Tuesday, July 24, 2018

(लहानशी गोष्ट) पश्‍चाताप


     निशांत आणि उमा या डॉक्टर दाम्पत्यांनी गावात राहून लोकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार त्यांनी गावात दुमजली इमारत उभी केली होती. खाली दवाखाना सुरू केला होता आणि वरच्या मजल्यावर दोघे राहत होते. गणपत पवार गावचे सरपंच होते. त्यांनी वयाची पन्नाशी गाठली होती. एके दिवशी पहाटे पहाटेच सरपंचांना हृदयाचा झटका आला. तिघा मुलांनी त्यांना दवाखान्यात आणलं. डॉक्टर दाम्पत्य तात्काळ उपचाराला लागले. सरपंचांना बरे वाटू लागले. दोन-तीन दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
     यथावकाश सरपंच आणि डॉक्टर यांच्यात मैत्री वाढली. जाणं-येणं चाललं. डॉक्टर निशांत यांची दोन्ही मुलं शहरात सेटल झाली होती. पैशांची कसलीच कमतरता नव्हती. त्यांची अजिबात इच्छा नव्हती की, आई-बाबांनी साधी वीजही पुरेशी नसलेल्या गावात राहावावं. पण डॉक्टर दाम्पत्यांनी ठरवलं होतं की, शहरात खूप दवाखाने आहेत. गावाकडे नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्या रिटायरमेंटच्या पैशांतून दवाखान्यात सर्व त्या सुविधा उपलब्ध करून घेण्याचा बर्‍यापैकी प्रयत्न केला होता. सरकारी दवाखान्यात जे सुविधा मिळत नाहीत, त्या त्यांनी आपल्या दवाखान्यात उपलब्ध केल्या होत्या.

     सरपंचांच्या थोरल्या मुलाला एक मुलगा आणि एक मुलगी होती. दुसर्‍याला मात्र दोन्ही मुलीच होत्या. त्यामुळे तिसर्‍या वेळेला ते सुनेची गर्भ तपासणी करू इच्छित होते. एके दिवशी त्यांनी गप्पा मारता मारता निशांत डॉक्टरांना विचारलं. डॉ. निशांतनी याला स्पष्ट शब्दांत नकार दिला. शिवाय त्यांची पत्नीदेखील याच्या विरोधात आहे, हेही निक्षून सांगितलं.  ते म्हणाले, “ आजच्या युगात कसल्या भुरसट कल्पना घेऊन बसला आहात? मुलगा काय मुलगी काय दोघंही एकच!”
     पण सरपंच निघाले जुन्या वळणाचे.ते थोडेच ऐकणार होते. त्यांनी सुनेला मुलगाच व्हावा म्हणून कुठल्या तरी वैद्याकडून झाडपाल्याच्या पुड्या आणून दिल्या. सरपंचांनी कित्येकदा सुनेची सोनोग्राफी करण्याची विनंती केली. पण डॉ. निशांत बधले नाहीत. यावर सरपंच डॉक्टरांवर कमालीचे नाराज झाले. तीन महिन्यानंतर सुनेची तब्येत बिघडू लागली. चेकअप करण्याचा सल्ला देण्यात आला,पण सरपंचांनी ऐकलं नाही. ते म्हणू लागले,“पहिल्या दोन्ही मुलांच्या वेळेला काही झालं नाही. त्यामुळे आताही काही होणार नाही.”
     सुनेला नववा महिना लागला आणि तिच्या शरीरावर सूज चढू लागली. डॉक्टरांनी दवाखान्यात दाखल करायला सांगितले,तरीही सरपंचांनी ऐकले नाही. त्याच रात्री डॉ. निशांत उमाला म्हणाले,“इमरजन्सी केस आहे. सरपंचांनी सुनेला आणलं आहे.”  परिस्थिती फारच गंभीर होती. तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. पण तिला ते वाचवू शकले नाहीत. त्यानंतर सरपंचांच्या समर्थकांनी उपचार व्यवस्थित केले नाहीत, म्हणून दवाखान्याची तोडफोड केली. दवाखान्यात दाखल असलेल्या रुग्णांचीदेखील फरफट झाली.
     घाबरून डॉ. निशांतनी आपल्या मॅजिस्टेट मित्राला फोन केला. अर्ध्या तासात पोलिस आले. त्यांनी निशांत आणि उमा यांना सुखरुप बाहेर काढून घेऊन गेले. ज्या सरपंचांना हृदय विकाराचा झटका आल्यावर दोघांनी कसलाही मागचा पुढचा विचार न करता उपचार केले.त्यातून त्यांना बरे केले. त्याच इसमाने दवाखान्याची तोडफोड घडवून आणली. याचा मोठा धक्का डॉ. निशांतना बसला. त्यांच्या मुलांनी त्यांना गावाकडे न जाण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांचा नाईलाज झाला.  नंतर गावातला दवाखाना विकण्यात आला. शहरात नव्याने दवाखाना सुरू झाला.डॉक्टर दाम्पत्य शहरात रमले. कामात व्यस्त झाले.
     जवळपास आठ महिन्यांनी मॅजिस्टेट मित्राचा डॉ.निशांतना फोन आला. सरपंच गेले. त्यांना पुन्हा हृदय विकाराचा झटका आला. गावातल्या सरकारी दवाखान्यात सुविधा नसल्याने त्यांना शहराकडे आणण्यात येत होते. तोवरच त्यांचा वाटेत मृत्यू झाला. ते तुमची फार आठवण काढत होते म्हणे! ते तुमची माफी मागून पश्‍चाताप करू इच्छित होते.

Monday, July 23, 2018

(लहानशी गोष्ट) जीव


     आज गंगारामला फार आनंद झाला होता.कारण त्याच्या गाईने एका गोंडस वासराला जन्म दिला होता.
गंगाराम चाळीशी ओलांडलेला एक शेतकरी होता. त्याने लग्न केले नव्हते. तो गावातल्या लोकांनाच आपल्या घरच्यांसारखे मानायचा.  तो दिवसभर शेतात खपायचा आणि राहिलेला वेळ गाईसोबत घालवायचा. तिला हिंडवून आणायचा. चारा-पाणी करायचा. तिची जीवापाड काळजी घ्यायचा. त्याचा गाईवर खूप जीव होता. आज तर त्याच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. या आनंदातच त्याने गावभर लाडू आणि पेढे वाटले.

