Monday, May 27, 2019

अरे, कुणी तरी कृत्रिम पावसाचं मनावर घ्या


राज्यातल्या दुष्काळी तालुक्यातील जनतेचे पाण्याविना होणारे हाल बघवत नाहीत. माणसांचे जिथे पाण्याविना हाल सुरू आहेत,तिथे जनावरांचे काय घेऊन बसलात! ओला चारा तर कुठेच नाही. कडबासुद्धा आता कुठे मिळेनाशी झाली आहे. चारा नाही,पाणी नाही,अशा बिकट परिस्थितीत जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवला जात आहे. दूध व्यवसाय करून कसे तरी पोट भरणाऱ्या दुष्काळी जनतेचा हक्काचा घासदेखील आता हिरावून घेतला जात आहे. राज्यातल्या दुष्काळी भागात  चारा छावण्या उभारल्या जात असल्या तरी जनावरांसह अख्खे कुटुंबच या छावण्यांच्या आश्रयाला आल्याचे विदारक चित्र दिसत आहे. कामधंदा सोडून जनावरांच्या पोषणासाठी लोक छावण्यांमध्ये तळ टाकून आहेत. 

घरात राहिलं तरी पिण्याच्या आणि वापराच्या पाण्यासाठी वणवण करण्यापेक्षा छावण्यांमध्येच कुटुंब थाटून शेतकरी हतबल होऊन बसला आहे. छोट्या मोठ्या गावांमध्ये विकतच्या शुद्ध पाण्याचा गोरखधंदा फोफावला आहे. अशा परिस्थितीत शासन आणि प्रशासनाने पावसाच्या आघाडीवर काही तरी उपाययोजना करणं भाग आहे,पण कुणीच याकडे लक्ष द्यायला तयार नाही. गेल्यावर्षी कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची चर्चा झाली. सोलापूर जिल्ह्यात यासाठी काही प्रमाणात प्रयत्न झाले,पण त्यातून भरीव काही हाती लागले नाही. मुळात कृत्रिम पावसाचे प्रयोग खर्चिक आहेत.त्यामुळे त्याबाबत फार चिकाटीने, संशोधनात्मक प्रयत्न व्हायला हवेत.पण शासन आणि प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही.
कायम दुष्काळी तालुक्यांसाठी आता कृत्रिम पावसाचे प्रयोग होणे गरजेचे आहे. अलीकडच्या काळात पाऊसमान कमी होत आहे.जमिनीतील पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे. तरीही माणसे चाळण करायचे थांबेनात. गर्भातच पाणी नसेल तर येणार कोठून? पानी फाउंडेशन सारख्या सामाजिक संस्था पावसाचे पाणी जीरवण्यासाठी जलसंधारणाची कामे करत आहेत.पण पाऊसच पडला नाही तर ही कामे वायफटच जाणार आहेत.
गेल्या दोन चार वर्षांत पावसाचे प्रमाण कमीच होत आहे. रब्बी-खरीप हाताला न लागण्याचा प्रकार गेल्या दोन वर्षात सलगपणे घडला आहे. त्यामुळे अनेक आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. ग्रामीण भागातील बाजार पेठेतील आर्थिक उलाढाल मंदावली आहे. शेतकरी सावकाराच्या कचाट्यात सापडत चालला आहे. शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. याला खरे तर पाणी हा घटक महत्त्वाचा आहे. ज्या ठिकाणी पाणी आहे,तिथे आर्थिक सुबत्ता आहे.त्यामुळे शासन कर्त्यांनी पाण्याचा बंदोबस्त करायला हवा. सिंचनाच्या माध्यमातून ही सोय करणे आवश्यक आहेच,पण आता कृत्रिम पाऊस पाडून त्याची उपलब्धता करणे शक्य आहे. मागे काँग्रेस आघाडी काळात जयंत पाटील अर्थ मंत्री असताना 'जयंत' विमानातून कृत्रिम पाऊस पाडण्याचा काही प्रमाणात यशस्वी प्रयत्न केला.पण त्यात सातत्य ठेवायला हवे होते. आज त्यात चांगली सुधारणा झाली असती आणि त्याचा राज्याला चांगला उपयोग झाला असता. गेल्यावर्षी याबाबतीत प्रयोग झाले असले तरी त्यातून फारसे हाताला लागलेले नाही. आपल्या भारतात अवकाश यंत्रणा सक्षम आहे,पण त्याचा लाभ घेण्यात राजकीय मंडळी उदासीनता दाखवत आहेत. अन्य देशात आणि कमी पावसाच्या प्रदेशात कृत्रिम पाऊस नियमितपणे पाडला जात आहे. या माध्यमातून पाहिजे त्या ठिकाणी पाऊस पडला जातो आणि उत्तमरीत्या पिके घेतली जातात. 2011 च्या भीषण दुष्काळावर मात करताना चीनने वैज्ञानिक पद्धतीने कृत्रिम पावसाचे प्रयोग यशस्वी करून दाखवले आहेत. इस्रायलच्या शास्त्रज्ञांनी सुद्धा कृत्रिम पावसाच्या माध्यमातून 15 ते 20 टक्के पावसाचे प्रमाण वाढवण्यात यश मिळवले आहे.  मग आपल्याकडे का दुर्लक्ष केले जात आहे.
पाणलोट क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडून शेती आणि पिण्यासाठीच्या पाणी टंचाईवर मात करता येऊ शकते. फक्त यासाठी इच्छा शक्तीची आवश्यकता आहे. बारामती परिसरात कृत्रिम पावसासाठी उभारण्यात आलेली यंत्रणा आता गंजून गेली आहे. आता पुन्हा नव्याने ही यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे. यासाठी लागणारी छोटी विमाने, ढगांमध्ये फवारणी करणारी यंत्रणा आणि रासायन ,हेलिपेड अशा बऱ्याच यंत्रणांची आवश्यकता भासणार आहे. आणि मुळात शास्त्रज्ञाची यशस्वी टीम यासाठी लागणार आहे. राज्य शासनाने यासाठी आता गुंतवणूक करायला हवी आहे. दरवर्षी काही प्रमाणात गुंतवणूक वाढत नेण्याची गरज आहे.आता शासनाने फक्त चर्चा किंवा यासाठी आश्वासने देण्याची भाषा बंद करून खरोखरच कृत्रिम पावसासाठी यंत्रणा उभी करण्यासाठी आणि पाऊस पाडण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.जेवढ्या लवकर हालचाल होईल,तेवढ्या लवकर प्रयोग प्रत्यक्षात येईल. नाही तर उशीर झाला तर यंदाचे वर्ष देखील वाया जाण्याची भीती आहे. आता असे वर्षे वाया घालवणे परवडणारे नाही.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7038121012

No comments:

Post a Comment