Saturday, August 18, 2018

पतसंस्थांकडील गुंतवणूक कोणत्या आधारे करावी?


     आपल्याकडच्या बँकांमधल्या गैरव्यवहारामुळे लोकांना पैसे कुठे गुंतवायचे आता कळेनासे झाले आहे. मोठी लोकं लाखो,कोटीने बँकांना सहज गंडा घालतात आणि मोकाट फिरतात. पण तिथेच साधा माणूस असेल किंवा शेतकरी असेल तर त्यांच्या मागे लागून मात्र त्याच्या नाकीनऊ आणतात. बँकांच्या या कटकटीतून शेवटी तो आत्महत्याच करतो, दुसरे काही त्याला जमत नाही. दुसरीकडे बँकांना लाखो-कोटींचा गंडा घालणारे बँकांनाच शहाणपणाचे डोस पाजून आपण कसे बरोबर आहोत,हेच सांगत सुटतात. राजकारणी लोकांशी लागेबांधे असल्याने अशा लोकांचे काही एक वाकडे होत नाही. शेतकर्‍याला कोणी वाली असत नाही. शेतकरी आणि सामान्य माणूस यांच्या मुंड्या पिरगाळूनच ही माणसे मोठी झालेली असतात. बँका असोत किंवा पतसंस्था,या सर्वच क्षेत्रात राजकारण्यांचा,ठग्यांचा राजरोस वावर आढळून येतो. यांच्यामुळे अनेक सहकारी संस्था डबघाईला आल्या आहेत. सहकारी साखर कारखाने किंवा अन्य प्रक्रिया उद्योग, सुतगिरण्या अशा अनेक संस्था अशा लोकांनी गिळंकृत केल्या आहेत. सांगली,बुलढाणा अथवा सोलापूर जिल्ह्यातल्या डबघाईला आलेल्या सहकारी संस्था या काही उदाहरणादाखल देता येतील.

      या सगळ्यामुळे लोकांनी गुंतवणूक कोठे करायची, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. लहान लोकांना किंवा शेतकर्‍यांना मोठ्या किंवा राष्ट्रीयकृत बँका त्यांच्या पायरीवरदेखील उभा करून घेत नाहीत. त्यामुळे कित्येकांना सहकारी पतसंस्थांचा आधार घ्यावा लागतो. पण इथेही याहून बिकट अवस्था आहे. राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या पतसंस्थांचे दिवाळे निघाले आहे. तरीही लोकांना यांचा हा आधार लागतोच.  आपल्या राज्यात आजच्या घडीला सुमारे 13 हजाराहून पतसंस्था आहेत. या संस्थांमध्ये सुमारे 70 हजार कोटींच्या ठेवी आहेत. माणसे आपल्या मुला-मुलींची लग्ने करण्यासाठी किंवा दवाखाना खर्चासाठी पैशांची गरज म्हणून गुंतवणूक करतो. पण ऐनवेळी हे पैसे उपलब्ध होत नाहीत. आपल्या गरजेला हे पैसे मिळत नसतील तर या पतसंस्थांची आपल्याला गरजच काय, असा प्रश्‍न निर्माण होतो.
राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अत्यंत तोकड्या व्याजाने ठेवींवर व्याज मिळते. त्याच्यापैकी दोन-ते तीन टक्क्यांपेक्षा अधिक व्याज या पतसंस्थांमध्ये मिळते. त्यामुळे हा लाभ लक्षात घेऊन लोक पतसंस्थेला ठेवीसाठी निवडतात. मात्र इथेही गैरव्यवहारांचा बाजार भरलेलाच आहे. त्यामुळे पतसंस्थांमध्ये पैसे गुंतवताना काही प्रमाणात काळजी ही घ्यावीच लागते. त्याशिवाय आपल्या ठेवींना संरक्षण मिळणार नाही. अलिकडे पतसंस्थांच्या ठेवींनादेखील विमा संरक्षण देण्याचा विचार चालू असल्याचे वाचनात आले आहे.पण तरीही पतसंस्थांमध्ये पैसे गुंतवताना काळजी ही घेतलीच पाहिजे.त्यामुळे लोकांनी पतसंस्थांच्या लेखाजोखांकडे अधिक लक्ष द्यायला हवे. अर्थात यातही गोलमाल करून बँका आणि पतसंस्था चांगली श्रेणी मिळवण्याचा प्रयत्न करतात. यासाठी सलग तीन-चार वर्षांचा लेखाजोगा पाहायला हवा.त्याचा बारकाईने अभ्यास करायला हवा. सध्या सर्वत्र पतसंस्थांचे वार्षिक सर्वसाधारण सभांचे आयोजन केले जात आहे. बँकासुद्धा ग्राहक मिळवण्यासाठी नानातर्‍हेच्या क्लृप्त्या करताना दिसत आहेत. त्यामुळे साधारणपणे सभासद व ठेवीदारांनी ठेवीत तसेच कर्जवाटपात झालेली वाढ याबाबी नक्कीच तपासून पाहायला हव्यात.
     पतसंस्थांचे वार्षिक अहवाल पाहताना थकीत कर्जाचे प्रमाण पाहायला हवे. दहा टक्क्यांपेक्षा अधिक थकीत कर्जाचे प्रमाण असेल तर काळजी करण्याची गोष्ट आहे. 5 टक्क्यांच्या आत असेल तर परिस्थिती उत्तम आहे, असे समजावे. पाच ते दहा टक्क्यांपर्यंत विचार करण्यासारखी गोष्ट आहे, असे समजावे. अनुत्पादित कर्जाचा (एनपीए) आकडाही पाच टक्क्यांपर्यंत असल्यास उत्तम तर पाच ते 15 टक्क्यांपर्यंत ठीक आहे,पण त्यापेक्षा अधिक असेल तर मात्र गंभीर विचार करण्यासारखी परिस्थिती आहे, असे समजावे.
जाणकारांच्या मतानुसार वैधानिक लेखापरीक्षक संस्थेचे लेखापरीक्षण करताना कर्ज प्रकरणांच्या तारण मालमत्तेची गुणवत्ता, संचालकांचे कर्जवाटप आणि वसुलीची धोरणे तसेच त्या धोरणांचे सकारात्मक व नकारात्मक परिणाम यांचे विश्‍लेषण विचारात घेतले जातात. या सगळ्याच गोष्टींच्या नोंदी लेखापरीक्षण अहवालात केलेल्या असतात.त्यामुळे ठेवीदार सभासदांनी या अहवालातील गंभीर दोष लक्षात घेऊन ठेवी ठेवण्याचा विचार करायला हवा.
     आणखी एक महत्त्वाचे म्हणजे लेखापरीक्षणातील गुणांकन हे सीएएमईएल रेटिंग पद्धतीने केले जात असते. यातल्या गुणांकणानुसार 100 ते 75 टक्क्यांपर्यंतच्या गुणांसाठी अ वर्ग दिलेला असतो. 74 ते 61 टक्के यासाठी ब वर्ग आणि 60 ते 51 साठी क वर्गाची तरतूद केलेली असते. विशेषत: बहुतांश पतसंस्थांचे लेखापरीक्षण अ वर्ग असल्याचे आढळून येते. अशावेळेला त्यांचे गुणांकन लक्षात घ्यायला हवे. ज्यांचे कामकाज 90 पेक्षा जस्त असेल, ते परिपूर्ण असल्याचे समजले जाते. याचा विचार केल्यास आपण कोणता वर्ग मिळाला आहे,याचा विचार करण्यापेक्षा पतसंस्थेला 100 पैकी किती गुण मिळाले,याचा विचार करावा. संस्थेकडून या गोष्टी विचारून पुढचे पाऊल टाकायला हवे. खराब कामगिरी असेल तर आपल्याला येथील गुंतवणूक जोखमीची आहे, असाच विचार करायला हवा. आज इतके पोळत आहे की, आता कुठलीही गोष्ट फुंकून पिण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही.सामान्य लोकांनी आपल्या चौकशा करण्याचे प्रमाण कमी नव्हे तर जास्त प्रमाणात करायला हवे. जोपर्यंत आपल्या समस्येचे निराकरण होत नाही, तोपर्यंत कुठल्याही संस्थेतील गुंतवणूकही जोखमीची आहे, या ध्यानात ठेवायला हवे.

Friday, August 17, 2018

सुविचार (भाग 5)


1)   आपण जे पेरतो ते उगवते आणि नशीब आपल्याला आपल्या दुष्कृत्यांचे फळ भोगायला लावते.-एपिक्टेट्स
2)   प्रत्येक माणसाला त्याच्या पापाची शिक्षा भोगावी लागते.जो माणूस कायम हे लक्षात ठेवेल तो कोणावर रागावणार नाही. दुसर्‍याशी नीचपणाने वागणार नाही,दुसर्‍याला शिवीगाळ करणार नाही, तिरस्कार करणार नाही. सतत दुसर्‍याला दोष देत राहणार नाही आणि समोरच्याचा अपमान करणार नाही.-एपिक्टेट्स
3)   जे लोक आपल्याला आवड्त नाहीत,त्यांच्याबद्दल विचार करण्यावर आपण एकही मिनिट घालवणार नाही.-जनरल एल्सिनोवर
4)   रागीट माणूस विषारी असतो.- कन्फ्युसिअस

5)   कृतज्ञता हे खूप चांगल्या लागवडीचे फळ असते. ते सर्वसाधारण सगळ्या लोकांकडून मिळत नाही.-डॉ.जॉन्सन
6)   आज मी अशा लोकांना भेटायला जाणार आहे, जे खूप जास्त बोलतात, जे खूप स्वार्थी आहेत, ज्यांना अहमगंड आहे,जे कृतघ्न आहेत,पण त्यामुळे मला आश्‍चर्य वाटणार नाही किंवा त्यांच्यामुळं मी अस्वस्थसुद्धा होत नाही,कारण अशा लोकांशिवाय जग असणार हे माझ्या कल्पनेतसुद्धा बसत नाही.-बरा. मार्क्स
7)   कृतज्ञता व्यक्त करण्यास विसरण्र, हे लोकांसाठी नैसर्गिक आहे.जर आपण कृतज्ञतेची अपेक्षा करत राहिलो तर आपला कपाळमोक्ष होईल आणि आपल्याला हृदयविकार जडेल.-लेखक डेल कार्नेगी
8)   या जगात प्रेम मिळवण्याचा फक्त एकच मार्ग आहे- तो म्हणजे प्रेम कधीही मागू नका आणि त्याच वेळी निरपेक्ष बुद्धीने दुसर्‍यावर प्रेम करा.
9)   आपल्याला जर आनंद मिळवायचा असेल तर आपण कृतज्ञतेबद्दल विचार करणे थांबवले पाहिजे आणि फक्त आपल्या आंतरिक आनंदासाठी दुसर्‍याला आनंद दिला पाहिजे.-अ‍ॅरिस्टॉटल
10) सापाच्या विषारी दातांपेक्षा कृतघ्न मुले किती अधिक विषारी आहेत.-शेक्सपिअरचा किंग लिअर
11) कृतघ्नता हा नैसर्गिक आहे. ती रानटी तणाप्रमाणे असते. कृतज्ञता ही गुलाबाच्या रोपाप्रमाणे असते. तिची मशागत करावी लागते.पाणी घालावे लागते.त्याची लागवड करावी लागते आणि त्याला जपावे लागते.-डेल कार्नेगी
12) जर तुम्हाला ताजे, शुद्ध पाणी प्यायला असेल आणि जेवणचावेळेस अन्न उपलब्ध असेल तर तुम्हाला कधीही कशाविषयीही तक्रार करण्याचे कारण नाही.- एडी रिकेनबॅकर
13) मी मूर्खासारखा कशाची काळजी करतो आहे?-एक जवान
14) सगळ्यात उत्तम डॉक्टर म्हणजे डॉक्टर डाएट, डॉक्टर क्वाएट आणि डॉक्टर मेरीमन-जोनाथन स्विफ्ट (गलिव्हर्स ट्रॅव्हल्सचा लेखक
15) आपण आपल्याकडे जे आहे त्याचा क्वचितच विचार करतो आणि जे नाही त्याबद्दल झुरत बसतो. हीच खरी आपली शोकांतिका आहे.-डेल कार्नेगी
16) प्रत्येक घटनेकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा धडा हा वर्षाला एक हजार पौंड कमावण्यापेक्षा अधिक मोलाचा असतो.-एक विचार
17) तुमच्या आयुष्यात दोन ध्येये असली पाहिजेत-पहिले म्हणजे तुम्हाला हवे ते मिळवणे आणि दुसरे म्हणजे त्याचा उपभोग घेणे. फक्त शहाणा माणूसच दुसरे ध्येय गाठू शकतो.-लोगन पिअसॉल
18) तुमच्याजवळील चांगल्या गोष्टींचा विचार करा. वाईट गोष्टी विसरून जा.-डेल कार्नेगी
19) आपण इतरांची नक्कल करू नये. स्वत:ला ओळखा आणि स्वत्त्व जपा. डेल कार्नेगी
20) नशिबाने आपल्याला लिंबू दिले तर, त्याच्यापासून सरबत करायला शिका. थोडक्यात संधीचे सोने करा.-एक सुविचार (मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या संग्रहातून)



नशिबाचा खेळ


     नेहमी म्हटलं जातं की, नशिबात असतं ते चुकत नाही. यासारखीच आणखी एक प्रचलित मान्यता आहे,ती म्हणजे मनुष्य आपले भाग्य स्वत: लिहू शकतो. मग प्रश्‍न असा पडतो की, या दोन्ही गोष्टी कशा शक्य असतील. एकिकडे आपण नशिबाचे गुणगान गातो आणि दुसरीकडे मनुष्याच्या कर्मावर विश्‍वास ठेवतो. हे कसं शक्य आहे? ज्यावेळेला मुलगा चांगल्या मार्कांनी पास होत नाही, त्यावेळेला त्याच्या शिक्षकाला, समाज,परिसर,त्याचे मित्र एवढेच नव्हे तर गल्लीतल्या लोकांनादेखील दोष दिला जातो. एकादी व्यक्ती दारूच्या नादाला लागली तर, अमुक्यामुळे आमचे हे प्यायच्या नादाला लागले, नाही तर आमचे हे दारूला स्पर्शदेखील करत नव्हते. दुसर्‍याला दोष देऊन मोकळे. पोरगा बिघडला तर, संगतीला दोष दिला जातो, त्याच्या मित्रांना दोष दिला जातो. अदृश्य गोष्टीला दोष दिला की, त्यांना आपल्या मुलाच्या दोषाचा आणि आपल्या सगळ्या कमकुवतपणापासून सुटका करून घेता येते. दुसर्‍या बाजूला एक मुलगा आहे. त्याच्याजवळ सोयीसुविधा नाहीत. आई-वडील काबाडकष्ट करून त्याला शिकवतात. बाबा दुसर्‍याच्या शेतात राबराब राबतो, आई चार घरची धुणीभांडी करते. अशा मुलाला 90 टक्क्यांपेक्षा अधिक मिळतात,तेव्हा लोक त्याची हेटाळणी करतात. दुसरं काय! नशीब. त्याचं नशीब जोरावर होतं, असे म्हणून मोकळे होतात.

     अर्थात, हा चमत्काराचा प्रयत्न आहे. खरं सांगायचं म्हटलं तर प्रत्येकाच्या अंगी अनेक कला लपलेल्या असतात. नशीब प्रत्येकाला संधी देत असतं. पण संधी हुकली तर त्याचा फायदा त्याला होत नाही. सगळं काही ठीकठाक असतानाही तो यशस्वी होऊ शकत नाही. तो त्याच्या गुणांचा, कलेचा योग्य ठिकाणी उपयोग करू शकत नाही. एकदा का मनात नकारात्मक गोष्ट घर करून बसली की, काही केल्या त्यांच्या मनातून त्या जाता जात नाहीत. खरे तर त्याच्या भाग्याला, नशिबाला दोष देण्यात अर्थ नाही. उलट तो त्याच्या गुणांचा योग्य वापर करू शकला नाही,याचा दोष आहे. नकारात्मकाता घरात येऊन बसली की, त्याचा आत्मविश्‍वास तुटून पडतो. तो स्वत:ला अभागी समजत असतो, करंटा समजत असतो.तो आपल्या वाईट नशिबाला स्वत: च आवतण देतो.पण ज्याच्यात मानसिक ताकद आहे,तो आपल्या मनाला कामाला जुंपलेला असतो. कर्मरत व्यक्तीचे विचार नशिब निश्‍चित करतात. ए जीवनालाच बदलून टाकतात. भविष्य बनवू शकतात. भारतीय तत्त्वज्ञानात कर्मशक्तीलाच महत्त्वपूर्ण समजले जाते. कर्मच जन्म-जन्मांतरीचा प्रभाव टाकू शकते. तेच व्यक्तीला सचेत, सावधदेखील करते. तर मग आपले विचार नकारात्मक का असतात? याचे दायित्व आपल्यावरही असते. आपण कुठेही गेलो, काहीही केले तरी आपले संपूर्ण जीवन आपल्या मेंदूच्या कचाट्यात सापडलेले असते.

मनोविकारावर इलाज आहे


     बदलत्या जीवनशैलीचा परिणाम मानवी आरोग्यावर मोठया प्रमाणावर होत आहे. यामुळे आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. सतत काहीतरी नवीन करण्याची धडपड असल्याने मानवी आरोग्य ढासळत चालले आहे. त्यांचा थेट परिणाम मनावर होत असल्याने मनुष्याची सहनशक्ती कमी झाल्याने मानसिक रुग्णांचे प्रमाण वाढलेले आहे. मनोरुग्ण हा समाजाचा एक भाग आहे. असे असतानाही मानसिक रुग्ण समाजाच्या मुख्य धारेपासून दूर राहतो. उपचार घेत असलेल्या रुग्णांचे नातेवाईकही त्यांची अहवेलना करताना दिसतात. ही बाब लक्षात घेऊन शासनाने त्यांच्यासाठी विविध उपाययोजना शासनस्तरावर राबविण्यात येत आहेत.याचा लाभ संबधित रुग्णाला मिळायला हवा.यासाठी नातेवाईकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्याकडे या मानसिक आजाराकडे फारसे लक्ष दिले जात आहे. याबाबत गैरसमजुती पुष्कळ आहेत. शिवाय यावर इलाज करणाऱ्या डॉक्टरांची संख्या फारच तोकडी आहे. त्यामुळे या आजाराकडे अद्याप म्हणावे असे लक्ष दिले जात नाही,ही मोठी शोकांतिका आहे.

     खरे तर माणसाला अनेक प्रकारचे मनोविकार सतावत असतात. विशेषत: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आणि स्पर्धेच्या युगात या मनोविकाराचे अनेक प्रकार लोकांना जडायला लागले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे लोकांचे आपापसातले भावनांचे देणेघेणे कमी होत चालले आहे. ग्रामीण भागात लोक गरीब असतील पण ते परस्परांना धरून असतात आणि आपल्या मनातील तणाव सहजपणे दुसर्‍याला बोलून दाखवतात. केवळ बोलून दाखवल्यानेसुध्दा मनावरचे दडपण कमी होत असते.
     शहरात मात्र प्रत्येकजण आपल्या मनातल्या भावना दुसर्‍यांना बोलून दाखवत नाही. आपल्या मनाची कमतरता इतरांना कळली तर आपल्याला कमीपणा येईल आणि प्रतिष्ठा जाईल असे प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे कोणी कोणाच्या भानगडीत पडत नाहीत आणि मनावरची अनेक दडपणे घेऊन लोक जगत राहतात. त्याचे परिणाम त्यांच्या मनावरही होतात आणि शरीरावरही होतात. अशा विकारांमध्ये ड्रिप्रेशन आणि लैंगिक व्यवहारातील असाधारणत: निद्रानाश इत्यादी विकारांचा प्रामुख्याने समावेश होतो. नैराश्य आणि तीव्र डोकेदुखी ही याच विकारांची अपत्ये होत. भारतामध्ये अशा विकारांचे प्रमाण फार वाढत आहे. मात्र त्यावर इलाज करण्यासाठी आवश्यक तेवढे समुपदेशक किंवा मानसशास्त्रज्ञ आपल्या देशात उपलब्ध नाहीत ही दु:खाची बाब आहे.
     जागतिक प्रमाणानुसार दर एक लाख लोकसंख्येमागे एक मानसशास्त्रज्ञ असण्याची गरज आहे. परंतु भारतात मात्र दर चार लाख लोकांमागे एक मानसशास्त्रज्ञ उपलब्ध आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. भारतात आज १३ हजार ५00 मानसशास्त्रज्ञांनी आवश्यकता आहे. परंतु प्रत्यक्षात ३ हजार ८00 मानसशास्त्रज्ञ उपलब्ध आहेत. ही कमतरता भरून काढणे फारसे अवघड नाही. परंतु शैक्षणिक करिअर म्हणताच केवळ वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखांकडे पळत चाललेल्या विद्यार्थ्यांना मानसशास्त्रज्ञ होणे हासुध्दा एक करिअरचा चांगला पर्याय आहे. हे कोणीतरी समजून सांगावे लागेल.शासनाने,सामाजिक संस्थांनी याच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे.
     मानसिक आजाराकडे लक्ष दिले जात नाही.त्यामुळे आजार बळावतो. अशा रुग्णाला नातेवाईक अक्षरशः वाऱ्यावर सोडतात. असे रुग्ण गावोगावी,शहरोशहरी,गल्लीत-बोळात  मोकाट फिरताना दिसतात. ही माणसे काहीही खातात,काहीही पितात. लहान मुले त्यांना दगड मारतात. त्यांच्यावर वेळेवर उपचार झाले तर ते नक्कीच बरे होतात. यासाठी नातेवईक आणि सामाजिक संस्थांनी प्रयत्न करायला हवेत. मानसिक आजार असलेला रुग्ण हा मनोरुग्ण असतोच असे नाही. त्याच्यावर नियमित उपचार आणि नातेवाईकांचे प्रेम मिळाले . तर मानसिक आजार हा नक्कीच बरा होतो. त्यामुळे अशा मनोरुग्णांचे पुनर्वसन व्हायला हवे. आपल्याकडे  समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न करण्यात येत आहे. न्यासातर्फे १0 योजना राबविण्यात येत आहे. तसेच ७ एप्रिल २0१७ पासून मनोरुग्णांसाठी शासनाने योजना तयार केली. या योजनेमुळे मनोरुग्णांची काळजी घेत असताना नातेवाईकांना येणार्‍या अडचणी कमी झाल्यात. या योजनेमुळे शासकीय रुग्णालयात उपचार मिळत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा आर्थिक खर्च कमी होण्यास मदत झाली आहे . तसेच १६ वर्षाखालील मनोरुग्णांना वेगळया मनोरुग्णालयात उपचार घेण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे.याचा लाभ रुग्णाला करून देण्याची जबाबदारी नातेवाईकांची आहे.

वाहन चालवातानाचा बेजबाबदारपणा


     अलिकडच्या काळात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जगात अपघाताच्या बाबतीत भारत देश आघाडीवर आहे.इतर रोगांच्या आजाराने मृत्यू पावणाऱ्यासंख्येपेक्षा अपघाताने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अपघात हे अनावधानाने, नजरचुकीने होतात हे खरे असले तरी त्यामध्ये प्रामुख्याने बेजबाबदारपणा, बेपर्वाई किंवा 'चलता है' ही मानसिकता कारणीभूत असते हे नाकारता येणार नाही. वाहन चालवताना लक्ष केंद्रित नसणे, वाहनांच्या वेगाबाबतचे नियम न पाळणे, वाहनांची देखभाल-दुरुस्ती न करणे अशा अनेक मानवनिर्मित कारणांमुळे निष्पापांचा हकनाक बळी जात असतो. असे असूनही वाहतूक, प्रवास यादरम्यानच्या जबाबदारीची जाणीव नागरिकांना होताना दिसत नाही. 

अलीकडील काळात तर स्मार्टफोनवर गाणी लावून हेडफोनच्या सहाय्याने ऐकत वाहन चालवण्याची फॅशनच आली आहे; मात्र ही फॅशन किती क्रूर ठरू शकते याची झलक उत्तर प्रदेशातील अपघाताने दाखवून दिली आहे. उत्तर प्रदेशात गोरखपूरपासून ५0 किलोमीटर अंतरावर कुशीनगर भागात बेहपूर्वा येथील चौकीदार नसलेले रेल्वे क्रॉसिंग ओलांडत असताना ही स्कूल बस एका रेल्वेवर आदळल्यामुळे १३ मुले आणि चालक अशा १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या बसचालकाने गाणी ऐकण्यासाठी इअरफोन लावला होता. या अपघातामुळे जुलै २0१६ मध्ये भदोही जिल्ह्यामध्ये झालेल्या एका अपघाताच्या आठवणी ताझ्या झाल्या. त्या घटनेमध्येही स्कूल बस चालक इअरफोन लावून बस चालवत होता. कानामध्ये इअरफोन लावून सार्वजनिक ठिकाणी वावरताना बळी गेलेल्यांची संख्या खूप मोठी आहे. विशेषत: रेल्वे क्रॉसिंग करताना तर बहुतांश तरुण-तरुणी इअरफोनवर गाणी ऐकत फिरत असतात. अशा वेळी त्यांना बाजूने येणारी रेल्वे आणि तिचा आवाज यांविषयी काहीही पत्ता लागत नाही आणि ते मृत्यूच्या दाढेत ओढले जातात.
रेल्वेने प्रवास केला जातो तेव्हा ती फलाटाला लागते आणि फलाटाला लागून जिना असतो. तो सर्वांना दिसतही असतो, पण ते जिन्याच्या दहा ते पंधरा पायर्‍या ओलांडण्याचा आळस करतात. शॉर्टकटने आपला रस्ता गाठावा, असा विचार करतात.  वाहन चालवताना आपली जबाबदारी, नियमांचे पालन करणे, हॅल्मेट घालणे, ट्रिपल सीट वाहन न चालवणे, अरुंद रस्त्यावर ओव्हरटेक करताना घ्यावयाची काळजी, गाडीचा वेग याबाबत वाहनचालकानेच काळजी घ्यायला हवी. काहीही झाले तर सर्व प्रकाराला सरकारी यंत्रणेला जबाबदार असते , आपली बेपर्वाईची मानसिकताही बदलावी लागेल व स्वत:ची सुरक्षा स्वत:ला करावी लागेल.

Thursday, August 16, 2018

(बालकथा) जलदेवता


     एक साधू जंगलात झोपडी बांधून राहत होता. तो सरयू ब्राम्हण होता. त्यामुळे त्याला लोक सरयू ब्राम्हण म्हणूनच ओळखत होते.तो देवाचा मोठा भक्त होता. पाच मैल दूर रोज आंघोळ करायला जात असे.
एक दिवस साधूला थोडा ताप आला. तरीही तो रोजच्याप्रमाणे नदीवर स्नान करून आला. दुसर्‍यादिवशी मात्र अंगात चांगलाच ताप चढला. डोके तर इतके दुखत होते की, त्याला बसतादेखील येत नव्हते.
साधूला पूजा करायची होती. स्नानाशिवाय तो कधीच पूजा-पाठ करत नसे. इतकेच नव्हे तर जलग्रहणदेखील करत नव्हता. त्याने स्नानाला जाण्याचा निश्‍चय केला. काही अंतर चालून गेल्यावर त्याला चक्कर आली. तो एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसला. थोड्या वेळात झाडाच्या गार सावलीखाली त्याला झोप आली.

साधूला जाग आली, तेव्हा त्याने पाहिले की, सूर्य अगदी माथ्यावर आला आहे. तो भरभर चालू लागला. पण अचानक त्याच्या पायाला ठेस लागली. दगडाला पायाला जोराची ठोकर लागल्याने  त्यातून रक्त येऊ लागले.
आजारपणामुळे साधू आधीच क्षीण झाला होता. त्याच्या अंगात त्राण उरले नव्हते. आता तर त्याला पुढे चालणे अशक्यच झाले. जरा दुखायचे थांबल्यावर तो पुन्हा चालू लागला. नदी अजून बरीच दूर होती.नदीवर जाण्यापूर्वीच तो जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध पडला.
ज्यावेळेला त्याचे डोळे उघडले,त्यावेळेला त्याच्यासमोर एक ब्राम्हण उभा असलेला दिसला.सरयू साधूने विचारले, “तुम्ही कोण आहात? काय हवंय तुम्हाला? ”
ब्राम्हण म्हणाला, “ मी एक साधासुधा ब्राम्हण आहे.तुम्ही थोडे पाणी प्या. तुम्हाला बरे वाटेल. ”
“ स्नान केल्याशिवाय पाण्याचा थेंबही घेत नाही. ” सरयू साधू निश्‍चयाने म्हणाला.
ज्यावेळेला खूप सांगूनही साधू पाणी प्याला नाही,त्यावेळेला तो ब्राम्हण खर्‍या वेशात आला. म्हणाला, “ सरयू, मी जलदेवता वरुण. मी तुझ्या तपस्येवर खूप प्रसन्न झालो आहे. बोल, तुला काय हवंय. ”
वरुण देवाला साक्षात समोर पाहून सरयू साधूला फार आनंद झाला. म्हणाला, “ वरुण देवा, जर तुम्हाला मला काही द्यायचे असेल, एक नदी द्या. जवळपास एकही नदी नाही. प्राणी-पक्ष्यांनादेखील पाण्यासाठी दूर-दूरपर्यंत भटकंती करावी लागत आहे. त्यांचेही पाण्याशिवाय खूप हाल होताहेत. ”
वरुणदेवाने आशीर्वाद दिला, “तुला जसं हवं,तसं होईल. इथून वाहणारी नदी पुढे सरयू नावाने ओळखली जाईल. ”
पर्वत रांगांमधून निघणार्‍या या नदीला सरयू नावाने ओळखळे जाते,याच नदीच्या काठी आयोध्या नगरी वसली आहे.

Wednesday, August 15, 2018

(बालकथा) छोटुला ढगोबा


     तो छोटुला ढगोबा अगदी एकटा म्हणजे एकटाच होता. त्याला मित्र कोणी नव्हते. त्याला मैत्री करायला फार आवडायचे,पण त्याला कोणी मित्र बनवून घेत नव्हते. एके दिवशी तर तो फिरत फिरत एका शाळेवर जाऊन पोहचला.खेळाच्या मैदानावर खेळत असलेल्या मुलांना त्यानं विचारलं, “ माझ्याशी दोस्ती करणार का? ”
मुलांनी आपल्या डोक्यावर काळ्या ढगाला पाहिलं आणि ओरडतच सुटले, “ पळा पळा, आता पाऊस आला. ”
“अरे, थांबा थांबा. माझ्याशी खेळा. ” छोटुला ढगोबा ओरडू लागला,पण त्याचे ऐकतंय कोण? सगळे पसार. शेवटी काळा छोटुला ढगोबा हिरमुसला आणि पुढे निघाला.

यानंतर ढगोबा एका सुंदर घराच्या अंगात आला.तिथे एक महिला तारेवर कपडे सुखवायला टाकत होती. शेजारीच तिच्या दोन्ही मुली मातीत घर बनवण्यात दंग होत्या.
छोटुल्या ढगोबाने त्यांच्यावर थंड हवेचा झोका फेकला आणि विचारलं, “काय! माझे मित्र बनणार का? ”
त्या महिलेने त्याच्याकडे पाहिले आणि आपल्या मुलींना इशारा देत म्हणाली, “ चला... चला... आटपा लवकर. आत चला. पाऊस येणार आहे. ” असे म्हणून ती वाळायला घातलेले कपडे गोळा करू लागली.
“ अरे,थांबा आणि खेळा.माझ्याशी दोस्ती करा. ”  पण त्याचं ऐकतंय कोण? सगळे घरात घुसले. मुली खिडकीत उभे राहून त्याला पाहू लागल्या. ढगोबा नाराज झाला आणि पुढे निघाला.
छोटुल्या ढगोबाला फार वाईट वाटलं. तो विचार करू लागला, “ शेवटी, माझ्याशी कुणीच दोस्ती का करत नाही? माझ्यावर कुणीच कसं प्रेम करत नाही? ”
“ मी अशा काही लोकांना ओळखते, जे तुझ्यावर मनापासून प्रेम करतात. ”  तेवढ्यात एक आवाज आला. ती हवा होती.
छोटुल्या ढगोबाने विचारलं, “ खरंच! तू त्यांना ओळखतेस? ”
“ हो! चल माझ्यासोबत. दाखवते तुला. ”  हवेनं त्याला प्रेमानं गोंजारत आपल्या जवळ घेतलं. ती छोटुल्या ढगोबाला आपल्या सोबत घेऊन गेली. हिरवीगार मैदाने, पर्वत ओलांडून लांब एका विशाल क्षेत्रात ते पोहचले. आता इथे हिरवळीचा पत्ताच नव्हता. सगळीकडे ओसाड माळरान. एवढेच नव्हे तर इथल्या विहिरींना, नदीलाही पाणी नव्हते. विहिरी,तलाव, नदी कोरड्या ठणठणीत पडल्या होत्या.
छोटुल्या ढगोबाला हे सर्व नवीन होते. त्याला ते पाहून फार आश्‍चर्य वाटलं. त्याने पाहिले की, त्याला पाहायला लोक घरातून बाहेर आले होते. त्याला पाहून आनंदाने ओरडत होते. त्याला हातांनी खुणावत होते.
“ या लोकांना तुला पाहिल्यावर आनंद झाला आहे. तू यांना पाणी दे. ”  हवा म्हणाली.
“पण मी तर खूपच छोटा आहे. ”  ढगोबा म्हणाला.
“ मी मोठा होईन ना, तेव्हा यांना भरपूर पाणी देईन. ”
 तेव्हा हवा तिच्या जुन्याच सवयीप्रमाणे हसली. म्हणाली, “ आता तू छोटा राहिला नाहीस. ”
आता काळा ढगोबा स्वत:ला पाहायला गोल फिरला. खरेच,तो फार मोठा झाला होता. आता त्याने संपूर्ण आकाश व्यापून टाकले होते. त्याने आनंदाने आपले पावसाचे गोदाम उघडले. “घ्या, आता मनसोक्त पावसात खेळा,मज्जा करा. ”  तो बरसायला लागला.
“आई... आई... ”  एक छोटीशी मुलगी हाक मारत होती. “ अगं,पाऊस आला. ” असे म्हणत ती बाहेर आली आणि पावसात चिंब होऊन नाचू लागली. ढगोबाने पाहिले,एक बदक एका कोरड्या डबक्याजवळ उभा राहून चोच वर करून पाऊस झेलतो आहे. थोड्याच वेळात ते डबके भरले. त्याने त्यात पटकन उडी मारली आणि लागला बागडायला.
लगेचच फुलं टवटवीत झाली. त्यांनी आनंदाने पाकळ्या खोलल्या. “ छोटुल्या ढगोबा, थांब आणि आमच्याशी मनसोक्त खेळ. ”  अचानक त्याला आवाज आला.
काळा छोटुला ढगोबा म्हणाला, “ धन्यवाद मित्रांनो, आता मी थांबलोच आहे. आपण खेळुया. ” मित्र मिळाल्यावर त्याला फार फार आनंद झाला.