Thursday, June 6, 2019

गुणकारी काळा,जांभळा,निळा गहू


सकाळी चहाबरोबर काळ्या किंवा जांभळ्या रंगाची बिस्किटे, दुपारी जांभळ्या रंगांच्या चपात्या आणि रात्री निळ्या रंगाची रोटी. तंदुरुस्त राहू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या खाण्यापिण्यात  अशा रंगीत गव्हाचा वापर वाढल्यास नवल नाही. कारण आता असा रंगीत गहू बाजारात यायला वेळ लागणार नाही. आपल्याच देशात आता त्याचं उत्पादन सुरू झालं असून लवकरच त्याचे उत्पादन संपूर्ण देशात घेतलं जाईल.
मोहाली येथील नॅशनल एग्री-फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (एन ए बी आय) मधील शास्त्रज्ञाच्या एका गटाने आठ वर्षांच्या प्रदीर्घ संशोधनानंतर गव्हाच्या तीन रंगांच्या  नव्या जाती शोधून काढल्या आहेत. अत्यंत गुणकारी असलेल्या या जांभळ्या, काळ्या आणि निळ्या रंगांच्या गव्हामुळे आपल्याला अनेक रोगांपासून मुक्तता मिळू शकते. गेल्या वर्षी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड  अथोरिटी ऑफ इंडिया (एफएसएसएआय) या संस्थेनेदेखील  या गव्हांचा  वापर मानवाच्या उपयोगास असल्याचे आणि तो वापरण्याची परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे  या तिन्ही रंगांचे गहू भारतीय पर्यावरणाशी पोषक, अनुकूल आहेत. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गव्हाचे पीक  गेल्या वर्षांपासून मध्य प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि बिहार राज्यात घेतले जात आहे.
शास्त्रज्ञाच म्हणणं असं आहे की, हा    अँटीऑक्सिडेंटयुक्त   गहू हृदय रोग, मधुमेह आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतो.  काळ्या रंगांच्या गव्हात झिंकबरोबरच बायोफोर्टिफाइड असते. याशिवाय हा गहू कुपोषणाच्या विरोधात हत्यार म्हणून वापर करता येतो. अशाच प्रकारे जांभळा रंगाचा गहू मधुमेही रुग्णांसाठी लाभकारी आहे.
शास्त्रज्ञाचा हा प्रयोग आता एनएबीआयच्या लॅब आणि संस्थेच्या 35 एकर क्षेत्रापुरता मर्यादीत राहिला नाही तर देशातल्या  पाच राज्यातील सुमारे  700 एकर क्षेत्रात रंगीत गव्हाच्या पिकाचे उत्पादन घेतले जात आहे. मध्य प्रदेशात 80 एकर, पंजाबमध्ये 210 एकर, उत्तर प्रदेश मध्ये 150 एकर, हरियानामध्ये 65 एकर आणि बिहार राज्यात 10 एकरमध्ये हे रंगीत गव्हाचे पीक  घेतले जात आहे. गेल्या वर्षी 80 एकर क्षेत्रात हे पीक यशस्वी रित्या घेतले गेले आहे. त्यामुळे या गव्हाच्या जातींचा हळूहळू प्रसार आणि वाढ होत आहे. आणखी काही वर्षांत या गव्हाच्या जाती संपूर्ण देशात पिकवल्या जातील.
आपल्या देशात आयुर्वेदाला अलीकडच्या काही वर्षांत फारच महत्त्व आहे. विविध रोगांसाठी आयुर्वेद औषध वापरले जात आहे. उपयुक्त फळांचा रस आपल्याला आता प्रक्रिया करून बाटलीबंद स्वरूपात मिळत आहे. पण आता आपल्याला यासाठी दवाखान्यात जाण्याची गरज नाही. कारण आता या गव्हामुळे बिस्किटे, चपात्या,रोट्या खायला मिळणार आहेत. देशातल्या इतर राज्याच्या कृषी विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन त्यांचा विस्तार करायला हवा. औषधी गुणांच्या या गव्हाच्या जातींचा प्रसार झाल्यास लोकांच्या आरोग्यास  त्याचा आणखी  उपयोग होण्यास मदत होईल.- मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7498863006

No comments:

Post a Comment