Wednesday, May 16, 2012

... आणखी किती बळी देणार आहोत आपण!

     रस्ता अपघाताच्याबाबतीत भारताची सार्‍या जगात छी: तू झाली आहे. जगभरात प्रत्येक तासाला होणार्‍या रस्ता अपघातात २५ वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांची संख्या ४० आहे. म्हणजे यात एक तृतीयांश भारतीय आहेत. आणखी एक धक्कादायक बाब अशी की,  दरवर्षी होणार्‍या रस्ता अपघातामुळे भारताला २० अब्ज डॉलरचे नुकसान सोसावे लागत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार एवढ्यात पैशात देशातल्या पन्नास टक्के कुपोषित बालकांना पोषण आहार दिला जाऊ शकतो. २०१० मध्ये भारतात १.३४ लाख लोक रस्ता अपघातात मरण पावले आहेत. राष्ट्रीय गुन्हा रेकॉर्ड ब्युरोनुसार ९९ टक्के अपघात मद्यपान करून गाडी चालवल्याने घडले आहेत. दहशतवादामुळे दरवर्‍शी दोन हजार माणसे मेली तर तो राष्ट्रीय चिंतेचा विषय होतो. मात्र रस्ता अपघातात तब्बल लाख- दीड लाख   माणसे मरत असताना याची दखल गांभिर्याने घेतली जात नाही, हे मोठे दुर्दैव आहे. विशेष म्हणजे यात महाराष्ट्र आघाडीवर आसावा, यात आणखी ते दुर्दैव कोणते? रस्ता अपघातात महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात २०१० मध्ये देशात ३ लाख ८४ हजार ९४९ माणसे रस्ता अपघातात मरण पावली. यात महाराष्ट्रातील सर्वाधिक ६४ हजार २०४ लोकांचा समावेश आहे. मध्यप्रदेशमध्ये रस्ता अपघातात ३५ हजार ६१७ माणसांचा बळी गेला आहे. त्यांचा देशात दुसरा क्रमांक आहे.
     आपल्या देशात जड वाहनामुळे दरवर्षी १२५ लाख माणसे अपघातात आपला जीव गमावतात. तर ५ लाखापेक्षा अधिक लोक गंभीर जखमी होतात. योजना आयोगाच्या रिपोर्टनुसार या अपघाताम्मध्ये ७५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. ही बाब मोठी चिंताजनक म्हटली पाहिजे. देशभरात रोज कुठे ना कुठे असा प्रकार घडत असतो. गर्दीच्या हाती सापडलेल्या चालकाला मारहाण, रास्ता रोको किंवा वाहनांची तोडफोड या घटना आता सामान्य झाल्या आहेत. यातून होणारे नुकसान मोठा चिंतेचा विषय असून ज्याची चूक नाही, त्यालाही नुकसानीला सामोरे जावे लागते. असा हा मामला विचित्र आहे. म्हणजे एकदा घरातून गेलेल्या माणसाची माघारी येण्याची शाश्वती तर  नाहीच. पण शिवाय तो जिवंत आलाच तर कशा अवस्थेत येईल, काही सांगता येत नाही.  चूक नसलेल्या लोकांनाही हकनाक या अपघातांचा झटका बसतो.
     अपघाताला कुठले एक कारण पुरेसे नाही. त्याला अनेक कारणे आहेत. शासन, प्रशासन आणि निष्कालजीपणाने ,बेदरकारपणे गाडी चालवणारी माणसे त्याला कारणीभूत आहेत. आपल्या देशात रस्त्यांची अवस्था मोठी भयावह आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आपल्या सरकारी व्यवस्थेतून कुठलीच यंत्रणा   सुटलेली नाही. त्यामुळे रस्त्याच्या कामातल्या भ्रष्टाचारामुळे रस्ते मजबूत होत नाहीत. त्यांचा दर्जा अगदीच तकलादू असतो.  एका पावसाळयातच त्याची वाट लागलेली असते.  शिवाय  डागडुजीबद्दलचा निष्काळजीपणा हा आणखी एक मोठा कळीचा मुद्दा आहे.  डागडुजीबाबत शासन गंभीर नाहीच शिवाय दुरुस्ती केलीच तर वरवरची असते. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे निष्पाप प्रवाशांच्या मृत्यूचे निमंत्रक बनले आहेत.वाहन बेदरकार चालवणार्‍यांनावरही कुठले नियंत्रण राहिलेले नाही. रस्ता म्हणजे आपल्या बापजाद्याची इस्टेट असल्यासारखी माणसे वागत असतात.  यात आपली युवा पिढी आघाडीवर आहे. वर पाहिलेल्या आकडेवारीवरून आपल्या ते लक्षात येईल. युवा पिढी जिवाची पर्वाच करायला तयार नाही. त्यांना बेदरकारपणा आणि धूमचा शौक भावला आहे. पण त्यांना आपल्या मागे कुणी आहे, आपल्या पुढच्या आयुष्यात बरेच काही कर्तृत्व करायचे बाकी आहे, याची अजिबात चिंताच नाही. आई-वडीलही त्यांना मोकळीक देत असतात. त्यांच्यावर बंधने घालण्यास कचरतात. मुले आता भावनिक ब्लॅकमेलचा लाभ उठवून विविध गैरमार्गाचा अवलंब करत आहेत. वास्तविक पालकांनी सगळ्याच बाबतीत कठोरता बाळगायला हवी. आठरा वर्षे पूर्ण झाल्याखेरीज पाल्याच्या हातात वाहन सोपवू नये. यामुळे बर्‍याच गोष्टींना आळा बसेल.
     रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढली आहे. रोज मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून वाहने चालवताना स्वतः बरोबरच दुसर्‍याची काळजी घेणे आवश्यक बनले आहे. मात्र आपल्याकडे वाहन चालवताना जसा निष्काळजीपणा बाळगला जातो तसा वाहनांच्या काळजी घेण्याच्याबाबतीतही घडत आहे. वाहनांची वेळच्यावेळी काळजी घेतली जात नाही. वेळच्यावेळी ऑईलबदलीसारखी, ब्रेकफेलची कामे, वाहनांची स्वच्छता या गोष्टी व्हायलाच हव्यात. जड वाहनांच्याबाबतीत तर सर्वदृष्टीने काळजी आवश्यक आहे. शिवाय वाहने जपून चालवायला हवीत. वेगावर मर्यादा हवी. 'मनावर ब्रेक, उत्तम ब्रेक' हे ध्यानात ठेवायला हवे. शासनानेही रस्ता दुरुस्ती, रस्त्यांच्या दर्जेबाबत काळजीने लक्ष द्यायला हवे. रस्त्याची कामे चांगली न करणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून अन्य लोकांकडून चांगल्या प्रकारे कामे करून घेता येतात. रस्त्यांच्या कामांची वेळोवेळी पाहणी व्हायला हवी. रस्ते म्हणजे दळणवळणाच्या रक्तवाहिन्या आहेत. गाव, शहर, जिल्हा, राज्य आणि देश यांच्या विकासात रस्त्यांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे त्यांची चिंता व्हायलाच हवी. सर्व काही शक्य आहे, पण त्याला इच्छाशक्तीची गरज आहे. शासनाने त्याकडे गंभीरपणे पाहण्याची आवश्यकता आहे.          
dainik saamana 23/5/2012                                                                            

Tuesday, May 15, 2012

चित्त्याची शिकार होणार नाही याची काय खात्री!

चित्ता हा सर्वात चपळ प्राणी; पण या प्राण्याचा हिंदुस्थानातून कधीचाच नायनाट झाला आहे. चित्त्याची ओळख फक्त चित्रातूनच केली जात असताना हिंदुस्थान सरकार चित्त्याचे संवर्धन आपल्या जंगलांमध्ये करणार असल्याची बातमी आली आहे. आफ्रिकेतील नामिबिया या देशातून १२ चित्ते हिंदुस्थानात आणले जाणार असून त्यांना मध्य प्रदेशातल्या कुनो पालपूर अभयारण्यात सोडले जाणार आहे. जून महिन्यात या चित्त्यांचे आगमन हिंदुस्थानात होत असून सध्या कुनो पालपूर अभयारण्यात त्यांच्या भोजनासाठीची आवश्यक ती व्यवस्था केली जात आहे. नामिबिया एकूण ५० चित्ते हिंदुस्थानास देण्यास तयार झाला आहे. त्यांना मध्य प्रदेशाबरोबरच राजस्थानमधील जैसलमेर आणि गुजरातमधील जंगलांमध्ये जोपासले जाणार आहे.
यापूर्वी सत्तरच्या दशकात इंदिरा गांधी पंतप्रधान असताना इराणमधून चित्ते आणण्याची योजना आखण्यात आली होती; परंतु आणीबाणी आणून हुकूमशाहीचा अवतार धारण करू पाहणार्‍या इंदिरा गांधींना यासंबंधातल्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी फुरसतच मिळाली नाही. त्यामुळे ही योजना बारगळली. सध्याच्या घडीला इराणमध्येसुद्धा केवळ ५० चित्तेच उरले आहेत. सध्या फक्त आफ्रिकेच्या व इराणमधल्या जंगलांतच चित्ता आढळून येतो. नामिबिया सरकार चित्त्याच्या शिकारीमुळे त्रस्त आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर आणि तितक्याच वेगाने जंगलांवर अतिक्रमण होत आहे. तेथील गवताळ मैदाने नष्ट होत चालली आहेत. त्यामुळे तिथले सरकार ५० चित्ते हिंदुस्थानला देण्यास तयार झाले.
हिंदुस्थानात एकेकाळी हजारोंच्या संख्येने चित्त्याचे वास्तव होते. मोगल बादशहा अकबरच्या काळात शिकारपट्ट्यात पाच हजारांच्या आसपास चित्ते असायचे. छत्तीसगड ते कर्नाटक आणि तामीळनाडू ते पुढे केरळपर्यंतच्या विशाल जंगली पट्ट्यात चित्त्यांचे साम्राज्य होते. असे म्हटले जाते की, सरगुजाचा राजा रामानुज शरणसिंह या एकट्याने १ हजार ३६८ वाघांची शिकार केली होती आणि १९६८ मध्ये देशातल्या शेवटच्या चित्त्याची शिकारसुद्धा त्यांनीच केली होती. चित्त्याच्या हिंदुस्थानात होणार्‍या आगमनाने चित्त्याची जात नष्ट केल्याचा कलंक पुसला जाणार आहे. गेल्या ४० वर्षांत देशातल्या बालगोपाळांना चित्ता चित्रात दाखवला जात होता. आता तो प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे. चित्त्याच्या आगमनामुळे हौशी लोकांच्या पर्यटनात वाढ होण्याची शक्यता असली तरी चित्त्याच्या शिकारीचीही साशंकता टाळता येण्याजोगी नाही. चित्ता तर आपण नष्ट केलाच, पण आपला राष्ट्रीय पक्षी असलेला वाघही आता धोक्यात सापडला आहे. कधीकाळी ४० हजारांहून अधिक वाघ हिंदुस्थानातल्या जंगलांमध्ये होते, पण २०१० च्या सर्वेक्षणानुसार एक हजार ७०६ च वाघ शिल्लक उरले आहेत. गेल्या पाच वर्षांत आजार, वय, शिकार व अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे ३७० वाघ नष्ट झाले. यात ६८ वाघ शिकारीला बळी पडले आहेत. वाघाच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी १७ राज्यांवर १४५ कोटी रुपये केंद्राने खर्च केले आहेत. तरीही वाघांची शिकार होतच आहे. असे असताना चित्ता कसा सुरक्षित राहील हा प्रश्‍नच आहे.
चित्त्याला हिंदुस्थानात आणण्यालाही काही संघटनांनी विरोध दर्शविला आहे. मानवी आक्रमणामुळे जंगले नष्ट होत चालली असताना व हिंस्र श्‍वापदे मानववस्तीत घुसून धुमाकूळ घालत असल्याच्या घटना घडत असताना चित्ते हिंदुस्थानात आणून काय साधले जाणार आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यामुळे मोठे बिकट प्रश्‍न निर्माण होतील व गावेच्या गावे उठवावी लागतील, असे त्यांचे म्हणणे आहे. अर्थात चित्त्यासारख्या प्राण्याचे संवर्धन हिंदुस्थानात होणार असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे, पण वाघाप्रमाणे त्याचीही शिकार होणार नाही याची काय खात्री! त्यामुळे शेवटी मूळ हेतूलाच धक्का बसणार आहे.
- मच्छिंद्र ऐनापुरेsaamana, 15/5/2012

Monday, May 14, 2012

देशी धूनवर थिरकताहेत विदेशी बाला

      बॉलीवूड आणि भारतीय प्रेक्षक विदेशी बालांवर लट्टू झाल्याचं दिसतं. नाही तर या विदेशी बालांचं इतकं आयातीकरण झालं नसतं. आता प्रत्येक चित्रपटात विदेशी बाला देशी धूनवर थिरकताना दिसत आहेत. खरे तर विदेशी कलाकारांच बॉलीवूडमध्ये आयातीकरण तसं काही नवं नाही. पण आजकाल त्यात भलतीच वाढ झाली आहे. विदेशी ब्युटी तर यात आघाडीवरच आहेत. त्यांनी भारतीय प्रेक्षकांवर जादू केली असून त्यांना पसंद केलं जाऊ लागलं आहे.
      'राजनीती' मधली सारा थॉम्पसन असो , अथवा ' काईट्स' ची बार्बरा मोरी.  'रॉकस्टार' मधील नर्गिस फाखरी असो  किंवा 'एक था दीवाना' चित्रपटातील एमी जॅक्सन, त्यांचा तोंडावळा भारतीय वाटत असला तरी त्या परदेशातल्या आहेत. आजकाल छोट्या-मोठ्या भूमिकांसाठी विदेशी चेहरा असणं, सामान्य बाब झाली आहे. पण ऍक्ट्रेस म्हणूनही  बॉलीवूडमध्ये त्यांचा वावर वाढला आहे. बॉलीवूड आता हॉलीवूडच्या वळणावर चालला असताना विदेशी ब्युटीसुद्धा बॉलीवूडमध्ये स्वतः ला एक्सपोज करायला उत्तेजित झाल्या आहेत. बॉलीवूडमधला हा बदल त्यांना मोहवून टाकत आहे.
      कलाकार आणि निर्माता असलेल्या सैफ अली खानच्या गेल्याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'एजंट विनोद' मध्ये करिना कपूर लीड रोलमध्ये होती. तरीही सैफचे समाधान झाले नव्हते. त्यामुळे या चित्रपटात एक नव्हे तर दोन -दोन चेहरे त्याने आयात केले. त्यातली एक होती, इराणची मरियम जकारिया. हिने 'एजंट वोनोद' मध्ये करिनासोबत 'दिल मेरा मुफ्त का...' या गाण्यावर मुजरा डान्स केला आहे. इतकेच नव्हे तर सैफसोबत स्टंट दृश्येही दिली आहेत. दुसरी इंपोर्टेड सेक्सी एजंट म्हणजे मलिका हेडन. तिने सैफसोबत 'प्यार की पुंगी...' मध्ये डान्स केला आहे. शिवाय तिच्यावर 'आय विल डू द टॉकिंग... ' हे आयटम सॉन्गसुद्धा चित्रित करण्यात आले आहे.
      कॅनडाची पोर्न स्टार सनी लियोन हिने 'डिपार्टमेंट' मध्ये आयटम सॉन्ग कारावा, म्हणून रामगोपाल वर्मा खूपच तिच्या मागे लागला होता. पण तिला पहिल्यांदा साईन केलेल्या महेश भट्ट यांनी तिला त्याचे स्वातंत्र्य दिले नाही. ती त्यांच्या 'जिस्म २' मध्ये काम करत आहे. अखेरीस ती न मिळाल्याने रामने ब्राजिलियन ब्युटी नतालिया कौरला आयटम गर्ल बनवले.
      तिकडे सनी लियोन 'जिस्म २' द्वारा बॉलीवूड पडद्यावर आग लावायला निघाली आहे. 'बिग बॉस- सिझन ५' या रियालिटी शोमध्ये तिला इंट्री मिळाल्यावर ती खर्‍या अर्थानं प्रकाशात आली. यानंतरच  तिचे पोर्न व्हिडिओ पाहायला भारतात एकप्रकारची स्पर्धा लागल्याचे सांगतात. तिच्यावर सर्वात अधिक इंप्रेस झाले होते ते, महेश भट्ट.  पोर्न चित्रपटांशी ट्क्कर देऊ शकतील असे चित्रपट बनविणारे महेश भट्ट  बिग बॉस-५' संपण्याची वाट न पाहता  थेट 'बिग बॉस' च्या सेटवरच गेले आणि तिला 'जिस्म २' ची ऑफर देऊन टाकली. 'जिस्म२' हा बिपाशा बसूला हॉटेस्ट बनवणार्‍या आणि २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जिस्म'चा सिक्वल आहे. पण लियोन या चित्रपटात बिपाशाचीही मर्यादा ओलांडेल की नाही माहित नाही. मात्र तिने एका मुलाखती सांगितले होते की मी 'जिस्म २' मध्ये सेक्सी सीन करते आहे, पण सेक्स नाही. महेश भट्ट यांनी 'मर्डर २' साठी श्रीलंकन सुंदरी जॅकलिन फर्नांडिस शोधून आणली. तिच्यामुळेच 'मर्डर २' प्रदर्शनापूर्वीच हॉट बनला होता.
     श्रीलंकेतून ऍक्ट्रेस आयात करण्याचा सिलसिला अजून सुरूच आहे. चंडी परेरा श्रीलंकन मॉडेल आणि ऍक्टर आहे. 'एक सिंहनी' चित्रपट केलेल्या चंडी परेराचे पालनपोषण ऑस्ट्रेलियात झाले आहे. चंडी जॅकलिनची बहीण आहे. सध्या तिचा मुक्काम मुंबईतच आहे. दुसरी एक श्रीलंकन ब्युटी आहे, ती गम्या विजयदासा ! ती २००९ ची 'मिस श्रीलंका' आहे. जॅकलिनच्या यशामुळेच ती बॉलीवूडमध्ये येण्यास उत्तेजित आहे. ती मनिष मानिकपुरीच्या छत्तीसगड नक्षलवादावर आधरित असलेल्या ' अलाप' चित्रपटात 'चढती जवानी... ' वर आयटम सॉन्ग करत आहे.
      प्रसिद्ध हास्य अभिनेता चार्ली चॅपलीनची नात कियरा चॅपलीन राजश्री ओझा यांच्या 'चौराई' द्वारा भारतीय प्रेक्षकांसमोर येत आहे. कियरा 'जिक्यू' आणि 'एफएचएम' द्वारा जाहीर केल्या जाणार्‍या 'सेक्सी वूमन'च्या  यादीत सातव्या क्रमांकावर आहे. विदेशी बालांचा ओढा पाहता आगामी काळात अशा विदेशी बालांची बॉलीवूड इंट्री  अधिक असणार हे उघड आहे. शेवटी भारतीय प्रेक्षकांना त्या आवडू लागल्या आहेत. ते त्यांचे स्वागत करायला उत्सुक आहेत.

