Friday, May 31, 2019

शहरे प्रदूषणमुक्त करण्याचा जाहीरनामा


देशात हवा प्रदूषण वाढत असून त्याचे दुष्परिणामही जाणवत आहेत.पण अजूनही राजकीय पक्ष ,प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. देशातील 15 लाख लोक दरवर्षी हवेच्या प्रदूषणा मुळे मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे आता राजकीय पक्षांनी निवडणूक लढवताना शहरे प्रदूषण मुक्त करण्याचा जाहीरनामा लोकांसमोर ठेवायला हवा.लोकांनीही आता जागृत होण्याची गरज आहे. अन्यथा प्रदूषणाचा विळखा शहरी लोकांना गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही.

जागतिक आरोग्य संघटनेने जगातील 1600 शहरांचा अभ्यास केला आहे. विशेष म्हणजे आपल्या देशाची राजधानी असलेले दिल्ली शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचे आढळून आले आहे. देशातील 15 लाख लोक दरवर्षी या प्रदूषणा मुळे मृत्यूमुखी पडत आहेत. यात सातत्याने वाढ होत आहे. 2017 मध्ये 12 लाख 40 हजार लोक प्रदूषणामुळे मृत्यूमुखी पडले. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने जो अहवाल प्रसिद्ध केला आहे ,त्यात जगातील सर्वाधिक 20 प्रदूषित शहरांमध्ये आपल्या देशातील 14 शहरांचा समावेश आहे. या भयावह परिस्थितीची सर्वांनीच वेळीच दाखल घेण्याची गरज आहे.
हवेतील प्रदूषण जीवघेणे आहे,हे खरे तर विविध संघटना अलीकडच्या काही वर्षांत ओरडून सांगत आहेत,मात्र आपले त्याकडे लक्षच जात नाही.हेच मोठे दुर्दैवी म्हटले पाहिजे. हवेतील सुक्ष्मकण थेट फुफ्फुसात जातात. रक्तातून ते शरीरात मिसळतात.यातून अनेक रोगांचा धोका निर्माण होतो. दमा,हृदय रोग, कर्करोग असे अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात. आपल्या देशातल्या खेड्यांमध्ये कामधंदा नाही. कामाचे स्रोत नसल्याने मोठ्या प्रमाणात लोकांचे त्यातल्या त्यात युवापिढीचे स्थलांतर होत आहे. 2032 पर्यंत तब्बल 40 टक्के लोक शहरात राहणारे असतील, असे सर्व्हेक्षणाचा अहवाल सांगतो. इतक्या मोठ्या संख्येला सर्व प्रकारच्या सोयी सुविधा देण्यास आजची शहरे सक्षम नाहीत.साहजिक यांना सर्व त्या गोष्टी अपुऱ्या स्वरूपात मिळणार. जसजशी वाहनांची संख्या वाढेल,तसतशी प्रदूषणा ची टक्केवारी वाढत जाईल. शहरातले कारखाने यात आणखी भर घालत जातील. त्यामुळे आपण ज्या पिढीकडून उद्याच्या समृद्ध भारताची अपेक्षा करतो,त्या पिढीलाच आपण मृत्यूच्या दाढेत ढकलत आहोत.
शहरातील प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही.आणि हा खर्च फार मोठा आहे. शहरातल्या मुदतबाह्य वाहनांना भंगारकडे पाठवताना फार मोठ्या अडचणी आहेत.अन्य देशातल्या शहरांमध्ये प्रदूषण शोषणारी मोठमोठ्या मनोऱ्या सारखी यंत्रणा उभारली जात आहे,पण ती फार खर्चिक आहे. भारतातले शहरातले सत्ताधारी असे धाडस करणार नाहईत. त्यांना शहराच्या आरोग्याची किती काळजी असते,याचे उदाहरण आपण जागोजागी पाहत असतो. जागोजागी कचऱ्याचा ढीग, सांडपाण्याची अव्यवस्था या प्राथमिक उपाययोजना करताना या लोकांना नाकीनऊ येते,तर असला मोठा प्रोजेक्ट कोठून उभारणार, असा प्रश्न आहे. अलीकडच्या काळात शहरांना मदत करण्याचे खूळ निघाले आहे,पण याकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केले जात आहे.
आपल्या देशात रस्त्यावरची धूळ ही मोठी समस्या आहे.याशिवाय वाहनांच्या धुरातून निघणारा कार्बन मोनाऑक्साइड, विटा भाजणे, बांधकामे,इतर उद्योग व शेतीतील कचरा,कचरा जाळणे अशी हवा प्रदूषणाची कारणे आहेत.सांगली,कोल्हापूर सारखी शहरे या प्रदूषित शहरांमध्ये समाविष्ट झाली आहेत. हे प्रदूषण जीवघेणे असतानाही अजूनही याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.याकडे वेळीच लक्ष दिले नाहीतर भविष्यात फार मोठा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. आता शहरातल्या सत्ताधारयांनी आणि लोकसभा,विधानसभा निवडणूक वाढवणाऱ्यानी हा प्रदूषणाचा प्रश्न सोडवायला घ्यायाला हवाच,शिवाय त्यांनी शहरे प्रदूषण मुक्त करण्याचा विढा उचलायला हवा.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7038121012

No comments:

Post a Comment