Sunday, May 12, 2019

बदलासाठी नेहमी तयार राहा

आपण लहानपणापासून टोपीविक्या माणसाची गोष्ट ऐकत आलो आहे. त्याच्या टोप्या माकडं घेऊन जातात. माकडं माणसांची नक्कल करतात. त्यांच्या या कमकुवतपणाचा लाभ उठवत तो माणूस आपल्या टोप्या परत मिळवतो. आता तेच अनुभव तो माणूस आपल्या मुलाशी शेअर करतो. मुलगा टोप्यांचे गाठोडे घेऊन दुसर्याला गावाला जाण्यासाठी बाहेर पडतो. वाटेत दाट झाडांच्या सावलीत त्याला थोडी विश्रांती घ्यावीशी वाटते. तिथे लवंडतो. त्याला झोप लागते. तो झोपेतून उठल्यावर पाहतो तर गाठोड्यात टोप्या नाहीत. वर झाडावर बघतो तर झाडावरच्या माकडांनी त्या टोप्या आपल्या डोक्यावर घातलेल्या असतात. त्याला वडिलांनी सांगितलेला अनुभव आठवतो. तो लगेच आपल्या डोक्यावरची टोपी काढतो आणि खाली जमिनीवर आपटतो. पण नवलाची गोष्ट अशी की, एकाही माकडाने आपल्या डोक्यावरची टोपी काढून फेकली नाही. कुणीच त्याची नक्कल केली नाही. तेवढ्यात जवळच्या झुडपातून एक माकड येते आणि खाली पडलेली टोपी उचलून पळून जाऊ लागते. त्या माकडाला सांगायचं असतं की, आम्ही आमच्या चुकांमधून शिकलो आहोत. आमचा सिल्याबस आम्ही बदलला आहे. आता आम्ही माणसांची नक्कल करत नाही. याचा अर्थ साफ आहे, काळानुसार बदलण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे.

परिवर्तनाचा अंदाज घ्या
आपण आपल्या आजूबाजूला घडलेल्या घटनांपासून काही शिकण्याचा प्रयत्न न करता जुन्याच शिकवलेल्या फॉर्म्युल्याशी चिकटून बसलेले असतो. त्याच्यावरच आपण विश्वास ठेवतो. आणि मग अपयश आलं की, आपण चकित होऊन जातो. आपल्याला आपण योग्यच केलं आहे, असं वाटत असतं. मोठ्या कंपन्यादेखील काही वर्षांनंतर मार्केटिंग स्ट्रेटजी, प्रचार यंत्रणा, जाहिराती आणि इतकंच नव्हे तर आपल्या लोगोबरोबरच रंगामध्येही बदल करीत असतात. त्यांना माहित असतं की, जुन्या फॉर्म्युल्याने नव्या जमान्यातील बिझनेसमध्ये यश मिळवता येत नाही. माणसाकडे जुन्या गोष्टींकडे चिकटून राहण्याची प्रवृत्ती असते, पण बदल स्वीकारायचा असेल तर त्याला कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायला हवे.
आपल्या क्षमता वाढवा
भारतीय क्रिकेट टीमने 1983 मध्ये पहिल्यांदा विश्वकप जिंकला होता.त्या अंतिम सामन्यात भारताने पहिल्यांदा खेळताना वेस्ट इंडिजला 183 धावांचं लक्ष्य दिलं होतं. आणि तेही 60 षटकांमध्ये! आजच्या परिस्थितीत ही धावसंख्या 20-ट्वेंटी खेळात सहजपणे उभारली जाऊ शकते. इतकं ते सोपं आणि सुलभ झालं आहे. हे स्पष्ट आहे की,वेळेबरोबरच व्यक्ती व्यक्तींमधील सामर्थ्य आणि स्किल्स यांचीही वाढ झाली आहे. जुनी बेंचमार्क्स आता आपल्याला धोकादायक ठरू लागली आहेत. त्यामुळे स्वत:ला अपडेट ठेवण आवश्यक आहे. आजच्या परिस्थितीनुसार संसाधनं सहजरित्या उपलब्ध होत आहेत. पण याचबरोबर कॉम्पिटिशनदेखील अधिक वाढलं आहे.
डार्विनचा सिद्धान्त समजून घ्या
डार्विनचा सिद्धान्त प्रोग्रेस किंवा डेवलपमेंटसाठी बदल आवश्यक आहे, हेच सांगतो. बदलाशिवाय कोणत्याही फिल्डमध्ये फक्त प्रोग्रेसच नव्हे तर सर्वाइवलदेखील शक्य नाही. सर्वाइवलसाठी स्ट्राँग किंवा इंटेलिजंट असण्याबरोबरच बदल स्वीकारणे आवश्यक आहे. बाजाराच्या स्वरुपात आलेले परिवर्तन पाहता जर आपण स्वत:ला त्यानुसार बदलले नाही तर डार्विनच्या सिद्धान्तानुसार आपले अस्तित्वदेखील टिकू शकत नाही. (सुशील चौधरी या मोटिवेशन स्पीकरच्या भाषणाच्या आधारावर

No comments:

Post a Comment