Sunday, September 16, 2018

प्रतिस्पर्ध्याचे अनुकरण करू नका


     चीनमधले सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्त्व आणि ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाचे प्रमुख जॅक मा ( वय 54) यांनी 10 सप्टेंबरला आपल्या वाढदिवशीच रिटायरमेंटची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी डेनियल झेंग यांना आपला उत्तराधिकारी नेमला आहे. एका वर्षानंतर कंपनीची संपूर्ण जबाबदारी झेंग यांच्या हाती असणार आहे. बिल गेट्स यांना आपला आदर्श मानणार्या जॅक मा यांनी या पुढचे आयुष्य शिक्षणक्षेत्रात घालवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

     जॅक मा सांगतात की, बिल गेट्स यांच्याकडून खूप काही शिकलो आहे. मी कधी त्यांचा इतका श्रीमंत होऊ शकत नाही,पण त्यांच्या अगोदर रिटायर मात्र होऊ शकतो. जॅक मा स्वत:ला अजूनही तरुण समजतात आणि नवीन काही तरी करण्यावर त्यांचा विश्वास आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात परतण्याचा निर्णय  याचसाठी घेतला आहे,कारण यापूर्वी म्हणजे सुरुवातीला त्यांनी इंग्रजीचा शिक्षक म्हणून काम केले आहे. चीनच्या पूर्व भागातील झेजियांग प्रांतातल्या हांगझोऊ येथे एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांना आयुष्यात स्थीर होण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. त्यांना 30 ठिकाणी नोकरीसाठी लायक समजले गेले नाही. अर्थात त्यांना तिथे नोकरी मिळाली नाही.पण त्यांनी हार कधी मानली नाही.
     ज्यांनी ज्यांनी त्यांना नोकरी लायक समजले नाही, त्यामध्ये  केएफसीसारख्या नावाचादेखील समावेश होता. नव्वदच्या दशकात इंटरनेट क्रांती झाल्यावर त्यांनी आपला कारोबार सुरू केला. त्यानंतर जे काही घडले, ते चमत्कारापेक्षा वेगळे नाही. आपला उत्तराधिकारी निवडल्यानंतर मा यांनी कंपनीच्या शेयरधारकांना, कर्मचार्यांना आणि ग्राहकांना एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कधी कधी असं काही घडतं की, त्यामुळे आपल्याला सर्वोत्तमचा शोध घ्यावा लागतो. पण आपल्याला ठाऊक असायला हवं की, आपल्याला पहिल्यांदा योग्य माणसांचीआवश्यकता असते, सर्वोत्तमची नाही. त्यांनी पत्रात असेही म्हटले आहे की, मी स्वत:ला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. जर मी आनंदी राहू शकलो नाही तर मग मी माझ्या कर्मचार्यांना कसा बरं आनंदी ठेऊ शकणार? ते म्हणतात, आपल्याला आपल्या प्रतिस्पर्धीकडूनही शिकले पाहिजे. पण अनुकरण करायचे नाही.
     जॅक मा यांनी निर्माण केलेली अलीबाबा ही जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी आहे. शेयरच्या किंमतीच्या आधारावर कंपनीचे मूल्य जवळपास 420.8 अब्ज डॉलर ( सुमारे 30 हजार 284 अब्ज रुपये) आहे. अलीबाबाला या स्तरावर पोहचवण्यासाठी जॅक मा यांना काही कमी संघर्ष करावा लागला नाही. ते गरीब कुटुंबातले होते. पण खूप धडपड्या होते. वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांच्या डोक्यात इंग्रजी शिकण्याचे फॅड शिरले होते. ते सायकलवर स्वार होऊन एका हॉटेलात जायचे आणि पर्यटकांना फिरवून आणायचे. या बदल्यात त्यांना पैसे मिळायचे,पण याहीपेक्षा सर्वात चांगली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना इंग्रजी शिकण्याची संधी मिळायची. यामुळेच ते इंग्रजीचे शिक्षकही बनले.
     जॅक मा यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांना ज्या ज्या वेळेला संधी मिळाली, ती त्यांनी सोडली नाही. 1995 मध्ये ते एक द्विभाषी म्हणून अमेरिकेतल्या सिएटलमध्ये गेले आणि तिथे पहिल्यांदा इंटरनेट पाहिले. तिथे त्यांनी याहू सर्च इंजिनवर काही शब्द शोधले,पण त्यांना चीनचा एकही परिणाम आढळून आला नाही. इथेच त्यांनी मनाशी खूणगाठ बांधली की, आता आपण याच क्षेत्रात काम करायचे.
चीनला परतल्यावर जॅक मा यांनी या क्षेत्रात हात आजमावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या कामात त्यांना यश आले नाही. 1999 मध्ये त्यांनी आपल्याच वयाच्या, पठडीतल्या 17 लोकांना एकत्र जमवले आणि 2 हजार डॉलरमध्ये अलीबाबाचा पाया रचला. जॅक मा म्हणतात, मी दोन हजार डॉलर कर्ज घेऊन कंपनी सुरू केली, पण पर्सनल कॉम्प्युटर किंवा ई-मेल यांबाबतीत काहीच गंध नव्हता. त्यामुळे ते म्हणतात की, मी एका आंधळ्या माणसासारखा होतो, जो एका आंधळ्या वाघाच्या पाठीवर स्वार होता. आज त्यांची कंपनी ई-कॉमर्स, ऑनलाईन बँकिंग, क्लाउड कंप्युटिंग, डिझिटल मिडियामध्ये आपला कारोबार करत आहे.
     जॅक मा यांनी आजच्या युवकांना यशाचे काही महत्त्वाचे मंत्र सांगितले आहेत, ते त्यांनी जानून घ्यायला हवे. कारण त्यांच्या पुढच्या आयुष्यात यशाची पायरी चढताना या मंत्राचा चांगला आणि उपयुक्त असा उपयोग करता येणार आहे.
     लोकांचे महत्त्व- जॅक मा म्हणतात की, तुम्हाला काम करताना योग्य माणसांची आवश्यकता असते. तुम्हाला पैशाची कधीच कमतरता पडत नाही. मात्र तुमच्याजवळ स्वप्ने पाहणार्या माणसांची कमतरता असते. मरेपर्यंत का होईना, पण आपले स्वप्न पूर्ण करणारेच आयुष्यात यशस्वी होतात, अशा माणसांची आज गरज आहे.   
     वयानुसार काम- त्यांना वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत यश मिळाले नव्हते. पण आता ते वयाच्या 54 व्या वर्षी रिटायर होत आहेत. त्यांचे म्हणणे असे की, ज्यावेळेला तुम्ही 20 ते 30 दरम्यानच्या वयाचे असता, तेव्हा तुम्हाला चांगल्या बॉसच्या गोष्टी ऐकायला हव्यात. आणि अनुभवासाठी एकाद्या चांगल्या कंपनीत काम करायला हवे. ज्यावेळेला तुम्ही 30 ते 40 चे होता आणि तुम्हाला तुमच्यासाठी काही करायचे असेल तर करून टाका. वेळ दवडू नका. तुम्ही अपयशी ठरलात तरी तुम्ही स्वत:ला सांभाळू शकता. आणि ज्यावेळेला तुम्ही 50 ते 60 च्या वयाचे होता, तेव्हा तुम्हाला नव्या लोकांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्याच्या भूमिकेत काम करायला हवे.
     प्रयत्न सुरूच ठेवा-ते म्हणतात की, जर तुम्ही प्रयत्नच केला नाहीत तर तुम्हाला कशात संधी आहे, हे कसे कळणार? तुम्हाला यशाच्या कथांमधून शिकण्याची आवश्यकता नाही. तुम्ही पराभव कधीच स्वीकारायचा नाही. आजचा दिवस वाईट असू शकतो. उद्याचा दिवसदेखील खराब असू शकतो.पण परवाचा दिवस मात्र तुमचा असू शकतो, हे लक्षात ठेवा.
     आनंदी राहा- जॅक मा सांगतात की, मी स्वत:ला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो, कारण जर मीच आनंदी नसेन तर माझ्या सहकार्यांना,शेयरहोल्डर आणि माझ्या ग्राहकांना कसा आनंदी ठेवू शकेन? त्यामुळे प्रत्येकाने कितीही संकटे आली तरी आनंदी राहण्याचा प्रयत्न करायला हवा.
     नवाचार, सृजनशीलता- तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्याचे कधीच अनुकरण करू नका. तुम्ही जर दुसर्याचे अनुकरण केलात तर संपलात म्हणूनच समजा. किंमतीची नव्हे तर तुम्हाला सेवा आणि नवाचार याची स्पर्धा करायला हवी.



Wednesday, September 12, 2018

नुकसानीचे नफ्यात रुपांतर


     महान मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड एडलर यांनी लोकांमध्ये असलेल्या विशेष शक्ती स्त्रोतांच्या अध्ययनासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यांनी माणसांमधला चमत्कारिक विशेष गुण शोधून काढला,तो म्हणजे- नुकसानीचे नफ्यात रुपांतर करणे. हाच भाव ज्युलिअस रोसेन वॉल्ड यांनी थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडला.- ज्यावेळेला तुमच्या वाट्याला लिंबू येतो, त्यावेळेला त्याचे सरबत करून प्या. आहे की,नाही चमत्कारिक विशेष गुण! काही माणसांमध्ये असा गुण ठासून भरलेला असतो.साहजिकच त्यामुळे अशी माणसं आयुष्यात पराभूत कधी होत नाहीत.ती एका वेगळ्या उंचीला जाऊन पोहचतात.

     ज्या माणसांना आपण समस्यांनी घेरलेलो आहे,याची कल्पना येते, तेव्हा अशी माणसं सपशेल शरणागती पत्करतात. हत्यार टाकलेली अशी माणसं मग म्हणतात, माझं दुर्दैव! आणखी काय असणार? मला संधीच मिळाली नाही, असे म्हणतो. त्याचे झालेले नुकसान त्याच्या जिव्हारी लागते. तो खचून जातो. तो आत्म-ग्लानीमध्ये हरवून जातो. मात्र एकादा बुद्धिमान, समजूतदार माणूस यावर वेगळा विचार करायला लागतो. आपले हे जे नुकसान झाले आहे, ते कसे भरून काढायचे? त्याचे रुपांतर फायद्यात कसे करायचे? याच्या विचारातूनच फायद्याचे गणित जुळते. फ्लोरिडामध्ये एका शेतकर्याने जमीन खरेदी केली. नंतर त्याला कळलं की, या शेतात काटेरी झुडपांखेरीज काहीच उगवत नाही. सगळीकडे बिळं आहेत. या शेतात फळझाडं तर राहू द्याच, अगदी डुकरांचा सांभाळसुद्धा करता येणं शक्य नाही. या शेतातल्या काटेरी झुडपांमध्ये फक्त साप राहतात. साप ही एक मोठी समस्या होती. मग त्याने या समस्यांना,अडचणींनाच उपयोगी गोष्टींमध्ये बदलण्याचा विचार केला.
     शेतकर्याने या सापांना पकडून काचेच्या पेट्यांमध्ये ठेवून दिले. वेगवेगळ्या प्रकारचे, जातीचे साप त्याने वेगवेगळ्या पेट्यांमध्ये ठेवून दिले. लोक विविध प्रकारचे साप पाहायला येऊ लागले. काही लोक सापांवर अभ्यास करायला येऊ लागले. त्याचे शेत म्हणजे एक पर्यटन स्थळ बनले. जवळपास वर्षाला 20 हजारावर त्यांची संख्या झाली. आता त्या सापांचे विष काढून प्रयोगशाळांमध्ये पाठवले जाऊ लागले. साप चावलेल्या रुग्णांवर त्याचा उपयोग केला जाऊ लागला. या विषाचाच औषध म्हणून वापर होऊ लागला. सापाची कातडी पाहिजे त्या किंमतीला विकली जाऊ लागली. स्त्रियांचे पर्स, चपला आदींसाठी त्यांचा उपयोग होऊ लागला. पेटीबंद सापाचे मांस जगभरातल्या ग्राहकांसाठी पाठवले जाऊ लागले. पुढे त्या गावाचे नामकरण रॅटल स्नेक फ्लोरिडा असे झाले. हा त्या व्यक्तीचा सन्मान होता, जो परिस्थितीपुढे नतमस्तक झाला नाही. झुकला नाही. त्याने नुकसानीचे फायद्यात रुपांतर केले. नुकसानीने खचून न जाता वेगळा विचार करणारा माणूस नक्कीच परिस्थितीवर मात करून आयुष्यात पुढे पुढे जातो. 

Sunday, September 9, 2018

स्मार्टफोनची सद्दी संपली?


     आकडेवारीवर विश्वास ठेवला तर आपला भारत देश एक स्मार्टफोन देश बनत चालला आहे, ही आशा संपुष्टात येताना दिसते. कारण ग्लोबल मार्केट इंटेलिजेन्स फर्म आयडीसीच्या एप्रिल-जूनच्या विक्रीचे आकडे सांगतात की, स्मार्टफोनच्या तुलनेत फिचरफोनची विक्री 1 कोटी 5 लाखाने अधिक झाली आहे. आणखी एका आकडेवारीवर आपण दृष्टीक्षेप टाकल्यावर आपल्या लक्षात येईल की, ग्लोबल इंडस्ट्री एनालिसिस फर्म काऊंटरपॉइंटनुसार जानेवारी-मार्च 2018 आणि मागील वर्षाचे स्मार्टफोनच्या विक्रीचे आकडे समान राहिले आहेत. मात्र फिचरफोनची विक्री जवळपास दुप्पट झाली आहे.

     याचा अर्थ भारताला ज्या स्मार्टफोन युगाची प्रतीक्षा होती, ती संपुष्टात येऊ लागली आहे काय? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. कारण आजदेखील देशात 50 कोटी लोक फिचरफोनचा वापर करताना दिसतात. विशेष म्हणजे यातील बहुतांश फोनची साधने (हँडसेट)ही एक हजार रुपये अथवा त्याहीपेक्षा कमी किंमतीची आहेत. हा जो ट्रेंड आपल्याला दिसत आहे,तो डेटाच्या किंमती कमी आणि वॉयस कॉल मोफत होत असताना दिसत आहे. खरे तर हे आश्चर्यकारक म्हणायला हवे.
     आयडीसीच्या 13 ऑगस्ट 2018 ला जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल-जूनच्या दरम्यान 3.35 कोटी फोन विकत घेतले गेले. जे गेल्या वर्षीच्या विक्रीच्या तुलनेत वीस टक्के अधिक  आहेत. पण धक्कादायक गोष्ट अशी की, या कालावधीत 4.4 कोटी फिचरफोन खरेदी केले गेले.  आणि हे आकडे गेल्या वर्षाच्या समान तिमाहीच्या तुलनेत 29 टक्के अधिक आहेत. याचा अर्थच असा की, आपल्या देशात स्मार्टफोन खरेदीसाठी चांगली संधी असतानादेखील लोक फिचरफोनला अधिक पसंदी देत आहेत. अर्थात याला बरीच कारणे आहेत. कारण स्मार्टफोनच्या किंमती लोकांना अजूनही परवडणार्या नाहीत. दुसरे म्हणजे आपल्या देशात अजूनही सर्वदूर इंटरनेटची सुविधा पोहचली नाही. बर्याच लोकांना स्मार्टफोनची आवश्यकताच नाही. अनेकांना मनोरंजनाव्यतिरिक्त स्मार्टफोनचा आणखी उपयोग होऊ शकतो,याची माहितीच नाही. काही स्मार्टफोन स्वस्त आहेत,पण त्यामुळे त्यांचा चांगला रिझल्ट मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे अनेकांना फोनचा उपयोग फक्त बोलण्यासाठी, संपर्क करण्यासाठी झाला म्हणजे पुरे, असे वाटत आहे.
     रिलायन्स जिओफोनसारख्या उपकरणांनी आपल्या आकर्षक किंमतीमध्ये म्हणजे 501 रुपये (जुन्या फोनच्या एक्सचेंजसह)अथवा 1200 रुपयांपर्यंत ( ऑफरशिवाय) इंटरनेटची सेवा देत आहेत. यात वॉट्स अॅप, फेसबूक,युट्यूबसारखे अॅप उपलब्ध आहेत. मात्र यात थर्ड पार्टी अॅपची सुविधा नाही. हे हँडसेट पारंपारिक फिचरफोनपेक्षा थोडे चांगले म्हणजे पुढारलेले  आहेत. अर्थात हे फोन फिचरफोन आणि स्मार्टफोनच्या दरम्यानचे आहेत. यांना स्मार्टफोनच्या सुरुवातीच्या मालिकेतील समजले जाऊ शकते.
     परंतु, सगळेच फिचरफोन उपयोगकर्ते याचाही खर्च पेलू शकत नाहीत. कारण या हँडसेटचा किमान मासिक खर्च हा 149 रुपये आहे. काही फोन वापरणारे हे महिन्याला 30 ते 50 रुपयेच खर्च करू शकतात. आपण एका व्यक्तीचे यासाठी उदाहरण घेऊ. रमेश (नाव बदलेले आहे.) हे एका कंपनीत सिक्युरिटी गार्ड आहे. त्यांनी एक्सचेंज ऑफरमध्ये 1.8 इंच स्क्रीन असलेला आणि फिजिकल कीपॅडचा मायक्रोमॅक्सचा 1000 (एक हजार) रुपये किंमतीचा खरेदी केला आहे. त्यांचा जुना फोनसुद्धा फिचरफोन होता. हा फोन तीन वर्षे वापरल्यावर काम करायचा बंद झाला होता. रमेश यांना स्मार्टफोनसाठी गुंतवणूक करणे म्हणजे वायफट खर्च करण्यासारखे वाटते.कारण ते ड्युटीच्यावेळी व्हिडिओ पाहू शकत नाहीत.
   
 फावल्या वेळात ते आपल्या मित्राचा स्मार्टफोन घेतात आणि व्हिडिओ पाहतात. ते म्हणतात, माझा फोन रोजची बोलण्याची गरज पूर्ण करतो. मग मी स्मार्टफोन का घेऊ? हा फोन मी का घ्यावा हे कळत नाही, मला मासिक डेटा काय असतो,याची माहिती नाही. फिचरफोन स्वस्त आहे. मी तो कधीही बदलू शकतो. 52 वर्षांचे सुरेश ज्यांचा 50 कोटीपेक्षा अधिक लोकांमध्ये समावेश होतो, ते आजदेखील फिचरफोन वापरतात.  आयडीसीच्या असोशिएट रिसर्च डायरेक्टर नवकेंद्र यांच्या म्हणण्यानुसार स्मार्टफोनमध्ये जी वाढ होत आहे, ती अपेक्षेपेक्षा फारच कमी वेगाने होत आहे. आज 40 टक्के फिचरफोन उपयोगकर्त्यांजवळ असे फोन आहेत, ज्याची किंमत एक हजार रुपये आहे.
     आज मोबाईल डेटाचा वापर वाढला, डेटाची किंमत कमी झाली असली आणि व्हिडिओ वगैरे सामग्रीचा वापर वाढला असला तरी फिचरफोनचा वापर आपल्या देशात मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. 5 जुलैला रिलायन्स जिओ इन्फोकॉमने दिलेल्या माहिती नुसार त्यांच्या 21.5 कोटी ग्राहकांपैकी 2.5 कोटी ग्राहक हे अजूनही फिचरफोन वापरतात. एअरटेलच्या 34 कोटी ग्राहकांपैकी 10 कोटीपेक्षा कमी ग्राहक ( 2018-19 च्या पहिल्या तिमाहीतीला आकडे) डेटा सर्व्हिसचा वापर करताना दिसतात.
     मोबाईल इंटरनेटचा वापर फक्त 27.5 टक्के लोकच करतात. उर्वरीत एक तर फिचरफोनचा वापर करतात किंवा स्मार्टफोन असूनही त्याच्या साधारणसेवेचाच ते वापर करतात. गुगलचे साऊथईस्ट एशिया आणि भारताचे वाइस प्रेसिडेंट राजन आनंदन यांच्या मतानुसार भारतातला बहुतांश भाग हा अजूनही इंटरनेटशी जोडला गेलेला नाही. त्यामुळे स्मार्टफोनची गरज मर्यादित लोकांपुरतीच राहिली आहे. स्मार्टफोनच्या वापरासाठी निरक्षता आणि वहन करण्याची क्षमता मोठे आव्हान म्हणून समोर आले आहे. एका गुंतवणूक फर्मच्या प्रमुखाच्या दाव्यानुसार कमीत कमी 30 कोटी भारतीय पुढच्या पाच वर्षात अजूनदेखील ऑनलाइन सेवांचा वापर करू शकणार नाही.
     50 कोटी लोक फिचरफोनचा वापर करतात.पण त्यातले जवळपास 20 कोटी लोक असे आहेत, जे एक हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचा फिचरफोन वापरतात. अन्य 30 कोटी लोक असे आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार  साधारण बजेटचे स्मार्टफोन चांगले नसतात म्हणजेच वापरण्यालायक नसतात. याची मेमरी, स्टोरेज, स्पीड कमी असते. हे फार काळ टिकत नाहीत.शिवाय हे साधारण किंमतीचे स्मार्टफोन फिचरफोनपेक्षा नाजूक असतात. फिचरफोनची बॅटरी फार काळ चालते. त्याबाबत कोणतीच कीरकीर असत नाही. जवळपास तीन दिवस त्याची बॅटरी चालते तर स्मार्टफोनच्या बॅटरीसाठी दिवसातून दोनवेळा तरी चार्जला लावावी लागते. अर्थात नवे मॉडेल याबाबत आश्वासक करत असले तरीही ते या लोकांना आकर्षित करू शकलेले नाहीत.
     50 पैसे प्रति जीबी डेटाच्या या जगतात सर्वात कमी दर आणि फ्री वाइस सर्व्हिस असतानादेखील लाखो-करोडे लोक अजूनही फिचरफोनवरच समाधानी आहेत. माहितीगारांच्या म्हणण्यानुसार फिचरफोनचा वापर करणार्यांना स्मार्टफोन आपल्याला शिक्षण व आरोग्यसारख्या मूलभूत गोष्टींसाठी कशाप्रकारे उपयोगी पडू शकतो, याची कल्पना नाही. नव्याने स्मार्टफोन वापरणार्यांदेखील मनोरंजनाव्यतिरिक्त स्मार्टफोनचा काय उपयोग होऊ शकतो,याची माहिती नाही.
     इंटरनेट अँड मोबाईल असोशिएशन ऑफ इंडियाक्षे प्रेसिडेंट सुभो रे सांगतात की, लोकांना स्वस्तातला स्मार्टफोन आणि फिचरफोन यापैकी कोणा एकाला निवडण्याचे स्वातंत्र्य दिले तर ते फिचरफोनचीच निवड करतील. एका चिनी हँडसेट कंपनीचा निर्माता सांगतो की, एंट्री-लेवलचे स्मार्टफोन ग्राहकांना निराश करतात. मेमरी, रॅम, स्टोरेज आणि कॅमेरा रिजॉल्यूशन इतके कमी असतात की, त्याचा वापर त्यांना निराश करून टाकतात. कारण त्यांच्या मनासारखे ते काम करत नाहीत.  त्यामुळे बोलणे या मूलभूत गरजेकडेच हे लोक  अधिक लक्ष देतात.
प्रारंभी स्तराचा (इंट्री-लेवल) स्मार्टफोन कमीतकमी साडेतीन हजाराशिवाय येत नाही. आणि आपल्याकडे 40 टक्के लोकांकडे एक हजारापेक्षा कमी किंमतीचा फिचरफोन आहे. शिवाय साडेतीन हजाराचा फोन म्हणावी अशी क्वालिटी देऊ शकत नाहीत. विशेष म्हणजे हे फोन आणखी स्वस्त करणे अशक्य आहे. कारण चिपसेट, एलसीडी स्क्रीन,मेमरी या गोष्टी किंमतीच्या 60 टक्के हिस्सा कवर करतात.त्यामुळे ते आणखी स्वस्त विकता येत नाहीत. त्यामुळे कुठलीही कंपनी चांगल्याप्रकारचा स्मार्टफोन चार हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकू शकत नाही. मग हा स्मार्टफोन लोकांना परवडणार कसा? साहजिकच लोकांना फिचरफोनशिवाय पर्याय नाही. मग आपल्या भारतात स्मार्टफोनची क्रांति कशी येणार

Sunday, September 2, 2018

(बालकथा) ती परत नाही आली


     एक म्हातारी होती. ती बाजारात सूप विकायची. तिच्या चिकन सूपसारखी चव अन्य कुणाच्या सूपला नव्हती. लोक तिचे सूप विकत घ्यायचे,पण त्यांना तिचे नाव-गाव काही माहिती नव्हते. त्यांना फक्त स्वादिष्ट चिकन सूपशी मतलब होता.
रोज सकाळी म्हातारी तिच्या डोक्यावर एक मोठे काळे भांडे घेऊन बाजारात यायची,एका झाडाखाली बसायची आणि सूप विकायची. लवकरच तिचे सूप विकले जायचे,मग ती घरी निघून जायची.

     त्याच बाजारात कलारी नावाचा एक लहान मुलगा राहायचा. त्यालादेखील म्हातारीचे सूप फार आवडायचे. त्याला म्हातारी कोठून येते, हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. एके दिवशी म्हातारी आपले रिकामे भांडे घेऊन माघारी निघाली, तेव्हा तोही तिच्या मागे मागे जाऊ लागला.म्हातारी एका उंच अशा पहाडावर चढली. कलारीदेखील तिच्या मागून पहाडावर चढला. चालता चालता संध्याकाळ झाली.कलारीला आता भितीही वाटू लागली,पण तरीही तो म्हातारीच्या मागे मागे चालत राहिला.
म्हातारी एका झोपडीत शिरली. तिथे एक खूप मोठे भांडे ठेवलेले होते.ते रिकामे होते. म्हातारी त्या भांड्याजवळ गेली आणि गाणं गायल्यासारखं म्हणू लागली,“ ! जादूगर पातेल्या, माझ्यासाठी गरमागरम सूप बनव, चिकनचे सूप बनव, मी ते विकीन, लोक ते विकत घेतील...”
     काय आश्चर्य! लगेच सूप तयार झाले. भांड्यातून वाफ निघू लागली. सूपाचा वासदेखील काय मस्त येत होता. त्या वासाने कलारीच्या तोंडाला पाणी सुटले. त्याची भूक उसळून बाहेर आली. म्हातारी झोपडी बाहेर गेल्यावर तो न राहून झोपडीत शिरला. भांड्याजवळ गेला. तो भांड्यातून एक चिकनचा तुकडा काढणार तोच, तिथे म्हातारी टपकली. म्हातारीने त्याला पाहिले आणि मोठ्याने ओरडली. कलारीने तिथून धूम ठोकली. म्हातारीने त्याचा पाठलाग केला,पण ती त्याला पकडू शकली नाही.
कलारी धावत धावतच त्याच्या घरी आला. त्याने सगळे काही आपल्या आई-वडिलांना सांगितले. त्यांनी पहाडाच्या दिशेने पाहिले, तेव्हा तिथून मोठी वाफ उठत होती.
     त्या दिवसानंतर त्या म्हातारीने बाजारात येऊन कधी सूप विकले नाही.कुणी तिला पाहायला पहाडावरदेखील जाऊ शकला नाही. कलारीने तिच्याविषयी सांगितल्यापासून सगळेच तिला घाबरत होते. पण अजूनही लोक पहाडावर ढग पाहिला की  म्हणतात,    ती पहा,त्या जादूच्या भांड्यातून वाफ निघालीय.”

सर्विलान्स टेक्नॉलॉजीने स्वच्छंदी जगण्यावर नियंत्रण


     आज अनेक कारणांमुळे शाळा-महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. शाळांवर यासाठी सक्तीच करण्यात आली आहे. मुलींवर होणारे अत्याचार, छेडछाड प्रकरणांमुळे तर त्याची अनिवार्यता स्पष्ट होऊ लागली आहे.पण यामुळे आणखी एक धोका आपल्यासमोर स्पष्टपणे येऊ लागला आहे. सर्विलान्स टेक्नॉलॉजीमुळे शाळा प्रमुख,पालक यांची जबाबदारी कमी झाली असली तरी आपण या पिढीच्या स्वच्छंदी आणि मोकळ्या जगण्यावर घाला आहोत,हेही लक्षात घेतले पाहिजे. आजची पिढी आता वेगळ्याच वातावरणात आणि कुणाच्या तरी देखरेखीखाली, दडपणाखाली वावरताना दिसत आहे. यामुळे त्यांना मनासारखे जगण्याला मुरड घालावी लागत आहे. यामुळे मुले विशेषत: मुली आपला आत्मविश्वास गमावण्याची शक्यता अधिक आहे. घरात देखरेख, शाळा-कॉलेजातही नजरकैदेत राहिल्याने त्यांच्यावर पारदर्शकतेच्या नावाखाली आपण तंत्रज्ञानाकडून नियंत्रण ठेवत आहोत.

     अशा प्रकारचे नियंत्रण परदेशात ठीक आहे अथवा ज्यांचे आई-वडील नोकरी करणारे असतील,त्यांच्या पाल्यांसाठी योग्य आहे, ज्यांना वेळोवेळी त्यांच्या मुलांच्या शाळा-महाविद्यालयात जाऊ शकत नाहीत. पण बाकीच्यांचे काय? असे पालक आता त्यांच्या मुलांना असेही विचारू शकत नाहीत की, त्यांनी शाळेत काय काय केले? कारण आता त्यांना थेट आपल्या डिवाईसवर कुठे असेल, तिथे पाहायला मिळत आहे. आजच्या टेक्नॉलॉजीमुळे आता हे सर्व शक्य झाले आहे. आता हे तंत्रज्ञान आपल्याकडच्या लहान शहरांमध्येही येऊ घातले आहे. सीसीटीव्ही कॅमेरामुळे बर्याच गोष्टी समजून घ्यायला सोप्या झाल्या आहेत. पूर्वी घरापासून आणि आपल्या माणसांपासून दूर राहण्यासाठी शाळा हे एकच माध्यम होते. त्यामुळे याठिकाणी स्वच्छंदपणे खास करून मुलींना वावरता येत होते. इथे वागण्याला एक प्रकारचे स्वातंत्र्य होते. हे स्वातंत्र्य आत्मविश्वास आणि नवीन काही तरी करण्याची ऊर्मी देत होते. पण आजच्या तंत्रज्ञानाच्या देखरेखीच्या काळात मुले आपल्या मर्जीप्रमाणे जगू शकत नाहीत. आता ही मंडळी मनसारखे जगण्यासाठी एकांत शोधू लागले आहेत.
     आपण क्षणाक्षणाला त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत. पारदर्शीपणा,सुरक्षा याच्या नावावर आपण अगदी क्लासरूमपर्यंत परवानगीशिवाय  त्यांच्यावर नजर ठेवून आहोत. यामुळे मुलांच्या जगण्याला आपण कुंठीत करत आहोत. त्यांच्या स्वच्छंदी जगण्यावर घाला घालत आहोत. याचे दुष्परिणाम आपल्यालाच महागात पडणार आहेत. ब्रिटीश फिलॉसोफर जेरेमी बेंथम यांनी 1791 मध्येच सर्विलान्स टेक्नॉलॉजीमुळे मुलांच्यावर केली जाणारी देखरेख त्यांच्या स्वातंत्र्यावरच घाला असल्याचे म्हटले होते. आता ते सत्यात उतरत आहे. यामुळे मुले फारच सावधपणे आणि सांभाळून वागत आहेत. मुलांवर याचे मोठे दडपण येत आहे. त्यांच्या इच्छा- आकांक्षा दबल्या जात आहेत. काही नवे करण्याची ऊर्मी असूनही घरातले काही म्हणतील काय, या भितीने ते त्यापासून दूर राहत आहेत. खरे तर पालकांना मुलांच्या खासगीपणाची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

Saturday, September 1, 2018

आजूबाजूचा केरकचरादेखील तणावाला कारणीभूत

     सध्या आपल्या देशात स्वच्छता अभियान राबवले जात आहे. खरोखरच काही शहरांनी कमालीचे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यामुळे साहजिकच त्याचा लाभ तिथल्या नागरिकांना न झाला असल्यास नवल नाही. आपल्याची देशाची प्रतिमा अन्य देशात घाणेरडा देश अशीच आहे. मात्र अलिकडच्या काही वर्षात ही प्रतिमा बदलू लागली आहे. लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटू लागले आहे. स्वच्छतेमुळे रोगराई नांदत नाही आणि लोकांचा बळी जाण्यापासून सुटका होते. माणसाचे आयुष्यमान वाढण्यास मदत होते. शिवाय वातावरण उत्साही राहण्यास मदत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे औषध-पाण्यावर होणारा खर्च टाळून आपल्या अर्थव्यवस्थेचे होणारे नुकसानही थांबवता येते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची सुरुवात आपल्या घरापासून, अंगणापासून करायला हवी. अजून कोणी केली नसेल तर त्यांनी आतापासूनच प्रारंभ करायला हरकत नाही.यामुळे  आपल्या देशाची घाणेरडा देश म्हणून जी प्रतिमा तयार झाली आहे, ती दूर होण्यास मदत होणार आहे.

      आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि हिरवागार असल्यास माणसाचे मानसिक आरोग्यदेखील चांगले राहते, असा निष्कर्ष अलिकडेच एका नव्या संशोधनातून निघाला आहे.यूनिवर्सिटी ऑफ पेसिलवेनियाच्या पेरिलमॅन स्कूल ऑफ मेडिसिनच्या अहवालानुसार सांगितले गेले आहे की, साफसफाई आणि हिरवागार परिसर प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या मानसिक आरोग्याचे रहस्य आहे. याचा खुलासा नुकताच अमेरिकन मेडिकल असोशियनच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात करण्यात आला आहे. अहवालात फिलाडेल्फियाचा उल्लेख करण्यात आला आहे. तिथे याचे परिणाम पाहायला मिळाले आहेत. घाणेरडे रस्ते आणि झाडेझुडपे अशा भागातून जाण्याने हृदयावर परिणाम तर होतोच शिवाय तणावदेखील वाढतो. शहरांना कचरामुक्त करण्याबरोबरच झाडे,रोपे लावल्याने माणूस आनंदी राहू शकतो.
     स्वछता अभियान राबवण्यापूर्वी 18 महिने आणि 18 महिन्यानंतर स्थानिक लोकांना विचारण्यात आले होते, तेव्हा त्यांना किती नैराश, असहाय्य, बेचैन आणि तणाव जाणवत होता, यांची नोंद घेण्यात आली. साफसफाई आणि हिरवागार परिसर झाल्यानंतर लोकांमधल्या तणावात 41 टक्के घसरण आल्याचे दिसून आले. यासाठी सलग तीन वर्षे अभ्यास चालला होता. अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, कोणत्याही देशातील लोकांचे मानसिक आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर साफसफाई आणि परिसर हिरवागार राहिला पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. स्वच्छतेचा स्वीकार केला तर आजार आणि औषधांवर होणार्या खर्चातदेखील घट येईल. कारण आरोग्यसंपन्न मन आणि शरीर असेल तरच मजबूत अर्थव्यवस्थेची निर्मिती होऊ शकते.

कागदी विकास काय कामाचा!


     एका बाजूला देशाच्या अर्थव्यवस्थेने गती घेतली असल्याचे आणि एकूण देशांतर्गत उत्पादनात म्हणजेच जीडीपीत वाढ झाली असल्याचे 2018-19 च्या पहिल्या तिमाहीतले आकडे सांगत आहेत. यामुळे जीडीपी 8.2 टक्क्यांवर पोहचला आहे. पण दुसर्या बाजूला भारतीय रुपया ऐतिहासिक असा नीचांकी पातळीवर गडगडला आहे. 1 डॉलरला आपल्याला आता 71 रुपये मोजावे लागणार आहेत. रुपया आणखी खाली गडगडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्याच्या घडीला आपला रुपया अतिदक्षता कक्षात पोहचला असताना आपण जीडीपी सुधारला म्हणून स्वत:ची पाठ थोपवून घ्यायची का, असा सवाल उपस्थित होतो. महागाईत, पेट्रोल-डिझेल दरात किंवा अन्य वस्तूंच्या दरात काही घसरण झाली आहे का? नाही ना! मग उगाच त्याचा जयघोष का करायचा? आजच्या घडीला कागदी विकासाला अजिबात महत्त्व उरलेले नाही,हेच यातून स्पष्ट होते.

     वास्तविक, रुपयाचे जे सातत्याने अवमूल्यन होत आहे,याचाच अधिक फटका आपल्याला बसतो आहे. आता तर त्याने ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठलेली आहे. रुपयाचे अवमूल्यन रोखण्याची गरज होती, मात्र त्यासाठी प्रयत्न केले नाहीत. याचाच अर्थ असा आहे की, देशवासियांना आणखी महागाईला तोंड द्यावे लागणार आहे. गडगडणारा रुपया आणि वाढणार्या डॉलरच्या किंमतीचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर पडणार आहे. 2013 च्या तुलनेत रुपयाचे दहा टक्क्याच्या आसपास अवमूल्यन झाले आहे. 31 ऑगस्ट 2013 मध्ये एका डॉलरची किंमत 65.21 रुपये होती, जी आता 71 रुपयांना जाऊन पोहचली आहे. रुपयाच्या अवमूल्यनाचे कारण कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये होत असलेली वाढ आणि आयातदारांची डॉलरमध्ये वाढलेली मागणी असल्याचे सांगितले जात आहे. पण आयातीवर अधिक विसंबून राहिलेल्या भारतासारख्या देशाच्या मुद्रेचे इतके अवमूल्यन योग्य आहे का? यामुळे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची कंबर तुटणार नाही काय?
     डॉलर महाग झाल्याने सर्वच सामान्य नागरिक वापरत असलेल्या वस्तू,ज्यात विदेशी उपकरणे किंवा अन्य घटकांचा जो वापर होतो, ते आणखी महाग होतील. परदेश प्रवास,शिक्षण,उपचारांवरचा खर्चदेखील जवळपास आणखी 10 टक्क्याने वाढेल.महागाई वाढेल. पेट्रोलियम उत्पादनांवर आणखी खर्च करावा लागणार. याचा परिणाम प्रत्येक वर्गावर होणार आहे. कच्चा माल महागाने मिळणार म्हटल्यावर त्याचा प्रभाव औद्योगिक क्षेत्रावरदेखील पडणार. अमेरिका किंवा अन्य देशांमधल्या शहरांमध्ये लाखो विद्यार्थी-विद्यार्थीनी उच्च शिक्षणासाठी जातात. अमेरिकेतल्या शिक्षणाचा खर्च काही महिन्यापूर्वीच 30 ते 40 हजार डॉलर येत होता. डॉलरची किंमत 64 ते 65 रुपये होती,तेव्हाचा हा खर्च होता. त्यात आता दहा टक्के म्हणजे 3 ते 4 लाख रुपयांची अधिकची भर पडणार आहे.परदेशात शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांमध्ये मध्यम वर्गीय कुटुंबांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यांच्या पालकांना दहा टक्के जादाचा भार आणखी संकटे उभी करणारा आहे. डॉलर महाग झाल्याने आपल्याला निर्यात,पर्यटन उद्योग, आयटी कंपन्यांच्या महसुलात वाढ होऊन लाभ होणार आहे. मात्र ही वाढ अल्प आणि लाभदेखील अल्पकाळ असणार आहे.
     भारत सरकारचे आर्थिक संबंधातले सचीव एस.सी.गर्ग यांनी चार दिवसांपूर्वीच दावा केला होता की, डॉलर 70 रुपयाच्या पुढे जाणार नाही. पण या दाव्याची चार दिवसांतच हवा निघाली. आर्थिक संबंधातले अभ्यासक रुपया आणखी गडगडण्याची शक्यता बोलून दाखवत आहेत. म्हणजेच पुढे अजून काय काय वाढून ठेवले आहे, याचा पत्ता नाही. आमच्या अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेने रुपया बळकट करण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा ज्या प्रकारे पेट्रोल-डिझेलचे दर रोज नवा इतिहास रचत आहेत, महागाई वाढत आहे, तसाच प्रकार आपल्याला रुपयाच्याबाबतीत पाहायला मिळेल. सामान्य माणसाचे जगणे कठीण होऊन जाणार आहे. सरकार पुढच्या वर्षापर्यंत अर्थव्यवस्था ब्रिटनला मागे टाकेल, असा दावा करत आहे,पण सामान्य माणसाचे जगणे आणखी दु:सह्य होत चालले असेल तर या कागदी विकासाचा (जीडीपी 8.2 टक्के) मग काय फायदा म्हणायचा? स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांत जे जे कोणी सरकारे आली, त्यांनी विकासाचे नव-नवे दावे केले आहेत. करत आले आहेत. पण देशातल्या वाढत्या  बेरोजगारी, महागाईवर नियंत्रण मात्र  कुणी घालू शकलेले नाही.देशांतर्गत उत्पादन वाढल्याचे जितकी म्हणून कीर्ती वाढत गेली तरी जो पर्यंत व्यापार असंतुलन बदलणार नाही, तोपर्यंत आपण जिथे आहोत,तिथेच उभे राहिलेले पाहायला मिळणार आहे.