Sunday, May 2, 2021

तिला हवी होती स्वतःची ओळख


तमिळनाडूतल्या तिरुनेलवेली जिल्ह्यात एक गाव आहे मुक्कुडल. या गावातल्या एका अतिशय गरीब कुटुंबात अश्वीथाचा जन्म झाला. गावातल्या बहुतांश गरीब कुटुंबातील चूल फक्त एकाच उद्योगामुळे पेटत होती, तो म्हणजे विडी उद्योग.अश्वीथाची आईदेखील विडी वळायची. दहा-दहा, बारा-बारा तास राबायची, कारण घर चालवायला पैसे कमी पडत. त्यात मजुरी फारच कमी मिळायची. थोडी मोठी झाल्यावर अश्वीथाही आईला कामात मदत करू लागली.पण तिने शाळा आणि अभ्यासाची पाठ सोडली नाही. तिचं वय वाढत होतं तसं तसं तिला एक गोष्ट खटकत होती, ती म्हणजे प्रत्येक घरात तिला महिलांवर अत्याचार दिसत होते.

या विरोधात त्या महिला 'ब्र' शब्ददेखील काढत नव्हत्या. निमूटपणे सगळं सहन करत होत्या. तिला कळत नव्हतं की, बायका हे सगळं सहन का करतात? तेव्हा अश्वीथा आठ वर्षांची असेल. एक दिवस तिच्या आईने एक छोटी वही तिला वाचायला दिली आणि विचारलं की, मोजून सांग या आठवड्यात कामाचे पैसे किती झाले? तिने सगळी पानं उलटून पाहिली तर त्यावर तिला सगळीकडे तिच्या आईचा अंगठाच  दिसला. अश्वीथाच्या आईला लिहिता वाचता येत नव्हतं. ती ठार अंगठेबहाद्दूर होती. शाळेला जायचा कधी प्रश्नच आला नव्हता. मग ती सही  कशी करणार?  अश्वीथाला ते काही आवडलं नाही. तिने आईला सही करायला शिकवायचं ठरवलं. पहिल्यांदा तर तिच्या आईने शिकायला नकारच दिला. 'काय करायचं आता सही शिकून?' असा तिचा प्रश्न होता. पण मुलीच्या जिद्दीपुढं तिचं काही चाललं नाही. सही यायला लागल्यावर तिच्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र तिला बरंच काही सांगून गेला. तिच्या आईला तर एकादा गड जिंकल्याचा आनंद झाला होता.

अश्वीथा ज्या ग्रामीण समाजातून आली होती, तिथले लोक मुलीला 'ओझे'च समजत होते. त्यांच्या वाट्याला फक्त स्वयंपाक करणे, घरची साफसफाई करणे आणि मुलांचा सांभाळ करणे याच गोष्टी होत्या. अश्वीथाला लहानपणापासूनच जाणवत होतं की तिच्याकडून कुणाच्या काही अपेक्षाच नव्हत्या. त्यांचं विश्व काय ते- गरिबी, ग्रामीण आणि मुलगी. कधी कधी तर तिला वाटायचं की, तिनं जन्मालाच यायला नको होतं. विडी वळताना ती नेहमी आईला विचारायची- आई, माझं आयुष्य तुझ्या आयुष्यापेक्षा वेगळं  आहे का गं? मला कॉलेजात शिकायला मिळेल का? आई मुलीला कसं निराश करणार?, पण तिला ठाऊक होतं, तिची मुलगी ज्या गावात राहते, तिथल्या मुलींना अशी स्वप्न पाहणं शाप आहे. फक्त ती म्हणायची की, 'अगं, अगोदर हायस्कूल तर शिक.'

अश्वीथाला मात्र काळजी वाटत होती की, हायस्कूलचं शिक्षण झाल्यावर वडील आणि नातेवाईकांचा तिच्यावर लग्नाचा दबाव आणणार. तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न अगदी लहान वयातच झालं होतं. अश्वीथा तेरा वर्षाची होती तेव्हा तिला हेलन केलर यांचे आत्मचरित्र वाचायला मिळालं होतं. या पुस्तकाने तिला मोठा आत्मविश्वास दिला.'तुमचं आयुष्य फक्त तुम्हीच बदलू शकता. दुसरं कुणी बदलू शकणार नाही.' तिनं ठरवलं की, स्वतःच स्वतः चं आयुष्य बदलवायच! हायस्कूलचं शिक्षण झाल्यावर अपेक्षेप्रमाणे तिला पुढच्या शिक्षणासाठी आईवडील आणि नातेवाईकांशी झगडावं लागलं. मोठा गदारोळ माजला. परंतु शेवटी त्यांना अश्वीथाचं ऐकावं लागलं. तिला कॉलेजात प्रवेश मिळाला. तिचा अभ्यासही छान चालला,पण पदवीच्या शेवटच्या वर्षी पुन्हा घरच्यांनी लग्नासाठी उचल खाल्ली. रोज घरात लग्नाच्या कटकटी सुरू झाल्या. अश्वीथाला कुठं तरी पळून जावंसं वाटू लागलं. या दरम्यान, तिने घरापासून जवळजवळ सोळाशे किलोमीटर दूर असलेल्या दिल्लीतल्या 'यंग इंडिया फेलोशिप' साठी अर्ज केला होता.  काही 'राऊंड'च्या मुलाखतीनंतर तिला पूर्ण स्कॉलरशिपसोबत फेलोशिप मिळाली. वडील लग्नाची बोलणी करत होते, आईला मुलीची काळजी लागून राहिली होती, अशा परिस्थितीत अश्वीथाला मात्र जसे काही मनासारखी भरारी घ्यायला नवे पंख मिळाले होते. ती दिल्लीला गेली,तिथं तिला कळलं की,97 निवडलेल्या मुला-मुलींपैकी ती एकमात्र ग्रामीण कॉलेज ग्रेजुएट मुलगी होती. तिथं सगळं शहरी वातावरण.  तिला स्वतःला आपण वेगळं असल्याचं जाणवू लागलं. शिवाय भाषेची अडचण होती. पण तरीही तिने सहकारी विद्यार्थ्यांपेक्षा अधिक मेहनत घेत स्वतःला सिद्ध करून दाखवलं. फेलोशिप कार्यक्रमाच्या समाप्तीपर्यंत तिचं आयुष्यचं पार बदलून गेलं. 

दिल्लीहून परतल्यावर 2014 मध्ये तिने 'बोधी ट्री फाउंडेशन’ नावाची एक एनजीओ संस्था सुरू केली. आता ती या माध्यमातून तिथल्या परिसरातल्या मुलांमध्ये ज्ञानाची ज्योत पेटवत आहे. पायाभूत शिक्षणाबरोबरच तिथल्या मुलांना इंग्रजी भाषेचं शिक्षण, कौशल्य निर्मिती आणि करिअर संबंधित अन्य प्रशिक्षण देते आहे. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत तिरुनेलवेलीतल्या 2 हजार 400 पेक्षा अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी लाभ मिळवला आहे. काही वर्षांपूर्वी  तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी अश्वीथाचा पुरस्कार देऊन सन्मान केला, तेव्हा पूर्ण गाव तिचा हा सन्मान सोहळा टीव्हीवर पाहत होता. विडी कामगार असलेल्या आईवडिलांसाठी तर ही अभिमानाचीच गोष्ट होती. आता अश्वीथाने सामाजिक कार्यकर्ती म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. तिच्याजवळ स्वतःचा आवाज आणि स्वातंत्र्य होतं. आणि हे सगळं फक्त शिक्षणामुळं घडलं होतं.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment