Saturday, October 13, 2018

मीटू ची सुरुवात 2006 ला;अमेरिकेत शिक्षाही झाली


     तनुश्री दत्तने प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर अनेक महिलांनी आपले बंद ठेवलेले तोंड उघडले आहे. यामुळे साहजिकच बॉलीवूडमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यानंतर विन्टा नंदा, नवनीत झिशन, संध्या मृदुल आणि  दीपिका अमीन यांनी आपला लैंगिक छळ झाला असल्याचा आरोप केला आहे. यामुळे अनेक कलाकारांना स्पष्टीकरण द्यावे लागले आहे, तर चेतन भगतसारख्या लेखकाला माफी मागावी लागली आहे. तनुश्री दत्ताने नाना पाटेकरविरोधात मोहिम उघडल्यानंतर देशात बरीच खळबळ उडाली. अनेकांना तनुश्रीची भूमिका संशयास्पद वाटत होती,मात्र नंतर एक-एक महिला सामिल होऊ लागल्यावर मी टू हे प्रकरणच वेगळे असल्याचे समोर आले. आता यात फक्त बॉलीवूड कलाकारच नाही तर राजकीय व्यक्तीही अडकले असल्याचे एम.जे. अकबर यांच्यावरील आरोपावरून स्पष्ट झाले आहे. या मोहिमेची कक्षा आता वाटतच जाईल, असे संकेत मिळत आहेत. याचा शेवट कसा होईल, हे सांगणे कठीण आहे. कारण परदेशातही या मोहिमेला मोठा प्रतिसाद लाभत आहे आणि अमेरिकेत यासंदर्भात शिक्षाही झाली आहे. मात्र मनेका गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे कुणी आपला अपमान केला आहे,म्हणून त्याच्यावर सूड उगवण्यासाठी केलेला आरोप या मोहिमेचा फज्जा उडवल्याशिवाय राहणार नाही.

