माणसाची इच्छाशक्ती प्रचंड असेल तर तो
अशक्य कोटीतील गोष्ट शक्य करून दाखवतो. वय
सत्तरीकडे झुकलेले,गावाला पाणी द्यायला प्रशासन हतबल,
गावकरी आहे,त्यात जगण्याच्या अधीन झालेले.
गावात उपासमार, शिक्षणाचा अभाव, अशा कठीण परिस्थितीत दिवस काढणार्या लोकांना आपल्या
इच्छाशक्तीने पाणी देऊन मोठं कर्म केलेल्या दैतारी नायक यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी आपल्या मन की बात मध्ये कर्मयोगी असा उल्लेख केला. नुकताच
त्यांना पद्मश्री देऊन गौरव करण्यात आला आहे. अशा माणसांची गरज
इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरते. पहाड खोदून गावाच्या शेतीच्या
आणि पिण्याच्या पाण्याचे संकट दूर करणारा अवलिया हा तिथल्या लोकांसाठी देवच म्हटला
पाहिजे.
स्थानिक मिडियामध्ये कॅनॉल मॅन म्हणून
ओळखले जाणारे दैतारी नायक ओडिसातल्या क्योंझर जिल्ह्यातल्या बैतरणी या छोट्याशा खेड्यात
राहतात. या पहाडी इलाक्यातल्या आणि जंगलाने वेढलेल्या गावात शेतीचेच काय पण पिण्याच्या
पाण्याचेही दुर्भिक्ष्य. पावसाच्या पाण्यावर शेती व्हायची,पण प्रत्येकवेळेला पाऊस दगा द्यायचाच. त्यामुळे लोकांचे
प्रचंड हाल व्हायचे. अनेक संकटं झेलत येथील लोक आहे त्या परिस्थितीत
जगत होती. कुणी येऊन आपलं भलं करेल, असाही
विश्वास इथल्या लोकांमध्ये नव्हता. जिथे
प्यायच्या पाण्याची मुश्किली तिथे शेतीला पाणी कोठून मिळणार? मग जगणार काय? असा प्रश्न साहजिकच
उपस्थित होतो. लोकांना पोटभर अन्न मिळत नाही, नेसायला कपडे नाहीत, शिक्षणाचा पत्ता नाही, अशा परिस्थिती जगणार्या लोकांना दोन वेळच्या अन्नाची
भ्रांत होती. दैतारी नायक सांगतात, आमच्याकडे
पैसेच नव्हते तर आम्ही मुलांना शाळेत तरी कसे पाठवणार?
हे सगळं पाहून सत्तरीकडे झुकलेल्या दैतारींचे
मन अस्वस्थ व्हायचे. आपली पिढी तर गेली,पण पुढच्या पिढ्याही अशाच जाणार का? का या लोकांना स्वास्थ्य
मिळणार नाही.मग त्यांनी गावातल्या लोकांशी चर्चा केली.प्रशासनाने मनावर घेतले तर पहाड खोदून आपल्या गावापर्यंत कालवा आणला जाऊ शकतो.
शेती वाचवण्यासाठी हा एकच शेवटचा मार्ग होता. दैतारी
यांनी गावकर्यांसमवेत प्रशासनाकडे गार्हाणे मांडले,पण काही उपयोग झाला नाही. सरकारी कार्यालयांना खेटे घातले, आश्वासनाशिवाय काहीच हाती लागले नाही. कित्येकदा तर त्यांना
रागावून अक्षरश: हाकलून माघारी पाठवण्यात आले. सगळेच निराश झाले. सर्वांची खात्री झाली की, आता आपल्याला असेच जगावे लागणार.
ही गोष्ट 2010 ची आहे. दैतारीचं मन मात्र
व्याकूळ झालं होतं. फक्त डोक्यात एकच होतं, गावात कॅनॉल आला पाहिजे. पाण्याचा पाट आला पाहिजे.
पाणी आल्यावर आपली पिकं पिकतील. खायला भरपेट अन्न
मिळेल, मुलं शाळेला जातील. गावाची परिस्थिती
सुधारेल. ते रात्रंदिवस याचाच विचार करायचे. एक दिवस त्यांनी आपल्या भावांना बोलावून आपण पहाड खोदूया का, असा प्रश्न केला. हे ऐकून घरचे
लोक हसायला लागले. ते म्हणाले, दादा,
पहाड तोडणं हा काही गमतीचा खेळ नाही. आपल्यासाठी
अशक्य कोटीतील आहे हे. दैतारी सांगतात, आमच्याकडे शेतीशिवाय जगण्याचे दुसरे साधन नव्हते.शेतीची
अवस्था बिकट झाली होती. आमच्याकडे पहाड खोदून पाण्याचा पाट
(कॅनॉल) आणणं हाच एकमेव मार्ग होता. पण कुणीच त्यांच्या मदतीला येत नव्हतं. सगळे परमेश्वराच्या भरवशावर होते.
पण दैतारींनी ठरवलं होतं, ही परिस्थिती बदलायची. गावात सुबत्ता
आणायची. घरचे लोक सोबतीला आले नाहीत. मग
शेवटी एक दिवस ते एकटेच
निघाले. खुरपे, कुदळ घेऊन. पहाडावर पोहचल्यावर त्यांनी पाणी आणण्याच्या मार्गावरची झाडे तोडायला सुरुवात
केली. याला कित्येक दिवस लागले. सगळे स्वच्छ
केल्यावर त्यांनी प्रत्यक्ष पहाड खोदायला सुरुवात केली. रात्रंदिवस
या कामाला लागले. रात्री उशिरा काम करून थकून घरी यायचे.
पुन्हा सकाळी कामावर निघून जायचे. विलक्षण वेढ
त्यांच्या अंगात शिरलं होतं. ते कुठल्याही परिस्थिती गावात पाणी
आणू पाहात होते. या दरम्यान, त्यांच्या
घरच्यांनी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. गाववाले तर त्यांची
टरच उडवत होते. सगळ्यांना वाटत होतं की, एक दिवस थकून काम बंद करून माघारी येईल. पण असं काही
घडलं नाही. दैतारी नित्यनेमाने आपले काम करीत राहिले.
जवळपास सलग चार महिने ते एकटेच पहाडावर जाऊन काम करत राहिले.
शेवटी घरच्यांना सहन झाले नाही. ते एक दिवस पहाडावर
पोहचले. तिथले दृश्य पाहून ते तर अचंबितच झाले. दैतारी यांनी एकट्याने पहाडाचा बराच भाग खोदून काढला होता. हे पाहून कुटुंबाची आशा पल्लवित झाली. आपण सगळ्यांनी
मिळून पहाड खोदला तर नक्कीच गावात पाणी येईल, याची खात्री त्यांना
झाली.
यानंतर चार भाऊ आणि त्यांची मुलं दैतारी
यांच्या मदतीला आली. मात्र यासाठी दैतारी
यांना चार महिने एकट्याने पहाड खुदाईचं काम करावं लागलं आणि मग त्यांचा विश्वास बसला. संपूर्ण कुटुंबाने जवळपास चार वर्षे मोठे कष्ट
घेऊन पहाड खोदण्यात यश मिळवले. 2014 मध्ये त्यांचे स्वप्न पूर्ण
झाले. गावात कालव्याद्वारे पाणी आले तेव्हा संपूर्ण गाव आनंदाने
नाचू लागले. गाववाल्यांच्या चेहर्यावर
हास्य उमटलं. सगळीकडे फक्त दैतारी यांचीच चर्चा होऊ लागली.
हा करिश्मा पाहून गावचे, आजूबाजूचे लोक दंग झाले.
दूर दूरवरून लोक पाहायला येऊ लागले. स्थानिक मिडियाने
त्यांना कॅनॉल मॅनची पदवी बहाल केली. त्यांची चर्चा राज्यभर झाली.
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमात
कौतुक करून त्यांना खरा कर्मयोगी अशी उपमा दिली. या वर्षी त्यांना
पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. दैतारी म्हणतात की,
मी असा काही विचार केला नव्हता की, मला एवढा मोठा
पुरस्कार मिळेल. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, जर कुणी तुमच्या मदतीला येत नसेल तर गप बसू नका, एकटे
बाहेर पडा. नंतर आपोआप सगळे तुमच्या मागे येतील.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत
खूप छान
ReplyDelete