गंगाराम गाईचे दूध कधी विकायचा नाही. उलट गावातल्या मुलांना घरी बोलावून त्यांना दूध प्यायला द्यायचा. त्याला कबड्डीची मोठी हौस होती. रोज संध्याकाळी त्याच्या घरासमोर कबड्डीचे मैदान भरायचे.
आज गंगारामने रोजच्याप्रमाणे गाईला चारा-पाणी देऊन खुंट्याला बांधले. वासरालादेखील नेहमीप्रमाणे गाईभोवती खेळण्यासाठी मोकळे सोडले. आणि स्वत: रानात निघून गेला.
गाव शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर होते. त्याच्या घरामागूनच शहराच्या दिशेने जाणारा रस्ता गेला होता. त्यादिवशी वासरू खेळत-खेळत रस्त्यावर गेले. एका वेगात आलेल्या गाडीने त्याला जोराची धडक दिली आणि वासरू जागीच गतप्राण झाले.
कळल्यावर गंगाराम धावतच आला. त्याचा रक्तदाब वाढला होता. रस्त्यावर मरून पडलेले वासरू पाहून त्याचा हार्ट फेल झाला आणि तोही जागीच कोसळला. दोघांचे मृतदेह रस्त्यावरच पडले होते. संध्याकाळ होत आली होती. इकडे गाईचा जीव वरखाली होत आला होता. कारण आज ना मालक आला होता, ना तिचे वासरू.
अर्धी रात्र ओसरली. तिच्या सहनशीलतेचा अंत झाला. तिने दाव्याला हिसडा द्यायला सुरुवात केली. पण काही उपयोग झाला नाही. शेवटी तिचाही शेवट झाला. आज गंगाराम, गाय आणि वासरू या तिघांचा जीव उडाला होता. संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
पोलिस चौकशी झाली.या चौकशीत स्पष्ट झाले की, गाडीचा ड्रायव्हर दारू प्यायला होता. पण त्याने या दारूच्या नशेत आपल्याबरोबरच आणखी दोघा जीवांचा जीव घेऊन गेला. वाहन सावकाश चालवायला हवे, हे कोण कुणाला सांगणार?

(लहानशी गोष्ट) बाबा, मला लग्न करायचं आहे


     दहा वर्षाचा अर्णव अभ्यासात हुशार होता. शाळेतले आणि घरातले सगळेच त्याला जीव लावायचे. आई तर त्याला जिवापाड जपायची. हादेखील आईची काळजी घ्यायचा. आईला कुठं लागलं-खरचटलं तर लगेच त्यावर फुंकर मारायला हजर असायचा.

सगळे आपापल्या विश्‍वात दंग होते. इकडे अर्णव मात्र दिवसेंदिवस अबोल होत चालला होता. त्याचं काही तरी बिनसलं होतं. एके दिवशी अर्णव शाळेतून घरी आल्या आल्या बाबांना म्हणाला,“ बाबा, मला लग्न करायचं आहे. माझं लग्न लावून द्या.” बाबांनी पहिल्यांदा तर हसण्यावरीच नेले,पण त्याचा घोशा सुरूच होता. “अरे माझ्या बछड्या, मोठा तरी हो, मग बघू.” पण अर्णव काही ऐकायला तयार नव्हता.“बाबा,प्लिज...” असं त्याचं चालूच होतं. शेवटी वैतागून त्याचे बाबा त्याच्यावर जोराचे ओरडले.
अर्णव रडायला लागला. त्याची आई धावतच आली. त्याला जवळ घेऊन मायेनं कुरवाळू लागली. बाबा रागाने म्हणाले,“ तुमच्या या लेकाला लग्न करायचं आहे म्हणे!पहिल्यांदा तर हसून टाळण्याचा प्रयत्न केला,तर याचं चालूच... अगदी तुझ्या वळणावर गेला आहे.”
काही वेळाने बाबांचा राग शांत झाला. आपल्या मुलावर रागावल्याचा त्यांना पश्‍चाताप झाला. ते त्याच्या खोलीत गेले. त्याला उठवलं, त्याला जवळ घेतलं आणि म्हणाले, “ माझं जरा अतीच झालं.राग अनावर झाला बाबा.” मग त्याच्याबरोबर खेळू लागले. “पण तुला लग्न का करायचे आहे?” बाबा म्हणाले.
अर्णव म्हणाला,“ बाबा, तुम्हीच म्हणाला होतात ना की, तुम्ही आईशी लग्न करून तिला इथं आणलं आहे. ती आल्यावर तुमची सगळी कामं आई करू लागली. तुम्हाला आराम मिळू लागला. माझी बायकोदेखील माझी सर्व कामं करेल. माझा होमवर्क करेल. मी आराम करीन.” बाबा मोठ्यानं हसू लागले.
“आजीही म्हणते,तुझी आई आल्यापासून मीदेखील आराम करते. आई दिवस-रात्र काम करते. आईचं काही चुकलं तर तुम्ही तिला रागावता. आजीदेखील कधी कधी आईचा रागं रागं करते. मी आईला नेहमी म्हणतो, तू का नाहीस रागं रागं करत. कधी कधी तिचा मूड बिघडला तर ती मलाच रागावते.”
“बाबा, माझी बायको येईल ना,तेव्हा आईलासुद्धा आराम मिळेल. कुणीच आईला कामात मदत करत नाही. म्हणून मी तिला मदत करणार आहे.”  बाबा विचारात पडले. खरंच, सगळी चूक अर्णवची आहे की घरच्या अन्य सदस्यांची?

Sunday, July 22, 2018

दुष्काळ तरीही अर्थकारण शेतीभोवतीच!


(मच्छिंद्र ऐनापुरे)
जत तालुक्याच्या एका कोपर्‍यातून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून कृष्णेचं पाणी सांगोल्याकडं जातंय. 120 गावे आणि 350 वाड्या-वस्त्यांच्या या तालुक्यातील जेमतेम दहा-बारा गावांना कृष्णेचं पाणी पोहचलं आहे. या गावांचं अर्थकारण बदललं आहे. आता या परिसरातले शेतकरी ऊस,द्राक्षे, डाळिंब ही पीकं घेतली जात आहेत. जनावरांची संख्या वाढून दुधाचे प्रमाणही वाढलं आहे. शेतकर्‍यांकडे आर्थिक सुबत्ता येऊ लागली आहे. पण बाकीच्या गावांचं काय? या गावांना कृष्णेचं पाणी कधी मिळणार आणि इथे सुबत्ता कधी नांदणार? परवा सांगली जिल्ह्यातल्या टेंभू योजनेला भरघोष मदत विधानसभेत जाहीर करण्यात आली आहे. पण या ठिकाणी जतच्या वाट्याला काहीच आल्याचं आढळून आलं नाही. जेमतेम साडेचारशे मिलिमीटर पर्ज्यनमान असलेल्या तालुक्याचं अर्थकारण दुष्काळ असतानाही शेतीभोवतीच फिरत आहे. कारण या ठिकाणी कोणताही उद्योग किंवा कारखानदारी नाही. त्यामुळे इथले कुशल आणि अकुशल मनुष्यबळ स्थलांतर करत असते. कृष्णेचं पाणी कधी तालुक्यातून खळाळणार आणि शेतकर्‍यांमध्ये आर्थिक सुबत्ता कधी येणार, असा प्रश्‍न तब्बल गेली पन्नास वर्षे विचारला जात आहे. आता पुन्हा तोच प्रश्‍न इथल्या सर्वांच्या तोंडी आहे.

आधुनिक शेती करण्याशिवाय पर्याय नाही, अशी दृढता आपल्या शेतकर्‍यांमध्ये आली असल्याने ठिबक-तुषार सिंचनाचा वापर करत शेतकरी द्राक्षे, डाळिंब पिके घेऊन बागायतदार बनू लागला आहे. मात्र याला कधी सुक्या दुष्काळाचा आणि दराचा फटका वारंवार बसत आला आहे, त्यामुळे आर्थिक विवंचनेतून शेतकरी वर यायला तयार नाही. पाण्यासाठी आंदोलने झाली, महाराष्ट्र सोडून कर्नाटकात जाण्याची भाषा झाली.पण त्याचा उपयोग होताना दिसत नाही. पाणी येईल, चर्चा सुरू आहे, अमुक एवढा निधी आला आहे. आता पाणी शिवारात खळाळणार, अशा बातम्याच तेवढ्या ऐकायला आणि वाचायला मिळत आहेत. प्रत्यक्षात पाण्याचा पत्ताच नाही. पाणी पाणी असा टाहो फोडत दोन पिढ्या गेल्या आहेत, तरीही कृष्णेचे पाणी येतच आहे. अजून किती पिढ्या घालवाव्या लागणार, असा प्रश्‍नच आहे.
निसर्गाच्या लहरीवर इथला शेतकरी ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेत आहे. इथली ज्वारी रुचकर आहे.त्यामुळे पुण्या-मुंबईकडून या ज्वारीला मागणी आहे.पण दर मिळत नाही. पाणी नसल्याने इथल्या शेतकर्‍यांना ज्वारीशिवाय पर्याय नाही. 2 लाख 25 हजार 828 हेक्टर क्षेत्र असलेल्या तालुक्यात लागवडीखालील क्षेत्र 1 लाख 34 हजार 353 हेक्टर आहे. यातले खरिपाचे क्षेत्र 45 हजार 100 हेक्टर आणि रब्बीचे क्षेत्र 82 हजार 600 हेक्टर इतके आहे. पैकी तब्बल 84 हजार हेक्टरवर ज्वारीचे पीक घेतले जाते. त्यानंतर बाजरीचा क्रमांक लागतो. बाजरी 30 हजार हेक्टरवर तर त्याखालोखाल मका 5 हजार 726 हेक्टरवर घेतला जातो.
कडधान्यांमध्ये भुईमूग (2 हजार 500 हेक्टर),उडीद (3 हजार), सूर्यफूल (2 हजार 200), मटकी (6 हजार 288) आणि तूर (5 हजार 540) घेतली जाते. डाळिंबाचे आगार समजल्या जाणार्‍या तालुक्यात द्राक्षपिकाचे क्षेत्र वाढू लागले आहे. ठिबकवर इथल्या पोषक जमिनीवर द्राक्षे पीक वाढत असून सध्या 6 हजार 200 हेक्टरवर घेतले जात आहे. डाळिंब 4 हजार 200 हेक्टरवर घेतले जाते. विशेष म्हणजे यंदा प्रथम ऊसाची लागवड दुप्पट झाली आहे. याशिवाय आंबा, चिकू, बोर यांच्या बागाही काही प्रमाणात आहेत.पाऊसमान गेल्यावर्षी समाधानकारक झाल्याने हा फरक आपल्याला दिसत आहे.
शेती ही जरी पावसाच्या पाण्यावर असली तरी आणि त्यातून फायदा होवो अथवा न होवो,पण शेतकर्‍यांना खरा हातभार लावत आहे, तो पशुधन आणि दूधाचा व्यवसाय. माडग्याळ मेंढी आणि मटणासाठी येथील बोकडांना मोठी मागणी आहे. जत आणि माडग्याळ येथे जनावरांचा मोठा आठवडी बाजार भरतो. मोठी उलाढाल होत असते. कोल्हापूर,इचलकरंजी, इस्लामपूर, सातारा यांसह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून मांसासाठी बोकडांना मोठी मागणी आहे. याचा फायदा इथल्या शेतकर्‍यांना आणखी व्हावा, यासाठी अशोक शिंदे यांनी मांस प्रक्रिया उद्योग याठिकाणी व्हावा, अशी मागणी उचलून धरली होती,पण ती प्रत्यक्षात उतरू शकली नाही. शासनाने याकडे लक्ष दिल्यास हा व्यवसाय भरभराटीला येऊ शकतो. यानंतर दूध संकलनही मोठ्या होत आहे. म्हैशींबरोबरच जर्शी, गीर जातीच्या गाईंचे प्रकल्प वाढत आहेत. जत तालुक्यात दूध संघ नाहीत,पण वारणा,वसंतदादा, राजारामबापू, चितळे, सोलापूरचे काही दूधसंघ येथून दूध संकलन करत आहेत. काही दूध संघ जनावरांच्या संख्यात्मक वाढीसाठी अर्थसहाय्य करत आहेत. अर्थात अलिकडच्या काळात नवी पिढी बाहेरील पाण्याची वाट न पाहता जिद्द,परिश्रम आणि काटकसरीने शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करत आहे. आणि त्यांना यशही मिळत आहे. ड्रॅगनसारखे फळही घेतले जात आहे. 800 हेक्टरच्या आसपास याची शेती आहे. शेतकर्‍यांना अर्थकारण कळले असले तरी पाणी या महत्त्वाच्या घटकाची आस त्यांना लागून राहिली आहे. बँका, पतसंस्था, सोसायट्या याम्च्या माध्यमातून शेतकरी आपली आर्थिक उन्नती करून घेत आहे. जत तालुक्यातल्या बँका आणि पतसंस्थांचे व्यवहार काही अपवाद सोडले तर चांगल्या प्रकारे सुरू आहेत.

