Wednesday, May 26, 2021

कशाला इतका पैशाचा हव्यास?


जगात गुन्हेगार निर्माण होत नाहीत अथवा गुन्हेगारी सापडत नाही, असा देश पृथ्वीच्या पाठीवर सापडणे अशक्य. ही गुन्हेगारी विशेषतः पैशासाठी अथवा आपली हौसमौज भागविण्यासाठी केली जाते. व्यसनी लोकही याच संकल्पनेत मोडतात. डोक्यात फक्त पैसाच असल्याने परिणामांची जाणीव होत नाही तसेच क्रोधावर नियंत्रण न राहिल्याने अशा घटना घडल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी निरीक्षणे आहेत. अर्थात तेवढीच कारणे नसून व्यक्तीसापेक्ष कारणेही बदलत असल्याचे अशा तज्ज्ञांचे म्हणणे आहे. केवळ खूनच नव्हे, तर चोऱ्या, जबरी चोऱ्या, घरफोड्या, दरोडा, जीवे मारण्याचा प्रयत्न, हाणामाऱ्यांसारख्या गुन्ह्यांमध्येही अलीकडचे तरूण आणि गरजवंत, चैनीला चटावलेले ओढले जात असल्याचे वास्तव आहे. मात्र या सर्व घटनांमागे एक सार्वत्रिक कारण आहे. ते म्हणजे व्यसनाधीनता. पैशाची नशा अथवा कुठल्या ना कुठल्या त्यातही मद्याच्या व्यसनाला जवळ करणारी मुले,तरुण अशा घटनांमध्ये पटकन ओढली जात असल्याचे वास्तव आहे. त्याला काहीअंशी पोलिसही जबाबदार आहेत. 

गुन्हेगारी फोफावण्याचे मूळ पोलिसांच्याच कार्यपद्धतीमध्ये दडले आहे. मद्य संस्कृतीला चालना देणारे बार संस्कृतीचे अड्डे रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवले जातात. एखाद्या बारवर कारवाई केली म्हणजे शहरातील सर्वच बार वेळेत बंद होतात, असे नाही. किंबहूना केवळ कारवाईचे सोंग घेणे आणि अंतःकरणापासून कारवाई करणे, यातील तफावत न समजण्याइतपत जनता आता खुळी राहिलेली नाही. कारवायांचे सोंग घेऊन त्याआड पोलिस स्वार्थ साधून घेण्यात धन्यता मानतात. असे बार गुन्हेगारी प्रवृत्तींना एकत्रित आणणारे आणि गुन्हेगारीला चालना देणारे केंद्र ठरत आहेत. त्यांच्यावर पोलिसांचा आणि राजकीय पदाधिकाऱ्यांचाही वरदहस्त असल्याने हे थांबणार कसे, असा प्रश्न अनुत्तरित राहतो. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या शिरकावास सहाय्यभूत ठरणाऱ्या अशा केंद्रांवर पोलिसांनी प्रामाणिकपणे कठोर कारवाईचा दंडुका उगारला तरी भरकटणारी तरुणाई भानावर येण्यास मदत होईल. समाजातील सजग घटकांनी ओरड केली की, तेवढ्यापुरती कारवाई करायची अन् थोडे वातावरण शांत झाले की, पुन्हा येरे माझ्या मागल्या म्हणत अवैध व्यवसायांना आशीर्वाद द्यायचा, हे पोलिसांचे धोरण तरुणाईचे आणि सर्वांचेच नुकसान करीत आहे. चिरीमिरीच्या मोहात न अडकता कठोरपणे कारवाईचा बडगा उगारला तरी गुन्हेगारी विश्वामध्ये नव्याने प्रवेश करणाऱ्यांचे प्रमाण रोखण्यात पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली, असे म्हणता येईल.

विविध शहरांमध्ये वर्षानुवर्षे अवैध धंदे सर्रास चालविले जातात. थातूरमातूर कारवाई करून पोलिस आपली जरब असल्याचे भासवितात. परंतू त्यांचे हे दहाडणे म्हणजे वाघाने नव्हे, तर वाघाच्या मावशीने गळ्यातून आवाज काढण्यासारखेच. शहर आणि जिल्ह्याबाहेरील गुन्हेगारांनी स्थानिक गुन्हेगारांना हाताशी धरून गुन्हे घडवून आणले आहेत. गुन्हेगारीकडे वळू शकणारा उथळ तरुणाईचा गट त्यांच्याकडे आकर्षित झाला, तर त्यांचे मनसुबे सिद्धीस जाण्यास वेळ लागणार नाही. पोलिस हे सर्व कसे रोखणार, हा खरा प्रश्न आहे भ्रष्टाचार, शेतीवाडी, प्लॉट अशी स्थावर मालमत्ता हडपणे, लाच खाणे, खून- बलात्कार अशा अनेक प्रकारच्या गुन्हेगारीने सगळीकडे थैमान घातले आहे. अशा गुन्हेगारांना शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात असते. गुन्ह्याच्या आवाक्यानुसार गुन्हेगाराला कमी- अधिक शिक्षा होत असते. पण  त्यासाठी साक्षी-पुरावे गोळा करावे लागतात. अर्थात इथेही भ्रष्टाचार  फोफावला आहे. पैशासाठी साक्षी फिरवण्याच्या घटना आता नव्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे पैसा हा सर्वश्रेष्ठ बनला असल्याने ही दुनिया पैशाच्यामागे धावताना दिसत आहे. गुन्हेगारी संपवायची भाषा बोलायला सोपी आहे, परंतु प्रत्यक्षात अंमलात आणणे, महाकठीण आहे. आजकाल गुन्हेगारीचे यामुळेच उदात्तीकरण होत आहे. संघटीत गुन्हेगारीचे म्होरके छुप्या पद्धतीने गुन्ह्यांची सूत्रे हालवत आहेत. गुन्हेगारांना कायद्याची भिती राहिलेली नाही. त्यांना जात, धर्म, पंथ नसतो. त्यांची मानसिकताच पहिल्या गुन्ह्यापासून धीट बनलेली असते. 

फक्त शिक्षणाने गुन्हेगारांची विकृती बरी होत नाही. कठोर शिक्षा आणि संस्कार यासाठी महत्त्वाचे आहेत. गुन्ह्यासाठी शिक्षा असते तर चुकीसाठी दंड किंवा भरपाई असते.  शिक्षा ही चुकातून बोध घेण्यासाठी असते. शिक्षा विकृती घालवण्याचे काम करते. त्यासाठी गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी.  ही गुन्हेगारी रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान आवश्यक आहे. शिक्षणाने माणूस सुशिक्षित होतो, पण सुसंस्कृत होत नाही. विचार आणि संस्कार यातून माणूस घडतो. संस्कारातून नीतीमत्ता निर्माण होते.  आज तरुणांना विचार आणि संस्काराची गरज आहे आणि हे त्याला घरातून , समाजातून आणि शाळेतून मिळायला हवे. काही वर्षांपूर्वी शाळांमधून मूल्यशिक्षणाचा पाठ घेतला जायचा,पण आता अनेक विषयांच्या भाऊगर्दीत तोही बाजूला पडला आहे. वास्तविक घर आणि समाज माणसाला त्यांच्या वागण्यातून संस्कार देत असतात. आज कुठेच संस्कार दिसत नाही. गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धा यामुळे संस्कार बाजूला पडला आहे. राज्यकर्त्यांना सत्तेची लालसा लागल्याने उलट हे लोक स्वार्थासाठी अशा लोकांना आपलंसं करून घेतात. सगळीकडे पैसा, व्यसन, स्वार्थ बोकाळला असल्याने समाजाची दिशाही बिघडून गेली आहे. जी माणसे प्रामाणिक असतात,त्यांनाही जगणं सुलभ राहिलेलं नाही. पण तरीही प्रामाणिकपणा कोणी सोडू नये.  त्यांना त्यांच्या प्रामाणिकपणाचे फळ त्यांच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी मिळतेच. माणसानं सतत वाचन केलं पाहिजे. विचार केला पाहिजे.काय चूक आहे काय नाही,हे तपासलं पाहिजे. संकटात असलेल्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्याला मिळणाऱ्या एका भाकरीतून एक तुकडा गरजवंताला द्यायला पाहिजे. यातूनच समाज घडतो. माणूस घडतो. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment