Monday, May 27, 2019

गुन्हेगार लोकप्रतिनिधी आणि आम्ही


सतराव्या लोकसभेत निवडून आलेल्या जवळपास निम्म्या खासदारांवर विविध प्रकारचे गुन्हे नोंद आहेत. 'असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' म्हणजेच 'एडीआर' या संस्थेने ही आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. या संस्थेच्या पाहणी अहवालानुसार 539 पैकी 233 खासदारांवर गुन्हे नोंद आहेत.  यातल्या चाळीस टक्के खासदारांवर तर गंभीर प्रकारचे गुन्हे आहेत. तीस टक्के खासदारांवर बलात्कार,खून,खुनाचा प्रयत्न,महिला विरोधात गुन्हे नोंद आहेत. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये गुन्हे नोंद असलेल्या खासदारांचे प्रमाण 26 टक्क्यांनी वाढले आहे. याचा सरळ अर्थ असा की, आणखी काही वर्षांनी शंभर टक्के खासदारांवर गुन्हे नोंद असतील. आता ही बातमी वाचल्यावर कुणालाच चीड किंवा संताप आला नाही.कारण आता ते गृहीत धरले गेले आहे.
लोकप्रतिनिधी हा गुंड, माफिया,बलात्कारी,खून अशा विविध गुन्ह्यात अडकलेला असतोच,त्याशिवाय तो लोकप्रतिनिधी कसला? असे म्हणण्याची वेळ आली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर त्याला कायद्याची भीती राहत नाही. उलट  आता त्याला अभय मिळत राहतं. कायद्याची अंमलबजावणी करणारा घटक आता त्यांचा गुलाम बनलेला असतो. पोलीस खाते अपराध केलेल्या माणसाला पकडतात,पण त्याला सोडवायला राजकीय व्यक्तीच जातात.लोकप्रतिनिधीला  उलट भांडणे सोडवण्याचा मान मिळतो. हीच मंडळी न्यायनिवाडा करायला बसतात. आणि समाजात आपसूक प्रतिष्ठा मिळवतात.आपल्या देशात इतर कुठल्याही घटकापेक्षा राजकारणी किंवा लोकप्रतिनिधी यांना अधिक मान,प्रतिष्ठा दिली जाते.इथे संस्काराशील पिढी घडविणाऱ्या शिक्षकाला प्रतिष्ठा नाही. इतर कोणत्याच लोकांना इतके महत्त्व नाही,जितके लोकप्रतिनिधीला आहे. त्यामुळेच आजची पिढी पुढाऱ्यांच्या नादाला लागून भरकटत चालली आहे. पुढाऱ्यांचे आदेश शिरसावंद्य मानून त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट प्रमाण मानण्यात धन्यता मानली जाते. त्यांच्यासाठी वाट्टेल ते करायला आजची युवा पिढी तत्पर आहे.  लोकप्रतिनिधी साठी युवा पिढी मारहाण करायला, खून किंवा खुनाचा प्रयत्न करायला तयार असेल तर त्यांचा आदर्श कोण असणार? ज्या लोकप्रतिनिधीवर सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत,तो त्यांच्या दृष्टीने मोठा हिरो! असे असेल तर कुणाला चीड किंवा संताप येणार आहे. या प्रवाहापासून लांब असलेला व्यक्तिदेखील चीड व्यक्त करत नाही,कारण त्याला यांच्याशी काही देणेघेणेच असत नाही. आपला समाज बधीर झाल्याची ही लक्षणे आहेत. यांनी आता  आपला आदर्शदेखील बदलला आहे. त्यामुळे आपला देश नेमका कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे,याची कल्पना येते. उद्या कदाचित इर्षेने सगळेच गुन्हेगार बनतील,कारण गुन्हेगाराला प्रतिष्ठा मिळत असेल तर तसा प्रकार करायला सगळेच तयार होतील.आज जे लोक दोन नंबरचा पैसा कामावताहेत असे सावकार,माफियाच काय अधिकारी,डॉक्टर,बिझनेसमन चार गुंड पाळून आहेत. हा मक्ता आता फक्त राजकारण्यांकडे राहिलेला नाही. मग संसदेत गेलेल्या निम्म्या खासदारांवर गुन्हे असले तर त्याचे आश्चर्य वाटायचे काहीच कारण नाही.

No comments:

Post a Comment