तालुक्यातील सहकारी संस्था
सोसायट्या- 82
पतसंस्था-65
औद्योगिक संस्था-13
मजूर सोसायट्या- 32
पगारदार संस्था-6
गृहनिर्माण संस्था-12
खरेदी-विक्री संघ-1
बँका- 1 जत अर्बन आणि इतर 9 राष्ट्रीयकृत बँका

नवरा मुलगा डोप टेस्टमध्ये उत्तीर्ण झाल्यावरच होणार लग्न!


     आजकालची तरुण पोरं फक्त पायातले बघताना दिसत आहेत. दूरचे पाहायचं त्यांनी सोडून दिलं आहे. अजून आयुष्य इतकं पडलेलं असतानाही त्याची चिंता त्यांना पडलेली दिसत नाही. नशापान करणे, गुंडागर्दी करणे यातच ही मंडळी मश्गुल आहेत. ध्येय नावाची चीज यांच्या डोक्यात शिरलेली नाही. खाणे-पिणे ऐश करणे, यालाच त्यांनी ध्येय समजून नालायकी जीवन जगत आहेत. यांना ना नोकरी, ना छोकरी, अशी गत झाली असल्याने यामुळे याचा मोठा दुष्परिणाम समाजावर होत आहे. समाज दुषित होत चालला आहे. मुलींवर वाईट नजर ठेवून त्यांची छेड काढणे, अत्याचार करणे असे प्रकार वाढू लागले आहेत. सध्या तरुण वर्गाकडून होत असलेले गुन्हे हे फक्त आणि फक्त नशाखोरीमुळे वाढले आहेत. पुढारी लोकांची साथ अशा लोकांना त्यांच्या स्वार्थामुळे मिळत असल्याने या देशातल्या तरुणांचे काय होणार असा प्रश्‍न सुज्ञ लोकांना सतावत आहे.

     पंजाब आणि हरियाणा राज्यात सर्वाधिक नशेबाज असल्याचे नुकतेच एका अभ्यासात आढळून आले आहे. अन्य राज्यांमध्येही सर्व काही सुरळित आहे, असे नाही. सर्वच राज्यांमध्ये नशाखोरी बोकाळलेली आहे,मात्र या दोन राज्यांमध्ये जरा अतीच आहे. काँग्रेस नशाखोरी बंद करू असे आश्‍वासन देत पंजाबमध्ये सत्तेवर आली असली तरी ती नष्ट करणे किती मोठे कठीण आहे, याची कल्पना त्यांना आली आहे. अर्थात त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आता वेगळी योजना राबवण्याचा विचार या राज्यांमध्ये सुरू आहे. त्यातल्या त्यात चंदीगढ या केंद्रशासित प्रदेशात तर फारच वेगळा विचार अंमलात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लग्नाअगोदर मुलाची डोप टेस्ट (नशेची तपासणी) करण्याची योजना बनवण्यात आली असून जर नवरा मुलगा या तपासणीला होकार देत असेल तर त्याची चाचणी करण्यात येईल. यासाठी डोप टेस्टसाठी सरकार उपलब्ध करून देणार आहे. यात नवरा मुलगा पास झाला तरच मुलगी त्याला पसंद करू शकते.
     पोलिस अधिकार्‍यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याबाबतची माहिती दिली आहे. ही योजना राबवल्यास नशाखोरी थांबवण्याच्यादृष्टीने पहिले पाऊल असेल, असे म्हटले आहे. उच्च न्यायालयाने मान्य केले आहे की, बहुतांश कौटुंबिक कलहाचे कारण नवर्‍याची नशाखोरी आहे. यामुळेच घरात भांडणे, बायकांना मारहाण करणे, घरादाराचे नुकसान करणे, असे प्रकार होत आहेत. जर नवर्‍याची नशा तपासणी करण्याची व्यवस्था सरकारने केल्यास चंदीगढ हा देशातला पहिला प्रदेश असणार आहे. या केंद्रशासित प्रदेशानंतर दोन्ही राज्यात ही योजना राबवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारच्या एका अभ्यासानुसार चंदीगढसह पंजाबमध्ये जवळपास 9 लाख नशेखोर युवकांचा समावेश आहे. यांची वये ही साधारणत: 15 ते 35 च्या दरम्यान आहेत. यातले बहुतांश युवक ( 53 टक्के) हेरॉईनसारख्या नशेच्या पदार्थाचे सेवन करतात. या नव्या योजनेच्या अंमलबजावणीमुळे नशापान करणार्‍या नवर्‍या मुलास लग्नास नकार देण्याचा अधिकार मुलींना मिळणार आहे. कुठल्याही मुलीला आपला नवरा दारुडा, नशा करणारा नको असतो. त्यामुळे मुलींच्या मनाविरुद्ध काही घडणार नाही.
     तरुणांच्या नशाखोरीला खरे तर पायबंद घालणे फार आवश्यक आहे. यामुळे तरुणांचा देश अशी ओळख असलेल्या भारतातले तरुण बरबाद होताना दिसत आहेत. परिणाम आपला देश महासत्ता कसा बनू शकतो, असा प्रश्‍न आहे. देशात सामाजिक मूल्यांचा र्‍हास होत असून आपला देश मूल्यांची रुजवण करायला कमी पडत आहे. राज्याराज्यांमधील आणि देशातला शिक्षण विभाग यासाठी प्रयत्न करीत असला तरी ज्या वयात मुलांना याची गरज आहे, तिथे कुठेच मूल्यांची शिकवण दिसून येत नाही. याला खरे तर शासन, प्रसारमाध्यमे, सोशल मिडिया, शिक्षण संस्था कारणीभूत आहेत. आपल्या देशातल्या शिक्षणाकडे उद्योजक, व्यावसायिक बनवणारे युवक बनवण्याचा अभ्यासक्रम नाही. संशोधक तर आता बनतच नाहीत. तशी गुंतवणूक, व्यवस्था नाही. प्रसारमाध्यमेदेखील स्वत:च्या स्वार्थाखेरीज दुसरे काही दाखवण्याच्या मनस्थितीत नाही. ही प्रसारमाध्यमे आपला टीआरपी वाढवण्यासाठी गुन्हेगार आणि गुन्हेविषयक बातम्यांना अधिक स्थान देताना दिसत आहेत. वास्तविक सरकारने प्रसारमाध्यमांना काही नियम घालून देण्याची गरज निर्माण झाली आहे. स्वातंत्र्य हा लोकशाहीचा एक महत्त्वाचा घटक असला तरी त्याला काही मर्यादा आहेत, आचारसंहिता आहे. विधायक बातम्यांना, मूल्याधारित बातम्यांना अधिकाधिक स्थान देणार्‍या आणि त्यावर चर्चा घडवून आणणार्‍या प्रसारमाध्यमांना सरकारी जाहिराती व अन्य सोयीसुविधा देण्याचा विचार करायला हवा.
     आपल्या देशात राजकारणावर फार बोलले,लिहिले आणि दाखवले जाते. विज्ञान, टेक्नॉलॉजी या गोष्टींवर फारच कमी चर्चा होताना दिसते. अन्य देशात याच्या उलट परिस्थिती आहे. अन्य देश मंगळावर वसाहत निर्माण करण्याच्यादृष्टीने हालचाल करत आहे. नवे तंत्रज्ञान शेतीसह सर्व क्षेत्रात आणले जात आहे आणि उत्पादन वाढवले जात आहे. आपल्याकडे राजकारण आणि अंधश्रद्धा कशी पसरवता येईल, अशा आधारावरच स्टोर्‍या बनवल्या जात आहेत. राजकारणावर आणि त्यांनी केलेल्या स्टंटबाजीवर अधिक वेळ खर्च करण्यापेक्षा प्रसारमाध्यमांनी युवकांना संशोधन,उद्योग,शेतीपुरक व्यवसाय यांच्या यशकथा यांचा भडिमार करण्याची आवश्यकता आहे. आपला देश तरुणांचा देश आहे. चीन-जपानसारखे देश म्हातारे होत चालले आहेत. याठिकाणी तरुणांची आवश्यकता आहे. आपले तरुण ही कसर भरून काढू शकतात, मात्र आमची ही पिढी नशाखोरीत बरबाद होत चालली आहे. वास्तविक आपल्या देशाकडून म्हणजेच सरकार आणि प्रसारमाध्यमांकडून ही संधी तरुणांना परदेश नोकरी उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या रोजगाराच्या वाटांवर अधिक फोकस दिला जायला हवा आहे. आपल्या देशातल्या तरुणांना मार्गावर आणण्याचा प्रयत्न झाला तरच देश महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहात आहोत, ते साकार होणार आहे.

Thursday, July 19, 2018

(बालकथा) गर्दीने भरलेले आकाश


     जून 2099 ची ही सकाळ फार उष्ण होती. निळाशार आकाशात तरंगणारे विशेष प्रकारच्या पदार्थांपासून बनवलेले नारंगी ढग हवा फिल्टर करत होते. आकाशात काही उंचीवर ड्रोन तथा डिस्कसारखी स्वयंचलित वाहने फिरत होती. यांमध्ये काही लोक कंबरेला आंटी ग्रेविटी बेल्ट बांधून उडत होते. पृथ्वीवर तर जागाच शिल्लक उरलेली नव्हती, त्यामुळे बहुतांशी ट्रॉफिक आकाश मार्गानेच चालू होते.
शंभराव्या मजल्यावरील आपल्या एका छोट्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये उभी असलेली शुभी कसल्याशा विचारात बुडाली होती. खरं तर तिला जॉगिंग करायचं होतं,पण ती तिचा व्हर्चुअल रियलिटी डिवाइस कोठे तरी ठेवून विसरून गेली होती.
“आई!” तिने आवाज दिला.

“तू पुन्हा विसरलीस का? तरी बरं, घरातल्या सगळ्या वस्तू कॉम्प्युटराइजड आहेत.” असे म्हणत शुभीच्या आईने मनगटावरच्या स्मार्टफोनवर कसली तरी कमांड दिली. लगेच बीप बीप असा मोठा आवाज शुभीच्या खोलीतून ऐकायला येऊ लागला.
“जा, त्याचे लोकेशन तुझ्या उशीखाली दाखवतेय.”
शुभी धावतच आत गेली आणि तिच्या उशीखालचे हेअरबँडसारखे डिवाइस उचलले. बाल्कनीत येऊन तिने डोक्याला फिड केले.
“डिवाइस ऑन.” असे म्हणताच भोवतालचे वातावरण एकदम बदलून गेले. गर्दीने भरलेल्या आकाशाच्या ठिकाणी आता हिरवीगार बाग अवतरली. तिथे रंगीबेरंगी फुले, छान छान फुलपाखरे आणि सुंदर पाण्याचे कारंजे दिसत होते. फुलांतून निघणारी मंद सुगंधी हवा नाकाला आल्हाददायक वाटत होती. पायांत जाणवणार्‍या हिरव्या गालिच्यासारख्या गवतावर जॉगिंग करायला शुभीला चांगलीच मजा येत होती.
“शुभी, मी कामावर चाललेय. तू नाष्टा करून अभ्यासाला बस.”  कंबरेला एंटी ग्रेविटी बेल्ट लावले होते. अंगावरच्या ड्रेसवर ती सुंदरसे जॅकेट कसून बांधत होती. खरे तर हे विशेष प्रकारचे थर्माकंट्रोल जॅकेट होते. यात असलेली बॅटरी आणि आतल्या बाजूला पसरलेल्या पातळ तारेच्या जाळीमुळे आतले तापमान नियंत्रित केले जाऊ शकत होते. हे जॅकेट शरीराला एसीप्रमाणे थंड आणि हिटरसारखी उष्णता देऊ शकत होते.पंखे, कूलर,एसी, हीटर आणि रजई-कांबळ यांचा जमाना कधीचा सरला होता. आईने शुभीच्या मस्तकाला आपल्या ओठाने स्पर्श केला आणि बाल्कनीतल्या टेक ऑफ पॉइंटवरून उड्डाण केले.
शुभीला या खेपेला उन्हाळ्याच्या सुट्टीत चंद्रावर फिरायला जायचं होतं. आई परत आल्यावर आपला बेत सांगायचा, असा विचार करून तिने खोलीतल्या स्क्रीनसारख्या भिंतीवर न्यूज चॅनेल लावले.
स्क्रीनवर दाखवले जात होते की, पृथ्वीच्या पहिल्या ग्लोब कमांडरची निवड झाली होती. आता ते शपथग्रहणासाठी ग्लोब सेंटरच्या भव्य इमारतीच्या दिशेने निघणार होते. पृथ्वीवरच्या फ्रान्स, अमेरिका, रशिया, ब्रिटेन, भारत आणि चीन या प्रमुख सहा फारबिक देशांबरोबरच अन्य देशांचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते. सहा प्रमुख देशांच्या समुहाला फारबिक म्हटले जात होते. ग्लोबल वार्मिंग, पॉप्युलेशन बॉम्ब, आतंकवाद यासारख्या आव्हानांचा निपटारा करण्यासाठी या फाबरिक देशांनी मिळून एका संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेचा प्रमुख म्हणून ग्लोब कमांडरची निवड केली गेली होती.
“जरा, माझं ऐक.” कुणी तरी शुभीच्या कानाजवळ येऊन पुटपुटलं. तिने चमकून मागे पाहिलं. मोठ्या मोठ्या हिरव्या डोळ्यांची एक सुंदर मुलगी तिच्याजवळ उभी होती. ती कुठल्या तरी होलोग्राम इमेजसारखी दिसत होती. तिने शरीराला चिकटलेला शानदार पोशाख परिधान केला होता. त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे सेंसर आणि इंडिकेटर चमकत होते.
“कोण आहेस तू? कोणी एलियन आहेस का? आणि इथे का आलीस?”शुभीने विचारले.
 “अगं, नाही! मी रोमा. तुझ्यासारखी मनुष्यच आहे. भविष्यकाळातून आली आहे. मला तू भविष्ययात्री म्हणू शकतेस.”
“तू इथे का आली आहेस?” शुभीला थोडं थोडं लक्षात येत होतं.
“पृथ्वीचा सर्वनाश थांबवण्यासाठी!”
“ काय म्हणालीस?” ऐकून शुभीला शुद्ध हरपल्यासारखे झाले.
“खरे तर मी प्राचीन इतिहासावर पुस्तक लिहितेय. या संदर्भात मी पृथ्वीवरच्या विशिष्ट लोकांच्या मुलाखती घ्यायला आले होते.”
“मुलाखत, आणि भूतकाळातल्या लोकांची?” शुभीला काही अर्थबोध झाला नाही.
“बघ, हा थॉट स्कॅनर आहे.एकविसाव्या शतकातील प्रज्ञावंत व्यक्ती इयोन रस्क यांच्या न्यूरालिंक प्रोजेक्टची कमाल!  याच्याने लोकांचे विचार वाचले जाऊ शकतात. आम्ही आमच्या प्रश्‍नांची यादी तयार करतो आणि लोकांचा मेंदू वाचून त्यांचे उत्तर समजून घेतो. मी आताच पहिल्या ग्लोब कमांडरची मुलाखत घेऊन आलेय. असं कळलंय की, तो सरफिरा आतंकवादी आहे, जो संपूर्ण पृथ्वी नष्ट करायला निघाला आहे. तो खूप आनंदी आहे,कारण लवकरच त्याला ही संधी उपलब्ध होणार आहे.” रोमा काळजीच्या स्वरात म्हणाली.
शुभीला सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला. पदाची शपथ घेतल्यावर ग्लोब कमांडरला अणूशस्त्रास्त्रांच्या कंट्रोल बटनाचा कोड सोपवला जाणार होता.
 “म्हणजे हे जग काही क्षणात नष्ट होणार आहे?” असा विचार करत शुभीने शपथ घ्यायला निघालेल्या ग्लोब कमांडरकडे पाहिले. त्याच्या डाव्या कानावर छोटीसी मस दिसत होती. पण मागच्या काही दृश्यांमध्ये हे नव्हते. काही तरी गडबड होती.
“माझी आई ग्लोब कमांडरच्या सुरक्षा यंत्रणेची चीफ कमांडो आहे. ती नक्कीच काही तरी करू शकते.” असा विचारत करतच तिने कापर्‍या हाताने आईला मनगटावरच्या स्मार्टफोनद्वारा संपर्क साधला. तिला सगळा प्रकार सांगितला.
लगेचच ग्लोब सेंटरवर गोंधळ उडाल्याचे दिसत होते. ग्लोब कमांडरला तिथून हटवण्यात आले आणि लागलीच गुप्त ठिकाणी  स्थानबद्ध करण्यात आले. शपथग्रहण सोहळा स्थगित करून शहरात रेड अलर्ट जारी करण्यात आले.
“तुला ही गोष्ट माझ्या अगोदर माझ्या आईला सांगायला हवी होती.” शुभी अजूनदेखील गोंधळलेलीच होती.
“मी प्रयत्न केला,पण त्या ऐकू शकल्या नाहीत. सगळेच काही आमचे सिग्नल पकडू शकत नाहीत. पण तू ते संकेत पकडलेस.” असे म्हणून रोमा हसली.
काही तासांनी शुभी डायनिंग टेबलवर बसून बाबांनी बनवलेला रुचकर पास्ता मोठ्या चवीने खात होती.
“तो कुणी तरी हमशकल बहुरुपी होता, ज्याने खर्‍या ग्लोब कमांडरची जागा घेतली होती.” आई सांगत होती. “वास्तविक, शपथग्रहणापूर्वी ग्लोब कमांडर वॉशरूममध्ये गेले होते. तिथे केयर टेकरच्या वेशात तो बहुरुपी उपस्थित होता. त्याने ग्लोब कमांडर यांना बेशुद्ध केले. आणि त्यांचा वेश परिधान करून बाहेर आला. अणुशस्त्रास्त्रांचा कमांड कोड मिळताच तो मोठा धमाका करणार होता. तो पकडला गेला. आता सर्व काही ठीक आहे.”
अचानक खोलीतल्या स्क्रीन- वॉलवर खर्‍या ग्लोब कमांडरचा हसरा चेहरा दिसू लागला. ते म्हणत होते, “आम्हां सर्वांना तुझा अभिमान आहे, शुभी. एका भव्यदिव्य समारंभात तुला सन्मानित करण्याबरोबरच चांद्रसहलीचे बक्षीसही दिले जाणार आहे.”
“व्वा! मुलगी असावी तर अशी!”  आई-वडिल आनंदाने एकदम ओरडले. मनातल्या मनात रोमाला धन्यवाद देत शुभी उठून उभी राहिली. तिला आता चांद्रसहलीची तयारीसुद्धा करायची होती. (मूळ हिंदी लेखिका-कल्पना कुलश्रेष्ठ) अनुवाद-मच्छिंद्र ऐनापुरे

Tuesday, July 17, 2018

भविष्यात जगावर 'सायन्सराज'


     रोबोटकरवी होत असलेली कामे,उडत्या कारची यशस्वी चाचणी,चालकविरहित कार, शेतीत वाढत चाललेले तंत्रज्ञान, अ‍ॅपच्या माध्यमातून मोबाईलचा होत असलेला विविधांगी वापर या गोष्टी पाहता भविष्यात सायन्सचे राज्य असणार आहे, यात तीळमात्र शंका नाही. तीस वर्षांपूर्वी वर्चुअल रियलिटीच्या वस्तू फक्त चित्रपटांमध्ये पाहायला मिळायच्या. आता त्या सत्यात उतरल्या आहेत. मात्र आज जो विचार केला जात आहे, तो उद्या सत्यात उतरणार आहे. हे फक्त आणि फक्त सायन्समुळे घडत आहे. उद्याचं जग कसं असणार आहे, याची आपणा सर्वांनाच उत्सुकता आहे.

     अलिकडच्या हॉलीवूड चित्रपटांमध्ये आयर्नमन,हल्क,स्पायडरमन या सुपर हिरोंचा बोलबाला आहे. बॉलीवूडच्या क्रिशनेदेखील यात भर घातली आहे. आपण उडणार्‍या कार चित्रपटांमध्ये पाहिल्या आहेत. एका झटक्यात एका ग्रहावरून दुसर्‍या ग्रहावर उड्डाण करणारे सुपर हिरोज आपण पाहात आहोत. पण आज जे आपण चित्रपटांमध्ये पाहात आहोत,त्याला शास्त्रीय आधार आहे. यामागे सायन्स आहे. यांवर संशोधन चालू आहे. त्यामुळेच आपल्याला या गोष्टी चित्रपटांमध्ये दिसत आहेत. आणखी काही वर्षांनी म्हणजे सुमारे पन्नास वर्षांत आपल्याला या गोष्टी प्रत्यक्षात साकारलेल्या दिसतील. हे एकदम काही घडणार नाही,परंतु टप्प्या-टप्प्याने या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. अर्थात यातून काही चांगले परिणाम दिसतील,काही वाईटही. कारण याचा सदुपयोग आणि दुरुपयोग करणारे,याच पृथ्वीवर आहेत.
सध्याची वाढती लोकसंख्या या जगापुढे मोठा चिंतेचा विषय आहे. यामुळे अन्नधान्य आणि साधनांची कमतरता भयंकर भासणार का, असा प्रश्‍न असला तरी काही प्रमाणात यावर संशोधन होऊन माणूस यावरही मात करू शकेल, असे विज्ञानाच्या वाढत्या वापरावरून स्पष्ट होत आहे. मात्र कदाचित न्यूक्लियर वॉर, पाणी टंचाई, ग्रीन हाऊस गॅसचे वाढते प्रमाण यासारखी भिती भविष्यात कमी होऊ शकेल. औषधांवरचे अवलंबित्व कमी होईल, कारण शरीरात एखाद्या गोष्टीची कमतरता आढळून आल्यास नॅनो यंत्रे तिथे पाठवून ती भरून काढण्याचा प्रयत्न केला जाईल. काही भू-शास्त्रज्ञांनी जी भिती व्यक्त केली आहे, ती कदाचित सत्यात उतरण्याचीही शक्यता आहे. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास समुद्र किनारी वसलेली शहरे पाण्याखाली जाऊ शकतात, अशी भविष्यवाणी काही शास्त्रज्ञांनी केली आहे. आपण एलियन्सच्या विश्‍वात सैरसपाटा करू शकू. 2050 पर्यंत जगभर फक्त इलेक्ट्रिक वाहनांचाच बोलबाला असणार आहे. पेट्रोल-डिझेलची जागा बायनरी पॉवरने घेतलेली असेल. तुम्हाला आश्‍चर्य वाटेल, सध्या मलेशियासारख्या देशाने तर लोकांच्या रस्त्यावरून चालण्याने निर्माण होणार्‍या एनर्जीद्वारा वीज बनवण्याच्या शोधाच्या खटपटीला लागले आहेत.
मंगळावर मंगलमय वातावरण
येणार्‍या शतकात मंगळ ग्रहावर मंगलमय वातावरण असणार आहे. आपले अवकाश विज्ञान इतके पुढे गेले आहे की, भिती उत्पन्न करणारी अवकाश पोकळी आणि मैदाने असणार्‍या ग्रहांवरदेखील सध्या काम सुरू आहे. या ठिकाणी पृथ्वीवरच्या माणसांच्या वस्त्या असणार आहेत. लोक पिकनिक करायला जात असतील. शुक्रावरचे मैदान दलदलीचे आहे, त्यामुळे शास्त्रज्ञ आतापासूनच पृथ्वीपासून वर हवेत तरंगणारी अंतराळ प्रयोगशाळा बनविण्याचा विचार केला जात आहे.
पुढच्या काही दशकांचीच गोष्ट असणार आहे. मंगळावर कमीत कमी सात लाख लोक कायमस्वरुपी राहू शकतील.एवढेच नव्हे तर आतापर्यंत ज्या एस्टेरॉइड (लघुग्रह) आणि मिटियोरॉइडपासून पृथ्वी वाचवण्याचा गप्पा मारल्या जातात, त्यांच्यापासूनचा बचाव तर आपल्या डाव्या हाताचा मळ असणार आहे.त्यात लपलेले महागडे खनिज शोषून पृथ्वीवासीय आपल्यासाठी त्याला उपयोगात आणतील. आता तर आपण फक्त मंगळा आणि चंद्रापर्यंतच पोहचलो आहोत. पण नॅनो यंत्रे म्हणजेच अगदीच छोट्या आकाराची पण मोठी कामगिरी करणारी आणि सूर्यापासून सतत आपल्यासाठी ऊर्जा बनवण्यात सक्षम असणार्‍या यंत्रांमुळे आपल्याला पुढे आकाशगंगांमध्येदेखील प्रवेश मिळवता येणे शक्य होणार आहे.
ड्रोनमार्फत होम डिलीव्हरी
ड्रोनची उपयुक्तता आता आपल्या चांगलीच लक्षात येऊ लागली आहे. अलिकडे त्याच्या वापराबाबत आणखी संशोधन होऊ लागले आहे. शरीराच्या अवयवदानात त्यांचे वहन भविष्यात ड्रोनमुळे शक्य होणार आहे.तातडीने अवयव मिळाल्याने अनेकांना जीवनदान मिळणार आहे. शिवाय यापुढे आपल्याला दूध, अन्नपदार्थ आणायला रहदारीतून वाट काढत किंवा उन्हा-पावसात बाहेर पडावे लागणार नाही. फक्त एका फोनवर त्याची होम डिलीव्हरी होऊ शकणार आहे.
भविष्यातील शिक्षण
येणार्‍या काळात परीक्षा आणि रोज रोज शाळेला जाण्याची कटकट कमी होईल. विद्यार्थ्याला त्याच्या कुवतीप्रमाणे, इयत्तेनुसार  घरीच शिक्षण दिले जाईल. त्यामुळे ना कुणाशी स्पर्धा असणार आहे, ना कसली गर्दी. ई-लर्निंगचा बोलबाला असणार आहे. प्रत्येक गोष्टीत वर्च्युअल रियलिटी हावी असणार आहे, तर खेळाच्या मैदानाच्या जागी वर्च्युअल वर्ल्डमध्ये राहून मुले,युवक आऊटडोर खेळ खेळू शकतील.
शेती असेल वर-खाली
जरा विचार करा, वाढत्या लोकसंख्येमुळे शेती करायला जागाच उरली नाही तर काय होईल? यावरही तोडगा निघेल.  आज जशा मजल्यांच्या इमारती आहेत, तशाच प्रकारे शेतीसुद्धा केली जाऊ शकेल. हिरवळीसाठी वर्टिकल गार्डन आणि खाण्या-पिण्यासाठी वर्टिकल शेती हा पर्याय असणार आहे. पहिल्या मजल्यावर भात पिकवला जाईल.दुसर्‍या मजल्यावर कडधान्ये आणि तिसर्‍या मजल्यावर भाजीपाला. आहे की नाही भन्नाट कल्पना! काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, भोजनासाठी काही नव्या साधनांचा शोध लावला जाईल. कारण हरप्रकारचे भोजन एक तर पॅकेटबंद असेल किंवा टॅबलेटच्या स्वरुपात. नाही तर मग द्रव रुपात असू शकेल. माणूस कोणता शोध लावेल, सांगता येणार नाही.
प्रवासाची साधने
उडणार्‍या कारचे यशस्वी परीक्षण 2009 मध्येच झाले आहे. पण असे मानले जात आहे की, या शतकाच्या अखेरपर्यंत उडणार्‍या कारचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू असेल. यामुळे लोक आपला प्रवास मोथ्या आनंदाने करतील. त्यांना त्याचा कंटाळा असणार नाही. कार चालवणार्‍या चालकाची आवश्यकता भासणार नाही. संगणक त्यांची भूमिका पार पाडतील. लांबच्या प्रवासासाठी हायपरलूप ट्रान्सपोर्टलचा उपयोग केला जाईल. सुपरसॉनिक गती असलेल्या ट्युब ट्रेनने लोक प्रवास करतील. हा प्रवास चक्क काही मिनिटांचा असेल. लवकरच रेल्वे आणि वाहने फ्रिक्शनलेस तंत्रज्ञानावर चालतील. म्हणजेच या वाहनांना चाके असणार नाहीत. त्यांच्या शानदार वेगामुळे ते हवेत तरंगत जातील.
चंद्रावर सहल
या शतकाच्या अखेरीस अंतराळात जाणं-येणं रोजचं असणार आहे. तोपर्यंत काही लाख लोकांनी चंद्रप्रवास केलेला असू शकेल. काही लोकांसाठी चंद्र हा सहलीचे ठिकाण असू शकेल. एवढेच नाही तर स्पेस टुरिझ्मप्रमाणेच स्पेस हॉटेल्सदेखील अस्तित्वात येऊ शकतील. अवकाश म्हणजे एकाद्या शहरासारखं होऊन जाईल. आतापासूनच अंतराळावर आधारित उद्योगाची पायाभरणी सुरू झाली आहे.  
मनुष्य आणि रोबोट
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आगामी काळात घरातील छोटी-मोठी कामे करण्यासाठी रोबोट असणार आहेत. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजेन्सवाले रोबोट मानवाच्या मदतीला येतील. एक काळ असा येईल की, रोबोट हा मानवापेक्षा प्रचंड हुशार असेल. अलिकडेच निर्मित करण्यात आलेल्या सोफिया नावाच्या रोबोटने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. 2050 पर्यंत असे नव्हे त्याहून हुशार रोबोटचे अस्तित्व ही सामान्य गोष्ट असेल. शास्त्रज्ञांचे मत असे आहे की, भविष्यात मानव आणि रोबोट यांच्यात युद्धसुद्धा होऊ शकेल. हे रोबोट सैनिक, घरकाम करणार्‍या, कारखान्यांमध्ये, यंत्रांवर काम करणार्‍या माणसांची जागा घेतील. सुरक्षा गार्ड म्हणूनदेखील त्यांचीच नेमणूक केली जाईल. अर्धा माणूस आणि अर्धा रोबोटसुद्धा कदाचित अस्तित्वात येईल.त्यांना शास्त्रीय भाषेत सायबोर्ग म्हणतात. जसा रोबोकॉप चित्रपटाचा हिरो आहे तसा. हा सगळा बदल किंवा प्रगती ही फक्त विज्ञानामुळे शक्य आहे. त्यामुळे येणारा काळ हा सायन्सचा असणार आहे.