Tuesday, May 28, 2019

प्लास्टिक कचऱ्यावर उपाय


सांगली जिल्ह्यातल्या विटे नगरपालिकेने प्लास्टिक कचऱ्यापासून पेव्हर ब्लॉक बनवून त्याचा व्यवासायिक उपयोग करायला सुरुवात केली असून यामुळे पालिकेच्या उत्पन्नात भर पडत आहे. प्लास्टिक कचऱ्यापासून पेव्हर ब्लॉक बनवण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम बनवणारी विटे नगरपालिका 'स्वच्छ शहर सर्व्हेक्षण 2019' स्पर्धेतही यश मिळवून आहे.विटे शहर हे पश्चिम भारतात सर्वाधिक स्वच्छ शहरांमध्ये अव्वल ठरले आहे. या नगरपालिकेने असे अनेक पूरक प्रकल्प उभे केले आहेत. त्यामुळेच या नगरपालिकेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

प्लास्टिक कचरा हा आपल्या भारतातला सर्वाधिक मोठा जटील प्रश्न आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईवर महापुराचे जे संकट ओढवले त्याला हा प्लास्टिक कचराच कारणीभूत होता.त्यानंतरही कुणी यातून काही बोध घेतला नाही,हा भाग वेगळा असला तरी प्लाटिक कचरा देशातल्या पर्यावरणाला दिवसेंदिवस घातक ठरत आहे, हे वेगळे सांगायला नको आहे. ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत सर्वत्र या प्लास्टिक कचऱ्याने थैमान घातले आहे. देशातील काही मोजके शहरच काही प्रमाणात या प्लास्टिक कचऱ्यापासून नागरिकांची सुटका करण्यात यशस्वी झाले आहेत. या मोठ्या शहरांपेक्षा छोट्या शहरांमध्ये प्लाटिक कचऱ्याची मोठी समस्या उभी राहत आहे, आणि त्यातून जनावरांना आपला जीव गमवावा लागत आहे. पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात सहन करावी लागत आहे. हा कचरा सर्रास जाळला जात असल्याने त्याचा विषारी धूर नागरिकांच्या नाकातोंडा वाटे शरीरात जाऊन शरीराला अपाय होत आहेत. गटारी तुंबणे हा प्रकार तर नित्याचाच होत आहे. जनावरांच्या पोटात तो मोठ्या प्रमाणात साठत असल्याने त्यांच्याही जीविताला धोका निर्माण झाला आहे.
प्लास्टिक माणसांना वरदायी ठरला असला तरी त्याच्या अतिवापरामुळे तितकाच धोकाही निर्माण झाला आहे.प्लास्टिक कुजत नसल्याने फार मोठी समस्या आपल्यापुढे उभी ठाकली आहे. अलीकडच्या काळात प्लास्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम लक्षात आल्याने देशातील अनेक राज्यांनी किमान जाडीच्या पिशव्यांच्या खरेदी विक्रीला  बंदी घातली. पण आपल्याकडे कायदे भरपूर आहेत,पण त्यांची अंमलबजावणी प्रामाणिकपणे होताना दिसत नाही. नागरिकांना जशी देशाची चिंता नाही,तशी लोकप्रतिनिधी, प्रशासन यांनाही नाही. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होताना दिसत नाही. अर्थात ही अंमलबजावणी फक्त प्लास्टिकबाबतच आहे, असे नाही तर गुटखा,सुगंधी तंबाकू, प्रवाशी वाहतूक, अवैध धंदे,झाडांची,प्राण्यांची कत्तल,तस्करी अशा अनेक बेकायदा धंद्याला कसलाच काही लगाम राहिलेला नाही. यातून हाणामारी, खून-दरोडे घडत आहेत,हा भाग आणखी निराळाच आहे.
टाकाऊ प्लास्टिक कचऱ्यापासून रस्ते बनवण्याचे प्रयोग पुणे,बंगळुरू शहारांमध्ये झाले.पण त्यात सातत्य का राहिले नाही.शासनाने अशा प्रकल्पांना का हातभार लावला नाही.प्रोत्साहन का दिले नाही, हाही एक मोठा प्रश्न आहे.वास्तविक मोठ्या कंपन्यांनीदेखील यात शिरकाव करायला हवा होता आणि त्यामुळे रस्त्यावर कुठेही पडणाऱ्या या प्लास्टिक कचऱ्याला मोल असले असते आणि रस्त्यावर तो असा तसा विखरून पडला नसता. भारत प्लास्टिक कचरा मुक्त करायचा असेल तर त्याचा पुनर्वापर करणारे प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारले जाणे आवश्यक होते. पण तसे घडताना दिसत नाही.म्हणूनच विटे नगरपालिकेचे कौतुक महत्त्वाचे आहे.
विटे नगरपालिकेने प्लास्टिक कचऱ्यापासून पेव्हर ब्लॉक बनवण्याचा प्रकल्प राबवून एक नवा आदर्श घालून दिला आहे. अन्य स्थानिक स्वराज्य संस्थासाठी मार्गर्शक ठरणारा आहे. विटे शहरात पालिका दैनंदिन घंटागाडीतून ओला व सुका कचरा विलगीकरण करून घेत आहे.त्याबरोबर प्लास्टिकसुद्धा रोज वेगळे संकलित केले जात आहे. आणि याच प्लास्टिकपासून पालिकेचे कर्मचारी घनकचरा डेपोवर पेव्हर ब्लॉकनिर्मिती करीत आहे. खराब प्लास्टिकच्या डोकेदुखीवर पर्याय शोधून पेव्हर ब्लॉक निर्मितीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. फक्त यशस्वी करून दाखवला नाही तर त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन त्याला व्यावसायिक जोडसुद्धा दिली.आता या पेव्हर ब्लॉकला मागणीही वाढू लागली आहे. त्यामुळे पालिकेला आणखी एक उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. डेन्सी फायर मशीनचा वापर करून उत्पादन घेतले जात आहे. या पेव्हर ब्लॉकचा उपयोग सार्वजनिक शौचालये, रोड डिव्हाडर, अंतर्गत रस्ते सुशोभीकरण करण्यासाठी करता येतो. यामुळे शहराच्या सौंदर्यातही भर पडण्यास मदत होणार आहे.प्लास्टिक कचरा आपल्या देशापुढचा मोठा गंभीर प्रश्न असला तरी स्थानिक स्वराज्य संस्था, कंपन्या यांनी याचा पुनर्वापर करणारे प्रकल्प उभे केल्यास शहरे स्वच्छ राहण्यास मदत तर होईलच,पण पर्यावरण हानीपासून सुटकादेखील होईल.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत (सांगली) 7038121012

No comments:

Post a Comment