मित्रांनो,आता तुम्ही एका मिनिटापेक्षा कमी वेळेत अडीच तासांचा एचडी चित्रपट डाऊनलोड करायला सज्ज व्हा. तसेच तुम्हाला आता कुणालाही इंटरनेटद्वारा मोठ्यात मोठी फाईल काही क्षणार्धात पाठवणं शक्य होणार आहे. आणि आता क्रिकेटची मॅच पाहायला तुम्हाला क्रिकेटच्या ग्राऊंडवर जावं लागणार नाही. कारण मोबाईलवरच तुम्हाला क्रिकेट ग्राऊंडवरचं गवताचं पातंही स्पष्ट पाहता येणार आहे. मात्र यासाठी आता तुम्हाला फक्त थोडी कळ काढावी लागणार आहे. कारण आठ-दहा महिन्यात 5 जीचा वेग आता तुमच्या दारात असणार आहे.
मिळाली ट्रायल करायला परवानगी
मोठ्या प्रतीक्षेनंतर भारतीय दूरसंचार विभागाने टेलिकॉम कंपन्यांना 5जी सेवेच्या ट्रायलासाठी परवानगी दिली आहे. 4 मे 2021 रोजी काही कंपन्यांना मिळालेल्या या परवानगीनुसार पुढचे पाच-सहा महिने तरी ट्रायल चालणार आहे. म्हणजे या कंपन्या या वर्षा अखेरीस डिसेंबर महिन्यापर्यंत किंवा जास्तीत जास्त जानेवारी-फेब्रुवारी 2022 पर्यंत 5जी सेवा भारतात सुरू करू शकतील. ज्या कंपन्यांना परवानगी मिळाली आहे किंवा एकत्रित कराराने काम करीत आहेत त्या कंपन्यांमध्ये एअरटेल, रिलायन्स, जिओ, व्होडाफोन, आयडिया या कंपन्यांखेरीज महानगर टेलिफोन लिमिटेड यांचाही समावेश आहे. या कंपन्यांनी टेलिकॉम उपकरणांच्या मूळ निर्माता कंपन्यांशी करार केला आहे,ज्यात एरिक्शन, नोकिया, सॅमसंग आणि सीडॉट या कंपन्या 5जी टेक्नॉलॉजी बहाल करतील.
वाढेल नेट स्पीड
5 जी अवतरल्यावर एक प्रकारचा वायरलेस कनेक्टिविटीचा दौर सुरू होईल. यामुळे जीबीपीएसच्या वेगाने डेटा ट्रांसफर होईल.याचाच अर्थ असा की, इंफॉर्मेशन (माहिती) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचण्यासाठी सेकंदाच्या हजाराव्या भागाचाही वेळ लागणार नाही. म्हणजे इतका कमी वेळ लागेल की, आपल्याला ते सांगताही येणं शक्य नाही. 5जीचा अर्थ आहे, पाचव्या पिढीचे माहिती तंत्रज्ञान. आता आपण ज्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर करत आहे, तो कुठे 4जी आहे तर कुठे 3जी किंवा 2जी आहे. पण 5जी पाचव्या पिढीचे ब्रॉडबँड सेल्युलर नेटवर्क तंत्रज्ञान आहे.
सध्या जे 4जी म्हणजेच फोर्थ जनरेशन लॉन्ग टर्म इवोल्यूशन तंत्रज्ञान आहे,त्याची जागा आता 5जी घेईल. जी किंवा 2जीमध्ये मोडक्यातोडक्या आणि खरखर करत असलेल्या आवाजात वायरलेस कनेक्टिविटीद्वारा आपण एकमेकांशी बोलत होतो. शिवाय याच काळात 'एसएमएस'सारखी डेटा सर्व्हिसदेखील सुरू झाली होती. याचा अर्थ हा की या काळात मोबाईल इंटरनेटची सुरुवात झाली होती.3जी तंत्रज्ञान जेव्हा आले,तेव्हा तर एक क्रांतीयुग अवतरल्याचे वाटत होते. पण आज तेच तंत्रज्ञान मागे पडले आहे. 3जीच्या माध्यमातून आपण वेबसाईट ऍक्सेस करू लागलो, मधे मधे गोल गोल फिरणाऱ्या गोलांदरम्यान व्हिडीओ पाहायला लागलो.संगीत ऐकणं तर अगदी सोपं झालं. 4जी तंत्रज्ञानात मात्र व्हिडीओ पाहताना कधी तरच अडथळा येऊ लागला. म्हणजे आपल्या हातात अख्खं जग सामावलं. पण आता येणाऱ्या 5जीची गोष्टच वेगळी असणार आहे. हे तंत्रज्ञान आतापर्यंतचा आपला संपूर्ण अनुभवच बदलून टाकणार आहे.
कनेक्ट होणार सगळे डिवाइसेस
या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तमाम डिवाइसेस आपसात कनेक्ट होतील आणि ते रियल टाइम डायलॉग करतील. म्हणजेच तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून जे पाहिजे ते विचारू शकता आणि क्षणार्धात त्याचे उत्तरही मिळू शकेल. माहितीच्या या विश्वातील हे एक काल्पनिक स्मार्टयुग असणार आहे. एक किलोमीटरच्या आवाख्यातील 10 लाखांपर्यंतच्या मशिनी आपसात कनेक्ट होऊ शकतील आणि कुठल्याही प्रकारच्या व्यवहाराला बाधा येणार नाही किंवा त्याचा वेग मंदावणार नाही. 5जी तंत्रज्ञान पीक डेटा रेट्स म्हणजे आदर्श परिस्थितीत एका सेकंदात 20 गीगा बिट्स डेटा डाउनलोड आणि 50 गीगा बिट्स डेटा अपलोड करू शकेल.यामुळे इंटरनेट वापरकर्त्यांना डाटाचा हाई डेंसिटी मिळू लागेल. साहजिकच यामुळे कामकाजाचा वेगही वाढेल.
5जीच्या आगमनामुळे आणखीही काही फायदे होणार आहेत. मोबाईलची बॅटरी कमी खर्च होईल.5जी माहिती तंत्रज्ञानाद्वारा सेल्फ ड्राइविंग कार वाहनांचा वापर सोपा होईल.5जी नेटवर्कमुळे हाई डेंसिटी लाइव स्ट्रीमिंग शक्य होईल. या तंत्रज्ञानानंतर आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर नेहमीच्या व्यवहारातही मोठ्या प्रमाणात होईल. वर्चुअल रियालिटीसारख्या डिवाइसचाही वापर या पाचव्या पिढीच्या माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शक्य आहे. 5जीच्या वेगामुळे वस्तू पाहण्याचा आणि जाणीव करण्याचा आपला अनुभवच फक्त बदलून जाणार नाही तर त्याचे परिणामही आपल्या आयुष्याला बदलून टाकतील.
कोरोना-5G चा काही संबंध नाही
कोरोना आणि 5G चा काही तरी संबंध असल्याची चर्चा सुरू आहे.यासंबंधीत काही पोस्ट व्हायरल होत आहेत. यात सांगितलं जातं आहे की, 5G ची ट्रायल सुरू झाल्यामुळे भारतात कोरोना महामारीची दुसरी लाट भयंकर प्रमाणात उसळली आहे. कोरोना वाढीला 5Gची ट्रायल जबाबदार असल्याचं म्हटलं जातं आहे. मात्र ही पूर्णपणे अंधश्रद्धा आहे. सध्याला 5जी तंत्रज्ञानाचा जगातल्या पाच सहा देशांमध्ये व्यावहारिक दृष्टिकोनातून वापर सुरू आहे.अमेरिका,चीन, हांगकांग, दक्षिण कोरिया आणि आणखी काही युरोपीय देशांमध्ये याचा वापर सुरू असला तरी त्यात अजून सुधारणा बाकी आहेत. याशिवाय जवळपास 17 देशांमध्ये 5जी तंत्रज्ञानाचे ट्रायल चालू आहे आणि आणखी काही दिवसांत याची संख्या 35 च्या वर जाईल. जर कोरोना आणि 5जीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असता तर या देशांमध्येही कोरोनाने हाहाकार माजवला असता. वास्तविक कोरोना 197 देशांमध्ये पसरला आहे. हाच कोरोना आफ्रिकीसारख्या देशांमध्ये धुमाकूळ घालत आहे, जिथे 5जी तर सोडूनच द्या, 4जी सुद्धा तिथे पोहचला नाही. त्यामुळे 5जी आणि कोरोना महामारी यांचा दूर दूर पर्यंत संबंध नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment