुम्ही  जर यश मिळवणार  असाल तर तुम्हाला यशाच्या त्याच त्याच मळलेल्या वाटेवरून जाण्यापेक्षा नवी वाट शोधावी लागेल.-जॉन डी. राकेफेलर

3)   आशा तुम्हाला कधीच सोडून जात नाही,तुम्हीच तिला सोडता.- जॉर्ज वीनवर्ग
4)   समोरच्याला समजून घेण्यासाठी आणि क्षमा करण्यासाठी आत्मसंयमाची आणि विशेष गुणांची आवश्यकता असते.-बेंजामिन फ्रँकलिन
5)   कठोर मेहनतीशिवाय यशाचा प्रतीक्षा करणे म्हणजे तुम्ही जिथे पीक काढण्याचा प्रयत्न करत आहात,जिथे बियांची पेरणीच केली नाही.-डेव्हिड ब्लाए
6)   आपल्याला मोठेपणा मिळावा यासाठी तीव्र इच्छा मनी बाळगणे,हाच तर मानव आणि प्राणी यांच्यातील सर्वात मोठा फरक आहे.-डेल कार्नेगी
7)   काही वेळेस लोक इतरांची सहानुभूती मिळवण्याच्या आणि लक्ष वेधून घेण्याच्या नादात तारतम्य घालवतात आणि स्वत:चे महत्त्व वाढवण्यासाठी मूर्खासारखे वागतात.-डेल कार्नेगी
8)   क्रोधामुळे ज्ञानाचा प्रकाश विझून जातो आणि तुमच्याजवळ पश्‍चातापाशिवाय काही उरत नाही.- आर.जी. इंगरसोल
9)   घाव घालण्यासाठी लोखंड गरम होण्याची वाट पाहू नका, तर त्याला घाव घा घालून गरम करण्याचा प्रयत्न करा.-विलियम बी. स्प्रेंग
10) तुमच्यावर हल्ला करणार्‍या शत्रूला घाबरू नका. तुमची स्तुती करणार्‍या मित्रांपासून मात्र जपून राहा.-जनरल ओब्रेगॉन
11) कौतुक आणि स्तुती यामधील फरक काय? पहिले प्रामाणिक आहे आणि नंतरचे अप्रामाणिक आहे. कौतुक थेट तुमच्या हृदयातून येते,तर स्तुती म्हणजे निव्वळ तोंडाच्या वाफा दवडणे असते. कौतुक नि:स्वार्थी मनाने केलेले असते,तर स्तुती नेहमी स्वार्थी हेतूनेच केली जाते. कौतुक सर्वत्र वंद्य असते,तर स्तुती सर्वत्र निंद्य असते.
12) जगातील सर्वात मौल्यवान हिर्‍याहूनही ज्ञान अधिक मौल्यवान असते.-महात्मा गांधी
13) शहाणा माणूस संधी शोधण्यापेक्षा त्या स्वत:च निर्माण करतो.-फ्रॉन्सिस बेकन
14) ज्याला थोड्या गोष्टींबाबत सखोल ज्ञान असते त्यालाच तज्ज्ञ म्हणतात.- एन.एम. बटलर
15) एका माणसाच्या विनाशावर दुसर्‍याने आपल्या कीर्तीचा डोलारा उभा करण्याइतकेच पाप नाही.- जॉन प्रे
16) एक वेळ पेहराव जुना असला तरी चालेल,पण पुस्तके नवीन विकत घेऊन ज्ञानवृद्धी करा.- राल्फ इमर्सन
17) शिक्षण म्हणजे समाजोद्धाराचे प्रभावी साधन होय.- कर्मवीर भाऊ पाटील
18) माणसाची कृती त्याच्या विचारांचा आरसा असतो.-जॉन लॉक
19) चांगले काम शेवटास नेण्यासाठी वाईट उपाय योजू नयेत, नाही तर त्या कामाच्या चांगुलपणाचा बट्टा लागतो.-महात्मा फुले
20) वेळ व संधी येण्याची वाट बघण्यापेक्षा आपल्या कर्तबगारीने ती आणा.-लोकमान्य टिळक
21) जेथे कायदा संपुष्टात येतो,तेथे हुकुमशाही सुरू होते.-विल्यम एल्डर
22) कोठेही झालेला अन्याय सार्वजनिक न्यायास धोका निर्माण करणारा असतो.-मार्टिन ल्युथर
23) थोरांच्या मनात थोर ध्येये असतात तर इतरांच्या मनात केवळ इच्छा असते.- वॉशिंग्टन आयर्विन
24) उदात्त वृत्तीचा मनुष्यच व्यक्तींना आकर्षून घेतो.- जर्मन कवी गटे
25) कौशल्य आणि आत्मविश्‍वास हे अजिंक्य सैन्य आहे.-जो हर्बर्ट
26) सुप्त चैतन्य व निद्रिस्त शक्ती जागृत करण्याचे एक साधन म्हणजे शिक्षण होय.- विनोबा भावे
27) ज्ञानाची भूक ही माणसाची मूलभूत भूक असून ती मानवास पशुकोटीतून वर काढते.-दुर्गा भागवत
28) अर्धवट ज्ञानी हा दु:खाचा धनी असतो.- माधवनाथ
29) ज्याच्याजवळ धैर्यरुपी धन नाही त्याच्यासारखा निर्धन कुणीही नाही.-शेक्सपीअर
30) श्रद्धावान,बुद्धिमान, कर्तृत्ववान आणि ऐश्‍वर्यवान माणसाचे कोठेही गेले तरी स्वागतच होते.-गौतम बुद्ध
31) छापील पुस्तके वाचून खरे ज्ञान मिळत नाही तर ते अनुभवातूनच मिळते.-डॉ. राजेंद्रप्रसाद
32) जगानं तुम्हाला भलं म्हणावं असं वाटत असेल तर तुम्ही स्वत:बद्दल भलं बोलू नका.-पास्कल
33) स्वत:च्या अज्ञानाची जाणीव असणे,हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे.-स्वामी शिवानंद
34) विज्ञानाखेरीज आपल्याला भविष्य नाही,मात्र त्याला अध्यात्माचा लगाम हवा.-पं.जवाहरलाल नेहरू
(मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या संग्रहातून)

Friday, August 10, 2018

सांडपाण्याची समस्या आणि उपाय


     आपल्या देशातल्या सर्वच नद्या प्रदूषित झाल्या आहेत. काही नद्यांच्या पाण्याला दुर्गंधी येते,तर काही नद्यांचे पाणी इतके घाणेरेडे आहे की, त्यात आंघोळ करायची तर शिरशिरी येते. या नद्या उगम पावतात,तेथूनच सीवेज (मलप्रवाह) म्हणजेच घाणेरड्या पाण्याचा प्रवाह सोबत घेऊनच वाहत असतात. आपल्या देशातल्या पवित्र म्हटल्या जाणार्‍या गंगा,यमुनासारख्या नद्या असोत किंवा कृष्णा,कावेरी अथवा पंचगंगा असो, या सगळ्या नद्या प्रदूषित झाल्या आहेत. वास्तविक या सर्व नद्या वाटेत येणार्‍या शहरांमधूनच वाहत असतात. त्यात शहरातले सांडपाणी, कारखान्यांचे दुषित पाणी मिसळत जाते. या नद्या पुढे जशा जातात,तशा त्या आणखी अधिक दुषित होत जातात. यामुळे वादविवादही झाले आहेत. राज्या-राज्यांमध्येही तंटे आहेत. कावेरी जलविवादावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय ऐकवल्यावर लागलीच तामिळनाडूने कावेरी नदीचे पाणी कर्नाटक प्रदूषित करून पुढे पाठवत असल्याचा आरोप केला. असाच प्रकार याचवर्षी जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीवर पाणी प्रदूषित करण्याचा आरोप ठेवला. नि:संशय सीवेज नद्यांमध्ये जात आहे,त्यामुळेच हरिद्वारमध्ये गंगेच्या पाणी आचमन किंवा आंघोळ करण्याच्याही लायकीचे राहत नाही. यमुना नदीची अवस्थाही यापेक्षा काही वेगळी नाही. या भारतातल्या पवित्र समजल्या जाणार्‍या नद्या आहेत, त्या त्यांच्या उगमापासूनच प्रदूषित होत आल्या आहेत. परिस्थिती इतकी वाईट आहे की, बद्रीनाथ किंवा केदारनाथमधल्या आश्रमांचे घाणेरडे पाणी नाल्यांद्वारा नदीत सोडले जात आहे.

     सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण जगभरात आणि विशेषत: विकसनशील देशांमधील ऐंशी ते नव्वद टक्के सीवेज  कोणत्याही प्रक्रियेविना नद्यांमध्ये सोडले जात आहे. भारत सरकारनेदेखील मान्य केले आहे की, बासष्ठ टक्के ड्रेनेजचे पाणी थेट स्थानिक जल व्यवस्थेत किंवा नद्यांमध्ये सोडले जात आहे.काही ठिकाणी ही टक्केवारी सत्तर टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. यामुळे पाणी प्रदूषित होऊन प्राणी,मनुष्य यांच्या शरीराला अपायकारक ठरत आहे. तीन वर्षांपूर्वीपर्यंत देशात अशी काही राज्ये होते की, तिथे एकही सीवेज प्रक्रिया संयंत्रांची व्यवस्था केलेली नव्हती. आपल्या देशात 50 ते 80 टक्के पाण्याचे प्रदूषण घरगुती सीवेजमुळे होते. आपल्याकडील जलस्त्रोत असेही आहे की, तिथे आंघोळ करू नये, असा सल्ला दिला जातो. त्यामुळे प्रत्यक्षात पाण्यातल्या जीव-जंतूवर काय परिस्थिती ओढवत असेल, हा प्रश्‍न तर वेगळाच आहे.
     सीवेजमध्ये 99 टक्के जल आणि एक टक्के भाग हा कार्बनिक आणि अकार्बनिक असतो. त्यामुळे काही देश सीवेज पाणी अधिकाधिक प्रदूषणरहित करण्याचे तंत्रज्ञान विकसित करत आहेत. जर्मनी, इस्त्राईल, अमेरिका अशा देशांमध्ये तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. व्यावसायिकदृष्ट्या हे देश हेच तंत्रज्ञान निर्यातदेखील करत आहेत.कृषी आणि औद्योगिक क्षेत्रात असे सीवेज पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचे काम सुरू आहे. इस्त्राईल याबाबतीत आघाडीवर आहे. अनेक देश असे आहेत की, तिथे पाणी संकटाने त्यांचा गळा आवळला आहे. या संकटाशी तोंड देण्यासाठी या सीवेज पाण्याचा प्रक्रिया करून पुनर्वापर केला जात आहे. आफ्रिकेतील नामीबिया हा असा देश आहे, ज्या देशाची राजधानी असलेल्या विंडहॉक शहरात पिण्याच्या पाण्याचेदेखील वांदे होत आहेत. त्यामुळे तिथे सीवेज पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात शुद्ध केले जाते की, ते शुद्ध केलेल्या पाण्यातून शहरवासियांची तहान भागवली जात आहे. 1968 मध्ये ही प्रक्रिया सुरू झाली होती, ती आजतागायत सुरू आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार अशा प्रकारचे आणखी संयंत्रे उभारण्यात आली आहेत. ही प्रक्रिया यंत्रणा पाहण्यासाठी जगभरातले लोक तिथे जात आहेत.
     भारतातल्या शहरी क्षेत्रातून रोज 56 अब्ज लीटर घाणेरडे,मलयुक्त पाणी ड्रेनेजमधून वाहत असते. आज पाण्याचा थेंब न थेंब वाचवण्याचे अभियान चालवले जात आहे, त्याचवेळेला घरांमधून आणि कारखान्यांमधून अब्जावधी लीटर पाणी बेकार बाहेर पडते,तेव्हा ते पाहिल्यावर मनाला वेदना झाल्याशिवाय राहत नाही. शहरीकरणाबरोबरच वाढते सीवेज आणि यांतून होणारे जलप्रदूषण याचे गांभिर्य लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रने सातत्याने स्वच्छ पाणी आणि स्वच्छता या मुद्द्यांना हात घातला आहे. पाण्याच्या पुनर्वापराबाबत आग्रह धरत आहे. कृषी व औद्योगिक क्षेत्रात असे संयंत्र उभारणे गरजेचे आहे. प्रक्रिया करून शुद्ध केलेल्या पाण्याचा वापर शेतीसाठी केला जाऊ शकतो.यासाठी शासन आग्रही असले पाहिजे. नद्यांचे प्रदूषण रोखण्यात आपल्याला यश येत आहे.पण नद्यांमध्ये मिसळण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते किंवा त्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाऊ शकतो. सध्याची वाढती पाणी टंचाई पाहता,याकडे वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारखान्यांना किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना याचे निर्देश देऊन असे प्रकल्प उभारण्याची गरज आहे. तरच नद्या प्रदूषणमुक्त होतील आणि जलजंतू,जनावरे आणि माणूस आपला जीव वाचवू शकतील.