एकदा एका शिष्याने संत कबीरांना विचारलं,"विवाह चांगलं की संन्याशी जीवन?" कबीर म्हणाले,"दोघांपैकी काहीही असो दे,पण ते उच्चकोटीचे असायला हवे." "महाराज , मी समजलो नाही?"शिष्य म्हणाला.
कबीर त्याला आपल्या सोबत घेऊन गेले.दुपारचे बारा वाजत आले होते.कबीर कपडे विणायला बसले.प्रकाश भरपूर होता,तरीही कबिरांनी आपल्या धर्मपत्नीला कंदील आणायला सांगितला.त्यांनीही लगेच ते पेटवून आणले आणि त्यांच्याजवळ आणून ठेवला. संध्याकाळी ते शिष्याला एका डोंगरावर घेऊन गेले. या उंच डोंगरावर एक वृद्ध साधू झोपडी बांधून राहत होता. कबिरांनी साधूला आवाज दिला.वृद्ध आजारी साधू मोठ्या मुश्किलीने इतक्या उंचावरून खाली आला. कबिरांनी विचारलं,"तुमचं वय किती?" साधूने सांगितले,"80 वर्षे!"
एवढे सांगून तो साधू पुन्हा डोंगर चढू लागला. कसं तरी तो झोपडीत पोहचला.कबिरांनी पुन्हा आवाज दिला आणि खाली बोलावलं.तो खाली आला. कबिरांनी विचारलं,"तुम्ही इथे किती वर्षे झाली राहता आहात?"
तो म्हणाला,"चाळीस वर्षांपासून!" चढल्या-उतरल्याने साधूला चांगलाच दम लागला होता. त्याचा श्वास फुलला होता. आता तो फार थकला होता. पण तो अजिबात क्रोधीत झाला नव्हता. दोघांचे उदाहरण देत कबीर म्हणाले,"गृहस्थ बनायचं असेल तर दोघांच्या प्रेमात पूर्ण विश्वास असायला हवा.समर्पण असायला हवे. आणि संन्याशी बनायचं असेल तर दुरव्यवहार,क्रोध यांचा समावेश जीवनात अजिबात असू नये.हेच जीवनाचा सार आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत
No comments:
Post a Comment