Saturday, April 13, 2019

(लघुकथा) जाणीव

पवारसाहेबांचे दोन-चार शेजारी त्यांच्या घरी आले. त्यांना पाहून पवारसाहेब म्हणाले, “आज कसं काय येणं केलंत माझ्या घरी? ”
त्याचं असं आहे, तुमचा बंड्या आपल्या कॉलनीतल्या मुलींची छेड काढतो. त्याला समजवा. तुमच्याही घरी मुलगी आहे म्हटलं, ” त्यातला एकजण म्हणाला.

यावर पवारसाहेबांचा पारा चढला. ते उसळून म्हणाले, “ पोराचे हेच वय आहे खेळण्या-बागडण्याचे ! या वयात बारीक-सारीक खोड्या या होणारच. शेवटी तो कधी करणार? तुमच्या माझ्या वयात? साखळदंडाने बांधून घालायला माझा मुलगा काही जनावर नाही. तुम्हीच तुमच्या मुलींना, सुनांना समजावून सांगा. ” सगळे शेजारी पुढे काही न बोलताच माघारी निघून गेले.
काही दिवसांनी कळलं की, पवारसाहेबांची मुलगी गेल्या दोन-चार दिवसांपासून घरी आलीच नाही. पवारसाहेबांचं बाहेर पडणंच बंद झालंएके दिवशी ते सगळे शेजारी पुन्हा पवारसाहेबांकडे गेले. म्हणाले, “पवारसाहेब, काही काळजी करू नका, मुलीचं हेच वय आहे, खेळण्या-बागडण्याचे! या वयात अशा लहानसहान खोड्या होणारच, मग काय ती तुमच्या-आमच्या वयात थोडीच करणार आहे? ”
बास ओ बास. मला आणखी बोलून लाजवू नाका. मला त्या दिवसाच्या चुकीची जाणीव आता झाली आहे. मला क्षमा करा. ” असे म्हणून पवारसाहेब हुंदके देऊ लागले.

No comments:

Post a Comment