Sunday, June 6, 2021

जास्तीतजास्त किती वर्षे जगू शकतो माणूस?


शास्त्रज्ञ माणसासंबंधीत अनेक गोष्टींसंदर्भात संशोधन करत आहेत. त्यात माणूस जास्तीतजास्त किती वर्षे जगू शकतो, यावरही संशोधन सुरू आहे. अर्थात संशोधक आणि जाणकारांना हा प्रश्न आज नाही तर अनेक वर्षांपासून पडला आहे. आपल्याकडे आपले पूर्वज जास्तीतजास्त वर्षे जगले असल्याचे लोक सांगत असतात. मात्र याचे लिखित प्रमाण किंवा दस्तावेज नाही. त्यामुळे या बोलण्याला अर्थ राहत नाही.कारण कुठल्याही गोष्टीला पुरावा हवा असतो. पुराव्याअभावी कोणतीच गोष्ट प्रमाण होत नाही. पण तरीही आपल्याकडच्या अनेकांकडे पूर्वजांच्या जगण्याबाबत अनेक कथा,गोष्टी आहेत. माझे आजोबा अमूक इतकी वर्षे जगले, तमूक वर्षे जगले,असे माणसे म्हणत असतात. ते आपल्या पिढीला किंवा आपल्या संबंधित लोकांना हे अभिमानाने  सांगत असतात.

आजच्या काळाचा विचार केला तर वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील स्वामी शिवानंद महाराज यांच्याबाबत सांगितलं जातं की, त्यांनी वयाची 125 वर्षे पार केली आहेत. मार्च 2021 मध्ये स्वामी शिवानंद महाराज वारणासीहून गोरखपूरला गेले होते, तेव्हा तिथल्या त्यांच्या शिष्यगणांनी स्वामींच्या वयाबाबत लवकरच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले होते आणि मिडियांनी ही बातमी प्रसिध्द केली होती आणि दाखवली होती. स्वामी शिवानंद महाराज या जगातील सर्वाधिक वयाची जीवित व्यक्ती असल्याचा त्यांचा दावा आहे. 

स्वामी शिवानंद यांचा लिखित दस्तावेज आहे. म्हणजे त्यांच्या पासपोर्टवर त्यांची जन्मतारीख 8 ऑगस्ट 1896 अशी आहे. या पासपोर्टवर ही तारीख कशी आली आणि त्याला काय आधार आहे, याचा मात्र अधिक खुलासा करण्यात आलेला नाही. आणि तसं झालं तर स्वामी शिवानंद हे आजच्या घडीला जगातील सर्वाधिक वयाची जीवित व्यक्ती म्हणून नोंद व्हायला काहीच हरकत नाही. 

याचा अर्थ असा की त्यांनी फ्रान्सच्या महिला जीन कालमें यांच्या नावे सर्वाधिक आयुष्य जगलेली व्यक्ती म्हणून जो विक्रम प्रस्थापित आहे,तो मोडला जाईल. जीन कालमें या 122 वर्षें जगल्याची नोंद आहे. एखादी व्यक्ती जास्तीतजास्त किती वर्षांपर्यंत जगू शकते, याचा सातत्याने अभ्यास केला जात आहे. मोंट्रीयल (कॅनडा) च्या मॅकगील युनिव्हर्सिटीमध्ये बायोलॉजिस्टसची एक  टीम या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अनेक वर्षांपासून संशोधन करत आहे. पण ते अजून एका ठाम अशा निष्कर्षापर्यंत पोहचलेले नाहीत. या अभ्यासाचे नेतृत्व करणारे शास्त्रज्ञ सिगफ्रेड हेकिमी यांचं म्हणणं असं की, ते 1968 पासून अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स ,जपान आदी देशांतील जास्तीतजास्त वर्षे जिवंत असलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवून आहेत. सध्याच्या त्यांच्या हजारो व्यक्तींच्या दस्तावेजानुसार त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की, माणूस जास्तीतजास्त 115 वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतो. मोंट्रीयलच्या मॅकगील युनिव्हर्सिटीचे हे संशोधन 2017 मध्ये विश्वप्रसिध्द 'नेचर' जर्नलमध्ये प्रसिध्द झाले आहे. यानंतर या संशोधनावर जगभर बरीच चर्चा झाली. अनेक देशांतल्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन मान्य केलेले नाही. कारण याबाबत प्रत्येक देशातील परिस्थिती वेगवेगळी आहे. काही देशांच्या नोंदी उपलब्ध नाहीत. तरीही आजच्या घडीला किंवा उपलब्ध नोंदीनुसार जीन कालमें याच सर्वाधिक आयुष्य जगलेल्या व्यक्ती आहेत. त्या त्यांच्या वयाच्या 122 व्या वर्षी निधन पावल्या. 

मॅकगील युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी याबाबत आणखी एक निष्कर्ष काढला आहे. त्यानुसार आज ज्यांनी वयाची 110 वर्षे ओलांडली आहेत, ते पुढे आणखीही काही वर्षे जगू शकतात. अल्बर्ट आईस्टीन कॉलेज ऑफ मेडिसिनचे मॉलिक्युलर जेनेटिसिस्ट ब्रॅण्डन मिल्होलॅण्ड यांचेही म्हणणे असे की, माणूस वयाच्या 125 वर्षांपर्यंत जिवंत राहण्याची शक्यता 10 हजारांमध्ये एक असे आहे. मिल्होलॅण्ड यांच्या म्हणण्यानुसार माणसाचं सरासरी वय वाढत असलं तरी जास्तीतजास्त आयुसीमा वाढू शकत नाही. त्यालाही एक सीमा आहे. 19 व्या शतकापासून आतापर्यंत माणसाचं सरासरी वय वाढलं आहे,याला वॅक्सिन, अँटिबायोटिक्स, कॅन्सरसारख्या घातक आजारांवर उपलब्ध झालेले उपचार आणि खाण्यापिण्यात झालेली सुधारणा आदी गोष्टी कारणीभूत आहेत. मात्र हेच प्रमाण सातत्याने पुढे अबाधित राहील,याची काही शाश्वती नाही. शेवटी प्रत्येकाची एक क्षमता आहे. कारण एका मर्यादेनंतर कोशिका निष्क्रिय व्हायला लागतात. त्यामुळे मग माणसाच्या जिवंत राहण्याला विराम मिळतो. त्याचबरोबर असंही पाहिलं गेलं आहे की, जे लोक उत्तमप्रकारे जगले आहेत, आपल्या आरोग्याची चांगली काळजी घेतली आहे, त्यांचे शरीर देखील वयाच्या 110 वर्षांनंतर क्षीण होत जाते. त्यामुळे शास्त्रज्ञांनी 115 वर्षे हे माणसाचे सरासरी अधिकतम वय मानले आहे. अर्थात हे काही सर्वमान्य झालेलं नाही. अजूनही काही वर्षे यावर संशोधन होत राहील, मग एक प्रमाण निश्चितच मान्य केले जाईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment