Thursday, June 6, 2019

17 व्या लोकसभा निवडणुकीचे 'हटकेपण'


काहीही म्हणा,पण 17 व्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थाने विशेष आहे. रंजक तर आहेच,शिवाय अनेकांना चकित करणारी आहे. लोकसभेच्या निवडणूक निकालाने अनेकांची अजूनही झोप उडालेलीच आहे. 2014 मध्ये मोदी लाट असताना जेवढ्या जागा भाजपला मिळाल्या,त्यापेक्षा अधिक जागा 'मोदी लाट' नसताना मिळाल्या. यावर आश्चर्य करणारे सगळ्याच पिढीमध्ये आढळून येत आहेत. साहजिकच काहींना या निकालाबाबत संशय आहे, शंका आहे. एव्हीएम मशीनवर तर अनेकांचा आरोप आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर आता सर्वच राजकीय पक्षांना या मशीन विरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे.
आता त्या मशीनचे काय व्हायचं ते होवो, पण ही निवडणूक अनेक अर्थाने वेगळी आणि विशेष आहे. या संसदेत सर्वाधिक शेतकरी खासदार निवडून गेले आहेत. या वेळेला वकील असलेल्या खासदारांची संख्या घटली आहे. राजकारणी किंवा समाजसेवक असलेल्या खासदारांची संख्या 39 टक्के आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे 1984 नंतर पहिल्यांदाच कुठल्या एका राजकीय पक्षाला मोठ्या संख्येने बहुमत (303) मिळाले आहे. यावेळेला महिला खासदारांची संख्याही वाढली आहे.
एका अहवालानुसार, 17 व्या लोकसभेसाठी निवडून गेलेल्या 542 खासदारांपैकी 39 टक्के खासदार राजकारणी किंवा सामाजिक क्षेत्राशी संबंधित आहेत. तसा उल्लेख त्यांनी आपल्या निवडणूक नामनिर्देशन पत्रकात लिहिले होते. 16 व्या लोकसभेत हीच संख्या फक्त 24 टक्के होती. आताच्या लोकसभेतील 38 खासदारांनी स्वतःला शेतकरी म्हणवून घेतले आहे. 16 व्या लोकसभेत यांची संख्या 20 टक्के होती. या खेपेला इतक्या मोठ्या संख्येने 'शेतकरी' संसदेत पोहचले आहेत, तर आमच्या शेतकरी बांधवांची अपेक्षा त्यांच्याकडून वाढणे साहजिक आहे. शेतकरी बांधव सध्याची परिस्थिती, सरकारी धोरणे ,पावसाचा अभाव आदींमुळे पार देशोधडीला लागला आहे.  त्यांच्याकडून आशा असणारच! 17 व्या लोकसभेत वकिलांचा सहभाग तीन टक्क्याने घातला असून आता तो चार टक्के राहिला आहे.
अहवालानुसार, आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या लोकसभेत 90 टक्के खासदार हिंदू समाजाचे आहेत. भाजपकडून निवडून आलेल्या खासदारांपैकी हिंदूंची संख्या 99.6 इतकी आहे. 16 व्या लोकसभेत 23 मुस्लिम खासदार संसदेत होते. या वेळेला यांची संख्या वाढून 27 झाली आहे. यातले 14 मुस्लिम खासदार हिंदू मतदारांचे वर्चस्व असलेल्या मतदार संघातून निवडून आले आहेत.
नवनिर्वाचित खासदारांमध्ये कोणाकडे किती संपत्ती आहे याची आकडेवारीही समोर आली आहे. यातील काहींकडे राहायला स्वत:चे घरही  नाही ,तर काही जण भल्या मोठ्या बंगल्यांचे मालक आहेत. लोकसभेत निवडून गेलेले 542 खासदारांपैकी 6 खासदार असे आहेत ज्यांच्याकडे अचल संपत्ती नाही. यात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि सर्वात तरुण खासदार चंद्राणी मुर्मू यांचाही समावेश आहे. चंद्राणी मूर्मू या अवघ्या 25 वर्षांच्या आहेत. हेही एक वैशिष्ट्यच आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7498863006

No comments:

Post a Comment