Thursday, May 10, 2012

बॉलीवूडचा अनमोल खजाना धोक्यात!

     भारतीय सिनेमाने आपली शंभर वर्षे पूर्ण केली आहेत. देशभरात त्याचा उत्सव साजरा केला जात आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या बाता केल्या जात आहेत. चित्रपटांमध्ये कशाप्रकारचे इफेक्टस द्यावेत, जेणेकरून चित्रपट अधिक इफेक्टीव होईल, याची चर्चा केली जात आहे. चित्रपटात खूप पैसा आहे, याची सार्‍यांनाच कल्पना आहे. इतकेच नव्हे तर आता भारतीय चित्रपटांची चर्चा सातासमुद्रापार केली जात आहे. मायानगरीतही विविध प्रकारचे समारंभ होत आहेत. चित्रपट बनविण्याची समिकरणेही बदलली आहेत. पैसा उभारण्यासाठी चित्रपट बनवले जात आहेत, आणि बनविल्यानंतरही पैशाचाच विचार केला जात आहे.
     पण काही माणसे असेही आहेत की, त्यांना केवळ चित्रपट बनविणं, इतकंच ठाऊक आहे. त्यांना पैसा महत्त्वाचा वाटला नाही. गुरुदत्त अशाच फिल्मकारांपैकी एक! पण आता संदर्भ बदलले, समिकरणे बदलली तसे चित्रपटही बदलले. एवढे खरे असले तरी आपला हा अनमोल ठेवाच आता धोक्यात आला आहे. त्यातलीच एक दु:खद बातमी वाचायला मिळाली, ती म्हणजे भारतातला पहिला बोलपट 'आलमाअरा' ची सगळी प्रिंट खराब झाली आहे. देशातला पहिला चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' याची तर आपण केवळ १९ मिनिटांची प्रिंट्च साम्भाळू शकलो आहोत. बाकीचे सर्व 'आलमाआरा' सारखे नष्ट झाले आहे.
     आज नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि नॅशनल फिल्म आर्चीव ऑफ इंडियासारख्या संस्थांच्या संचालकांना एक चिंता आता सतावते आहे, ती म्हणजे चित्रपटाच्या प्रिंटा कशाप्रकारे सुरक्षित ठेवायच्या.१९२०-३० च्या दशकातल्या चित्रपटांची तर गोष्टच निराळी पण, सध्या ७० ते ९० च्या दशकातले चित्रपट सुरक्षित नाहीत. त्यांच्या सुरक्षतेबाबत मोठी समस्या निर्माण झाली आहे. १९३१ मध्ये बनविण्यात आलेला पहिला बोलपट ' आलमाआरा' याची प्रिंत पूर्णता खराब झाली आहे. बॉलिवूडच्या इतिहासात ज्या चित्रपटांची दखल घ्यावी लागेल, अशा चित्रपटांची वाताहत झाली असल्याचे दिसते आहे. अशा चित्रपटांची संख्याही मोठी आहे. उदाहरणार्थ, पहिला डबल रोलचा चित्रपट, पहिला नायिकेचा बाथ सीन असलेला चित्रपट वैगेरे..! १९२३ मध्ये बनलेला 'पत्नी प्रताप' मध्ये पहिल्यांदाने एका नायकाने दुहेरी भूमिका केल्या होत्या. १९४१ मधला 'चित्रलेखा' या चित्रपटात पहिल्यांदा नायिकेला अंघोळ करतानाचे दृश्य  दाखवले गेले होते. अशा प्रकारच्या अनेक महत्त्वाच्या चित्रपटांच्या प्रिंटा नष्ट झाल्या आहेत. भारतीय सिनेमाच्या सुरुवातीच्या काळात बनलेल्या जवळपास १३०० मूकपटांपैकी केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतपत चित्रपट उरले आहेत. बॉलिवूडला ज्या चित्रपटांचा अभिमान आहे, अशा अनेक चित्रपटांच्या प्रिंटा त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. सूचना व प्रसारण मंत्रालयाने चित्रपटांच्या प्रिंटांच्या संवर्धनासाठी दहा कोटी रुपयांचा निधी दिला आहे. वास्तविक, जिथे ज्या चित्रपटांच्या नावावर अब्जावधीचा जुगार खेळला जातो, तिथे दहा कोटी म्हणजे दया में खसखसच! जुन्या चित्रपटांपैकी केवळ ८९ चित्रपटांना सांभाळता आले आहे. यात 'काबुलीवाला'चा समावेश आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या कथेवर आधारलेला व बलराज साहनी यांची भूमिका असलेला हा चित्रपट महत्त्वाचा ठेवा आहे. १९९३ मध्ये बनलेला कल्पना लाझमी यांच्या 'रुदाली' चित्रपटाचा बहुतांश भाग नष्ट झाला आहे.  सत्यजित राय यांचा जलसागर' सुद्धा नष्ट झाला होता, परंतु त्याच्या पॉझिटिवचा उपयोग करून त्याला पुनर्जन्म देण्यात यश आले आहे. १९८०-९० मध्ये बनलेल्या चित्रपटांचे नुकसानही अधिक झाले आहे. आपल्या देशात मास्टर निगेटीवने चित्रपट बनतात. तर जगातल्या अन्य देशांमध्ये पहिल्यांदा इंटर निगेटीवने चित्रपट बनवतात.
     चित्रपट निर्मात्यांनी आणि अन्य चित्रपटाशी निगडीत लोकांनी आपल्या चित्रपटांच्या प्रिंटांची वेळोवेळी पाहणी करून त्याला पाहण्यालायक ठेवण्याकडे लक्ष पुरवायला हवे. त्यामुळे बर्‍याच प्रमाणात समस्या सुटण्यास मदत होईल. नॅशनल फिल्म आर्चीव ऑफ इंडियामध्ये स्टोर करण्यात आलेल्या जवळपास १३ हजार चित्रपटांपैकी ९०० चित्रपट पाहण्यालायक करण्यात आले आहेत. भारतात दरवर्षी ४ हजाराच्या आसपास चित्रपट बनतात. हे सगळे चित्रपट सुरक्षित राहतील का, असा प्रश्न सतावत आहे. विधु विनोद चोप्रा यांनी काही चित्रपटांना नवसंजिवनी दिली आहे. 'सजा-ए-मौत', खामोश, परिंदा, लवस्टोरी १९४२ आदी चित्रपटांच्या प्रिंटा स्वच्छ करून त्यांची ओरिजनल क्वालिटी, त्याचा साऊंड व्यवस्थित करण्यात आला आहे. एनएफएआयच्या मदतीने सुरू करण्यात आलेल्या रिलायन्स मिडिया वर्कच्या माध्यमातून १००- चित्रपटांना जीवदान देण्याचा खटाटोप सुरू आहे. दादासाहेब फाळके यांनी ज्या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली, त्या 'राजा हरिश्चंद्र'च्या चित्रपटाची केवळ १९ मिनिटांची प्रिंट वाचवण्यात आपल्याला यश आले आहे.
      साधारपणे एका चित्रपटाला जीवदान देण्यासाठी २ वर्षे लागतात. यासाठी लाखो रुपये खर्च होतात. नॅशनल फिल्म आर्चीव ऑफ इंडियाच्या स्टोरमध्ये ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांच्या प्रिंटा १२ ते १४ अंश सेल्सियस तापमानावर ठेवले जातात. रंगीत चित्रपटांना २ ते ४ अंश सेल्सियस तापमानावर ठेवण्यात येते.
     आपल्या देशात बनलेला 'लगान' मात्र सगळ्यात सुरक्षित आहे, असे म्हटले पाहिजे. कारण त्याची प्रिंट आपल्या देशातच नाही. ऑस्करच्या नॉमिनेशनसाठी अमिरखानने ती प्रिंट तिकडे नेली होती. आजही ती लास एंजिल्सच्या सेफ डिपाझिट वोल्टमध्ये सुरक्षित आहेत. आपल्या बॉलिवूडकडे अब्जावधी रुपयांचा पैशा आहे. पण चित्रपटांच्या प्रिंटाच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो तेव्हा सरकारकडे बोट दाखवले जाते. ही मोठी दुर्दैवाची गोष्ट म्हटली पाहिजे. आपला अनमोल ठेवा जपून ठेवायचा असेल तर बॉलिवूडनेसुद्धा अर्थसहाय्य करायला हवे आहे. तरच अनमोल खजिना आबाधित राहील. 

dainik surajya, solapur 15/5/2012                                                                                                                     

Saturday, May 5, 2012

माकड आणि माणूस

     एक दिवस माकड माणसाला म्हणाले," भावा, लाखो  वर्षांपूर्वी तुसुद्धा माकडच होतास. मग आज एक दिवस पुन्हा एकदा माकड होऊन दाखवशील ना?" 
     ऐकून पहिल्यांदा माणसाला मोठं आश्चर्य वाटलं, पण नंतर म्हणाला," चल ठीक आहे. एक दिवसासाठी मी माकड बनायला तयार आहे."
     माकड म्हणाले," तर मग तुझे कातडे मला दे. अनायसे मीसुद्धा  एक दिवसासाठी माणूस बनेन." यावर माणूस तयार झाला.
     माणूस झाडावर चढला आणि माकड ऑफिसला निघून गेला. संध्याकाळी माकड आले आणि म्हणाले," भावा, माझे मला कातडे परत दे. मला एका दिवसातच माणसाचा मोठा उबग आला."
     माणूस म्हणाला," हजारो- लाखो वर्षांपासून  मी माणूसच आहे, आता फार नाही, पण निदान  शंभर वर्षे तरी तू माणूस म्हणून राहून दाखव."
     माकड रडू लागले. -" भावा, इतका क्रूरपणे माझ्याशी वागू नकोस." पण माणूस तयार झाला नाही. तो झाडाच्या एका फांदीवरून दुसर्‍या फांदीवर, दुसर्‍यावरून तिसर्‍या, तिसर्‍यावरून चौथ्या असे करत तो अदृश्य झाला.
     हताश होऊन माकड माघारी परतले.
     आणि तेव्हापासून प्रत्यक्षात माणूस माकड आहे आणि माकड माणूस. ( अनुवाद- 'हिंदुकुंज' वरून)

Sunday, April 29, 2012

कविता

सारखेपणा...!
गावही आता
शहरी वाटू लागलीत
जशी विमान प्रवासात
चांगली वाईट माणसं
शेजारी शेजारी बसतात...
मतदान केंद्रावरचा सारखेपणा
आता सर्वत्र दिसू लागलाय
दिवसेंदिवस वैशिष्ट्यहीन
होत चाललेली माणसम
सामान्यत्व आणि
विशेषत्व
विसरत चाललीत
समतेचे वारे जरूर वहावे
पण, व्यक्तिवैशिष्टाचा अस्त न व्हावा
वारीतून भक्त बाजूला पडू नये

बालकविता

   महावृक्ष
भोवतालचे कवच त्याने ताडकन फोडले,
मातीतुनी वर येऊनी कोंब मोठ्याने हसू लागले.
       इवल्याशा डोळ्यांनी त्याने आभाळाकडे पाहिले,
       दूधाचा ग्लास प्यावा तसा रानवारा पिऊ लागले
पालटू लगल्या कायेला पानरुपी हात मिळाले,
दोन्ही हातांनी त्याने सूर्याला वंदन केले
       हिरवा अंगरखा लेवून ते मोठे होऊ लागले,
       वनदेवतेला त्याने मानवसेवेचे व्रत दिले
थकलेल्याला सावली, भुकेल्याला फळे द्यायचे,
मनी स्वप्न बाळगले महावृक्ष व्हायचे
                                   - मच्छिंद्र ऐनापुरे, जत