Sunday, May 30, 2021

तंबाकू व तंबाकुजन्य पदार्थांचे व्यसन घातक


भारतासारख्या विकसनशील देशामध्ये धूम्रपान करण्याचे वाढते प्रमाण आणि त्यातून होणारे धोके ही खरं तर फार मोठी चिंतेची बाब आहे.  आणखी एक चिंताजनक गोष्ट म्हणजे देशात धूम्रपान करणार्‍यांमध्ये महिला आणि लहान मुलांचीही संख्या वाढत आहे.  पाश्चिमात्य देशांमध्ये धूम्रपान करण्याचे व्यसन कमी होत असताना, भारतात मात्र सर्व प्रयत्न होत असूनही तरुणांमध्ये हे व्यसन मोठ्या प्रमाणात आणि वेगाने पसरत आहे.  बरेच तरुण हे छंद किंवा दिखावा म्हणून सिगरेट ओढायला, तंबाकू किंवा गुटखा-मावा खायला सुरू करतात. काही तरुण त्यांच्या मानसिक त्रासातून मुक्त होण्यासाठी काही क्षण धूम्रपान करायला किंवा तंबाकू खायला सुरवात करतात आणि काही दिवसातच त्याची लत लावून घेतात. देशात धूम्रपान किंवा तंबाकुजन्य पदार्थांचे सेवन करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीचा अंदाज यावरूनही काढला जाऊ शकतो की, अमेरिका आणि चीननंतर भारत तंबाखू उत्पादनाच्या बाबतीत जगातील तिसरा मोठा देश आहे आणि चीननंतर जगात धूम्रपान करणार्‍यांची सर्वाधिक संख्या भारतात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार,जगात धूम्रपानामुळे दररोज सुमारे अकरा हजार म्हणजेच दरवर्षी चाळीस लाख लोक मृत्यूमुखी पडतात, त्यापैकी जवळजवळ एक तृतीयांश लोक भारतात मरण पावतात.  दरवर्षी देशात 13 लाखाहून अधिक मृत्यू तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोग, दमा, हृदय रोग यासारख्या विविध आजारांमुळे होतो.  दरवर्षी धूम्रपानातून मृत्यूरुपी धुरामध्ये कोट्यवधी रुपयांचा चुराडा होतो. आकडेवारीवर नजर टाकल्यास, जगात दररोज एक अब्जाहून अधिक लोक धूम्रपान करतात, ज्यात भारतात धूम्रपान करणार्‍यांची संख्या अकरा टक्क्यांहून अधिक आहे. एका अहवालानुसार भारतात 10 कोटींपेक्षा अधिक लोक धूम्रपान करतात, तर तीन कोटींहून अधिक लोक धूम्रपान करण्याबरोबरच तंबाखूजन्य पदार्थांचेही सेवन करतात.धूम्रपान करणाऱ्यांकडून  वर्षभरात सात हजार कोटींपेक्षा जास्त सिगरेटी ओढून त्याची राख करतात. दरवर्षी या सिगारेटच्या धुरामुळे वातावरण किती प्रदूषित होते, याचा अंदाज घेतला  तर लक्षात येईल की,पन्नास टन तांबे, पंधरा टन शिषे, अकरा टन कॅडमियम आणि इतर अनेक घातक रसायने वातावरणात मिसळतात.

दररोज धुम्रपानामुळे मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा वीस पट अधिक आहे, तर देशात दहा वर्षांत एड्समुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या ही धुम्रपानामुळे होणाऱ्या मृत्यूच्या एका आठवड्याइतकीच आहे.  देशात दररोज तंबाखूशी संबंधित आजारांमुळे तीन हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. यातील दहा टक्के लोक असे आहेत जे स्वत: धूम्रपान करत नाहीत, परंतु धूम्रपान करणार्‍यांच्या संपर्कात असतात.

भारतातील तंबाखू सेवन करणार्‍यांवर सर्वेक्षण करणाऱ्या 'टोबॅको इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया' या संस्थेच्या म्हणण्यानुसार, बिडी धूम्रपान हे भारतातील निम्न व मध्यम वर्गात अधिक प्रमाणात आढळते.  असा अंदाज आहे की देशात दरवर्षी शंभर अब्ज रुपयांच्या मूल्यांमध्ये अधिक बिड्यांचे सेवन केले जाते.  जर आपण धूम्रपानामुळे देशावर होणाऱ्या आर्थिक बोजाचा विचार केला तर आपल्याला असे आढळून येईल की, यामुळे भारताला दरवर्षी 26 अब्ज डॉलर्सचं ओझं  सहन करावं लागतं. उपचारावर केला जाणारा खर्च देशाला मातीत घालणाराच आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंडळाच्या म्हणण्यानुसार 2011 मध्ये देशातील 35 ते 69 वयाच्या लोकांवर तंबाखूच्या वापरामुळे सुमारे 24.4 अब्ज डॉलर्स म्हणजेच एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये खर्च करावे लागले आहेत.

