बहिणीचा फोन आल्यावर जगन सगळी कामं जिथल्या
तिथं टाकून सांगलीला आला. बहिणीनं सांगितलं होतं
की, आम्ही कोल्हापुरातून सांगलीत शिफ्ट होतोय. तुझी मदत लागणार आहे. आईनं त्याला जायला नकार दिला होता.
पेरणीसाठी ट्रॅक्टर सांगितला होता. पण लगेच जी
एसटी मिळाली,त्यात बसलासुद्धा! बहिणीकडे
सामानांचा ढिग पडला होता. आल्या आल्या तो बहिणीसोबत घर सजवण्याच्या
कामाला लागला. या दरम्यान शेजार्यांनी
चहा-नाश्टा आणून दिला. पोहे खावून वर चहा
पिऊन जगन पुन्हा कामाला लागला. संध्याकळचे पाच वाजत आले.
काम आवरत आलं.
कुठल्या तरी कंपनीत भावजी मोठ्या पदावर
होते. भावजी दिवसभर फोन कानाला लावूनच होते. काम झाल्यावर बहीण कंबर दुखाली म्हणून बेडरूममध्ये जाऊन पडली. काही सामान कुठे ठेवावे, हे कळत नव्हते. ते विचारायला तो बहिणीच्या खोलीकडे निघाला. खोलीजवळ आल्यावर
भावजीचा आवाज त्याला ऐकू आला. “ ऐक, आता
जगनला गावाकडे पाठवून दे. सात वाजेपर्यंत एसटी मिळून जाईल त्याला.
माझा बॉस व आणखी दोघे-तिघे सहकारी येणार आहेत डिनरला
आपल्याकडे. जेवण मी बाहेरूनच मागवणार आहे. गावातल्या आणि शहरातल्या लोकांच्या राहणीमानात कमालीचा फरक असतो. त्याच्यामुळे ऑफिसमधल्या लोकांपुढे माझी फर्स्ट इंप्रेशन खराब व्हायला नको.
त्याला पाठून देऊन तूही तयारीला लाग.” हे सर्व ऐकून जगन आल्या पावली परत
फिरला. त्याने त्याचे दोन-तीन चांगले कपड्यांचे
जोड सोबत आणले होते. भावजी त्यांच्या गाडीतून आपल्याला सांगली
फिरवून आणतील.
जड अंत:करणाने त्याने बॅग उचलली आणि बहिणीला हाक दिली. “आईचा
फोन आला होता, महत्त्वाचं काम आहे म्हणाली, मी निघतो. ” बहीण पडलेला चेहरा घेऊन बाहेर आली. इच्छा असूनही ती आपल्या
भावाला थांबवू शकली नाही. तोंडातून शब्दच फुटला नाही.
मनातल्या मनात म्हणाली, बरं झालं! आईचा फोन आला. नाही तर लग्नानंतर पहिल्यांदा घरी आलेल्या
भावाला कुठल्या तोंडानं जायला सांगणार होती?
No comments:
Post a Comment