Friday, May 17, 2019

छोटे बीज आणि त्याचा वटवृक्ष


तामिळनाडू राज्यातल्या घनदाट जंगलात वसलेलं गाव म्हणजे पुल्लूचेरी. देशातल्या सर्वदूर पसरलेल्या गाव, वाड्यावस्त्यांप्रमाणेच पुल्लूचेरीपर्यंत पोहचण्यापूर्वी विकासाचे रस्ते खत्म झालेले होते. मदुराईपासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर वसलेल्या या गावात राहतात चिन्ना पिल्लई. चिन्ना फक्त 12 वर्षांची होती, तेव्हा तिचं लग्न लावून देण्यात आलं होतं. लग्न झाल्यावर काही दिवसांतच तिला जवळच असलेल्या अलागार कोविल गावातल्या शेतात मजुरीनं जावं लागलं. तिथल्या शेतात काम करणारे मजूर आजूबाजूच्या वाड्यावस्त्यांवरचे होते. यात चिन्नाच्या गावाचाही समावेश होता.

चिन्ना एका पाठोपाठ एक झालेल्या दोन मुलं आणि तीन मुलींची आई बनली. चिन्नाचं आयुष्य असहाय्य शेतमजुरांसारखं जमीनदार आणि सावकारांच्या उधारी आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेलं. चिन्ना आणि तिचा नवरा पेरुमल जीव तोडून शेतात मेहनत करत होते.पण कर्ज काही कमी होत नव्हतं. सावकार या असहाय्य मजुरांकडून तीनशे पट व्याज वसूल करायचे. पण त्यांच्या विरोधात कोणी बोलण्याची हिंमत करत नव्हते. शेतमालकदेखील फारच कमी मजुरी द्यायचे. चिन्नाला मात्र हे सर्व काही मंजूर नव्हतं. त्या सांगतात- मी आमच्या शेतमालकाला सतत अगदी विनयाने सांगायची की, आमची मजुरी वाढवा. काही शेतमालक यामुळे नाराज झाले.पण हा आमचा हक्क होता आणि आम्ही आमचा हक्कच मागत होतो. चिन्ना तिचासारख्या महिला मजुरांच्या टीमची लिडर होती. या सगळ्या महिला मजुरांची परिस्थिती एकसारखीच होती. कारण त्या सर्व असंघटीत होत्या.त्यामुळे त्या शेतमालकांवर दबाव टाकू शकत नव्हत्या. चिन्ना यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा निश्चय केला. त्यांनी 1990 मध्ये छोट्या छोट्या बचतीच्या माध्यमातून आपल्यासह या महिला मजुरांचे भविष्य सुरक्षित करण्याची मोहिमच उघडली. यासाठी त्यांनी आपल्या समुहाच्या महिलांना सर्वात अगोदर विश्वासात घेतलं. 15 महिलांनी दर महिन्याला 20 रुपये बचत करण्याचे ठरवले. त्या त्यांच्या समुहातल्या एखाद्या गरजवंत महिलेला कर्ज रुपात रक्कम द्यायच्या. आणि त्या महिलेला 60 टक्के प्रतिवर्ष व्याज द्यावं लागायचं. सावकाराच्या तीनशे पट व्याजाच्या तुलनेत ही रक्कम फारच छोटी होती.
काही महिन्यातच कलंजियम या स्वयं सहायता समुहावर लोकांचा विश्वास वाढत गेला. चिन्नाच्या प्रयत्नाने सावकाश का होईना पण त्यांच्या समुहाच्या महिलांना आत्मनिर्भर बनवलं.  या समुहाच्या सदस्या फक्त अडचणीच्यावेळीच कर्ज घ्यायच्या नाहीत,तर छोट्या-मोठ्या धंद्यांसाठीही या स्वयंसहायता समुहाची मदत घेऊ लागल्या. धन फौंडेशनशी जोडल्या गेल्यानंतर या स्वयं सहायता समुहाने मागे वळून कधी पाहिलेच नाही. जवळपास तीन दशकापूर्वी चिन्ना पिल्लईने पुल्लूचेरीच्या गरीब महिलांना सशक्त बनवण्याचे जे बीज पेरले होते, ते आता 13 राज्यातल्या 12 लाख कुटुंबांचा विशाल अशा वटवृक्षात रुपांतर झाले आहे.
सुरुवातीला सुरुवातीला तर महिलांचे पती या मोहिमेला विरोध करत होते, कारण त्यांना याच्यावर विश्वास नव्हता. या महिला समुहाच्या बैठकीला उपस्थित राहायच्या,त्यामुळे घरातला स्वयंपाक करायला उशीर व्हायचा. त्यामुळेदेखील घरातले पुरुष नाराज व्हायचे. नंतर मग चिन्ना आपल्या सायकलीवर बसवून महिलांना बैठकीला आणायच्या.पुन्हा घरी सोडायच्या. चिन्ना सांगतात की, महिला स्वत:च्या पायावर अशाप्रकारे मजबूत उभारल्या पाहिजेत जेणेकरून त्या आपल्या कुटुंबाचे आणि मुलांचे भविष्य घडवतील. यासाठी त्या शिक्षणाला अधिक महत्त्व देतात. त्यांना स्वत:ला शिक्षणाची कधी संधीच मिळाली नव्हती, पण त्यांच्या दूरदृष्टीमुळे महिलांच्या मुलांचे शिक्षण कधी थांबले नाही. त्या म्हणतात, बदलाचं सर्वात मोठं साधन म्हणजे शिक्षण. माझी इच्छा आहे की, आमची पुढची पिढी इतकी सुशिक्षित आणि सशक्त व्हायला हवी की, त्यांना कुणी सहजासहजी फसवलं जाऊ नये. देशातल्या कोणत्याही कोपर्यातला गरीब त्यांच्या आर्थिक विवंचनेमुळे सुखकर आयुष्य जगण्यापासून वंचित राहू नयेत.
चिन्ना यांना एक एक लाख रुपयांचे तीन पुरस्कार मिळाले. त्यांनी त्यातली निम्मी रक्कम स्वत:जवळ ठेवली आणि निम्मी आपल्या अभियानसाठी दान केली. यातील एक पुरस्कार त्यांना जानेवारी 2001 मध्ये पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याहस्ते मिळाला होता. हा पुरस्कार होता-स्त्री शक्ती पुरस्कार. त्यांच्या प्रसिद्धीमुळे काहींना इर्ष्या झाली, त्यांना त्रास देणार्या माणसांनी इथेही संधी सोडली नाही. त्या आठवून सांगतात की, त्यांना स्त्री शक्ती पुरस्कार घेण्यासाठी दिल्लीला जावं लागणार होतं. या लोकांनी सांगितलं की, तू विमानानं गेलीस तर तुला हार्ट अॅटॅक येईल. त्यामुळे मला रेल्वेने जावं लागलं. परंतु, या पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जो माझा आदर सत्कार केला. त्यामुळे आदराच्या एका सर्वोच्च स्थानावर पोहचले. त्यांनी असे म्हणत माझ्या पायांना स्पर्श केला की, मी चिन्नामध्ये शक्ती पाहतो.
चिन्नाच्या प्रसिद्धीमुळे त्यांच्या गावाला आणि समुहाला देशभरात प्रसिद्धी आणि सन्मान मिळाला. त्यांना जानकीदेवी बजाज पुरस्काराशिवाय तामिळनाडू सरकारचा प्रतिष्ठित अवैयार अॅवार्ड देऊनही गौरवण्यात आले आहे. अलिकडेच त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. सन्मान मिळाल्यावर चिन्ना म्हणाल्या होत्या, जगात प्रसिद्ध तर मी अटलजींमुळेच झाले होते.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत



No comments:

Post a Comment