दर आर्थिक वर्षात वायू प्रदूषणामुळे भारतीय व्यवसायाला 95 अब्ज अमेरिकन डॉलर्स (सात लाख कोटी) चे नुकसान सहन करावे लागत आहे, जे भारताच्या एकूण जीडीपीच्या तीन टक्के आहे. हा तोटा वार्षिक कर संकलनाच्या 50 टक्के किंवा भारताच्या आरोग्य बजेटच्या दीडपट इतका आहे. डलबर्ग एडवाइजर्सने हा अहवाल क्लीन एअर फंड आणि भारतीय उद्योग परिसंघ (सीआयआय) च्या सहकार्याने तयार केला आहे. या अहवालात वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या प्रचंड आर्थिक नुकसानीबरोबरच याचे आरोग्यावर होणारे विनाशकारी परिणाम समोर ठेवून वायू प्रदूषणाशी सामना करण्यासाठी त्वरित सक्रिय होण्यावर भर देण्यात आला आहे. प्रदूषणामुळे व्यवसायात झालेल्या नुकसानीचा अंदाज लावण्याचा हा पहिलाच अहवाल आहे. कंपन्या आणि धोरण निर्मात्यांना स्वच्छ हवेचे सक्रिय समर्थक होण्यासाठी प्रेरित करणे हे त्याचे उद्दीष्ट आहे.
अहवालानुसार, वायू प्रदूषणाचा आरोग्यावर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांमुळे भारतातील कामगार दर वर्षी 130 कोटी (1.3 अब्ज) दिवसांची सुट्टी किंवा रजा घेतात आणि त्यामुळे सहा अब्ज अमेरिकन डॉलरचा तोटा होतो. वायू प्रदूषणाचा कामगारांच्या मेंदू आणि शरीरावरही परिणाम होतो.त्यामुळे त्यांची उत्पादकता कमी होते आणि व्यवसायाचा महसुलाची 24 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत घट होते. याशिवाय हवेच्या कमी गुणवत्तेमुळे ग्राहकांची घराबाहेर पडण्याची इच्छा कमी होते. ग्राहकांचा बाजारपेठेत प्रवेश कमी होतो आणि परिणामी ग्राहकांशी थेट संबंधित व्यवसायांना 22 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा तोटा होतो. सन 2019 मध्ये, वायू प्रदूषणामुळे 17 लाख लोक अकाली मृत्यूमुखी पडले, जे त्यावर्षी भारतातील मृत्यूंपैकी 18 टक्के होते. 2030 पर्यंत ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भारत अशा प्रमुख देशांपैकी एक होईल जेथे अकाली मृत्यूदर जागतिक अर्थव्यवस्थेला हानी पोहचवते.
डाॅलबर्गचे संचालक (आशिया) गौरव गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, 2025 पर्यंत भारत पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी स्वच्छ हवेकडे लक्ष देण्याची गरज आहे. आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी, अग्रगण्य उद्योजकांना अधिक सामील व्हावे लागेल आणि स्वच्छ हवेच्या हालचालीसाठी प्राधान्याने प्रयत्न करावे लागतील. सीआयआयच्या उपमहासंचालक सीमा अरोरा यांच्या म्हणण्यानुसार विशिष्ट व्यवसाय आणि त्यांचे कर्मचारी यांची वायु गुणवत्ता सुधारण्यात थेट भूमिका आहे. या संदर्भात बरेच विचार करण्याची गरज आहे.
अशा प्रकारचा हा भारतातील पहिला अभ्यास आहे. हा अहवाल भारतीय व्यवसायांवर होणाऱ्या वायू प्रदूषणाच्या प्रभावाचा तीन प्राथमिक मार्गांनी परीक्षण करतो. जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्था आणि कंपन्यांवरील प्रदूषणाच्या परिणामावरील विद्यमान संशोधन यांचे संकलन आणि त्यांचे विश्लेषण केले गेले आहे. विस्तृत डेटा (मॅक्रो) विश्लेषण केले गेले. निर्देशकांमध्ये मुख्यत: आरोग्यामधील घट आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या क्रियाकलापातील घट यांचा समावेश आहे. विशिष्ट क्षेत्रांमध्ये आणि शहरांमधील वायू प्रदूषणाच्या परिणामाचा संपूर्णपणे अभ्यास केला गेला आहे, त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान आणि पर्यटन क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे.
देशाच्या जीडीपीमध्ये नऊ टक्के योगदान देणाऱ्या आणि परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याऱ्या भारतातल्या महत्त्वपूर्ण क्षेत्राला म्हणजेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला(आय टी)ही याचा फटका बसला आहे. प्रदूषणामुळे उत्पादकता कमी झाल्यामुळे दरवर्षी 1.3 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा तोटा होतो. गेल्या दशकात भारत जगातील पाचवा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे आणि जगातील 30 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 21 शहरे भारतातील आहेत. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न न झाल्यास यात आणखी वाढ होण्याचीच भीती आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment