Sunday, October 9, 2011

चैतन्यमूर्ती: अमिताभ बच्चन

                   संपूर्ण बॉलिवूड व्यापलेलं एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे अमिताभ बच्चन. १९७० पासून हिंदी चित्रपटांत अमिताभरूपी सुरू झालेला झंझावात आजही कायम आहे. कलाकार कितीही मोठा असला, तरी वयाचं बंधन त्याला झुगारणं ही असाध्य गोष्ट असते. मात्र बच्चन यांनी आपल्या करिष्म्याने हा असाध्य प्रकार जवळपास साध्य केला आहे. यामुळेच चैतन्याचा टवटवीत झरा असलेलं हे व्यक्तिमत्त्व जिवंतपणीच दंतकथा बनलं आहे, असं म्हणण्यात अजिबात अतिशयोक्ती नाही. 
महान पित्याच्या घरी जन्माला आलेला  मितभाषी आणि आत्ममग्न असणारा अमिताभ नोकरी असतानाही मनातून अस्वस्थ असायचा. आपल्या स्वप्नांना मोकळी वाट करून देण्यास संकोचायचा. पण चित्रपटाची हाक त्याला स्वस्थ बसू द्यायची नाही. शेवटी सुरक्षित नोकरीला लाथ मारून चित्रपट क्षेत्रातला जुगार खेळायला मुंबईला आला. के. ए. अब्बास यांनी 'सात हिंदुस्थानी' चित्रपटातल्या एका व्यक्तिरेखेसाठी अमिताभची निवड केली. १९६९ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातल्या अमिताभच्या अभिनयाने अनेकजण प्रभावित झाले. या चित्रपटामुळे चांगल्या संधी येतील या अपेक्षा मात्र फोल ठरल्या. महिनाभरानंतर स्वप्नाचं भयानक वास्तव समोर आलं. चित्रपटातला जुगार महागात पडणार अशीच सारी परिस्थिती दिसत होती. स्टुडिओ ते स्टुडिओ फिरून, प्रत्येक निर्मात्याचे उंबरठे झिजवूनही अमिताभला भूमिका मिळत नव्हत्या. शेवटी चित्रपटनिर्माता हृषीकेश मुखर्जी यांनी त्याला राजेश खन्नाच्या 'आनंद' मध्ये संधी दिली.
' आनंद' मधल्या अमिताभच्या दमदार अभिनयामुळे खरं तर " टेक ऑफ पॉईंट' ठरला असता, मात्र त्याच्या नशिबी यश इतक्या लवकर लिहिलं नव्हतं. त्यानंतर आलेले जवळजवळ अकरा चित्रपट अपयशी ठरले. परवाना, बॉम्बे टू गोवा, प्यार की कहानी, रेश्मा और शेरा, बन्सी बिरजू, एक नजर, रास्ते का पत्थर, संजोग, गरम मसाला, बंधे हाथ असे एकामागे एक चित्रपट आले आणि गेले. शेवटी ही अपयशाची गाथा प्रकाश मेहरा यां  च्या 'जंजीर' ने खंडीत केली. १९७३ चा हा चित्रपट अमिताभच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. मात्र या चित्रपटाचा किस्साही मोठा रंजक आहे. जंजीरमध्ये खरंतर सुरुवातीला होती मुमताज. पण राजकुमार आणि त्यानंतर देवआनंदने या सिनेमाला नकार दिल्यानंतर तिच्यासमोर अमिताभ आला. तेव्हा तिने या ताडमाड उंचीच्या हिरोसमोर उभं राहायलाही नकार दिला. तेव्हा जया भादुरी पुढे आली. प्रत्यक्ष जीवनातही उत्तम ट्‌युनिंग जुळलेली  ही जोडी त्या सिनेमात पडद्यावरही हीट ठरली.
अँग्री यंग मॅनची प्रतिमा दशकभर कायम राहिली. अमिताभसोबत काम केलेल्या चित्रपट निर्मात्यांनी त्याला अनेक प्रतिमा दिल्या हृषीकेश मुखर्जींच्या चित्रपटातला अस्वस्थ, यश चोप्रा यांचा रोमांटिक, प्रकाश मेहरांचा गंभीर आणि मनमोहन देसाईंचा मनोरंजक अमिताभ प्रेक्षकांना दिसला. या व्यक्तिरेखांमध्ये विविध रंग भरन्याची चढाओढ सुरू झाली. काही वेळेस ती प्रेक्षकांच्या पसंदीस उतरली, काही वेळेला नुकसान झाले. हा नवा सुपरस्टार राजेश खन्नाच्या स्थानाला धक्के देऊ लागला. आणि एक वेळ अशी आली की, या स्थानासाठी अमिताभला पसम्दी देण्यात आली. अमिताभने राजेश खन्नाला मागे टाकले.
अमिताभच्या लोकप्रियतेने कळस गाठला. त्याच्या सिनेमाची तिकिटे ब्लॅकने विकली जाऊ लागली. थिएटरवर तिकिटांचा ब्लॅक बाजारसुद्धा त्याच्याच कारकिर्दीत फोफावला. अशातच त्याला 'कुली'च्या चित्रीकरणादरम्यान अपघात झाला. तो लवकर बरा व्हावा म्हणून सारा देश प्रार्थना करू लागला. देशभरातून पवित्र धागे  पाठवण्याचा, उपास-तापास , यात्रा करण्याचा अशा अनेक मार्गाचा अवलंब चाहत्यांनी तो बरा व्हावा म्हणून केला. शेवटी पुन्हा अमिताभ पडद्यावर परतला. सगळ्यांना हायसे वाटले.
अमिताभचा राजकारण प्रवेशही गाजला. अर्थात  हा निर्णय भावनाशीलतेतून घेण्यात आला होता. आई इंदिरा गांधी यांच्या निधनानंतार राजकारणात आलेल्या राजीव गांधींना आपल्या आजूबाजूला विश्वासातील माणसे हवी होती. मित्र अमिताभ त्यासाठी परिपूर्ण होता. अमिताभ अलाहाबाद मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी झाला. पण महत्त्वाकांक्षी राजकीय नेत्यांनी त्याची आवस्था अभिमन्यूप्रमाणे केली. राजकारण सोडण्याशिवाय त्याच्यासमोर पर्याय राहिला नाही. राजकारणातला घोडेबाजार कवीच्या मुलाला मानवला नाही आणि तो पुन्हा 'शहेनशा' च्या रुपाने कलात्मक क्षेत्राकडे वळला. १९८६ साली के. भाग्यराजचा संस्मरणीय 'आखरी रास्ता' प्रदर्शित झाला. कथा अतिशय सुरेख होती. पुढे चुका होत गेल्या अर्थात या सगळ्या चुकांना एकटा अमिताभ जबाबदार नव्हता.त्याचे जुने दिरग्दर्शक अमिताभसोबत यशाला ग्राह्य धरून बसले. 'गंगा जमुना सरस्वती' ही त्याची सुरुवात. 'जादुगार', तुफान' असल्या ठुकार कथानकाच्या चित्रपटांमुळे त्याचे चित्रपट चालेनासे झाले. 
मुकुल आनंदसारख्या दिग्दर्शकाने त्याला पुन्हा स्टारपदावर नेण्याचे ठरवले. १९९० मध्ये 'अग्निपथ', १९९१ मध्ये 'हम' आणि १९९२ मध्ये 'खुदा गवाह' आला. पण अंडरवर्ल्ड, गुन्हेगारी पार्श्वभूमीने उदवस्त झालेले कुटुंब, कॉस्चुम ड्रामा असा विविध प्रयत्न असूनही चित्रपट चालले नाहीत. 'अजुबा', इंद्रजीत, अकेला, इन्सानियत असले चित्रपट त्याच्या कारकिर्दीला आणखी खोलात नेत गेले. मात्र त्याची धडपद सुरूच होती. याच कालावधीत टीव्ही एशिया काढला. एबी कॉर्पोरेशनची घोषणा झाली. ही त्याच्यासाठी सर्वात मोठी आनि वाईट घटना होती. यामुळे त्याच्या गुणावगुणांवर प्रसारमाध्यमातून प्रकाश टाकण्यात आला. अनिवाशी भारतीयचा मुद्दाही गाजला. मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन गाजले. परंतु या सगळ्या गोष्टी सुरू असताना अमिताभ शिकतच होता. चुका सुधारण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचबरोबर त्याच्या अंतर्मनातही बदल होत होता. वय आणि अनुभव यामुळे त्याच्या स्वभावात बदल घडत गेला. शिवाय त्याच्या अभिनयातही निहार येत राहिला.
या दरम्यान त्याचे चित्रपटही पडद्यावर येत होते. 'मृत्युदाता' , 'लाल बादशहा' , ' सूर्यवंशम', 'मेजरसाब'  सारखे चित्रपट आले आणि गेले. पण त्याने संकटांना आणि अपयशाला धीराने तोंड दिले.  २००० मध्ये या सुपरस्टारने ' कौन बनेगा करोडपती' द्वारे या सुपरस्टारने छोट्या पदद्यावर पर्दापण केले. त्याचवेळी ' मोहबतें' आला. यामुळे त्याच्या कारकिर्दीला नवी आणि नव्याने सुरूवात झाली. मुख्य प्रवाहातल्या चरित्र भूमिकांना त्याने प्राधान्य दिले. आज सत्तरी ओलांडली तरी तो नव्या दमाने काम करीत आहे. उलट वय वाढत जाईल तसतसे त्याच्यात तारुण्याचा पुनश्च: शिरकाव होत आहे काय असे वाटत असल्यासारखा त्याचा जोश दिसत आहे. आजच्या घडीला त्याच्यासारखा तोच, एकमेवाद्वितीय असा चित्रसृष्टी व्यापून राहिला आहे.
२५ वर्षांपूर्वी अमिताभने जेव्हा त्याच्या स्वतःच्या व्यक्तिरेखेच्या वडिलांची भूमिका केली होती तेव्हा त्याने साकारलेली वृद्ध व्यक्तिरेखा ही त्याच्या आजच्या रुपापेक्षा तुलनेने शांत आणि शरीराने दमछाक झालेली होती. वास्तवात अमिताभ अधिकच जोशपूर्ण  आणि उत्साही  दिसत आहे. अमिताभला 'बागबान' मधून या वयातही नायिकेसोबत प्रेमदृश्यं करायला मिळतील किंवा ' कजरा रे...' या गाण्यात तरुण पिढीला स्वतःच्या तालावर नाचवता येईल असं भाकित कोणाला करता आलं नसत? धमाकेदार नृत्य, जबरदस्त अभिनय, अनेक कंपन्यांचा राजदूत, स्टेज शो.... किती तरी ठिकाणी अमिताभ एकाचवेळी काम करताना दिसतो.त्याने नायकाकडून चरित्रकलाकारापर्यंतचा प्रवास सहजतेने केलाच, शिवाय चरित्र भूमिकेत मध्यवर्ती स्थानी राहून या वयातही सेक्स सिंबॉल बनला. 'ब्लऍक',  'सरकार' , ' विरुद्ध'
कभी अलविदा न कहना (समर जीत सिंह तलवार), बाबुल (बलराज कपूर), 2007- नि:शब्द (विजय) एकलव्य (एकलव्य), चीनी कम (बुद्धदेव गुप्ता), शूट आऊट एंड लोखंडवाला (डींगरा), झूम बराबर झूम (सूत्रधार), रामगोपाल वर्मा की आग (बब्बन सिंह), गंगा (भोजपुरी), 2008- भूतनाथ (कैलाशनाथ/भूतनाथ), सरकार राज (सुभाष नागरे), दि लास्टलियर (हरीश मिश्रा), गॉड तुसी गेट्र हो (गॉड अलमाइटी), 2009- अलादीन (जीनियस), पा (औरो), 2010- रण (विजय हर्षवर्धन मलिक), तीन पत्ती (वैंकट सुब्रमण्यम), कंधार (मलयालम) (लोकनाथन शर्मा), 2011- बुड्ढा होगा तेरा बाप (विजू), आरक्षण (प्रभाकर आनंद) ने त्याची कीर्ती कायम राखली.
आज चित्रपटसृष्टीत सगळ्यात व्यस्त कोण असेल तर अमिताभ बच्चन शाहरुख खान, अमिर खान, हृतिक रोशन याम्च्यासारखे आघाडीचे कलाकार वर्‍शाला एखाद-दुसरा चित्रपट काढतात. मात्र हा कलाकार मात्र दोन-दोन, तीन तीन चित्रपटही करीत आहे. वय वाढेल तसे त्याने कामात अधिक गुंतवून घेतल्याचे दिसते. रात्री अकरा-बारा वाजेपर्यंत तो कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असतो. पहाटे पाच वाजता त्याचा दिवस सुरू होतो. शेवटी त्याच्यासारखा तोच. या वाढदिवसाच्यानिमित्ताने  त्याला लाख लाख शुभेच्छा ! - मच्छिंद्र ऐनापुरे 

Saturday, October 8, 2011

मच्छिंद्र ऐनापुरे यांना पत्रलेखनाचा पुरस्कार

इचलकरंजी / प्रतिनिधी
येथील वृत्तपत्र पत्रलेखक संघाच्या चौदाव्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी (दि.9) रोजी वृत्तपत्र पत्रलेखकांचा मेळावा व उत्कृष्ट पत्रलेखन पुरस्कार वितरण असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. संघाचे अध्यक्ष पांडुरंग पिसे यांनी ही माहिती दिली.

प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे प्रौढ व निरंतर विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. भालबा विभूते उपस्थित राहणार आहेत. पत्रलेखनासाठी पत्रलेखकांना प्रेरणा मिळावी यासाठी गेल्या अकरा वर्षापासून संघाच्या माध्यमातून प्रतिमहिना प्रसिद्ध झालेल्या एका पत्राला उत्कृष्ट पत्रलेखनाचा पुरस्कार दिला जातो. तेरा पत्रलेखकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. जयश्री मांडवकर, अशोक आफळे, आसमा मुजावर, प्रकाश चौगुले, अतुल देसाई, स्वाती पाटील-निंबाळकर, ज्योती पाटील, हणमंत शिंदे, प्रा. एम. बी. देशमुख, मच्छिंद्र ऐनापुरे, सुनीता जाधव, विजय रवंदे, मनोज खेतमर यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Tuesday, October 4, 2011

बालकथा दोन संन्यासी

सूर्य मावळतीला पोहचला होता. या वेळेला नावेतून आलेले दोन संन्यासी नदी किनार्‍याला लागले. त्यातला एक तरुण होता तर दुसरा वृद्ध. त्यांनी नावेतून उतरल्यावर नावाड्याला विचारले," सूर्य मावळण्यापोर्वी आम्ही गावात पोहचू शकू का? ' जवळच गाव होते. गावाभोवती तटबंदी होती. या गावाचा एक नियम होता. सूर्याच्या अस्ताबरोबरच गावाचा मुख्य दरवाजाही बंद केला जात असे. वृद्ध नावाडी म्हणाला, ' तुम्ही सावकाश जाल तर पोहचाल पण वेगाने, घाईगडबडीने जाल तर मात्र पोहचू शकणार नाही.' दोघांनाही आश्चर्य वाटले." हा असे का सांगतो, हा वेडा आहे, ' असा त्यांनी मनात विचार केला. आता याच्या तोंडाला लागण्यात अर्थ नाही असे समजून त्यांनी गावची वाट धरली. वेळेत पोहचण्याच्या इराद्याने ते भरभर चालू लागले. सूर्य मावळण्यापूर्वी पोहचलो नाही तर रात्र गावाबाहेरच काढावी लागेल, या भीतीने ते आणखी वेगाने चालू लागले. इतक्यात वृद्ध संन्यासी ठेच लागून पडला. त्याच्या डोक्यावरचे ग्रंथांचे गाठोडेही पडले. ग्रंथ इतस्तः विखुरले. काहींची पाने वार्‍याने उडून गेली. तरुण संन्याशाची मोठी तारांबळ उडाली.
मागून नावाडी आपली नाव ठिकाणाला लावून येत होता. तो जवळ आला तेव्हा तरुण संन्यासी वृद्ध संन्याशाच्या पायातील जखम  साफ करून  पट्टी बांधत होता. नावाडी त्यांना म्हणाला,"" मित्रांनो, मी सांगितले होते की सावकाश जाल तर पोहचाल. आणि घाईगडबड कराल तर मात्र पोहचणार नाही... माझं तुम्ही ऐकलेले नाही.'' तेव्हा दोघांच्या लक्षात आले की, सावकाश चालणे हीसुद्धा एक कला आहे.
                                                       - मच्छिंद्र ऐनापुरे, जत  

ये दोस्ती हम तो तोडेंगे

अमिताभ बच्चन आणि अमजद खान यांचा ' याराना' आपण पाहिला आहे. एकमेकांसाठी सर्वस्व त्यागणार्‍या या मैत्रीमध्ये विघ्नसंतोषी विघ्न आणतात. पण शेवटी मैत्रीचा विजय होतो. ही झाली चित्रपटातली मैत्री. पण 'रियल लाईफ' मध्ये दोस्ती तुटण्याच्या घटना आजूबाजूला सतत घडत असतात.कालचे दोस्त आज एकमेकांची तोंडेसुद्धा पाहायला तयार होत नाहीत. आपल्या अमिताभ आणि अमरसिंग यांच्या मैत्रीचेच उदाहरण घ्या. त्यांच्या मैत्रीला 'अमरप्रेम' म्हटले जायचे. पण काळाने पलटी खाल्ली आणि मैत्रीचे संदर्भही बदलले. बरीच ओरड झाल्यावर अमिताभ अमरसिंगास भेटायला तुरुंगात गेले पण हा नाटकीपणा सार्‍या देशाला कळून आला. अमिताभच्या चित्रपट आणि वास्तव जीवनातला फरकही लक्षात आला. 
भारतीय टेनीस जगतातील महेश भूपती आणि लिएंडर पेस यांच्या मैत्रीची चर्चा सातासमुद्रापार केली जात होती. या दोघांनीही दुहेरीमध्ये आपली हुकूमत ठेवली होती. पण कोण जाणे, काय झालं ? अचानक दोघांच्या मैत्रीत दरार आली. दोघांच्यातले मतभेद चव्हाट्यावर आल्यावर सारेच संपले. दोघांनीही एकमेकांसोबत न खेळण्याचा निर्णय घेतला. इतकंच नव्हे तर एकमेकांचे तोंड न पाहण्याच्या शपथाही घेतल्या. आता अलिकडे डेविस कपमध्ये दोघे एकत्र आले, पण ती पहिली जादू  खेळात दिसली नाही.
संजय दत्त आणि संजय गुप्ता जुने मित्र. संजय गुप्ताने चित्रपटाची निर्मिती करावी आणि संजय दत्तने त्यात भूमिका करून आपली दोस्ती निभावावी. पण एकाला वाटले, दुसरा आपला फायदा घेतोय आणि दुसर्‍याला वाटले, आपलीही एक 'आयडेंटी' आहे. झालं! जुने मित्र वेगळे झाले. तेव्हापासून आजतागायत या दोघाम्मधून विस्तव जात नाही. प्रसारमाध्यमांनी त्यांच्यावर भरभरून लिहलं आणि बोललंही पण यांनी थोडंच बोलून जगाला बरंच काही सांगून टाकलं.
पैसा, ताकद आणि नाती एकदम सांभाळणं तसं कठीण काम. अशात आयपीएलचा तमाशा  असेल तर बाब आणखीनच गंभीर. ललित मोदी आणि शशी थरूर यांची ओळख तशी फार जुनी नव्ह्ती. आयपीएलच्या कोची टीमने त्यांची मैत्री गडद केली. पण सोशल वेबसाईट ट्वीटरच्या  सततच्या ' ट्वीट्'ने दोघांमध्ये दरी आणली. पैशाची ताकद नाती सांभाळण्यास असमर्थ ठरली. दोघेही वेगळे झाले. तेव्हा त्यांनी जी बयानबाजी केली, ती पुन्हा सांगण्याची खरे तर आवश्यकताच नाही.
प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता डिनो मोरियो आणि कॅली दोरजी यांच्या मैत्रीत दरार आणायला त्याची मैत्रीण लारा दत्ता कारण  बनली. दोघांची मैत्री बॉलीवूडमध्ये फेमस होती. पण आज तो इतिहास बनला आहे. आज ते एकमेकांविषयी फारसे बोलत  नाहीत.पण बोलले तर  दुश्मनीचे रंग लपत नाहीत.
शाहरुखचे बॉलीवूडमध्ये मित्र आधीच कमी. पण जे मित्र आहेत किंवा होते, त्यांच्याशी त्याची मैत्री वाखाणण्यासारखी असते, असे म्हटले जाते. शाहरुख मैत्रीला जागतो, म्हणतात. अशीच  फराह खान आणि त्याची मैत्री या मायानगरीत ' बेस्ट बडीज' मानली जात होती. परंतु, आता त्यांच्यात ही मैत्री


राहिलेली नाही. त्यांच्या मैत्रीबाबत म्हटले जात होते की, दोघेही एकमेकांशिवाय कधी कुठली असायनमेंट करणारच नाहीत. पण त्यांच्यातल्या अधिकच्या गोडीत मिठाचा खडा पडला.  आणि काम बिघडले. दोघांमध्ये अशा काही घटना घडल्या की, फराहने आपल्या ' तीस मार खाँ' मधून शाहरुखला आऊट करून टाकले. आता दोघांच्या मैत्रीच्या नात्यात अजिबात मिठास राहिली नाही. अर्थात जुन्या मैत्रीचा आदर करीत या दोघांनी सार्वजनिकरित्या एकमेकांविषयी बोलण्याचे टाळले आहे.
बॉलीवूडचा बादशहा आणि दबंग सलमान खान यांचा उल्लेख केल्याशिवाय ' दोस्ती ते दुश्मनी' या प्रवासाचा शेवट हो ऊच शकत नाही. या दोन दिग्गज कलाकारांसाठी ' टॉक ऑफ द टाऊन ' या इंग्रजी म्हणीचा खास उल्लेख केला जातो. त्यांची कुठलीही ऍक्टीविटी बातमी बनून जाते. वास्तविक बॉलीवूडमध्ये दोस्ती-दुश्मनी कायम स्वरुपाची कधीच नसते. पण या दोघांची दुश्मनी दिवसेंदिवस जुनी होत चालली आहे. कटुता वाढत आहे. दोघे मित्र होते, तेव्हाही चर्चा होती आणि आताही होत आहे. एकदा बोललेला शब्द माघारी घेतला जात नाही, तसे एकदा तुटलेली  मैत्री पुन्हा   जोडली जात नाही, असेच काहीसे  चिन्ह आपल्याला  आजूबाजूला दिसत आहे. पण पुन्हा  मैत्री जोडलीच  तर मात्र त्यात  पूर्वीचा मिठास राहत नाही . एवढे मात्र खरे !             - मच्छिंद्र ऐनापुरे, जत  

बालकथा कुत्रा, मांजर आणि उंदीर

खूप जुनी गोष्ट आहे. तेव्हा कुत्रा , मांजर आणि उंदीर यांच्यात दाट मैत्री होती. एकदा कुत्र्याला काही कामानिमित्ताने दुसर्‍या गावाला जाणे भाग पडले. जाताना त्याने आपल्याजवळील आवश्यक कागदपत्रे देखभालीसाठी मांजराकडे दिली. आणि तो निघून गेला.
काही महिने उलटले. तरीही कुत्रा काही आला नाही. मांजराने विचार केला, आता काही दिवस कागदपत्रे सांभाळण्यास उंदराकडे द्यावीत. शेवटी हो ना करत त्याने मैत्री कर्तव्याखातर कागदपत्रे घेतली. आणखी काही महिने गेले. थंडीचे दिवस आले. कडाक्याची थंडी पडू लागली. उंदराला थंड सहन होईना. थंडीने तो कुडकुडू लागला. त्याने विचार केला, या जिवघेण्या थंडीपासून सुटका करून घेण्यासाठी या कागदांचा चांगला उपयोग होईल. मग काय! उंदराने त्या कागदाचेच घर बनवले. आणि त्या घरात आरामात राहू लागला. त्याची थंडी पळून गेली. शिवाय अन्नासाठी त्याला कुठे बाहेर जावे लागले नाही. घरात स्वस्थ बसून कागद कुरतडून खाऊ लागला.
काही दिवसाने कुत्रा माघारी आला. त्याने मांजराकडे आपल्या कागदपत्रांची मागणी केली.  मांजराने त्याला उंदराकडे नेले. तेथे पाहतो तर उंदराने कागदपत्रांची  पार दुर्दशा करून टाकली होती. अनेक कागदांचा भुगा करून टाकला होता.  कागदपत्रांची ही आवस्था पाहून मांजर संतापले. उंदराची बेफिकीरी त्याला सहन झाली नाही. मागचा पुढचा विचार न करता तो उंदरावर धावून गेला. उंदीर घाबरून पळू लागले. इकडे कुत्र्याला मांजराचा राग आला. कसलाही विचार न करता मांजराने उंदराकडे कागदपत्रे दिलेच कशी , असा सवाल करत कुत्राही मांजराच्या पाठीमागे लागला. तेव्हापासून मांजर उंदराच्या आणि कुत्रा मांजराच्या पाठी धावू लागला.
                                                          - मच्छिंद्र ऐनापुरे, जत    

बालकथा एक होती तारका

गोष्ट प्राचीन काळची आहे. एका गावात एक वृद्ध जोडपे राहात होते. त्यांना मूलबाळ नव्हते. पण तरीही ते कुणाला दोष न देता दिवस आनंदात  घालवत  होते.
एका दिवसाची संध्याकाळ. दोघेही शेतातून घरी परतत होते. वाटेत त्यांना एक लाकडी पेटी दिसली. त्यांनी काही वेळ कसलासा विचार केला आणि पेटी उचलून घरी आणली. त्याचे कुलूप फोडून  ती उघडली. आणि पाहतात तर काय , आत सुंदर, गोंडस चिमुरडी  मुलगी शांत झोपली होती. तिला पाहताच दोघांना खूप खूप आनंद  झाला. जणू काही ही सुंदर मुलगी परमेश्वरानेच पाठवली आहे असे त्यांना वाटले. तसे समजूनच देवाचे आभार मानून त्यांनी तिचा सांभाळ करण्याचे ठरवले.
ते तिच्या संगोपनात गर्क झाले. तिला अगदी फुलासारखे जपू लागले. दिवस जात होते, तशी ती मोठी होत होती. ती अधिकच देखणी दिसू लागली. ती त्या दोघा वृद्धांनाच माता-पिता समजू लागली. त्यांच्या प्रत्येक आज्ञेत राहू लागली. शिवाय त्यांची काळजी करू लागली. त्यांना कामात मदत  करू लागली. दोघांनी तिचे नाव तारका ठेवले.
वयात आली तेव्हा तर ती एखाद्या राजकन्येहून अधिक सुंदर दिसू लागली. तिच्या सौंदर्याची कीर्ती सर्व दूर पसरली. तिला मागणी घालण्यासाठी लांब लांबचे राजपुत्र, राजे- महाराजे येऊ लागले.  तिच्या सौंदर्यावर भाळून , तिचा विरह सहन न होऊन कित्येक वेडेपिसे झाले. मात्र तिने कुणालाच दाद दिली नाही. सगळ्यांना तिने स्पष्ट नकार दिला.
एक दिवस त्या राज्याचा सम्राट स्वतः तिला पाहायला आला. तिच्या सौंदर्यावर तोही भाळला. त्याने लगेच तिला लग्नाची मागणी घातली. पण तारकाने त्यालाही नकार दिला. त्याने तिला पळवून नेण्याची धमकी दिली. त्यावर तारका त्याला म्हणाली, ' माझा पती चंद्र आहे. त्या सुधारकाची मी राणी आहे. माझे लग्न त्याच्याशी झाले आहे. मी लवकरच त्याच्याकडे आकाशात परतणार आहे. त्यामुळे राजा अविचार सोडून दे.'
भल्या भल्या राजा- महाराजांना आपले मांडलिकत्व पत्करायला लावणार्‍या सम्राटाचा अहंकार दुखावला. त्याला   तिच्या नकाराचा संताप आला.  त्याने गर्जना केली, ' तू चंद्राकडे जातेसच कशी ते मी पाहतो.' त्याने सिपायांना आदेश दिला. ' तारका आणि त्या चंद्रावर बारीक नजर ठेवा. पळून चालली तर तिला ठार मारा. '
सम्राटाच्या सिपायांनी जागता पाहारा ठेवला. दुसर्‍यादिवशी अंधार होताच, आकाशात ढगांनी गर्दी केली. जोराचा वारा सुटला. लोक सैरावैरा धावू लागले. इतक्यात तारका दिशेने आकाशातून प्रचंड मोठा एक प्रकाशाचा गोळा आला आणि काही क्षणात तारकाला वरती घेऊन गेला.  तिच्यासोबत वृद्ध माता-पिता गेले. शेवटी सम्राटाचा अहंकार आणि क्रोध व्यर्थ गेले. ( जपानी लोककथा)                                                                   - मच्छिंद्र ऐनापुरे, जत    

बालकथा एक दिवसाचा राजा

एका गुरूकुलात राजपुत्रासोबत  व्यापार्‍यांची दोन मुलंही अध्ययन करीत होती. अध्ययनाच्या शेवटच्या वर्षी व्यापारीपुत्र राजपुत्रापासून लांब लांब राहू लागले. राजपुत्राने त्यांना कारण विचारले. त्यावर शेठपुत्र म्हणाले,  'तू राजपुत्र आहेस. आज ना उद्या राजा  होशील. आम्ही मात्र व्यापारीच होऊ आणि आपले पोट भरत राहू. कुठे तू आणि कुठे आम्ही. तुझ्यापासून लांब असलेलंच बरं.'   राजपुत्र म्हणाला, ' तुम्ही माझे मित्र आहात. मैत्री राहिली तर भविष्यात कधी ना कधी मी तुम्हाला एक दिवसाचा राजा बनवीन.' ऐकून दोघा मित्रांना खूप आनंद झाला.  अध्ययन पूर्ण झाल्यावर सगळे आपापल्या घरी परतले.
काही काळ लोटला. राजपुत्र राजा बनला. तिकडे शेठपुत्रसुद्धा आपापल्या नगरीतले  शेठ म्हणून ओळखले जाऊ लागले. दिवस जात होते. एक दिवस पहिल्या शेठपुत्राला व्यापारात मोठा तोटा झाला. कर्ज देणार्‍यांनी तगादा लावला. त्याला आपल्या राजपुत्र मित्राची आठवण झाली. तो त्याच्याकडे गेला. आणि आपल्या वचनाची आठवण करून दिली. राजा म्हणाला,' ठीक आहे, आज दिवसभर तू राज्यकारभार सांभाळ.'
शेठपुत्राने पहिल्यांदा कोशाध्यक्षास बोलावणे पाठवले.  शेठपुत्रास  कर्ज दिलेल्या लोकांनाही बोलावण्यात आले. कोषाध्यक्षास राज खजिन्यातून व्याजासह मुद्दल देण्यास सांगितले. त्यानुसार देणेकर्‍यांचे सारे पैसे चुकते करण्यात आले. सगळ्यांना आनंद झाला. काही धन त्याने परोपकारात घालवले. घोडागाडी भरून सोने-चांदी आपल्या घरी पाठवून सुखी आणि संपन्न झाला.
काही दिवसांनी दुसर्‍या व्यापारीपुत्राचा धंदाही डळमळीत होऊ लागला. तोसुद्धा आपल्या राजपुत्र मित्राकडे गेला. वचनाची आठवण करून दिली. राजा म्हणाला, ' उद्या या नगरीचा राजा तू हो.' शेठपुत्र हर्षोल्हासित झाला. दुसर्‍यादिवशी सकाळी उठल्यावर त्याने सेवकांकरवी दाढी केस बनवले. मालिश करवून घेतली. अंघोळ केली. राजवस्त्रे नेसली. नंतर भोजनखान्यात राजेशाही भोजनावर मनसोक्त ताव मारला. यामुळे त्याचे शरीर जड झाले. त्याला झोप येऊ लागली.त्याने विचार केला, थोडा वेळ आराम करावा आणि मग राजदरबारात जाऊन कारभार पाहावा. एक दिवसाचा राजा राजमाहालात जाऊन झोपला. जाग आली तेव्हा सूर्य मावळत होता. तो घाबरला. पण आता त्याच्या हातात काही राहिले नव्हते. कारण त्याची वेळ संपली होती. तो जसा आला , तसा राजमाहालातून बाहेर पडला. त्याने वेळेचे महत्त्व जाणले नाही. ( राजस्थानी लोककथा)
                                                         - मच्छिंद्र ऐनापुरे, जत