Wednesday, April 3, 2019

मी असा, मी तसा


माझा स्वत:चा स्वभाव ओळखणं माझ्यासाठी कठीण आहे. मी कसा आहे, याची माझी मलाच कल्पना नाही.त्यामुळे माझ्या स्वभावाविषयी सांगताना माझाच गोंधळ सुर्रू आहे. कारण आपण सांगणार आहे, तो तसा मी खरेच आहे का? त्याला माझी बालपणीची परिस्थितीही कारणीभूत आहे. जशी परिस्थिती येईल, तसा झुकत गेलो आहे. लहानपणी आपलं अस्तित्व शून्य होतं, कुणी काहीही म्हणावं, त्याचा राग धरावा आणि त्याचा सूड घ्यावा, असे मनात वाटत असलं तरी तसं धाडस काही मी कधी केलेलं नाही. उलट अपमान मूग गिळून सहन करणे, एवढेच माहित! मात्र यामुळे एकमात्र झालं. मी माणसांपासून दूर पळत राहिलो. माणसांची भिती वाटायला लागली. माणसं काही म्हणतील आणि आपली टर उडवतील, म्हणून त्यांच्यात मिसळत नव्हतो. साहजिकच एकटं राहणं आलं.याचा परिणाम आजही दिसतो. आजही स्टेजवर उभारून ठामपणे आपली मते मांडता येत नाहीत. दुसर्याच्या मतांचीच री ओढून वेळ मारून नेणे, हेच करत आलो आहे. शालेय वयात असं डेरिंग करून परिपाठात सहभाग घेतल्याचं आठवत नाही. डी.एड.लाही पुढे येऊन काही मिनिटे बोलल्याचं आठवत नाही. म्हणजे बोलण्याच्या बाबतीत आपण त्याच्यापासून चक्क पळच काढला आहे.

सहावीला असतानाच प्रसंग! जतच्या एस. आर.व्ही.एम.मध्ये श्री. बिळूर सर वर्गशिक्षक होते. प्रत्येक वर्गात नाटक, नृत्य वगैरे बसवण्याची तयारी चालली होती. आमच्याही वर्गात ते बसवलं जाणार होतं. सरांनी इतर चार-पाच जणांबरोबर मलाही उठवलं. मी जाम घाबरलो. मी थेट तिथून पळ काढला. सरांनी चार पोरं पाठवून मला पकडून आणायला सांगितलं. सरांनी मारलं की नाही माहित नाही,पण खूप बोलले. पण तरीही माझ्यावर त्याचा काही फरक पडला नाही. शेवटी सरांना माझा नाद सोडावा लागला. कारण माणसांची, गर्दीची भिते माझ्यात जाम बसली होती. आजही त्यात फारसा फरक पडला नाही. फक्त अनुभवाचे बोल मला बोलू देतात एवढच! तिथूनच मला वाटतं, कुठल्याही गोष्टीतून पळ काढण्याची सवय लागली असावी. आपल्याला झेपत नाही, होत नाही तर मग बाजूला व्हा! असा काहीसा माझा स्वभाव बनला आहे. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलीही गोष्ट फारशी मनावर घ्यायची नाही. मुळात मी मुलखाचा आळशीही आहे, असं वाटतं. मनात आलं तर करायचं नाहीतर सोडून द्यायचं, असं काहीस माझं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे  आपलं असं काही ठाम मत असल्याचं मला जाणवत नाही. हां, एकमात्र असं की जीवन जगताना स्वभावाला मुरड घालायची,पण लिहिताना तेवढाच खंबीरपणा दाखवायचा. त्यामुळे प्रत्यक्षात तसं जगता नाही आलं तरी लिखाणात तसे जगण्याचा प्रयत्न करायचो. आणि त्याचं समाधान वाटायचं. अथवा वाटतं.
 साधारण इतर सर्वसामान्य लोकांसारखाच माझाही स्वभाव आहे. आपल्याला त्रास होत असेल तर त्यापासून आपण बाजूला व्हायचं. आपल्याला त्याची झळ बसत नाही ना? याचा विचार करून त्यात किती सहभाग घ्यायचा, हे साधारण मी ठरवतो. त्यामुळे आयुष्यात मला फारशा आडचणी आल्या नाहीत. नोकरी सांभाळून पत्रकारिता करायचो, तेव्हा आपल्याला समाजाला सरळ करायचं आहे, असं वाटायचं. परंतु, प्रत्यक्षात सगळं विपरित होतं. स्वत:वर विश्वास नसल्याने अडचणी आल्यावर काय करायचं, याचाही काही विचार नसल्याने त्याच्याहीविषयी भिती वाढत गेली. राजकारण्यांनी मला झटका देण्याचा प्रयत्न केला, परंतु, माझं नशीब बलवत्तर, मला त्यांचा त्रास झाला नाही. कारण त्यांचे प्रयत्न विफल झाले. पुढच्या काळात फार मोठी महत्त्वाकांक्षा मनात बाळगली नसल्याने त्याचा त्रास नंतर नंतर झाला नाही. त्यानंतर मी माझा मार्ग बदलला. पुढील आयुष्यात असे अनुभव आल्यावर मी माझा मार्गच बदलण्याचा प्रयत्न करत राहिलो. कारण कुठली झळ बसायला नको, असे वाटायचे. तशी भिती वाटायची.
याचा सरळ अर्थ असा आहे की मी हेकेखोर नाही. मी माझी मतं कधी रेटून नेली नाहीत. समोरच्या माणसाला तसे वाटत असेल तर तो त्याचा दोष आहे. त्याने आपली मते ठामपणे मांडताना आणखी काही तरी विचार करून आपल्या ठामपणाला मुरड घातली असावी, असं मला वाटतं. पण पुढची व्यक्ती मला भारी पडली तर मी आपले म्हणणे मांडण्याचा रेटा लावण्याचा प्रश्न येत नाही. मी लगेच म्यान होतो. जिथे आपल्याला कशाची झळ पडत नसेल तर मग आपण त्याचा विचार का करायचा?, असा माझा स्वभाव आहे, असे मला वाटते.
मला कपड्याच्या आणि त्याच्या रंगाच्याबाबतीत फार इंटरेस्ट नाही. आपण विदूषक वाटणार नाही, याची खात्री झाली की मग कुठलेही कपडे आणि रंग दोन्ही गोष्टी चालतात. खरे सांगायचं तर मला माझा आवडता रंग सांगता येत नाही. कारण त्याचा फार विचार केला नाही. कोणी याबाबतीत विचारलं असलं तरी ठोकूनच दिल्याचं आठवतं. अर्थात हे खोटे म्हणून नाही तर आपल्या आवडी-निवडी नाहीत, असे सांगायला मनाला कसंसच वाटू नये म्हणून सांगितल्या गेल्या आहेत. आजही तसाच प्रकार सुरू आहे. कारण स्वत: विषयी फार विचार केलाच नाही. माझ्याकडे काही माझं नाणं चालण्यासारखं भांडवल आहे. फारच काही येत नाही, असं नाही. थोडे फार अक्षर चांगले आहे. तशाच प्रकारे चित्रकलेच्याबाबतीत आहे. स्वतंत्रपणे एकाद्या विषयावर लिहिता येतं. पत्रकारितेतला अनुभव आहे. त्यामुळे आपलं आयुष्य सहज चालून जातं, याबाबत खात्री आहे. त्यामुळे फार कुठल्या गोष्टीचा विचार करत बसावा लागला नाही.
टापटीप राहावं. फॅशन अंगिकारावं, असं कधी वाटलं नाही. चालतंय ना चालू द्या, असाच माझा शिरस्ता राहिला आहे. नोकरी सेफमधली असल्याने पुढे आयुष्यही सेफमध्येच गेलं. आयुष्यात नोकरी झाली की सर्व काही आलं, असा विचार करणारा मी आज मात्र आपण किती काळ वायफट घालवला, याचा पश्चातापही होतो. आज इतर कामात व्यस्त असल्याने आता पुन्हा शिक्षणाच्या दारी जायला मन तयार नाही. आता आहे, त्या स्थितीत राहून आपल्या आवडत्या छंदाला वेळ द्यावा, असे वाटते. पण अलिकडच्या दोन तीन वर्षात आपल्या आयुष्याला काही तरी दिशा असायला हवी, असं वाटू लागल्याने त्याला थोडी फार शिस्त आली आहे. बार-हॉटेलसारख्या नको त्या ठिकाणी वेळ घालवणारा मी नंतर वाचन आणि लेखनात वेळ घालवायला लागलो. त्याचा फायदाही झाला.अर्थात वाचन लेखनाची आवड पूर्वीपासून होती. पण आज त्याच्याकडे प्रयत्नपूर्वक लक्ष देऊ लागलो आहे. याबरोबर आणखीही काही गोष्टींकडे प्रयत्नपूर्वक लक्ष देऊ लागलो असलो तरी मधे मधे माझा स्वभाव डोकावू लागल्याने यश मिळण्यात अडचणी येत आहेत.
एकादी वस्तू, एकादी गोष्ट मिळवावीच, अशी काही जिद्द मनात कधी बाळगली नाही.कारण खच खाणे हा माझा स्वभावच आहे. आणखी म्हणजे मला अनेक गोष्टी प्रयत्न न करता मिळाल्या आहेत. त्यामुळे त्याचेही काही विशेष वाटलं नाही. पण आज एकादी गोष्ट मिळवताना किती पापड बेलावे लागतात, याचा खर्या अर्थानं अंदाज येत आहे.म्हणजे माणूस म्हणतो, वय होत जाईल तसा तो सुखी होत जातो.कामाचा ताण कमी, होतो, जबाबदारी कमी होते, असं काहीबाही बोललं जातं ना तेव्हा हसू येतं. माणसाच्या अंगावरील जबाबदार्या वयपरत्वे कमी होत नाहीत तर त्या आणखी वाढतात. फक्त अनुभवामुळे त्या जबाबदार्या पेलल्या जाऊ शकतात. म्हणजे त्यात अडचण वाटत नाही, असं मला वाटतं.



No comments:

Post a Comment