Saturday, February 24, 2018

विज्ञान साक्षरता वाढायला हवी


     विज्ञान प्रयोगातून चांगला समजतो. शिवाय सततच्या प्रयोगातून हाताला आणखी काही नवे नवे गवसत असते. त्यामुळे विज्ञान हा विषय पुस्तक वाचून शिकविता येत नसून तो तर अनुभवाने शिकविणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या देशातील शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. विज्ञान या विषयाला अनुभवांपासून दुरावता येणार नाही. हा विषय पूर्णपणे अनुभवांशी निगडीत आहे. वर्गात शिक्षकाने किंवा पालकांनी अधोरेखित करुन दिलेले एखादे उत्तर पाठ करुन परीक्षेत ते उतरविणे ही आपल्याकडची रूढ पद्धत अत्यंत चुकीची आहे. परीक्षांना देण्यात येणार्या अवाजवी महत्त्वाचा हा परिणाम आहे. शाळांमध्ये विज्ञानाचा अभ्यास हा प्रत्यक्ष प्रयोग करुनच शिकविला गेला पाहिजे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षणात आवड निर्माण होणार नाही. या सर्वासाठी आपल्या शिक्षण पद्धतीचा साचा बदलणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठ, राज्य शासन, शिक्षण मंडळे, शैक्षणिक संस्था तसेच परीक्षा बोर्डाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. परीक्षा मंडळांनी केवळ ठराविक साच्यातच परीक्षा घेण्याची पद्धत योग्य नाही, त्यात काळानुरुप बदल करणे गरजेचे आहे.

     शाळेत शिकविताना शिक्षकांनी सर्वप्रथममी माझ्या समोर असलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा हुषार आहे. त्यांना काय कळतं, माझा अनुभव जास्त आहे.’ हा अहंभाव मनातून काढून टाकला पाहिजे. तरच तो शिक्षक विद्यार्थ्यांना हा विषय व्यवस्थित शिकवू शकतो. विज्ञान हा विषय सैधांतिक आहे. यामुळे यातील सिद्धांत समजणे गरजेचे आहे, आणि हे सिद्धांत समजण्यासाठी प्रयोगाद्वारे शिक्षण देणे गरजेचे आहे. शाळांनी, शैक्षणिक संस्थांनी विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. देशात विज्ञान शिक्षण पद्धतीवर अनेक प्रयोग सुरु असून ते अत्यंत लहान स्वरुपात आहेत. शाळा, महाविद्यालयातील काही शिक्षक शिकविण्याच्या पद्धतीत निरनिराळे प्रयोग करत असतात. मात्र त्या प्रयोगांना व्यापक स्वरुप येण्याची गरज आहे.
     इथे एक उदाहरण देणे महत्त्वाचे ठरेल. एका शिक्षक विद्यार्थ्यांने त्याच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्राचे धडे देण्याचा नवा प्रयोग केला. बर्याचदा विद्यार्थी प्रश्न वा एखादी समस्या सोडविताना गोंधळतात यामागचे कारण म्हणजे त्यांच्या डोक्यात असलेली सूत्रे वापरण्याची पद्धत. मग जर विद्यार्थ्यांनाच प्रश्न तयार करायला सांगून तो सोडविण्यास सांगितला तर विद्यार्थ्यांना त्याचा नक्की फायदा होईल. या विचाराने त्या शिक्षकाने एक महिना विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या व्यतिरिक्त अशाप्रकारचे प्रशिक्षण दिले. त्याचा परिणाम इतका चांगला झाला की विद्यार्थ्यांचे भौतिकशास्त्राचा पाया पक्का झाला व त्यांच्या मनातील त्या विषया संदर्भातील भीती पूर्णत: दूर झाली. अशाप्रकारचे प्रयोग विविध ठिकाणी झाले पाहिजे तरच आपली शिक्षण पद्धती सुधारेल आणि आपला देश खर्या अर्थाने विज्ञानाधिष्ठ होईल.
    परदेशात नव्याने रुढ झालेल्या रचनावादाचा आपण पुरस्कार केला पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्वयंकल्पनांना वाव दिला पाहिजे. शिक्षक वारंवार मी सांगतो तेच बरोबर आहे असे म्हणत जर विद्यार्थ्यांची कल्पकता मारत असेल तर, विज्ञानाच्या अभ्यासात विद्यार्थ्यांना रुची वाटणे कठीण आहे. रचनावादाच्या सिद्धांतामध्ये प्रत्येकाच्या कल्पनेला वाव देण्यात येतो. त्यानुसार विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अथवा त्यांच्या कल्पनेला शिक्षकांनी वाव दिला पाहिजे. विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळू शकते. आपल्याकडे रचनावाद रुजलेलाच नाही, विशेष म्हणजे तो अनेकांना माहितीदेखील नाही. विद्यार्थ्यांच्या तसेच पालकांनी आपल्या मुलांच्या चुका समजून घेणे आवश्यक आहे. मुलं त्यांच्यापाशी असलेल्या अनुभवातून अंदाज बांधत असतात आणि त्यातून त्यांची कृती होत असते. त्यांच्या चुकीचे मूळ शोधून जर त्यांना त्याचे स्पष्टीकरण दिले तर त्यांची खर्या अर्थाने प्रगती होईल.
सर्वात महत्त्वाचे म्हनजे विज्ञान शिक्षणाचा साचा बदलण्याची गरज आहे. विज्ञानाचा अभ्यास बदलण्यासाठी विज्ञानाच्या पुस्तकांचा साचाही बदलणे आवश्यक आहे. पुस्तकांमध्ये प्रात्यक्षिकांवर भर देण्यात आला पाहिले. अलिकडे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातर्फे 1 ली ते 5 वीच्या पाठयपुस्तकांमध्ये बदल करण्याचे काम सुरु आहे. ते लवकरात लवकर विद्यार्थ्यांसमोर आले पाहिजे. प्रयोगाच्या आधारे पाठयपुस्तके लिहिली गेली पाहिजेत. याचे प्रयत्न काही ठिकाणी सुरु आहेतच. नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग सेंटरने काढलेली नवीन पाठयपुस्तके विज्ञानाच्या अभ्यासासाठी अनुकुल असून त्या आधारावर महाराष्ट्र शासनाने पाठयपुस्तकांची निर्मिती करायला हवीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाळांमध्ये प्रयोग साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हायला हवे. अलिकडच्या महणजे 2004 सालापासून राज्यातल्या माध्यमिक शाळांना वेतनेत्तर अनुदान बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या शाळांमधील विज्ञान साहित्य गायब झाले आहे. जुन्याच मोडक्यातोडक्या साहित्यावर जेमतेम प्रयोग घेतले जात आहेत. ही परिस्थिती बदलायला हवी आहे.  शिक्षकांचा शिकविण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी काही पावले उचलताना त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण मिळायला हवे आहे.
   माणसाच्या दैनंदिन जिवनातील विज्ञानाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत जात असल्याने विज्ञान साक्षरता निर्माण होणे गरजेचे आहे. आपल्याला देशाची बौद्धिक, सांस्कृतिक प्रगती करायची असेल तर शिक्षणाचे संयोजन करणे अपरिहार्य आहे. आज विज्ञान व तंत्रज्ञान हे प्रत्येकाच्या दृष्टीने महत्त्वाचे झाले आहे. त्याचबरोबर या माध्यमातून फसवाफसवीचे प्रमाणही वाढले आहेत. त्यामुळे विज्ञान साक्षरता पसरणे गरजेचे आहे. येत्या काही वर्षांमध्ये विज्ञान आयुष्यातील अविभाज्य घटक बनणार आहे. त्यामुळे विज्ञान शिक्षण क्रमप्राप्त होणार आहे. याचे गांभीर्य जाणून 1968 मध्येच कोठारी कमिशनने विज्ञान शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आहे. सर्वाची बुद्धिमत्ता समान स्तरावर मानून अभ्यासक्रम बनविण्यात येतो याचा अर्थ असा आहे की, प्रत्येकाला विज्ञान येऊ शकते. विज्ञान शिक्षणाची गोडी वाढवायची असेल तर शिक्षण पद्धतीत बदल घडविणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे आहे. यात पहिल्यांदा सरकारने पुढाकार घ्यायला हवा आहे.

टेन्शनला बाय-बाय


     मुलांमध्ये अभ्यास करताना लक्ष लागत नाही ही तक्रार मोठ्या प्रमाणात आढळून येत असते; परंतु त्यासाठी अभ्यासाला पूरक वातावरण घरामध्ये असणे गरजेचे आहे. अभ्यास करण्याची जागा सतत बदलती असावी म्हणजे मुलांना कंटाळा येणार नाही. मुलांनी सेल्फ स्टडी करणे आवश्यक असते म्हणजे केलेल्या अभ्यासातले काय लक्षात राहिले हे आपल्याला समजते. मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी किमान 6 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. त्यामुळे मन ताजेतवाने राहण्यास मदत होते. अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून चहा, कॉफी पिण्यास हरकत नाही परंतु यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असावे. कोल्ड ड्रिंक, गोड पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत वाचण्याची अनेकांना सवय असते; परंतु बर्‍याचदा वाचून झाले नाही तर त्या अस्वस्थतेमुळे वाचलेले देखील लक्षात राहात नाही. सततच्या अभ्यासामध्ये 2 ते 3 तासांनी 1 तासाचा गॅप ठेवा म्हणजे वाचलेले लक्षात राहते आणि पुढचा करणारा अभ्यासही लक्षात राहण्यास मदत होते. मुलांनी आपल्या मनामध्ये सतत सकारात्मकता ठेवावी. 

     परीक्षेच्या आदल्या दिवशी किमान 7 तास झोप घ्यावी. परीक्षेला जाताना उपाशीपोटी जाऊ नये, लाईट पदार्थ खावेत जेणेकरून पेपर लिहिताना झोप येणार नाही.पालकांनी मुलांच्या अभ्यासानंतर त्याच्याशी चांगल्या विषयांवर गप्पा माराव्यात त्याला परीक्षेचे दडपण आल्यास ते दूर करण्यासाठी त्याला समजून सांगावे. मार्कांचे, ग्रेडचे टेन्शन त्यांच्यावर लादू नये. या गोष्टींचे पालन केल्यास निश्‍चितच परीक्षेच्या टेन्शनला आपल्याला बायबाय करता येईल. परीक्षेच्या काळात मित्रांमध्ये अभ्यासाबाबत चर्चा सुरू असतात. एखादा मुलगा हुशार असेल तर त्याचा अभ्यास लगेचच होऊ शकतो; परंतु इतर मुलांनी त्याचे दडपण घेऊन अभ्यास करणे चुकीचे आहे. केवळ त्याचा अभ्यास झाला म्हणून माझेही तेवढे वाचून झाले पाहिजे, असे म्हणून अभ्यास केल्यास तो अभ्यास लक्षात राहात नाही. त्यामुळे मुलांनी अभ्यासाबाबत कोणत्याही प्रकारची स्पर्धा करू नये.

Wednesday, February 21, 2018

जरा यांच्याकडेही लक्ष द्या


     शाळांमध्ये विद्यार्थ्यांद्वारा खुलेआम फायरिंग, कमी वयात मुली गर्भवती होणं, ड्रग्ज आणि अशा अन्य प्रकारच्या नशा करणंसारख्या घटना अमेरिका किंवा अन्य युरोपीय देशांमधल्या शाळांमध्ये सर्रास घडत असतातआता असं वाटायला लागलं आहे की, अमेरिका किंवा अन्य युरोपीय देशातील हिंसात्मक संस्कृती  आपल्या देशामधल्या मुलांमध्ये वाढते आहेआणि आपल्या देशातली मुलं त्या चुकीच्या मार्गाने जात आहे. गुन्हेगारी जगतामध्ये अडकत चाललेलं बालपण आणि अलिकडच्या काळात घडलेल्या घटना पाहता या परिस्थितीला  खरेच आपली मुलं जबाबदार आहेत का आणखी कोणी? मुलांमध्ये वाढत असलेली गुन्हेगारी प्रवृत्तीमागे फक्त एकटा तो जबाबदार नाही तर त्याला अनेक कारणे जबाबदार आहेत. देशातल्या काही शाळांमध्ये घडलेल्या घटना केवळ काळीज चिरून जाणार्या नाहीत तर देशाचे भविष्य समजली जाणारी ही मुलं कोणत्या दिशेने जात आहेत, असा प्रश्न पडतो. शाळेत शिकायला आलेल्या मुलांकडून अशा प्रकारच्या क्रूर,हिंसक घडलेल्या घटना भयंकर आणि त्याहून चिंताजनक वाटाव्या अशा आहेत. अशा प्रकारच्या कल्पनादेखील केल्या गेल्या नाहीत, असे भयंकर प्रकार पाहण्याचे दुर्भाग्य आजच्या लोकांपुढे आले आहे. अर्थात अशा प्रकारच्या घटनांमध्ये अडकलेली मुले कुठे ना कुठे टीव्ही,चित्रपट, सोशल मिडिया आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेली सामग्रीतून प्रभावित झाला आहे, हे स्पष्ट होते.

मुलांसाठी वेळ नाही
     आजच्या आई-वडिलांचे संपूर्ण लक्ष आपल्या मुलाला चांगल्यात चांगले शिक्षण मिळावे आणि त्यांना पाहिजे त्या सुख-सुविधा मिळाव्यात याकडे देताना दिसतात. जे भोग आपल्या वाट्याला आले, ते त्यांच्या वाट्याला येऊ नयेत, अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असते. मात्र ते हे विसरतात की, मुलाला नेमके काय हवे आहे. त्यांच्याकडे मुलाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पैसा आहे, श्रीमंती आहे, एवढ्यावरच आपल्या मुलाचे मूल्यमापन होताना दिसत आहे. त्याने चांगले शिकावे,यासाठी वाट्टेल ते करायला आजचा पालक तयार आहे. मात्र त्याची काय आवड आहे, त्याला काय हवं आहे,हे पाहायला आणि त्याच्याकडेचे जाणून घ्यायला पालकांकडे वेळ नाही. त्यामुळे वात्सल्य आणि स्नेह याचे ते भुकेले बनले आहेत. परिणामी त्यांच्यामध्ये असंतुष्टपणा जाणवायला लागला आहे. यामुळे त्यांच्यात नकारात्मक विचार वाढायला लागले आहेत. यामुळे निर्माण झालेली असहिष्णुतता मुलांमध्ये हिंसा वाढवू पाहत आहेत. कित्येकदा आई-वडिलांमध्ये होत असलेले नित्याचे वाददेखील त्याला कारणीभूत आहेत. 
सिनेमा,टीव्ही आणि इंटरनेट
आजच्या मुलांचा सर्वाधिक वेळ हा टीव्ही,मोबाईल,व्हिडिओ गेम्समध्ये जात आहे. या माध्यमातून त्यांची मजल गुन्हेगारी शोज किंवा अडल्ट कंटेटपर्यंत सहजपणे जाते. आई-वडिलांजवळ आपल्या मुलाची दिनचर्या काय आहे,हे जाणून घ्यायलादेखील वेळ नाही. ते बिनधास्तपणे टीव्ही,लॅपटॉपवर काहीही पाहायला तयार असतात. इंटरनेट सेवा आज फारच स्वस्तात उपलब्ध झाली आहे. कमी दरात पुष्कळ डेटा पुरवण्याचे काम कंपन्या करताना दिसतात. साहजिकच मुले काहीही पाहताना दिसतात. यामुळे अगदी लहान वयात कुठलीही गोष्ट मिळवायचीच , असा हट्ट त्यांच्यात वाढताना दिसत आहे.
वाढते विभक्त कुटुंब
     आता समाजात विभक्त कुटुंबांचा प्रसार वाढतो आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत घरातल्या वडिलधार्या लोकांचा मुलांवर धाक होता. पण आज विभक्त कुटुंबांमध्ये मुलांना संस्कार देण्यात आपण कमी पडत आहोत. एकटेपणा, मानसिक तणाव आणि आई-वडिलांच्या आशा- आकांक्षा आदी कारणांमध्ये मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. आजच्या परिस्थिती लोक एक किंवा दोन पुरेत याकडे अधिक प्रमाणात लक्ष देत असल्याने प्रत्येक कुटुंबात एक किंवा दोन मुलेच अथवा मुली आढळून येताना दिसतात. एकटा-दुकटा असल्या कारणाने मुलाचे लाडही फार होऊ लागले आहेत. वर्गात आपल्या मुलाला शिक्षकांनी मारले तर लगेच त्याच्या अंगावर पालक धावून जातात. मुलगा शिकू दे अथवा नसू दे,पण माझ्या मुलाला मारायचं नाही, असा पवित्रा पालक घेताना दिसतात. मुलगा घरात-घराबाहेर एकटा असल्याने तो काय करतो याकडे आई-बाबांचे अजिबात लक्ष नसते. साहजिकच मुले संगतीने किंवा एकलकोंडेपणामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळताना दिसतात.
आजचे शिक्षण जबाबदार
     शिक्षणाचे मंदिर म्हणून ओळखल्या जाणार्या शाळांमध्ये अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत,याला आपली शिक्षण व्यवस्थादेखील कारणीभूत आहे. स्पर्धेच्या या जगात मुलांवर फक्त यश मिळवण्याचे दडपण दिले जात आहे. अशा वेळेला त्याच्या पदरी अपयश आले तर तो आपले धैर्य आणि संयम गमावून बसतो. शिक्षकांकडून आपल्या आई-वडिलांना आपली तक्रार केली जाईल,याची भीती असते. ही भीतीदेखील हिंसक मानसिकतेला जन्म देते.
     म्हणजे आपल्या देशात आई-वडिलांकडे आपल्या मुलासाठी वेळ नाही. शिक्षकांच्या मनात त्यांना समजून घेण्याची काळजी नाही. त्यातच शिक्षकांच्या अंगावर इतकी मोठी अशैक्षणिक कामे टाकण्यात आली आहेत की, त्यांना ती सोडवून मुलांकडे लक्ष द्यावे,यासाठी संधी दिली जात नाही. कारण सतत काही ना काही कामे शिक्षकांच्या बोकांडी मारली जात असतात. शाळांमधून मूल्यशिक्षण हद्दपार झाले आहे. मुलांना घरात ना संस्कार ना बाहेर समाजात. त्यामुळे मुले अगदी मनमानीप्रमाणे वागताना दिसतात. त्यांना चांगल्या-वाईटाचा फरकच कळेनासा झाला आहे. त्यांच्यात फक्त हट्टीपणा, दुराग्रहीपणा वाढताना दिसत आहे.  देशातल्या शाळांमध्ये घडलेल्या काही घटनांमुळे चिंताजनक भविष्याच्या दिशेने इशारा केला जात आहे. वेळीच आपण याकडे लक्ष दिले नाहीत,तर आपल्याला आणि देशाला फार मोठी किंमत चुकवावी लागणार आहे.
     मुलांना वाटेवर आणण्याकरिता आई-वडिल,समाज, शाळा आणि शासन या सगळ्यांनी आपापली जबाबदारी सांभाळली पाहिजे. आई-वडिलांनी आपला कितीही व्यस्त कार्यक्रम असला तरी काही वेळ काढून मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. त्याचे मन समजून घेतले पाहिजे. त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलून त्याच्या मनाची व्यथा जानून घेतली पाहिजे. टीव्ही,मोबाईल,व्हिडिओ गेम्स यांनी त्यांच्या मनाचा ताबा घेतला आहे. मैदानी खेळाला प्राधान्य देताना टीव्ही,क़ॉम्प्युटर,गेम्स यासाठी ठरवून वेळ द्यायला हवा. सध्या अभ्यास महत्त्वाचा आहे तर अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, हे त्यांच्यात बिंबवले पाहिजे.
     काही पालक मुलांदेखत टीव्ही पाहत असतात. मुलाला समोर बसवून आपण टीव्ही पाहत बसणे योग्य नाही. मुलावर संस्कार कसे होणार? आई-वडिलांचे अनुकरण मुले करीत असतात. त्यामुळे पहिल्यांदा आई-वडिलांनी टीव्ही पाहण्याचा बंद करावा. पाहिला तर घरातल्या सर्वांनी मिळून पाहावा, असा कार्यक्रम ठराविक वेळापर्यंत पाहायला हरकत नाही. त्यात अधिक गुंतून जाता कामा नये. टीव्ही, सोशल मिडियामध्ये नकारात्मक गोष्टींची पेरणी अधिक होताना दिसत आहे. त्याकडे कुठल्या मर्यादेपर्यंत पाहायला हवे, याची जाणीव मुलांना वेळोवेळी करून द्यायला हवी. टीव्हीवर,लॅपटॉप,मोबाईलवर मुले नेमकी काय पाहतात, याकडेही जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे.मुलांना शाळेत फक्त यशाचा धडाच शिकवला जातो. अपयश पदरी पडल्यावर त्याचा सामना कसा करायचा, हे शिकवले जात नाही. या गोष्टी शिकवायला हव्यात. अलिकडे मुलांना नापास करायचे नाही, असा सरकारी फतवा निघाल्याने सध्याची परिस्थिती फारच वाईट झाली आहे, याचा प्रत्यय यायला लागला आहे. मुलांमध्ये खिलाडूवृत्ती बिंबवली पाहिजे.
     मुलांना पालकांनी त्यांनी मागितलेल्या गोष्टी लगेच देता कामा नये. त्यामुळे त्यांना त्याची किंमत कळत नाही. तहान लागल्यावर लगेच पाणी मिळाल्यावर तहानेचे महत्त्व कळत नाही. तहान लागल्यावर पाण्याचा शोधाशोध करायला लागल्यावरच त्याला त्याची किंमत कळते. तसे वस्तूंचे आहे. मुलाला लागणार्या वस्तूची गरज किती आहे, याची कल्पना त्याला यायला हवी आहे.

देशात घडलेल्या काही प्रमुख घटना
11 डिसेंबर 2007
गुरुग्रामच्या युरो इंटरनॅशनल स्कूलमध्ये आठवी इयत्तेत शिकणार्या विद्यार्थ्याने आपल्याच सहकारी मित्राचा- अभिषेक त्यागीचा गोळी घालून खून केला. दोन दिवसांपूर्वी दोघांच्यात वाद झाला होता.
9 फेब्रुवारी 2012
चेन्नईतल्या सेंट मॅरीज एंग्लो इंदियन हायर सेंकडरी स्कूलमध्ये रागावल्याने नाराज झालेल्या नववी इयत्तेच्या 15 वर्षाच्या विद्यार्थ्याने शिक्षिकेचा चाकूने भोसकून खून केला.
8 सप्टेंबर 2017
गुरुग्रामच्या रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये 11 वीच्या वर्गात शिकणार्या विद्यार्थ्याने दुसरीत शिकणार्या प्रद्युम्नचा शौचालयात चाकूने वार करून खून केला. तो परीक्षा आणि पीटीएम टाळू इच्छित होता.
26 ऑक्टोबर 2017
दिल्लीतल्या एका शाळेत 14 वर्षाच्या सातवी इयत्तेत शिकणार्या विद्यार्थ्याला त्याच्याच वर्गात शिकणार्या विद्यार्थ्याने धक्का दिला,त्यामुळे भिंतीला धडकल्याने त्याचा जीव गेला. तो विद्यार्थी पिडित विद्यार्थ्याला चिडवायचा.
15 नोव्हेंबर 2017
दिल्लीतल्या एका सरकारी शाळेच्या बाहेर किरकोळ कारणावरून वादविवाद झाला.नंतर नववीच्या विद्यार्थ्याने त्याचा खून केला.
17 जानेवारी 2018
इखनौच्या ब्राइटलँडकॉलेजमध्ये पहिलीचा विद्यार्थी ऋत्विकला बाथरुममध्ये बंद करून सातवीच्या विद्यार्थीनीने चाकूने वार करून खून केला. तिला शाळेला सुट्टी हवी होती.
20 जानेवारी 2018
हरियाणातील यमुनानगर येथील स्वामी विवेकानंद शाळेत कमी उपस्थिती असल्याने काढून टाकल्याने चिडून जाऊन 12 वीच्या विद्यार्थ्याने -शिवांशने प्राचार्य रितु छाबडा यांचा गोळी घालून खून केला.
1 फेब्रुवारी 2018
उत्तर-पूर्व दिल्ली क्षेत्रातल्या करावल नगराच्या सादतपूर येथील जीवन ज्योती पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणार्या 14 वर्षाच्या विद्यार्थ्याला-तुषारला त्याच्या तीन सहकार्यांनी बेदम मारहाण करून मारून टाकले. त्याचा मृतदेह शौचालयात आढळून आला.
याशिवाय सहकार्यांकडून बलात्कार, शारीरिक शोषण, अपहरण,मारहाणसारख्या घटनादेखील शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून घडत आहेत.

Tuesday, February 20, 2018

ऑनलाइन विवाह नोंदणीसाठी जनजागृती हवी


 
   सध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे असल्याने संगणक साक्षरतेचे प्रमाण वाढत चालले आहे. अलिकडच्या काळात काही जुन्या काळातील लोक सोडले तर बहुतांश लोक संगणक साक्षर झाले आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने काही सरकारी योजना ऑनलाइन सुरू केल्या आहेत. याचा लाभ लोक घरबसल्या घेत आहेत. राज्य सरकारच्या मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक विभागाने सहा महिन्यापूर्वी विवाह नोंदणी ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे नवविवाहितांचा वेळ,पैसा आणि श्रम वाचावेत, हा हेतू आहे. कारण, नोंदणी कार्यालयांमध्ये येऊन नोंदणी करणारी बहुतांश जोडपी मध्यस्थांची (दलाल) मदत घेताना आढळून येत आहेत. ही मध्यस्थ मंडळी या नवविवाहित जोडप्यांकडून मोठा मोबदला घेताना दिसतात. मात्र प्रत्यक्षात विवाह नोंदणी शुल्क नाममात्र आहे. विवाह नोंदणी अर्ज आणि त्याचे नाममात्र शुल्क ऑनलाइन भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र याला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे नोंदणी कार्यालायात जाऊन विवाह नोंदणी करणार्या जोडप्यांची संख्या राज्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.याचा अर्थ ऑनलाइन विवाह नोंदणीबाबत जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे यासाठी तालुका,गाव स्तरावर याबाबत जनजागृती मोहिम उघडण्याची आवश्यकता आहे.शासनाने तलाठी,ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि आरोग्य केंद्र सेविका यांच्यामाध्यमातून ऑनलाइन विवाह नोंदणीचा प्रसार गावोगावी आणि घरोघरी करायला हवा. संगणक युगात त्याचा वापर वाढला पाहिजे. कारण त्याच्या वापरामुळे लोकांचा वेळ, पैसा आणि श्रम निश्चित वाचणार आहे.

Monday, February 19, 2018

अनुपम सौंदर्यवती मधुबाला


     आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी हिदी चित्रपट अभिनेत्री मधुबाला हिचे खरे नाव मुमताज जहान बेगम दहलवी. बेबी मुमताज म्हणूनही ती ओळखली जायची. मधुबाला लौकिक अर्थाने शिकलेली नव्हती. मधुबालाने इंग्रजी संभाषणाचे धडे सुशीलाराणी पटेल यांच्याकडून घेतले होते. मधुबालाचा व चित्रपटसृष्टीचा संबंध हा फारच जवळचा. मुंबईत झालेल्या गोदीच्या स्फोटात त्यांचं घर उद्ध्वस्त झालं, मात्र मधुबालाचं कुटुंब वाचलं ते केवळ चित्रपट पाहायला गेल्यामुळे. घरच्या परिस्थितीने अवघ्या नवव्या वर्षीच तिला चित्रपटात काम करावं लागलं. अभिनय करण्याकरिता नव्हे तर केवळ अर्थार्जन करण्यासाठी मधुबाला या चित्रपटसृष्टीत आली. 

     बालकलाकार म्हणून १९४२ साली आलेला 'बसंत' हा तिचा पहिला चित्रपट. अभिनेत्री देविका रानी यांनी तिचे काम पाहिले. तिच्या कामाने प्रभावित होऊन त्यांनीच तिला मधुबाला हे नाव दिले.  बालवयातच काम करायला सुरुवात केल्यामुळे मधुबाला कधी शाळेत जाऊ शकली नव्हती. तिला उर्दू भाषा येत होती, परंतु इंग्रजीचा एकही शब्द तिला बोलता येत नव्हता. मधुबालावर तिच्या वडिलांचा पगडा खूप जास्त होता. वडिलांच्या कडक शिस्तीमुळे मधुबाला कधीही पार्टी, प्रीमिअरमध्ये दिसली नाही. १९४२ साली आलेल्या ‘बसंत’ या सिनेमाद्वारे त्यांनी बालकलाकाराच्या रुपात पहिल्यांदा पडद्यावर एन्ट्री घेतली. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे नऊ वर्षे. तर अभिनेत्री म्हणून १९४७ मध्ये ‘नीलकमल’ या सिनेमात त्या पहिल्यांदा झळकली होत्या. याचवर्षी त्यांचा आणखी एक चित्रपट रिलीज झाला होता. ‘दिल की रानी’ हे दुस-या सिनेमाचे नाव. १९४८ मध्ये  मधुबाला यांचा ‘अमर प्रेम’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सर्व सिनेमात  मधुबाला राज कपूर यांच्यासोबत झळकली होती. या सिनेमानंतर मधुबाला यांनी बॉम्बे टॉकीजच्या ‘महल’ सिनेमात काम केले होते. ‘महल’ला मिळालेल्या यशानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. याच वर्षी तिचे एकापाठोपाठ एक चित्रपट यशस्वी झाले. आल्या आल्या मधुबाला ही रसिकांच्या मनाची राणी झाली. 
     मधुबालाने कोणत्याही एका साच्यात अभिनय केला नाही. आपल्या सत्तरहून अधिक चित्रपटांच्या कारकिर्दीत मधुबालाने जवळजवळ सर्वच प्रकारच्या जॉनरचे चित्रपट केले. त्यात ग्लॅमरस होते, विनोदी होते, गंभीर होते, शोकांतिकाही तशाच होत्या. महल, बरसात की एक रात या चित्रपटातल्या तिच्या भूमिका असोत की मिस्टर अँण्ड मिसेस ५५, चलती का नाम गाडी, यांसारख्या सर्वच चित्रपटांमधल्या तिच्या भूमिका रसिकांना आजही आपल्याशा वाटतात. काळातील आघाडीच्या अभिनेत्यांसह मधुबालाने काम केले होते. अशोक कुमार, दिलीप कुमार, देवानंद या आघाडीच्या अभिनेत्यांसह मधुबालाने स्क्रिन स्पेस शेअर केली होती. आपल्या करिअरमध्ये त्यांनी एकुण ६६ सिनेमांमध्ये प्रमुख अभिनेत्री म्हणून काम केले होते. त्यानंतर किशोर कुमार यांच्यासह मधुबालाचे लग्न झाले.हॉलिवुडमध्ये जसा मर्लीन मन्रोने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिचा काळ गाजवला, तसाच बॉलिवुडमध्ये लावण्यवती मधुबाला यांनी बॉलीवूड मध्ये गाजवला. भारतातच नव्हे पण हॉलीवुडपर्यंत मधुबाला यांच्या सौंदर्याची कीर्ती गेली होती. जगप्रसिद्ध दिग्दर्शक मा.फ्रँक काप्रा यांनी भारतात येऊन  मधुबाला यांना हॉलीवुडमधील चित्रपटात चमकविण्याचे प्रयत्न केले होते.. पण त्यांच्या वडिलाच्या मुळे ते शक्य झाले नाही. काप्रामुळे तिच्याबद्दल तेथील माध्यमांनी यामुळे खूप लिखाण केले. 
     १९५२ च्या तेथील एका नियतकालिकात असे म्हटले गेले की, “Madhubala ~~ The biggest star in the world and she is not in Beverlie Hills.”  नर्गिस यांच्या नंतर भारतीय टपाल खात्याने १८ मार्च २००८ ला  मधुबाला यांचे तिकीटा काढून मान दिला होता. अतिशय अल्पायुशी असणारी ही अनुपम सौंदर्यवती आपल्या गुणांमुळे मात्र चिर:कालपर्यंत बॉलिवूड कलाकार आणि सिनेप्रेमींच्या मनात स्वत:चे स्थान अबाधित राखून आहे, यात शंकाच नाही. २३ फेब्रुवारी १९६९ रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले.

शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट कसे होणार?


     बोलणं सोपं  आहे,पण करणं फार अवघड आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.  पण त्यासाठी कोणतीच तयारी केलेली नाही. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत आपला शेतकरी फायद्यात नाही. आजही शेतकरी आत्महत्या हा मुद्दा गाजत आहे आणि शेतकरीही आता आंदोलन करीत आहेत्यामुळे शेतकरी वर्गाला दुर्लक्षित करून चालणार नाही,याची कल्पना केंद्र सरकारला विशेषतः नरेंद्र मोदींना वाटत असल्याने त्यांनी शेतकरी विषय मनावर घेतला आहे. पण् यात फक्त शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न दुप्पट करून टाकू, इतकेच आश्वासन देण्यात आले आहे. प्रत्यक्षात ते कसे करणार याचे काहीच सकृतदर्शनी पुरावा दिसत नाही. फक्त बोलले म्हणजे काही होत नाही. पुढच्या वर्षी केंद्राच्या निवडणुका आहेत.यात यांचीच  अधिक काळजी दिसत आहे. शिवाय मोदींना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायला आणखी एक टर्म हवी आहे. 2022 पर्यंत त्यांनी मुदत मागितली आहे. मग असा प्रश्न पडतो की त्यांनी गेल्या चार वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केले, असा प्रश्न पडतो. चार वर्षात ज्यांनी काही केले नाही,त्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा ? शेती आणि शेतकरी हा विषय इतका क्लिष्ट आहे की , तो नुसता बोलून सुटणार नाही. त्यासाठी प्रत्यक्षात कृती आवश्यक आहे. सध्याच्या गतीने, संशोधनाने आपण 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू शकणार नाही. यासाठी विशाल कृती कार्यक्रम राबवण्याची आवश्यकता आहे. 

     शेती  सातत्याने  तोट्यात चालली आहे.  आर्थिक पाहणी अहवालात हवामान बदल, मॉन्सून, कमी लागवड, उत्पादकतेत घट, कमी बाजारभाव आदी कारणांमुळे शेती क्षेत्राचा विकासदर उद्योग, सेवा क्षेत्रांपेक्षा खूपच कमी राहणार, हे स्पष्ट केले होते. आपल्याला या सगळ्यात गतीने बदल घडवावे लागणार आहेत. हवामान बदलाचा अभ्यास करून शेती लागवड आणि तंत्र स्वीकारावे लागणार आहे.  शास्त्रज्ञांच्या सहभागाशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे अशक्य असल्याचे प्रतिपादनही अलिकडेच राष्ट्रपती कोविँद  यांनी  केले आहे.त्यामुळे शास्त्रज्ञ यांचीही भूमिका महत्त्वाची आहे, हे विसरून चालणार नाही.
      या देशातील कृषी संशोधकांनी आजपर्यंत भौगोलिक परिस्थिती, स्थानिक वातावरण यानुसार बहुतांश पिकांच्या विविध वाणांपासून ते काढणीपर्यंतचे उत्पादन वाढीचे तंत्र विकसित केले. त्यांचा शेतकऱ्यांच्या पातळीवर व्यापक उपयोग झाल्याने आपला देश अन्नधान्यात स्वयंपूर्णच झाला. इतकेच नव्हे  तर प्रमुख निर्यातदार देश म्हणून आपला देश पुढे आला आहे. परंतु मागील काही वर्षांपासूनच्या हवामानबदलाच्या काळात अनेक पिकांचा उत्पादन खर्च वाढून उत्पादकता आणि एकूण उत्पादन घटत आहे. 2017-18 च्या हंगामात कापसासह तेलबिया, डाळी आदी शेतीमालांचे उत्पादन देशात घटणार असल्याचे देश-विदेशांतील अनेक संस्थांनी स्पष्ट केले आहे. अशावेळी बदलत्या हवामान परिस्थितीनुरूप शेती संशोधनाची दिशा ठरवून त्यातून विकसित होणारे वाण, लागवड तंत्र शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायला हवे आहे.  शिवाय  अनेक नैसर्गिक संसाधने आक्रसली जात असून, अशा परिस्थितीमध्ये उत्पादनवाढीवर संशोधकांनी भर द्यायला हवा आहे. 
      समजा संशोधक आणि शेतकरी यांनी आपापल्या पद्धतीने उत्पादकता, उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न केला , परंतु उत्पादनाचे उत्पन्नवाढीत रूपांतर होऊ देण्याचे काम मात्र शासनाला करावे लागणार आहे. कारण उत्पादन वाढले आणि बाजारात आवक वाढली की हमखास  भाव पडतात. हा बाजार व्यवस्थेचा नियमच बनून गेला  आहे. कधी कधी शासनाच्या आयात-निर्यातीच्या धोरणाचा फटका शेतीमालास बसला आहे. त्यामुळे आमच्या शेतमालाला योग्य दर मिळू दिला नाही, असाही अनेक वेळचा अनुभव आहे.  शासन का आपल्या बाजाराकडे का लक्ष देत नाही, असा प्रश्न पडतो. त्याच बरोबर  उत्पादन वाढले तरी शेतकऱ्यांची बाजार व्यवस्थेतील लूट, दर पाडण्याचे व्यापाऱ्यांचे षडयंत्र हे जोपर्यंत थांबणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार नाही. बाजार व्यवस्था सुधारण्यासाठी शासनाचे प्रयत्न चालू असले तरी ते फारच अपुरे असून, त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही. ई-नाम अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समित्या जोडल्या जात अाहेत, त्याची व्याप्ती वाढवावी लागेल. आणि ही प्रणाली प्रत्येक बाजार समितीत प्रभावीपणे काम करते की नाही, हेही पाहावे लागणार आहे. 
      शेतीपूरक व्यवसायाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते, हे सत्य आहे. परंतु असे व्यवसाय देशात पारपंरिक पद्धतीने शेतकरी करीत आले आहेत, आजही करतात. असे असताना त्यामध्ये अपेक्षित वाढ का होत नाही, याचाही आढावा शासनाने घ्यायला हवा. हे व्यवसाय भरभराटीला न येण्यामागील प्रमुख अडसर शोधून ते दूर करण्यावरही शासनाचा भर हवा. शेतीमालाच्या मूल्यवर्धनाने रास्त दर मिळून उत्पन्नवाढ आणि परिसरात रोजगाराच्या संधी असे अनेक फायदे आहेत. यासाठी केवळ अर्थसंकल्पी तरतूद वाढवून चालणार नाही, तर गावपातळीवर शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीमाल प्रक्रियेबाबत प्रबोधन आणि प्रशिक्षणाची मोहीम हाती घ्यावी लागेल. त्यांना भागभांडवल उभे करण्यास साह्य करावे लागेल. गावातल्या गावात रोजगार मिळायला हवा. प्रक्रिया उद्योग वाढले पाहिजेत. अन्नप्रक्रियेचा हेतू साध्य होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार नाही. आपल्याला काय काय करावे लागणार आहे, याची कल्पना यायला हरकत नाही. मोदींना दुसरी इनिंग मिळवण्यासाठी याची प्रत्यक्षात सुरुवात करावी लागणार आहे. 

सरपंच गाव बदलू शकतो...


     केंद्र आणि राज्य सरकारांनी गावांवर लक्ष केंद्रित केले आहे . गावांना थेट निधी मिळत आहे. याचा फायदा गाववाल्यांनी घ्यायचा आहे. गावात राजकारण न आणता गावाचा विकास साधायला हवा. सरपंच मंडळींनी पारदर्शक कारभार करत गावाला बरोबर घेऊन काम करायला हवे. पाच वर्षांत जग बदलते; मग सरपंच म्हणून  गाव का बदलू शकत नाही, असा सवाल उपस्थित होणे साहजिकच आहे. सरपंच म्हणून ते  केवळ मिरवणार असतील तर पाच वर्षे केव्हाच निघून जातील, परंतु सचोटीने कामे करणार असतील  तर त्यांना वेळही  पुरणार नाही. त्यामुळे त्यांनी  ठरवायला  हवे की वेळ वाया घालवायाचा की संधीचे सोने करायचे, सरपंचदेखील गाव बदलू शकतात. हे अनेक सरपंच मंडळींनी दाखवून दिले आहे. आता थेट सरपंच निवड आणि त्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने करण्यात आलेल्या नियमावलीचा लाभ घेऊन गावाचा विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा.

      गावाचा विकास साधताना गावातील सर्व घटकांनी सरपंचाच्या पाठीशी उभे राहणे अत्यावश्यक आहे. निम्मी शक्ती गावच्या राजकारणात जात असेल तर सरपंचाने गावचा विकास केव्हा करायचा असाही प्रश्न अनेक गावांमध्ये असतो. पण सरपंचांनी चिकाटी, प्रामाणिकपणा सोडू नये. ग्रामस्थ आपोआप तुमच्या बरोबर येतील, असे आपले वागणे ठेवल्यास त्याचा नक्कीच फायदा गावाला होणार आहे. निधी नाही म्हणून गप्प बसून चालणार नाही, गावाला सोबत घेऊन काम केल्यास निधीची कमतरता कधीच पडणार नाही.  लोकसहभागातून जलसंधारणाची उत्तम कामे केली जाऊ शकतात. त्यामुळे  गावच्या विहिरी, बंधारे भरन्यास मदत होणार आहे. गावाला शंभर टक्के ठिबक संच वापराकडे लक्ष दिल्यास पाण्याची बचत चांगल्या प्रकारे होते. 
      गावात कामे करताना पद-प्रतिष्ठा याबाबी बाजूला ठेवाव्या लागतात.  पुढारी,सरपंच, शिक्षक, महसूल कर्मचारी, सनदी अधिकारी असे सगळे गावात असतील तर त्यांनी गावाच्या विकासासाठी आपले योगदान द्यायला हवे. अधिकारी लोकांनी वेळ मिळेल तेव्हा  गावात जाऊन पायजमा-शर्ट घालून विकासकामे करण्याला हातभार लावला तर त्याचा गावाला फायदाच होणार आहे. सरपंच म्हणून काम करणाऱ्या लोकांनी अभ्यास करायला हवा.  गावाला बदलविण्यासाठी सरपंचांनी आधी नियम, कायदे समजून घ्यायला हवेत. संयम व सचोटीची जोड देत ग्रामसेवकाशी संघर्ष न करता त्याच्याशी समन्वयानेच कामे केल्यास चांगला फायदा होईल.
      चिकाटीने पाठपुरावा केल्यास सरपंचाला निधी मिळत जातो. हेतू स्वच्छ ठेवला तर गाव बदलविण्यासाठी कामे बेधडक सुरू करावीत. अतिक्रमणे काढून विकास करावा. सरपंच आरक्षण पद्धतीमुळे  पुन्हा सरपंच होण्याला संधी मिळत नाही.त्यामुळे मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन स्वतः सर्वगूण संपन्न बनवत गावाचा विकास करायला हवा.  त्यामुळे पाच वर्षे लोकसहभागातून कामे केली तर ‘चांगला सरपंच’ म्हणून सरपंच परिचित होतात. त्यामुळे पुढे जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्यत्वासाठी तुमचे नाव आपोआप घेतले जाईल.
  गावात सरपंचाने असे वागा
 गावात लोकांशी नीतीने वागा.
सरळ मार्गाने गावात कामे करा
लोकांना देशाचे राजकारण कळत असते. त्यामुळे सरपंचाचा हेतू तर जनता पटकन ओळखते, त्यामुळे समाजकारणावर भर द्या.
सर्वधर्म, संप्रदाय, जाती-धर्मांशी सलोख्याने वागावे.
 कृषिकेंद्रित ग्रामविकासासाठी हे करा 
 गावशिवारात शेतीविकास, जोडधंदे यासाठी अभ्यास करून योजना सुचवाव्यात
सर्वप्रथम एसटी स्टॅंडचा प्रवेश रस्ता चांगला करून घ्यावा. त्यानंतर इतर रस्ते दुरुस्त करून घ्यावेत.
सांडपाणी व्यवस्थेसाठी गटार व्यवस्था, शोषखड्डे तयार करावेत.
घाणीचे साम्राज्य म्हणजे गाव ही व्याख्या बदलण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन करा.
गावच्या आर्थिक विकासासाठी पतसंस्था काढा, बॅंकेकडून पतपुरवठा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.
लोकवर्गणीतून शिक्षणविषयक कामे उभारावीत.
गावातून शहरात स्थलांतरित झालेल्या नोकरदारांना शोधा. त्यांना गावविकासात सामावून घ्या.
 काय करायचे राहिले याचा ‘सर्व्हे’ करा 
 सरपंचाने गावासाठी निधी असा आणावा
 यासाठी सरपंचाने आधी प्रस्तावित योजनेसाठी अभ्यास करावा. जागेचा प्रश्न मिटवूनच आराखडा, प्रस्ताव तयार करावा. त्यानंतर निधीचा शोध घ्यावा. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्वनिधीतून गावाला पैसे मिळू शकतो. जिल्हा परिषदेचा ग्रामनिधी पडून असतो. चौदाव्या वित्त आयोगातून पाच वर्षांच्या कामांसाठी पैसा मिळू शकतो. जिल्हा नियोजन समिती, पशुसंवर्धन,आरोग्य,कृषी विभागातूनही पैसा येतो. आमदार निधी, खासदार निधी, विशेष प्रस्ताव म्हणून निधी मिळवण्याचे मार्ग सरपंचांकडे आहेत. मात्र, त्यासाठी भरपूर पाठपुरावा करण्याची तयारी ठेवावी. कुठल्याही गोष्टीत  कष्ट,जिद्द, चिकाटी महत्त्वाची आहे. पण या तुमच्या कार्याचा लाभ अख्ख्या गावाला होणार आहे. गाव नक्कीच तुम्हाला दुवा देईल.