     तनुश्री दत्त ही फक्त आरोप करून थांबली नाही तर तिने पोलिसांत अभिनेता नाना पाटेकर यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.2008 मध्येहॉर्न ओके प्लीजया चित्रपटादरम्यान नाना पाटेकरांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असभ्य वर्तन केले, असा आरोप तनुश्री दत्ता हिने केला होता. नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य, चित्रपट निर्माता सामी सद्दिकी आणि दिग्दर्शक राकेश सारंग यांच्यावरमुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, तनुश्री दत्ताच्या तक्रारीची दखल घेत राज्य महिला आयोगाने नाना पाटेकरसह अन्य तिघांना नोटीस पाठवली आहे.
      पडद्यावर संस्कारी बाबू म्हणून ओळखले जाणारे अलोकनाथ यांच्याविरोधात तर अनेक महिलांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. एका टेलीफिल्मच्या चित्रीकरणादरम्यान आलोकनाथने जबरदस्तीने आपल्या खोलीत शिरण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप दीपिकाने ट्विटद्वारे केला आहे. आलोकनाथवर सिनेसृष्टीतील 4 महिला कलाकारांनी आरोप केल्यानंतर दीपिका अमीननेही मीटू मोहिमेत पुढे येऊन आलोकनाथने दिलेल्या त्रासाला वाचा फोडली होती.  अनेक वर्षांपूर्वी दीपिका आणि आलोकनाथ एका टेलिफिल्मसाठी चित्रीकरण करत होते. या टेलिफीमच्या चित्रीकरणादरम्यान एक दिवशी दीपिका एकटीच तिच्या खोलीत बसली होती. तेव्हा दारूच्या नशेत तिच्या खोलीत शिरण्याचा प्रयत्न आलोकनाथने केला. त्यानंतरही आलोकनाथने दीपिकाला त्रास देऊ नये म्हणून सेटवरची सगळी माणसे कायम तिच्या अवतीभवती असायचे. आलोकनाथ कायम दारू पिऊन मुलींच लैंगिक शोषण करायचा हे सिनेजगतात सर्वश्रुत आहे. दारू पिऊन सेटवरती गोंधळ घालणे हे त्याच्यासाठी नेहमीचच होते. मुलींना बघून त्याला स्वत:वर नियंत्रण ठेवताच येत नसायचे, अशा शब्दात तिने आपला संताप व्यक्त केला आहे. रेणुका शहाणे यांनीही अलोकनाथ यांचे दारू पिल्यानंतरचे रूप वेगळे असायचे म्हटले होते.
     कंगणा राणावतनेदेखील मी टू या मोहिमेत उडी घेतली आहे. चित्रपट दिग्दर्शक विकास बहल यांच्यावर छेडछाडीचा आरोप करणार्या महिलेचे समर्थन करत अभिनेत्री कंगना रनौत हिने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विकास बहल हे सेक्ससंबंधीच्या गोष्टी माझ्याशी शेअर करायचे, असे म्हणत कंगनाने खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे आता बहल यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. बहल यांच्याक्वीनचित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार्या कंगनाने लैंगिक छळासंबंधी स्वतःला आलेला अनुभव शेअर करत पीडित महिलेचे समर्थन केले आहे. 2014 मध्येक्वीनचित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. त्या वेळी बहल यांचे लग्न झाले होते. ते पत्नीसोबतच्या शारीरिक संबंधांविषयीच्या गोष्टी माझ्याशी शेअर करायचे, असा आरोप तिने केला. जेव्हा सार्वजनिक ठिकाणी आमची भेट व्हायची, त्यावेळी ते गळाभेट घ्यायचे. तेव्हा तुझ्या केसांचा सुगंध खूप आवडतो असे ते म्हणायचे, असा आरोपही तिने केला. त्यापाठोपाठ कंगनाने हृत्विक रोशनला सोडले नाही. बायकोला घेऊन काही पुरुष  मिरवतात आणि प्रेयसीला लपवून ठेवतात त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे, असंही ती म्हणाली आहे. आणि हा टोला हृतिकसाठी होता का असे पत्रकारांनी विचारल्यावर, हो मी हृतिकबद्दलच बोलत असल्याचे अभिनेत्री कंगणा राणावतने म्हटले आहे. शिवाय यावर कढी म्हणजे लोकांनी त्याच्यासोबत काम करणे बंद केले पाहिजे, असे कंगनाने म्हटले आहे. हृतिक आणि कंगनामधील वाद बॉलिवूड आणि प्रसारमाध्यमांमध्ये चांगलाच गाजला होता.
     एका महिला छायाचित्रकाराने नुकतेच ट्विट करत कैलाश खेरवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. एका पत्रकार मैत्रिणीसोबत खेर यांची मुलाखत घेण्यासाठी गेली असता, ही घटना घडल्याचे तिने यात म्हटले आहे. मुलाखती दरम्यान दोन्ही महिलांच्या मधोमध बसून कैलाश मला वारंवार स्पर्श करत होता. तिने आपल्या सहकारी पत्रकाराला ही घटना त्या मुलाखतीत प्रसिद्ध करायला सुचवल्यावर, अशाप्रकारच्या बातम्या छापल्या जात नाहीत, असे सांगण्यात आल्याचे तिने म्हटले आहे. कैलाश खेरव्यतिरिक्त या महिला छायाचित्रकाराने मॉडेल जुल्फी सय्यदवरही अशाप्रकारचे आरोप केले आहेत.
     परराष्ट्रमंत्री एम.जे. अकबर यांच्यावरही पत्रकार सबा नकवी आणि लेखिका गजाला वहाब यांनी अकबर यांच्यावर आरोप केले आहेत. अन्य दोन महिलांनीही त्यांच्यावर आरोप केले आहेत. महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर अडचणीत आले आहेत. आता त्यांना आपल्या मंत्रिपदावर पाणी सोडावे लागणार आहे. ’मी टूमोहिमेने धुमाकुळ घातला असताना, अशा थेट आरोपानंतर अप्रत्यक्षरित्या यात आता महानायक अमिताभ बच्चन यांचेही नाव जुडल्या गेल्याने खळबळ उडाली आहे. सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट सपना भवनानीने महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर आरोप केले आहेत. मी अमिताभ बच्चन यांच्याबाबत अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी ज्या महिलांसोबत लैंगिक गैरवर्तन केले आहे त्या महिलांनीही पुढे येऊन बोलण्याची गरज आहे. ज्यामुळे तुमचा महानायकाचा बुरखा फाटेल अशा आशयाचे एक ट्विट सपना भवनानीने केले आहे. तसेच ट्विटरच्या माध्यमातून सपना भवनानी यांनी महानायक अमिताभ बच्चन यांना इशाराच दिला आहे. तुमचा पिंक सिनेमा आला आणि त्यात तुम्हाला जणू काही एक चळवळकर्ते म्हणूनच सादर केले गेले. मात्र तुमचे सत्य लवकरच बाहेर येईल याची मला खात्री आहे. या मोहिमे अंतर्गत जेव्हा तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांचे प्रकरण समोर आले तेव्हा अमिताभ यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी माझे नाव तनुश्री दत्ता नाही आणि नाना पाटेकरही नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र त्यांच्या वाढदिवशी म्हणजेच 11 ऑक्टोबरला आणि त्याआधी या मोहिमेबाबत ट्विट करत महिलांनी पुढे येऊन बोलले पाहिजे, अन्याय सहन करायला नको असे ट्विट केले होते. या सगळ्या ट्विटचा आधार घेत सपना भवनानी यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे. तुम्ही महिलांबद्दल लिहिलेले ट्विट हे धादांत खोटे आहेत. तुम्ही जे काही वागला आहात ते आठवून तुम्ही तुमची नखं कुरतडू नका, तुमचे सत्यही लवकरच बाहेर येईल आणि तुम्हालाही याची किंमत चुकवावी लागेल.
     सध्या मी टू ही मोहीम बॉलीवूडमध्ये धुमाकूळ घालत असताना आणि त्या माध्यमातून  अनेक अभिनेत्रींनी आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगावर बोलायला सुरुवात केली असताना अखेर याची दखल केंद्रसरकारने घेतलीकेंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी  पीडित महिलांकडून मी-टू मोहिमेअंतर्गत आपल्यासोबतही लैंगिक शोषण झाल्याचे उघडपणे सांगितले जात असल्याच्या घटनांचे स्वागत केले आहे. देशात मीटू मोहिम सुरु झाल्याने मी अत्यंत आनंदी आहे. मात्र, मी आशा करते की या मोहिमेला स्वैर स्वरुप येऊ नये, ती नियंत्रणातून बाहेर जाता कामा नये. महिलांनी आपल्याला ज्या लोकांनी अपमानित केले अशांना हकनाक  लक्ष करु नये, असेही बजावले आहे. ज्या व्यक्तीने आपल्यासोबत असे कृत्य केले त्या व्यक्तीला आपण नेहमीच लक्षात ठेवतो. त्यामुळेच आम्ही कायदा मंत्रालयाला सांगितले आहे की, या संदर्भातील तक्रारी दाखल करुन घेण्यासाठी कुठल्याही वेळेचे बंधन नसावे. त्यामुळे पीडित महिला आता 10-15 वर्षांनंतरही याबाबत तक्रार दाखल करु शकतात. त्यामुळे तक्रारीसाठी मार्ग खुला झाला आहे.
     या मोहिमेअंतर्गतमीटूद्वारे महिलांनी पुरुषांविरोधात उठवलेला आवाज आता महिलांच्या विरोधातही येऊन ठेपला आहे. महिलेनेच महिलेच्याविरोधात गैरवर्तनाची तक्रार केली आहे. महिला हास्य कलाकार अदिती मित्तलने बळजबरीने चुंबन घेतल्याचा आरोप कनीज सुरका या महिलेने केला. कनीज सुरका हिने ट्विट करून अदिती मित्तलने माझे बळजबरीने चुंबन घेतले, असे स्पष्ट करतानाच माझ्याबाबत जे घडले आहे ते सांगणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे. दोन वर्षापूर्वी अंधेरीत एक विनोदी कार्यक्रमात ही घटना घडली असल्याचे सुरका हिने म्हटले आहे. या कार्यक्रमादरम्यान, अदिती उठली व माझ्याजवळ आली व मला न विचारताच तिने बळजबरीने माझे चुंबन घेतले. या प्रकारामुळे आपल्याला धक्का बसला, असे कनीजने म्हटले आहे.
       विकास बहल, चेतन भगत, कैलास खेर यांच्यावर आज लैंगिक छळाचे आरोप झाले असले तरी यापूर्वीही असे आरोप झाले आहेत. मधुर भांडारकर, सुपरस्टार राजेश खन्ना, दिवाकर बॅनर्जी, आदित्य पांचोली, इरफान खान, जितेंद्र त्याचबरोबर ओमपुरी, गायक अंकित तिवारी अशा अनेकांवरदेखील गंभीर आरोप झाले आहेत.गेल्यावर्षी अमेरिकेत ज्यावेळेला हॉलीवूड स्टार हार्वे वेंस्टीनच्या विरोधात लैंगिक छळाचा आरोप झाला, तेव्हा मी-टू मोहिम संपूर्ण अमेरिकेत वणव्यासारखी पसरली. वर्षबहरात या मोहिमेने अनेक देशात प्रवेश केला आणि त्या त्या देशात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. यात अनेक नावाजलेले लोक अडकले.
दोषींवर कारवाई झाली, तेव्हा मग आणखी आशा निर्माण झाली. या मोहिमेने अनेकांना आवाज उठवायला प्रेरणा दिली. अनेक कारणांमुळे हा आवाज बसला होता, बंद झाला होता. आता त्याला वाट मिळाली आहे. विशेष म्हणजे ही मोहिम अशा वेळेला इतक्या जबरदस्तपणे वायरल होत आहे,ज्या वेळेला युद्धाच्या दरम्यान लैंगिक छळाच्याविरोधात आवाज उठवणार्या कांगोली स्त्री रोग तज्ज्ञ डेनिस मुक्वेज आणि नादिया मुराद यांना 2018 चा प्रसिद्ध नोबेल शाम्ती पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.
मी टू ची सुरुवात 2006 मध्ये
हॅशटॅग मी-टू या शब्दाचा वापर सर्वात अगोदर 2006 मध्ये तराना बुर्के या अमेरिकी सामाजिक कार्यकर्ता महिलेने केला होता.तेव्हापासून जगभरातल्या अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या भाषेत याचा वापर वाढला आहे. रशियामध्ये मात्र या मोहिमेविरोधातच महिला उतरल्याचे पाहायला मिळाले. कारण या महिलांनी हार्वे वेस्टिनच्या बाजूने मैदानात उतरले होते.रशियातल्या महिलांनी मॉस्कोमधील अमेरिकी दूतावासवर नग्न प्रदर्शन केले होते. यांनी हार्वे यांच्या बाजूने घोषणा दिल्या होत्या. मी टू मोहिमेमुळे फक्त भारतातच नव्हे तर दक्षिण कोरिया, जपान, इस्त्राइल, अरब, फ्रान्स, रशिया, आफ्रिका, चीन, केनियासारख्या अन्य मोठ्या देशांमध्ये खळबख उडाली आहे. मात्र एकट्या रशियात एक वेगळाच परिणाम जाणवत राहिला.
     तनुश्री प्रकरणात बहुतांश अभिनेत्री- अभिनेता त्यांच्या बाजूने उतरले आहेत. पण काहीजण इतके दिवस महिला का गप बसल्या, असा सवाल करत आहेत. अब्जावधींच्या या फिल्मी दुनियेत नेहमी अशी प्रकरणे विसरली जात असल्याचा अनुभव आहे. ब्रिटिश लेखिका लौरा बेट्स म्हणतात की, जोखीम घेऊन वेगवेगळ्या देशांमध्ये स्वत:च्याबाबतीत घडलेल कथन लोकांसमोर आणत आहेत, याचे खरोखर कौतुक व्हायला हवे. ही मोहिम आणखी पुढे जायला हवी. काही देशांमध्ये यामुळे कायदा बदल्याचा प्रयत्न झाला आहे. पण अजून याबाबतीत दीर्घ संघर्ष करावा लाग्णार आहे.

Friday, October 12, 2018

निवडणूक कामे आणि शिक्षक



   
 आता लवकरच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. मतदान यादी अद्ययावत करण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. मतदान यादी दुरुस्ती, मयत मतदाराचे नाव वगळणे, नव्याने मतदाराचे नाव मतदान यादीत समावेश करणे, या गोष्टी सध्या वेगाने सुरू आहेत. महसूल विभागाच्या अधिकार्यांनी पुन्हा एकदा या कामाला प्राथमिक- माध्यमिक शिक्षकांना जुंपले आहे. सांगली जिल्ह्यात मध्यंतरी हे काम आशा वर्कर्सना देण्यात आले होते,पण त्यांचे काम असमाधानकारक असल्याचे सांगून पुन्हा ते शिक्षकांकडेच सोपवण्यात आले आहे. यासाठी न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देऊन शिक्षकांना भिती घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्हाधिकारी तर गुन्हे दाखल करण्याची धमकीच देत आहेत. साहजिकच शिक्षक हा भित्रा प्राणी असल्यामुळे घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा नवा मतदार शोधण्यासाठी धावधाव धावतो आहे. इतके नवीन मतदार झालेच पाहिजेत,तेवढी नावे कमी झालीच पाहिजे, नाही तर नोटीसा दिल्याच म्हणून समजा. बीएलओचे काम घेतलेले शिक्षक अक्षरश: काळ,वेळेचं बंधन न बाळगता यासाठी राबराब राबतो आहे. ही त्यांचे हे हाल पाहून अशैक्षणिक कामाच्या मुद्द्याने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. 
     सध्या पहिल्या सत्राच्या परीक्षेचा काळ आहे. अभ्यासक्रम संपवायचा असतो. उजळणीवर भर द्यायचा असतो. त्यातच शासन नवनवीन दिवस, उपक्रम राबवण्याबाबत फतवे काढतच आहे. सध्या गोवर-रुबेलाच्या लसीचे कामदेखील शाळांकडे सोपवण्यात आले आहे. अंगणवाडी ते आठवीपर्यंतच्या मुलांना ही लस दिली जाणार आहे. यासाठी पालकांमध्ये जागृती मोहीम राबवण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी वारंवार बैठका, कागदी घोडे नाचवण्याबरोबरच पालक सभा घेऊन पालकांमध्ये या लसीबाबत विश्वास संपादनाचे काम शिक्षकांकडेच सोपवण्यात आले आहे. स्वच्छता अभियान, तंबाकू मुक्त शाळा, नवोदय , शिष्यवृत्ती यांची आवेदने भरण्याचे काम शिक्षकांनाच करावे लागत आहे. दहावी-बारावीच्या परीक्षांचे आवेदन भरण्याचेही काम सुरू आहे. स्कॉलरशीप आवेदने भरण्याचीदेखील घाई सुरू आहे. आणि आता त्यातच नवीन मतदार नोंदणीसाठी शिक्षकांना जुंपले आहे. शिक्षकांनी नेमके करायचे तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वादाच्या भोवर्यात अडकलेल्या शिक्षकांच्या निवडणूक ड्यूटीचा मुद्दा आता नव्याने पेटला आहे. सार्वत्रिक निवडणुकांचे वारे वाहू लागलेले असताना अशा परिस्थितीत अशैक्षणिक जबाबदारीतून मुक्ती देण्याची मागणी होऊ लागली  आहे. यासाठी शिक्षक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेण्याची तयारी दर्शविली आहे.    
     संपूर्ण राज्यभरातील हजारो शिक्षकांना निवडणूक कामांसाठी जुंपण्यात आले आहे. मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीदरम्यान काही शिक्षकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. तर निवडणूक कामामुळे आजारी पडल्यामुळे काही  शिक्षकांचे निधन झाल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. तसेच अनेक निवडणूक अधिकार्यांनी शिक्षकांबरोबर अरेरावी केल्याच्या अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे साहजिकच शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काहींना मानसिक त्रास होत आहे. परिणामी निवडणूक कामातून शिक्षकांची मुक्तता करावी आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी त्यांच्यावर जबरदस्ती करू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे.  लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता शिक्षक- शिक्षकेतरांना राज्य सरकारच्या निकषानुसार तातडीने आर्थिक मदत केली पाहिजे. शिक्षकांना निवडणुकीची अशैक्षणिक कामे देऊ नये, त्याचप्रमाणे हलगर्जी करणार्या अधिकार्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा फौजदारी गुन्हा दाखल करा, तर कर्मचार्यांना दमदाटी करून त्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणार्या अधिकार्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणीदेखील होत आहे. शिक्षकांना अध्यापनाशिवाय देण्यात येणार्या अशैक्षणिक  कामांची यादी मोठी आहे. यामध्ये शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण, कुटुंब सर्व्हेक्षण,घरात शौचालय आहे की नाही अशा सर्वेक्षणाचादेखील समावेश आहे. या सर्व अतिरिक्त कामांमुळे शिक्षक अध्यापनावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. शिक्षकांना अध्यापनाशिवाय इतर अशैक्षणिक कार्य सांगणे म्हणजे आरटीई कायद्यातील तरतुदीचे उल्लंघनच होत आहे. शहरी भागातील तसेच सधन घरातील विद्यार्थी शिकवणी लावून अध्ययन करू शकतात. मात्र गरीब घरातील, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांशिवाय पर्याय नसतो. अशा स्थितीत शिक्षकांवर लादण्यात येणार्या अतिरिक्त कामाचा फटका या विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर पडत आहे
     शिक्षकांनी शाळेतील आपला वेळ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिकवण्यावर खर्च करणे अपेक्षित आहे. त्यामुळेच त्यांच्यावर असलेले अशैक्षणिक कामांचे ओझे जितके कमी करता येईल तितके केले पाहिजे. शाळांमध्ये भौतिक सुविधा नाहीत. डिझिटल शाळा, -लर्निंग शाळा यांचा सध्या बोलबाला सुरू आहे. शासन यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्याकडून काहीच होताना दिसत नाही. शाळांमध्ये विजेची सोय नाही, इंटरनेट सुविधा नाही, मग कशा होणार डिझिटल शाळा! शाळांना वीज मंडळ व्यावसायिक दराने वीज आकारणी करत आहे. महिन्याला कमीत कमी वीज न वापरता सातशे ते आठशे वीज बील येते. ते कुठून भरायचे? त्यामुळे राज्यातल्या सुमारे 70 टक्के शाळांना वीज नाही. घरगुती दराने शाळांना वीज द्या, असे डोके फोडून शिक्षक सांगताहेत,पण शासन त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. आणि मुळात म्हणजे अलिकडे शासनाने नवीन शिक्षकांची भरती केली नसल्याने बहुतांश शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे.  एका शिक्षकाकडे दोन-दोन, तीन-तीन वर्ग आहेत. ही सगळी कामे करताना शिक्षक विद्यार्थ्यांसमोर कसा जाणार आणि अध्यापन कसा करणार, असा प्रश्न आहे. शिक्षकांची अशैक्षणिक कामातून सुटका व्हावी आणि शाळांना विजेसह अन्य सुविधा मिळणार की नाही, असा सवाल आहे. फक्त शिक्षकांमुळे प्राथमिक शिक्षकांचा दर्जा घसरला आहे, एवढे सांगायचीच तेवढी जबाबदारी शासनाची आहे का?


Wednesday, October 10, 2018

घटस्थापना-परंपरा आणि महत्त्व


उत्सव नवरात्रीचा
आज आश्विन शुद्ध प्रतिपदा. आजपासून नऊ दिवस दुर्गा देवीचीचा उत्सव साजरा होत आहे. त्यासशारदीय नवरात्रअसेही म्हणतात. शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव आहे. ते देवीशी संबंधित व्रत आहे. हिंदू धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत, तर शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. भारतात सर्वत्र या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे देवीचीपूजा केली जाते. सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तीचे दैवतीकरण होऊन त्या शक्तिरूप मूर्तीलादेवीअसे नाव मिळाले. शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया, जगदंबा म्हणून गौरविले. देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पाहायला मिळतात. जसे उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही सौम्य रूपांची नावे असून; दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत. महाकाली, महासरस्वती व महालक्ष्मी ही देवीची महत्त्वाची रूपे मानली आहेत. महाकाली संहार करणारी, दैत्यांना मारणारी हीतमोगुणीरूपी देवी आहे. महालक्ष्मी हे तिचेरजोरूपवैभव, संपत्ती यांचे रूप आहे

महासरस्वती हे तिचेसात्त्विकरूप आहे. सप्तशतीच्या पोथीत या तीनही रूपांचे वर्णन आहे. पहिल्या अध्यायात कालीचे वर्णन; दुसर्या ते चौथ्या अध्यायांत महालक्ष्मीचे वर्णन आहे. पाच ते तेरा अध्यायांत महासरस्वतीचे वर्णन आहे. नवरात्रात सप्तशतीच्या पोथीचे वाचन करतात. कथा नवरात्र व्रताची एक कथा सांगतात ती अशी, की रावणाने सीतेला पळवून नेल्यामुळे राम शोकग्रस्त झाला. मग त्याच्या सांत्वनासाठी नारद तिथे आला. त्या वेळी नारदाने रामाला सीतेच्या पूर्वजन्माची कथा पुढीलप्रमाणे निवेदन केलीपूर्वजन्मीसीताही भूमिकन्या होती. ती एकदा तप करीत बसली असताना रावणाच्या दृष्टीस पडली. तिच्या रूपावर मोहित होऊन रावण म्हणाला, ‘तू माझी पत्नी हो.’ रावणाच्या या विनंतीचा सीतेने अव्हेर केला. त्यामुळे रावण चिडला व तिचे केस धरून तिला फरफटत नेऊ लागला. त्याच्या याकृत्यामुळे सीता क्रोधित झाली व तिने शाप दिला की, ‘तुझा नाश करण्यासाठी पुढच्या जन्मी मी अयोनिसंभव अशी स्त्री होईन.’ तीच आजची सीता व तुझी भार्या होय. ती आज लंकेच्या अशोक वनात आहे. रावणाचा नाश केल्यावाचून तू तिला परत आणू शकणार नाहीस. नंतर रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदाने रामालानवरात्र व्रतकरायला सांगितले. रामाने ते केले. अष्टमीच्या मध्यरात्री देवीने रामाला दर्शन देऊनतुझ्या हातून रावणाचा वध होईलअसा आशीर्वाद दिला. रामाने व्रत पूर्ण करून दशमीच्या दिवशी लंकेवर स्वारी करण्यासाठी प्रस्थान ठेवले व रावणाला मारले.
 घटस्थापना
 पहिल्या दिवशी घटस्थापना करतात. लहानशा मातीच्या ढिगावर गहू पेरून त्यावर मातीचा घट ठेवतात. घटावर देवीची स्थापना करतात. कित्येक ठिकाणी घटावर तांत्रिक यंत्राचीही स्थापना करतात. नऊ दिवस देवीची पूजा करतात. रोज माळ बांधणे, कुमारिकेचे पूजन करणे, ब्राह्मण-सुवासिनींना भोजन घालणे, अखंड दीप लावणे, उपवास करणे, सप्तशतीचा पाठ करणे इ. विविध आचार वेगवेगळ्या कुळांत पाळले जातात. विजयादशमी हा देवीच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर अष्टमी ही महाअष्टमी किंवा दुर्गाष्टमी म्हणून प्रसिद्ध आहे.
 नवरात्रीचे महत्त्व
 जीवनामध्ये शक्ती, ऐश्वर्य, समृद्धी व ज्ञान प्राप्त व्हावे, म्हणून नवरात्रीत देवीची उपासना करतात. देवीच्या पूजेत वापरल्या जाणार्या साहित्यामागेसुद्धा काही विशिष्ट अर्थ आहे. जसे घटस्थापनेत विड्याची पाने पृथ्वीतत्त्वाचे प्रतीक आहे. तर हळकुंड तेजतत्त्वाचे प्रतीक, सुपारी आपतत्त्वाचे प्रतीक, तर खारीक वायुतत्त्वाचे प्रतीक, दक्षिणा (ज्याला पाण्याचा स्पर्श झाला आहे असे नाणे) आकाशतत्त्वाचे प्रतीक आहे. म्हणजेचपंचमहाभूतांचीही सर्व प्रतीके आहेत. त्याबरोबर हळद ही परमकल्याण रूप आहे. कुंकू मांगल्याचे रूप आहे. सिंदुर जीवनात अभ्युदयाचा काळ दाखवितो. (ऐश्वर्यप्राप्ती होते.) तुपाचा दिवा स्नेहाचे प्रतीक आहे. तेलाचा दिवा स्थैर्य दर्शवितो. दान/दक्षिणा समर्पक वृत्तीचे प्रतीक आहे. कापूर आरती केल्याने घराची शुद्धता होते. तसेच अग्निहोत्र केल्याने घराची शुद्धता व आरोग्यप्राप्ती होते.
 देवीचे वर्णन
 देवी ही ब्रह्मरूप आहे. चराचर सृष्टी तिच्यापासून निर्माण होते. विश्वावर ती शासन करते. अग्नीसारखी तेजस्वी दिसते. ज्ञानाने प्रकाशित होते. देवी असुरांचा, तसेच अज्ञानाचाही नाश करते. वेदांमध्ये तिचा गौरव करतात. ती पाशांकुश आणि धनुष्य-बाण धारण करते. ती त्रिनेत्र आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या मागची प्रेरक शक्ती म्हणजेदेवीचआहे. ब्राह्मी, माहेश्वरी, वैष्णवी, वाराही इंद्राणी, चामुंडा व महालक्ष्मी या देवीच्या अष्टशक्ती आहेत. घटस्थापना-
 देवीची चैतन्यरूपे
 देवीची एकूण नऊ चैतन्यरूपे आहेत. 1) देवी शैलपुत्री 6) देवी कात्यायनी 2) देवी ब्रह्मचारिणी 7) देवी कालरात्री 3) देवी चन्द्रघंटा 8) देवी महागौरी 4) देवी कुष्मांडी 9) देवी सिद्धिदात्री 5) देवी स्कंदमाता नवरात्रात प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक दिवसाची वेगळी देवता आहे. त्यातही विशिष्ट दिवशी विशिष्ट पूजा, कुळाचार आहेत. पहिले तीन दिवस दुर्गेचे (कालीमातेचे), नंतरचे तीन दिवस महालक्ष्मीचे व शेवटचे तीन दिवस सरस्वतीचे असे मानतात. 1) प्रतिपदा - घटस्थापना शुद्ध प्रतिपदेला. ऊँ सुरभ्यै नमः। या मंत्राने गायीची पूजा करावी, असे देवी भागवतात सांगितले आहे. गायीला या दिवशीगोघ्रासघालावा. 2) द्वितीया - दुर्गेची पूजा करावी. संध्याकाळी बीजेच्या चंद्राचे दर्शन घ्यावे व नमस्कार करावा. 3) तृतीया - ‘तीजदुर्गेची पूजा करावी. 4) चतुर्थी - महालक्ष्मीची पूजा करावी. 5) पंचमी - ललितापंचमी, उपांग ललिता पूजन. हे एक काम्य व्रत आहे. 6) षष्ठी - महालक्ष्मीचे पूजन करतात. 7) सप्तमी - देवी सरस्वतीचे पूजन करावे. 8) अष्टमी - सरस्वतीचे पूजन करावे. नवचंडी याग व देवळात होमहवन करतात. 9) नवमी - कुंकुमार्चन करतात. स्वतः देवीनेच एका प्रसंगी, ‘आश्विन प्रतिपदेपासून नऊ दिवस निष्ठेने माझी पूजा केली, तर मी तुमच्या सुखासाठी जपत राहीन.’ असे सांगितले. अशी श्रद्धा आहे. देवीच्या देवळात नवरात्रात देवीला रोज नवीन वेशभूषा करतात. देवी कधी मोरावर, कधी वाघावर, कधी हत्तीवर, कधी कमळावर असे रोज नवीन साज असतात.

Tuesday, October 9, 2018

पाणी अडवाच,पण झाडेही लावा


     पाणी फौंडेशन, नाम फौंडेशन आणि त्यांच्या जोडीला राज्य शासनाची जलयुक्त शिवार योजना यांच्यामुळे महाराष्ट्र राज्यात चांगली कामे झाली आहेत. मात्र पाऊसच झाला नसल्याने ही कामे बेकार गेली आहेत, असे म्हणायला हरकत नाही. पावसाचे पाणी अडवण्यासाठी हा सगळा खटाटोप करण्यात आला,मात्र पावसानेच पाठ फिरवल्याने या योजनांचा रिझल्ट हा नापास असाच आला आहे. कारण गतवर्षापेक्षा यंदा पाण्याचे टँकर जास्त लागल्याचे आकडेवारी सांगते. गेल्यावर्षी सहा महसूल विभागात 107 पाण्याचे टँकर लागले होते. यंदा मात्र हा आकडा तब्बल 329 वर गेला आहे. शिवाय सध्याला तितक्याच गावांची पाण्याचा टँकर सुरू करण्याची मागणी प्रशासन दरबारी पडून आहे. शासनाला अजूनही पाऊस पडेल, अशी आशा आहे. पण राज्याच्या हवामान खात्याने कधीच मान्सून माघारी परतला आहे, हे सांगून टाकले आहे. साहजिकच त्यामुळे राज्यापुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. सध्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडून द्या, आता प्यायलाही पाणी नाही, अशी भीषण परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. प्रशासन पाण्याचा टँकर सुरू करण्याबाबत चालढकल करत असल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑक्टोबरपूर्वी दुष्काळ जाहीर केला जाईल, असे सांगितले आहे. आकडेवारी मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शासनालाही पाऊस पडेल आणि राज्यावरचे दुष्काळाचे संकट टळेल असे वाटले होते.पण यंदाच्या पावसाळ्यात तीस टक्केदेखील पाऊस झाला नाही. त्यामुळे राज्यापुढे बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी खरिपाला पाऊस झाला नसला तरी रब्बीला पावसाने साथ दिली होती. उशिराने पाऊस झाला असला तरी उत्पादनात घट होऊनही शेतकर्यांना पावसाची साथ लाभली होती. शिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील मिटला होता. त्यामुळे साहजिकच पाण्याचे टँकर कमी लागले होते. गेल्या वर्षी कोकण आणि नागपूर विभाग वगळता नाशिकला 24, पुणे 32, औरंगाबाद 28, अमरावती 23 असे पाण्याचे टँकर सुरू होते. यंदा मात्र यात वाढ झाली आहे. कोकण आणि नागपूर विभाग सोडला तर नाशिक 118, पुणे 21, औरंगाबाद 182 आणि अमरावती 8 अशा टँकरद्वारा पाणी पुरवठा केला आत आहे.
     राज्यात मर्यादित सिंचन सुविधा, अवर्षणप्रवण क्षेत्राची मोठी व्याप्ती, अनिश्चित व खंडित व पर्ज्यनमानामुळे कृषी क्षेत्रातील अनिश्चितता वाढली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर 2014 मध्ये जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. या अंतर्गत गेल्या तीन वर्षात सुमारे 16 हजारांहून अधिक गावांमध्ये ही कामे सुरू झाली. राज्य शासनाबरोबरच लोकसहभाग,पाणी फौंडेशन, नाम फौंडेशनसारख्या स्वयंसेवी संस्थांचा मोठा सहभाग लाभला. या कामाचा परिणाम गेल्यावर्षी पावसाळ्यात दिसून आला. गेल्या तीन वर्षात निवड झालेल्या गावांमध्ये 4 लाख 98 हजार 206 इतकी जलयुक्त शिवारची कामे झाली आहेत. या अभियानात 2018 आणि 19 मध्ये 6 हजार 200 गावांची निवड करण्यात आली होती. मात्र कामे झाली चांगली,पण पावसानेच दगा दिल्याने या कामावर पाणी फिरले आहे.
     पावसाचे पाणी जिरवून ओढ्या,नाले, तलाव, विहिरी आणि कुपनलिकांना पाणी आणण्याचे काम या योजनेमुळे यशस्वी होऊ शकते, हे गेल्या दोन वर्षात आपण अनुभवले आहे. आपल्या राज्यात सिंचन योजना भरपूर असल्या तरी त्यातून सिंचन किती झाले, हा वादाचा मुद्दा आहे.पण त्यातून पावसाचे पाणी अडवून आपापल्या गावी सोय गावकरी एकत्र येऊन करू शकतात, हे स्पष्ट झाले. त्यातून लोकसहभाग वाढत गेला. त्यात अमिरखानच्या वॉटर कपने आणखी रंगत आणली.खरे तर प्रत्येक गावाने पावसाचा थेंब न थेंब अडवला पाहिजे. कारण कित्येक भागात, तालुक्यात, जिल्ह्यात नद्या वाहत नाहीत. त्यांना पाण्याचा स्त्रोत नाही. त्यामुळे वाहून जाणारे पाणी अडवून जिरवता येऊ शकते, हे फार पूर्वीचे तंत्र आपण वापरत आहोत. पाणी अडवा, पाणी जिरवा ही टॅगलाईन महाराष्ट्रानेच संपूर्ण देशाला दिली आहे. पण पाऊस पडला तरच या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. आता आपण पाऊस पडण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा, याची अंमलबजावणी मनापासून केली पाहिजे.प्रत्येकाने दरवर्षी एक झाड लावून त्याचे संगोपन केल्यास त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसतील.

Monday, October 8, 2018

रोगराई वाढली,जनता त्रासून गेली


     काहीही म्हणा,पण अलिकडच्या काही वर्षात रोगराई वाढली आहे. रोज नवनवे आजार उदयाला येत आहेत. सध्या महाराष्ट्रात स्वाईन फ्लूने धुमाकूळ घातला आहे. या अगोदर डेंग्यूने तर आपले बस्तानच बसवले आहे. तो आता इथून हालायलाच तयार नाही. आपली आरोग्य यंत्रणा त्याला हुसकावून लावण्यासाठी तोकडी पडत आहे. अपुरे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, औषधे, इमारती यामुळे आजार आणखी बळावत चालले आहेत. त्यातच आरोग्य केंद्रे असून अडचण आणि नसून खोळंबा, अशातली आहेत. धड इथे उपचार होतात, ना सुविधा आहेत. डॉक्टरांचा तर पत्ताच नसतो. आरोग्य यंत्रणाच संपूर्ण अपुरी असल्याने मेळ कसा लागायचा, असा प्रश्न आहे. शासन कर्मचारी, वैद्यकीय अधिकार्यांची भरती करायला तयार नाही. त्यामुळे अनेक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये कर्मचार्यांअभावी ओस पडले आहेत. त्यातच साप चावला, विंचू चावला किंवा कुत्रा चावला, यामुळे उदभवणार्या रोगाला  प्रतिबंध करणार्या लसीच ऐनवेळी उपलब्ध नसतात.त्यामुळे गोरगरिबांची अडचण होते. त्यांना महागड्या हॉस्पीटलमध्ये जाऊन उपचार घ्यायला पैसे नसतात. साहजिकच या यंत्रणेच्या कमकुवतपणाचा ते बळी ठरतात. यामुळे आरोग्य यंत्रणा काही कामाची नाही, असेच सर्रास बोलले जात आहे.

     अलिकडे वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. क्षणात ऊन, तर क्षणात पाऊस. तर कधी वारे वाहायला लागतात, तर अचानक थंडी वाजायला सुरू होते. अशा वातावरणामुळे माणसे लगेच आजारी पडतात. अलिकडच्या काळात सकस अन्नाचा अभाव, व्यायामाची कमतरता, स्पर्धात्मक धावपळ या बदललेल्या जीवनशैलीमुळे प्रतिकारशक्ती कमी होऊ लागली आहे. यामुळे वातावरणात जराही जरी बदल झाला, तर लोकांना गोळी घ्यावी लागते. त्याशिवाय पुढचे काही चालतच नाही. पावसाळ्यात उन्हाळ्याचा तर हिवाळ्यात पावसाळ्याचा कधी न घेतलेला अनुभव घ्यावा लागत आहे. त्यामुळे या विचित्र वातावरणाचा प्रतिकूल परिणाम मानवी आरोग्यावर झाला नाही तर नवलच!
     सध्या  राज्यभर साथीच्या रोगांनी धुमाकूळ  घातला आहे. अशा रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारकडून परिणामकारक प्रयत्न होत नाहीत, ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. सरकारकडून कठोर निर्णय घेतले जात नाहीत. विविध साथींच्या रोगांमुळे अनेक निष्पापांचे बळी जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा धुळे, जळगाव, औरंगाबाद, नागपूर आदी मोठ्या शहरांमध्ये डेंग्यूचे थैमान दिसून येत आहे. गेल्या सहा महिन्यात राज्यात डेंग्यूच्या सहा हजारांहून अधिक केसेस नोंदल्या गेल्या आहेत. एकट्या मुंबईत डेंग्यूमुळे पाचजणांना आपला जीव गमवावा लागला. राज्यात आतापर्यंत डेंग्यूचे तेवीस बळी गेले आहेत. डेंग्यूसोबतच मलेरिया, स्वाइन फ्लू,हिपेटायटीस या आजारांनीही नागरिकांना पछाडले आहे. खतरनाक स्वाइन फ्लूने एकट्या सांगली जिल्ह्यात स्वाइन फ्लूने पाच जणांचा बळी घेतला आहे. सातारा, सोलापूरातही काही माणसे दगावली आहेत.
     याशिवाय राज्यात मलेरियाचे सहाशे पंचवीस रुग्ण आढळले आहेत. काही ठिकाणी उपाययोजना करूनही डेंग्यू, मलेरियासारखे आजार नियंत्रणात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. डेंग्यू हा एक विचित्र आजार आहे. एकीकडे तापाचे प्रमाण वाढत असतानाच रक्तपेशी कमी होत आहेत आणि दुसरीकडे ताप नियंत्रणात आणून रक्तपेशींची संख्या पूर्ववत करण्याचे अतिशय अवघड काम डॉक्टरांना करावे लागत आहे. ज्या विशिष्ट डासांमुळे डेंग्यूसारखा आजार उद्भवतो त्यांचे पूर्ण निर्मूलन करण्यामध्ये सरकारी यंत्रणा नेहमीप्रमाणे अपयशी ठरली आहे. मोठमोठ्या शहरात पाणी साठण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची बांधकामे सुरू आहेत. तेथे अनेक महिन्यांपासून साचलेल्या अस्वच्छ पाण्यामुळे या डासांची निर्मिती होते आणि त्याचा नाहक फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन डासांच्या निर्मूलनाची मोहीम सरकारी यंत्रणेने वेळीच हाती घेतली असती तर अशी परिस्थिती उद्भवली नसती.पण सरकारला याचे काही वाटत नाही, असेच त्यांच्या संथ हालचालीवरून दिसत आहे. सरकारने आपल्या डोळ्यांवर बांधलेली गांधारीची पट्टी जरा बाजूला करायला हवी आहे. राज्यातली जनता कोणत्या अवस्थेतून जात आहे, हे त्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहायला हवे.

इंधन दरकपात राजकारणावर आधारित


     परवा केंद्र आणि राज्य सरकारने अडीच- अडीच रुपयांनी पेट्रोल स्वस्त करण्याचे जाहीर केले.पण प्रत्यक्षात ग्राहकांना चार रुपयेच पेट्रोल स्वस्त दराने मिळाले. तेल कंपन्यांनी दर कमी केले नाहीत की चलाखी केली,परंतु प्रत्यक्षात म्हणावा असा लाभ ग्राहकांना लाभला नाही. कारण गेल्या तीन महिन्यात ज्या वेगाने पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत आहेत, त्या मानाने चार रुपये म्हणजे काहीच नाही. उलट या कमी झालेल्या दराचा काही एक उपयोग सामान्य नागरिकांना झाला नाही. कारण या कालावधीत विविध वाहतूक करणार्यांनी आपले दर वाढवले होते. त्यांनी त्यात कपात केली नाही. त्यामुळे साहजिकच महागाई कमी होण्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही. दुकानातील रेशन धान्य, वाहतूक भाडे, विकतचे पाणी, झेरॉक्स, टीव्ही, फ्रिज, कॉम्प्युटर, लॅपटॉपच्या दरात वाढ झाली आहे. वाहतूक दर वाढल्याने अनेक बारीक-सारीक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत.10 रुपयाला मिळणारा शुद्ध पाण्याचा जार आता पंधरा रुपयांना मिळू लागला आहे.

     सरकारने तेलाचे दर आणखी कमी केले तरी हे वाढलेले दर कोणी कमी करणार नाही. त्यामुळे याचा सामान्य लोकांना काहीच लाभ होणार नाही. तेलाचे वाढत असलेले दर सरकार फक्त पाहात बसले. पेट्रोल व डीझेलच्या किंमती गेले किमान तीन महिने  दररोज वाढत आहेत. सरासरी 40 ते 50 टक्क्यांनी त्या वाढल्या आहेत. त्यामुळे आता त्या तुलनेत केलेली कपात अत्यंत किरकोळ म्हणावी लागेल. विशेष म्हणजे त्यानंतरही दरवाढीचे सत्र थांबलेले नाही. म्हणजे आणखी तेलाचे भाव वाढतच आहेत. आणखी काही दिवसांनी पुन्हा पेट्रोल लीटरमागे नव्वदी गाठायला वेळ लागणार नाही. सरकारला यावरचा उपाय सापडलेला नाही.किंवा परकीय गंगाजळीच्या मोहापायी त्याकडे दुर्लक्ष केले, असेच म्हणावे लागेल.
     तेलाचे दर सतत वाढत असले तरी इंधनावरील उत्पादनशुल्क कमी करण्यास मोदी सरकारने वारंवार नकार दिला होता. चार वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर खूप कमी होते, तरीही त्याचा फायदा भारतीय जनतेला मिळाला नाही. कारण भाजप सरकारने त्यावरील उत्पादन शुल्क वाढवत नेले. नोव्हेंबर 2014 ते जानेवारी 2016 दरम्यान मोदी सरकारने नऊ वेळा त्यात वाढ केली. त्यातून लक्षावधी कोटी रुपये थेट केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा झाले. अंदाजपत्रकात तूट दिसू नये यासाठी योजलेली ही युक्ती होती. या रकमेतून कल्याणकारी योजना राबवणे शक्य झाल्याची मल्लिनाथी अनेक मंत्र्यांनी केली; पण याच कारणासाठी काँग्रेसच्या सरकारने थोडी करवाढ केली किंवा इंधनाचे दर वाढवले की भाजपचे नेते त्यांच्यावर आगपाखड करत असत. मात्र आता मध्य प्रदेश, राजस्तान, मिझोराम व छत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पुन्हा जिंकण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. तेथील मतदारांना नाराज करणे त्यांना परवडणारे नाही. म्हणजेच इंधनदर कपातीचा हा निर्णय अर्थकारणावर नव्हे, तर राजकारणावर आधारित आहे, असेच म्हणावे लागेल. अर्थात जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर चढे राहिल्यास त्याचाही लाभ होण्याची शक्यता कमीच आहे.
      सध्या आपल्या भारताच्या रुपयाची अमेरिकन डॉलरच्या तुलनेत जोरदार घसरण होत आहे. तो रोखण्यातही सरकारला अपयश आले आहे. तेलाच्या किंमती कमी करण्याबरोबरच रुपया सावरण्यासाठी काहीच हालचाली दिसल्या नाहीत, हे खरे तर दुर्दैवच म्हटले पाहिजे. रुपयाच्या घसरणीमुळे खनिज तेल आयातीचा खर्च वाढत आहे. इंधनाचे देशांतर्गत दरही त्यामुळेच वाढत आहेत. त्याचा एक परिणाम म्हणजे सरकारचे उत्पन्नही वाढत आहे. मात्र स्वयंपाकाचा गॅस व रॉकेलवरील अनुदानाचा खर्चही वाढला आहे. आता रॉकेलवरील अनुदानाचा भार खूप कमी झाला असला तरी एकूण इंधनावरील अनुदान चालू आर्थिक वर्षात 60 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल असा अंदाज वित्ततज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. ताज्या दर कपातीमुळे आपल्या उत्पन्नात सुमारे 10 हजार 500कोटी रुपयांची घट होईल असे सरकारचे म्हणणे आहे. याचा ताण येऊन आर्थिक तूट अपेक्षेपेक्षा वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे विकासकामांना व भांडवली खर्चाला सरकारला कात्री लावावी लागेल.
     कर्नाटकात काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणूक झाली. त्या काळात सरकारने इंधनाची दरवाढ रोखली होती; पण नंतर दर पुन्हा वाढले. या निवडणुका झाल्यावर लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे कदाचित आणखी तेलाचे भाव कमी होतील. कारण त्यांना लोकसभा जिंकायची आहे. लोकसभेबरोबर महाराष्ट्रातही विधानसभेचाही बार उडवून टाकला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राने केंद्राबरोबर तेलाचे भाव कमी करून या शक्यतेत भर घातली असल्याचीही चर्चा आता रंगली आहे. मात्र  सध्याची किरकोळ कपात हा नागरिकांना दिलासाही म्हणता येत नाही. कारण इंधन दरवाढ रोज होतच आहे.सरकारने असले राजकारण करण्यापेक्षा तेल दरवाढ, रुपयाची घसरण रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत.सरकारकडे अर्थतज्ज्ञांची वानवा आहे का, असा सवालही सध्याच्या परिस्थितीवरून उपस्थित होतो.

Sunday, October 7, 2018

’ऑनर किलिंग’: प्रबोधनाशिवाय पर्याय नाही


     सोलापूर जिल्ह्यातल्या वैद्यकीय शिक्षण घेणार्या अनुराधा बिराजदार या वुवतीला तिच्या वडिलांच्या खोट्या प्रतिष्ठेपायी आपला जीव गमवावा लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. या मुलीची चूक एकच की, तिने त्यांच्या शेतात चाकरीला असलेल्या गड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केला. आता या आई-वडिलांवर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. उद्या काय घडायचे घडो,पण आज त्या आई-वडिलांची काय प्रतिष्ठा राहिली हा प्रश्न आहे. अलिकडच्या काही वर्षात या खोट्या प्रतिष्ठेपायी आपल्याच मुलीच्या जीवावर उठणार्या जन्मदात्यांच्या मानसिकतेतून अनेक मुलींना आपला जीव गमवावा लागला आहे. आज जग कुठे चालले आहे, आणि आपण कुठे चाललो आहे, याचा खरे तर विचार करण्याची गरज आहे. परवा सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील साळमळगेवाडी गावातल्या एका अल्पवयीन मुलीलाही अशाच प्रकारे जीव गमवावा लागला आहे. यामुळे आपली बुरसटलेली मानसिकता आपण सोडायला तयार नाही, हेच यातून स्पष्ट होत आहे. आज शिक्षण तळागाळापर्यंत पोहचले आहे,पण त्या शिक्षणाचा काही एक उपयोग होत नाही. त्यामुळे आपले शिक्षण हे चुकीच्या पद्धतीने चालले आहे का, याचाही विचार करावा लागणार आहे.

     जग जितके जवळ येत चालले आहे,तेवढे लोकही एकमेकांपासून दुरावत चालले आहेत. शिक्षण फक्त नोकरी आणि प्रतिष्ठेचा बाजार झाला आहे. यातून अंगिकारण्याची मूल्ये हद्दपार झाली आहेत. आपल्या देशाची व्यवस्था ही गरिबाला गरीब आणि श्रीमंतांना श्रीमंत करीत चालली आहे, तशी पैसा ही एक सन्मानाची बाजू तयार होऊ लागली आहे. आज काल पैशाला अधिक महत्त्व आले आहे. त्यामुळे आपल्या लायकीच्या लोकांशी सोयरीक करण्यासाठी आटापिटा चालला आहे. आपल्याकडची जातीव्यवस्था बंद किंवा कमी होण्याऐवजी वाढ होत चालली आहे. हेदेखील आपले दुर्दैव म्हटले पाहिजे. समाजातून जातीव्यवस्था हद्दपार व्हावी, समाजात समता प्रस्थापित व्हावी यासाठी अनेक समाजसुधारकांनी लोकजागृती करून समतेचा संदेश दिला. इतकेच नव्हे तर  समाजसुधारकांच्या लोकजागृतीचे प्रतिबिंब राज्यघटनेत उमटले. भारतीय घटनेने समतेचा अधिकार मान्य केला. पण तरीही प्रतिष्ठेचा बुरखा पांघरुण घेतलेला हा माणूस हा अधिकार मान्य करायला तयार नाही.
     अजूनही भारतीय समाज वृथा व मिथ्या अहंकारात खितपत पडलेला आहे. अद्यापही जातीयता व धर्माच्या बाहेर पडायला भारतीय समाज तयार नाही. या धर्ममार्तंड व जातीयवादी राज्यघटनेला धाब्यावर बसवत स्वत:ची जात व धर्मच श्रेष्ठ असल्याचा बेडजावपणा मिरवत असतात. यातूनच देशातऑनर किलिंगचे प्रकार (सन्मान हत्या) मोठया प्रमाणात घडत आहेत. उच्च जाती-धर्माच्या मुला-मुलीने कनिष्ठ जातीच्या मुला-मुलीशी विवाह केला, तर सन्मान व प्रतिष्ठा जपण्यासाठी हत्याकांडाचे शस्त्र हाती घेतले जात आहे. अलिकडेच तेलंगणातील मिरयालगुडा गावातील एका अनुसूचित जातीच्या जावयाची सासर्याने क्रूररपणे हत्या केली. हैद्राबाद शहरात घडलेल्या आणखी एका घटनेत खोट्या प्रतिष्ठेपायी एका सासर्याने आपल्या जावयाची आणि स्वत:च्या मुलीची भररस्त्यात हत्या केली. मुलीने एका अनुसूचित जातीच्या तरुणाशी लग्न केले इतकीच काय तिची चूक होती.
     22 वर्षीय माधवी आणि 24 वर्षीय बी. संदीप हे पाच वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये राहत होते. 12 सप्टेंबरला त्या दोघांनी लग्न केले. माधवी पाच महिन्यांची गरोदरही होती. मात्र, उच्चवर्गीय असलेल्या माधवीच्या वडिलांना अशा प्रकारचा विवाह अपमानजनक वाटला. अपमानीत व जातीयतेने पछाडलेल्या पित्याने जावयाला भेटण्यासाठी बोलावून एक कोटी रुपयांची सुपारी दिली आणि जावयाला ठार करविले. जावयाला ठार करताना वडिलांना आपल्या मुलीचा संसारही दिसला नाही. केवळ आपली प्रतिष्ठा, मान, सन्मान शाबूत राहावा यासाठी हे हत्याकांड घडले. पुरोगामी म्हटला जाणारा आपला महाराष्ट्रदेखील यात मागे नाही. सोलापूर-सांगलीतील ही प्रकरणे ताजीच आहेत. खोट्या प्रतिष्ठपोटी जाती-धर्माच्या अहंभावापायी पोटच्या लेकी-बाळींना अत्यंत क्रूरपणे संपविल्याच्या घटना वारंवार समोर येतात. तेव्हा समाजमन आजही आतून जाती-धर्म आणि पारंपरिक विचारांशी किती घट्टपणे जोडले आहे, हे वास्तव लक्षात येते.
     पुरोगामी महाराष्ट्रात तर संतांनी व समाजसुधारकांनी जातीअंताची व धर्माची लढाई किती तिव्रतेने लढली याचा इतिहास साक्षीला असतानासुद्धा सन्मान हत्याच्या घटना सातत्याने घडत आहे. महाराष्ट्रात एका वर्षातऑनर किलिंगचे तब्बल 220 प्रकार घडल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. ग्रामीण भागात आंतरजातीय प्रेम आणि विवाहाला विरोध असल्याचे स्पष्ट झाले असून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालात ही धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
     2012 मध्ये राज्यात 2 हजार 712 जीवे मारण्याच्या घटना घडल्या होत्या. 2013 मध्ये 2 हजार 512 व्यक्तींचे खून झाले होते. या सर्व घटनांच्या पाठीमागे वैयक्तिक वैर, हुंडाबळी, परजातीमधील व परधर्मामधील जोडीदाराची निवड केल्यामुळेऑनर किलिंगच्या घटना घडल्याचे संशोधनातून समोर आले आहे. खोटी प्रतिष्ठा, सहसंवेदनाचा अभाव, जात व धर्माचा पगडा, बुरसटलेल्या कल्पना आदी कारणांमुळेऑनर किलिंगच्या घटना वाढत आहे. ’ऑनर किलिंगच्या प्रकारात सर्वात जास्त बळी महिलांचा जात आहे. पुरुषप्रधान समाज आजही स्त्रीला समान प्रतिष्ठा द्यायला तयार नाही. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात आम्ही प्रवेश केला मात्र आजही आपला स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पारंपरिक आहे. महिलांनी चार भिंतीच्या आतच जीवन जगावे. रांधा, वाढा व उष्टी काढा अन् पुरुषांच्या दबावाखाली जीवन जगा.
     पुरुषी मानसिकता आजही बघायला मिळते. म्हणूनच तर महिलांच्या बाबतीत कठोर फतवे निघतात. महिलांनी डोक्यावरून पदरच घेतला पाहिजे. मोबाईलवर बोलण्यास बंदी, विशिष्ट प्रकारचे (टी शर्ट व जिन्सपँट) कपडे घालण्यास बंदी, धर्मातच व जातीतच लग्न करण्याचा अट्टाहास, अशा प्रकारचे फतवे निघतात. महिलांनी या फतव्याचे उल्लंघन केले, तर तिला कठोर दंड दिला जातो किंवा जबर शिक्षा दिली जाते. महिलांच्या गुलामगिरीला पुरुषी मानसिकताच कारणीभूत आहे. पुरुषी अहंकारी व्यवस्थेमुळे महिला बळी पडतात. जात पंचायतीचे फतवे महिलांसाठी किती जाचक असतात हे खाप जात पंचायतीवरून अधिकच स्पष्ट होते. त्यांना जगायचे असेल तर त्यांनी पुरुषांच्या दहशतीतच जगले पाहिजे, असा तालिबानी फतवा उत्तर प्रदेशच्या खाप पंचायतीने जारी करत महिलांचे स्वातंत्र्य व हक्क हिरावून घेतले. कित्येक महिनेऑनर किलिंगच्या नावाखाली आपल्या मनाविरुद्ध वागणार्या मुलींना त्यांचे पालकच मृत्यूदंडाची कठोर शिक्षा देत असल्याचे वृत्त अधूनमधून आपल्या वाचनात येतात.
     ’ऑनर किलिंगच्या घटनांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रीच समाजाच्या टीकेचे लक्ष होते. जातीबाहय प्रेम करणार्या बहुतांश घटनांमध्ये शिक्षेची कुर्हाड मुलींवरच कोसळलेली असते. क्वचितच शिक्षा मुलांना होते. आपल्या मुलीने आपले घराणे, घराण्याची अब्रु धुळीला मिळवली आणि आता तिला ठार करूनच पायश्चित करता येणार आहे, अशी समजूत जनमाणसात प्राचीन काळापासून दृढ झालेली आहे. तेव्हा या हत्या थांबवायच्या असतील तर ही मानसिकता घडण्यास मूळ कशात आहे हे शोधायला हवे.
     पुरुषप्रधान समाजाची महिलांच्या जगण्यासंबंधी जी धारणा आहे त्यातूनचऑनर किलिंगचे प्रकार घडतात. महिलांना एक भोग वस्तू म्हणून, पुरुषांच्या ताब्यातील वस्तू म्हणून पुरुष स्त्रीला आपल्या र्मजीप्रमाणे तिला वाकवत आला आहे. ’ऑनर किलिंगच्या नावाखाली महिलांचे असेच बळी जाणार हे सर्व थांबवायचे असतील तर प्रभावी कायद्यापेक्षाही समाजाची महिलांप्रतीची मानसिकता बदलण्याची गरज आहे. समाजाच्या मानसिकतेत बदल होण्यासाठी शिक्षेपेक्षा जनजागृती आवश्यकता आहे. परजातीत व परधर्मात लग्न केल्याने घराण्याची प्रतिष्ठा धुळीला मिळत नाही आणि समजा अशी चूक आपल्या मुलीकडून झालीच तर तिला ठार केल्याने ती प्रतिष्ठा परत प्राप्त होते असे नाही. उलट मुलीला ठार करून तिच्या घरचे जेव्हा तुरुंगात जातात तेव्हा त्यांच्या घराच्या प्रतिष्ठेत कोणती भर पडते? यासाठी त्यांचे प्रबोधन व्हायला हवे.