Friday, June 11, 2021

जगाला प्रेमाचा संदेश देणारे सानेगुरुजी


भारताला निर्मळ विचार आणि निरामय वृत्ती यांची गरज आहे,असे सानेगुरुजी म्हणत. प्रांतीयता, फुटीरता, जातीयता, कडवी आणि अंध भाषिकता हे देशाच्या प्रकृतीशी आणि संस्कृतीशी विसंगत आहे. आपण सारे एक आहोत. सारे प्रांत,भाषा माझे आहेत, आपण सारे भाऊ आहोत, असे ते म्हणत. सर्व भारतीय भाषांचा अभ्यास करणारे आंतरभारतीसारखे नवभारताच्या निर्मीतीचे एखादे मंदिर असावे, असे त्यांना वाटे. 

पांडुरंग साने एम.ए.झाल्यावर अंमळनेर येथील एका शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले आणि ते साने गुरुजी झाले. त्याचवेळी त्यांनी वसतिगृहाची जबाबदारीही स्वीकारली. तिथे त्यांनी मुलांसाठी अनेक उपक्रम सुरू केले. 'विद्यार्थी' मासिक सुरू केले. मुले वाचन,मनन, श्रवण आणि प्रतिपादन यांतून समृद्ध व्हावीत असे त्यांना वाटे. शिक्षणाविषयी सानेगुरुजी यांची एक निश्चित भूमिका होती. ते म्हणत,'शिक्षक हा मुले आणि पुस्तके यांमधला दलाल नसतो, तो पुस्तकातील ज्ञानाचा भार वाहणारा हमाल नसतो, मुलांना जीवनदृष्टी देणारा त्यांचा मार्गदर्शक व मित्र असतो.'

त्यांच्या शाळेत घडलेली एक गोष्ट. एका मामलेदार साहेबांचा मुलगा अभ्यासात बेताचा होता. गुरुजींनी त्याच्या प्रगतीपुस्तकांत नोंद केली,'Weak in study.' साहेबांनी याबाबत गुरुजींकडे विचारणा केली,'मुलगा कच्चा कसा राहतो?शिक्षक काय करतात? गुरुजींनी त्यांना उलट विचारले,'मुलगा शाळेत सहा तास असतो. त्याचे पालक काय करतात?'

खरा शिक्षक काय करतो याविषयी गुरुजी लिहितात, 'खरा शिक्षक मुलांना भूतकाळाची कल्पना देऊन, भविष्यकाळाच्या दरवाजापर्यंत आणून ठेवतो. आजपर्यंत जगाने काय केले याची कल्पना देऊन उद्या मानवजातीला काय करायचे आहे,याची सूचना देतो. अशा विशाल दृष्टीचे शिक्षक मुलांना मिळायला हवेत. 

सानेगुरुजी 'छात्रालय' नावाचे दैनिक चालवत. त्यात ते मुलांना 'नित्य नवा दिस जागृतीचा' दाखवत असत. त्यात इतिहास असे, समाज दिसे, शिक्षण भेटे, धर्म लाभे. गुरुजींचा हेतू विद्यार्थी घडवणे हा होता. या मुलांचे हात कामसू हवेत, बुद्धी कर्तव्यपरायण व्हावी, मन मोठे व्हावे यासाठी ते सतत प्रयत्नरत होते. मुलांनी आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा म्हणून त्यांच्यासाठी सानेगुरुजी यांनी अनेक व्यक्तीचारित्रे लिहिली. राणी लक्ष्मी,अब्राहम लिंकन, रवींद्रनाथ टागोर, गौतम बुद्ध, रामकृष्ण परमहंस, संत मीराबाई, संत जनाबाई, देशबंधू अशी  कितीतरी देश-परदेशातील आदर्श व्यक्तिमत्त्वे त्यांनी लिहिली. त्यांचा व्यासंग दांडगा होता. 

गुरुजी हे एक राष्ट्रीय शिक्षक होते. त्यांच्या आईवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. आई गेल्यावर त्यांनी मातृभूमीला आपली आई मानले. मातृदेवतेच्या जागी त्यांनी राष्ट्रदेवतेची प्राणप्रतिष्ठा केली होती. देशाची बांधिलकी हे त्यांच्यापुरते सर्वोच्च मूल्य होते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. देशसेवेला वाहून घेतले. अनेकदा त्यांना तुरुंगवास झाला,पण ते तिथेही गप्प बसले नाहीत. तिथे त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली. तामिळनाडूतील त्रिचनापल्ली कारागृहात असताना त्यांनी तिरुवल्लूवर यांच्या 'कुरल' काव्याचे मराठीत भाषांतर केले. धुळ्यातल्या कारावासात विनोबा भावे तुरुंगातल्या कैद्यांना गीताप्रवचने देत.ते शब्दबद्ध करण्याचे काम सानेगुरुजी यांनी केले.  विनोबा भावे यांचे ते शिष्य बनले. संस्कृत, कन्नड,तेलगू, मल्याळम, हिंदी, बंगाली आदी भाषा ते संपर्कातून ऐकून शिकले. बोलून त्या भाषांचे जाणकार झाले. त्या भाषेतील ग्रंथ त्यांनी मराठीत अनुवादित केले. अटकेत असताना त्यांनी बालगोपाळांसाठीही अनेक पुस्तके लिहिली.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताचे उराशी बागळलेले स्वप्न पूर्ण झाले. पण आपला नवभारत कसा असावा, याचेही चित्र त्यांनी रेखाटले होते. यावर त्यांनी लिहिले आहे,' भारतात सारे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. द्वेष शमले आहेत. लोक परस्परांची संस्कृती अभ्यासत आहेत. अनेक भाषा शिकत आहेत. विकास करून घेत आहेत. ज्ञानाविज्ञान वाढत आहे. कला फुलत आहे. व्यक्तीस्वातंत्र्यासाठी प्रतिष्ठा राखणारा समाजवाद आला आहे. अज्ञान,रूढी, रोग नष्ट होत आहेत. प्रयोग चालले आहेत. हिमालयावर युवक चढाई करत आहेत. ज्ञानासाठी समुद्राच्या तळाशी जात आहेत. ज्ञानासाठी नचिकेताप्रमाणे मृत्यूशी स्नेह करत आहेत.'

देश स्वतंत्र झाला,पण देशभर भ्रष्टाचाराचे, जातीयतेचे, ध्येयशून्यतेचे धुके दाटत चालले. त्यामुळे गुरुजी खचले. आणि शेवटी त्यांनी 11 जून 1950 रोजी आपला देह ठेवला.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment