Sunday, January 8, 2023

अशाने देश विज्ञान क्षेत्रात भरारी कसा घेणार?

अलीकडेच नागपुरात पार पडलेल्या  विज्ञानविश्वातील सर्वांत मोठ्या उपक्रमाला म्हणजेच  भारतीय विज्ञान काँग्रेसच्या वाट्याला दुर्लक्षच आले. सत्ताधारी, राजकारणी असो किंवा विज्ञान संशोधन क्षेत्रातील मातब्बर मंडळी याकडे फिरकलेसुद्धा नाहीत. कोरोनामुळे आभासी उपस्थितीचं नवं फ़ॅड आलं आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या काँग्रेसला याच पद्धतीने उपस्थिती दाखवली.देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाची दिशा निश्चित करण्यासाठी काही ठोस कार्यक्रम देण्यात अपयशी ठरले.  महत्त्वाचे म्हणजे  अत्याधुनिक संशोधन आणि देशाच्या विज्ञानजगताला ठोस कार्यक्रम देण्यात ही विज्ञान काँग्रेस अपयशी ठरली आहे. राजाश्रयाबरोबरच विज्ञान काँग्रेसला लोकाश्रयाची गरज असून, विज्ञानाला जनमानसात पोचविणाऱ्या या महा-उत्सवाला अस्ताचं ग्रहण लागलं आहे की काय असं वाटायला लागलं आहे. तसं झालं तर देशाच्या भवितव्यासाठी ते योग्य ठरणार नाही. पंतप्रधान मोदी यांनी भारतीय शास्त्रज्ञांना देशाच्या गरजा ओळखून संशोधन करण्याचं आवाहन केलं आहे. देशाच्या अमृतकाळातील विकासासाठी विज्ञानजगताची मोठी भूमिका असल्याचे गौरवोद्गार काढले. मात्र तेही वैज्ञानिक जगताला दीर्घकालीन व्यापक आणि सर्वंकष दृष्टिकोन देऊ शकले नाहीत. केवळ 'इनोव्हेशन' मधील क्रमवारी सुधारली म्हणजे देशात वैज्ञानिक  प्रगती झाली, असं म्हणता येणार नाही. मूलभूत विज्ञानातील संशोधनाचा अभाव , सुविधांची वानवा , नव्या संधीच्या कमतरता आणि नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल काहीच व्यक्त करण्यात आलं नाही. याशिवाय देश म्हणून आपल्या संशोधनातील उपलब्धीबद्दलही फारशी चर्चा झाली नाही. विविध चर्चासत्रांमध्ये विषयांच्या वैविध्याचा आणि नाविन्याचा अभाव पाहायला मिळाला.संपूर्ण आयोजनामध्ये देशभरातील आघाडीच्या शास्त्रज्ञांचा सहभाग कमी दिसला. खरंतर वादाची पार्श्वभूमी आणि उपयोजनशून्यतेमुळे आघाडीचे शास्त्रज्ञ विज्ञान काँग्रेसकडे पाठ फिरवत असल्याचं अनेक वर्षांपासून बोललं जात आहे.त्याची काहीशी प्रचिती या वेळी आली. एका मेळाव्याच्या पलीकडे विज्ञान काँग्रेस ठोस काही देण्यात अपयशी ठरत असल्याने वर्षागणिक मातब्बर शास्त्रज्ञांचा ओढा कमी झाला आहे. पर्यायाने कटिंग एड्ज संशोधन, भविष्यकालीन आव्हानं, संशोधनाच्या नव्या संधी आणि कृती कार्यक्रमातील प्रगल्भता लोप पावत आहे. दिवसेंदिवस राजकीय नेतृत्व विज्ञानाबद्दल प्रचंड अनास्था दाखवत असून, त्याची प्रचिती विज्ञान काँग्रेसच्या निमित्ताने आली. संपूर्ण मानवजातीच्याच प्रगतीचा अविभाज्य घटक हा विज्ञान असतानाही, राजकीय आणि सामाजिक नेतृत्व याकडे कमालीचं दुर्लक्ष करत असून, आत्मनिर्भर होऊ पाहणाऱ्या भारतासाठी निश्चितच हे भूषणावह नाही.अशाने देश विज्ञान क्षेत्रात प्रगती कशी साधणार? संशोधनासाठी निधीचा कमतरता नेहमीच असते. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) तुलनेत आपण फार कमी खर्च संशोधनावर करतो. अमेरिका, चीनसारखे देश दोन टक्क्यांवर खर्च करतात. एखाद्या विषयाचा पुर्वी देशात एखादा दुसरा शास्त्रज्ञ असायचा, त्यामुळे विचारांची देवाणघेवाण, नवकल्पना आणि परस्पर सहकार्य यांचा अभाव होता. अशा चर्चेतूनच विज्ञान पुढे जातंय. याबाबत अमेरिका आणि युरोपातील शास्त्रज्ञांप्रमाणे आपणही परस्पर सहकार्य आणि चर्चेतून संशोधन पुढे न्यायला हवे. 

डॉ. सी. व्ही. रमण यांच्या रूपाने देशातच काम केलेल्या पहिल्या शास्त्रज्ञाला नोबेल मिळाले. त्यानंतर अजूनही भारतात राहून संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना नोबेल मिळालेले नाही. त्या दिशेने प्रवास सुरू आहे. परंतु पुरेसे प्रोत्साहन हवे आहे. प्रयोगांसाठी निधीपासून शिक्षणातील मूलभूत बदलांपर्यंत आपल्याला काम करावे लागेल.संशोधनात पुर्वीपासून पैसे कमी मिळतात, पण मानसन्मान खूप होता. जनमानसात प्राध्यापक, शिक्षक आणि संशोधक यांना आदराचे स्थान होते. आता कुठेतरी ते कमी झाल्यासारखे वाटते. सर्वच हुशार विद्यार्थ्यांचा संशोधनाकडे कल असेलच असे नाही. संशोधनातल्या संधी, निधीची उपलब्धता हा प्रश्न आहेच. आता मोठ्या पॅकेजची नोकरी हीच विद्यार्थ्यांसह शिक्षणव्यवस्थेची आणि समाजाची भूमिका आहे. त्यामुळे सध्या संशोधनाचे गणित बिघडलंय, तरीही देशातील काही भागांमध्ये वैज्ञानिकांची परंपरा निर्माण होते, हे आशादायक चित्र आहे.  मूलभूत विज्ञानाचा नवनीतम संशोधनाशी संबंध विद्यार्थ्यांना स्पष्ट केला पाहिजे. संशोधनासाठी निधी हवाच पण विज्ञानाला लोकसन्मानही पाहिजे. विज्ञानात रुची निर्माण करणाऱ्या शिक्षण व्यवस्थेचा पाया रचावा लागेल. संशोधकांनीही 'कटिंग एज' म्हणजे नवीनतम संशोधनात स्वतःला गुंतवावे. तेव्हा कुठे आपण नोबेलविजेत्या संशोधनाकडे वाटचाल करू. राजकारण्यांच्या बातम्यांचा रतीब घालणाऱ्या टीव्ही चॅनेलवाल्यांनी देखील स्वतःच्या टीआरपी बरोबरच देशाचा विकास लक्षात घेऊन आजचा युवक विज्ञानाकडे कसा आकर्षित होईल, यासाठी काही कार्यक्रम द्यावेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 


Friday, January 6, 2023

शब्दसंपतीचे मालक व्हा

आदिम अवस्थेपासून आधुनिक मानवापर्यंतच्या विकासाच्या प्रवासाचं रहस्य काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? बहुतेक लोक याचे उत्तर देतात की इतर प्राण्यांच्या तुलनेत माणसाचा विकसित मेंदू या संपूर्ण प्रगतीच्या आणि संस्कृतीच्या मुळाशी आहे. तसं हे उत्तर अपूर्ण आहे. याचं पूर्ण उत्तर असं आहे- माणसाने प्रगती केली, कारण या मेंदूने भाषा शोधली. सर्व प्रगतीच्या मुळाशी भाषा आहे. जगातील ज्ञानाच्या सर्व शाखा विकसित झाल्या आहेत - त्या भाषेमुळे! 'भाषा' म्हणजे अर्थपूर्ण शब्दांचे व्यवस्थित-क्रमबद्ध संयोजन!

शब्दांची ही दुनिया फार विचित्र आहे. शब्दांच्या सामर्थ्याकडे आपलं कधीच लक्ष जात नाही. शब्दच माणसाला ज्ञानाशी जोडतात. शब्दच माणसाला माणसाशी जोडतात आणि शब्दच माणसाला माणसापासून तोडतात. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून, अक्षरे ध्वनीचे प्रतीक आहेत, ते निर्जीव आहेत. माणूसच त्यांना अर्थ देतो, जिवंत करतो. शब्द जिवंत झाले की मग माणसाचे विविध स्वभाव आणि गुण त्यांच्यात येऊ लागतात. मानवी स्वभावाचे जेवढे वेगवेगळे नमुने आहेत तितकेच शब्दांच्या स्वभावाचेही नमुने आहेत. जसे काही लोक इतरांना हसवण्याचे काम करतात, त्याचप्रमाणे काही शब्द देखील लोकांना हसवतात. जसे काही माणसे इतरांना नेहमी त्रास देतात;  तसे काही शब्दांच्या उच्चाराने समोरच्याला अस्वस्थ करतात. 

कधी कधी तर असे शब्द ऐकून ते रडायलाही लागतात. काही लोक खूप प्रिय असतात;  त्याचप्रमाणे काही शब्दही खूप प्रिय असतात.  त्यांना पुन्हा पुन्हा ऐकण्याची, त्यांना गुणगुणण्याची इच्छा होते. एकीकडे काही शब्द फसवे, काही अर्थहीन, तर काही शब्द अत्यंत सौम्य, सात्विक, सभ्य आणि सुसंस्कृत असतात. काही शब्द आपल्याला निष्क्रीय करतात. 'काहीही करू नकोस, जे काही तुझ्या नशिबात आहे ते तुला नक्कीच मिळेल. नाही तर मिळणार नाही.' न्यूटनने म्हटले आहे की, कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी ९०% (नव्वद टक्के) मेहनत, ५% (पाच टक्के) बुद्धिमत्ता आणि ५% (पाच टक्के) योगायोग आवश्यक असतो. शब्द जे आपल्याला निष्क्रिय ठेवतात;  आपण त्यांना आपल्या जीवन व्यवहारातून फेकून दिले पाहिजे. काही भाषांमधील शब्द इतर कोणत्याही भाषेशी मैत्री करतात आणि त्यातीलच एक बनतात. जसे तुमचे काही मित्र असे असतात की;  जे सर्वांमध्ये मिसळू शकतात. काही असे असतात की ते इतरांशी मैत्री करू शकत नाहीत.  शब्दांचाही असाच स्वभाव असतो;  विशेषतः, इंग्रजी भाषेतील बरेच शब्द ते ज्या प्रदेशात गेले त्या भाषेत मिसळून गेले. जसे 'बस, रेल्वे, कार, रेडिओ, स्टेशन' इत्यादी. तमिळ भाषेतील शब्द मात्र त्यांच्या द्रविड कुटुंबापुरतेच मर्यादित राहतात, असे म्हटले जाते. त्यांना कोणामध्ये मिसळायचे नसते. हिंदी शब्द  लगेच मिसळणारे असले तरी सर्वच नाहीत,  काही शब्द आपले स्वतंत्र अस्तित्व शेवटपर्यंत टिकवून ठेवतात. त्यांच्या मूळ स्वरूपातच ते इतर ठिकाणी जातात. काही शब्द इतर भाषांशी अशा प्रकारे मिसळून जातात की त्यांचे स्वतंत्र रूप, अस्तित्वच हरवून जातात. काही शब्द हिंदीतही आढळतात जे दोन वेगवेगळ्या भाषांमधील शब्द एकत्र करून बनवले जातात. आता ते शब्द फक्त हिंदीचे बनले आहेत. हिंदी-संस्कृत पासून वर्षगाँठ, माँगपत्र; हिंदी-अरबी /फारसी पासून थानेदार, किताबघर ; अंग्रेजी-संस्कृतपासून रेलयात्री, रेडियो तरंग ; अरबी /फारसी-अंग्रेजी पासून बीमा पॉलिसी इत्यादी.हिंदीचे शब्दविश्वही या शब्दांमुळे समृद्ध झाले आहे. काही शब्द आपल्या आईला इतके प्रिय असतात की ते आपली मातृभाषा सोडून इतरांसोबत जात नाहीत. काही शब्द खूप छान असतात, ते कोणत्याही भाषेत स्वतःसाठी जागा बनवतात. 

शब्दांच्या बाहेर जाण्याच्या आणि इतर अनेक भाषांमधून शब्द येण्याच्या या मार्गाने आपली भाषा समृद्ध झाली आहे. विशेषत: ते शब्द ज्यासाठी आपल्याकडे पर्यायी शब्द नाहीत. इंग्रजी, पोर्तुगीज, अरबी, पर्शियन भाषेतून आलेले हजारो शब्द आले आहेत;  त्यांना येऊ द्या. जसे ब्रश, रेल्वे, पेन्सिल, रेडिओ, कार, स्कूटर, स्टेशन इ. परंतु ज्या शब्दांसाठी आपल्याकडे सुंदर शब्द आहेत, त्या शब्दांसाठी इतर भाषेतील शब्द वापरू नयेत. आमच्याकडे 'आई'- वडिलांसाठी अनेक सुंदर शब्द आहेत. जसे- माई, अम्मा, बाबा, अक्का, अण्णा, दादा, बापू.आता त्यांना मम्मी-डॅडी म्हटणे म्हणजे आपल्या भाषेतील सुंदर शब्दांचा अपमान आहे. 

आपल्या तोंडून बोललेले शब्द आपले चारित्र्य, बुद्धिमत्ता, समज आणि मूल्ये दर्शवतात, म्हणून आपण शब्द उच्चारण्यापूर्वी विचार केला पाहिजे. कमीत कमी शब्दात अर्थपूर्ण बोलणे आणि लिहिणे ही एक कला आहे. ही कला मेहनतीने आणि विविध पुस्तके वाचून साध्य करता येते. पण फक्त एका चुकीच्या शब्दाच्या उच्चारामुळे अनेक वर्षांच्या मैत्रीला तडा जाऊ शकतो. आता कोणत्या वेळी, कोणाच्या समोर, कोणते शब्द वापरावेत, हे अनुभवातून, मार्गदर्शनातून, वाचनाने आणि संस्कारातूनच कळते. परीक्षेत जी वाक्ये सुंदर, समर्पक आणि अर्थपूर्ण शब्दांनी लिहिली जातात, त्यामुळे चांगले गुण मिळतात. अपशब्द वापरणे नेहमीच हानिकारक असते. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची अशी शब्दसंपत्ती असते. हा शब्दसंग्रह वाढवण्यासाठी साहित्याचे वाचन आवश्यक आहे. शब्दांचे वेगवेगळे अर्थ जाणून घेण्यासाठी  शब्दकोशाचीही गरज असते. शब्दकोषाचे रोज एक पान एकाग्रतेने वाचले तर शब्दसंपत्तीची ताकद कळून येईल. तर, आता तुम्ही ठरवूनच टाका की  तुम्हाला तुमचा शब्दसंग्रह वाढवायचा आहे.  आणि त्यासाठी वाचन संस्कृती वाढवा. वाचायला सुरुवात करा.मग  तुम्ही शब्दांच्या संपत्तीचेही मालक व्हाल. - डॉ. सूर्यनारायण रणसुभे (अनुवाद- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली) 


बिमल रॉय : हिंदी चित्रपटसृष्टीला नवी दिशा देणारे दिग्दर्शक

ज्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये धार्मिक आणि ऐतिहासिक विषयांचे वर्चस्व होते, तेव्हा बिमल रॉय यांनी स्वत:ला सामाजिक आणि उद्देशपूर्ण चित्रपटांपुरते मर्यादित केले.शेतकरी, मध्यमवर्ग आणि महिलांचे प्रश्न त्यांनी आपल्या चित्रपटांतून मांडले. ते त्यांच्या काळातील ज्वलंत प्रश्नांपासून कधीही दूर गेले नाहीत.  बिमल रॉय यांनी प्रसिद्ध साहित्यकृतींवर अप्रतिम चित्रपटही बनवले. तगडी कथा-पटकथा-संवाद, उत्कृष्ट चित्रीकरण आणि सुरेल गाणी-संगीत ही त्यांच्या सर्वच चित्रपटांची ओळख आहे. बिमल रॉय यांच्याशिवाय हिंदी सिनेमाची कल्पनाच करता येत नाही, हे एक सत्य आहे. बिमल रॉय हे खरंच हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नक्षत्र आहे, ज्याची चमक कधीच फिकी पडणार नाही. फिल्मी दुनियेत त्यांचा सिनेमा 'बिमल रॉय स्कूल' या नावाने ओळखला जातो. ज्यांच्याकडून अनेक पिढ्या प्रशिक्षित होत राहतील.  भारतीय चित्रपटसृष्टीत असे वेगळे स्थान फार कमी चित्रपट दिग्दर्शकांनी मिळवले आहे.

बिमल रॉय यांनी खूप सुंदर चित्रपट भारतीय प्रेक्षकांना दिले. जीवनाच्या वास्तवतेला कलात्मकता आणि काव्यात्मकतेचं सौंदर्यलक्ष्यी परिणाम देऊन रुपेरी पडद्यावर एखाद्या उत्कट कवितेसारखं चितारणाऱ्या , भारतीय जीवनशैलीचं हृद्य दर्शन घडवणाऱ्या , साहित्यकृती, अमर व्यक्तिरेखा यांचं प्रतिबिंब ज्यात आहे अशा श्रेष्ठ चित्रपटांची देणगी भारतीय रसिकांना दिली.  निर्माता, दिग्दर्शक, कॅमेरामन बिमल रॉय यांचा जन्म 12 जुलै 1909 रोजी पूर्व बंगालमधील ढाक्क्याजवळच्या सौपूर या गावचे जमीनदार हेमचंद्र रॉय यांच्या संयुक्त विशाल अशा कुटुंबात झाला. अत्यंत संवेदनशील, पण बुद्धिमान असलेला हा मुलगा निसर्गाचा वेडा होता.
ब्रिटिश शाळेत त्याचं शिक्षण झालं. पेंटिंग काढण्यात , व्हायोलिन वाजवण्यात तर तळ्याकाठी , आमराईत रमणारा हा मुलगा मितभाषी होता. ढाक्क्याच्या जगन्नाथ महाविद्यालयात इंटरला असताना वडिलांचं निधन झालं. भावंडं इंग्लंड, कोलकाता येथे शिकत होती. आईजवळ बिमल एकटा होता. त्यानंतर घरातल्या मुनिमनं सर्व संपत्तीचा अपहार केला. जमीनदारी एका रात्रीत गेली. घर, जमीन, शेत, तलाव सर्व गेलं. दक्षिण कोलकात्यात शिक्षण सोडून आणि आईला घेऊन ते राहायला आले. त्या वेळी कोलकात्यात 'न्यू थिएटर्स' ही नामवंत चित्रनिर्मिती संस्था उदयास येत होती. लहानपणी दुर्गापूजेत सर्वांना जमवून 'यहुदी की लडकी' किंवा ' मिसर कुमारी' सारखी नाटकं बसवणारे बिमलदा , कॅमेरा चालवण्यात तरबेज होते. न्यू थिएटरमध्ये दिग्दर्शक- कॅमेरामन नितीन बोस यांचे सहायक कॅमेरामन म्हणून रुजू झाले. न्यू थिएटर्सच्या मीरा, गृहदाह, देवदास, माया, मुक्ती, अभिनेत्री अशा चित्रपटांतून हे नाव चमकू लागलं. पोस्टरवर प्रमुख अभिनेत्यांच्या जोडीला बीमलदाचं नाव प्रकाशित होत असे. ते स्टार कॅमेरामन झाले. प्रत्येक अभिनेत्री त्यांच्याकडून फोटो काढून घेण्यास उत्सुक असत. तरुण बिमलदांवर शरत साहित्याचा प्रभाव होता. प्रथमेश बारुआबद्दल , नितीन बोसबद्दल आकर्षण होतं. 1937 मध्ये मनोबिनासारख्या सुविद्य , प्रगल्भ पत्नीमुळे त्यांच्या जीवनात नवीन पर्व सुरू झालं. बीमलदांना आता स्वतंत्रपणे काम करण्याची इच्छा होती. तशी संधी चालून आली. त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट एक सप्टेंबर 1944 रोजी 'चित्रा' सिनेमा गृहात प्रदर्शित झाला. 'उदयेर पाथे' नवसिनेमाचा, नवविचारांचा संदेश घेऊन आला. बंगाली तरुणांत त्यांची खूप चर्चा होई. 'उदयेर पाथे' च्या हिंदी आवृत्तीच्या - हमराहीच्या निमित्तानं बिमलदा प्रथमच मुंबईत आले. पण काही काळ कोलकात्यात अस्थिर वातावरणात काढल्यानंतर ते मुंबईस राहायला आले. शाळेतल्या मित्राने हितेश चौधरीने त्यांना मुंबईत आणलं. येताना ऋषिकेश मुखर्जी, असीत सेन, नझीर हुसेन अशी गुणी माणसंहि त्यांच्याबरोबर होती. हितेन चौधरी यांनी ' माँ' चित्रपटाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. माँ चांगला चालला. देविकारणीच्या बंगल्यात बिमलदांचे वास्तव्य होते. मनोबीना सर्वांची - सहकारयांची जातीनं देखभाल करीत . त्यातूनच 'बिमल रॉय प्रॉडक्शन' उभे राहिले. सलील चौधरी ' रिक्षावाला' ही त्यांची कथा घेऊन आले आणि ' दो बिघा जमीन' ही अजोड कलाकृती प्रेक्षकांसमोर आली. बलराज साहनी यांनी शंभू महातो या गरीब शेतकऱ्याची अविस्मरणीय भूमिका केली आणि हिंदी चित्रपट सृष्टीत बंगाली खादीचा पेहराव घातलेले मितभाषी बिमल रॉय दाखल झाले. त्याच सुमारास 1953 मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेला  'परिणिता' आला आणि बिमलदांनी अनेक पारितोषिक जिंकली. चित्रपटाच्या इतिहासात बिमल रॉय युग सुरू झाले.
'देवदास', 'मधुमती', 'बंदिनी', ' सुजाता', 'परख' मधून बिमलदांनी वास्तवता, जीवनाचे गहिरे रंग, व्यक्तिरेखा, निसर्ग, संगीत यांचे रंग भरले. त्यांच्या आवडत्या शरच्चंद्र यांच्या कादंबऱ्यांवर हळुवारपणे 'बिराज बहु' , देवदास, परिणिता सारखे चित्रपट केले. त्यांचे सहकारी, चाहते, मित्र असलेले ऋषिकेश मुखर्जी , असीत सेन, बासू भट्टाचार्य आदी दिग्दर्शकांनी बिमल रॉय स्कूलची परंपरा पुढे चालू ठेवली. संयत अभिनय, वास्तवता, आणि कलात्मकता यांचं भान बिमलदांची देणगी आहे.
अविश्रांत काम करणाऱ्या बिमलदांना अर्ध्या वाटेत फुफ्फुसाच्या कर्करोगाने गाठलं. डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. पण युनिटमध्ये कुणीही विनावेतन राहिलं नाही. वांद्र्याच्या 'गोदीवाला' बंगल्यात अखेरपर्यंत भाडेकरू म्हणून राहिले. 8 जानेवारी 1966 रोजी बिमलदांनी अखेरचा श्वास घेतला.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Wednesday, January 4, 2023

अफाट प्रतिभेचा उपेक्षित संगीतकार सी. रामचंद्र

'ऐ मेरे वतन के लोगों...' हे गाणे 59 वर्षांपासून देशातल्या नसानसांमध्ये सळसळते आहे. या गाण्याने राजा आणि रंक दोघांच्याही डोळ्यांत पाणी आणले आहे. शहिदांचा सन्मान करताना सरकारे आपल्या पद्धतीने मदत करतात. सैन्य दल तोफांची किंवा बदुकांच्या फैर्‍यांची सलामी देऊन शहिदांना शेवटचा निरोप देतात. जनता शहिदांचा सन्मान करताना डोळ्यांत अश्रू आणून त्यांना आपल्या हृदयात जागा देतात. चित्रपटसृष्टीने शहिदांच्या सन्मानाच्या रुपात  'ऐ मेरे वतन के लोगों...' सारखे गाणे दिले.

ऐ मेरे वतन के लोगों...  हे गाणे शहिदांच्या हौत्माम्याचे स्मरण करण्यासाठी रचले गेले होते. पण या गाण्याचा उद्देश होता, 1962 मध्ये मिळालेल्या पराभवाने खचून न जाता त्यांचे मनोबल वाढवण्याचे! गाण्याचा शेवट आहे, 'जय हिंद,जय हिंद की सेना... ' गाण्याच्या काही अंतर्‍यांमध्ये सैन्याच्या रेजिमेंटांचा हवाला होता आणि सांगितले गेले होते की, आमच्या एका एका वीर जवानांनी दहा-दहा शत्रू सैन्यांना मारले.

ज्यावेळेला सरकारने चित्रपटसृष्टीकडे मदतीची अपेक्षा केली, तेव्हा सगळ्याच संगीतकार, निर्मात्यांनी आपापल्या परीने मदत केली. काहींनी आपलीच जुनी गाणी सादर केली. मात्र त्यावेळेला महबूब खान एक दिवस कवी प्रदीप यांच्या घरी पोहचले. आणि त्यांना आपल्या देशाच्या सैनिकांच्या मदतीसाठी एक गाणे लिहिण्याची विनंती केली.  हे गाणे सरकारच्या विनंतीनुसार लिहिले गेले असल्यामुळे यासाठी कवी प्रदीप यांना कसलाही मोबदला मिळाला नाही. प्रदीप यांची इच्छा होती की, हे गाणे लता मंगेशकर यांनी गावावे. त्यावेळेला लता मंगेशकर आपल्या कामात व्यस्त होत्या, त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा नकार दिला. अधिक विनंती केल्यावर या गाण्याचे दोन भाग करण्याचे ठरले. एक भाग लता मंगेशकर आणि दुसरा भाग आशा भोसले यांच्या आवाजात 27 जानेवारी 1963 रोजी दिल्लीच्या नॅशनल स्टेडिअमवर पहिल्यांदा गायले जाणार होते. वर्तमानपत्रांमधल्या जाहिरातींमध्ये आशा भोसले यांच्याही नावाचा या गाण्याची एक गायिका म्हणून उल्लेख केला जात होता. आशा भोसले यांनी या गाण्याच्या रिहर्सलमध्येही भाग घेतला होता.

या गाण्याच्या संगीताची जबाबदारी सी. रामचंद्र यांच्याकडे सोपवण्यात आली होती. संगीतकार सी. रामचंद्र यांच्या दिग्दर्शनाखाली लता मंगेशकर यांनी अनेक गाणी गायली होती आणि त्यांच्यातला ताळमेळ चांगला जुळला होता. पण काही कारणांमुळे 1958 पासून लता मंगेशकर आणि सी. रामचंद्र यांच्यातील बोलणेच बंद होते. अण्णा म्हणजेच सी. रामचंद्र यांनी 26 जानेवारी 1963 रोजी लता मंगेशकर यांना या गाण्याची टेप दिली. पण शेवटच्या वेळी आशांनी लता यांना आपण दिल्लीला जाणार नसल्याचे सांगितले.लता मंगेशकर यांच्यासह अनेक संगीतकारांनी आशा यांची खूप मनधरणी केली.पण त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. शेवटी 26 जानेवारी 1963 रोजी मुंबईतून एक फ्लााइट पकडून लता, दिलीप कुमार, महबूब खान, राजकपूर, शंकर जयकिशन, सी. रामचंद्र यांचे सहाय्यक मदन मोहन आदी मंडळी दिल्लीला रवाना झाली. फ्लाइटमध्ये  लता मंगेशकर यांनी ते गाणे ऐकले, जे सी.रामचंद्र यांनी टेपमध्ये दिले होते. 27 जानेवारी रोजी ते गाणे त्यांनी नॅशनल स्टेडिअमवर गायले. गाणे संपल्यावर स्टेजच्या पाठिमागे असलेल्या लता यांना महबूब खान यांनी त्यांना पंतप्रधान पंडित नेहरू बोलावत असल्याचा निरोप दिला.  नेहरू यांनी लता मंगेशकर यांचे कौतुक केले आणि तुमच्या गाण्याने माझ्या डोळ्यांत पाणी आणले, असे सांगितले.

हे गाणे दिल्लीत ज्यावेळेला गायले गेले, त्यावेळेला तिथे ना या गाण्याचे संगीतकार सी. रामचंद्र होते, ना कवी प्रदीप! नंतर ज्यावेळेला नेहरूंना मुंबईला जाण्याची संधी मिळाली, त्यावेळेला त्यांनी आवर्जून कवी प्रदीप यांची भेट घेतली. मात्र अण्णा शेवटपर्यंत उपेक्षितच राहिले. ऐ मेरे वतन के लोगों... या गाण्याने इतिहास रचला. या गाण्याने भारतरत्न लता मंगेशकर यांच्या करिअरला नवी उंची दिली. या गाण्याचे गीतकार प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. या गाण्याची एक ओळ आहे, तुम भूल न जाओ इनको... इसलिए कही ये कहानी. पण दुर्दैवाने या गाण्याचे संगीतकार सी. रामचंद्र मात्र शेवटपर्यंत उपेक्षित राहिले. अण्णा यांनी शास्त्रीय संगीत, लोकसंगीत यांचा मेळ घालत जी गाणी रचली होती, ती खूपच लोकप्रिय ठरली. ऐ मेरे वतन... पूर्वीही अण्णा यांनी 'आना मेरी जान संडे के संडे...' (शहनाई, 1947),  'मेरे पिया गये रंगून... '(पतंगा,1949) सारखी लोकप्रिय गाणी दिली होती.

सी.रामचंद्र  यांचे वडील नागपूरला रेल्वेत स्टेशन  मास्तर होते. धाकट्या रामचा अभ्यासापेक्षा संगीताकडे असलेला ओढा पाहून त्यांनी  तेथील सप्रे गुरुजीकडे काही वर्षे शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी ठेवले, तेथून पुण्यातही  काही काळ संगीत विद्यालयात जाऊन त्यांनी संगीताचे धडे घेतले. त्यांचे ध्येय इन्स्पेक्टर किंवा सिनेनायक होण्याचे होते. देखणा चेहरा व 6  फुटापर्यंतची उंची नि मधूर आवाज यामुळे आपणास नायकाचे काम सहज मिळेल, असे त्यांना वाटले.यासाठी त्यांना खूपच स्ट्रगल करावे लागले. 

अखेर त्यांना बी. व्ही. राव यांच्या 'नागानंद' चित्रपटात नायकाचे काम  मिळाले, पण तो चित्रपट आपटला.  पुढे रामचंद्र सोहराव मोदींच्या मिनर्व्हा मुव्हीटोनमध्ये एक्स्ट्रा म्हणून नोकरीस लागल्यावर “सैदे हवस' या चित्रपटात त्यांना एक छोटीसी भूमिका मिळाली. मोदींचे संगीतकार तेव्हा मीरासाब होते. रिकाम्या वेळात राम चितळकर मीरसाबच्या ताफ्यातील वाद्ये वाजवत रहात, ते पाहून एकेदिवशी मोदी म्हणाले, “तुला अभिनय काही जमत नाही, तुझा ओढा संगीताकडे आहे, तू तिकडे लक्ष दे! मग त्यांनी मीरासाबचा सहाय्यक म्हणून अण्णांना नेमले.  त्यांच्या हाताखाली चितळकर नोटेशन करण्यात तरबेज झाले. नंतर ते स्वतंत्रपणे आण्णासाहेब या नावाने संगीत देऊ लागले. सिनेनिर्माते व दिग्दर्शक जयंत देसाईनी त्यांचे सी. रामचंद्र असे नामकरण केले. 

अण्णानी संगीत साज चढवलेला फिल्मीस्तानचा “सफर” (1947)खूप गाजला. त्यातील अमीरबाई कर्नाटकीने म्हटलेले “मारी कटारी मर जाना” हे ठसकेबाज गीत रेडिओ सिलोनवर लागते  तेव्हा काळजात कट्यार घुसते! रफीलाही यात ‘कह के भी न आये तुम अब छुपने लगे तारे', “अब वो हमारे हो गये, इकरार करे या न करे? अशासारखी माधुर्याने भरलेली गाणी दिली.  गेल्या पिढीतील दिग्गज नायकांसाठीही अण्णांनी पार्श्वगायन केले होते. 1. अशोककुमार 'संग्राम, शतरंज' मीनाकुमारी नायिका असलेल्या या चित्रपटात अण्णानी अशोककुमारसाठी एक गझलही गायली होती. 2. राजकपूर, 'सरगम, शारदा', 3. देवआनंद बारीश, अमरदीप, सरहद्द, 4. दिलीपकुमार 'नदिया के पार, इन्सानियत, समाधी, पैगाम, आझाद. लताचा अण्णांच्या संगीतात उदय होण्यापूर्वी ललिता देऊलकर (नंतरच्या सौ. सुधीर फडके) शमशाद बेगम, सुरिंदर कौर, बिनापानी मुकर्जी, मिनाकपूर, सरस्वती राणे, जोहराबाई अंबालावाली, अमिरबाई कर्नाटकी, मोहनतारा अजिंक्य, गीता दत्त व 'दुनिया'त  सुरैय्या आदींना घेऊन आपले संगीत लोकप्रिय केले होते.  1. 'ठुकराके ओ जानेवाले. 2. दिल को भुल दो तुम हमें. या पतंगाच्यावेळी गीतकर राजेंद्रकष्णचा अण्णांच्या संगीताल प्रथम प्रवेश झाला. राजेंद्रची गाणी अण्णांचे संगीत दोघांनी मिळून अनेक चित्रपट हिट केले! 

पूर्वी हिंदी सिनेसंगीतांत पंजाबी व उत्तर  हिंदुस्तानी वादकांची मोनॉपाली होती, ती मोडून काढीत अण्णांनी आपल्या वाद्यवृंदात महाराष्ट्र व गोव्यातील वादकांचा समावेश  केला. तमाशातील ढोलकीपटू लाला गंगावनेला आपल्याकडे घेतले. 'नदीया के मार'मधील 'दिल  दे के भागा दगा देके भागा' हे गाणे अण्णासह ललित देऊळकरने ठसक्यात म्हटले होते. यात अण्णानी जोगतीणींच्या ताफ्यात वाजविल्या  जाणाऱ्या चौंडक या तालवाद्याचा वापर हिंदी  सिनेसंगीतात प्रथमच केला! अण्णानी बेन या ख्रिश्चन तरुणीशी लव्ह मॅरेज केले होते. बेनचे - पहिले मूल डिलिव्हरी दिवशीच दगावल्यावर 'आता यांना परत मूल होणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितल्यावर काही काळाने त्यांनी दुसरे लग्न करून घेतले. या दुसऱ्या पत्नीपासून त्यांना एक मुलगा, एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली. पुढे पत्नीच्या जाण्याने खचलेले अण्णा आपल्या दोन मुलांच्या वात्सल्याने बरेचसे सावरले. आपल्या भरल्या संसारातील शेवटच्या कालखंडात सुखी झालेले अण्णा शांतपणे वयाच्या  63 व्या वर्षी आपल्यातून निघून गेले!- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Tuesday, January 3, 2023

क्रोध आणि द्वेषातून उद्भवणारे संकट

आजच्या व्यस्त जीवनशैलीत तणावामुळे माणूस मानसिकदृष्ट्या खूप दडपणाखाली जगू लागला आहे. त्याचा परिणाम त्याच्या वागण्यातही स्पष्टपणे दिसून येतो. यामुळेच चिडचिड, निराशा आणि लहानसहान गोष्टींवरून आक्रमक वर्तन ही एक सामान्य पण गंभीर समस्या बनली आहे. पण हीच चिडचिड भयंकर रागाचे रूप घेते आणि संतापलेली व्यक्ती आपल्याच माणसांना मारून टाकते तेव्हा ही समस्या अधिक गंभीर रूप घेते.  अशा हृदयद्रावक घटना सातत्याने वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी जयपूरमध्ये एका तरुणाने बहिणीची हातोड्याने वार करून हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकून दिले.म्हणे हा तरुण शिकलेला होता आणि इंजिनीअरिंगचे शिक्षण घेऊन नोकरी करत होता. त्याने कबूल केले की तिची बहीण त्याच्या कामात सतत आडवी येत असे. त्याला तिचे आडवे येणे पसंद नव्हते. याचा राग आल्याने त्याने ताईची हत्या केली.

अशीच आणखी एक घटना दिल्लीतील आहे.  पत्नीशी भांडण झाल्यावर एका तरुणाने आपल्या दोन वर्षांच्या मुलाला दारूच्या नशेत दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. झारखंडच्या साहिबगंजमध्ये पतीने पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे पन्नासहून अधिक तुकडे केले.  अशा घटना पाहिल्यानंतर आणि ऐकून मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. रागाच्या भरात तोडफोड, मारहाण यांसारख्या घटना समजण्यासारख्या आहेत, पण किरकोळ गोष्टींवरून एवढा राग मनात धरून स्वत:चा माणसाचा जीव घेतला जातो, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळेच हा प्रश्न पुन्हा पुन्हा हादरवतो की लोकांमध्ये इतकी नकारात्मकता, हिंसा, राग, द्वेष कुठून आणि का येत आहे? आता हिंसा किंवा द्वेषाची अभिव्यक्ती केवळ जात, धर्म, भाषा, प्रदेश किंवा शत्रू एवढ्यापुरती मर्यादित न राहता त्याचा विस्तार वैयक्तिक संबंधांमध्येही होताना दिसत आहे.

जगभरातील समाजांमध्ये द्वेष वाढण्याची कारणे समजून घेणे आवश्यक आहे. प्रश्न असा आहे की आपण अशा टप्प्यावर कसे आणि का पोहोचलो आहोत जिथे द्वेष आणि रागाच्या रूपात राष्ट्रवाद, जातिवाद आणि नारीद्वेष, दुराचार वाढत आहेत आणि जगभरातील चळवळींचा आधार बनला आहे. व्यक्तीच्या प्रगतीबरोबरच असंतोष आणि निराशाही वाढली आहे.  कारण या आधुनिक जगात उच्चभ्रू आणि राज्या सरकारे दिलेली आश्वासने आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात  अपयशी ठरले आहे. कल्याणकारी राज्य आणि घटनात्मक मूल्ये जपण्याचे आश्वासन पूर्ण होत नाही, तेव्हा नागरिकांमध्ये नाराजी आणि असंतोषाच्या भावना निर्माण होऊ लागतात. असं होणं स्वाभाविक आहे.  हीच परिस्थिती आज भारतात आहे. सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे नागरिक असूनही लोक स्वत:ला असुरक्षित जगाचा भाग समजू लागले आहेत. त्यांना त्यांच्या आजूबाजूला असंतोष, निराशा, आक्रोश आणि आर्थिक अस्थिरता दिसते. आणि अशी परिस्थिती एका दिवसात निर्माण झालेली नाही. सर्वात मोठ्या लोकशाहीतच लोकशाही मूल्ये का दुर्लक्षित होत आहेत, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.

शेवटी असे काय घडले आहे की, सामाजिक प्रश्नांबाबत सक्रिय असणार्‍या बुद्धीवादी गटांनी मौनाची संस्कृती स्वीकारली आहे.  केवळ इतरांचे काय होते यासाठीच नाही, तर स्वतःचे किंवा स्वतःच्या गटांचे आणि समुदायांमध्ये जे काही घडत आहे, यासाठी देखील आवाज  ऐकू येत नाहीत आणि कोणताही प्रतिकार नोंदवलेला दिसत नाही. सतत वाढणारी महागाई, संसाधनांची अनुपलब्धता, आरोग्य सुविधांचा अभाव, रोजगाराची हानी, शिक्षणाचा घसरलेला स्तर, भविष्याची अनिश्चितता, कामाची परिस्थिती, कमी वेतन, कामाचे अनिश्चित तास, महिला आणि दलितांसाठी असुरक्षित वातावरण, हिंसक घटनांमध्ये वाढ इ. काही महत्त्वाचे पैलू आहेत ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, परंतु तरीही केले जात आहे.  पण का? लोकशाही राज्य हक्क, निवडणूक सहभाग, समानता, स्वातंत्र्य या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून जीवन ठरवण्याच्या नागरिकाच्या आकांक्षेचे प्रतिनिधित्व करते हे वास्तव आहे. पण लोकशाहीप्रती असलेली साशंकता खरी ठरली आहे कारण आता राज्य आणि सरकार हे सत्तेचे मुख्य स्त्रोत नसून भांडवलाच्या मालकी आणि नियंत्रणातूनच खरी सत्ता सुनिश्चित होत आहे.

लोकशाही राज्य हे हक्क, निवडणूक सहभाग, समानता, स्वातंत्र्य या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून जीवन ठरवण्याच्या नागरिकांच्या आकांक्षेचे प्रतिनिधित्व करते हे वास्तव आहे. पण लोकशाहीप्रती असलेली साशंकता खरी ठरली आहे कारण आता राज्य आणि केंद्र सरकार हे सत्तेचे मुख्य स्त्रोत नसून भांडवलाच्या मालकी आणि नियंत्रणातूनच खरी सत्ता सुनिश्चित होत आहे. आणि जोपर्यंत तो खंडित होत नाही तोपर्यंत कोणत्याही समाजातील लोकशाही संकल्पनेचा तर्क हा एक भ्रम आहे. समाजशास्त्रज्ञ लिंडसे पोर्टर यांचा असा विश्वास आहे की सुशिक्षित आणि हुशार लोकांची मुले शेवटी आराम आणि विशेषाधिकाराने भ्रष्ट होतील. त्यानंतर ते केवळ त्यांच्या संपत्तीचाच विचार करतील, ज्यामुळे मोजक्या लोकांचे राज्य प्रस्थापित होईल. विषमता वाढेल.  पोर्टरच्या या आशंकाने ठोस स्वरूप धारण केले तर ते दिसत नाही, असे काही वेळा वाटते. वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात प्रवेश केल्यानंतर जेवढे लोक त्यांच्या प्रगतीवर आनंदी दिसत होते, आज ते तितकेच दुःखी आणि त्रस्त झाले आहेत.

दुर्बल घटकांचे शोषण, महिलांबाबत वाढती गैरवर्तणूक, किशोरवयीन व तरुणांमध्ये वाढती आत्महत्येची प्रवृत्ती, सामाजिक आणि आर्थिक असुरक्षितता, समाजात जात, धर्म, प्रदेश या आधारावर वाढता भेदभाव, गरीब-श्रीमंत यांच्यातील वाढती दरी आणि विशेषत: नातेसंबंधांमध्ये निर्माण झालेला अविश्वास. समाजात असे घटक आहेत जे समाजात संतापाचे आणि हिंसाचाराचे कारण बनत आहेत. सध्या देशात लोकशाही मूल्यांना आव्हान दिले जात आहे, हे नाकारता येणार नाही. अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत ज्यांनी संविधानाचा आत्माच ठेचला आहे. एखाद्या व्यवस्थेत, विशेषत: लोकशाही व्यवस्थेत, जेव्हा राज्यकर्ते किंवा उच्चभ्रू गट त्यांच्या हितसंबंधांना राज्याच्या माध्यमातून संरक्षण देऊ लागतात, तेव्हा तेथे अशा प्रकारची अडथळे आणि आव्हाने निर्माण होणे स्वाभाविक आहे. जेव्हा बोलण्यात आणि वागण्यात तफावत निर्माण होते, तेव्हा मोठी लोकशाहीही हतबल होते. विज्ञानाने निर्माण केलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करताना माणूस अनेक तर्क मांडतो आणि त्याची उपयुक्तता तार्किक आधारावर सिद्ध करतो, पण वैज्ञानिक विचार अंगीकारताना त्याच तर्कांकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही, हा मोठा विरोधाभास आहे.

कदाचित, आजच्या युगात, वादांना बगल दिली गेली आहे, म्हणूनच समाज, कुटुंब, मैत्री, राज्य, समाजात वितुष्टाची परिस्थिती निर्माण झाली आहे. समाजात पसरलेल्या या विकृती आणि अव्यवस्थितपणाबद्दल ना शैक्षणिक स्तरावर, ना राज्य आणि प्रशासकीय स्तरावर, ना कुठल्याच बौद्धिक स्तरावर कोणतीही काळजी दिसून येत नाही, हे दुर्दैव आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक वर्गातील तरुणांना मतभेद विसरून पुढे यावे लागेल, अन्यथा समाज अव्यवहार्य होईल किंवा प्राणी समाज आणि मानवी समाजातील भेद संपुष्टात येईल असे घडू नये. विकास हा मानवी जीवनातील गुणात्मक वाढीसाठी केला जातो, जीवनात व्यत्यय निर्माण होण्यासाठी नाही. स्वत:ला भौतिकवाद आणि उपभोगवादाकडे इतकं ढकलून देऊ नका की विकासाच्या रूपात विनाशाच्या ढिगाऱ्यावर तुम्ही एकटेच उभे आहात आणि तुमच्या सोबत ते भोगणारे किंवा पाहणारे कोणीही नाही. त्यासाठी नातेसंबंधात विश्वास, प्रेम आणि बांधिलकी असणे आवश्यक आहे, तरच राष्ट्र-राज्याच्या विकासाच्या कल्पनेला सकारात्मक स्वरूप येऊ शकेल.

Sunday, January 1, 2023

( बालकथा) बक्षीस

फिरोजाबाद जनपदच्या राजाला सुंदर इमारती बांधण्याची खूप आवड होती. त्याच्या जनपदमध्ये आजूबाजूला मोठमोठ्या आणि भव्य इमारती दिसत होत्या. शिल्पकला ही त्या इमारतींची खासियत होती. राजाने कुशल कारागीरांना आपल्या जनपदमध्ये खास बोलावून घेतले होते, जेणेकरून ते सुंदर कोरीव काम असलेल्या इमारती बांधू शकतील. या कारागिरांमध्ये एक अतिशय अनुभवी कारागीरही होता, जो आता म्हातारा झाला होता. वर्षानुवर्षे जनपदची सेवा करताना त्याने अनेक उत्कृष्ट वास्तू व मंदिरे बांधली होती. राजा त्याला सर्वोत्तम कारागीर मानत असे. एके दिवशी तो कारागीर राजाला म्हणाला - 'महाराज, मी आयुष्यभर जनपदची सेवा केली, पण आता मी म्हातारा झालो आहे.  कृपया मला जनपदच्या सेवेतून मुक्त करा.'

राजा कारागिराला म्हणाला - 'शिल्पी श्रेष्ठ, तुम्हाला निवृत्ती घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.  पण माझी एक इच्छा आहे की आधी तुम्ही माझ्यासाठी एक इमारत बांधा, जी सर्व इमारतींपेक्षा उत्तम असेल.'
कारागीर इमारतीच्या बांधकामात गुंतला, पण अनिच्छेने. त्याच्याकडून अपेक्षित असलेली उत्कृष्टता त्याने दाखवली नाही. बस! कशी तरी इमारत बांधून पूर्ण केली. एके दिवशी पुन्हा राजासमोर उभे राहून त्याने विनंती केली- “महाराज, तुमच्या इच्छेनुसार मी नवीन इमारतही बांधून पूर्ण केली आहे. आता मला जनपदच्या सेवेतून लवकर मुक्त करा.'
राजा म्हणाला - 'आजपासून तुम्ही जनपदच्या सेवेतून मुक्त झाला आहात. मला तुम्हाला विशेष बक्षीस द्यायचे आहे. म्हणूनच मी तुम्हाला ही भव्य इमारत बांधायला लावली आहे, जेणेकरून मी ती तुम्हाला बक्षीस म्हणून देऊ शकेन.'
कारागीरला आनंद झाला, पण मनापासून हा वाडा बांधला नाही आणि त्यात अनेक उणिवा राहिल्या. याचं त्याला खूप वाईट वाटत होतं. तो खिन्न मनाने परतला.- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

भारतातून होतेय अप्रत्यक्षपणे पाण्याची निर्यात?

भात, गहू, कापूस आणि ऊस ही अशी पिके आहेत, जी जमिनीची सुपीकता कमी असताना जास्त पाणी शोषून घेतात. जमिनीची सुपीकता टिकून राहावी म्हणूनच शेतकऱ्यांना भरड धान्य, कडधान्ये, तेलबिया पिकवण्यास आणि एनपीके खतांचा वापर करण्यास सांगितले जाते.परंतु या मुद्द्याचा विरोधाभास असा आहे की भारत सरकार युरिया-डीएपी (नायट्रोजन आणि फॉस्फरसपासून बनविलेले खत) सारख्या खतांवर मोठ्या प्रमाणात अनुदान देते. परिणामी, डीएपी कंपाऊंड एनपीके (नायट्रोजन, फॉस्फेट आणि पोटॅश खते) पेक्षा स्वस्त पडते. गंमत म्हणजे, एनपीके वर अनुदान न मिळाल्याने हे खत महाग होते, ज्यामुळे शेतकऱ्यांनी ते जवळजवळ नाकारले आहे. राजकीय तोटा सहन करावा लागू नये म्हणून सरकार डीएपीवर अनुदान देत आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षात युरिया-डीएपीवर थेट 2 लाख कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. साहजिकच यंदा भात व गव्हाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. ही पिके मोठ्या प्रमाणात उत्पादित केली जातात आणि बहुतेक निर्यात केली जातात. बहुपिक शेती करायला शेतकरीही टाळाटाळ करत आहेत. यामुळे देशाला डाळी आणि तेलबिया मोठ्या प्रमाणात आयात कराव्या लागतात. त्यांच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर परदेशी भांडवलही खर्च केले जाते. इतकेच नव्हे तर गहू, धान या पिकांच्या उत्पादनासाठी पाणी व्यवस्थापन आणि वीज व्यवस्थेत खर्च होणारा पैसाही अप्रत्यक्ष निर्यात होतो आणि त्याचा तोटा आपल्यालाच भोगावा लागतो. पण राजकारणाच्या दृष्टीकोनातून हे वास्तव उघड होत नाही किंवा विरोधक हे मुद्दे संसदेत मांडत नाहीत. 

हा शेती आणि कृषी-औद्योगिक उत्पादनांशी निगडित प्रश्न असून, त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची निर्यात होत आहे. या पाण्याला 'वर्चुअल वाटर' असेही म्हणता येईल. वास्तविक भारतातून तांदूळ, साखर, कपडे, पादत्राणे, फळे आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो. ते तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी खर्च केले जाते.  आता तर ज्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी येथे बाटलीबंद पाण्याचे प्लांट उभारले आहेत तेही हे पाणी अरब देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात करत आहेत. अशा प्रकारे निर्यात होत असलेल्या पाण्यावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास जलसंकट आणखी वाढणार आहे.  देशातील तीन चतुर्थांश रोजगार पाण्यावर अवलंबून आहेत. हे सामान्यतः विसरले जाते की शुद्ध पाणी तेल आणि लोखंडासारख्या खनिजांपेक्षा कितीतरी जास्त मौल्यवान आहे, कारण पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी प्रति हेक्टर वीस हजार डॉलर्स दराने पाणी जागतिक अर्थव्यवस्थेत सर्वात जास्त योगदान देते. या दृष्टिकोनातून, भारतातून कृषी आणि कृषी उत्पादनांद्वारे पाण्याची अप्रत्यक्ष निर्यात हे आपल्या पृष्ठभागाच्या आणि भूगर्भातील पाण्याच्या साठ्याच्या शोषणाचे प्रमुख कारण बनत आहे. 

खरे तर एक टन धान्य उत्पादनासाठी एक हजार टन पाणी लागते. तांदूळ, गहू, कापूस आणि ऊस यांसारख्या पिकांना सर्वाधिक पाणी वापरतात. आम्ही यापैकी बहुतेक निर्यात करतो. सर्वाधिक पाणी भात पिकवण्यासाठी वापरले जाते. पंजाबमध्ये एक किलो धानाचे उत्पादन करण्यासाठी 5,389 लिटर पाणी लागते, तर पश्चिम बंगालमध्ये तितकेच भात उत्पादन करण्यासाठी सुमारे 2,713 लिटर पाणी खर्च होते. पाण्याच्या वापरातील हा मोठा फरक म्हणजे पूर्व भारतापेक्षा उत्तर भारतात तापमान जास्त आहे. शेतातील माती आणि स्थानिक हवामान हे देखील पाण्याच्या वापराशी संबंधित महत्त्वाचे घटक आहेत. तसेच साखरेसाठी उसाचे उत्पादन करताना पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.  गव्हाच्या चांगल्या पिकासाठीही तीन ते चार वेळा सिंचन करावे लागते. जास्तीत जास्त सत्तर टक्के पाणी सिंचनासाठी वापरले जाते.  बावीस टक्के पाणी उद्योगांमध्ये आणि आठ टक्के पाणी पिण्यासाठी व इतर घरगुती कारणांसाठी वापरले जाते. परंतु नद्या आणि तलावांची पाणी साठवण क्षमता सतत कमी होत आहे आणि सिंचन आणि उद्योगांसाठी होणार्‍या शोषणामुळे, पृष्ठभागाच्या वर आणि खाली पाण्याचे प्रमाण सतत कमी होत आहे. अशा परिस्थितीत पिकांच्या स्वरूपात पाण्याची अदृश्य निर्यात समस्या अधिकच बिकट करत आहे. याला आळा घालण्यासाठी पीक पद्धतीत सर्वंकष बदल करण्याची आणि सिंचनात आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्याची गरज आहे. 

पृथ्वीवर 1.4 अब्ज घन किमी पाणी असल्याचा अंदाज आहे.  मात्र यातील केवळ दोन टक्के पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी योग्य आहे. यातून उत्पादित होणारी पिके, फळे आणि भाजीपाला निर्यातीच्या माध्यमातून 25 टक्के पाणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वापरले जाते. अशा प्रकारे, 1,050 अब्ज चौरस मीटर पाण्याची अप्रत्यक्षरित्या व्यापार होतो. एका अंदाजानुसार, या जागतिक व्यवसायात भारतातून दरवर्षी सुमारे 10,000 कोटी घनमीटर पाणी पिकांच्या स्वरूपात निर्यात केले जाते. पाण्याच्या या अप्रत्यक्ष व्यापारात भारत जगात अव्वल आहे.  खाद्यपदार्थ, औद्योगिक उत्पादने आणि चामड्याच्या स्वरूपात ही निर्यात सर्वाधिक आहे. पाण्याची ही निर्यात टाळण्यासाठी अनेक देशांनी त्या कृषी आणि अकृषिक उत्पादनांची आयात सुरू केली आहे, ज्यामध्ये पाण्याचा सर्वाधिक वापर केला जातो. प्रगत सिंचन तंत्रज्ञानासाठी जगात ओळख असलेल्या इस्रायलने संत्र्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे, कारण या फळाद्वारे अप्रत्यक्षपणे पाण्याची निर्यात होत होती. इटलीने लेदर टॅनिंगवर बंदी घातली आहे.  त्याऐवजी, पादत्राणे बनवण्यासाठी ते भारतातून मोठ्या प्रमाणात टॅन केलेले चामडे आयात करते. पीक पद्धतीत बदलासोबतच पाणी वापराची कार्यदक्षता वाढवण्याची गरज आहे. 

सिंचनाची सध्याची संसाधने आणि तंत्रे असताना प्रत्यक्षात केवळ 25 ते 40 टक्के पाणी सिंचनासाठी वापरले जाते, बाकीचे पाणी वाया जाते. आपल्या पारंपारिक पद्धतीने कालवे आणि कूपनलिकांद्वारे सिंचन केले जाते. मात्र आता बदलत्या परिस्थितीत कारंजे, ड्रॉप आणि स्प्रिंकलर या तंत्रांचा अवलंब करण्याची गरज आहे. त्यामुळे 30 ते 50 टक्के पाण्याची बचत होते.  त्यांचा विस्तार एक कोटी हेक्टर शेती क्षेत्रापर्यंत केल्यास भारत सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत करू शकेल. आर्थिक उदारमतवादाखाली जागतिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारताची धोरणे लवचिक आणि गोंधळात टाकणारी बनवण्यात आली आहेत. परिणामी या कंपन्या निर्दयीपणे नैसर्गिक पाणी पिळण्यात गुंतल्या आहेत. किंबहुना, भारत हा कदाचित जगातील एकमेव असा देश आहे की जिथे पाण्याला अजिबात राष्ट्रीय प्राधान्य नाही, त्यामुळे पाण्याची अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष निर्यात होत आहे की नाही, हा देशाच्या नेत्यांच्या चिंतेचा विषय नाही.  याउलट, डीएपी सारख्या खतांना सबसिडी देणे हे पाण्याचे अतिशोषण आणि अदृश्य निर्यातीला कारणीभूत ठरणारे उपाय आहेत. 

पाणी म्हणजे जीवन! या मूलभूत स्रोताची आपल्या देशात विलक्षण टंचाई आहे. जागतिक लोकसंख्येच्या 18 टक्के लोक भारतात राहतात आणि निसर्गाने आपल्याला उपलब्ध करून दिलेला पाण्याचा साठा केवळ चार टक्के आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि त्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करणे आवश्यक आहे. काटकसर करायची, तर खर्च कुठे होतो ते प्रथम समजून घेतले पाहिजे.

भारतात शेती क्षेत्रातील पाण्याचा वापर 89 टक्के एवढा प्रचंड आहे. उर्वरित पाण्यातील सहा टक्के पाणी औद्योगिक वापरासाठी (मुख्यत: औष्णिक वीज निर्मितीसाठी) खर्च होते आणि पाच टक्के पाणी घरगुती वापरासाठी खर्च होते. त्यामुळे मुख्यत: शेतीला लागणाऱ्या पाण्यात काटकसर व्हायला हवी

प्रत्यक्षात शेती क्षेत्राकडून होणाऱ्या पाण्याच्या मागणीत सातत्याने वाढच होत आहे. उदाहरणार्थ पंजाब व हरियाणा या राज्यांमध्ये हरितक्रांतीनंतर खरीप हंगामात भात आणि रब्बी हंगामात गहू ही पिके घेतली जातात. ५० वर्षांपूर्वी या राज्यांतील शेतकरी प्रामुख्याने ज्वारीचे पीक घेत असत. भाताच्या पिकासाठी ज्वारीच्या सहापट पाणी लागते; आणि गव्हाच्या पिकासाठी ज्वारीच्या दुप्पट पाणी लागते. हा उत्पादित गहू, तांदूळ आपण निर्यातही करतो. म्हणजे एका अर्थाने ही पाण्याचीच निर्यात आहे! पाण्याची टंचाई असणाऱ्या देशाने अशी पाण्याची निर्यात करणे, हे कितपत योग्य आहे?

महाराष्ट्रातही उसासाठीच्या पाण्याच्या मागणीत वाढ होत गेली आहे. महाराष्ट्रात 1960 नंतर उसाखालचे क्षेत्र झपाटय़ाने वाढत गेले आहे. 1960 मध्ये महाराष्ट्रात उसाखालचे क्षेत्र 1.5 लाख हेक्टर होते. आता ते 12 लाख हेक्टर झाले आहे. महाराष्ट्रात एक हेक्टर क्षेत्रावर उसाचे पीक घेण्यासाठी पाटाने पाणी दिल्यास 48 हजार घनमीटर पाणी लागते. पाण्याच्या अशा राक्षसी गरजेमुळे धरणे आणि बंधाऱ्यांतील बरेचसे पाणी उसाच्या शेतीसाठी खर्च होते. परिणामी इतर पिकांसाठी साधी संरक्षक सिंचनाची सुविधाही उपलब्ध होऊ शकत नाही. असे मौल्यवान पाणी वापरून तयार होणारी साखरदेखील आपण निर्यात करतो. अशा निर्यातीसाठी सरकार अनुदानसुद्धा देते, म्हणजे येथेही पाण्याची निर्यात! कोणत्या पिकांना प्राधान्य द्यायचे हे त्या पिकांसाठी लागणाऱ्या पाण्याचे मोजमाप करून ठरवले पाहिजे. शास्त्रशुद्ध दृष्टिकोन ठेवून कमी पाणी ‘पिणारी’ पिके प्राधान्याने लावल्याशिवाय पाण्याची टंचाई दूर होणार नाही.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली