Saturday, April 13, 2019

(बालकथा) आणि विठूचं आयुष्य बदललं


कचरा आणा... कचरा…” या आवाजाबरोबरच दरवाजाची बेल वाजली. प्रमिला कचर्याची बादली घेऊन बाहेर आली. आज कचरा उचलणार्या दादाबरोबर अकरा-बारा वर्षांचा एक मुलगाही आल्याचं तिनं पाहिलं.
 याला यापूर्वी कधी पाहिलं नाही. ” प्रमिलानं विचारलं.
 वयनी, हा माझा मुलगा आहे. आता यालाही कामाला लावायचं आहे. ”
याला शाळेला का नाही पाठवत? शिकला तर चांगली नोकरीदेखील मिळून जाईल. ” प्रमिला म्हणाली.

 वयनी, मुलांना शाळेला पाठवावं इतकंही नाही कमवू शकत मी. काम शिकला तर निदान त्याच्या भाकरीचा तरी प्रश्न मिटेल. ”
 हो, हेही बरोबरच आहे. ” असं म्हणून प्रमिला आत जाऊ लागली. तेवढ्यात तो मुलगा म्हणाला, “ काकू... काकू, खायला काही असलं तर द्या, खूप भूक लागलीय. ”  प्रमिलानं त्याला खायला देत त्याचं नाव विचारलं. त्यानं गडबडीने खात खातच सांगितलं,विठू.
दुसर्यादिवशी पुन्हा विठू त्याच्या वडिलासोबत आला. प्रमिलाने कचर्याची बादली बाहेर ठेवली, तेव्हा विठूने पुन्हा खायला मागितलं. प्रमिलाने त्याला खायला देत विचारलं, “  विठू, तुला शाळा शिकायला आवडत नाही का? ”विठूने खात खात फक्त हो अशी मान डोलवली. आणि करणार तर काय? स्वप्नच ते अर्धवटच राहणार.
प्रमिला म्हणाली, “  मी तुला शिकवीन. तुझ्या बाबांचे काम होईपर्यंत मी तुला वाचायला-लिहायला शिकवीन. ” विठूने आनंदाने तिची गोष्ट मान्य केली. प्रमिलाने ही जबाबदारी स्वीकारली असली तरी सासू-सासर्यांना काही हे काम पसंद पडले नाही. ते म्हणाले, “  सूनबाई, ही माणसं चांगली नसतात.. चोर असतात. ते जसं आहेत, तसंच त्यांना राहू दे. ” पण प्रमिला आपल्या निर्णयावर ठाम राहिली. सासू-सासर्यांनी सांगून टाकलं की, त्याला शिकवायचं असेल तर तिकडे बाहेरच शिकव.घरात नको घेऊस. ”
विठू रोज प्रमिलाला खायला मागायचा, मग शिकायला बसायचा. आता तो छोटी छोटी वाक्ये लिहायला आणि थोडा फार हिशोब ठेवायला शिकला. त्याला स्वत:चं नाव सारखं सारखं लिहायला आवडायचं.
दरवाजाची बेल वाजल्यावर सासूचा आवाज आला, “  पुन्हा आला बघ तो भिकारी. ”
विठूने आज प्रमिलाला विचारलंच, “  काकू, हे लोक मला कुठंवर भिकारी आणि चोर म्हणणार? ”
प्रमिला म्हणाली, “  ज्यादिवशी तू खायला मागायचं बंद करशील आणि स्वत:च्या कष्टातून खाशील, त्यादिवशी हा प्रकार बंद होईल. ”
 नमस्कार काका, मी प्रमिला बोलतेय. काही किराणा मागवायचं आहे. यादी सांगू का? ” प्रमिला श्रीमंतकाकांशी मोबाईलवर बोलत होती.
प्रमिला, तुला स्वत:ला सर्व किराणा माल न्यावा लागेल. माझ्याकडे कामाला एकही पोरगं नाही. ” श्रीमंत काकांनी आपली मजबुरी सांगितली.
प्रमिलाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तिने लगेच विठूची शिफारस करून टाकली. मग काय! विठूच्या पोटापाण्याचा प्रश्नच मिटून गेला. आता विठू श्रीमंत काकांच्या किराणा दुकानात कामाला जाऊ लागला. प्रमिला आणि श्रीमंत काका या दोघांनी मिळून विठूला शाळेत दाखल केलं. प्रमिलाच्या प्रयत्नांमुळे विठूच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. आता विठू तिच्या घरी खायला मागण्यासाठी नाही तर खायचा किराणा माल पोहचवायला येऊ लागला.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत   



No comments:

Post a Comment