Monday, June 3, 2019

उद्याच्या पिढीकडे आपण कोणतं जग सोपवत आहोत


ग्लोबल वार्मिंगकडे प्रत्येकजण दुर्लक्ष करीत आहे. त्याचबरोबर विकासाच्या नावावर खप वाढवून राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढवण्याकडे लक्ष दिले जात आहे. यामुळे एक निश्चित आहे की, पुढच्या 30 ते 40 वर्षांत जगात जीवन जगण्यालायक ठिकाणं राहणारच नाहीत.  ग्लोबल वार्मिंग गांभीर्याने घेऊन निश्चित अशी नीती बनवण्याची गरज आहे. भारतासारख्या विकसनशील देशाला तर याची मोठी गरज आहे.

आपल्याला अर्थशास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक प्रमाणात बदलण्याची गरज आहे. आपल्याला कार्बन डायॉक्साईड उत्सर्जन कमी करायला हवं. आनंद आणि विकासाची धोरणे बदलायला हवीत. उपभोक्तावादाला आपल्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू बनण्यापासून रोखायला हवे. प्रत्येकाने यासाठी प्रामाणिकपणे काम करायला हवे.यासाठी अधिकाधिक शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि नव्या विचारांच्या अर्थतज्ञ यांची मदत घ्यायला हवी आहे. आतंकवाद आणि सांप्रदायिक हिंसाचार या गोष्टी जगात सुरुवातीपासून होत आल्या आहेत.पण याहीपेक्षा अधिक घातक ग्लोबल वार्मिंग आहे.
वास्तवात जर ग्लोबल वार्मिंगचा या पृथ्वीतलावर परिणाम झाला तर मग मात्र आतंकवाद त्यापुढे काहीच असणार नाही. तीन वर्षांपूर्वी लोकं म्हणत होते की, आयएसआयएस जगासाठी सर्वात  धोकादायक आहे. पण खरे तर हवामानातला बदल हा सर्वाधिक धोकादायक आहे. प्रत्येक धर्माने माणसांना मारले आहे,पण याहीपेक्षा अधिक धोक्याचे काम हवामान बदलाने केले आहे.जर याकडे तात्काळ लक्ष दिलं गेलं नाही तर व्यापक विनाशाला कुणीच रोखू शकणार नाही.
प्राथमिक शिक्षण, वैश्विक आरोग्य सुविधा आणि सार्वजनिक परिवहन यांमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक परिवहनचा वापर मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे. यामुळे अन्य  खासगी मालमत्ता असलेल्या वाहनांचा वापर कमी होईल. त्यामुळे हवा प्रदूषण तर कमी होईलच,पण शिवाय इंधनाचा वापरदेखील कमी होईल. साहजिकच आपली परकीय गंगाजळी वाचण्यास मदत होईल. प्राकृतिक स्रोतांचे जतन होईल. भावी पिढीला त्याचा उपयोग होईलच शिवाय त्यांना ग्लोबल वार्मिंगचा धोका लक्ष्यात येईल.
कृषी क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आताच्या शेतकऱ्याला आपल्या उत्पादनातून फायदा मिळवणं कठीण होत चाललं आहे. शेतकऱ्याची मुलं आपल्या इच्छेने शेतीची कामं करायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांचं भविष्य कसं असणार आहे,हा मोठा चिंतेचा विषय आहे. त्यांना नोकऱ्या कोण देणार? कारण नोकऱ्याच कुठे आहेत सध्या? कृषी क्षेत्रावरचं संकट फक्त भारतापुरत मर्यादित नाही. विकासाचं पश्चिमी मॉडेल स्वीकारलं गेल्यानं हे संकट पूर्ण विश्वभरात पसरलं आहे. त्यामुळे आता आपण कृषी संकटात सापडलो आहोत. हवामान बदलावरदेखील याचा दुष्परिणाम जाणवत आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याची गरज आहे.
आणखी एक महत्त्वाचं म्हणजे पर्यावरण रक्षणासाठी खास गुंतवणूक करण्याची गरज आहे. अगोदर सांगितलेल्या सर्व समस्या एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत.जंगल तोड करून किंवा खनन अथवा अन्य वाणिज्यिक कारणांसाठी वनभूमीचा वापर करणे चुकीचे आहे. जंगलातील तोडलेल्या झाडांच्या बदल्यात हजारो झाडे लावणे,हा यावरील उपाय नाही.  यामुळे पाण्याची कमतरता निर्माण होईल आणि पुढे जाऊन हे संकट मोठे भयानक होऊन जाईल. या गोष्टी आपण जाणून घेतल्या तर समस्यांचे निरसन करणाऱ्या बाबींचा शोध घेता येईल.
जात,लिंग आणि वर्ण यांच्या समानतेच्यादृष्टीने विचार करता येईल. या मुद्द्यांकडे लक्ष देता येईल. महिलांना देखील त्यांची ताकद, शक्ती ओळखण्याची संधी मिळायला हवी. पुरुष संस्कृतीच्या आजच्या समाजात त्यांचे सशक्तीकरण आवश्यक आहे. यात उत्तम शिक्षण आणि आरोग्य या गोष्टींकडे  प्राधान्याने लक्ष द्यायला हवे आहे. विकासाचे मापन करताना जीडीपीच्या तुलनेत मानव विकास सुचकांक सारख्या मापदंडांकडे अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. मुलांना मुलेच राहू देण्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षण म्हणजे परीक्षा आणि पुढे जाऊन नोकरी असे साधन समजले जाऊ नये. सध्याच्या या शिक्षण पद्धतीमुळे मुलांचं बालपण हरवून गेलं आहे. प्राथमिक शिक्षणाला आणखी व्यापक स्वरूप देण्याची गरज आहे. मुलांना कला आणि संस्कृती यावर अधिक शिकवलं जाण्याची आवश्यकता आहे. नोकरी कशी पटकवावी,हेच फक्त शिकवलं जाऊ नये. ते उद्याचे खंदे भविष्य कर्ते आहेत.  त्यांच्या साठी आपण असे जग सोपवून जात आहोत,ज्याची अवस्था आपण फार चांगली ठेवलेली नाही.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7498863006

No comments:

Post a Comment