धूम्रपानामुळे आरोग्यावर होणारे धोके आणि धूम्रपानातून होणारी पैशाची हानी याची आपल्याला पुरेशी काळजी नसली तरीही ही बाब मोठी चिंतेची आहे.  सिगारेटच्या पाकिटावर त्याच्या धोक्यासंबंधित वैधानिक चेतावणी छापलेली असताना आणि प्रत्येक सार्वजनिक वाहनामध्ये 'धूम्रपान निषेध' किंवा 'नो स्मोकिंग' असे फलक लावलेले असतानाही कुठेच काही फरक पडताना दिसत नाही.धूम्रपानाबाबत लोकांच्या मनात अजूनही अनेक चुकीच्या धारणा आहेत.

उदाहरणार्थ, बहुतेक लोकांना माहित आहे की धूम्रपान त्यांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठीही हानिकारक आहे, परंतु लोक अद्यापही शरीरात उत्साह,तरतरी आणणे मानसिक तणाव कमी करणे,मूड बनवणे, मन शांत करणे यांसारख्या बहाण्याआड धूम्रपान किंवा तंबाकू आणि तंबाकुजन्य पदार्थांचे सेवन करत असतात.वास्तविक मागील काही वर्षांमधील सर्व संशोधन आणि अभ्यासांद्वारे हे सिद्ध झाले आहे की ही सर्व गृहतिके पूर्णपणे निरर्थक आहेत.  जगभरातील शास्त्रज्ञ असे म्हणत आहेत की धूम्रपान केल्याने असे काही होत नाही, उलट या व्यसनामुळे शरीरात शेकडो प्रकारचे प्राणघातक रोग जन्माला घातले जातात.

जर आपण वैज्ञानिक तथ्यांकडे पाहिले तर धूम्रपान करताना निकोटिनच्या प्रमाणामुळे, सर्व मज्जासंस्था उत्तेजित होते आणि हृदयाची गती वाढते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो.  याव्यतिरिक्त,  मेंदू आणि स्नायूवर देखील आक्रमण करते, ज्यामुळे मनुष्याच्या मनःस्थिती आणि वर्तनांवर परिणाम होतो.  

सिगारेटच्या धुरामध्ये जवळपास चार हजार विषारी रासायनिक पदार्थ असतात, ज्यामुळे शरीरावर विविध दुष्परिणाम होतात.  धूम्रपान केल्याने हृदयरोग, अर्धांगवायू, विविध प्रकारचे कर्करोग, मोतीबिंदू, नपुंसकत्व, वंध्यत्व, पोटातील अल्सर, ऍसिडिटी, दमा, भ्रमित होणे अशा अनेक घातक रोगांचा धोका कित्येक पट वाढतो.  शास्त्रज्ञांनी असा निष्कर्षदेखील काढला आहे की आधुनिक काळातील ही धूम्रपान आणि मद्यपान करण्याची प्रवृत्ती नपुंसकतेच्या समस्येस मुख्यत्वेकरून जबाबदार आहे.धूम्रपान केल्याने आपली प्रतिकारशक्ती कमी होते, झोप आणि एकाग्रता कमी होते, मन अस्वस्थ राहते आणि मूत्रपिंड खराब होते.  प्रत्येक सेवन केलेली सिगारेट प्रत्येक व्यक्तीचे आयुष्यमान पाच मिनिटांनी कमी करते.  आरोग्य तज्ज्ञांचा असा दावा आहे की जे लोक दररोज दोन पॅकेट सिगारेट ओढतात त्यांचे वय साधारण आठ वर्षांनी कमी होते तर जे लोक कमी सिगारेटचे सेवन करतात त्यांचे वय चार वर्षांपर्यंत कमी होते.

 धूम्रपान न करणार्‍यांपेक्षा बिडी-सिगारेट ओढणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता तीन ते चार पट अधिक असते. सार्वजनिक ठिकाणांशिवाय बंद खोल्यांमध्ये धूम्रपान करणेदेखील खूप अधिक धोकादायक आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मतानुसार ज्या मुलांच्या पालकांना बीडी-सिगारेटचे व्यसन आहे,त्या मुलांमध्ये न्यूमोनिया, ब्राँकायटिससारख्या, श्वसन, घसा आणि छातीचे आजार असणं एक सामान्य गोष्ट आहे.या धूम्रपान करण्याच्या धोक्यांमुळे आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे की, आपण बीडी-सिगारेट पीत आहोत की बीडी-सिगरेट आपल्याला पीत आहे?धूम्रपान करण्याचे बरेच घातक दुष्परिणाम पाहिल्यानंतर आणि समजून घेतल्यानंतर, तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आयुष्य या धुराबरोबर संपवून टाकायचं आहे की धूम्रपान सोडून तुमचं आणि तुमच्या कुटुंबासाठी उत्तम आरोग्य निवडायचं आहे, याचा निर्णय आता तुमच्या हातात आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment