अलीकडच्या काळात ऑनलाइन खरेदी विक्रीवर जोर दिला जात आहे. ऑनलाइन पद्धतीने खरेदी करणे चांगले असले, तरी त्यामुळे होणारी फसवणूक टाळण्याबाबत सावध भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. जत्रेत जशा प्रकारे हौसे,गवसे,नवसे असतात,तसे आता सर्वच क्षेत्रात अशी माणसे शिरली आहेत. त्यामुळे स्वतः गिऱ्हाईक म्हणून काळजी घेणे भाग आहे. खरेदीसाठी ऑनलाईन बाजार सगळ्यांना सोयीचा ठरला आहे. शॉपिंग करत बसण्यापेक्षा घरात बसून वस्तू मिळवायला लोकांना परवडू लागले आहे. त्यांचा महत्त्वाचा वेळ वाचत असल्याने अशा खरेदीचा कल वाढला आहे. मात्र अधिकृत वेबसाईटवर वस्तूंची खरेदी होणे आवश्यक आहे. यासाठी ग्राहकांनी दक्ष असणे गरजेचे आहे.
याच बरोबर बक्षीस जिंकल्याचे व लॉटरी लागल्याचे मेसेज व्हॉटस अप वर मोठ्या प्रमाणात धडकू लागले आहेत. त्यामुळे सुद्धा लोक फसून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहेत. लोकांच्या मेलला तर असे शेकडो मेसेज येऊन पडत असतात. जर असे घरी बसून काही कामधंदा न करता पैसे फुकट मिळत असते तर कुणीच काम केलं नसतं. सगळेच अशा लॉटरीच्या मागे लागले असते आणि श्रीमंत होऊन बसले असते.
आज आपल्या देशात कसल्याही प्रकारची सरकारी नोंद नसलेला 'मटका' मोठ्या इमानेइतबारे चालू आहे. याकडेसुद्धा लोक मोठ्या प्रमानात आकर्षित झाले आहेत. आणि किती तरी जणांनी स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करून घेतली आहे. पण तरीहि लोक यापासून काही बोध घ्यायाला तयार नाहीत.
सरकार आणि संबधित बँकांदेखील याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. खरे तर सरकारने कडक धोरण आखले पाहिजे. त्याचबरोबर असे ऑनलाइन व्यवहार करणा-यांनीही याबाबत जागरूकता ठेवली पाहिजे. कोणालाही आपल्या विषयीची माहिती फोनवर देऊ नये, याबाबत नागरिकांमध्ये पुरेशी जागृती होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ऑनलाइन फसवणूक करणा-यांच्या बँक खात्यांवर सरकारने व बँकेने लक्ष ठेवायाला हवे आहे. असे झाले तर निश्चितच ऑनलाइन व्यवहारांतील फसवणूक टाळून नागरिकांना दिलासा मिळू शकेल.
अनेकदा फोनद्वारे किंवा 'व्हॉट्सअॅप' वर मेसेज पाठवून खोटी माहिती देऊन तुम्हाला लॉटरी लागली आहे. असे भासवले जाते. तुम्ही काही रक्कम आमच्या खात्यात जमा करा. नंतर तुम्हाला दोन लाख रुपये मिळतील, असे सांगितले जाते. त्यानंतर काही दिवसांत फसवणूक झाल्याचे लक्षात येते. अशा घटना वारंवार घडतात, तरीही त्यातून धडा घेतला जात नाही, हे दुर्दैव. ऑनलाइन कंपन्या या अनेकदा वस्तू दाखवितात एक आणि मिळते दुसरीच, ही सर्वांत मोठी फसवणूक असते. याबाबत तक्रार करायची कोणाकडे याचीही ग्राहकांना माहिती नसते. ऑनलाइन विक्री करणा-या कंपन्यांची सेवा ज्या शहरात आहे, तेथे त्यांचे कार्यालय असावे म्हणजे काहीही अनधिकृत प्रकार घडला असेल, तर ग्राहक माहिती देऊ शकतील. तसेच, ऑनलाइन पद्धतीने वस्तू खरेदी करताना ब-याचदा फसवणूक होते. मोबाईल कंपन्यांकडून डाटा घेणे आणि त्याद्वारे अत्याधुनिक तंत्राचा वापर करून आपली माहिती मिळविली जाते. त्यामुळे ही डाटा विक्रीची पद्धत बंद व्हावी. सरकारने ऑनलाइन कंपन्यांवरही निर्बध आणले पाहिजेत. नागरिकांनीही कोणत्याही फोनवर आपली माहिती देता कामा नये. अनोळखी व्यक्तीला माहिती देणे चुकीचे असतानाही ब-याचदा नागरिक ही माहिती देतात. त्यामुळे फसवणूक करणा-यांचे आयतेच फावते.
आपल्या देशात यावर निर्बंध घालायला अनेक कायदे केले आहेत. मात्र आज त्यांचा वापरच होताना दिसत नाही. कारण कायदे इतके प्रचंड आहेत की, इतके कायदे जाणून घेणे आणि लक्षात ठेवणे मानवी बुद्धीच्या बाहेर आहे. आजकला फसवणुकीचा धंदा बोकाळला आहे. असमान आर्थिक परिस्थिती, चैन करण्याची लत वाढली आहे. त्यामुळे जाईल तिथे आणि घेईल तिथे फसवणुकीचा बाजार भरला आहे,त्यामुळे लोकांना आपणच चोखंदळ बनावे लागणार आहे, घटना-कायदे यांचाही अभ्यास करावा लागणार आहे, ग्राहकाने आपले हित आणि काळजी आपली आपणच बघितली पाहिजे, तरच त्याची फसवणुकीतून सुटका होणार आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7498863006
No comments:
Post a Comment