अरबी समुद्रात तयार झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा जबरी तडाका कोकणासह मुंबई,ठाणे आणि पालघर आणि गुजरात किनारपट्टीला बसला.ताशी 80 ते 120 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या धडकी भरवणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याने आणि मुसळधार पावसामुळे या परिसरात मोठे नुकसान झाले आहे. गेल्यावर्षीही असाच चक्रीवादळाचा तडाका मुंबईला बसला होता. जागतिक तापमान वाढ आणि गेल्या दशकात अरबी समुद्रातील वाढलेले तापमान यामुळे यापूर्वी शांत समजल्या जाणाऱ्या अरबी समुद्रात सलग चौथ्या वर्षी पावसाळ्यापूर्वी चक्रीवादळ आले. यापुढील काळातही चक्रीवादळे येणार असल्याने महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीवर धोका पोहचू शकतो, असे हवामान अभ्यासक गेल्यावर्षापासून सांगत आहेत. आता याची दखल घेऊन या समस्येला तोंड देण्याची गरज निर्माण झाली आहे.
भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थेचे (आयआयटीएम) हवामान शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू कौल यांनी सांगितले आहे की,गेल्या शतकात अरबी समुद्राचे तापमान वेगाने वाढत आहे. त्याचा परिणाम होऊन वारंवार चक्रीवादळे होत आहेत. कार्बन उत्सर्जनातील वाढीचा हा परिणाम आहे. त्यामुळे भविष्यात अशी वादळे येतच राहतील. त्याला तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी.
सागरी तापमानवाढीमुळे आपल्यासमोर काही आव्हाने उभी राहिली आहेत. चक्रीवादळाची तीव्रता वेगवान करण्यात सागरी तापमानवाढ हे तेल ओतण्याचे काम करते. गेल्या काही वर्षांत ओच्छी, फनी, अम्फान या प्रारंभी कमकुवत असलेल्या चक्रीवादळाचे 24 तासांत तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले होते. अपवादात्मक सागरी तापमानवाढीच्या परिस्थितीमुळे हे घडले. म्हणजे आपण झोपण्यास जातो, तेव्हा कमकुवत चक्रीवादळ निर्माण होत असते, तर सकाळी उठण्याच्या वेळी ते जोरदार चक्रीवादळात परिवर्तित होते. ते आपल्या दारात पोहोचलेले असते. त्याला तोंड देण्यास आपण सिद्ध राहिले पाहिजे.
गेल्या शतकात अरबी समुद्राचे तापमान वेगाने वाढत आहे. या दशकात त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. या तापमानवाढीचा परिणाम होऊन वारंवार चक्रीवादळे व त्यांची तीव्रता या भागात वाढली. चक्रीवादळाच्या दृष्टीने अरबी समुद्र पूर्वी शांत होता. त्यात आता बदल झाला आहे. टोकाचे बदल यामुळे गेल्या पाच दशकात सुमारे 1.4 लाख लोकांनी जीव गमावले. अरबी समुद्रात चक्रीवादळाचे सलग चौथे वर्ष असून, एप्रिल ते जूनदरम्यान सलग तिसऱ्या वर्षी ते पश्चिम किनारपट्टीवर धडकले आहे. 2019 मध्ये वायू वादळामुळे गुजरातमध्ये नुकसान झाले. 2020 मध्ये निसर्ग हे पहिले चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकले.
त्यानंतर आता तोक्ते चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टी व महाराष्ट्रात धडकले आहे. चक्रीवादळासोबत जोरदार वारे आणि अतिवृष्टी यामुळे किनारपट्टीवर मालमत्तेचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते. अरबी समुद्राची तापमानवाढ ही कायम राहणार आहे. कार्बन उत्सर्जनातील वाढीचा तो परिणाम आहे. त्यामुळे भविष्यात अशी वादळे येतच राहतील. चक्रीवादळ, पश्चिम किनारपट्टीवरील जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे येणारा पूर, तसेच समुद्राच्या पाणीपातळीत होणारी वाढ याला तोंड देण्याच्या तयारीत आपण असले पाहिजे. अलीकडच्या काळात हवामान, पाऊस आणि चक्रीवादळ यांचा काटेकोरपणे अभ्यास चालू आहे. अचूक अंदाज वर्तवण्यात आता यश येऊ लागले आहे. त्यामुळे आपण करीत असलेल्या अभ्यासाद्वारे येत्या दशकात येणाऱ्या चक्रीवादळाचा अंदाज आपण बांधू शकतो. त्याचा भारतीय किनारपट्टीवर कसा परिणाम होतो आहे, ते लक्षात घेत आपण उपाय योजले पाहिजेत. या जोखमीचे मूल्यमापन करून आपण प्राणहानी आणि मालमत्तेचे रक्षण करण्यास आता सज्ज झाले पाहिजे.
अलिकडे पावसाचेही प्रमाण वाढले आहे. कुठे ना कुठे अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळे, गारपीट अशा घटना वाढल्या आहेत. मात्र यामुळे शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्याचबरोबर मोठ्या शहरांना पुराचा धोका वाढला आहे. यानेही कधी नव्हे ते शहरी लोकांना मोठा फटका बसत आहे. अलीकडच्या फक्त दोन वर्षांच्या म्हणजे 2019 आणि 2020 वर्षाच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार सरासरी 12 टक्के पाऊस अधिक झाला आहे. यावर्षीही अधिक पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कदाचित यापुढे पावसाची सरासरी वाढण्याची शक्यता आहे. अलीकडेच शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की, जगभरातील 30 होऊन अधिक पर्यावरण प्रारूपांची तुलना आणि अभ्यास केल्यानंतर पुढील काळात भारतात मान्सूनचा पाऊस अधिक तीव्र स्वरूपाचा असणार आहे. त्याप्रमाणे याचा शेतीसह अन्य घटक आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर 20 टक्के परिणाम होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे देशातील सत्ताधाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. गेल्या वर्षभरात कोरोनाने घातलेल्या थैमानाने देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. आता त्यात अतिवृष्टीमुळेही भर पडत आहे.
हवामान बदलाच्या दुष्परिणामाबाबत यापूर्वी अनेकदा देश-विदेशातील शास्त्रज्ञांनी आपल्याला अवगत केले आहे. हवामान बदलामुळे पिकांची उत्पादकता कमी होऊन भारतातील अन्नसाखळी प्रभावित होईल आणि देशातील मोठ्या लोकसंख्येवर उपासमारीची वेळ येईल, असेही सांगून झाले आहे, मात्र या इशाऱ्याकडे राजकर्त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही ही दुर्दैवाची बाब म्हटली पाहिजे. गेल्या वर्षभरात कोरोना महामारीच्या ताळेबंदी काळात खरे तर शेतीमुळे देशातील जनता तरली आहे. अन्न धान्यात आपण स्वावलंबी असलो तरी वाढती लोकसंख्या आणि अतिवृष्टीचे वाढते प्रमाण शेती चौपट व्हायला वेळ लागत नाही. मोदी सरकारच्या शेती धोरणाबाबत देशातल्या शेतकऱ्यांच्या मनात संशयाचे घर आहे. या धोरणात पारदर्शकता नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन कित्येक महिने चाललेला संप मिटवण्याची गरज आहे. हवामान बदलामुळे येणाऱ्या देशावरील संकटांकडे लक्ष देण्याची गरज आहे. अतिवृष्टीचा फटका पूर्वी फक्त शेतीला बसत होता, मात्र आता काही वर्षात शहरांनाही बसत आहे. लोकांना ऐन पावसाळ्यात स्थलांतर करावे लागत आहे.
जागतिक तापमानवाढ हा जगाच्या चिंतेचा एक विषय बनलेला आहे. आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका नव्या अहवालात म्हटले आहे की पुढील पाच वर्षांच्या काळात जगाच्या तापमानात 1.5 अंश सेल्सिअसची वाढ होणे शक्य आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक हवामान विज्ञान संस्थेने काही वैश्विक विज्ञान संस्थांच्या सहयोगातून हा अहवाल तयार केला आहे. त्यानुसार पुढील पाच वर्षांमध्ये जगात चारपैकी एकदा एक वेळ अशी येईल ज्यावेळी वैश्विक तापमान वर्षात 1.5 अंश सेल्सिअसने वाढेल. 2015 मध्ये झालेल्या पॅरिस करारानुसार ग्रीन हाऊस गॅसेसचे उत्सर्जन कमी करावे लागेल. ग्रीनहाऊस गॅसेस म्हणजे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईडसारखे काही वायू जे पृथ्वीभोवती एखाद्या ग्रीनहाऊसप्रमाणे आच्छादन तयार करतात. त्यामुळे सूर्याची उष्णता कोंडली जाते व जगाचे तापमान वाढते. अशा प्रदूषणकारी वायूंचे उत्सर्जन कमी करणे ही काळाची गरज आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment